Skip to main content

sampadkiya in 8April2013


पशुत्त्व पुरोगामी कसे?
साहित्य, सामाजिक चळवळी, अथवा इतिहासादि शास्त्रे यांच्या क्षेत्रात परिवर्तनाच्या नावाखाली आक्रस्ताळी दांभिकता फैलावत चालली आहे. ती लक्ष्मण माने प्रकरणाने ताळयावर येईल, ही एक इष्टात्पत्ती मानायला हवी. लक्ष्मण माने यांच्याविषयी व्यक्तीगत टीकाटिपणी करण्यात काही हशील नाही. त्यांच्या `उपरा' या आत्मकथनात वर्णन केलेले भोग कुणाही सहृदय माणसाला अस्वस्थ करतील, पण त्यांच्या वाट्याचे उपभोगही अस्वस्थ करणारेच आहेत. आजवर त्यांची जी काही कारकीर्द झाली त्यातील वादविधाने आणि कार्य याविषयी कधी लिहावे लागलेच नाही आणि सध्या प्रकाशात येत असलेली त्यांची `काम'गिरी हा या स्थानी चघळण्याचा विषय नव्हे. ज्या कोणी अभागिनी लक्ष्मणरेषा ओलांडून किंवा न ओलांडताही बळी पडल्या त्यांना सामाजिक न्याय देणारी सक्षम रचना आपल्याकडे नाही. त्यामुळे त्यांच्याप्रति एक प्रदीर्घ उसासा टाकण्याशिवाय सामान्य भीरुता काही करू शकत नाही. बाकी एरवीच्या व्यवहारी दुकानदारीत माने पद्मश्री म्हणून वाचले काय, आणि गजाआड गेले काय!

या प्रकरणाने खऱ्याखुऱ्या परिवर्तनाचे, पुरोगामित्त्वाचे फार मोठे नुकसान झाले आहे. सामाजिक समस्या तर चिरंतन असतात; कारण सामाजिक मानसिकतेमधून, मनुष्यजात प्रवृत्तींमधून त्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे त्यांच्या विरोधातील संघर्षही चिरंतन चालू असतो. तो करण्यासाठी काही माणसे स्वत:ला वाहून घेतात. म्हणूनच समाज निर्माण झाल्यापासून सामाजिक समस्या आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यामुळे सामाजिक सुधारणाही होत आल्या आहेत. अलीकडच्या काळात विवेकानंद - रानडे - आगरकर - विठ्ठल रामजी - फुले - शाहू यांनी परिश्रमपूर्वक दिशा दाखविली. त्यामुळे त्यांच्या काळातील समाज बदलत गेला तरी तो `सुधारत' गेला नाही, कारण नव्या समस्या उभ्या राहिल्या. एकेकाळी मंदिरप्रवेशासाठी आंदोलन झाले, आता देवस्थानच्या संपत्तीविरोधात ते करावे लागेल. एकेकाळी स्त्रिया घराबाहेर पडाव्यात यासाठी धडपड होती, आता रात्रपाळीला महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न आहे. एकेकाळी आश्रमशाळेच्या मदतीला आमदारांनी यावे असे वाटत होते; आता आमदारांपासून आश्रमशाळा वाचविण्यासाठी काम करावे लागेल.

समाजाच्या वाटचालीत बहुतांशी प्रतिगामित्त्व नसते, पण स्थितिप्रियता असते. म्हणजे पुन्हा जुन्या आचार-विचारांकडे माणूस जात नाही, पण आहे त्या स्थितीला चिकटून राहू पाहतो. त्याला पुढची वाट दाखविणे एवढ्याच पुरते पुरोगामित्त्व संपत नाही - तर त्यांच्या सोबतीने सर्वांच्या समवेत पुढे जाण्यातच खरे पुरोगामित्त्व असते. तशा पुरोगामित्त्वाची झेप विवेकानंद, सयाजी महाराज, सावरकर किंवा आंबेडकर यांच्याकडे होती. त्यांच्याशी तुलना करणे हेसुद्धा शरमिंदे ठरावे अशी स्थिती आजच्या पुरोगामी चळवळींची झाली आहे. कमीजास्त प्रमाणात मानेगिरी करणारी दांभिक मंडळीही त्यास कारणीभूत आहेत. या पद्मश्रींनी तर अशा पुरोगामींची पार रयाच घालविली.

आता कुणी त्यांना सावरण्याचा प्रयत्न त्यांच्या परीने करून पाहायला हरकत नाही. `आरोप सिद्ध झाल्याशिवाय...'; - `दुसरी बाजू तपासावी लागेल...' इत्यादी बचाव करत राहून न्यायप्रियतेचा जास्ती एक दंभही मानेप्रेमींनी वाटल्यास हाताळावा. पण त्यात आता काही शोभा राहिली नाही. स्वत: माने यांच्या विद्रोहाचा तरी तशा न्यायिकतेवर किती विश्वास होता? परंतु व्यक्ती म्हणून त्यांच्या वर्तनाचा इथे प्रश्न नाही तर त्यांच्यासोबत किंवा आजूबाजूच्या गोतावळयात किंवा पुरोगामी चळवळीच्या हितचिंतकांत जी निराशा, अस्वस्थता, लज्जा पसरली असेल त्याविषयी चिंता किंवा कीव वाटावी.

इथे जाणीवपूर्वक लक्षात घ्यायला हवे की, पुरोगामी असणे ही अभिमानाने मिरविण्याची गोष्ट आहे ,परंतु ती स्थितीप्रिय गटाच्या विरोधी असता कामा नये. खरे सुधारणावादी असणारे कार्यकर्ते आक्रस्ताळे असत नाहीत. मुळातच त्या सुधारणा समाजाला पटवून देत त्याच्या हातून घडवून आणायच्या असतात. पण ते भान सुटून कधी राजकीय, कधी जातीय, कधी प्रादेशिक, कधी वैचारिक, कधी आर्थिक आणि कधी निव्वळ मत्सरी गट बनवून, सुधारणावादाऐवजी नस्ते नष्टचर्य ओढविणारी भांडणे माजवणारी चळवळ फोफावत चालली होती. लक्ष्मण माने हे तशा एखाद्या वैचारिक गोत्यात अडकले असते तर त्यांच्या पूर्वायुष्यातील संघर्षाचा आधार तरी त्यांना मिळू शकला असता; आता त्या सगळयावर पाणी पडून असल्या अंधश्रद्ध व कर्मकांडी पुरोगामी प्रदूषणाचा चिखल झाला. त्यामुळे नवतेच्या विचारांना पाखंडीपणा म्हणवून घ्यावे लागेल.

नव्याचे स्वागत करण्याची एक आश्वासक, सकारात्म संस्कृती आपल्याकडे आहे. ती सांस्कृतिक चळवळ सातत्याने पुरोगामीच राहावी. त्यातील असभ्यता आणि असंस्कृती यावरती हल्ला केलाच पाहिजे पण परिवर्तनाचा, नित्यनूतनाचा, सनातनतेचा मूळ गाभा अक्षुण्ण राहायला हवा. माने प्रकरणात व्यक्तीचे काय व्हायचे ते होईलच, पण पुरोगामी वाटचालीची सामाजिक दिशा हरवू नये.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...