Skip to main content

sampadkiya in 01oct.2012


ईशकृपे घट अमुचा भरभरुनी पाझरतो,
त्या कृपेस तुम्हापास, मी केवळ पोचवितो ।

ईर्षा नको, आनंद घेऊ

ईश्वरकृपेने, समाजाच्या सहकार्याने भरून गेलेल्या आपल्या समृद्धीच्या घटातील एक आेंजळ पुन्हा समाजाप्रती अर्पावी या इच्छेतून `लुल्ला ट्न्स्ट'च्या कामाला तीन वर्षांपूर्वी सुरुवात झाली. यावर्षी `कला व कलाकार' असा विषय घेऊन लुल्ला ट्न्स्टने `कलाविष्कार २०१२' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. एकूणच `कला' या विषयावर काही चिंतनाची प्रक्रिया आपल्या मनात सुरू व्हावी हाही त्यात एक हेतू!

कला ही केवळ भरल्यापोटी, सुस्थापित झाल्यानंतर करण्याची गोष्ट नाही, ती माणसाची अगदी मूलभूत-सहज प्रेरणा आहे. आदिम काळातल्या मानवसंस्कृतीच्या ज्या खुणा सापडल्या त्यावरून ते सिद्ध होते. मानवी संस्कृती जशी बहरत गेली तसे कलेला नवनवे पैलू मिळत गेले. दारातल्या रांगोळया, जात्यावरच्या ओव्या, कल्पक उखाणे, कलात्मक पाक पद्धती, ताटातले वाढप... एका खोलीच्या घरात किंवा झोपडीतही स्वच्छ भांड्यांची नेटकी मांडणी  जीवनातील कलाविष्कार दाखविते.

संगीत, नृत्य, वादन, चित्र, शिल्प, हस्तकौशल्य इ. कलाप्रकारांची खूप प्राचीन व समृद्ध अशी परंपरा आहे. बदलत्या काळाचे, परकीय आक्रमणांचे संस्कार कलाप्रकारांत होत गेले. पूर्वी फक्त राजाश्रयाने वृध्दिंगत किंवा प्रदर्शित होणाऱ्या कला हळूहळू सर्व समाजात खोलवर रुजल्या, बहरल्या. संगीताच्या प्रांतातही खूप बदल झाले. पूर्वी तीन-चार तास एकच राग आळविणाऱ्या मैफली चालत, संगीत नाटके रात्रभर रंगत. त्यांचा आकृतीबंध बदलत गेला. क्रिकेट जसे कसोटीपासून २०-२० पर्यंत आले, तसे संगीतही तीन मिनिटांच्या ध्वनिमुद्रिकेत बंदिस्त झाले. परंतु खरा कलावंत त्यातही कलेची अभिजातता धरून असतो. कला जेव्हा स्पर्धेशी जोडल्या गेल्या तेव्हा मात्र त्यांच्या मूळ गाभ्याला, हेतूलाच धक्के बसू लागले.

गल्लीगल्लीत - गावागावात अन् चॅनेल चॅनेलवर महागायक-महानर्तक वगैरे होण्याच्या स्पर्धा सतत चालू आहेत. अंगठ्याएवढी मुले काही चमत्कृतीपूर्ण घोटीव आविष्कार करून तोंडात बोट घालायला लावतात. असले कार्यक्रम पाहून मग इतर पालकांच्यात महत्वाकांक्षी राक्षस जागा होतो. मग मुलाने रडण्यासाठी `आ' वासला किंवा हात झाडून हट्ट केला तरी त्याच्यातल्या सुप्त कलेचा साक्षात्कार झाल्यासारखे ताबडतोब कोणत्यातरी स्पर्धाचक्रात त्याला अडकवून टाकतात. लहान, कोवळया, संवेदनशील वयात कुठल्यातरी कलेची ओळख होणे, त्याची साधना सुरू होणे, त्यासाठी योग्य गुरू मिळणे ही खरेतर भाग्याची गोष्ट. पण आता कला ही कलेसाठी नकोच आहे; ती फक्त स्पर्धा जिंकण्यासाठी हवी आहे. कलेची गोडी लागणे, हळूहळू त्यातील सौंदर्यस्थळे सापडणे, ती आविष्कृत करता येणे, त्यातला आनंद, त्यातून येणारी सांस्कृतिक समृद्धी महत्त्वाची वाटायला हवी. संदीप खरे म्हणतात -
आता इतकं सहज सरळ उगवत नाही पीक
हाती येताच म्हणतो दाणा, नेऊन मला वीक ।
कर्तव्यागत झरतो पाऊस नेमे भिजते माती
कर्तव्यागत कणसामध्ये भरून येतो मोती... ।
गाणे, क्रीडा असो वा अभ्यास असो; निकालाची खात्री देणारे, यशाचे हमखास पॅटर्न सापडलेले क्लासेस आणि आपले घोडे गंगेत जेमतेम न्हाले की त्याला रेसला लावणारे पालक, हे दृश्य कलेच्या आणि एकूणच समाजाच्या निरोगीपणाला मारक आहे.

ज्याला  कलेचा स्पर्श होतो, त्याच्या मनातले सगळे अमांगल्य दूर होते. उच्च प्रतीची मूल्ये, आनंद यांची ओळख होते, क्षुद्रता लोपते. स्पर्धेच्या नावाखाली `चांगले' नव्हे तर `इतरांपेक्षा चांगले' महत्त्वाचे ठरते. इतरांपेक्षा पुढे हा एकच विचार ठसवला जातो. त्यापायी मुलं निरागसता घालवून बसतात. पूर्वीही वर्गात दोनपाच मुलेच अभ्यास-कला यात निपुण असतील; त्या मुलांविषयी आदर असायचा. आता मुलांनाही असूया, हेवा, द्वेष, मत्सर या भावनांची ओळख लवकर करून दिली जाते. शिकतानाच `अमूक गोष्टीत पहिलं येण्यासाठी करतोय' हे दडपण मनावर असेल तर शिकण्यातला आनंद हरवून जातो. जिंकलो नाही तर काय; या भीतीपोटी अंगभूत गुणही मुक्त फुलत नाहीत.

कला जीवनानंदासाठी आहे, व्यक्तिमत्त्व समृद्ध करण्यासाठी आहे. नृत्य-गायन या कला आता फक्त सादरीकरणाशी जोडल्या जातात, त्याही खूप घाईघाईने. बाजारात पहिला आंबा आपला यावा म्हणजे त्याला दर उत्तम मिळेल, यासाठी घाईघाईने आंबा उतरवून, कसली पावडर टाकून कृत्रिम रसायनांनी झटपट पिकवला जातो.  दोन-चारदा सादरीकरण सफाईदार करायचे, की लगेच माध्यमांद्वारे द्वारे खुली. पुढे त्यांच्याशीच टाय अप! मग आकर्षक पोशाख, झगमग दिवे, चकचकीत कार्यक्रम - काहीतरी `हटके' करणे. प्रसिद्धी, पैसा वाहू लागतो. साधनेसाठी बराच काळ `वाया घालवणे' हे पटत वा परवडत नाही. कुठलीच संधी निसटू द्यायची नसते. सगळे साध्य करण्याच्या हट्टापायी शिकण्यातला, वाटचालीतला आनंद घ्यायचा राहूनच जातो.

क्रीडाक्षेत्रही याला अपवाद नाही. नुकत्याच झालेल्या ऑलिंपिकमुळे क्रीडासाधने-व्यवस्था-क्रीडापटूंची क्षमता वगैरे सर्व गोष्टींवर ऊहापोह झाला. चीनने पोतंभर पदके लुटून नेली म्हटल्यावर चीनने नेमके काय केले हे खणून काढण्याचा प्रयत्न झाला. जी माहिती पुढे आली त्याला क्रीडासंस्कृती म्हणावे की विकृती? सगळया जगाच्या डोक्यावर स्वार होण्याच्या लालसेपायी चीनने अतिरेकी मार्ग अवलंबले आहेत. खेळाडूंना लहान वयात हेरले, त्यांच्या शरीरयष्टीला-क्षमतेला अनुकूल खेळ त्यांना `दिला', भरपूर मोबदला, आकर्षक सोयीसुविधा यांच्या प्रलोभनांसह मुलांना सरकारकडे सोपविण्यात आले. `नाही' म्हणण्याचे स्वातंत्र्य नसते. मग खडतर प्रशिक्षण. सुवर्णपदक हेच ध्येय. ते पदक मिळवून आणेतो घरी जाण्याची, घरच्यांना भेटण्याचीही मुभा नसते. अशा `कारखान्यां'मधून पदक विजेत्यांची रांग बाहेर पडते. क्रीडा मानसशास्त्रज्ञ म्हणतात की, चिनी खेळाडूंच्या चेहऱ्यावर जिंकल्यापेक्षा सुटकेचा आनंदच दिसतो. पदक मिळाले तर सरकार घसघशीत बक्षीस देते; पण जी दुर्दैवी मुले पदकापर्यंत पोचू शकत नाहीत त्यांच्या आयुष्याचे गणित विस्कटते. त्यांना लहानपणापासून कुठलीही अन्य कौशल्ये, शिक्षण ठाऊक नसते. अपयशाचा शिक्क घेऊन बाहेर फेकली तर त्यांच्या हातात काहीच उरत नाही. चीनने गुणसूत्रीय फेरफार अवलंबिला आहे का, अशी शंका आता जगाच्या मनात मूळ धरू लागली आहे. चीनचे काय व्हायचे ते होवो, पण क्रीडासंस्कृती, खिलाडूवृत्ती वगैरे लोप पावताहेत. खेळ खेळण्याने संघभावना, अपयश पचवण्याची ताकद या गोष्टी रुजतात. निकोप स्पर्धाही हवी. एकूण कौशल्याविषयी आदरभाव हवा. कणाकणाने आपली क्षमता वाढवत त्यातला आनंद देता घेता यायला हवा.

शिखरावर जागा थोड्यांनाच असते, खाली राहणाऱ्यांची संख्या मोठी, त्यांचा समाज बनतो. तो जर निकोप, निरोगी मनोवृत्तीचा व्हायला हवा असेल तर यशाबरोबरीने किंवा यशापेक्षाही सामुदायिक आनंद महत्त्वाचा. कशात तरी पारंगत व्हावे, कुठे तरी चमकावे याचा अट्टाहास असू नये. सुंदर गोष्टींची ओढ असणे, कलांचा आस्वाद मुक्त मनाने घेता येणे, अन्य यशस्वी लोकांबद्दल निखळ कौतुक, आदर वाटणे, चांगला श्रोता-प्रेक्षक-वाचक-रसिक-जाणकार असणे-चांगला माणूस असणे जास्त महत्त्वाचे. मी माझ्यातली क्षमता ओळखेन - माझा आनंद कशात आहे ते समजून घेईन व त्यांस माझ्या परीने खतपाणी घालून फुलवेन - स्वत: आनंदाने जगेन व इतरांना आनंद देईन - त्यांच्याही आनंदात सहभागी होईन - हेही एक मोठे, सुंदर ध्येय असू शकते. त्यासाठी जीवनात कलेचे स्थान हवे. त्यासाठी कलेची जाण हवी.

कला आणि कलाकार हे एका संपूर्ण समाजाचे आरोग्य, सामाजिक वातावरण निरामय बनवण्याचे काम करतात. परमेश्वराने हा कलेचा अंश प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात वा वेगवेगळया रूपात प्रदान केलेला असतो. अभ्यास-करिअर-अर्थार्जन यापुढे कलागुणांची मातब्बरी वाटत नाही. पदार्थ विकत मिळतात, पण `भूक' विकत घेता येत नाही. पाणी आजकाल विकत मिळते पण `तहान' आतून लागावी लागते. कलाकृती पैशाने खरेदी करता येतात पण `कला' आतून उमलावी लागते. आस्वादक-कलासक्त मनसुद्धा घडवावे लागते. त्यासाठी मनही मोकळे निर्मळ करावे लागते. अहंकार बाजूला ठेवावा लागतो. एखादी सर्जनशील कला अंगी बाणवली किंवा आस्वाद घ्यायला शिकले तर माणसाला दुसऱ्या सोबतीचीही गरज वाटत नाही. कलेच्या सहवासात तो आपली व्यथा, एकटेपणा विसरून जातो. व्यक्तीपेक्षाही कला, छंद यांची सोबत शाश्वत आणि अक्षय आनंद देणारी असते.

`सा विद्या या विमुक्तये ।' च्या चालीवर `सा कला या विमुक्तये ।' बंधनातून मुक्ती देते ती कला. जात-धर्म-पैसा-प्रतिष्ठा-स्त्री-पुरुष-भाषा या सर्वांपलीकडे जायला, पाहायला कला शिकवते. मनाला, बुद्धीला, बंध, मर्यादा केवळ अज्ञानामुळे असतात असे नाही तर ज्ञानाचे देखील बंध खऱ्या आनंदापासून वंचित ठेवतात. कला या सर्वापासून मुक्ती देणारा जणू बीजमंत्र आहे. कलेला मातृका या नावानेही संबोधतात. मातृका व त्यांचे बीजमंत्र यांची आराधना विशिष्ट गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी करतात. कलेची ही मातृका अक्षय आनंदाचा बीजमंत्र देते. ऐहिक जगाचा व त्यातील क्षुद्र दु:खांचा विसर पडून जीवनाचा खरा अर्थ शोधण्याच्या मार्गावर ती नेते.

असे म्हणतात की, मृत्यूनंतर आयुष्यात केलेल्या सर्व कृत्यांचा हिशेब चित्रगुप्ताला द्यावा लागतो. त्यावेळी तो हेही विचारणार की, जन्माला घालतेवेळी  एक कलेचे बीजही परमेश्वराने तुझ्यात टाकले होते, त्याचे तू काय केलेस? असा हिशेब देतेवेळी त्याच्या दानाचा अपमान झाल्याचे सांगावे लागू नये. स्वत:मधले हे सुप्त बीज शोधायला हवे, जोपासायला हवे.
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन