अमेरिकेत जाऊन पैसे मिळवायचे आहेत?
भारतातील तरुणांना अमेरिकेचे मोठे आकर्षण आहे. तेथील जीवनाचे दिसणारे स्वरूप तेथे येण्यास आकर्षित करीत होते. स्वातंत्र्यानंतर भारतात गुणवान मंडळींना स्थान असेल किंवा कसे याचीच शंका होती. त्यामुळे सहाव्या दशकात अमेरिकेने आपले दरवाजे उघडले तसे बरीच मंडळी उच्च शिक्षण, पैसे कमावण्यास नोकरी असा विचार करूनच भारताचा किनारा सोडती झाली. आता तेथील भारतीयांची संख्या जवळजवळ २० लाखांवर गेली आहे. सारे चांगले उत्पन्न कमावतात. पैसे सांभाळून असतात.
अमेरिका हा देश चांगलाच मोठा आहे. लोकसंख्या फारच थोडी. लोकांना चैनीची चांगलीच सवय लागली. जेथून शास्त्रज्ञ मिळतील तेथून जमा करून उपयुक्त शोध लावून माणसाचे जीवन समृद्ध बनवले. मग त्यात इतरांना काही त्रास होतो की नाही याचीही त्यांनी पर्वा केली नाही. त्याचा उपयोग इतरांना करून देण्यासाठी रॉयल्टीसाठी पेटंट ही व्यवस्था त्यांनी सुरू केल्यामुळे खूप पैसा मिळू लागला. युद्धस्थळापासून फार दूर असल्यामुळे शांतताही मिळू लागली. विजेची मुळीच कमतरता नाही. सर्व पैशाचा कारभार असल्यामुळे माणसांपेक्षा कंपन्यांचे फायदे जास्त महत्त्वाचे मानतात असेच वाटू लागले.
संपत्ती निर्माण करणारे कारखाने खूप उभे राहिले. उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचे `क्रॅपिटॅलिझम' या पद्धतीतील मूळ तत्व आहे. बाकी सर्व त्याला अनुसरूनच असतात. उत्पादनावर वाईट परिणाम होता कामा नये हे सरकारचे मुख्य धोरण असे. अमेरिकेतील तरूण माणसे कमी होत गेल्यामुळे उत्पादन महाग होत गेले. आपले कारखाने इतर देशांत नेऊन तेथील स्वस्त कामगारांकडून ते चालवून जास्त पैसे कमवण्यास सुरुवात केली. कारखाने परदेशी असल्यामुळे मालकांना खूप पैसे मिळत असले तरी सरकारचे उत्पन्न घटले. सरकार बाहेरून कर्ज घेऊ लागले. सध्या तरी अशी परिस्थिती आहे की, अमेरिकन सरकार रोज २०० कोटी डॉलर कर्ज घेते आहे. स्थानिक कारखाने कमी झाल्यावर येथील अनुभवसिद्ध लोकांनी आता जगभरच्या उद्योगांचे सल्लागार म्हणून सल्ले देत पैसे मिळवण्यास सुरुवात केली. येथे सुमारे ४.५ कोटि लोक दरिद्री आहेत, त्यांना जगवण्यासाठी सरकार त्यांना अन्न-कार्ड (फूड स्टॅम्पस्) पुरवते. ते लोक सार्वजनिक भटारखान्यातून जेवण घेतात.
अमेरिकेत क्रेडिट कार्डद्वारा खरेदी केली जाते. त्यामुळे चैन आणि ऐष करण्याची फार सवय लागलेली आहे. रेस्टॉरंटमध्ये गिऱ्हाईके प्लेटभर खातात आणि `विशाल' बनतात. तेथे राहणारे भारतीय हळूहळू त्यांच्याच पंक्तीत बसायला लागले. किती खरेदी करावी याचे भान नाही. सहसा प्रत्येक अमेरिकन उधारीवर जगतो. पगारदार माणूस आपली पुढील सहा महिन्यांची मिळकत आत्ताच खर्च करून बसलेला असतो. त्यामुळे नोकरी गेली की ते लोक अक्षरश: रस्त्यावर येतात.
मला लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आठवते. सोन्याची म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे पुष्कळ लोकांना पूर्वी पैसे कमावण्यासाठी लंकेत जावेसे वाटे. तेथे कोणत्याही कामाचा मोबदला सोन्याच्या विटांमध्ये मिळत असे. आमचा बंडू कर्ज काढून तेथे (एकटाच) गेला. बरोबर नेलेले खाद्यपदार्थ असल्यामुळे आठवडाभर त्याला काही खर्च करावा लागला नाही आणि कामाच्या मोबदल्याच्या १६-१६ (सोन्याच्या) विटा जमल्या होत्या. आता इथेच राहून श्रीमंत होऊनच परतूया असा विचार तो करू लागला. बायकोलाही येथे बोलावून घेऊ आणि सुखात इथंच राहू. पण त्यासाठी भारतातील सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी तेथे जावे लागणार. येताना त्याने परतीचे तिकीट काढले होते म्हणून या विटा त्याला मोडाव्या लागणार नव्हत्या.
दुसऱ्या दिवशी न्हाव्याच्या दुकानात गेला. कटिंग झाल्यावर विचारले. न्हावीबाबाने `दीड वीट' म्हणून सांगून बंडूला एकदम झीटच आणली. तो एका हॉटेलात गेला, तर जेवणाचा दर `दोन विटा' होता. एक खोली घेऊन सामान ठेवून कुलूप ठेवणे गरजेचे होते. दुकानदाराने एक चांगले कुलूप दाखवले. ते दीड विटेला मिळाले. एक खोली आठवड्यास तीन विटा या भाड्याने आगावू देऊन घेतली. आठ विटा खोलीत ठेवून तो कामावर गेला. सायंकाळी मजूरीच्या अडीच विटा घेऊन तो घरी आला. ही लंकेची सहल आतबट्ट््याचीच ठरते आहे. आता येथे न राहणेच चांगले. आपला भारतच बरा. मिळेल त्या वाहनाने तो परत गेला. बरोबर दाखवण्यापुरतीसुद्धा वीट नेता आली नाही. आता तो सावकाराचे कर्ज फेडण्याच्या खटाटोपात आहे.
अमेरिकेला जाऊन यायचे असेल तर प्रयत्न करा, पण तेथे राहून पैसे कमावण्याचा विचार आता प्रत्यक्षात येणे कठीण दिसते. सध्याच्या परिस्थितीचा विचार करून भविष्यात काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज बांधणारे आहेत. श्री.जेराल्ड सेलॉट हे अशी भाकिते करण्यात पटाईत समजले जातात. त्यांच्या अंदाजानुसार या चार वर्षात अमेरिकेत क्रांति होण्याचा संभव आहे. अन्नधान्यावरून दंगे आणि चळवळीही त्यांना अभिप्रेत आहेत. डॉलरच्या किंमतीत ९०% इतकी घसरण होईल असाही त्यांचा होरा आहे. मीही गेल्या पंधरा वर्षात अमेरिकेच्या पाच भेटींमध्ये महागाई तिथे फार वेगाने वाढते आहे या निष्कर्षाला आलेलो आहे. नवीन नोकऱ्या मिळणे फारच अवघड आहे असे दिसते. तेथे गेलेल्या आपल्या लोकांशी सल्लामसतल करूनच तेथे जाण्याचा विचार अंमलात आणावा ही सूचना.
- प्रा. मुकुंद. दि. आपटे,
३२, रक्षक सोसायटी, आैंध क्रॅम्प, पोस्ट ऑफीस, पुणे ४११०२७
फोन : (०२०) २७२७०३३२
Comments
Post a Comment