Skip to main content

16 April 2018

अंत्यज सेवेसाठी समर्पित - मामा फडके

विट्ठल लक्ष्मण फडके या टिळकभक्त गांधीवाद्याचे नाव आज कितीजणांस ठाअूक असेल? टिळकांच्या आणि गांधींच्याही सहवासात असलेले, अंत्यजसेवेला जीवन वाहिलेले हे `पद्मभूषण' होते, गुजरात ही त्यांची कर्मभूमी. त्या राज्यात त्यांच्या नावाने मागासवर्गी विद्यार्थ्यांसाठी १९ आदर्श निवासी शाळा चालतात. गोधरा या गावात `मामा फडके मेाहल्ला' म्हणून ओळखला जातो. आजच्या कलुषित वातावरणात या सच्च्या हरिजनसेवकाचे काम स्मरणीय ठरेल.
रत्नागिरी जिल्ह्यात जांभुळआड येथे या विट्ठलाचा जन्म झाला. वडील रत्नागिरीच्या अेका दुकानात कामाला होते, त्यामुळे बेताच्या स्थितीतले प्राथमिक शिक्षण आजोळी आडिवऱ्याला आणि थोडे रत्नागिरीत झाले. शाळेत असतानाच त्यांनी देशकार्याचे ध्येय नक्की केले होते. `आम्ही तीन भाअू आहोत, तर मला देशसेवा करण्यासाठी आशीर्वाद द्या,' असे त्यांनी वडिलांना समजावून घर सोडले.
वरवर पाहता त्यांचा अवतार क्रांतिकारकासारखा असे. हे काही बाँब तयार करणारे वगैरे असावेत असे लोकांना वाटे. पण त्यांचे वाचन मनन आणि चिंतन वेगळे होते. मूठभर क्रांतिकारक स्वराज्य आणू शकणार नाहीत, त्यासाठी बहुजन समाजाची मजबूत संघटना हवी, हे त्यांनी १९०८साली सांगितलेलेे होते. १९१६ साली टिळक रेल्वेने लखनौ येथे गोधरामार्गे जाणार होते ते समजल्यावर लोक स्टेशनवर गोळा झाले. पोलीस कुणालाच आत सोडेनात. हे फडके कसेबसे टिळकांच्या डब्यात घुसले. टिळकांच्या सोबतच्या लोकांनी त्यांना हटकले व खडसावले, पण `लोकांसाठी नेत्याला वेळप्रसंगी त्रास द्यावा लागतो' असे म्हणून त्यांनी टिळकांना गाठून विनंती केली की, बाहेर लोक गोळा झालेत, त्यांना काही संदेश द्या. टिळक महाराज बाहेर आले व लोकांस म्हणाले, `हिंदू पारशी मुसलमान, असले काही काँग्रेस ओळखत नाही, फक्त देशाला ओळखते. देशाचे काम तर साऱ्यांचे आहे, ते साऱ्यांनी केले तरच देश स्वतंत्र होआील.' लो. टिळक मुंबआीच्या सरदारगृहात अंतकाळी होते, त्यावेळी आितरांसह  फहकेही तिथं बसून होते.
बडोद्याचे महाराज सयाजीराव यांनी नर्मदेकाठी गंगनाथ स्थानी अंत्यजांसाठी खास शाळा सुरू केली, नंतर ती बडोद्याला हलविली. महाराज अेकदा मुंबआीत बोलताना म्हणाले की, त्या शाळेसाठी चांगले शिक्षक मिळत नाहीत, कारण अुच्चवर्णी लोक त्यांना शिकवायला तयार होत नाहीत. ते अैकून आधी कालेलकर आणि पाठोपाठ विट्ठल फडके तेथे आिंग्रजी शिकविण्यासाठी रुजू झाले. त्या शाळेत कौटुंबिक वातावरण असावे म्हणून शिक्षकांना साहेब, सर असे  न  म्हणता काका अण्णा मामा म्हणावे अशी रीत होती. म्हणून तिथे कालेलकर काका झाले व हे फडके मामा झाले. हरिहर शर्मा अण्णा, आणि सीताराम पटवर्धन हे आप्पा झाले.
गांधीप्रणित निर्भय सत्याग्रहाचा ते सदैव अवलंब करीत. सरकारच्या `काळया यादीत' असल्याने त्यांच्यावर पाळत असे. रत्नागिरीत त्यांनी वंदे मातरम् याच विषयी भाषण केले, तेथील सीआयडी आिन्स्पेक्टर झारापकर यांना भाषण आवडल्याचे ते म्हणाले. फडके अुत्तरले, `मालक आणि कसाआी या दोघांनाही शेळी आवडते; तुमची बाजू कोणती?' पाचव्या जॉर्ज बादशहाला वाकून कुर्निसात त्यानी केला नाही, म्हणून त्यांची गंगनाथची अंत्यज शाळा बंद करण्यात आली. या सुमाराला त्यांनी गिरनार येथे राहून साडेतीन वर्षे तपस्या केली.
नामदार गोखले यांच्या निधनानंतर गांधीजी काही काळ पुण्यात होते. २६-०२-१९१६ला मामानी गांधीजींची भेट घेतली. गांधीजींनी मामाना सहजच ओळखले. गांधीजींनी त्यांना विचारले की, माझी मते तुम्हाला किती पटतात? त्यावर मामा स्पष्ट अुत्तरले, ` नव्वद टक्के पटतात, पण क्रांतिकारकांना भ्याड म्हणता ते मुळीच पटत नाही.' गांधीजींशी चर्चा करून ते कोचरब येथील गांधी आश्रमात पोचले. यालाच नंतर साबरमती आश्रम हे नाव मिळाले. गांधीजींच्या सहवासात कित्येक घडामोडींबद्दल चर्चा करण्याची मामाना संधी मिळाली. साबरमती आश्रमात ग्रंथपाल म्हणून मामा काम करीत. गांधींनी अेके दुपारी त्यांच्याकडून वर्तमानपत्र मागविले. मामानी त्यांना सांगितले की, `येथील आश्रमवासीयांना खूप काम असते, दुपारी ११ ते १ अेवढीच त्यांची विश्रांती असते. त्यावेळी वाचायला त्यांना वर्तमानपत्रे पाहिजेत, म्हणून ती तुम्हाला देत येत नाहीत! अर्थातच गांधीजींनी ते अैकले. मामा आजारी असताना गांधीजी त्यांची सेवा करीत, आितकी त्यांच्यात आत्मीयता होती.
मामांचे जीवन अंत्यजसेवेसाठी वाहिलेले होते. त्या मुलांच्या अुत्कर्षासाठी त्यांनी  गोधरा येथे १९१९ साली आश्रम स्थापन केला. ही गांधी युगातील पहिली अंत्यज शाळा. त्यांचे प्रतिपादन होते की, केवळ अशा संस्था अुभ्या करून किंवा प्रचार करून अस्पृश्यता निवारण होणार नाही, तर त्यांच्यासोबत कुटुंबियांप्रमाणे राहायला हवे. गोधरा शाळेतील तीन मुलांना त्यांनी साबरमतीच्या राष्ट्नीय शाळेत पाठविले. त्यामुळे त्या पोरांचे आआीवडील व्याकूळ झाले, व त्या मुलांना दीडच महिन्यात त्यानी घरी आणले. परंतु आता त्या घरचे वातावरण त्या पोरांना पटेना. दारू, भिकारीपणा, शिव्या मारहाण हे सोडून ती मुले परत आश्रमात राहायला गेली. मामांची प्रतिक्रिया अशी की, याला पालक जबाबदार नसून कोणत्याही मालकाचे गुलाम त्या गुलामीतच रमतात, तेव्हा पाप गुलामाला नव्हे तर मालकाला लागते.
अंत्यजांच्या शाळेसाठी त्यांनी काही पथ्ये सांभाळली होती. अंत्यजांसाठी कोरे अन्न द्यावे, शिजवलेले नको. विदेशी वा फाटके कपडे देअू नका. जे द्याल ते प्रेमाने द्या. अक्षरज्ञानाबरोबरच त्यांना मेहनतीचे काम द्या, लोहारकाम सुतारकाम शिकवा. शेतीकामे अुत्तम, कारण त्यामुळे निसर्गाशी जवळीक वाटते, वाढते. अंत्यज हा श्रमजीवी आहे, तो बुद्धिजीवी नाही; म्हणून तो महत्वाचा आहे, त्यांचा अुद्धार सवर्णांच्या सहकार्यावरच अवलंबून आहे. याचबरोबर ते अंत्यजांना स्पष्टपणे सांगत, ` तुमच्या हालअपेष्टांना सवर्ण जबाबदार नाहीत, ते तर त्यांची विपरीत परिस्थिती सहन करून ही शृुद्ध आचार जपतात. दारू मांस घाणेरडेपणा हे तुम्ही सोडत नाही, तेच तुमच्या अुपेक्षेचे कारण आहे. आितर कोणीतरी तुम्हाला जे हवे ते कशासाठी करू देतील?'
त्यांना तुरुंगवास तर घडलाच, पण ते तुरुंगात असताना झगडून कैद्यांसाठी काही सुविधा मिळवीत. आितर जे कैदी शिकले सवरलेले होते त्यांच्यासाठी मामा हे विद्यापीठ असत. अहमदाबाद येथे काँग्रेसचे अधिवेशन होते त्याची बरीच जबाबदारी त्यांच्यावर होती. अहमदाबाद नगरपालिकेची कोणतीही मदत  त्यांनी नाकारली, स्वत: सफाआीकामासाठी खडे झाले.  अधिवेशनानंतर त्यांचा सत्कार झाला त्यात पाटी आणि फावडे अंकित केलेले सन्मानचिन्ह देण्यात आले. ते चिन्ह अहमदाबादच्या गांधी संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. १९४६मध्ये त्यांच्या अेका डोळयाला दुखापत होअून तो निकामी झाला, पण त्यांचे कार्य थांबले नाही.
सरदार पटेल म्हणतात, `मामानी स्वत:चे चित्पावन ब्राह्मणत्व अंत्यजोद्धारात आहे, असे मानून त्या निर्धाराची दीक्षाच घेतली.' ३०-०८-१९४७च्या पत्रात काका कालेलकर म्हणतात, `आपल्याला स्वातंत्र्याचे वरदान मिळाले पण त्यासाठी लढणारे आता कमी होतील. भोग अैश्वर्य प्रतिष्ठा अधिकार यांचा आस्वाद घेण्याची सोय झाली, त्याचा त्याग करण्यास आता कोण तयार होणार?..... हिंदू धर्माची आणि स्वराज्याची सेवा करून गुजरात व अखिल भारतात पूज्य स्थान प्राप्त करणारे मामा फडके यांचे स्थान फार अुच्च पातळीवर आहे.' हरिजनसेवा ही काहीतरी नवीन प्रणाली वा विचार नाही, गांधीनी त्यास जोर दिला; हे नमूद केले पाहिजे.
`रोगात कोणता वद रोग भयंकर मनातिल चिंता
औषध काय अनुत्तम भोजननिद्रादिकांत परिमितता ।'
हा श्लोक त्यांनी लहानपणी पाठ केला व तो आयुष्यभर आचरिला. त्यांना १९६९ मध्ये भारत सरकारने `पद्मभूषण' देअून गौरविले.

-भास्कर हरी फडके, व्रजविहार सोसायटी, तरसाली रोड वडोदरा (गुजरात) फोन : (०) ९९९ ८०० २३५५

शहाण्यांना नुकसान व कमीपणा

माणसाने प्रगती करावी, विकास साधावा, -की चुकीचे वागून डबक्यातच राहावे? हा प्रश्न विचारणाराही येडा ठरेल. पण माणसाला जर येड्यासारखे वागून फायदा मिळत असेल, आणि त्याअुलट शहाण्यासारखे वागून फायदा तर नाहीच परंतु तोटाच होत असेल तर काय करावे; असा त्या प्रश्नाचा रोख आहे. रोजच्या व्यवहारातले साधे अुदाहरण आहे. कोणत्याही कार्यक्रमाची वेळ ठरलेली असते, निमंत्रणपत्रिकेत छापलेली असते. ठीक त्या वेळेत पोचणारी शहाणी माणसे येडी ठरतात, कारण अुशीरा येणाऱ्यांसाठी कार्यक्रम थांबवून ठेवण्याची प्रथा आहे. म्हणजे वेळ पाळण्यामुळे शहाण्यांचा जास्त वेळ फुकट खर्च होतो, आणि चुकीचे वागणारे अुशीरा येणारे लोक कार्यक्रम सुरू होतानाच पोचून शहाणे ठरतात. निसर्गत: काही पंगूत्व असणाऱ्यांसाठी धडधाकट व्यक्तीने सांभाळून घ्यावे ही माणूसकी झाली, पण धडधाकट माणसांनी जर  पंगूत्व पांघरले तर त्यांच्यासाठी शहाण्यांनी काय न्याय करावा?

आजच्या काळात दलितांचा किंवा मागास जाती जमातींचा प्रश्न तसाच अैरणीवर आला आहे. ज्यांना मागच्या कैक पिढ्यांपासून -परिस्थितीने किंवा निसर्गत: दुर्बळता आहे त्यांना काही झुकते माप देअून अधिक संधी दिल्या पाहिजेत हे निर्विवाद आहे. पण ज्यांना समान संधी आणि समान स्थितीचा लाभ गेल्या काही वर्षांत मिळाला असेल, त्यांनी विकासाच्या व्याख्येत समान प्रगती करायला हवी. ती केली नाही म्हणून असमानता आली, तर जे आपल्या कार्याने कर्तृत्वाने पुढे गेले त्यांना त्या परिश्रमांचा फायदा व्हावा की तोटा? जर तोटाच होत असेल तर माणसाने प्रगतीसाठी प्रयत्न तरी कशासाठी करावेत? कुटुंबातील दोन मुलांना समान परिस्थिती, समान साधने, समान कौतुक, समान संधी आणि समान संस्कारही मिळतात, त्यातल्या अेकाने काही विशेष प्रगती केली आणि दुसरा अुडाणटप्पू  झाला तर? फायदा कुणाला मिळावा?

आपल्या देशाची संघराज्याची मूलभूत कल्पना जरी रम्य असली तरी विविधता अशी आहे की, हा न्यायान्यायाचा प्रश्न सर्व राज्यांत शिजू लागला आहे. आीशान्य भारताकडे गेल्या चार पाच वर्षांत अुर्वरित भारताचे अधिक लक्ष वेधले आहे; तिथली स्थिती फार वेगळी  आहे. त्यांच्या दुर्बळतेला ती राज्ये जबाबदार नाहीत. म्हणून त्यांना अधिक झुकते माप द्यायलाच हवे. त्यांना मदतीसाठी कोणतीही अट आणि अपेक्षा तूर्त तरी ठेवूच नये. परंतु अुत्तर प्रदेश - बिहार - बंगाल या राज्यांचे काय? भारताच्या बाबतीत आधीच दक्षिण अुत्तर हा भेद अनेक बाबतींत आहे. आर्य द्रवीड अशा वास्तविक किंवा काल्पनिक संघर्षापासून त्याची सुरुवात झाली. भारतावर जी आक्रमणे झाली, त्यांत अुत्तर भारत गवसला. महाराष्ट्नत शिवाजीराजानी ते आक्रमण थोपविले त्यामुळे दक्षिण बरीचशी वाचली, तरीही आदिलशाही कर्नाटकात घुसलीच. इंग्रजाने उत्तरेत पाय पसरल्याने स्वातंत्र्याच्या पहिल्या सशस्त्र प्रयत्नात १८५७ साली उत्तरेतून महाराष्ट्नपर्यंतच लोण पोचले, दक्षिण त्या मानाने निवांत होती. स्वातंत्र्यानंतर भाषिक, सांस्कृतिक भेद स्पष्ट होत गेले. त्या साऱ्या पैलूंना आता आर्थिक विचारही जोडण्याची वेळ येअून ठेपली आहे. कारण अुत्तरेच्या मानाने दक्षिण भारतातील राज्यांनी बरी प्रगती केली आहे. त्याबद्दल त्या राज्यांना फायदा तर राहोच पण तोटा होण्याची वेळ आहे. भारताचा अेकसंधपणा टिकला पाहिजे म्हणून त्या राज्यांची समजूत काढावी लागेल हे वरवर खरे भासत असले तरी ती कुणाला पटेल असे नाही; आणि ती पटवून घ्यायची म्हटले तर, शहाण्यासारखे वागूनही नुकसान भोगावे लागणार, त्याची तयारी ठेवायची का? -असा तो `कौटुंबिक' बिकट प्रश्न आहे.

लोकसंख्यावाढ हा प्रगतीच्या आड येणारा भारतापुढचा अेक मोठा प्रश्न आहे. निरक्षरता हा दुसरा. अैदीपणा हा तिसरा..... आणखी कितीतरी आहेत. परंतु या प्रश्नांच्या संदर्भात दक्षिणेच्या राज्यांनी बरेच प्रयत्न करून प्रगती साधलेली आहे. वास्तविक स्वातंत्र्यानंतर भारताच्या राजकारणावर अुत्तरेच्या राज्यांचा  -आणि त्यातही अुत्तर प्रदेशाचा वरचष्मा राहिलेला आहे. अेकतर त्या राज्याला राजधानी दिल्ली जवळ पडते, तिथे अुचक घालमेल करणे सोपे होते, संपर्क राहतो. शिवाय दोहोंच्या स्वभावात साम्य आहे. त्याचाही फायदा दिल्लीत वावर करण्यावर होतो. महाराष्ट्नतल्या नेत्यांना तिथे परके वाटते हा अनेकांचा अनुभव तर आहेच. दिल्लीत संधान बांधणे उत्तरेला शक्य असते. तरीही अुत्तरेतली राज्ये आजच्या विकासाच्या मापाने मागास राहिलेली आहेत.

गंगा यमुनेसारख्या  महानद्या असूनही शेती व दळणवळण सुधारण्याअैवजी त्या राज्यांनी नद्यांची गटारे करून टाकली. लोकसंख्येच्या बाबतीत केरळने प्रयत्नपूर्वक चांगले काम केले आणि लोकसंख्येच्या वाढीवर नियंत्रण मिळवले. त्याअुलट अुत्तर प्रदेशाने केवळ `तेवढेच' काम केल्याचे दिसते. साक्षरतेच्या बाबतीत केरळने जवळजवळ शंभर टक्क्यांची मजल गाठली, तिकडे झारखंड बिहार यांची स्थिती पाहायलाही नको. पर्यटन- नोकरदारी-शेती सगळया बाजूंनी अुत्तर मागास राहिली. आता नव्याने जीअेसटी लागू झाला. वस्तू आणि सेवाकर राज्यांतील अुत्पादन आणि सेवाअुद्योगांच्या प्र्रमाणात गोळा होणार हे तर अुघडच आहे. परंतु अुद्योगच कमी असतील तर  जीअेसटी कसला गोळा होणार? त्या बाबतीत महाराष्ट्न् - गुजरात - तामीळनाड -कर्नाटक ही राज्ये तुलनेने अुद्योगशील आहेत, तिथे जास्त कर गेेाळा होणार. पाणी वनसंपत्ती पशूधन -म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीत दक्षिणी राज्यांनी कमी ऱ्हास केला आहे. सिनेमे तयार होण्याचे प्रमाण तामीळनाडूत खूप आहे; अुत्तरेतले कवी-नटनट्या-संगीतकार हे सारे मुंबआीत येअून बसले कारण त्यंाच्या राज्यांत सिनेमातील फक्त होली आणि गज्जरका हलवा अेवढेच टिकून असते.

आता या स्थितीने पुन्हा प्रादेशिक वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यात प्रगतीशील राज्यांस नुकसान होणार हे दिसते आहे. कारण आपल्या केंद्रिय अर्थ आयोगाच्या नव्या धोरणानुसार राज्यांना देण्याची आर्थिक वाटणी लोकसंख्येच्या प्रमाणात द्यायची आहे. म्हणजे केरळला केंद्राकडून कमी पैसे मिळणार, आणि अुत्तर प्रदेशाला ते जास्त मिळणार. का? -तर अुत्तरेने लोकसंख्या वाढविली म्हणून? अुद्योगधंदे केले नाहीत म्हणून? साक्षरतेचे काम केले नाही म्हणून? -आितकेच नव्हे तर २०२६ सालानंतर लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधींची संख्या ठरणार आहे. केरळची लोकसंख्या कमी झाली असल्याने तिथे कदाचित २० अैवजी १५ खासदार होतील; आणि अुत्तर प्रदेशात ते (बहुधा) आजच्या हिशेबात ७ वाढतील. म्हणजे लोकसभेत मात्र अुत्तरेचेच बहुमत वाढेल. निर्णय `त्यांचे' होतील. प्रगतीसाठी चांगले काम करण्याने केरळ तामीळनाड महाराष्ट्न् यांचे नुकसान होआील.
भारतीय अेकत्वाच्या भावनेने हा धडधडीत अन्यायही सहन करावा असे सांगितले जाआील, तेही अेकवेळ ठीक म्हणू. परंतु त्याहीपेक्षा वेगळा मोठा असह्य अन्याय असतो. आपण निर्माण केलेल्या चांगल्याचा फायदा दुसरा भाऊ शुंभ असला तरी त्याला देण्याचेही अेक कर्तव्य असते; पण त्यातही आणखी वाआीट म्हणजे अुत्तरेची अरेरावी वाढत गेली तर काय करायचे? तशी अरेरावी प्रथमपासूनच चालते हा दक्षिणेचा आक्षेप आहेच. म्हणून तर राज्ये तोडण्याची, हिंदी भाषेची, लंकेतल्या तमीळींची आंदोलने झाली आहेत. तोच सारा अुत्तरेचा रामभरोसे हुंबपणा  यापुढे चालू राहील अशी शक्यता राहणार असेल तर ते कसे सहन व्हावे? कुटुंबातीलच असला तरी अेक भाअू सतत मागास राहतो, निष्काळजी, निरुद्योगी राहतो आणि तो दुसऱ्या भावाच्या कमाआीतून अुचलेगिरी करणारा लाट्या गोमाजी होतो.   अेकवेळ निसर्गाने दिलेले हे ओझे नाआिलाजाने वागविता येआील; परंतु त्याअुप्पर शुंभाचा अगांतुक बाष्कळ मोठेपणा सहन करणे अधिक असह्य ठरते.

दक्षिणेच्या राज्यांनी आता तोच पैलू आपल्या अस्मितेच्या रूपाने फुत्कारायला सुरुवात केली आहे. भारताचे संघराज्य ही आदर्श अेकजिनसी, पण स्वायत्त प्रणालीची परस्पर पूरक प्रशासकीय संरचना असावी ही घटनाकारांची आणि राज्यशास्त्रज्ञांची अपेक्षा होती. त्यात गैर काहीच नाही. पण अेकत्र कुटुंबातील सामर्थ्य संवर्धित करणे ही जशी कुटुंबातील साऱ्यांची समान जबाबदारी असते, तशी ती सगळया राज्यांचीही असायला हवी. अन्यथा कुटुंब विस्कळीत होण्याचा धोका वाढतो, आणि जो विचारी कमावता प्रगतीशील कर्तबगार मुलगा स्वतंत्र वेगळे राहण्याचा निर्णय घेतो, त्याला बोल लावला जातो. तरीही त्याच्या म्हणण्यात आणि निर्णयात तथ्य असते; हे येत्या काळात भारताच्या नियोजनकारांनी आणि विचारी नागरिकांनी पक्के समजून घ्यावे लागेल.

जगज्ज्योती श्रीबसवेश्वर
१२व्या शतकाच्या मध्यावर श्रीबसवेश्वरांचा कार्यकाल होता. कर्नाटकात विजापूर जिल्ह्यात `बागेवाडी' ग्रामात इ.स.११३९ च्या वैशाख शु.३ रोजी श्रीबसवेश्वर यांचा जन्म झाला. त्यांच्या मातेने ईश्वर दर्शन करताना नंदीची आराधना केली. त्याच्या प्रसादरूप या बाळाचा जन्म! ही श्रद्धा होती, म्हणून बाळाचे नाव `बसव'. कन्नडमध्ये नंदीला बसव असे म्हणतात.
वेदशास्त्र संपन्न पंडित श्री मादिराव बसवचे पिता, बागेवाडीच्या विद्याकेंद्रचे अग्रहाराचे प्रमुख होते. तल्लख बुद्धी असल्यामुळे बसव मिळून मिसळून वागत असे. धार्मिक कर्मकांडे, जातीभेद, उच्चनीचता याच्याबद्दल त्याला वाईट वाटे. तपस्वी जातवेद मुनींकडे बसव शिक्षणासाठी जाऊ लागला. तेथेच १२ वर्षे राहून वेदशास्त्रे तसेच अनेक विषयांचे ज्ञान त्याने घेतले. तपश्चर्येमुळे अंत:करणात आराध्य देव पूर्ण ठसला होता. एकीश्वर भक्ति हे तत्त्व मनात बिंबले! बसवेश्वरांकडे समाज मोठा भाऊ म्हणून पाहात असे; ते बसवण्णा म्हणून प्रिय होते. साध्या सोप्या शब्दात त्यांनी समाजाला सूचना दिल्या. वचने कानडी आहेत. मराठी भावानुवाद- नको होऊस हिंसाचारी । खोटे नाटे जीवनाचा नाश करी संसारी ।
निपट निपट रे दुर्गुण घे वसा सद्गुणांचा ।
जीवा हाच धरी ध्यास जीवनाचा ।।
याच तऱ्हेची वचने श्री बसवण्णांनी रचली व समाजात प्रसृत केली. कल्याणपट्टणच्या कलचूरी-बिज्जळ राज्यात ते मुख्य प्रधान होते. त्यांनी प्रजेच्या कल्याणाच्या सुधारणा केल्या व उत्तम प्रशासक म्हणून कीर्ती व लोकप्रचिती मिळवली. आपल्याकडे लघुत्व घेऊन इतरांना मोठेपणाचा मान देऊन सर्व समाज संघटित केला. कल्याणपट्टणात ज्ञानीशरणांकडून श्रीबसवण्णांकडून ज्ञान व स्फूर्ती घेऊन वीरशैव भक्तीसंप्रदायाची दीक्षा घेतली. श्रीबसवण्णा महान शिवभक्त होते. विधवा विवाह, आंतरजातीय विवाह अशा सामाजिक सुधारणांना त्यांनी उत्तेजन दिले. अस्पृश्यतेला त्यांनी प्रयत्नाने नष्ट केले. श्रम हेच दैवत हा विचार समाजात रूजवला. श्रम करून स्वावलंबी होण्याचा पाठ समाजापुढे ठेवला.
श्रीबसवण्णांनी जीवनपार झटून सद्गुण संपन्न एकजीवसमाज घडवला! हाच वीरशैव पंथ. हा समाज जातीभेद विरहित, भक्तीची खूण म्हणून गळयात पार्थिव शिवलिंग असा प्रघात पाडला. शिवप्रभू सदाकाल हृदयपाशी असावा हा उद्देश. इष्टलिंग शिवशरण धारण करतो. असा धर्म पाळणारा भक्तीत रमलेला जातीभेद विरहीत समाज श्रीबसवेश्वरांना अपेक्षित होता. असे हे लोकोत्तर जगज्ज्योती बसवण्णा! जन्मदिवसानिमित्त त्यांच्या कर्तृत्वाचे पुण्यस्मरण!!
-अविनाश हरी लिमये,
थोरात कॉलनी, पुणे-०४
फोन-०२०-२५४४७५७९

आद्य शंकराचाार्य दिग्विजय
श्री शङ्कर दिग्विजय हा ग्रंथ श्री विद्यारण्य तीर्थ यांनी लिहिला असून त्यांचे पूर्वीश्रमीचे नाव माधवाचार्य असे होते. त्यांचा जन्म इ.स. १२९५ मध्ये झाला. इ.स.१८ एप्रिल १३३६ मध्ये विजयनगरची स्थापना झाली. आधी हरिहर आणि नंतर बुक्क राजा गादीवर आला. माधवाचार्य इ.स.१३३६ ते इ.स.१३६५ पर्यंत विजयनगरचे मंत्री होते. (वयाच्या ७०पर्यंत). पुढे ग्रंथलेखनासाठी मंत्रीपदाचा कारभार दुसऱ्या मंत्र्यावर सोपवून ते निवृत्त झाले. त्यानंतर ग्रंथलेखन, ग्रंथसंपादन व सायणांनी लिहिलेल्या ग्रंथावर सूक्ष्मदृष्टी इ. कामे जवळ जवळ १५ वर्षे करून वयाच्या ८५व्या वर्षी संन्यास ग्रहण केले. इ.स.१३८० मध्ये शृंगेरी पीठाचे आचार्य झाले. पुढे सहा वर्षांनी १३८६ मध्ये वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली.
श्री शङ्कर दिग्विजय या ग्रंथात शंकराचार्याच्या चरित्रावर प्रकाश पडतो, केवळ ३२ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी केलेले अफाट कार्य व दिग्विजय बघून मन थक्क होते. अद्वैत तत्त्वज्ञान जगात पसरविण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. भाष्यरचना, दिग्विजय, अन्य साहित्यरचना, मठ स्थापना इ. अनेक कार्ये करून आचार्यांनी तेराशे वर्षांपूर्वी वेदान्त तत्त्वज्ञानाची ज्योत तेवत ठेवली, तिचा प्रकाश आजही अखिल भारतवर्षाला उजळवून टाकीत आहे.
त्यांच्या स्तोत्रात कवित्व आणि दार्शनिकत्व यांचे मिलन तर दिसतेच, पण सुललित, रुचकर, प्रौढ, प्रसन्न, गंभीर व रसभावयुक्त काव्यशैलीत वाचक देहभान विसरून जातो. चार महावाक्ये त्यांनी चार मठांसाठी निवडली. त्या महावाक्यांतही गंभीर, रसाळ, तर्कनिष्ठ, न्यायशास्त्रातील सिद्धान्तयुक्त अशी संगती आहे.
`तत्त्वमसि'- हे उपदेश वाक्य आहे. `ते तू आहेस'. `सांगणारा', `ऐकणारा' आणि `ब्रह्माचे अस्तित्व' ह्या महावाक्यात अंतर्भूत आहे.
`अहं ब्रह्मास्मि'- हे अनुभव वाक्य आहे. ह्यात सांगणारा गळाला. `मी' आणि `ब्रह्म' राहिले.
`अयमात्मा ब्रह्म' - ह्या ठिकाणी कोणी `त्रयस्त' तोही ब्रह्म आहे हे ज्ञान
`सर्व खल्विदं ब्रह्म'- ह्यात सर्व जगत् ब्रह्मरूप आहे हा साक्षात्कार अंतर्भूत आहे.
`श्री शङ्कर दिग्विजय' ह्या ग्रंथात आद्य श्री शंकराचार्यांचे समग्र चरित्र, आचार्यांनी रचलेली स्तोत्रे, विशेषत: हरिहरेश्वराच्या स्तुतीच्या स्तोत्रात प्रत्येक श्लोकात विष्णू व शिव या अर्थी केलेली श्लोकाची रचना व मुकाम्बिकेच्या स्तोत्रात योगशास्त्रातील वर्णन वाचताना भान हरपते.

(-श्री.ज.गो.मराठे यांनी `शंकर दिग्विजय' ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे.)
संपर्क- द्वारा/गुणेश मराठे-३०४, $ रिद्धी सिद्धी अपार्ट; पद्मणनगर, आगाशी -४०१३०१
फोन-०२५०२५८८६९५

परीक्षा घेण्याची आिस्रायली रीत

आपल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल कधी फारसे चांगले अैकू येत नाही. आपली विद्यापीठे जगाच्या तुलनेत कुठल्या कुठे खाली सरपटलेली आहेत. शेदोनशे चांगल्या संस्थांच्या यादीत आपण कुठेही दिसत नाही, ही शेाचनीय स्थिती कशाने आली? खरी परीक्षा आपण घेतच नाही. सगळयांना पास करायचे हेच धोरण असल्याने सारेच पदवीधर, सारेच हुशार.....पण कामाचे किती? ज्यांच्याविषयी कालपर्यंत जरा बोललेे जात होते, त्या केंद्र सरकारच्या सी बी अेस आी परीक्षांचेही वाभाडे निघाले. शिक्षण संस्थेचे समारंभ, पदवीदान सोहोळे, घोषणा डामडौलात होतात, त्यंाचा अुबग येतो. पेपर फुटणे हा अेक नवा अध्याय लिहिला जात आहे. हा संसर्गजन्य रोग फैलावत आहे. त्याचबरोबर बोलघेवड्यांचे पीकही वाढत चालले आहे.
काही काळापूर्वी अेका नियतकालिकात आिस्रायल देशात परीक्षा कशा घेतात यावषयी अेक लेख माझ्या वाचनात आला. त्यात त्यांच्या पेपर सेटिंग ची पद्धत सविस्तर दिली होती. ती पद्धत आपल्याकडे आली तर पेपर फुटण्याचा प्रश्नच अुद्भवणार नाही. ती पद्धत अशी दिली होती -
समजा अेखाद्या विषयाचा पेपर काढायचा आहे, त्याच्या विहित पुस्तकात दहा अुपविषय (टॉपिक्स) आहेत. प्रत्येक टॉपिकवर दहा प्रश्न तयार करायचे आहेत. त्या दहा प्रश्नांचे कागद अेका पाकिटात ठेवायचे. -म्हणजे दहा अुपविषयांच्या प्रत्येकी दहा प्रश्नांची दहा पाकिटे होतील.
त्या विषयाची परीक्षा ठरलेल्या दिवशी सकाळी दहा वाजता सुरू करायची आहे. सगळया विद्यार्थ्यांना पावणेदहाला परीक्षेच्या दालनात यावेच लागते, त्यानंतर आत जाताच येत नाही. पावणेदहा ते दहा या पंधरा मिनिटांत पर्यवेक्षकाने त्या बंदिस्त दालनात विद्यार्थ्यांची झाडाझडती  घ्यायची. ठीक दहा वाजता आकाशवाणीच्या अेका केंद्रावरून त्या विषयाची प्रश्नपत्रिका सुस्पष्ट आवाजात अैकविली जाते. त्या विषयाच्या विभागप्रमुखाने ती वाचून दाखवायची (डिक्टेशन) आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी ती अुतरवून घ्यायची. हे प्रश्न सांगण्याचे काम तो विभागप्रमुखच करेल, ते अन्य कोणावरही सोपविणार नाही.
त्या प्रमुखाने स्वत: ती दहा पाकिटे घेअून, आकाशवाणीच्या बंदिस्त खोलीत ठीक दहा वाजायला पाच मिनिटे कमी असताना प्रवेश करायचा.  खोलीचे दार लावून घेअून नंतर आयत्या वेळी प्रत्येक पाकिटांतील प्रश्नाचा कोणताही कागद काढायचा, तो वाचायचा, आणि बाजूला ठेवायचा. मग दुसऱ्या पाकिटातील कोणताही अकल्पित प्रश्न अुचलायचा, आणि तो वाचून सांगायचा. साडेदहापर्यंत दहा प्रश्नांचे वाचन संपते. त्याने अेकअेक प्रश्न वाचून होताच तोे प्रश्न फॅक्स मशीनवर चढवायचा, प्रश्न वाचून होताच प्रत्येक परीक्षाकेंद्रावर  त्याची फॅक्स प्रत मिळते. तिथे आणखी हव्या तितक्या प्रती काढून मुलांना देता येतात. पेपर सोडविण्यासाठी साडेदहा ते दीड असा तीन तासांचा वेळ असेल. प्रश्नपत्रिका वाचून सांगणारा तो विभागप्रमुख त्याच्या कोंडलेल्या खोलीतून अकराशिवाय बाहेर येत नाही.
या पद्धतीचा अवलंब करूनही जर पेपर फुटला तर अर्थातच विभागप्रमुख अेकटा निखालसपणेे गुन्हेगार ठरतो. तो देश आिस्रायल आहे, त्यामुळे असल्या गुन्ह्याची चौकशी कधी होआील, शिक्षा काय होआील..... वगैरे शंकांची अुत्तरे वाचकांवरच सोडून देतो!!!

-म. वि. कोल्हटकर, जीवनछाया कॉलनी, सातारा
फोन-(०२१६२) २३२५०४

आठवांचे साठव

प्रारंभीचे `बाल'पण
आमच्या नियतकालिकाचा जीव तसा लहान, हे तर आम्ही पहिल्यापासून म्हणत आलो आहोत. त्यामुळे त्याची कुठे अैश मिरवावी अशी बुध्दीच होत नसे. बरेचजण आपल्या वाहनावर `प्रेस' असं लिहून फिरतात, कुणी आपल्या लेटरहेडवर किंवा भेटकार्डावर तसं म्हणवून घेतात. आम्हाला त्यांचा हेवाच वाटायचा. आपला अुल्लेख कुणी चारचौघात `संपादक', `पत्रकार' वगैरे शब्दांत केला की अुगीच लाजायला व्हायचं. आमच्या हातून तसं धाडस शक्य नव्हतं. आपण जे लिहितो, छापतो, वाटतो त्याची संभावना फार मोठ्या सन्मानानं केली जात असेल यावर कधी विश्वासच बसायचा नाही. कुण्या थोर माणसानं कधी चांगलं लिहिलं की ते पत्र काळजात जायचं; तरीही ते त्यानी मनापासून लिहिलंय की आपल्याला बालक समजून प्रोत्साहन देण्यासाठी खोटंखोटं लिहिलंय असा संशय येत राहायचा. त्याअुलट कुणी चांगलं म्हणायच्या बुध्दीनंही चांगलं म्हटलं तरी ते कसंतरीच वाटायचं.

प्रारंभकाळात अेकदा कधीतरी आिथल्या अेका पेपरवाल्याकडं काही अंक विकायला दिले. अंक विकला जाआील अशी खात्री नव्हती, पण आिच्छा तर होतीच. तो पेपरवाला वयस्कर, कष्टाळू होता. आितर दैनिके वगैरेंबरोबर आमचा अंक काखोटीत घेअून तो रेल्वे स्टेशनवर पॅसेंजर आल्यावर आरोळी देअू लागला. `केसरी-पुढारी-तरुणभारत-आपले ज%ग...' अुदय वेलणकर हा माझा भाचा आमच्या या घालमेलीत होताच; तो त्याच गाडीत बसल्याचे या विक्रेत्याने पाहिले होते. तिथे खिडकीशी येअून त्या म्हातारबाबानं अुत्साहात येअून ओरडून या संपादकाला सांगितलं, `-साहेब, आपला अेक अंक खपला बरंका...!' सभोवतीच्या ओळखीच्या लोकांसमोर ही बातमी अैकल्यावर, धरणी पोटात घेआील तर बरं असं अुदयला वाटलं.

आम्हा मित्रमंडळींचा अेक भोजनभाअू गट होता. दरमहा अेकेकाच्या घरी जमायचं, अनेक विषयावर बडबडायचं, कुणाची तरी खेचायची, आणि हशाखिदळीत त्या घरच्यांसह जेवण करायचं असा श्रीमंत कार्यक्रम असे. त्यातल्या कुणाच्या तरी संबंधात अेक कार्यक्रम झाला. त्याची बातमी कुठं छापून येण्याचं कारण नव्हतं, तशी आलीही नाही. पण पुढच्या भोजनप्रसंगी  या साऱ्या टारगट मित्रांनी आम्हाला घेरलं. `अरे, अेवढा भव्य कार्यक्रम झाला, त्याची बातमी कुठं नाही? आपले जग ला`सुध्दा' नाही?  आपले जगचा हा अुल्लेख खास बापुडवाणा होता. तो सोेसण्यात आम्हाला काही कमीपणा नव्हता, कारण आम्ही तसे `हे'च होतो.

कधी नाही ते आम्हाला अेकदा वाचक पडताळणीची लहर आली. काही वर्गणी वगैरे ठेवली होती, ती वेळेत देणारे तरी किती असणार? पण आमची हौस दांडगी. पैशाची फिकीर असली तरी अंक काढायचा, वाटायचा, असं चालू होतं. अेकदा त्या साऱ्यांना पत्र लिहूया असं ठरलं. मजकूर तयार केला. `आपण सन्मान्य वाचक आहात, आपली वर्गणी कधीतरी आली आहे पण आितकी बाकी राहिली. अमूक वेळेत वर्गणी आली नाही तर'......? `अंक बंद करण्यात येआील' ही शब्दयोजना नेहमीच्या प्रथेची. पण ती केल्यावर कोण प्रतिसाद देणार का याची काही शाश्वतीच नाही. मग असं लिहू, `अमूक वेळेत पैसे आले नाहीत तर.... अंक तुमच्याकडं येत राहील.' ही धमकी! अेकमेकास ती सांगून आम्ही पोट दुखेपर्यंत हसलो. त्या आठवणीनं आजही हसतो.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन