Skip to main content

Lekh in 3 sept.2012


जिंदगी के बाद भी.....
माध्यमांनी जीवनावर आक्रमण केल्यापासून टीव्हीवरील कार्यक्रमांपेक्षाही जाहिराती लक्षात राहतात. खूपदा चांगल्या  सृजनशील कल्पनांचा वापरही होताना दिसतो. आयुर्विमा या तशा रुक्ष आणि कोरड्या व्यवहारी विषयांनाही तरल भावनिक ओलावा देणारी आयुर्विम्याची (क्रॅच लाईन) आहे. `जिंदगी के साथ भी... जिंदगी के बाद भी'
इतर प्राण्यांपेक्षा माणसाला वेगळं करणारी  एक महत्त्वाची गोष्ट - चिंता! आजची - उद्याची, आपण असतानाची - नसतानाची, जगताना - मरताना - मेल्यानंतरसुद्धा! या सर्व चिंतांवर उत्तरं शोधण्यातच आपला जन्म सरतो. आजचं जगणं मेटाकुटीला आणतं. तरीही उद्याची तरतूद करावीच लागते. माणसातील एका चतुर गटाने हीच गोष्ट जाहिरातीतून बिंबविली. तुमच्यानंतर तुमचं कुटुंब उघड्यावर पडू नये.... तर मग आजच  पैसे गुंतवा. महिलासुद्धा हल्ली घराबाहेर पडतात, प्रवास करतात. त्यांना कुठं अपघात झाला तर? मग त्यांच्याही नावानं गुंतवा. मुलं मोठी होतायंत, त्यांची शिक्षणं, परदेशी जाणं, लग्न.... पैसा लागेल ना सगळयाला - मग आजच पैसा गुंतवा. अकस्मात - आजारपणामुळं - वयोमानामुळं.... कसंही गेलात तरी मागे उरलेल्यांच्या हाती घसघशीत रक्कम पडली पाहिजे. तुमच्या `जिंदगी के बाद भी' म्हणजे तुमच्यानंतर तुम्ही पत्करलेली सर्व कामं सुरळीत सुरू राहतील. असा हा पैशाचा विचार.
तेवढी तरतूद केली की निर्धास्त वाटायला हवं. पण आयुष्य सुरळीत चालणं तितकं सोपं नाही. ती जाहिरात पुन्हा डोळयांसमोर आणून पहा. मुलीचं लग्न ठरतंय - अचानक कर्ता पुरुष दगावला. आता? विम्याची घसघशीत रक्कम आली. लग्न पार पडलं. सगळे प्रश्न पैशाने सुटले. कृतज्ञतेनं त्याच्या फोटोकडे पाहणारी तितकीच कृतज्ञ महिला.
मला वाटतं की तिच्या नजरेत अजून काहीतरी लपलेलं आहे. विमा कंपनीला न दिसलेलं किंवा तिलाही ते कुणी देऊ शकत नाही असं काहीतरी राहून गेलेलं आहे. ते विम्यातली गुंतवणूक देणार आहे थोडंच? त्या जाहिरातीतल्या दोघांच आयुष्य मी डोळयांसमोर आणलं. काय बोलले असतील ते? मुलीच्या लग्नासाठी फक्त पैसा उभा करणं एवढीच चिंता त्यांना भेडसावली होती का? - की अजून काहीतरी त्यांना काळजीचं वाटत होतं? त्यांना वाटलं असेल ही आपली मुलगी हुशार आहे, दिसायला चांगली आहे, मनानं हळवी आहे. तिला कसं `घर' मिळेल? जोडीदाराशी तिचे सूर जुळतील का? ते घर तिला समजावून घेईल का? तिचा जीवनसंघर्ष कसा निभावेल? हे सारे प्रश्न त्या आईबापाच्या डोळयात असणारच - जाहिरातीत न सांगितलेले! पैसा आला, पण पुढे काय?
आयुष्याच्या लढाईत आवश्यक असणाऱ्या गोष्टी वेगळया असतात. चांगला रंगत चाललेला संसार उधळून जातो. भलतंच काही घडतं. परिचित असलेल्या कुटुंबात तसं काही घडलं तर मनाला चटका लागतो. लहानपणापासून मुलगा खूप हुशार, बुद्धिमान. पटापट यशाच्या पायऱ्या चढला, शिक्षणासाठी परदेशी गेला. इकडे त्याच्यासाठी काही स्थळांकडून आडून चौकशा सुरू. एक दिवस भयंकर बातमी. मुलगा खचलेला, टोकाची निराशा. त्या भरात भरकटलेला. सगळया कचाट्यातून त्याला परदेशातून सोडवून आणताना आईबाप महिन्याभरातच दहा वर्षांनी म्हातारे झाले. काय घडलं ते कुणालाही कळलं नाही. परीक्षेत नापास होऊ या भीतीनं कोणाची तरी आत्महत्त्या. व्यवसाय-संसार दोन्हीकडे सगळं छान असूनही छोट्या कारणांनी मोडणारे संसार, अविवेकी वागण्याने जिवाला घोर लावणारी मुलं आणि त्रासलेले जन्मदाते. आणि त्यांच्या बाबतीत त्यांच्याच मुखातून कळवळून उमटलेला प्रश्न, ``अजून काय करायला हवं होतं आम्ही? कुठं चुकलं आमचं?'' हा प्रश्न ऐकला की आपल्याही मनात कळ उठते आणि मस्तकातही!
कधी त्यांना विचारावंसं वाटतं `जिंदगी के बाद भी' साठी आयुष्यभर हप्ते भरता त्यासाठी मरमर मरताना `जिंदगी के साथ भी' जे करायचं होतं ते केलंत का? शिक्षण, अॅडमिशन, नोकरी हे मिळवायला शिकवलंत पण ते कशासाठी मिळवायचं हे कधी समजावून दिलंत का? यशासारखं यश नाही हे त्यांना ठासून सांगितलंत तरीही अपयशाचा घोट पचवायला शिकवलं का? लहान लहान गोष्टींना `नाही' असं म्हणून आयुष्यातले नकार पचवण्याचे हप्ते कधी भरलेत का? मुलांना जगण्यासाठी जे उपयोगी पडतं ते पालकांचं खरं देणं कधी दिलंत का? पैशात न मोजता येणारा आनंद घेण्यासाठी काही मोजमाप त्यांच्या हाती दिलंत का? त्यांच्या जीवनेच्छेच्या कोंभाला कधी खतपाणी घातलं का? संयम, समाधान, सहकार्य, स्वावलंबन, संवेदनशीलता याही गोष्टी रुजवायला हव्यात, त्यांच्या व्यक्तित्वात यायला हव्यात यासाठी काही तरतूद केली का?
शिक्षणासाठी आणि जगण्यासाठी पैसा तर लागतोच, पण नुसताच पैसा पुरत नाही. जिद्द लागते, कष्ट लागतात, जीवनदृष्टी मिळवावी लागते. कुणीतरी द्यावी लागते. आरोग्य विम्यामुळं रुग्णालयाचं बिल परस्पर दिलं जातं, परंतु  पेशंटला खरी गरज असते ती मायेनं कुणीतरी जवळ बसणाऱ्याची, आस्थेनं-आपुलकीनं शुश्रुषा करणाऱ्याची आणि स्वत:साठी धावपळ करणाऱ्यांची! त्याही पलिकडे असाध्य आजारावर मात करण्याच्या मुळाशी त्या पेशंटची विजिगिषु वृत्ती असावी लागते. पैशानं आणि तांत्रिक सोयीनं सगळयाची निश्चिती करून ठेवण्याच्या नादात हे आत्मबळ निसटून गेलेलं असतं. नुसत्या पैशातून दवाखान्याचं बिल भागेल पण जिवंत राहिलेला माणूस खचून जाईल.
पैशाव्यतिरिक्त महत्त्वाचं जे उरतं ते माणसाच्या नंतरही राहतं. ते नेमकं काय असतं? थोरामोठ्यांचे विचार, साहित्य, त्यांचे आवाज, त्यांची व्याख्यानं ही त्यांच्यामागे जगात राहतील परंतु आपल्यामागे आपण काय सोडून जाणार आहोत? आपल्या `जिंदगी के बाद भी' काय उरणार आहे? आपल्या सभोवतीच्या कुटुंबांत डोकावून पाहिलं तर अशा कितीतरी व्यक्ती आपल्याला `दिसतील'. त्या निघून गेलेल्या असल्या तरी त्यांच्या उत्साही आणि आनंदी व्यक्तिमत्वाच्या आठवणी आपल्याला येऊन चिकटतील. कुणाचा सतत मदतीला पुढे येणारा हात आपल्याला दिसू लागेल. कुणी घरादाराला लावलेली शिस्त, कुणी रुजविलेल्या चांगल्या प्रथा, कुणाचे चांगले गुण हे संक्रेमत होत राहतं... पिढ्यान् पिढ्या!
सांगलीचे श्री.प्रभाकर उर्फ बापूसाहेब कुंभोजकर. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची जन्मतारीख टिपून घेत आणि त्या व्यक्तीच्या वाढदिवशी शुभेच्छापत्र पाठवून कुंभोजकर सर अभीष्टचिंतन करीत. कुठेतरी समारंभात कुंभोजकरांनी `वहिनी, तुमची जन्मतिथी काय?' असं हळूच विचारून घेतलेलं असायचं. कुठल्याही घरच्या आईला तिच्या वाढदिवसाचा साक्षात्कार कुंभोजकरांच्या पत्रामुळं घडायचा. साधं चार ओळीचं शुभेच्छापत्र. परंतु आपण कुणाच्या तरी लेखी खूप महत्त्वाचे आहोत असा छाती फुगविणारा आनंद देण्याची क्षमता त्यांच्या पत्रात असायची. शेकडो - हजारोजणांना अशी पत्रं वर्षानुवर्ष मिळाली असतील.
सर गेले. परंतु आश्चर्य म्हणजे ती तशी पत्रं थांबली नाहीत. त्यांच्या कुटुंबियांनी त्याच निष्ठेनं ते व्रत चालू ठेवलं आहे. त्यांच्या `जिंदगी के बाद भी'! आपल्यामध्ये असंही काही असावं ते इतरांच्या `जिंदगी के साथ भी' आणि आपल्या `जिंदगी के बाद भी'
- विनिता तेलंग, सांगली
(फोन : ९८९०९२८४११)
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन