Skip to main content

Sampadkiya in 17 Sept.2012


लोकभावनांचे ढोल
गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न सध्या चर्चेत आहे. प्रसारमाध्यमे आणि दळणवळण यांच्या प्रसारामुळे कोणताही सणसमारंभ सर्वत्र फैलावतो. मुंबईतील दहिहंडी, पुण्याचा गणपती, कलकत्त्याची दुर्गा, दिल्लीची होळी, अमदावादचा गरबा, जयपूरची राखी हल्ली तेवढ्या क्षेत्रापुरती मर्यादित राहिली नाही. वर्षभर श्रमणाऱ्या व्यवसायी जीवांना कधीतरी उल्हासाच्या अनुभवांतून चैतन्यक्षण लाभावेत यासाठी त्या त्या प्रदेशातील परिस्थिती, गरज व ऋतुमान यानुसार उत्सव करण्याची प्रथा आली. परंतु आजकाल असा जल्लोष करणे हीच व्यावसायिक गरज असणाऱ्यांनी श्रमणाऱ्यांपेक्षा मोकाटगिरीला महत्त्व आणले आहे. त्यामुळे वर्षभरात कधीतरी येणारा एखादा उत्सव आजचे दैनंदिन जीवन व्यापून राहात आहे. मनाच्या उत्फुल्लतेतून येणाऱ्या नृत्य-संगीताऐवजी कायदा-व्यवस्था, वाहतूक-प्रदूषण यांचे वाद उभे राहू लागले. दहीहंडीतील नोटांचे थर आणि राखीच्या जरतारीची किंमत वाढत चालली.

गणपतीच्या निमित्ताने ध्वनिवर्धक व ढोलताशे रात्री किती वाजेपर्यंत सैल सोडावेत यावरती सध्या गावोगावी  बैठक-चर्चा होत आहेत. एरवी समान नागरी कायद्याची अपेक्षा वारंवार व्यक्त करणारा एक वर्ग असतो, तोही या चर्चेत आपल्या गावातील किंवा मंडळातील परंपरांचे ढोल वाजवून कायद्यातून आपल्यापुरती सवलत मागत असतो. एरवी कडक कायद्याचे राज्य हवे म्हणून पोलिसांना दुर्बळ ठरविणारी प्रतिष्ठित सभ्यता आपल्यापुरता कायदा लवचिक करू पाहते. आणि या आपमतलबी प्रवृत्तीच्या लोकशाही झुंडीतून आपले उत्सवी नर्तन सहीसलामत बाहेर पडून पुढच्या उत्सवाकरिता रस्त्यात मांडव बांधू लागते, हे सर्व अजबच.

कायदा ज्यांनी केला त्यांनी शास्त्र, विज्ञान, गरज, तर्कसंगती, परंपरा याशिवाय सभ्यता व प्रतिष्ठा यांचाही विचार केलेला असतो हे गृहीत आहे. उत्सवात मंगलवाद्ये वाजवायचीच नाहीत असा कुठेच कायदा नाही. तरीही कायद्याच्या ऐरणीवर वाद येतो, कारण कोणता ध्वनी मंगल आहे याची व्याख्या बदलते. बारा पेटाऱ्यांचे डॉल्बी किंवा चाळीस ढोलांचा ताफा ही मंगल वाद्ये ठरवायची असतील तर कायदा काय करणार? तांत्रिक शास्त्राच्या आधाराने हे ध्वनी काही डेसिबल्सपर्यंत संमत केले, तेही मान्य होत नाहीत. कायद्याचा अंमल कुणी, कसा करायचा हा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो. साखर कारखान्यांची मळी नदीत सोडली की गहजब करणारी लब्धप्रतिष्ठित जनता निर्माल्य-सांडपाणी-धूर-ध्वनी-प्लॅस्टिक यांबाबतचे कायदे कधी जाणूनही घेत नाही. नदीत मळी सोडण्याचे मुळीच समर्थन नाही पण ती अन्यत्र कुठे सोडायची याला पर्याय न देणारी लोकशाही, गोंगाट-ढोल बडवताना मात्र मांगल्य - पावित्र्य - परंपरा यांच्या ढिसाळ मार्गाने कायद्यांतून निसटू पाहते.

एका शहरात बारापर्यंत, दुसऱ्या ठिकाणी पाच दिवस तर आणखी कुठे डॉल्बीऐवजी ढोल-परवानगी असे नियम करण्याने वाद-वितुष्ट वाढत जाते. मांगल्याच्या पांघरुणाखाली कर्कशपणा करता येतो. पोलीस किंवा न्यायालये अशा पळवाटा रोखू शकत नाहीत. गावोगावच्या पोलिस अधिकाऱ्यांनी याविषयी समाजप्रमुखांच्या बैठका घेतल्या. त्यात पोलिसांनी कायद्याच्या कठोरतेचा कठोर उच्चार करण्यापेक्षा सामंजस्याची भूमिका मांडली. ढोलताशांचा आग्रह त्यांना योग्य वाटतो, पण तो मान्य करण्यास नाइलाजी असमर्थता त्यांनी व्यक्त केल्याचे दिसते. या सगळयाचा मतितार्थ असा की, जनता - कार्यकर्ते - समाजप्रमुख वगैरे सर्व घटकांना उत्सवी ढोल हवेच आहेत परंतु न्यायालय त्याला अटकाव करते आहे असा समज पसरला. हा कायदा अडवणूक करत असल्याने तो बदलण्याचा आग्रह लोकप्रतिनिधींकडे धरण्याचा सल्लाही पोलिसांनी दिला. तो सल्ला जर आपला चेंडू दुसऱ्याकडे टोलवून प्रचलीत  कठोर कायदा राबविण्याच्या समंजसपणासाठी असेल तर ठीक आहे, पण अशा सर्व घटकांचा लोकाग्रह मान्य करण्याची सजगता प्रतिनिधींनी दाखवून मुक्त ढोलपिटाईस संमती देणारा कायदा संमत केला तर बिकट होईल.

अशा वेळी बहुसंख्य भासणारी लोकेच्छा आणि सार्वत्रिक, सार्वकालिक लोकहित यांतील कोणता पर्याय योग्य, हे ठरविणे तत्त्वत: सोपे परंतु व्यवहारत: फार कठीण असते. कारण सार्वकालिक हित कळणारे लोक निष्क्रिय-उदासीन असतात; त्यामुळे स्वैरता करणाऱ्यांची मर्जी, लोकेच्छा म्हणून प्रगट होते व त्यास प्रतिनिधित्व मिळते, हा सध्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. सध्याच्या उत्सवी गदारोळास कायद्याच्या चौकटीत बसविणे शक्य आहे, आणि प्रचलित लोकशाही व्यवस्थेला ते मान्यही आहे.

प्रश्न खऱ्या हितकारी जीवनमूल्यांचा आहे. नृत्य-संगीताचे मूल्य जर मूल्यवान करायचे असेल तर मंजूळता आणि  गोंगाटकर्कशा यातला फरक कळायची गरज आहे. कायदा तर दोन्ही बाजूनी अर्थ निघू शकतील असा असू शकतो. दारूबंदी आहे आणि दारू उत्पादनाचा कायदाही आहे. वाळूउपशावर बंदी आहे आणि घरबांधणीला प्रोत्साहन आहे. यातून जर कर्कश्श ढोलबाजीला सामंजस्याची संमती मिळणार असेल तर सभ्यतेने अन्यत्र आसरा शोधण्याला किंवा अहित सोसत राहण्याला पर्याय नाही.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन