Skip to main content

Lekh on Lulla Trust in 3 OCT. 2011


दान सोपं, त्याचा भाव जागवावा!
- विनिता तेलंग, सांगली

सिंधूच्या तीरावर मुळं असलेल्या व कृष्णेच्या पाण्यावर भरणपोषण झालेल्या लुल्ला परिवाराने अर्घ्यदानाचा एक अभिनव कार्यक्रम गतवर्षी केला. त्या संस्कार सोहळयाचे हे दुसरे वर्ष. आपल्या सांपत्तिक उत्कर्षाच्या काळात, निव्वळ वैयक्तिक वा कौटुंबिक हौस-मौजेत व्यय न करता, ज्या समाजामुळे आपल्याला उत्कर्ष साधता आला, त्या समाजाच्या ऋणातून अंशत: मुक्त होण्याची संधी त्यांनी अर्घ्यदानाच्या रूपाने निर्माण केली.
श्री. किशोर लुल्ला यांचे वडील श्री.तोतारामजी लुल्ला यांच्या मनात हा संकल्प होताच. त्यांच्या निधनानंतर त्यास मूर्त रूप देण्याचे श्री.किशोर व त्यांच्या कुटुंबियांनी ठरविले व त्यातून हा कार्यक्रम साकार झाला. गेल्या वर्षी त्यांच्या वडिलांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने केलेला कार्यक्रम निव्वळ नैमित्तिक, तात्कालिक उमाळयातून आलेला नव्हता; तर स्वत:ला व आपल्या परिवाराला अशा प्रकारच्या समर्पण संस्काराची एक सवय, शिस्त ते लावू पाहात आहेत. स्वत:बरोबरच समाजातही हा विचार पुन:पुन्हा रुजवू पहात आहेत, म्हणूनच गेल्यावर्षीचा एक उत्कट सोहळा चालू वर्षी एका सुंदर-अभिनव प्रथेचं रूप घेऊ पाहतोय. समाजातले दृश्य-अदृश्य समर्पित कार्यकर्ते व संस्था यांना त्यांच्या कार्यात सहयोग देण्याचा, आर्थिक साहाय्य देण्याचा कार्यक्रम आहेच, परंतु या संस्था व कार्यकर्ते यांचा सर्व समाजाशी थेट संपर्क यावा, त्यांच्या कामाची माहिती लोकांशी संवाद साधून प्रत्यक्ष देता यावी या हेतूने एक अभिनव प्रदर्शन भरविले जात आहे.

भारतीय संस्कृतीत समर्पण, दान, सहयोग या गोष्टींना नेहमीच स्थान आहे. अनेक सण-समारंभ, धार्मिक कृत्ये-एवढेच नव्हे तर म्हणी-वाक्प्रचार यांतूनही हा `संस्कार' डोकावत असतो. आपण उपभोग घेऊन जे उरेल ते तर द्यावेच, - प्रसंगी स्वत:ला तोशीस लावूनही द्यावे.... व हे सर्व सहज, स्वयंस्फूर्तीने व्हावे हा विचार आपल्याकडे खोलवर रुजलेला आहे. लहानपणी आईजवळ बसून ऐकलेल्या कहाण्यांतून अशी पुष्कळ रूपके आढळतात. अशीच एक कहाणी आहे साक्षात् श्री विष्णू व लक्ष्मीची. शेषशायी भगवान विष्णू व त्यांचे पाय चुरणारी लक्ष्मी आपण अनेक चित्रांतून पाहिली आहे. एकदा लक्ष्मीमाता अशीच पाय चुरत असताना श्री विष्णूंना तिचे हात कडक लागले. लक्ष्मीमातेनेही त्याला दुजोरा दिला व म्हणाली की, `कशामुळे कळत नाही पण माझे हात पूर्वीसारखे मऊ राहिले नाहीत. काही केले तरी त्यांचा कठोरपणा जात नाही. भगवन्, आपणच काही उपाय सांगावा.' त्यावर श्री विष्णूंनी तिला सांगितले की, `पृथ्वीवर जा व एखाद्या गरीब, अडलेल्या बाईचे स्वत:च्या हाताने बाळंतपण कर.' लक्ष्मीमातेने स्वत: पृथ्वीवर येऊन एका दरिद्री मातेची सुटका केली. तिचे सुखरूप बाळंतपण केले. त्यानंतर खरोखरच तिचे हात पूर्वीसारखे मृदू, कुसुम-कोमल बनले! किती अर्थपूर्ण रूपक आहे हे! लक्ष्मी म्हणजे संपत्तीची देवता! पैसा, धन, समृद्धी ही जोवर दीनदुबळयांच्या, गरजूंच्या प्रत्यक्ष कामी येत नाही, तोवर ती कठोर-हृदयशून्य व म्हणूनच बिनकामाची ठरणार. त्याला मार्दव येते ते कणवेने, सहानुभूतीने, सहकार्याच्या कृतीने. एरवी ते व्यर्थच!
दातृत्त्वाचे मानदंड बनलेल्या अंगराज कर्ण वा राजा हरिश्चंद्रापासून ते सध्याच्या काळात आपल्या अमाप संपत्तीचा मोठा वाटा समाजासाठी खर्च करणाऱ्या टाटा, नारायण मूर्ती इ.पर्यंत आपल्याकडे दातृत्त्वाची मोठी परंपरा आहे. जगातील अतिश्रीमंत व सर्वात दानशूर असामी म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते वॉरेन बफे हे एक दंतकथा बनून राहिले आहेत. या महाशयांनी स्वकष्टाने मिळवलेल्या संपत्तीतून एेंशी टक्के म्हणजे अब्जावधी डॉलर्सचे दान आतापर्यंत केले आहे. परवा त्यांनी शासनाला अशी सूचना दिली की माझ्यावर आपण थोडा जास्त कर बसवावा, कारण या थोड्याशा वाढीने शासनाच्या तिजोरीत माझ्याकडून कराच्या रूपाने कोट्यवधी डॉलर्सची भर पडेल, त्यातून शासनाला अनेक चांगली कामे करता येतील. यांची संपत्तीही अचाट, दानतही अफाट. पण पुढे जाऊन त्यांनी जे मनोगत अन्य श्रीमंतांसाठी मांडले. ते प्रत्येकाने विचार करण्याजोगे आहे. ते म्हणतात की, मुळात आपण कमावलेली संपत्ती ही केवळ आपण एकट्याने कमावलेली नसते; त्यावर मुळी आपला एकट्याचा हक्कच नाही. माणूस कष्टाने, सन्मार्गाने जरी श्रीमंत झाला, तरी त्यामागे त्याला (आपोआप-दैवी कृपेने) लाभलेली बुद्धिमत्ता, आईवडील, अनुकूल परिस्थिती, मिळालेल्या संधी यांचाही वाटा असतोच. त्याने त्याचा वापर केला! सर्वजणच तो करतात असे नाही. हे जरी खरे असले तरीही आपल्या मोठेपणात या सर्व घटकांचे योगदान नाकारता येत नाही. त्यामुळे हा गृहस्थ स्वत:च्या मिळकतीलाही `स्वकष्टार्जित' असे लेबल लावू इच्छित नाही आणि म्हणूनच सर्व श्रीमंतांवर भरपूर कर बसवून त्यांच्या संपत्तीचा विनियोग सरकारने करावा अशी त्याची सूचना आहे.
आपल्याकडे तरी याहून वेगळे काय सांगितले आहे? भगवद्गीतेत सांगितलेल्या कर्मयोगाला अगदी सुलभ करून श्री ज्ञानेश्वरांनी आपल्यापर्यंत पोचवले. मुळात कोणतेही कर्म करताना, फळाच्या-उपभोगाच्या लालसेने करू नको, हे `मी' करतो आहे या अहंभावनेचा उच्चारच काय, मनात विचारही आणू नको, असे कर्म करतो तो `योगी'च होय असे ज्ञानदेव सांगतात.
`आणि हे कर्म मी करीन ।
अथवा आदरिले सिद्धी नेईन ।
येणे संकल्पेही जयाचे मन ।
विटाळेना ।।
आपले विहीतकर्म हे यज्ञ मानून करावे, म्हणजे काय? तर त्यामागे संकल्प असावा, शुद्ध हेतू असावा, आपल्या कलहांची, प्रयत्नांची आहुती त्यात द्यावी, सर्व सामर्थ्यानिशी तो तडीस न्यावा व नंतर त्याचे जे `फळ', त्याचा उपभोग-प्रसादाप्रमाणे सर्वांना वाटून नंतर यजमानाने ग्रहण करावा!
विहिताचरणे, प्राप्त संपत्तीते ।
वेची काजो येथे निष्कामत्वे ।
मग स्वभावत: राहिले जे शेष ।
त्यातची संतोष । मानोनिया ।
कुटुंबासहित आपुलिया घरी ।
सेविता ते हरी। सर्व दोष ।
किंवा
म्हणोनि स्वधर्मे जे जे संपादावे ।
सर्व ते वेचावे स्वधर्मेचि ।
स्वधर्म यज्ञान्ति उरेल जे मग ।
घ्यावा त्याचा भोग संतोषाने ।
असे उदात्त विचार कदाचित आपल्याला झेपणार नाहीत, तरीही लेखक-कवी मंडळींनी हा विचार रुजवण्याचे आपले काम सुरू ठेवले आहे. कविवर्य बोरकरांनी आपल्या ललित लेखात `त्याग हा एक प्रकारचा दिव्य भोग' असे वर्णन केले आहे. आपल्या बालवयात त्यांना एकदा योगायोगाने काही त्याग करण्याची संधी मिळाली व त्याचा इतरांना झालेला उपयोग पाहून ते आनंदून गेले. त्या प्रसंगाची आठवण काढून ते म्हणतात की, त्यागाला सिद्ध होण्याच्या अशा अजून संधी मला मिळाल्या असत्या, आणि त्याचा आस्वाद कसा घ्यायचा हे मी शिकलो असतो, तर मी एव्हाना किती `मोठा' झालो असतो! त्याग करायचा तो मुळी आपल्या आनंदासाठी. ती व्यक्ती हे आपल्या आनंदाचे निमित्त असते आणि हा आनंद म्हणजे एक प्रकारचा `दिव्य भोग'च असतो.
आपल्या मनातल्या माणुसकीला उजाळा मिळाला, तर त्या दानाला अर्थ, अन्यथा ते व्यर्थ! बाहेर पाणपोया काढल्यात, अन्नकोट चाललेत पण घरच्या मोलकरणीला भाकरी देताना हात आखडत असेल तर `दान'केले पण `भान' आले नाही असेच म्हणावे लागते. येशू िख्र्तासची अशीच एक गोष्ट सांगतात. मेल्यानंतर एका दानशूर गृहस्थाला स्वर्गात स्थान मिळाले नाही म्हणून तो तक्रार घेऊन येशूकडे गेला आणि म्हणाला, `मी माझ्या पैशाने हजारो पाणपोया बांधल्या आहेत. लाखो लोकांना फुकट पाणी वाटले. तरी मला स्वर्गात जागा का नाही?' येशू हसून म्हणतात, `खरं आहे, मला माहिती आहे तू खूप पाणपोया बांधल्यास. पण एकदा रात्री मी श्रमून तुझ्या दारी पाणी मागायला आलो होतो, तेव्हा तू मला हाकलून दिलं होतंस!'
दानधर्म करणं एकवेळ सोपं आहे, पण `भाव' जागविणं फार कठीण! देणाऱ्यानं क्षणभर, कल्पनेने तरी घेणाऱ्याच्या भूमिकेत जावं, त्याच्या वेदनेला, त्याच्या अभावाला समूजन घ्यावं म्हणजे आपण देताना, उलट त्यानं आपल्याला ही संधी दिल्याबद्दल कृतज्ञता दाटून येईल. दातृत्वाची, त्यागाची देखील एक धुंदी चढू शकते. तिच्यापासून लांब राहता येईल. हे केल्याने मला इतके पुण्य मिळेल असा हिशेब पुण्य करताना ठेवला की त्यातले पुण्य संपले! दान, मदत, सहकार्य करताना त्यायोगे जे काम पुढे जाते आहे, त्यातून जे काही चांगले घडते आहे, त्याचा आनंद मिळायला हवा. देता-घेता दोघांनीही एकमेकांच्या चेेहऱ्यावरील आनंदाचे बिंब-प्रतिबिंब अनुभवावे. देणाराही तृप्त आणि घेणाराही तृप्त अशी सुंदर अवस्था यावी. कुठेही अभिनिवेश नाही वा लाचारी नाही अशी सहज स्वाभाविक कृती व्हावी.
`देण्या'ची पण एक गंमत आहे. `पैसा' या गोष्टीचं महत्त्व सर्वांनाच आहे. सर्वाधिक महत्त्वही पैशाचंच वाटतं. शिवाय तो असा उचलून हातात ठेवता येतो त्यामुळे तो सर्वांना दिसतोही. पण अशी अनेक `दानं' आहेत ज्याची मोजदाद करता येत नाही, जी अव्याहत सुरू असतात. त्याचं कौतुकही होत नाही. `वेळ देणं' `श्रम देणं' `विचार देणं' या गोष्टी खरं तर अधिक अवघड - पण दुर्लक्षित राहतात. नेत्रदानामुळं अंधांना नेत्रसुखाचा लाभ होतो. पण एखादा विचारवंत, कार्यकर्ता, समाजसुधारक सगळया समाजाला एक वेगळी `दृष्टी' देतो, त्याचंही मोल आहे! `आपल्याकडे देण्यासाठी म्हणून तरी इतका पैसा असायला हवा होता'असं म्हणून कुणी खंतावू नये. आपल्याकडे देण्यासारखं काय आहे याचा विचार करावा असं पाडगावकरांनी सांगितलंय -
ज्यांच्याकडे बाग आहे
त्यांनी आेंजळभर फुलं द्यावीत,
ज्यांच्याजवळ सूर आहेत
त्यांनी दोन गाणी द्यावीत...
`धीर देणं', `आत्मविश्वास देणं', `उभारी देणं' अशा खूप गोष्टी देण्यासारख्या आहेत. प्रत्येक कुटुंबात असे लाभार्थी-इच्छुक आहेत. त्यांना समजून घेऊन बळ देणं हेही `देणं' महत्त्वाचंच आहे! देण्याचा हा वसा, हे व्रत मगदुराप्रमाणं चालवणं महत्त्वाचं. व्रताच्या जुन्या कहाणीची सांगता अशी असे - `उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको' वसा घेणं सोपं, निभावणं फार कठीण.
प्रामाणिकपणे संस्थांना उभारी देऊ पाहणाऱ्यांनाच अनेकदा तोंडघशी पडायची वेळ येते. बांधकाम क्षेत्रातले सुधीर निरगुडकर असेच दातृत्वाचा वसा घेतलेले सद्गृहस्थ. एका शैक्षणिक संस्थेच्या उभारणीसाठी त्यांनी पैसा ओतला, जीव लावून त्या संस्थेच्या वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले. वेळ, बुध्दी, योजकता पणाला लावली. संस्था खूप मोठी झाली. नावारूपाला आली आणि नंतर त्यात कली शिरला. निरगुडकरांनाच त्या संस्थेने अलगद बाजूला केले. त्यांना हा मोठा धक्का होता. पण हा उमदा माणूस काम करायचा थांबला नाही. उलट या घटनेपासून बोध घेऊन त्यांनी `आधारवड पुरस्कार' नावाचा एक कायमस्वरूपी पुरस्कार सुरू केला. प्रत्येक संस्थेच्या उभारणीत कुणीना कुणी आपलं सर्वस्व ओतलेलं असतं. या पायाच्या दगडांचा सन्मान होतोच असं नाही, त्यांना कुठली पदंही मिळत नाहीत, अशा व्यक्तींना शोधून त्यांच्या योगदानासाठी त्यांनी हा पुरस्कार सुरू केला!
आपण करत असलेले दान `सत्पात्री' असावे हा आपला मुख्य आग्रह असतो. यात करणारा व घेणारा दोन्हीकडून प्रामाणिक प्रतिसादाची गरज असते. पूर्वी काही विशिष्ट कारणासाठी काही लोकांसाठी एक वसाहत शासनाने बांधून दिली. सर्व प्रकारच्या योजनांचे फायदे तिथे त्या लोकांना मिळाले. आज ते मूळ कारण उरलेले नाही. पण त्या लोकांना `अनुदान', `वाटप' याची इतकी सवय झालीय की ती वसाहत पूर्ण निष्क्रीय, संवेदनशून्य झाली असूनही त्या वसाहतीचा `वापर' इतर खूप संस्था करत आहेत. वसाहतीतल्या एकुलत्या एक खड्ड्यात दर महिना-दोन महिन्याला कुणीतरी वृक्षारोपण करतं. फोटो काढतं. खाऊ वाटतं. कुणी कपडे, कुणी भांडी, कुणी औषधं, सगळं फुकट! आता तर त्यांना हे घेत राहणं बरं वाटतंय! त्यांची कामाची प्रेरणाच या सवलतींच्या भडिमारानं दबून गेलीय. असा साचेबद्धपणा, साचलेपणाही समाजाला फार घातक असतो. सध्याच्या जमान्याचा दुसरा धोका म्हणजे प्रसिद्धीचा अतिरेक!

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन