Skip to main content

Lekh in 3 Sept.2012


अनैसर्गिक विदेश
क्रॅनडात आल्यापासून इथल्या गोठविणाऱ्या थंडीची आणि बर्फाची गरमागरम वर्णनं आणि चर्चा मी ऐकत होतो. पहिले काही दिवस मी अगदी उत्सुकतेनं ऐकायचो. कधी एकदा बर्फ पाहायला मिळतंय असं व्हायचं. कौतुकानं मी ऐकणारा श्रोता मिळाल्यामुळं सांगणारेही थोडी-थोडी `ढील' देत होते. `अरे मागच्या वर्षी तर.... कमरेएवढं बर्फ.', `अरे माहितेय का एकदा तर.....' असे खरे-खोटे किस्से फोडणी देऊन मला ऐकवत होते. `आता होईल दोन-चार दिवसात सुरुवात. तुझे बूट चालायचे नाहीत. एवढासा कोट काय पुरतोय? गारठून तुला एक पाऊलही टाकता यायचं नाही.' असा उगाचच बागुलबुवा निर्माण केला होता. मित्र डॉमिनिक तर `दरवर्षी इथं येणाऱ्या भारतीयांपैकी १०% लोक बर्फात गायब होतात आणि एप्रिल-मे मध्ये परत सापडतात... तेव्हा तू आत्ताच व्हिसा काढून ठेव' म्हणून जाता-येता चिडवायचा.
पण तो बर्फ काही पडायचं नाव घेत नव्हता. खरं तर बर्फाचे दिवस इथल्या लोकांसाठी पूर्वी कष्टप्रदच होते. उणे ३० पर्यंत जाणारा हिवाळा जीवघेणाच की! हिवाळयाचे चार महिने बटाट्याशिवाय दुसरं काही खाल्लेलं आठवत नाही असं इथले जुने लोक सांगतात. सलग दोन-दोन आठवडे घराबाहेर पडता येऊ नये असा बर्फाचा खच असायचा म्हणे! पाणी गोठल्यामुळे पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडायचा. अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळं हवा रोगट आणि कुबट व्हायची. विज्ञानामुळं आता सगळंच बदललंय. सूर्य लवकर मावळला तरी विजेच्या झगमगाटात ते फारसं जाणवत नाही. घरं, ऑफीस, मॉल्स, वाहनं सगळीकडे हिटर्स. बाहेरची थंडी रोजच्या व्यवहारात कुठे आड येत नाही. त्यामुळे `आता चार महिने काही खरं नाही. थंडी अगदी नको होेते' वगैरे नुसतं बोलण्यापुरतं. प्रत्यक्षात सगळे पहिल्या बर्फवृष्टीची वाट पाहात होते. पुढं पुढं पावसाची चिकचिक नकोशी वाटली तरी पहिल्या पावसासाठी आपण जसे आतुर होतो, तसंच काहीसं!
आपल्याकडे मान्सूनच्या बातम्या जशा मे महिन्यापासूनच सुरू होतात तसं इथे पेपर्समधले रकाने न पडलेल्या बर्फवृष्टीने भरत होते. `हल्ली पूर्वीची बर्फवृष्टी नाही राहिली' असा पुणेरी सूर बऱ्याचजणांनी लावला होता. लांबलेल्या बर्फाशी `ग्लोबल वॉर्मिंग' जोडून `अखिल क्रॅनेडियन' प्रकारच्या स्वयंसेवी संघटनांनी `आपापल्या गल्लीत' आवाज उठवायला सुरुवात केली होती. `बर्फात हरवलेली वाट' म्हणून ध्रुवाजवळचे कोणतेतरी फोटो पेपरच्या पहिल्या पानावर झळकत होते.
सत्ताधारी पक्षाच्या एखाद्या माणसाची बरी चाललेली कंपनी किती प्रदूषण करते आहे आणि त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये कशी भर पडते आहे वगैरे आकडेवारी देऊन विरोधक त्याविरुद्ध सह्यांची मोहीम राबवत होते. सरकारला कोंडीत पकडून सभात्याग चालू होते... सगळं अगदी `घरगुती' वातावरण! नावं वेगळी म्हणून... एरवी टाईम्स ऑफ इंडिया वाचतो आहोत की टाईम्स ऑफ क्रॅनडा कळू नये!
प्रत्यक्ष बर्फ नसलं तरी दुकानांनी `खास हिवाळी' सेल आणि ऑफर्सचा धमाका सुरू केला होता. तिथला सेंट क्रॅथरिन स्ट्नीट म्हणजे आपला लक्ष्मी रोड किंवा दादर पश्चिम. कापूस, थर्मोकोल, प्लास्टिक, कृत्रीम धागे असं कायबाय वापरून केलेल्या सजावटींनी दुतर्फांची दुकानं भरली होती. कोपऱ्या-कोपऱ्यावर सांताक्लॉज अवतरला होता. झाडांवर, छपरांवर पडलेलं बर्फ, बर्फात खेळणारी मुलं, स्लेजवरून घसरणारा सांता, अशा देखाव्यांनी दुकानांचे दर्शनी भाग नटले होते. ती एवढी सगळी सजावट जर बाहेर काढली तर प्रत्यक्ष बर्फवृष्टीपेक्षाही जास्त थर जमला असता!
हळूहळू नोव्हंेबर संपत आला, तरी बर्फ काही तोंड दाखवायला तयार नव्हता. `काय सांगू महाराजा' म्हणून बर्फाची रसभरीत वर्णनं ऐकवणारे माझे ऑफीसमधले सहकारी आता बर्फाचा विषय निघाल्यावर `आपण त्या गावचेच नव्हे' असा चेहरा करायला लागले. आमचं तिथलं प्रोजेक्ट ऑफीस म्हणजे क्रॅनडाचं किंवा खरं तर जगाचं एक प्रातिनिधीक रूप होतं. अगदी आमच्या त्या वीस-बावीसजणांच्या टीममध्ये फ्रेंच, ब्रिटीश, जर्मन, स्वित्झर्लंडस्, इटालियन, अरबी, फिेलपिनो, थाई, मलेशियन, चिनी, रशियन, पाकिस्तानी, भारतीय, श्रीलंकन, अमेरिकन असे सगळे`क्रॅनेडियन्स' होेते. ठरवूनसुद्धा इतकं वैविध्य एका टीममध्ये आणणं कठीण जाईल. मग कधीकधी भारतीय उपखंडातले, अतिपूर्वेकडचे, पूर्व आणि पश्चिम युरोपियन्स असे उपगट जमून `गावाकडल्या गप्पा' व्हायच्या. आपल्याकडे सांगली-कोल्हापूरवाल्यांचं पुणे-मुंबईकरांशी पटकन जमत नाही. पण सातासमुद्रापार गेल्यावर पाकिस्तानीसुद्धा `आपले' वाटायला लागतात. ``आमच्याकडं फारशी परवानगी नाही, पण क्रॅनडात आल्यावर मला भारतीय सिनेमांचं एवढं वेड लागलं की आता माझा रविवार त्याशिवाय साजरा होतच नाही! बॉलिवूडचे सिनेमे पाहताना मला अगदी घरी गेल्यासारखं वाटतं'' - रावळपिंडीहून आलेली सामिया सांगायची. जुन्या गाण्यातल्या कितीतरी उर्दू शब्दांसाठी ती माझा `गुरू' झाली होती. एरवी दिसण्यावरून ती कोणतंही एकारान्त आडनाव लावून सहज खपून जाईल.
भारत-पाक संबंधाबद्दल इथल्या लोकांना खूप उत्सुकता आहे. क्रॅनडात एकमेकांत एवढे मिसळून वागणारे `आमची भाषा-संस्कृती एक आहे' म्हणणारे हे शेजारी आपापल्या देशात गेल्यावर मात्र एकमेकांवर एवढं का गुरकावतात हे इथल्या लोकांना उलगडत नाही. खरं सांगायचं तर आपल्याला तरी कुठं उलगडलंय? सर्व दृष्टीनं जवळचं असणारं आपलं हे धाकटं भावंड, पण जन्मापासूनच भाऊबंदकी सुरू आहे!
आपल्या दृष्टीने सगळया गोऱ्यांची `पाश्चात्य संस्कृती' असली तरी युरोपियन बायकांचा अड्डा जमला की, `कसं बाई या अमेरिकन आयांचं मुलांकडे लक्ष नसतं... बारा-तेराव्या वर्षी मुलं सिगरेटी ओढतात म्हणजे काय?' अशा गप्पा! (त्यांच्या दृष्टीनं एकोणीस-वीसाव्या वर्षी सिगरेट फुंकणं संस्कृतीत बसत असावं!) तर पूर्व युरोपियन बाया `ह्या पश्चिमेच्या बायका म्हणजे अगदीच बाई `हे' - जराशी प्यायली की लगेच कशी चढती यांना...' असं म्हणून एकमेकींत टाळया द्यायच्या.
पुरुषांच्यात त्यामानानं सांस्कृतिक एकी असते. खेळ, राजकारण, अर्थकारण, थोडे पांचट विनोद आणि तोंडी लावायला `पेग' अशा कॉमन गोष्टी! आपापल्या प्रांतानुसार `तोंडी लावण्याची' मात्रा थोडी कमी-जास्त एवढाच काय तो फरक!
आग्नेय आशिया सांस्कृतिकदृष्ट्या भारताच्या एवढ्या जवळ आहे हे मला क्रॅनडात समजलं. पॅट नावाची ऑफीसमधली एक थाई मुलगी मला एकदा लोकलमध्ये दिसली. बराच वेळ ती डोळे मिटून बसली होती. उतरताना मी म्हणलं, `छान डुलका लागला वाटतं?' तर मला म्हणाली, ``छे, मी ध्यान धारणेचा प्रयत्न करत होते.'' ``ओहो, तू इथे योगाचा क्लास लावला आहेस का?'' मी विचारलं. त्यावर म्हणाली, ``हे काय योग शिकवणार? (ती `योग'च म्हणाली, `योगा' नाही!) आमच्या देशात त्याची केवढी परंपरा आहे. इथल्या लोकांना आत्ता त्याचं महत्त्व पटतंय. पण गेली हजारो वर्षे आम्हाला योग माहित्येय..'' मग एकदम आठवून म्हणाली, ``अरे, तू तर भारतातून आलायस नाही का? म्हणजे तुलाही योग माहिती असणारच. मन:शांतीला आपण किती महत्त्व देतो ना.... कळेल हळूहळू या लोकांना.'' पुढं बऱ्याच पौराणिक, ऐतिहासिक गोष्टी निघाल्या. ``आमच्याकडे एक गोष्ट खूपच लोकप्रिय आहे. एका मोठ्या राक्षसाला एक राजा मारतो. तुला माहित्येय?'' तिनं विचारलं. आता पुराणातल्या बहुतेक गोष्टीत कोणीतरी एखाद्या राक्षसाला मारतोच! - म्हटलं थोडी गोष्ट सांग, किंवा पात्रांची नावं तरी सांग. ``अरे तो `ठॅस्नन' नावाचा `अॅर्शुर' नाही का?'' मला काही सुधरेना..... ``अरे ते दोघं भाऊ असतात, एकाची बायको असते...''
``बरं बरं, रामायण होय..?'' मी विचारलं. ``ओह, तुला ते नावासह माहित्येय र..'' तिला ते फारच भारी वाटलं. आता `दशानन' रावणाचा `ठॅस्नन' केल्यावर राम-लक्ष्मणांची नावं मी विचारली नाहीत. पण आजही तिथे संस्कृत आणि पाली (तिच्या भाषेत `बाली') भाषेचा अभ्यास होतो. त्यांच्या भाषेतही आपल्याएवढेच तत्सम, तद्भव शब्द आहेत. फक्त त्यांचे उच्चार एवढे विचित्र असतात की त्याला `तत्सम' म्हणवणार नाही! `माझं नावही संस्कृतच आहे' एकदा पॅट मला म्हणाली. झेींर्हीा असं काहीतरी तिच्या नावाचं स्पेलिंग होतं - म्हटलं हे कसलं संस्कृत? `मी घरातली सगळयात मोठी मुलगी आहे ना म्हणून.' ती म्हणाली. ``होय, पण `पोथाम'चा अर्थ?'' मी विचारलं. ``यू नो.... पॉ%थम मिन्स फर्स्ट..... फर्स्ट !'' एक बोट नाचवत ती म्हणाली. ``प्रथम होय'' माझी आत्ता ट्यूब पेटली. ``येस! दॅटस् मी! तुम्ही प्र-थम म्हणता काय?'' तिनं विचारलं. यातलं `प्र' म्हणताना तिला बरेच कष्ट पडले. मी मान डोलावल्यावर `जरा विचित्रच संस्कृत बोलतात वाटतं हे भारतीय' असा चेहरा करून मला विचारलं, ``म्हणजे मूळ `पो-थम'चं तुमच्या भाषेत `प्र%थम' झालंय का?''
- चारुदत्त आपटे, टोरांटो

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन