Skip to main content

ganesh upasana


मला उमजलेली गणेशउपासना

अधिक मास असल्याने गणपतीचे आगमन जरा लांबणार हे ठाऊक नसलेल्या तेरड्याच्या फुलांनी अन् आघाड्याच्या रोपट्यांनी यावर्षीही बाग केव्हाच रंगीबेरंगी करून टाकली. दुष्काळाचा फारसा बाऊ न करता बाजारपेठ सजली. ठाण मांडणाऱ्या गणेश मंडळांमुळे रस्ते लहान झाले. वाहतूक तुंबू लागली. आधी पूजेसाठी गुरुजींचे व मग मूर्तीचे बुकिंग झाले. सजावटीसाठी घराघरात कल्पकता पणाला लागली आणि आयाबाया पंचखाद्य, मोदकाच्या तयारीला लागल्या. (आता २१ मोदकांचं पॅक केवढ्याला मिळतंय कोण जाणे - की चेंज म्हणून यावर्षी घरी करूयात...?) क्रॅसेट-सीडीज्चे मार्केट आयटेम साँग्जच्या (अ)सुरावटींवर गणपतीची `मंगल'गीते माथी मारण्यासाठी सज्ज झाले. होशियार%% म्हणून `अभिजन' कानात बोळे घालायच्या तयारीत बसले. `गणेशोत्सव पर्यावरणीय कसा कराल', `घरच्या घरी गणपती कसा बसवाल', `गणेशोत्सव डॉल्बीमुक्त व्हायला हवा' अशा वृत्तपत्री लाटेवर आरूढ होऊन बाप्पा आलेसुद्धा!
गणेशोत्सवात - विशेषत: सार्वजनिक उत्सवात शिरलेले अमांगल्य ढळढळीत दिसतेच आहे. त्यावर यथाशक्ती, यथागती उपाय सुरू आहेत. गणपती हा आदिदेव - वेदप्रतिपाद्या - स्वसंवेद्या - आत्मरूपा म्हणतात. गणेशजन्माच्या, त्याच्या रूपाच्या संगतीकथाही अनेक आहेत; स्तोत्रे, कवचे, उपसनापद्धतीही अनेक; परंतु बुद्धी, सिद्धी, ऐश्वर्य, कला, मोक्ष आदि सर्व सुखाच्या प्राप्तीची हमी त्या उपासनेच्या फलस्वरूप मिळते ही श्रद्धा सर्वसमान.
गणेशाचे संपूर्ण अस्तित्त्व रूपकात्मक आहे. तो लंबोदर - सर्व जगाची दु:खे, दुष्कृत्ये पोटात घालणारा; वक्रतुंड आहे. वक्र - वाकड्या - वाईट शक्ती, तुंड - तोडणारा. सत्व-रज-तम गुणांनी भरलेले हे विश्व - प्रकृती आहे हा सिद्धांत मांडणाऱ्या भारतीय तत्वज्ञांना वाईट गोष्टी समूळ नष्ट करण्याचा भ्रम कधी नव्हता; बारीक, तीक्ष्ण नजरेने तो विश्वातील सूक्ष्मातिसूक्ष्म गोष्टी टिपतो. तो विशाल कर्णांनी सारे काही श्रवण करतो. (यालाच हल्ली लिसनींग स्किल म्हणतात?) मूर्ती केवळ मातीची. नदीकाठची माती घेऊन त्याची मूर्ती बनवायची व प्राणप्रतिष्ठा करून, पूजा करून, स्तवन म्हणून त्याच दिवशी ती विसर्जित करायची अशी पद्धत होती. मोहात पडून आपण त्याला अधिक दिवस ठेवून घेऊ लागलो. निसर्गातूनच घ्यायचे - निसर्गालाच अर्पण करायचे व त्यानिमित्ताने या सृष्टीच्या चक्राचे - `पुनरपि जननं पुनरपि मरणं' या जीवनचक्राचेही स्मरण करायचे ही साधी पद्धत!
सोंड नादाचे प्रतीक तर त्याचे वाहन उंदीर हे आपल्या क्षुद्र आशा-आकांक्षांचे, त्या जिथे अविरत जन्मतात त्या `चंचल' मनाचे प्रतीक - नियंत्रण करण्यास अत्यंत कठीण! या इच्छाच आपल्यातील आत्मतत्वाला कुरतडून संपवतात. क्षणाक्षणाला कुरतडून संपणाऱ्या काळाचे प्रतीक असेल. हातातला परशू संकटसमयी कामी येतो तर अंकुश विवेकाची टोचणी देतो. हातातली जपमाळ ही साधनेतील सातत्य सांगते तर मोदक म्हणजे साक्षात मोद! आनंद! गूळखोबरे या साध्या नैवेद्याने  तृप्त होणारा हा बाप्पा साध्या साध्या गोष्टीत आनंद घ्यायला सुचवतो. त्याच्या कमरेचा नाग हे शक्तीचे प्रतीक. स्वत:हून चावायला जाणार नाही, पण शेपटावर पाय पडला तर जीवघेणा दंश करणार, त्याच्या फुत्कारालाही जग घाबरते! चिखलातून वर येणारे मांगल्याचे प्रतीक कमळ, तर काट्यांत राहूनही सुगंधाने घमघमणारा केवडा, सहज मिळणारे लाल फूल व कुठेही मिळणाऱ्या दाह शमन करणाऱ्या दुर्वा या त्याच्या प्रिय वस्तू.
लहानपणी खूप प्रश्न पडायचे. इंद्र स्वत: देव असूनही त्याच्यावर संकट कसे येते? कुणाही उपटसंुभ राक्षसाला शंकर वर कसे देतात? देवांनाही `त्राहि भगवान' करण्याइतके राक्षस माजतात कसे? आणि शेवटी गणपतीला शरण आल्यावर सगळे चुटकीसरशी `ऑल इज वेल' कसे होते? समज मोठी झाल्यावर याची संगती लागते. सत्ता-इंद्रपद मिळाल्यावर देवांनीसुद्धा जेव्हा मर्यादा सोडल्या - ते भोगात-ऐश्वर्यात रममाण झाले तेव्हा त्यांच्या भक्ती विन्मुखतेला, सत्तालालसेला आवर घालण्यासाठी एखाद्या राक्षसाला बलसंपन्न केले जाई. देवांवर प्राणसंकट आले की त्यांनाही आपल्या मर्यादांची जाणीव होऊन त्यांच्यात पुन्हा शरणभाव उत्पन्न होई. मग ते गणेशाची आराधना करत व श्रीगणेश त्या दानवांचे पारिपत्य करून पुन्हा दैवी गुणांची, शक्तींची स्थापना करत. सत्तेचा मद चढणे, दुष्ट शक्ती अनावर होणे हे आजही दिसते. शिवाय आज तर दैवी गुणांच्याही मर्यादा (कला, संशोधन या क्षेत्रात नैतिकतेची-मानवतेची पायमल्ली) उल्लंघिल्या जात आहेत. अशा वेळी विघ्नहर्त्या गणेशाची उपासना अनिवार्यच आहे.
पण उपासना म्हणजे केवळ पूजा-फुले-पत्री-स्तोत्रे-आरत्या-पपन्न-आर्त्त्ूझ्र्ी-त्र्ु्ें-त्त्डॅद्धु-%ॅडैंडॅद्धें-उद्धडॅर्द्गी-त्त्त्त्ण्ॅण्-उ हे नव्हेच. उपासना याचा अर्थ त्या उपास्य देवतेच्या जवळ पोचण्याचा प्रयास. त्या देवतेच्या अंगी असलेले गुण आपल्या ठायी यावेत यासाठी केलेले नियमित - शिस्तबद्ध प्रयत्न म्हणजे साधना. ही साधना जितकी कठोर तितके फळ (गुणसंचयन) मोठेे!
स्वामी सवितानंदांनी गणेश उपासनेची तर्कसंगती फार सुंदर मांडलेली आहे. उपासनेत देवतेच्या चरणसेवेचे वा चरणामृताचे महत्त्व सर्वात मोठे मानतात. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी गणेशाचे आेंकारस्वरूपातील वर्णन करताना `अकार चरणयुगुल' असे म्हटले. उपनिषदातील कल्पनेनुसार $ मधून सर्व विश्वाची निर्मिती. त्यात `अ' पासून स्थूल सृष्टी. `उ' पासून सूक्ष्म सृष्टी व `म' पासून कारण सृष्टी निर्माण झाली. स्थूल सृष्टी म्हणजे आपण राहतो ते विश्व. गणपतीच्या (अकाररूपी) चरणयुगुलांची सेवा करणे म्हणजेच या विश्वाची सेवा करणे. माया म्हणून या भौतिक जगाचा तिरस्कार करून स्वत:च्या कठोर साधनेचे वैराग्य मिरवणे म्हणजे गणेश उपासना नाही. त्याचे गुण अंगिकारायचे तर आपला व्यवहार-दर्शन-बोलणे-त्याच्यासारखे मंगल, प्रसन्न, मधुर हवे. पूर्वी कुणीतरी लावलेल्या झाडांची फुले, फळे, पत्री विकत वा फुकट ढापून आणून वाहायची यात पुण्य नाही. पुढल्या गणेशभक्तांसाठी एखादे तरी झाड लावणे हे पुण्यप्रद. गणपती विद्येची देवता. ज्ञानार्जन वा ज्ञानदान, विद्याकार्याला मदत ही त्याची उत्तम उपासना. स्वत:जवळचे ज्ञान उदारपणे मुक्तहस्ते वाटणे हे त्याचे कार्य. आपले साधे खुसखुशीत चकलीचे `सीक्रेट' आपण सांगत नाही. असे करून खूप मोठे पारंपारिक ज्ञान आपण हरवून बसलो. ज्या देवतेची उपासना करू त्याचे शिष्य म्हणून शोभायला हवे. दुसरा संकटात दिसला तरी `उगाच भानगड नको' म्हणून आपण पळ काढतो. गणपती हा गणांचा अधिपती - त्याच्यासारखे आपण संकटसमयी समोर उभे राहून नेतृत्व करायला शिकावे. तो लंबोदर होऊन जगाचे अपराध पोटात घालतो. आम्ही आमच्याच घरच्यांच्या क्षुल्लक चुकांकडे उदारपणे पाहू शकत नाही. भक्तीचा सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे अनुसरण. गणेशाचे ज्ञान, शौर्य, मातृभक्ती, संयम या गुणांचे संवर्धनच आपल्याला मोक्षप्राप्तीइतक्या समाधानाप्रत नेणार. `मंत्र' या शब्दातही हीच अपेक्षा आहे. मननात् (तारयति) मंत्र । त्याचे नुसते उच्चरण-पठण नको, चिंतन मनन व अनुसरण हवे. गणेशकवचातही स्पष्ट म्हटले आहे की, जो हे कवच `जाणून' घेणार नाही, त्याला शेकडो वर्षे पठण करूनही सिद्धी प्राप्त होणार नाही. अथर्वशीर्षाची फलश्रुतीही हेच सांगते- एतद्अथर्वशीर्षं यो%धीयते - अधीयते. अभ्यास करणाऱ्यालाच फलप्राप्ती. जो या गुणेशाचे अंत:करणपूर्वक अनुसरण करेल त्याला गुणसिद्धी प्राप्त होऊन तो स्वत:च विघ्नांशी सामना करण्यास समर्थ व समृद्ध होणार.
ऋग्वेदातील ब्रह्मणस्पती (वेद काळातील गणपतीचे नाव) सूक्तातील ऋचांचे भावार्थ वाचले तर आपले पूर्वज किती द्रष्टे होते हे समजून आपण स्तिमित होतो. त्यातील गणेशाला - ब्रह्मणस्पतीला केलेले आवाहन असे - ``हे ब्रह्मणस्पते, सात्विक कल्याणासाठी उत्सुक अशा सर्वांना तू एकत्र कर. त्यांच्यात आत्मतेज निर्माण कर. त्यायोगे आम्ही निर्भयतेने लढू व (असुरांवर) विजय मिळवू. तू आमच्या आत्म्याच्या ठायी राहून आमच्या इंद्रियांना बलवान कर व मनाला विवेकी व आत्मविश्वासपूर्ण बनव. आमचा बुद्धिभेद करून आम्हाला मार्गच्युत करणाऱ्या दुष्ट शक्तींना त्यांची कुटिलता तू लक्षात आणून दे व आमचा सत्कृत्यांचा मार्ग निष्कंटक कर. प्रतिकूलतेनेच सामर्थ्याची कसोटी लागते त्यामुळे तू आमच्यावर कृपा कर, ज्यायोगे दुष्टांचे कुटिल डाव आम्ही हाणून पाडू शकू.''
त्याच्या पराक्रमाच्या वर्णनातही त्याने धर्मविरोधी रूढींना व सत्ताकेंद्राला हटवले, ज्ञानरूपी धेनूंना (बंदिस्त ज्ञानाला) मुक्त केले, जलाशय खुले करून सर्वत्र पाणी खेळवले ज्यायोगे अन्नवृद्धी झाली व लोक पुष्ट झाले, असे उल्लेख आढळतात. पणी नावाच्या राक्षसाने दिव्य ज्ञानकोष पळवला व गुप्त केला. तो कुणालाही मिळेना तेव्हा गणेशाने सामान्यजनांत फिरून त्यांना जागृत केले, त्यांचे संघटन केले, त्यांना प्रेरणा, स्फूर्ती दिली व त्यांच्याकरवी त्यांचे नेतृत्व करून विजय मिळवला! हे तर आजही घडायला हवे आहे! त्याच्या आराधनेत तू आम्हाला `उजव्या हाताने धन दे' असे मागितले आहे. आम्हाला केवळ सन्मार्गाने येणारी लक्ष्मी मिळूदे. वामहस्ताने येणारे धन नको.
गणेशाचे अजून एक वैशिष्ट्य हे की, तो सदैव `मंगल'रूपातच प्रकटला आहे. दैत्याचा, असुरांचा नाश करूनही तो कधी रुद्रावतारात, क्रुद्ध रूपात दर्शन देत नाही. तो दुष्टांना नियंत्रणात ठेवून त्यांनाही मंगलकार्यात सहभागी करण्याचा प्रयत्न करतो पण दुर्बलांच्या स्नेहभावाला वा अहिंसेला किंमत नसते हे लक्षात घेऊन तो आधी सामर्थ्य मिळवायला शिकवतो.
गणेशाच्या प्रसन्न, मंगल दर्शनाने तृप्त होण्याचे, त्याला निरोप देताना गलबलून जायचे; त्याला पुन्हा लवकर येण्याचे आवाहन करायचे. याचवेळी या गुणेशाच्या आराधनेचा संकल्प करणे व मंगलकामना करणाऱ्या समूहाचा - सज्जनशक्तीचा संचय करणे. त्याच्या बुद्धी - कला - स्नेह - संघटन या गुणांचे प्रदर्शन करणाऱ्यांची संख्या वाढवणे हेच आजच्या विघातक प्रवृत्तींना मंगल उत्तर आहे. मूर्तीचे दर्शन घेताना त्याच्या पाठीशी अरूप असणाऱ्या या प्रेरणांची जाणीव करून घ्यावी. पुढ्यातील मांगल्य डोळे मिटून `पाहिले' तरी निर्गुणातील संप्रेरक वलये आपल्यात संक्रेमत होऊ शकतील, आणि उत्सवात दडलेेले विघ्नविनाशी ईशत्त्व आपणच प्रकट करू.
(विनिता तेलंग - ९८९०९२८४११)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन