Skip to main content

Lekh on women


प्रश्न स्त्रियांचा नव्हे, सर्वांचा!
- विनिता तेलंग, सांगली
भौतिक, वैचारिक आणि आत्मिक दृष्ट्या विकसित अशा समृद्ध समाजाच्या निर्मितीचे स्वप्न आपण नेहमी पाहतो. आपला वैचारिक वारसा लक्षात घेता स्वप्न पाहण्याचा आपल्याला अधिकारही आहे. पण ते स्वप्न साकार करण्यासाठी आधी समोरचे प्रश्न नेमके समजून घ्यावे लागतील; त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रचलित संकल्पना - रचना कदाचित बाजूला ठेवाव्या लागतील; व खुल्या मनाने नि:पक्षपाती उत्तरे शोधून आचरणात तसे बदल करावे लागतील. ते करायला आपण सहजी तयार होत नाही. समाजातील सर्वच प्रश्न हे मुळात साऱ्या समाजाचे आहेत, एकमेकात गुंतलेले आहेत हे लक्षात घ्यायला हवे. कोणत्याही  समस्येचा सुटा सुटा विचार करून तो सोडवता येणार नाही. पर्यावरण - जीवनशैली - उद्योग असे प्रश्न सुटे सुटे सोडवताच येणार नाहीत.... त्यावर कितीही काम केले तरी!
गुन्हेगारीचे प्रश्न पोलिसांनी हाताळावेत, दुष्काळाचे सरकारने, मुलांची काळजी शाळांनी करावी व स्त्रियांचे प्रश्न त्यांच्या संघटनांनी पाहून घ्यावेत! अशी वर्गवारी केल्याने अनेक वर्षे या सर्व विषयांत कितीतरी कामे होऊनही म्हणावे तसे यश हाती आल्याचे जाणवत नाही. शिवाय दिवसेंदिवस नवनवीन प्रश्न आपल्यासमोर उभे ठाकत आहेत. इतके दिवस ज्या बलस्थानाच्या जोरावर आपण बाह्य संकटांना तोंड देत होतो, ती आपली कुटुंबरचना पडझडत आहे. सर्व सामाजिक अवनतीला एकच उत्तर म्हणजे कुटुंब बळकट करणे, असे मांडले जाते. तत्वत: हे अगदी बरोबर आहे पण व्यवहारात हे अत्यंत असाध्य व केवळ स्वप्नरंजन ठरते आहे. आपल्याच दुटप्पी वागण्यामुळे त्यातील स्वप्न आणि वास्तव वेगळे होतात.
फार पूर्वी आक्रमणांच्या काळात स्त्रीला घरी सुरक्षित ठेवावेसे वाटू लागले. त्यापूर्वीच्या काळात स्त्रिया कितीतरी प्रगत होत्या. त्यांना समाजात स्थानही बरोबरीचे, आदराचे होते. तो आदर, ती आत्मविकासाची संधी तिला घरी राहूनही मिळाली असती, तर ती तिथे रमली असती. तशी ती काही काळ रमलीही; पण घरात होणारी तिची घुसमट, टीका, अन्याय, अत्याचार याला विटून तिने पुन्हा हळूहळू घराबाहेर पाऊल टाकले. समाजानेही मोठ्या उदार मनाने तिला शिकायला प्रोत्साहित केले. हा प्रवास सर्वच स्तरात सहज सोपा नव्हता. पण एकदा या विकासाचे वेध लागल्यावर तिला थांबवणे अशक्य झाले. आज जवळपास सर्वच क्षेत्रात स्त्रिया अतिशय वेगाने प्रस्थापित होत आहेत. तर दुसरीकडे समाजापुढचे (केवळ तिचे नव्हेत) प्रश्नही वाढताहेत. तिच्या बाहेर पडण्याला यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे जबाबदार धरले जात आहे.
समाजही एकाच वेळी उदारमतवादी व परंपरावादी असतो. स्त्रीने शिकावे, करिअर करावे, उच्च पदांवर, विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवावे असे सर्वांना मनापासून वाटते. त्याबाबतीत अमेरिकेच्याही आपण पुढे आहोत. हिलरी क्लिंटनच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीवेळी तिच्या बाईपणावर असभ्य आरोप केले गेले. त्यास कुणी मोकळेपणा म्हणेल, पण तसे इथे संभवत नाही. बदलत्या परिस्थितीनुसार एकाच्या जिवावर संसाराचा गाडा ओढता येणे येथेही अशक्य झाले आहे. ही अपरिहार्यता आपण स्वीकारली. स्त्रीने संसाराला घसघशीत हातभार लावला तर हवा असतोे पण त्याचवेळी तिच्या कौटुंबिक, सांस्कृतिक जबाबदाऱ्या मात्र कणभरही कमी होत नाहीत. तिने बाहेर असताना कर्तृत्ववान, कणखर, धीट, परखड, व्यवहारी, व्यवसायनिष्ठ असायला हवे आणि घरात तिने नम्र, शालीन, मायाळू, भावनिक, त्यागी, घरेलू असायला हवे! या दुटप्पी वागण्यामुळे तिच्यावर येणारा ताण दुप्पट होतो याचा विचार केला जावा.
घरी असणाऱ्या गृहिणीच्या मनात आपण कमावत्या नाही, आपली स्वतंत्र ओळख नाही याचा न्यूनगंड असू नये. करिअर करावी तर तिथली भूमिका चोख निभावताना एखादा धागा हातून सुटला, मुलांचे उत्तम संस्कार, उत्तम मार्क, उत्तम स्वयंपाक, उत्तम आदरातिथ्य यांपैकी कुठे ती उणी पडली तर तिला त्याची सतत टोचणी लागेल याची चोख व्यवस्था  कुटुंबांतून आहे! तिने कितीही धडपड केली तरी कुठल्यातरी गोष्टीचा अपराधीपणा तिला छळतो आहे.
तिच्या बाहेर पडण्याने काही प्रश्नही निर्माण झाले पण दुर्दैवाने ते `तिचे' प्रश्न समजून त्याच्यावर उपाय शोधण्याची जबाबदारी तिच्यावरच सोपविली जाते. नवरे व्यसनी असू शकतात व त्यांच्या बायका संसाराचा गाडा निमूट, समर्थपणे ओढतात, त्यांच्या व्यसनमुक्तीसाठीही धडपडतात. हे सहज स्वीकारले जाते. सर्व प्रकारच्या आर्थिक-सामाजिक स्तरात हा प्रश्न तितकाच जळजळीत आहे. पण बदलत्या जीवनशैलीला बळी पडून स्त्रियाही व्यसनी होतात, तेव्हा त्यांच्यामागे दुर्दैवाने कुणीही नसते. व्यसनीपणाचे हे समर्थन नक्कीच नव्हे, पण एकाच समस्येला दोन टोकांच्या दृष्टींनी पाहिले जाते, याचे हे उदाहरण आहे. समाजाचे अध:पतन थांबवायचे तर प्रत्येक घटकाने आपापला वाटा उचलायला हवा. इतके दिवस स्त्रीने तिचेच काय, अन्य घटकांचेही खूप ओझे उचलले; विनातक्रार, आपणहून. आता पुरुषांचा सहभाग अपेक्षित करताना `तिचा' भार हलका करण्याची भावना आहे, जबाबदारीची भावना नाही हेही जाणवते.
कुटुंबरचना - व पर्यायाने समाजरचना विस्कळीत होण्यासाठी केवळ तिचे बाहेर पडणे कारणीभूत नाही; कारणीभूत आहे तो इतरांचा दृष्टिकोन - त्यात पुरुष आलेच, आणि बाहेर न पडणाऱ्या स्त्रियाही आल्या. आजही तिला तिचे स्थान मिळण्यासाठी स्वत:ला सिद्ध करण्यावाचून पर्याय नाही. घरच्या स्त्रीचे काम अनुत्पादक म्हणून दुर्लक्ष करण्याची चूक आता भोवते आहे. प्रसंगी टोकाला जाणारी तिची आजची वर्तणूक ही प्रतिक्रियात्मक आहे हे समजून घेतले पाहिजे. तिच्या क्षमता विकसित करण्याचे, अर्थार्जनाव्यतिरिक्त अन्यही मार्ग उपलब्ध व्हायला हवेत व त्याला प्रतिष्ठा मिळायला हवी. आई शहाणी तर घर शहाणे होते म्हणतात. पण प्रत्यक्षात घरी राहून सगळा गाडा सुरळीत चालवण्याच्या तिच्या कौशल्याला  `शहाणपणात' गणले गेले नाही. आईची `अक्कल' काढणारी घरे त्याकाळी उगवत्या पिढीने पाहिली, ती पिढी आता त्या अवहेलनेचा जणू वचपा काढते आहे. आताच्या मुली सतत छोट्या मोठ्या परीक्षांना तोंड द्यायला तयार नाहीत. स्वत:चा संसार हवा, मूल नको इथपासून पिचत `लग्नच नको'पर्यंत आलेल्या विचारसरणीला कोणती परिस्थिती कारणीभूत आहे ती लक्षात घेण्याची गरज आहे. यासाठी केवळ माध्यमे, चंगळवाद, आत्मकेंद्रितता वगैरे बाह्य गोष्टींना जबाबदार धरून चालणार नाही. ढासळती कुटुंबव्यवस्था, अत्याचार, हिंसा यासारख्या गोेष्टींवर प्रबोधन, वैचारिक ऊहापोह भरपूर करायचा आणि प्रत्यक्ष आचरणात, वैयक्तिक-कौटुंबिक-खाजगी आयुष्यात आपला पारंपारिक दृष्टिकोन तसाच वागवायचा हा दुटप्पीपणा चालणार नाही. काठावर बसून उसासे टाकणे वा टीका करणे यातून खोटे समाधान होईल. पण प्रत्यक्ष परिवर्तनासाठी याचा उपयोग शून्य आहे. यासाठी विचारपूर्वक छोटे छोटे बदल अंगवळणी पाडून घ्यावे लागतील. आपल्या कामाच्या ठिकाणी हाताखालच्या बाईने मुलाच्या आजारपणासाठी रजा मागितली तर ,`सारख्या सारख्या किती रजा द्यायच्या - बायकांना कामावर ठेवले की असेच होते' यासारखी विधाने केली जातात. घरी आपले मूल आजारी पडले की `छे! आजारपणासाठी मी कसा रजा काढू? (आणि उपयोग तरी काय!) तू बघ काय ते...!' असा सूर लागतो. मोठ्या पगाराची नोकरी सोड असे तिला म्हणवत नाही व घराची, तिच्या वैयक्तिक आयुष्याची होणारी फरफट पाहावत नाही. यातून काहीतरी मध्यम मार्ग निघायला हवा आहे. तो शोधण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यायला हवी.
चांगल्या आयुष्यक्रमासाठी आवश्यक ते गुण व्यक्ती म्हणून स्त्री पुरुष दोघातही हवेत. खंबीरपणा, नेमकेपणा, व्यासंग, व्यवसायनिष्ठा यासोबतच सौंदर्यदृष्टी, मानवी विचार, जमवून घेण्याची क्षमता, बहुअवधान, नेटकेपणा, कुटुंबाला भावनिक आधार वा प्राधान्य हेही गुणच आहेत; ते दोघांतली रुजायला हवेत.
नव्या पिढीच्या जडणघडणीची जबाबदारी कुटुंब व समाजातील सर्वांचीच आहे. एका विकसित, प्रगत राष्ट्नच्या उभारणीसाठी झटणारे भावी हात घडवण्याची हीच आशा आहे. आमची मुले `आदर्श' व्हावीत असे सर्वांनाच वाटते पण त्यासाठी अनुकूल वातावरण, वागणुकीतून उभे राहणारे आदर्श निर्माण करायला पुढे कोण येणार? हळूहळू नव्या पिढीला समानतेची व्याख्या उमगते आहे, त्यातील गोडीही कळते आहे. त्यांना एकमेकांच्या जबाबदाऱ्यांचे भान येते आहे. अवकाशाचे ज्ञान होत आहे. त्यांना ही नवी भूमिका समजून घेताना गोंधळलेपण येईल, कधी तणाव येतील. त्यांच्या या धडपडीला समजून घेऊन मोठ्या उद्दिष्टांसाठी क्षुल्लक गोष्टी सोडून त्यांना विकसित होण्यासाठी मागील पिढीनेही खुल्या मनाने मदत करायला हवी आहे.
या टप्प्यावर स्त्रीनेही स्वत:कडे पाहण्याची नजर बदलायला हवी. अधिक प्रगल्भ, विवेकी व्हायला हवे. स्त्रीत्वाचे अवास्तव भांडवल नको, स्त्रीत्वाच्या अंगभूत शक्तींना नाकारायलाही नको. मोठ्या मनाने नव्याने बदलाला सामोरे जायला हवे. तिल हवी असलेली एक उन्नत, विकसित माणूस बनण्याची संधी तिला हवीच आहे. तिचा विकास केवळ भौतिक पातळीवर झाला तर त्यातून सर्व समाजाची गुणात्मक प्रगती होणे शक्य नाही.
स्वत:चे स्त्रीत्व बाजारात आणणाऱ्या घटकांशी तिनेही भांडायला हवे. मिडियात वावरणारी, जाहिरात बनवणारी, पाहाणारी, वस्तू विकत घेणारी, सर्व माणसेच आहेत. प्रत्येक माणसात जेव्हा या विकृतीबद्दल घृणा निर्माण होईल, लिंगभावाचा आदर करण्याची वृत्ती येईल तेव्हाच हे चित्र बदलेल. आक्रस्ताळी वा टोकाची विखारी भूमिका न घेता स्त्रियांनी ही बदलाची लाट जबाबदारीने अंगावर घ्यायला हवी. यासाठी प्रत्येकवेळी पाऊल मागे घ्यावे लागते असे नाही. आपल्या जागी ठामपणे, निर्धारपूर्वक उभे राहूनही विपरीततेची लाट परतवता येते. त्यासाठी पायात सुस्पष्ट, व्यापक, कल्याणकारी, विवेकपूर्ण विचारांचे बळ हवे. स्त्रियांचे प्रश्न हे केवळ स्त्रियांचे न राहाता, तिचा विकास, तिचा सन्मान, तिची सुरक्षितता ही `सर्वांना' आपली जबाबदारी वाटायला हवी. स्त्रीविश्वाच्या कवेत जगातले सर्व काही येते त्यामुळे तिचे विश्व जितके सशक्त, निरोगी, समृद्ध, बळकट होईल तितके सगळे जग सुरळीत चालेल.
नुकतीच अरब देशांनी एका `नो मेन्स लँड'ची निर्मिती केली आहे. त्यांचा हेतू व दृष्टीकोन संकुचित असला तरी ही कल्पना  स्त्रीविश्वात लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही! त्यामुळे काही पिढ्यांनंतर `मर्दाना'च्या पडद्याआड जायचे की आज आपल्या डोळयांवरचा पडदा बाजूला करून उन्नत समाजरचनेच्या निर्मितीत सहभागी व्हायचे हे ठरवण्याची वेळ आता (पुरुषांवरही) आलेली आहे!
- विनिता तेलंग (९८९०९२८४११)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन