Skip to main content

Sampadkiya in 11 March 2013


स्वत:पासूनच मुक्तता व्हावी
आजच्या जमान्यात बहुतांश भल्या घरांमध्ये स्त्री-पुरुष समानता पटलेली आहे. महिला दिन म्हणून त्यांच्या  समस्यांचा विचार प्रकट व्हावा आणि त्या समस्या हलक्या व्हाव्यात इथपर्यंतची दिशा ठीक वाटते. परंतु स्त्रियांवर होणारे तथाकथित अन्याय हे सदासर्वदा पुरुषच करत असतो या आशयाचे दुसरे टोक गाठण्याचे कारण नाही. स्त्री घराबाहेर पडण्यासाठी पुरुषांनी प्रयत्न केलेले आहेत. ती बाहेर पडते म्हणून तिचे कौतुक करण्याचा काळही आता मागे पडायला हवा. बाहेर पडणारी स्त्री आपले हक्क `तितक्या'च निर्दयपणे बजावू पाहते, हे स्त्रीवादी चळवळीला अपेक्षित नसावे.

हल्ली बस, लोकलगाड्या अशा पुष्कळ सार्वजनिक वाहनांत महिलांसाठी राखीव आसने असतात. कुणी वृद्ध पुुरुषच नव्हे, तर वृद्ध स्त्री जरी समोर उभी असेल तरी तिला आपली जागा रिकामी करून देणारी स्त्री सहसा पाहण्यात नाही. घरच्या स्त्रीने दिवसभरात केेलेल्या कामाचे मोल केले जात नसेलही; परंतु दमूनभागून संध्याकाळी घरी येणाऱ्या पुरुषाला चार मायेचे शब्द ऐकवून त्याच्या आवडीचा पदार्थ नेटसपणी देणारी स्त्रीही दुर्मीळ होत चालली आहे, हे नाकारू नये. स्त्रीची दु:खे आणि मनस्थिती यांबद्दल सहानुभूती दाखविताना पुरुषांच्या परिश्रमांस अकारण बेदखल करणे अनुचित आहे.
आजकाल नागर समाजातून अस्पृश्यता गेली आहे तसेच स्त्रीविषयी विचार-आचरण बदलले आहे. स्त्री विषयक अन्यायांचा सरसहा अनाचार दृष्टीआड झालेला आहे. आधीच्या एकदोन पिढ्यांतून रुळलेल्या कालसापेक्ष रुढी-समजुती हळूहळू बदलत गेलेल्या असताना उगीच स्त्रीविषयक सहानुभूतीचे उमाळे महिलादिनास काढण्याचे फारसे प्रयोजन नाही. स्त्रीशिक्षणाचे महत्त्व नाकारायचे नाहीच; परंतु - उदाहरण म्हणून - इंजिनियर होणाऱ्या महिलांनी नोकरीत, व्यवसायात किंवा प्रपंचात इंजिनियरिंग विषयाचे काय केले असेही पाहायला हवे. तसे युवकांनीही मोठे कर्तृत्त्व केले नसेल पण टक्केवारीच काढली तर ती पुष्कळशी पुरुषांच्या बाजूने अनुकूलता दाखवेल हे सांगण्यास सर्वेक्षणाची गरज नाही. तीच स्थिती कोणत्याही ज्ञानशाखेत शिकणाऱ्या मुलींबाबत असावी.

स्त्रिया प्रपंचात अडकतात असे मानले जाते, त्यावेळी त्यांचे प्रपंचही पुरेसे अडकवून न घेता चालत असतात. त्या `शिकलेल्या' असल्यामुळे, कुटुंब लहान झाल्यामुळे, सुखसुविधा वाढल्यामुळे, समाजस्थिती बदलल्यामुळे स्त्रिया `अडकलेल्या' म्हणता  येत नाहीत. नदी-विहिरीचे पाणी आणणे, लोणची-शेवया घालणे, घरचे शिवण-टिपण करणे, धुणीभांडी, दळण-कांडण यांचा आता मागमूस नाही. तथापि लेखन-वाचन, मुलांचा अभ्यास, शुश्रुषा, प्रवासयोजना, बँक-कर इ. कामे यांतही त्या अडकलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा उपयोग कसा होतो हेसुद्धा पाहावेच लागेल.

स्त्रियांवरच काय, कोणावरही अन्याय होऊ नये. स्त्रियांचे प्रश्न आहेतच. तथापि ते सोडवण्यासाठी समाजातील इतर सर्व घटकांवर दोषारोप करणे सर्वथा गैर ठरते. स्त्रीवरच्या अन्यायास प्रत्येक वेळी पुरुषच दोषी असतो असा आविर्भाव डोकावत असतो, तो टाळलाच पाहिजे. स्त्री स्वत: स्त्रियांशी जास्तच गैर वागते, परिस्थितीचाही दोष असतो, पिढ्यांतील संक्रमण परिणाम करते, आणि काही निव्वळ गैरसमजही असतात. हे सर्व घटक आळीपाळीने एकमेकांवर प्रभाव टाकत असतात. परंतु उसाला दर मिळत नसला तरी त्यात कुणाला ब्राह्मण्यवाद दिसावा; तसे स्त्रियांच्या प्रश्नांसंदर्भात होण्याचे कारण नाही. स्त्रियांना विचार-आचरणाचे जेवढे स्वातंत्र्य उपलब्ध होते त्याही मर्यादेत त्यांनी इतर स्त्रियांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे पुरेपूर प्रयत्न केले आहेत. जो पाश्चात्य समाज आज `मुक्त' म्हटला जातो, तिथेच प्रथम महिलांनी आपल्या हक्कांसाठी आंदोलन केले होते, याचा अर्थ तिथेही `तो' अन्याय होताच. आणि इस्लामी समाजात जी बंधने व धार्मिक बुरखे येत आहेत त्यात निव्वळ पुरुषत्त्वाची अरेरावी आहे असेही म्हणता येत नाही; ती स्वयंस्फूर्त धार्मिकता असू शकते. म्हणूनच या दिनाच्या निमित्ताने स्त्री आणि पुरुष एवढ्या लिंगभेदावर भर न देता उभय मानवी समाजातील समत्त्वाच्या, परस्पर-पूरकतेच्या व मनोविकासाच्या आधारावर परिवर्तनाचा विचार साकल्ल्याने होण्यातच हित आहे.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...