Skip to main content

1 April 2018

आपले मानांकन सुधारावे
व्यक्ती, संस्था किंवा गाव-प्रांत-देश हे घटक कसे आहेत हे आपण मनोमनी ठरविलेलं असतं. आपल्या भोवतालचा कोणी माणूस किंवा बाआी कशी आहे, हे सांगण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष काही अनुभव आलेला असतो असे नाही. `त्या माणसाबद्दल फारसं चांगलं अैकू येत नाही, जरा जपून बरं!' असे सल्ले दिले घेतले जातात. लग्नाच्या बाजारातही स्थळाविषयी माहिती काढायला परक्या ठिकाणी `आतून' चौकशी करून त्या कुटुंबाविषयीचे सार्वत्रिक मत अजमावले जाते. आपला भला-बुरा काही थेट संबंध येत नसेल तरी लहान मोठ्या लोकांबद्दलही सार्वजनिक मत बनत असतेच. लालूप्रसाद, मोहनजी भागवत, आडवाणी, शरद पवार, नारायण राणे, ममताबाआी, अशी नुसती नावे घेतली तरी आपल्याला त्यांच्याबद्दल वेगळे काही फार सांगावे लागत नाही. तसेच अेखाद्या खेळाडूचे, गायकवादकाचे, अुद्योगपतीचेही असते. टाटा आणि रिलायन्स ही केवढी मोठी कर्तबगार नावे, पण त्यांच्यातला फरक आपल्यासारख्या चिरमुऱ्यांनाही आत कुठेतरी जाणवतो. हे मानांकन कसे ठरतेे? ते ठरते हे खरे!

पण जगाच्या व्यवहारी बाजारात नुसते असे सामाजिक प्रतिमेचे काही चालत नाही. आपल्याकडे आय अेस आय प्रमाणित वस्तू बाजारात असतात. तो दर्जा प्राप्त करण्याची अेक प्रणाली असते, काही निकष असतात. ती मानके पार केली तर तसे प्रमाणपत्र त्या वस्तूला मिळते, आणि मगच ती वस्तू चांगली आहे असे मानले जाते. कोणी चांगला शिक्षक आहे, तो फार चांगले शिकवतो अेवढे मुलांनीही म्हणून भागत नाही, त्याने बी अेड् ची पदवी घेतली तरच त्याची नेमणूक करता येते, -नाहीतर नाही! आपण हिशेब नीट ठेवतो पण ते ऑडीटरने तपासून `ठीक' म्हणावे लागते, तरच ते बाहेरचे जग मानते. विद्यार्थी हुशार असतो, पण त्याला सर्वाधिक गुण मिळाले तरच तो खरा हुशार, - अन्यथा `ज्यादाच हुशार'! त्याचेही जग आहे, तोही जगू शकतो. पण त्याला मानांकन नाही. आजच्या जगात असे प्रत्येक बाबतीत मानांकन असावे लागते. त्यासाठी आकडे द्यावे लागतात. सर्वेक्षण करावे लागते, करून घ्यावे लागते.
तसे केले नाही तर कसलेही नियोजन करताच येत नाही. नियोजन करायचेच असेल तर आधी आपण आहोत कुठे, ते समजून घ्यावे लागते. त्यासाठी ही सर्वेक्षणेे अुपयोगी पडतात. शिवाय काही संस्था संघटना व राष्ट्न्े यांचे परस्पर व्यवहार त्या सर्वेक्षणांच्या निष्कर्षांवर अवलंबून असतात. म्हणजे आपल्याला कर्ज देताना बँक जशी आपले हिशेब आणि त्यास ऑडीटरची मान्यता मागते, तसेच जगाच्या पातळीवरही मोठ्या करार-मदारावेळी घडत असते. म्हणून मानांकन करावेच लागते; शिवाय ते करणारी संस्था कोणती हेही महत्वाचे असते.  `आपलं सारं चांगलंच आहे, आम्ही शहाणे आहोतच, हे आता आणि काय नवे आम्हाला सांगणार? -आमचं आम्हाला ठाअूकच आहे की....!' हा सामान्य भारतीय स्वभाव आहे, काही अति(वि)शिष्ट शहरांत तर तेा अंमळ जास्तच आढळतो. पण बाहेरच्या जगालाही तो स्वभाव माहीत असल्यामुळे त्या म्हणण्यावर जग विश्वास ठेवत नाही, त्यांनाही मानांकन करून घ्यावे लागते.
या मानांकन संस्था संपूर्णत: निरपेक्ष समतोल शुद्धबुद्धीने काम करतात हे गृहीत असते. काही अेका किमान विश्वासावर त्यांचे काम चालते. सामन्यांतील पंच जसा नि:पक्षपाती  मानला जातो तसेच या संस्थांचे आहे. पिचत काही वेळी पंचही पक्षपाती असू शकतात, तसा संशय येतो. काही वेळी तर त्यांचा निर्णय स्पष्टपणे चुकीचाही असतो; पण पंचाचा निर्णय म्हणून त्यावेळेपुरता तरी तो मान्य करावा लागतो. तथापि त्यामुळे पंचाबद्दलचे नकारात्मक मत तयार होते आणि असा पंच नाकारलाही जातो. पण हे अपवाद सोडले तर जगाच्या पाठीवर ज्या मानांकन संस्था काम करतात त्यांना आपले स्थान, महत्व, प्रयत्न हे पटवून द्यावे लागते. त्यावरती आपला दर्जा ठरतो आणि जागतिक व्यवहार सोपे होतात. अेखादे धोरण चुकू शकते, निर्णय चुकू शकतोे, परिस्थिती बदलल्यामुळे अपेक्षित यश मिळत नाही, पण आपले स्थान, महत्व, आणि प्रयत्न यांबद्दलचा विश्वास टिकावाच लागतो.
चीन, भारत आणि अन्य देश कोणत्या गतीने पुढे जात आहेत याचे आकडे आपल्या कानावर सतत येत असतात. अुत्पादन, संपत्ती, आरोग्य, पर्यावरण, स्वास्थ्य, पाणी, शेती, हिंसाचार, नातेसंबंध.... अशा अनेक बाबतीत जगाचे मानांकन करणाऱ्या संस्था असतात.  सकल राष्ट्नीय अुत्पन्न आज १०० होतं, ते येत्या वर्षी १०७.६ झालं, म्हणजे विकासदर ७.६% झाला. जर हा दर ०.१ ने बदलला की विकासदर तितका खाली वर होतो. लगेच तेवढ्यावर जगातले अनेक निर्णय बदलू शकतात, म्हणून तो ०.१ अंशही फार महत्वाचा ठरतो. हे म्हणजे अगदी आजच्या शालान्त परीक्षेसारखं झालं. अेक दोन मार्क कमी झाले की आिच्छित कोर्सला प्रवेश मिळत नाही, आणि साऱ्या आयुष्याची दिशा बदलून जाते. डॉक्टर होण्याचं ठरविलं तरी (बिचारा)पत्रकार व्हावं लागतं!
२०१० साली अेस अँड पी या पतमानांकन संस्थेनं चीनचं मानांकन अे+ वरून अेअे असं वाढवून दिलं. वास्तविक तेव्हा चीनची आर्थिक अुत्पादनात घसरण होती. शिवाय कर्जाचं  प्रमाण सकल अुत्पन्नाच्या १४० टक्क्यांवरून २४० टक्के झालं होतं. त्या मानानं भारतानं(आपल्या स्वभावाप्रमाणं) कर्जफेडीच्या बाबत प्रामाणिकपणा दाखविलेला होता. भारताचं सरकारी कर्ज सकल राष्ट्नीय अुत्पन्नाच्या ७० टक्के आहे; म्हणजे १०० रुपये अुत्पन्न असेल तर ७०रु. कर्ज आहे.  स्पेनचं ९९ रु., अमेरिकेचं १०७, जपानचं २३९ आहे. तरीही आपल्याकडं कर्जबाजारीपणाबद्दल फार ओरड असते. आपली तरुण पोरं कसलं तरी दुकान टाकतात, त्यास बँकेचं कर्ज म्हटलं की सारं खानदान कासावीस होतं. बँकाही  त्याच्यावर विश्वास  न  दाखवता सतरा पुरावे आणि दाखले मागतात; आणि १लाख कर्ज हवं असेल तर चाळीस हजार रुपये देतात. तीही आपल्याला बँकेची मोठीच मदत वाटते. त्याअुलट पलीकडच्या पक्क्या बनेल माणसाच्या पोराला बँक त्याच्या दारात जाअून पैसे देते; तो माणूस भक्कम कर्ज काढून ते लांबवितो आणि तरीही  कारनं फिरतो; त्याला श्रेष्ठ अुद्योजक म्हणून पुरस्कारही मिळतो. जगातही तसेच काहीतरी घडत असावे. हा दुजाभाव आपल्या बाबतीत नसावा म्हणून आपल्या चांगल्या प्रतिमेचाही अेक दबाव असला पाहिजे. सज्जनतेलाही  सामर्थ्य असते, ते जगाला जाणवावे लागते.
भारतानं कधी कर्जफेडीची हयगय केली नाही, तरीही या संस्था भारताचं मानांकन बदलण्यास सहसा तयार नव्हत्या. नंतर मूडीज् या मानांकन संस्थेनंही आपल्याला फारसं मोजलं नाही. चालू वर्षाच्या जानेवारीत फिच् या संस्थेचा अहवाल आला, त्यातही भारतात काही सुधारणा झाल्याचं मान्य केलेलं नव्हतं. अशा स्थितीत आपल्या राजकीय पक्षांनी कितीही अच्छे दिन म्हटलं तरी जग ते मान्य करत नाही. त्याचबरोबर विरोधी पक्षांनी  जरी `हे सरकार आल्यापासून सारं अराजक आलं' असा ओरडा केला तरी तेही जग मानत नाही. मात्र त्यासाठी  ठोस मार्ग असतो; तो म्हणजे आपलं अुत्पादन वाढलंच पाहिजेे आणि बाकी साऱ्या बाबतीतही प्रगती झाली पाहिजे; आणि शिवाय ती आकडेवारीतून दाखविली गेली पाहिजे.  अेवढ्यानंही भागत नाही, तर आपल्या चांगलेपणाचा दबाव वाढवत जावं लागतं. शक्तीप्रदर्शनही वेळोवेळी करावं लागतं. मोठं व्हावं लागतं, आणि आम्ही किती मोठे हेही सांगत फिरावं लागतं.
ते केलं नाही तर मग या मानांकन संस्था आपण होअून, आपल्याला कधीतरी दिलेल्या दर्जात बदल करत नाहीत. कोणीतरी शिकवण्या घेणारे मास्तर अुत्तमच असतात, त्यांच्या क्लासला गर्दी होते, मुले अुत्तम घडतात... पण आदर्श शिक्षक दुसरेच कोणीतरी ठरतात, त्यांना पगारवाढ मिळते, पेन्शन फायदे मिळतात. ते ज्यांना नकोच असेल त्यांनी मानांकनाची फिकीर करण्याचं कारण नाही. त्यांचे जुने विद्यार्थी त्यांना मानतात. पण जगाच्या व्यवहारी बाजारात देशाला तसं म्हणता येत नाही. म्हणून त्या मानांकन संस्थांनी आपल्या प्रगतीची दखल घेतलेली नाही हे लक्षात आल्यावर, भारतीय सरकारी अधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. आर्थिक अुत्पादनवाढ, महागाआीत घट, अुद्योग चालू करण्यासाठी सुविधा, सरकारी वर्तणूक, लोकांचं आरोग्य, सार्वजनिक स्वच्छतेची जाणीव वगैरे बाबींकडे आकडेवारीसह लक्ष वेधण्याचे प्रयत्न होअू लागले आहेत. अेक बाब या संदर्भात महत्वाची म्हणजे शेेअरबाजार तेजीत असला तरी ती आर्थिक प्रगती आहे असे होत नाही.
आपल्याला मिळणाऱ्या मानांकन गुणवत्तेवर परकीय गुंतवणूकदार लक्ष ठेवतात. आपल्याकडे वारंवार दंगे आंदोलने तोडफोड होते तेही सगळे जग पाहात असते. अतिरेक्यांच्या कारवाया किंवा निसर्गसंकट यांचा परिणाम फारच थोडा होतो. पण बाजारात आपण टिकायचे असेल तर आपला माल नुसता चांगला असून भागत नाही; -तो विकला गेला पाहिजे. त्यासाठी ही मानांकने महत्वाची. आपल्यासारख्या सामान्यजनांस ते समजून आले तर आपलीही काही भूमिका त्यात असते हे कळेल. अुदाहरणार्थ विदेशी लोकांना -म्हणजे अुगीच हिंडायला येणारे असोत किंवा अुद्योगधंद्यासाठी असोत; - त्यांना कोणत्या वातावरणाचा अनुभव येतो हेही या मानांकनसंस्था जगाला सांगत असतात, त्यावर आपण कसे आहोत हे जग ठरविते. म्हणजे आपणही आपल्या देशाचे गुणात्मक मानांकन वाढविण्यास कारणीभूत ठरू शकतो.
***

कालाच्या प्रवाहातील आनंदडोह
माणसाला भरपूर पैसा मिळू लागला तर आनंद मिळतो का? या प्रश्नाचे अुत्तर सगळेजण `नाही' असेच देतील. ते पटवून देण्यासाठी अनेक अुदाहरणे साऱ्यांना तोंडपाठ असणार. पण मग आनंद मिळविण्यासाठी माणसे सतत पैशाच्या मागे का धावतात हे कोडे कुणालाही सुटत नाही. कोणत्या देशातील किंवा प्रांतातील माणसे आनंदी असतात? लंकेत रावणराज्यात सारी घरेदारे सुवर्णाची होती, विटाही सोन्याच्या होत्या, तर तिथल्या राज्याला रावणराज्य कशासाठी म्हणायचे? माणसे तिथे आनंदी नव्हती का?  -मग आणखी किती संपत्ती दिली तर ती आनंदी झाली असती? -सगळयांना अुत्तर माहीत असूनही लोंबकळत राहिलेला हा चिरंतन प्रश्न!

जागतिक पातळीवरच्या अनेक संस्था त्यांच्या पध्दतीनुसार सर्वेक्षणे करून काही निष्कर्ष मांडत असतात. अर्थ, आरोग्य, शेती, पर्यावरण शिक्षण वगैरे अनेक बाबतीत असंख्य प्रकारची माहिती गोळा करण्याचे त्यांचे काम चालत असते. आणि ज्यांना काही सुधारण्यासाठी नियोजन करायचे असते त्यांच्यासाठी ते अुपयोगी पडते. त्यात सामाजिक विषयांचाही समावेश असतो. संयुक्त राष्ट्नंच्या ताज्या पाहणीनुसार जागतिक `आनंद अहवाल' जाहीर करण्यात आला असून त्यात भारताचा आनंद निर्देशांक १३३वा दिला आहे. १५६देशांच्या यादीत आधीचा आपला क्रमांक बराच घसरत चालला आहे.आणि मौज अशी की, आपले शेजारी `अविकसित' देश -पाकिस्तानही - आपल्यापेक्षा आनंदी आहेत. सामुदायिक सामाजिक आनंद मोजण्यासाठी लोकांचे अुत्पन्न, परस्पर सहकार्य, निरोगी जीवनमान, सामाजिक स्वातंत्र्य, भ्रष्टाचाराचे स्थान असे काही घटक विचारात घेतले जातात, जे माणसाच्या आनंदाशी संबंधित आहेत.

आपल्या देशातील लोकांचे अुत्पन्न वाढले आहे अशी साधारण समजूत आपण करून घेतली आहे. ते आपण सकल राष्ट्नीय अुत्पन्नाच्या आकड्यावर ठरविले. देशाचे अेकूण अुत्पन्न वाढले हे तर खरेच आहे; पण प्रत्येकाचे अुत्पन्न वाढले असे नाही. मुंबआीत पैसा शब्दश: वाहाताना दिसतो, काही गावांत तर त्याचा माजही दिसतो. पुष्कळशा गावांतून आज सामान्य पुढाऱ्यांच्या वाढदिवसाचे मोठमोठे महागडे फलक झळकतात,अुत्सव फटाके चालतात, ते पैसा दुथडी वाहात चालल्याचे दर्शवितात. अशा प्रवाहात, बेकरीतून वाढदिवसाचे केक दीडदोनशे रुपयांचे विकत घेण्याची प्र्रथा आहे. पण ती प्रथा भारताच्या साऱ्या प्रदेशांत आणि आर्थिक स्तरांत सांभाळली जाअू शकत नाही. कारण तिथले आर्थिक दुर्भिक्ष्य नव्याने धनवंत झालेल्या भावनाशील लोकांसही  सहन  न  होणारे आहे. आपल्या देशात पैसा वाढला आहे, पण तो फार कमी लोकांकडे आहे, सामान्यत: जनता गरीब आहे. देशातील २३ टक्के अुत्पादन केवळ अेक टक्का लोकच वापरतात, आणि पुढचे ५५ टक्के अुत्पन्न दहा टक्क्यांच्या ताब्यात आहे. म्हणजे नव्वद टक्के लोक बाकी राहणाऱ्या २२टक्के अुत्पन्नांत भागवितात. आता त्या थरांचीही अुतरंड लक्षात घेतली  तर शेवटच्या पाच दहा टक्क्यांपर्यंत काय पोचत असेल याची कल्पना करता येआील.

भारतात अेके काळी सोन्याचा धूर निघत होता असे म्हणण्याची प्रथा असली तरी गरीबीही होतीच. परंतु माणसे अेकेका समाजगटात समाधानाने राहात होती, असे म्हणता येते. कदाचित त्यांचे अज्ञान असेल, आणि अज्ञानात आनंद असतो असे म्हणतात. आपल्या शेजारच्या पाकिस्तानात माणसे आपल्याहून आनंदी आहेत याचा दुसरा अर्थ काय? भारतापुरता विचार केला तरी सगळया प्रांतांत सिक्कीमचा भावनंाक (आिमोशनल कोशंट) आणि आनंदांक सर्वात पुढे आहे. म्हणजे सिक्कीमचे लोक भारतात सर्वाधिक आनंदी आहेत. जगात अमेरिका श्रीमंत म्हणतात, पण तिथे आनंदाचे प्रमाण जास्त नाही. तिथली माणसे अेकाकी होताहेत, शाळेत घुसून मुलांवर गोेळया झाडत आहेत, आत्महत्या करत आहेत हेही अैकू येते. तेथील सामाजमान्य अुत्तान वागणे, स्वैर सुखलोलुपता ही लक्षणे आनंदाची मानली  जात नाहीत असे दिसते.

आपल्याकडे पुढची पिढी फारच पुढे गेल्याचे आपण म्हणतो. साठीच्या अुंबरठ्यावरील नववृध्द लोक नव्या संगणकयुगाशी परिचित असले तरीही ते नव्या अुगवत्या पिढीच्या पार मागे पडतात. पैसा आणि आरोग्य या बाबतींत ते त्यांच्या आधीच्या पिढीहून खूपच सक्षम आणि समर्थ आहेत. पण त्यांचा आनंद कुठेतरी सांडून ओघळून गेला असल्याचे जाणवते. त्याआधीची पिढी फारशी पैसेवाली नव्हती. पोस्टातून किंवा शाळेतून निवृत्त झालेल्या आपल्या वाडवडिलांना किती पेन्शन मिळत होती हे आज सांगताना कसनुसे वाटेल. ज्यांना ती पेन्शनही नव्हती त्यांची दशा तर काय वर्णावी? पण त्यांचे पूजापाठ, सामाजिक कर्तव्य, कुटुंबाची काळजी आणि जबाबदारी यांत कुठे कमी नव्हती. आज तर त्याची तशी गरजही राहिलेली नाही. पण निवृत्तीच्या वयातील आजचा प्रौढ, सहली आणि सेकंड हनीमून यांत आनंद शोधू पाहतो आहे, तो त्याला सापडलेला नाही असे जागतिक संस्थांच्या अहवालावरून दिसते. नवी पिढी आधीच्या पिढीला वाकून नमस्कार करणारी नाही, आणि जुनी पिढी संध्याकाळी अेकत्र बसून पाढेपरवचा शिकवणारी किंवा सर्वंासह भोजनगप्पा करणारी नाही. आजची तरुणाआी हा तर साऱ्यांच्या फुका चिंतेचा विषय आहे, आनंदाचा नव्हे. आजच्या बालकांचे पालक प्रौढ कर्त्या वयाचे आहेत; ते समाजाप्रति काय करतात हे विचारण्याची सोय नाही. पूर्वीही सगळेच काही टिळक आगरकर कर्वे नव्हते; आजच्या पाअूणशेच्या घरांतील पिढी त्यांच्या तरुण वयात काय करत होती हेही विचारण्याची सोय नाही. पण कालचक्रानुसार जुनी पिढी आता वाल्याची वाल्मीकी झाली असे मानले, तरी पुढच्या काळातल्या स्मार्ट पिढीने त्यांना आचार विचार नीती शिकवण या साऱ्या बाबतीत दूर फेकून दिले आहे. कुण्या अेके काळी सिलोन रेडिओ अैकताना आधीच्या बुजुर्ग मंडळींस दूर ठेवणारी पिढी, आता कोणत्या तोंडाने नव्या पिढीच्या कानात वायरी अडकविलेल्या पाहून नावे ठेवणार? मित्रांच्या समुदायात  न  केलेल्या धाडसाच्या आठवणींत  रममाण होणारे आजचे प्रैाढ पालक त्यांच्या आजच्या भूमिकेबद्दल काय सांगतील?

दोन पिढ्यांतील अंतर हा कायमचा प्रश्नच असतो. माणसाच्या अेका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कार पाझरत जायला हवेत, त्यातून जे समाधान मिळते तोच माणसांच्या कौटुंबिक आनंदाचा ठेवा असतो. त्यासाठी तीन पिढ्या अेकत्र नांदाव्या लागतात. आधीच्या किंवा नंतरच्या दोन पिढ्यांचे संवाद तिसऱ्या पिढीने अ्रैकले तर कुणालाही आपल्या बदललेल्या कालक्रमाचा त्रास वाटत नाही, स्वास्थ्य मिळते, तेच खरा आनंद देते. तो आनंद लाभण्याचे बाकीचे कारण म्हणजे निसर्गाचे सान्निध्य, अडाणीपणा, अल्पायुष्य....वगैरे, यांतील  असू शकते. परंतु आजच्या सुशिक्षित मानलेल्या नागर मानवी समाजाच्या बाबत त्यांचा विचार करता येण्यासारखा नाही. तिथे जगाशी अेकरूप होेअू पाहणाऱ्या आभासी माध्यमांचा धोेका लक्षात घेण्याची गरज आहे. दूरच्या देशातील कोण्या अपरिचित मित्रमैत्रिणींशी संवाद करणारी तरुण पिढी त्या आभासी आनंदात आहे, परंतु घरातल्या आजीला अंथरूण घालून दिले तर निर्माण होणार आनंद ती पिढी कसा देअू शकेल?

आजच्या साऱ्या नागरी समाजात वाढते अेकटेपण आहे. आरोग्य आणि पैसा अुपलब्ध असला तरी  या दुग्धशर्करेच्या आनंदावर विरजण घालणारी विस्कटलेली कुटुंबे ही  मोठी सामाजिक समस्या ठरते आहे. अपत्यांची संख्या कमी झाली, तीही स्थलांतरित होत आहे. पुढच्या पिढीची लग्ने वेगळयाच कटू परिस्थितीशी होत आहेत. त्या विजोड स्थितीशी जुळवून घेणे प्रत्येक व्यक्तीलाच कठीण होत आहे. या साऱ्याचा समग्र परिणाम माणसाच्या भावनिक गरजा  न  भागण्यात होत असून आनंदाअैवजी त्रागा आणि नैराश्य पाझरत चालले आहे. ज्ञान माहिती डाटा गेम जंकफूड डिं्न्क्स अशा लाटेवर स्वार झालेली पिढी गर्दीत असली तरीही अेकटी पडते आहे. त्या अेकटेपणातून मानसिक आंदोलने फैलावतात, ती सारा आनंद हिरावून घेतात. म्हणजे ज्या साधनांनी आनंद मिळेल असे वाटत होते, तीच आता सार्वत्रिक निराशेचे कारण ठरू लागली आहेत. ती साधने जिथे कमी आहेत, किंवा काही मर्यादेने वापरात असतील ते प्रदेश तुलनेने आनंदी आहेत असे दिसते आहे. `विकसित' समाजातील बालक बावचळलेले आहेत, तरुण धुसफुसत आहेत, प्रौढ भविष्याला भ्यालेले आहेत, आणि वृध्द निराश आहेत.... अेकटेपण तर साऱ्यांनाच आहे. मग आनंदाचा क्रमांक कुठे शेाधायचा?

अशा परिस्थितीतही काही आनंदाचे निधान संचरत असते, त्यांचा शोध घेअून त्याचा विस्तार कसा होआील हे पाहायला हवे. ते प्रयत्नही चालू असलेले पिचत कुठे पाहायला अैकायला मिळतात. निराशेच्या अेकारलेपणात अशा सोबतीचा शोध घेण्यासाठी कण्हत कुथत का असेना अुभारी धरण्याचा प्रयत्न करणे हाही आनंद निर्माण करण्याचा अेक ठोस प्रयत्न असू शकतो. तंत्रज्ञानाची गती, आणि त्यायोगे येणारी मानसिकता आपण रोखू शकत नाही, पण तशा आनंदाचा शोध घेअून त्यात सहभागी होणे अेवढे तरी साधता येआील. काळाच्या अुदरात काय असेल हे सांगता येत नाही, पण आपल्या आनंदाचा काळ ठरणारे अेकटेपणच साथीसोबतीला घेअून काळ कंठण्याची वेळ येअू नये यासाठी जपायला हवे. तशी अुभारी धरण्यानेही  आपण आनंदाच्या निर्मितीत वरच्या क्रमांकावर येअू शकू.

त्यानेच कार्यकर्तेही द्यावेत
आपल्या संपादकीयात म्हटले आहे की, `देवानं बोलावलं तर जाण्यात आनंद असावा', हे जरूर अंगिकारावं, कठीण असलं तरी ... मात्र त्याच्यापुढं म्हटलं आहे की,  `आपल्या माघारी आिथलं सगळं सांभाळणं ही त्याची जबाबदारी आहे -'; ह्याबाबत मतभेद नोंदवतोे. सगळयांनीच त्याच्यावर किती भार टाकायचा? आपल्या माघारी हे सांभाळण्यासाठी त्याने कार्यकर्तेही निर्माण करायला हवेत अशी प्रार्थना करावीशी वाटते.
  -रविप्रकाश कुलकर्णी,  `स्वप्नसाकार', डोंबिवली (ठाणे)

मदतीचे आवाहन
श्री.हरीश देसाई(इंजिनिअर) हाजी अली मुंबई येथे असतात. त्यांच्या संपर्कात दोन मतीमंद मुली असलेली एक माता आली. दोन्ही मुली अशा असूनही बाई त्रासलेल्या नव्हत्या. त्या मुली ज्या शाळेत जात होत्या त्या शाळेत हरीश गेले. तेथील विद्यार्थ्यांकडून बऱ्याच वस्तू तयार करून घेतल्या जात होत्या, आपणही या मुलांसाठी काहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. त्यांनी इशपशषळीं डिंर्रीीश ही वेबसाईट बनवली. ही संस्था `बेनिफिट क्लब' या नावाच्या अखिल भारतीय संस्थेची सभासद आहे. त्या संस्थेचे कार्य मतिमंद, अपंग मुलांना आर्थिक साहाय्य मिळवून देणे. या मुलांनी बनविलेल्या वस्तूंची विक्री करून त्यांना अर्थसहाय्य मिळवून देण्याचे श्री.हरीश यांनी ठरविले. तसे प्रयत्न करू लागले. या कामासाठी त्यांना काही स्वयंसेवक मिळाले. त्यांचेच कार्य मी कागवाड येथे करीत आहे. मिरज, सांगली व कोल्हापूर येथे या वस्तू घरगुती स्वरूपात विक्रीसाठी ठेवल्या आहेत.
नम्र विनंती की, या वस्तू विकत घेऊन या मुलांना स्वावलंबी बनण्यास मदत करावी.
  अधिक माहितीसाठी - हरीश देसाई, फोन नं.०९८१९७८००३१  
   -जयश्री पटवर्धन, कागवाड(ता.अथणी)  फोन-७४०६९८३२७३

हा डोस हवा होता
`पिढीचे पालकत्व' हा लेख वाचला. आपण नोंदविलेली निरीक्षणे अनुभववृत्तीची आहेत. आपल्या कुटुंबातील सर्व घटनांवर लक्ष ठेवणारा `नातेवाईक' लुप्त झाला आहे. परिवाराचा आधारच मुळी त्रिकोणी चाौकोणी आहे. ही लक्षणे पुढील पिढी घडविण्यात अपुरी व भविष्यकाळाचा वेध घेताना निराशा पदरी पाडणारी आहेत.
प्रथम स्वत: बदला, सुधारा तरच कुटुंब सुधारेल, नुसते उपदेश करू नका. आपल्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत. समाजात माणूस एकटा राहील याकरिता चाललेले प्रयत्न ताबडतोब थांबवा. सध्याच्या संगणकाच्या व माहिती तंत्रज्ञानाच्या काळात असा डोस हवाच होता. `आई-बाप होणे सोपे पण पालक होणे अवघड' हा तर निष्कर्ष मनाला भिडणारा आहे. डॉ.कलाम यांची कुलगुरू निवडीची अट तर चांगले पालकत्व अधोरेखित करते.
  -नारायण खरे, पुणे ५१   फोन-९९७५३४४३०१

शेतीला पर्यटनाची जोड
  शेतीचा शाश्वत अुत्पन्नासाठी विविध अंगांनी फायदा होत असतो. शेतीपूरक धंदे तर कित्येक प्रकारे करता येतात. आजपर्यंत अशा अुद्योगांत गोपालन, दूध व्यवसाय, कोंबडीपालन, वैरण अुत्पादन, खतनिर्मिती, गुऱ्हाळ वगैरे अुद्योगांचा समावेश असायचा. आता त्यात अेका मोठ्या फायदेशीर अुद्योगाची भर पडली आहे, ती म्हणजे शेती पर्यटन अुद्योगाची.
जे लोक फिरायला पाहुणचाराला परदेशांत जाअून येतात, ते लोक तेथील शहरांच्या अैशीचे वर्णन करतात, त्याचप्रमाणे जे दीर्घकाळ तिथं राहून येतात ते लोक तिथल्या शेतीचंही कौतुक करतात. तिथे अेखाद्या शेतीवर फेरफटका मारताना मालकाचं अगत्य दिसतं. आपल्याला ते काही पदार्थ खायला देतात, आपल्या मुला नातवंडांना खेळायला देतात, तिथल्या गायीची धार काढायला देतात, मज्जा मज्जा करायला देतात. पण नंतर कळतं की ते काही फुकट नसतं, त्यासाठी मोजून पैसे घेतात. आपल्याकडं शेतावर हुरडा खायला, गुऱ्हाळाला, शेंगा कणसं खायला जाण्याची रीत होती; पण त्यासाठी कोणी पैसे देत नव्हता. `आपल्याच रानात पिकलेलं आहे, त्याचे कसले पैसे...' अशी शेतकऱ्यांची भावना होती. देणाऱ्यांना अगत्य होतं, -घेणाऱ्यांना कृतज्ञता होती. पण ते दिवस मागं पडले.
आता प्रत्येकाचं मोल आहे. मौजमजा करण्यासाठीही पैसे मोजण्याची गरज आहे. हे ओळखून काही ठिकाणी शेतीला जेाडधंदा म्हणून पर्यटनाचा अुद्योग सुरू झालेला आहे. त्यातून चांगले पैसे कमावता येतात. शहरी जीवनात हल्ली शेतच नव्हे तर मातीही दिसेनाशी झाली आहे. अशा लोकांना गावाकडं, शेतामळयाकडं जाण्याची फिरण्याची आवड आहे. त्यासाठी पैसे खर्च करण्याची त्यांची तयारी आहे. गावकऱ्यांनी विशेषत: शनीवार-रविवार या जोडसुटीचा फायदा करून घेअून आपल्या साऱ्या कुटुंबाला चांगला रोजगार मिळवून देता येईल. शेतावर गावरान जेवणाचा बेत, कुडाच्या घरात राहण्याची सोय, गावाकडचे खेळ, जवळच्या डोंगरदऱ्यात किंवा अेखाद्या देवस्थानात नेअून भटकविण्याची मौज, निसर्गाचा मनमुराद आस्वाद अेवढं अुपलब्ध करून देअून चांगली जाहिरातबाजी केली तर या व्यवसायाला अुत्तम दिवस आहेत.
सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या धकाधकीच्या त्रासाने वैतागलेल्या माणसांना आणि त्यांच्या पोराबाळांना या साऱ्यांचं आकर्षण आहे. त्यांतून आिथल्या लोककला, जुन्या परंपरा, कलाकार यांनाही रोजगार मिळण्यासारखा आहे. तारांकित हॉटेल्सकरिता पैसा फार मोजावा लागतो, आणि त्यांचा राबता आता सामान्य पैसेवाल्या माणसांना नकोसा वाटू लागला आहे. त्याअैवजी शांत रम्य निवांतपणाची मूळची ओढ आता खूप वाढली आहे. त्यांचा पाहुणचार करून ग्रामीण जनतेला हा व्यवसाय प्रतिष्ठेने करता येण्याजोगा आहे. त्यात चांगले पैसे आहेत. अर्थात त्यासाठी व्यवसायाची काही पथ्येही आवश्यकच आहेत. संपूर्णत: विश्वास हे या व्यवसायाचे फार मोठे भांडवल आहे. येणाऱ्या पाहुण्या पर्यटकांना आपलेपणा, सुरक्षा, अगत्य आणि शांतता मिळेल याची परिपूर्ण खात्री देता आली तर याच्याआितका चांगला पूरक व्यवसाय नाहीच म्हटले तरी चालेल.
या व्यवसायासाठी प्रामुख्याने गरज असते ती चांगल्या, -म्हणजे पुरेशा पण साध्या निवासाची. ती कौलारू किंवा पाल्याची छपरे चालतात. अेकत्र पाच दहाजण राहू शकतील असे मांडवही चालतात. पण बंदिस्त स्नानगृहे, स्वच्छतागृहे आवश्यक असतात. जेवायला ताटे टेबले यांची गरज नसते. अुलट जितके साधे असेल तितके छान. मातीची भांडीही मौजेची म्हणून वापरण्यात येतात. स्वच्छता ही दुसरी गरज. चूल, शेकोटी, बैलगाडी, शेती अवजारे, यांची चलती असते; त्यास फारसा खर्च नसतो. शेळी, ससे, बदक इ. छोटे पशूपालन, औषधी वनस्पतींची बाग, रोपवाटिका, अेखादे देवालय, झुलता पूल, बेताचा धबधबा, पाटाचे पाणी, मातीची चित्रे हे सारे गावातल्या गावात सहज मिळणारे असते. शिवाय लेझीम, सोंगी भजन, ग्रामीण खेळ, फेरफुगड्या, पंचमीचे झोके, गारुडी, नंदीवाले, कळसूत्री, कडकलक्ष्मी अशा विविध प्रकारे पर्यटकांची मनोरंजने सांभाळता येतात. त्यांत पर्यटकांना मजा वाटते, नावीन्य वाटते. आणि आपल्या गावकऱ्यांनाही पैसे मिळतात.
थोडीशी माहिती लोकांना झाली वा करून दिली तर हा अुद्योग भरभराटीला येअू शकेल. अेरवी कोणत्याही अुद्योगाला रस्ता-रेल्वे यांचे दळणवळण सोयीचे असते; पण या अुद्योगासाठी तर जेवढे आडबाजूचे ठिकाण असेल तितके चांगले. शेती थोडी असली तरी हा व्यवसाय करता येतो. अेखाद्या अेकरभरात अुत्तम ग्रामीण पर्यटक निवास निर्माण होतो. बारामती कऱ्हाड अशा सुमारे पाचशे ठिकाणी हे प्रयोग यशस्वी झाल्याची अुदाहरणे आहेत. महाराष्ट्न् राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन विकास संस्था (मार्ट), बारामती कृषीपर्यटन विकास संस्था वगैरे यासाठी कार्यरत आहेत.

द्राक्ष निर्यातीवर विजयी आघाडी
काही काळापूर्वी शाळेत मुलांना भूगोल शिकवताना अेकेका गावाची प्रसिध्दी कशाबद्दल, असे विचारले जाआी. त्यात `द्राक्षे' म्हटले की हमखास `नाशि%क' असे अुत्तर शेंबडे पोरही देत असे. आपल्या देशात द्राक्षे पूर्वापार होती, पण आितर फळझाडांप्रमाणेच द्राक्षांचे कुठेतरी वेल असत, ते हौसेने कुणीतरी परसबागेत लावत. घरी किंवा फारतर शेजारीपाजारी त्याचा आस्वाद घ्यायला मिळायचा. तशी तर फुलेही केवळ बागबगीच्यांत असत. पण अलीकडच्या काळात फुलांची शेती होअू लागल्याचे आपण पाहतो. द्राक्षाची शेती म्हणून सुरू झाली ती नाशिकला. तिथल्या द्राक्षाला पूर्वी वेगळी चव होती असे आज कोेणी म्हणते, पण तसे काही नाही. -तर मुळात द्राक्षे आितरत्र फारशी होतच नव्हती; आणि त्या काळात रासायनिक खताऔषधांचा माराही नव्हता, त्यामुळे त्या फळांना नैसर्गिक चव होती, गोडी होती.
१९७०च्या दशकानंतर हळूहळू सांगली सोलापूर या जिल्ह्यांत द्राक्षे पिकू लागली. त्या जिल्ह्यातील हवामान कोरडे व हलकी जमीन द्राक्षाला मानवते. आिथले शेतकरीही प्रयोगशील आहेत. त्यांनी द्राक्षवेलींसाठी मांडवांच्या विविध पध्दती, लागणीसाठीची अंतरे बदलून पाहिली आणि त्या प्रयोगांतून `तासगावची द्राक्षे' असे समीकरण जगभरात रूढ केले. १९८० सालानंतर द्राक्षेे केवळ खाण्यापुरतीच राहिली नाहीत, तर द्राक्षापासून बेदाणे सुरू झाले. नारायणगाव, नाशिक भागात द्राक्षापासून वाआीन तयार होअू लागली. १९९० च्या काळात आपली द्राक्षे आखाती देशांत आणि बांगला देशात पाठविली जात, परंतु चांगला भाव मिळण्यासाठी आपला माल युरोपच्या बाजारात पाठविण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि त्यात यशही दिसू लागले.
युरोपात फळांना चांगला दर मिळतो हे खरेच आहे, पण तिथली मंडळी भलतीच चिकित्सक असतात. द्राक्षे केवळ पाहून ते विकत घेत नाहीत, तर प्रत्येक द्राक्ष प्रयोगशाळेत पारखून तपासून घेतात की काय असे म्हणण्याजोगी परिस्थिती आहे. द्राक्षफळांत रोग-बुरशी नाशके किती वापरली गेली आहेत हे तिथे पाहिले जाते. त्या फळांतून लोकांच्या पोटांत ती विषारी रसायने जातील म्हणून ते लोक असला माल त्यांच्या देशात येअूच देत नाहीत. यामुळे द्राक्षाच्या पिकासाठी रोग-बुरशीनाशके यांचा वापर बंद, -निदान तो कमी करायला हवा; आणि थोडा वापर केलाच तर द्राक्षे पिकल्यावर त्याचा अंश फळात किंचितही राहता कामा नये हे बागायतदारांच्या लक्षात येअू लागले. द्राक्षे परदेशी पाठविण्यासाठी `युरोगॅप' हे प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) घेणे आवश्यक झाले. त्या नियमांच्या बंधनामुळे `रेसिड्यू टेस्ट' करूनच आपली द्राक्षे युरोपीय देशांत जाअू लागली. त्यांचे नियम अतिशय कडक असतात. आपल्या मालात जराथोडा दोष आढळला तर लगेच माल नाकारला जातो. वास्तविक पाहिले तर त्यांचेच बरोबर आहे, ते लोक त्यांच्या देशातल्या लोकांच्या आरोग्याबद्दल आितकी काळजी घेतात, यात चूक तर नाही! आपल्यास आितक्या शुध्दतेची सवय नाही त्यामुळे ते साधे नियमच कडक वाटतात त्याला काय करणार?  पण युरोपीय धोरणांमुळे आपल्या बागायतदारांतील जागरूकता वाढली. आपल्या मालासाठी बाजारपेठ मिळावी आणि चांगला दरही मिळावा म्हणून का होआीना, पण बागायतदार मंडळी रासायनिक शेतीपासून सावध होअू लागली.
द्राक्षाचे पीक आधीच फार नाजूक; त्यातही हवामानाचा लहरीपणा असतो. त्याला तोंड देत द्राक्ष पिकवायचे. परंतु मण्यांच्या आकारमानात, कडकपणात, रंगात किंवा गोडीत थोडा जरी फरक पडला तरी निर्यातदार तो माल कंटेनरमध्ये भरूनसुध्दा घेत नाहीत. निर्यातीसाठी द्राक्षघड काढताना केवळ निवडक माल स्वीकारला जातो. बाकीचा माल शेतकऱ्याने कुठेही विकावा! म्हणजे वेचक मालाचा दर  समजा जाग्यावरच ८० रु.किलोला मिळाला तर, शिल्लक पडणारा माल कमी दराने म्हणजे तीस बत्तीस रुपयाला विकत घेणारे आपले `गाववाले' ग्राहक आहेत की! त्यांना चांगले-वाआीट याचे फार सोअेर-सुतक नाही. कमी दरात स्थानिक बाजारात माल विकला तरी, निर्यातीसाठी किती माल बनविला गेला यावर त्या बागायतदाराचे खरे यश अवलंबून असते.
सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातली द्राक्षे मोठ्या प्रमाणात निर्यातीची तयारी करीत असतात. पळशी, हिवरे ही घाटमाथ्यावरची गावे दुष्काळी भागातील, पाण्याची तीव्र टंचाआी असणारी आहेत. पण त्या गावांत सुमारे ६५० अेकर द्राक्षबागा आहेत. ते सारे बागायतदार निर्यातीच्या प्रयत्नांत असतात. त्यांपैकी अेक पळशीचे विजय जोशी. त्यांनी या वर्षी  यशस्वी अुत्पादन घेतले आहे.
गेल्या आठ वर्षांपासून श्री जोशी हे द्राक्षपीक घेत आले आहेत. पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांची विहीर आणि विंधणविहीर यांच्यातील पाणी जपून वापरावेच लागते. त्यांची संपूर्ण बाग ठिबक सिंचनावर आहे. शेजारच्या शेेतकऱ्यांकडून त्यांनी निर्यातीविषयी माहिती घेतली, आणि त्या योग्यतेचा माल काढण्याचे प्रयत्न सुरू केले. परंतु त्यांच्या बागेतून निघणाऱ्या मालापैकी जेमतेम ४०-५० टक्के माल निर्यातीसाठी घेतला जायचा; आणि मग बाकीचा माल अत्यंत कमी दराने आिथे विकावा लागायचा. नेचर केअर या कंपनीच्या अुत्पादनांची माहिती मिळाली. ही अुत्पादने `आिको सर्ट' या संस्थेचे सेंद्रिय प्रमाणीकरण असलेली होतीच, त्यामुळे त्यांत विषारी अंश नसल्याची खात्रीच झाली. मालाच्या अुच्च प्रतीची हमी झाल्यावर श्री जोशी यांनी  नेचर केअरची  अुत्पादने त्यांच्या सहापैकी अेका प्लॉटवर वापरण्याचा निर्णय केला. बाकीचे प्लॉट्स मात्र त्यांच्या आजवरच्या पध्दतीने चालू राहिले.
नेचर केअर चे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे खत त्यांनी जमिनीत वापरले, त्याचबरोबर अॅबझॉरबर वापरण्याने पाण्याची ५०टक्के बचत झाली. जमीनीचा पोत सुधारण्याने रोगराआीचे प्रमाण खूप घटले. नेचर केअरची पृथ्वी रिच व रीचार्ज ही अुत्पादने त्यानी वापरली, त्यामुळे पिकाला सेंद्रिय कर्ब (ऑरगॅनिक कार्बन) भरपूर अुपलब्ध झाला. पृथ्वी रिचमधील बॅक्टेरियामुळे जमिनीतील जीवाणूंची संख्या मोठ्याच प्रमाणात वाढत गेली. आवश्यक ती सूक्ष्मद्रव्ये  अुपलब्ध होत गेल्याने फळांचा आकार आणि प्रत सुधारत गेले. पानांवर हिरवेपणा आणि टवटवी राहिली. आता बाग संपली आहे, तरी वेलींची पाने तशीच हिरवी गार आहेत.
स्वाभाविकच नेचर केअरची अुत्पादने वापरलेल्या प्लॉटची तुलना बाकीच्या प्लॉटशी करणे ओघानेच आले. या प्लॉटमधील खर्च कमी, पाणी कमी लागले आहे, त्यामुळे पाण्याचा खर्चही कमी झाला. आितर प्लॉटमधून माल ६०-६५ टक्के निर्यातयोग्य निघाला, बाकीचा ३५-४० टक्के वगळला गेला. नेचरकेअर प्लॉटमधील ९० टक्के माल निर्यात झाला, १० टक्के राहिला.
अर्थात आता पुढील वर्षासाठी विजय जोशी यांनी  आपला अनुभव त्यांनी आपल्या गटातील आितर शेतकऱ्यांना सांगायला  सुरुवात केली आहे.

-राहुल तारळेकर    
फोन-९२७०६९४८१३
(सेंद्रिय विचार)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन