Skip to main content

Maza Cloumn


दया आणि षौक
प्राणी छळ-प्रतिबंधक कायदा १९६० मध्ये आला. त्यानंतर सर्कशींवर गंडांतर आले. हत्तीला स्टुलावर बसविण्यात किंवा आसूडाच्या भीतीखाली सिंहाने शेळीच्या ताटामध्ये जेवण्यात त्या प्राण्यांचा छळ होतो असे कायद्याला वाटते. वास्तविक त्याच निकषावर माकडाला सुंदर कपडे घालून रिंगमास्तरच्या खांद्यावर मिरविणे याला सन्मान समजले पाहिजे; परंतु कायद्याला तेही मान्य होत नाही. अस्वल, माकड, वाघ, सिंह यांचे खेळ दाखवायला बंदी आहे. मनेका गांधींपासून कित्येक जीवनदयावादी प्राणीमित्र काही वर्षांपूर्वी बराच दंगा करीत असत. हल्ली तो फारसा ऐकू येत नाही.
सर्कशीतल्या प्राण्यांना ऐतखाऊपणाची सवय लागते इतके ते माणसाच्या वृत्तीचे बनतात, त्यालाही `प्राण्यांचा छळ' मानता येईल. काहीजण कुत्र्यांचे इतके लाड करतात की, आपल्याला हेवा वाटावा. माझ्या पाहण्यात एक बाई आहेत, त्या तव्यावरची गरमागरम पोळी तूप लावून तुकडे करून त्यांच्या कुत्र्याला भरवतात. त्या कुत्र्याचा आकार असा की, रेडकूसुद्धा खाऊ शकेल. झिपरी केसाळ कुत्री अंथरुणात घेऊन बसणारे प्राणी तुमच्याही पाहण्यात असतील. याउलट आमच्या शेजारी दोन गावठी कुत्री बाळगणारे एकजण आहेत. त्यांनी कुत्र्याला पट्टाही लावलेला नाही. ती कुत्री भटकत असतात, भांडत-भुंकत असतात, दुसऱ्याच्या दारीचं खरकटं आणतात. शेजारमावशी म्हणतात, ``कुत्रं ही आमची हौस नव्हे, गरज आहे. कुत्रं हे कुत्र्याच्या लायकीनं पाळावं!''
- तर त्या मनेकावादी मित्रांनी गावोगावी तशी धूम उडवली होती, त्यास फार काळ लोटलेला नाही. कुणी छकडेवाला गाडीत टिच्चून माल लादून जाताना दिसला की हे मित्र खवळून त्याच्या अंगावर धावत. कुणीतरी मटणवाला शेळीचे कोकरू बें बें बें करत पळवताना पाहिला की त्यांना कायद्याचा गिच्चा बसायचा. पण मनेकाबाईबरोबरच तो भर ओसरला. फटफटीच्या मागे आडव्या दांडक्यावर किंवा सायकलच्या हँडलवर तंगड्या बांधून उलट्या टांगलेल्या कोंबड्या नेल्या जाताना आता सर्रास दिसू लागल्यात. कायदा माहीत नसला तरी भूतदयेपोटी कुणी त्याला हटकलं तर, ``क्या साब, वो मरनेकोच ले जातै ।'' असं सहज म्हणतो. या लोकांचं म्हणणं तेच असतं. कोंबडं हे मारण्यासाठीच असतं; त्याचा दुसरा उपयोग काय? त्याला भूतदया दाखवायची म्हणजे फारतर दाणे खाऊ घालायचे आणि प्रेमानं कुरवाळत एकदम छटक्कन् मुंडी मारायची! परंतु कोंबड्याला कोंबड्यासारखं आणि बैलाला बैलासारखं वागवावं हेच बरोबर ठरेल काय? एखादा हमाल हातगाडीवरचं ओझं मेटाकुटीनं नेत असतो त्यावेळी हा प्राणीछळ कायदा लागू होत नाही परंतु उच्छाद आणणारी माकडं पिंजऱ्यात कोंडली की हे प्राणीमित्र माकड चावल्यागत पिसाळतात.
महाराष्ट्न् प्राणी-कल्याण कायदा संनियंत्रण समिती अशी एक यंत्रणा आहे. त्यातील प्राणी-कल्याण अधिकारी श्री.अनिल कटारिया यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून बैल व बैलगाड्यांच्या शर्यतीस बंदी घातली आहे. माजी केंद्रिय पर्यावरण मंत्री श्री.जयराम रमेश यांनी जाण्याअगोदर प्रसिद्धीला दिलेल्या राजपत्रात (गॅझेट) बैलांच्या शर्यतींवरील बंदीची अधिसूचना नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार नंदीबैलाचे खेळ, रेड्यांच्या टकरी यांसही बंदी आहे.
या सगळयाचा उपयोग वा अंमल किती हा तर प्रश्नच नाही. आण्णांच्या लोकपालासही अंमलबजावणी न होण्याची खात्रीच आहे. साक्षात् अहितकर अशा दारूवरील बंदीही निव्वळ हप्तेगिरीसाठीच असते. इथे तर नंदीबैलावर श्रद्धेचे खेळ चालतात. रेड्याची टक्कर हा करमणुकीचा माहौल असतो. रेड्यांची टक्कर अमानुष ठरते पण माणसांची कुस्ती मात्र हिंदकेसरीपद देते. यातला मतितार्थ काय? मस्तावलेले रेडे एकमेकास पाहून मुसमुसत एकमेकावर धावतात, तेव्हा प्राणीमित्रांची भूमिका काय असते कल्पना नाही. पण तीही अफलातून करमणुकीची संधी असते. अरुंद रस्त्यावर समोरासमोर आलेले दोन ट्न्कसुद्धा कितीजणांची करमणूक करत असतात. त्याचं ते `दावतो तुला' अन् `बघतो तुला' यातली मजा ही अनुभवण्याची गोष्ट आहे. मग रेड्यांची बात काय!!
थोडक्यात असे की, ज्याचा जो उपयोग असतो तो तसा करून घ्यावा हा मनुष्यधर्म आहे. सायकल उपयोगी म्हणून तीवर पाचशे किलोचा बोजा लादू नये तसं कोवळया पोराच्या डोक्यावर मणाचं ओझं देऊ नये. बैलांच्या शर्यतीला बंदी आणि घोड्यांच्या शर्यतीला प्रतिष्ठा, असले कायदे करणाऱ्या प्राणीमात्रांना प्राणीमित्र म्हणणे हा गाढवपणा झाला.
(12/9/2011)
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन