Skip to main content

14 May 18

पदवी आहे पण कौशल्यांचे काय?
रोजगारवाढरहित विकास (जॉबलेस ग्रोथ) ही सगळया जगापुढील समस्या आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा फैलाव आणि अंगीकार उत्पादन व्यवस्थेमध्ये झालेला असल्याने रोजगारवाढीसंदर्भातील चर्चा अधिक आहे. विकसित पश्चिमी देशांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण वाढत असल्याने तरुण मनुष्यबळाची त्यांना वानवा आहे. त्यामुळे यंत्रमानवाच्या संचाराबाबत त्या देशांना फिकीर नसली तरी, विकसनशील देशांमधील तरुण रोजगारेच्छूंच्या पोटात गोळा उभा राहतो. खर्चात बचत करत गुणात्मक दर्जा अव्वल राखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे उपयोजन करण्याची लाट कॉर्पोरेट विश्वामध्ये असल्यामुळे, तिसऱ्या जगातील धोरणकर्ते `जॉबलेस'पायी सचिंत आहेत.
चांगल्या दर्जाचा उत्पादक रोजगार निर्माण होणे अथवा न होणे, या समस्येचा धागा शिक्षणक्षेत्राशी जोडलेला आहे. पदवी असते परंतु रोजगारक्षमता कमकुवत असते. हातांना रोजगार नाही आणि उद्योगधंद्यांना प्रशिक्षित मनुष्यबळ नाही. पदवी आहे, पण ज्ञान आणि कौशल्ये नसल्यामुळे वास्तव अत्यंत दाहक आणि दु:खद आहे. शाळा महाविद्यालयांच्या शिक्षणाला व्यावसायिक अथवा धंदेशिक्षणाची जोड नसल्यामुळे रोजगार मिळण्याबाबत अडचणी जाणवतात. ज्या ज्ञानकौशल्यांना मागणी आहे त्यापेक्षा वेगळेच ज्ञान व कौशल्ये संपादन केलेल्या उमेदवारांना रोजगार मिळणे किंवा मिळवणे दुरापास्त ठरते. या बेरोजगारीस अर्थशास्त्रीय परिभाषेत संरचनात्मक बेरोजगारी (स्ट्न्क्चरल अनएम्प्लॉयमेंट) म्हणतात. मागणी असणाऱ्या ज्ञान कौशल्यांचा समावेश प्रचलित अभ्यासक्रमात करून या प्रकारच्या बेरोजगारीवर उतारा काढणे शक्य असते.
परंतु अभियांत्रिकीसारख्या ज्ञानशाखेतील पदवी असूनही प्रशिक्षित, कुशल कर्मचारी मिळत नाही आणि त्याच वेळी पदवीधर मात्र नोकऱ्यांच्या शोधात हिंडत आहेत. इथे प्रश्न रोजगाराच्या उपलब्धतेइतकाच उमेदवारांच्या क्षमतेचाही आहे. `ज्ञान' आणि `कौशल्ये' या दोन भिन्न बाबी असून रोजगार मिळविण्यासाठी कौशल्याची जोड आवश्यक वा अनिवार्य ठरत असते. केवळ पदवी मिळाल्याने संबंधित ज्ञान पुरेसे नाही. पुस्तकी ज्ञान आहे म्हणून नोकरी अथवा रोजगार मिळेलच याचीही हमी यापुढे मिळणार नाही. मिळविलेल्या ज्ञानाला उचित कौशल्यांची जोड पुरवत रोजगारक्षम बनवणे कळीचे बनते आहे.
एका खासगी कंपनीने केलेला अभ्यास आणि निष्कर्ष लक्षणीय आहेत. देशभरातील ६५० अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून २०१५ साली पदवी संपादन करून बाहेर पडलेल्या दीड लाख अभियंत्यांच्या पाहणी अभ्यासावर हे निष्कर्ष बेतलेले आहेत. यांपैकी जेमतेम १८ टक्के पदवीधरांच्या ठायी `सॉफ्टवेअर सर्व्हिसेस' क्षेत्रांमध्ये नोकऱ्या मिळविण्याची क्षमता होती, ३.६७ टक्के लोक `सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स' क्षेत्रातील नोकऱ्यांच्या क्षमता अंगी असणारे सापडले. संगणकाधारित अन्य प्रकारच्या सेवा पुरविण्याच्या उद्योगातील क्षमता असणाऱ्या पदवीधरांचे प्रमाण ४०.५७ टक्के दिसले. तर माहिती-तंत्रज्ञानातील `स्टार्टअप' कंपन्यांमधील क्षमता असणारे उमेदवार होते केवळ ३.८४ टक्के.
पदवी  मिळवलेल्या अभियंत्यांची रोजगारक्षमता इतकी दुर्बळ का असावी? कंपन्यांना गरज असते ती संगणक प्रणाली तसेच `अल्गारिदम्स' तयार करता येणाऱ्या पदवीधरांची. ९१ टक्के पदवीधर याच कौशल्यांच्या बाबतीत कच्चे असल्याचे उघड झाले. ७३ टक्के पदवीधर `सॉफ्ट स्किल्स्'च्या बाबतीत मागे होते, ६० टक्के पदवीधरांची `कॉग्निटिव्ह' कौशल्येच कच्ची होती. हे सगळे चित्र विस्मयकारक आहे.
संगणकशास्त्राशी संलग्न असे प्रशिक्षण त्या त्या कंपन्या आयोजित करत असतातच. पदवीधर उमेदवारांकडून अपेक्षा असते ती अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेले पायाभूत ज्ञान व गाभाकौशल्ये आत्मसात केलेली असावीत, तरीही केवळ ३.६७ टक्के अभियांत्रिकी पदवीधर सक्षम ठरावेत, ही वस्तुस्थिती गंभीर म्हणायला हवी. म्हणजेच, पदवी मिळवलेल्या अभियंत्याला प्रशिक्षण देऊन सॉफ्टवेअर इंजिनिअर बनविणे अवघड आहे.
भाषिक क्षमता व `कॉग्निटिव्ह' कौशल्ये असतील तर तीन ते सहा महिन्यांत `सॉफ्ट स्किल्स्' व तंत्रशास्त्रीय कौशल्ये हस्तगत करता येतात. भाषिक क्षमता आणि `कॉग्निटिव्ह' कौशल्ये अतिशय मुलभूत अशी गाभाकौशल्ये होत; असे असूनही प्रशिक्षण दिल्यानंतर `सॉफ्ट स्किल्स्' आत्मसात करण्याची क्षमता ५२ टक्के उमेदवारांपाशी नसल्याचे दिसते. इथे मुख्य गरज अथवा अपेक्षा आहे ती नवनवीन ज्ञान व कौशल्ये आत्मसात करण्याची. `सॉफ्टवेअर सर्व्हिसेस'च्या क्षेत्रात नोकरी करायची तर इंग्रजी भाषेशी सलगी असणे अनिवार्य ठरते. अभियांत्रिकीचे पदवीधर या आघाडीवरही कमकुवत ठरतात.
नोकरी मिळालेल्या उमेदवारांचा सहाएक महिन्यांत, परदेशी ग्राहकांशी अथवा व्यावसायिकांशी संपर्क होत असतो, त्यामुळे इंग्रजी बोलणे आणि लिहिता येणे ही गाभाकौशल्ये आत्मसात करावीत, अशी अपेक्षा असते. त्याच्याच जोडीने संगणकीय प्रणालीवरही हुकूमत अपेक्षित असते. तो हाताळत असलेल्या संगणकीय प्रणालीमध्ये काही सुधारणा गरजेच्या भासल्यास ते करता यावे, इतकीच कंपनीची अपेक्षा असते. परंतु अभियांत्रिकीसारखे शिक्षण घेतलेल्या पदवीधरांपाशी तितपत क्षमताही नसतात.
सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात एकांदरीनेच स्पर्धा प्रचंड वाढते आहे. आपली उत्पादने व सेवा यांची गुणवत्ता अव्वल राखणे आणि उत्पादन खर्चात बचत या बाबी अनिवार्य होऊन बसलेल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या शिक्षण-प्रशिक्षणावर खर्च करण्याबाबत कंपन्या, हात आखडता घेतील, अशीच संभावना दाट दिसते. ज्या उमेदवाराांची गाभाकौशल्ये सरस आहेत आणि विषयज्ञानाचा पाया पक्का आहे, अशांनाच नोकऱ्यांच्या बाबतीत प्राधान्य देतील. पदवीबरोबरच दर्जेदार कौशल्येही विद्यार्थ्यांना प्रदान करणे हा शिक्षणप्रणालीचा गाभा बनवावा लागेल.
-(`भारतीय अर्थ-विज्ञानवर्धिनी' पत्रिकेच्या आधारे)

आिये ग्रंथाचिये नगरी
अेखाद्या  सधन संपन्न घरी पुस्तकांचे कपाट दिसले तर त्या घराबद्दल चांगले मत होते, हा तरी पुस्तकांचा फायदा मोजावाच लागेल. अेका चांगल्या घरी पुस्तकांची वर्दळ पाहिल्यावर अेका येरूने असे विचारले होते की, ग्रंथालये आणि वाचनालये असतातच, तिथून पुस्तके आणून वाचणे सहज शक्य असते. मग स्वत:च्या घरात वेगळी कपाटं भरण्यात काय हुशारी असते कळत नाही. त्यावर त्या पुस्तकवेड्या सद्गृहस्थानं अुत्तर दिलं की, कोणत्याही गावात देअूळ असतं, मग आपापल्या घरात वेगळं देवघर कशाला करतात? ज्याला जेव्हा वाटेल त्यावेळी त्यानं दर्शनाला देवळात जावं; घरातली जागा अडवायची, त्याची पूजाअर्चा अुस्तवारी करायची हा व्याप कशाला? पुस्तकाचा जसा फारसा अुपयोग नाही, तसा देवाचा तरी काय असतो? तथापि ज्यांना ग्रंथ हेही देवाच्या ठिकाणी असतील त्यांच्यासाठी ती कपाटं अडगळ नव्हेत तर देवघरं आहेत.
गंमत म्हणून सांगतात की, काही अुच्चभ्रू म्हणविणारे लोक घराच्या भिंतींना शोभतील अशा रंगांच्या मुखपृष्ठांची मोठी मोठी पुस्तकं विकत घेतात. ती वाचावी लागत नाहीत, आणि घराचा मोठेपणा वाढवितात. हल्ली विकत घेअून पुस्तकं वाचण्याचं प्रमाण कमी झाल्याचं सांगतात, त्यात काही अर्थ नाही.  काही दशकांपूर्वी तरी कितीजण ग्रंथवाचन करीत होते? मुळातच त्या काळात साक्षरता कमी होती. तीस चाळीस टक्के साक्षर होते, म्हणजे त्यांना केवळ सही करता येत होती. अशा स्थितीत चांगले वाचक ते किती असणार? परंतु `पूर्वी आमच्या काळी म्हणजे.....' असं ठोकून देणाऱ्यांचा अेक वर्ग असतो, त्यांना हे वाचन बिचन करण्याची फार काळजी असते.
अेम सी छागला हे भारताचे न्यायाधीश होते, शिक्षणमंत्री होते; त्याहीपेक्षा ते थोर विचारवंत म्हणून प्रसिद्ध झाले होते. त्यांचे आत्मचरित्र `रोझेस आिन डिसेंबर' या नावाचे गाजले, त्याला काही दशके अुलटली. अेका तत्वज्ञ अधिकाऱ्याने आपल्या संग्रहातील हे पुस्तक शेाधण्यासाठी अेेक निवेदन प्रसिद्ध केले, ते वाचून त्यांचे ते पुस्तक परत मिळाले. पण दरम्यानच्या काळात अेका विख्यात महाविद्यालयाच्या तितक्याच विख्यात ग्रंथालयातील अेक मौज अैकायला मिळाली. तेथील संबंधित ग्रंथपालाने त्या तत्वज्ञ गृहस्थाला कळविले की, मी आता निवृत्त झालोय, पण आमच्या त्या ग्रंथालयात त्या पुस्तकाची प्रत निश्चितपणे आहे. मी तुमच्यासाठी ते पुस्तक मिळवून देआीन. त्यांनी ते ग्रंथालयात शोधले पण मिळेना! खूप मिनतवारीने अेकदाचे सापडले, `रोझेस आिन डिसेंबर' अशा नावामुळे ते नव्या मंडळींनी वनस्पतीशास्त्र या विभागात ठेवले होते. हे पूर्वीचे ग्रंथपाल निवृत्त झाल्यापासून त्या पुस्तकाचे वाचन करणार कोणीही वाचक नोंदला गेला नव्हता.
डोंबिवलीला रविप्रकाश कुलकर्णी हे समीक्षक आणि ग्रंथवाचक आहेत, त्यांच्याशी फोनवर बोलताना सहज म्हणून ही चौकार-गंमत सांगितली. त्यावर त्यांनी षट्कारच ठोकला. त्यांनी सांगितलं की, मुंबआीत अेक प्रसिद्ध ग्रंथालय आाहे. तिथं मी पाहिलंय, गीतारहस्य हा ग्रंथ त्यांनी रहस्यकथा विभागात ठेवला होता.
अेका शिक्षण सम्राटाच्या शाळेत ग्रंथालय पाहण्याची अुत्सुकता होती, कारण त्या ग्रंथालयात चार हजार पुस्तकं असल्याचं तिथल्या गुरुजींनी सांगितलं. ग्रंथालयाची सुसज्ज आिमारत, आत अैटदार कपाटं, फेर्नचरही चकाचक. पुस्तकांची कपाटं नीट पाहिल्यावर लक्षात आलं. कपाटात त्या शिक्षण सम्राटाचं चरित्र अैंशी प्रती, त्याच्या आआीच्या कष्टांची कथा चाळीस प्रती..... भरगच्च संख्येनं सजलेलं ग्रंथालय!!
पुस्तकांची दुनिया अजब असते. तितकीच ग्रंथालयांचीही अजब असते. कोणी ग्रंथपालानं त्याचे किस्से सतत सांगत राहिले तर काय बहार येआील. तसं कुणाचं पुस्तक वाचकास ठाऊक असेल तर तसे आवाहन!

जातीचा अंत होईल?
सारी मानवजात परमेश्वराची लेकरे असून जातीचा अंत करणे ही आजच्या सामाजिक विचारांची प्राधान्यकृती आहे;  हे विधान सदा सर्वकाळ प्रचलीत आहे. `आजच्या काळाची' म्हणून जी गरज सांगितली जाते, ती तर चिरंतनच असते. रामायण-महाभारताच्या काळी जन्माधारित जातींचा पगडा असल्यामुळे ज्या भल्याबुऱ्या घटना झाल्या, तेव्हा जन्माधारित जाती प्रत्यक्ष व्यवहारात होत्या, पण गुणकर्मविभागश: असे सांगितले मात्र जात होते. जातीअंताच्या चळवळी आजच्या वयस्कर पिढीला आठवते तेव्हापासून चालू आहेत आणि त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात जातीभेदही वाढत आहेत. आितकेच नव्हे तर जातींमधला विखार आणि परजातींविषयी शत्रुत्व वाढते आहे आणि वाढविले जात आहे, ते पाहिल्यानंतर, - पूर्वीचा सहानुभूतीपूर्ण जातीभेद अेकवेळ बरा म्हणायची वेळ येते!!

जन्माधारित जात म्हटले की आपोआपच त्यास परंपरेचा वारसा मिळतोे. कर्माधारित परंपरा पाळायची तरी तोच तो व्यवसाय करणे आले. ज्यांच्या नशीबी हलकी कामे आली, त्यांच्या मुलां-नातवंडांना त्याच हलक्या मानल्या गेलेल्या कर्मांच्या कर्दमात राहणे पिढ्यानुपिढ्या अपरिहार्य बनते. अुलट त्यांच्या जाती जमातींचे धर्मकृत्य करण्यासाठी त्यांनाही ब्राह्मण कुलोत्पन्नच लागतो. ही जनरीत मोडता मोडत नाही. अशावेळी वकीलाचा मुलगा वकील, आणि शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होण्यात स्वाभाविकता आहे असा अेक समर्थनविचार रुळवला जातो. तो प्रथमत: साळसूद वाटतो, आणि तो तसाच अनुसरलाही जातो.

परंतु हीच स्वाभाविक गोष्ट आपल्या सार्वजनिक जीवनात अनेकांना खटकत असते. आमदाराच्या पुढच्या पिढीला त्या पुढारकीची लागण जन्मत: होत असते. त्यामुळे राजकीय पुढारी ही अेक वेगळी कर्माधिष्ठित जात मानली की पुढची अुत्तरे सोपी होतात. महाराष्ट्नत पालघर-पलूस येथे आमदारकीच्या पोटनिवडणुका आहेत. तिथे जे आमदार होते, त्यांच्या मुलांना तिकीट देण्यात आले आहे.- किंवा त्यांच्या विरोधकांच्या घरांतच विरोधी तिकीट दिले गेले आहे. बाकीच्या पक्षांनी त्या जन्मसिद्ध वारसदारांना विरोध करू नये अशी वरकरणी सहानुभूतीची भूमिका मांडली. तसे करताना त्या नव्या अुमेदवारांची पात्रता कोणी विचारात घेतली असेल असे जोराने म्हणता येत नाही. आपल्याकडे  देवेगौडा, ताराबाआी वर्तक, प्रणिती शिंदे, सुप्रिया सुळे, सुमनताआी पाटील, .....अशी कितीतरी अुदाहरणे आहेत; ज्यांच्या पात्रतेपेक्षा केवळ परंपरागत पुढारकीच्या जातीमुळे त्यांना संधी देण्यात आली. पुढारी नावाच्या लोकशाही स्पर्धा-काळातील ही नवी जात तयार झाली, आणि त्या जातीचा वरचष्मा साऱ्या समाजाला अकारण सोसावा लागत असतो.

याच प्रकारे कंत्राटदार ही नवी जमात अुदयाला आली आहे. बड्या अुद्योगांंत घराणेशाही म्हणत असतील तर तिथे त्यास कुणाचा आक्षेप नसतो. कोणत्याच खाजगी व्यवसायात तसा असण्याचे कारण नसते. तथापि आसारामची मुलगी त्याच्याच नावावर अध्यात्माचा व्यवसाय करू लागते, तिथे बुवाबाजीची नवी जात तयार होत असते. तुकाराम रामदास यांच्या बाबतीत तो प्रश्न आला नाही, त्याचप्रमाणे नामदार गोखले, गांधीजी, सावरकर, विनोबा यांच्याही बाबतीत आला नाही. पण पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या कन्यारत्नावर ते दोषारोप होत राहिले. कारण तिथे जन्माधारित परंपरेची जात तयार होअून ती प्रभावी ठरू लागली, आणि मुख्य म्हणजे तसे वातावरण सामाजिक समतेला अनुरूप नसते. राजकीय क्षेत्रात घराणेशाही नावाचे व्यंग टीकाकारांसाठी अुपलब्ध होते. पण ते कधी टाळले जात नाही, त्या त्या घराण्याला आणि त्यांच्या अनुयायी नामक चमच्यांना त्यात काही गैर वाटत नाही. परंपरेने आपोआपच राजकारणी नावाची  नवी जात तयार होते. ती सेवाभावी होण्याअैवजी आितरांवर अरेराव होते. नवा जातीयवाद तयार होतो.
असे होण्यात गैर तर काही नाही. भले आधीच्या कोण्या कर्तबगाराआितके ते वंशपरंपरेचे वारसदार प्रभावी नसतील, पण त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोण परंपरागत जातीयच असतो. काही खऱ्याखुऱ्या कर्तृत्वांच्या बाबतीत त्या जातीच्या आधाराचा संबंध नसतो. जयंत नारळीकर यांचे वडील रँग्लर होते, दुसऱ्या पिढीतला रँग्लर म्हणून जयंतरावांचे कौतुक झाले तेव्हा ते म्हणाले होते की, आपल्याकडे हे कौतुक झाले पण केंब्रिजला अशा सात सात पिढ्या ओळीने रँग्लर होतात! -त्यावेळी त्यांना गणिती नावाच्या अत्युच्च जातीचे ठरवायला काही हरकत नाही, कारण तिथे गुणकर्माला प्राधान्य असते.

आज जन्माधारित जातीभेदांचे प्रमाण वरकरणी कमी दिसत असले तरी जातींतील भेदविखार वाढत चालले आहेत. परिस्थिती, आर्थिक विकास, साधने आित्यादींची अनुकूलता वाढलेली असल्यामुळे खेडोपाड्यांतील लग्नांचीही रीत पार बदलून गेली आहे. ती काही जातीधर्मांना नकोशी वाटत असते. अेके काळी त्याच चालीरीतींचा अवलंब ज्यांनी केला होता, त्या रीतीभाती पाझरत जातात, त्यांचा प्रसार होतो, आणि मग ज्यांनी त्यास प्रारंभ केला होता, त्यांनाही तो असह्य होतो. लग्नाची वरात हे त्याचे सर्वस्पर्शी अुदाहरण आहे. अेकेकाळी ज्यांनी आपल्या लग्नाची वरात वाजत वाजवत नेली होती, त्यांनाही आजच्या जमान्यात ती अतिरेकी वाटते. तो काळ वेगळा होता.... वगैरे समर्थन लंगडे आहे, कारण आज ज्यांना तशी स्थिती आली त्यांच्यासाठी सारे काही अनुकूलच असते. त्याला नावे ठेवून चालत नाही.

जातीचा विषय निघाला की हमखास आरक्षणाचा प्रश्न पुढे ठाकतो. समान संधी मिळण्यासाठी अेक सोयीची वाट म्हणून आरक्षणाची व्यवस्था असते. पण तो प्रश्न आता अस्मितेशी, नेतेगिरीशी आणि सामुदायिक लाभासाठी वापरला जातो हे पाहायला मिळते. मुळात कोणताही सामाजिक बदल कायद्याने होतो का, हाच वादाचा विषय आहेे. कितीतरी कायदे पाहण्यात असतात की ते वापरायचे कसे याचा बोध होत नाही. हुंडाबंदी म्हटले की वरदक्षिणा म्हणतात. सामाजिक सुधारणा होण्यासाठी मानसिकता बदलायला हवी असे गांधीजी म्हणत, आणि कायदा करायला हवा असे आंबेडकर म्हणत. त्यांच्या परीने दोघेही महान होते. काहींसाठी  आरक्षणाची तरतूद असणे म्हणजे अेका अर्थी असमानताच करणे असते. मग घटनेने समानतेचा अुद्घोष केला आहे, तो कुणासाठी? असे काही वादविषय चिरंतन राहणारच आहेत. पण दुर्बल कोणी राहू नये आणि अेकाने दुसऱ्यास गिळावे असा न्याय कदापि अस्तित्वात असू नये हे जातीजातींना मान्य असेल तर जातीअंतासाठी फार वेगळे काही करावेच लागणार नाही. पण आज तरी जातींचा वापर राजकारणी हेतूंनी दुष्टबुद्धीने होतो आहे.


तात्पर्य असे की, जातींचा अंत कधी होत नसतो, पण जातीजातींनी समानता, समरसता, आणि सहजीवन यांचा अवलंब करणे यात मानवता असते. विखाराअैवजी समन्वय हे मानवी समाजाच्या अुत्कर्षाचे आिंगित आहे. पण विखार हेच ज्यांचे शस्त्र साधन असते, अशीही अेक समाजशत्रू जात पृथ्वीतलावर आहे, ती मात्र धोकादायी आहे. परंपरेने कोणत्याही क्षेत्राला जातीधर्मांचे आधार घेतले जातातच, ते तारतम्याने अनुसरले तर त्यात घातक काही नसते. प्रदेश, भाषा, आहार, रीती, वर्तणूक, पूजापाठ, श्रद्धास्थाने अशा कितीतरी कारणांनी आपापल्या जातींचे पिंजरे प्रत्येकजण सुखरूप ठेवू पाहतोच.

मर्यादित सुखांच्या पलीकडे
अहमदाबाद येथे गेल्या २५ वर्षांपासून नवजीवन चॅरिटेबल ट्न्स्ट या नावाची संस्था काम करीत आहे. मतिमंद, सेरेब्रल पाल्सी, ओटिझम यांसारख्या व्यथांनी ग्रासलेल्या मुलांना आणि तरुणांना प्रशिक्षण देअून स्वावलंबी करण्याचे प्रयत्न संस्थेच्या वतीने केले जातात. सामान्यत: `अशा'  मुलांना समाजात फारसे कोणी वावरू देत नाहीत, त्यांना त्याच प्रकारच्या मुलांसाठीच्या वसतिगृहात -होस्टेलमध्ये ठेवण्यात येते; अन्यथा ते शक्य नसेल तर मग घरातला अेखादा अेकलकोंडा कोपरा त्यांच्यासाठी असतो. या सामाजिक समस्येवर अुपाय म्हणून या ट्न्स्टने  विशेष  विद्यालय सुरू केले. त्या शाळेने अनेक प्रशस्तीपत्रे व मानमान्यता मिळविली. गेल्या २५ वर्षांत या संस्थेने त्या क्षेत्रात आपले नाव रुजू केले आहे.
रजतजयंती वर्षात संस्थेने जे विश्वविक्रम केले आहेत त्यांंची नोंद करणे आवश्यक आहे -
अहमदाबादहून मुंबआीची सहल, या प्रकारच्या १०० मुलांनी अेकाच वेळी केली. सकाळी ही दिव्यांग मुले विमानाने मुंबआीला आली. सिद्धीविनायक मंदीर, हाजीअली, महालक्ष्मी, फिल्मसिटी असे फिरून ती सारीजण संध्याकाळच्या रेल्वेगाडीने अहमदाबादला परत गेली.
त्या शाळेची २६ दिव्यांग मुले हिमालयात मनालीजवळ ट्न्ेिंकग करून आली. ४५० मीटर अुंचीवरील सेनसुआी स्नो पॉआिंट पर्यंत ती गेली आणि संध्याकाळी परतली.
मतिमंद अशा १४ मुलांच्या अेका गटाने `हनुमान चालीसा' हे नृत्यनाट्य बसविले आहे. रामलक्ष्मण सीतेसह साऱ्या भूमिका आहेत. हनुमान द्रोणागिरी अुचलून आणतो, छाती फाडून रामदर्शन घडवितो अशी दृष्ये प्रेक्षकांचे कौतुक मिळवतात. या नृत्यनाट्याचे ३० प्रयोग स्टेजवर झाले आहेत, आणि आता त्यास सिंगापूरचे बोलावणे आले आहे.
अेकाच मैदानात २०० मतिमंद मुलांनी झुंबानृत्य  सादर केले आहे.
क्रचची ५१ फुटांची  प्रतिकृती त्या मुलांनी बनविली आहे. ती संस्थेच्या प्रांगणात अुभी केली आहे.
या साऱ्या अुपक्रमांना गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, आिंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अशा ठिकाणी स्थान मिळाले आहे. क्रच प्रतिकृती गिनीज् बुकने नोंदविली आहे. या संस्थेने केलेल्या पराक्रमी अुपक्रमांनी अन्य काही संस्थांना प्रेरणा मिळाली, त्या पुढे आल्या आणि अशा प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम त्यांच्याकरवी सुरू झाले आहेत. काही मर्यादेत राहिलेली मुले आता भरारी घेअू लागली असून त्यांच्यात वेगळया सुधारणा दिसू लागल्या आहेत.
ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून गेली ४२ वर्षे काम करणारे सुभाष रघुनाथ आपटे हे या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त आहेत, त्यांच्याच हाताखाली संस्थेत तयार झालेले नीलेश पंचाल हे तिथे प्राचार्य आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात २५-३० मुलांना घेअून दुबआीची सहल करण्याचे बेत आखले जात आहेत.
-सुभाष रघुनाथ आपटे, अहमदाबाद
फोन-९४२८०१८६०८   

आठवांचे साठव
पावसातलं भूत
अुन्हाळी पाअूस कधी सरळ येत नाही. अून ताप ताप तापतं. काहिली होते. तलखी होते.  आितकं तापतंय म्हणजे बहुधा आज अुद्या पाअूस येणार... असं रोज वाटतं. तसं महिनाभर वाटत राहिलं की मग अेकदा वावटळ घोंघावतं. धूळ धुरळा गरगरतो. पाला पाचोळा माजतो. वीज होते. पण पाअूस हुलकावणी देतो. आला आला म्हणेतो पसार होतो. मातीचा सुवास दरवळतो, त्यावरून तो जवळपास कुठंतरी पडला असणार असं सगळेच म्हणतात. परंतु पाअूस पडलेलं ते जवळपासचं ठिकाण शोधून सापडत नाही.
पण असं चार सहावेळा केलं की मग खरा पाअूस येतोच. त्याआधी किंवा मध्यावर धुमशान वादळ असतं. झाडं माडं कचाचा वाकतात, पिसारे पिंजारून पिसाटतात. कच्च्या कैऱ्या, बाकीची फळं, काही फांद्या झाडोरा सगळया रानांगणात विखरून पडतो. बहुधा हे सारं तांडव दिवस मावळताना, तिन्हीसांजेला किंवा  प्रहर रात्री चालतं. अर्ध्या तासात सचैल धारानृत्य झालं की तालीबांधात पाणी साठतं. आणि पाअूस लांबलांब सरकत जात थांबतो. वादळही शमतं. पण अेव्हाना अंधारून गेल्यामुळं कायकाय धिंगाणा झालाय हे लगेच पाहता येत नाही. त्यासाठी सकाळ अुजाडावी लागते.
असे वळवाचे पाअूस माझ्या आठवणीत साठून राहिलेत. सकाळी अुजाडू लागलं की आम्ही भावंडं बुट्टी किंवा किलतानाची पोती सरसावत रानात हिंडायला लागायचो. पडलेलं फळं गोळा करायची, अर्धवट मोडून लोंबणाऱ्या फांद्या छाटायच्या, घरटी सरळ करायची, पाणी अजून कुठं साचून राहिलेलं असेल तर पायांनी अेकमेकाच्या अंगावर अुडवायचं असं तासदीड तास चालायचं. सलग दोन तीन पाअूस झाले तर ताली तुंबून राहात. मोठ्या ताली भरून जायच्या. आमच्या पोरवयातील कंबरेआितकं पाणी साठायचं. त्यात लाडका खेळ म्हणजे लांब बांबूच्या काठ्या `वल्हवीत' फिरायचं. त्या पाण्यातही काठीकोलणी खेळायचो. वॉटरपोलोची आमची गावठी आवृत्ती. आमच्या मळयात हर तऱ्हेची आंब्याची ंझाडं होती. असल्या वादळी पावसानं बरेच आंबे पडले की चैत्रागौरीचं हळदीकुंकू काढायचं. अनायासे पन्हं होअून जाआी, कच्च्या आंब्यांचा सदुपयोग घडायचा. शिवाय गौरीच्या दोहो बाजूला राघू असायचे, म्हणजे तोतापुरी आंब्यांच्या चोचींना कुंकू लावून ते फुलपात्रातल्या तांदळात पोपटासारखे अुभे करायचे, ही पेटंट आरास!
 पुढच्या अंगणाजवळच्या अेका खोलीत अेक कुलकर्णी आजोबा राहात. त्यांची मुलंबाळं नोकरीत होती. पण तिथं अडचण करण्यापेक्षा  कुलकर्णी आजोबानी आमची ही खोली बसायअुठायला म्हणून घेतली होती. रात्री मुक्कामाला ते तिथं असत. दिवसा काही वाचनबिचन करीत, कुणाला तरी पंचांग सांगत, शिलाआीकाम करीत.. जुन्या खेडेगावातला  साधा श्रद्धाळू बामण होता. आम्ही पोरं त्यांच्याशी गप्पा मारताना टवाळी करीत असू. त्यांचा त्या काळाप्रमाणं भुतंखेतं आणि तत्सम बाबतीत पुरा विश्वास होता. त्यांच्या मताप्रमाणं आमच्या विहिरीवरच्या पिंपरणीच्या झाडावर `काहीतरी' राहातंय्. आम्ही तिथंच तर झोपत होतो, आम्हाला बरं कुणी दिसत नाही? -असं म्हटलेलं त्यांना रुचत नसे. `बघा अेक दिवस करेल गंमत...' असं म्हणून ते स्वत:ही घाबरत आणि आम्हाला भीती घालत.
अेके दिवशी रात्रीच्या प्रारंभी अशीच पावसाची लक्षणं होती. मी अेकटाच झोपायला होतो. पावसाच्या आधीच्या अुकाड्यानं गदमदत होतं म्हणून मी बाहेर कौलांच्या ढिगावर पथारी टाकली. पण तासा दोन तासांनी आभाळ गडगडू लागलं, विजेचे चमकारे सुरू झाले. थेंब टपटपू लागले; आणि मी मुकाट्यानं अंथरूण आवरून छपरात गेलो. तेवढ्या थेंबांनी तळपायाला चिकटेल अेवढी माती ओलावली होती. दोन पाच मिनिटांत पाअूस थांबलाच. झोपण्याआधी  पाय धुणं आवश्यक होतं. पण पाणी कुठून आणायचं? मग युक्ती केली. अेक जुनी बादली मिळाली, तिच्या कडीला काथ्याची दोरी बांधली, आणि विहिरीत सोडून शेंदून पाणी काढलं. दोनदा बादली खाली सोडून थोडं थोडं पाणी आलं, त्यानं पाय धुतले. सगळं आवरून पुन्हा झोपण्यात अर्धा तास गेला.
दुसऱ्या दिवशी ते कुलकर्णी आजोबा म्हणाले, `तुम्हाला खोटं वाटत होतं. काल रात्री मी या डोळयांनी पाहिलं ते. तुमच्या त्या विहिरीवरच्या झाडात नक्कीच ते आहे. काल पावसाच्या वेळेला विहिरीतून पाणी शेंदून काढत होतं. मी शू करायला अुठलो होतो, त्या बाजूला लक्ष गेलं, या डोळयानं पाहिलंय. आज तिथं निवेद-नारळ ठेवायलाच पाहिजे.'  ते ्रआजोबा आितकी खात्री देत होते तोवर बाकीच्यांनी जरा तर्क लढविणं चालू ठेवले होते. मी त्यांना माझं ते पायधुणं सांगितल्यावर बाकीच्यांनी खोे खो  हसून मलाच नैवेद्य द्यायचं ठरविलं, आणि त्या दिवशी माझ्यासाठी जेवायला गुळांबा, चपाती केली.
-वसंत आपटे, किर्लोस्करवाडी

वाद-संवाद
असे भक्तेनवास आपण अुभारावेत
मी गेल्या महिन्यात अंबेजोगाआीला योगेश्वरीच्या दर्शनासाठी गेलो होतो. ज्यांची कुलदेवता  ती देवी आहे, त्या लोकांसाठी  -म्हणजे विशेषे करून चित्पावन ब्राह्मण लोकांच्या सोयीसाठी, भक्तेनवासाची वास्तू अुभारली गेली आहे. माझ्या मनांत आले की या लोकांचे कुलदैवत कोकणात असते, तिथे या प्रकारची भव्य आणि आधुनिक धर्तीची निवाससोय असायला हवी.
मी माझ्या कुलदैवतासाठी बऱ्याचदा गुहागर येथे व्याडेश्वरला जातो. तिथले भक्तेनवास त्या मानाने फारच साधे, -खरे तर नीरस आहे. आपण कुलबंधूंनी मनावर घेतले तर अशा कुलदेवतांच्या क्षेत्री आपापल्या ताकतीने भक्तेनवास अुभी करता येतील. ती अत्याधुनिक, सुसज्ज असावीत. नव्या काळातल्या पिढीला आणि साठीपुढच्या निवृत्तांनाही आता अुत्तम राहणीमानाची सवय झाली आहे, त्यांना जुन्या पद्धतीची साधी निवाससोय चालत नाही. स्वच्छतागृह, स्नानगृह, चांगले फेर्नचर-बेड्स वगैरेंची गरज असते. आम्हा सर्व कुटुंबियांचेही तेच म्हणणे पडले, आमच्या कुलाच्या कार्यकारिणीतील अेका महिला सदस्यालाही ते पटले. त्यांनी सुचविल्यावरून हे निवेदन आपल्या अंकात देत आहे. दानशूर व्यक्तींना आवाहन करून असा प्रकल्प पूर्णत्वास नेता येआील, यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. याविषयी काही प्रश्न असतील किंवा या प्रकल्पात सहभाग शक्य असेल तर संपर्क साधावा.
 -श्रीकृष्ण विष्णू आपटे, गणेशवाडी, पाचपाखाडी, ठाणे (प)          
    फोन : ९८७० १२८ ४२०



संवाद
नवे अुभारण्यापेक्षा जुने सुधारूया
आपल्यातल्या कित्येकांना जिथे काही कमी असते, किंवा अयोग्य भासते तिथे आपण अुभे राहावे असे वाटते ही फारच चांगली आणि सध्याच्या काळात सामाजिक दृष्ट्या मोठी गोष्ट आहे. आपल्यातले बरेच जण अशा प्रकारच्या योजना मांडतात, प्रस्ताव करतात त्यावेळी  `आपण करूया' हा भाव असतो. आितर अनेक ठिकाणी `हे कुणीतरी करावे', किंवा त्याहून चलनी सूचना म्हणजे `हे सरकारने करावे' अशी असते. आपल्या वाचकांचे सुजाणत्व जे वारंवार जाणवत असते, त्याचाच हा पुन:प्रत्यय आहे.
या प्रस्तावांमागची सद्भावना आणि विचार लक्षात येतो, पण तरीही मला स्वत:ला त्या आवेगात झपाझप काही निर्णय घेअून कामाला लागणे अुचित वाटत नाही. मुख्यत: अशा प्रकल्पांसाठी येणारा खर्च वेळ परिश्रम यांचा विचार करता त्यांची अुपयोगिता किती हा विचार महत्वाचा असला पाहिजे. कोकणच्या म्हणीसारखा, कपभर दुधासाठी म्हैस पाळायची  त्यातला प्रकार होअू नये. शिवाय अशा प्रकारचे प्रकल्प काही काळापूर्वी केले गेलेले असतात, त्यांची निरुपयोगिता कशामुळे झाली हेही तपशीलवार पाहिले पाहिजे.
मध्यंतरी अेका मोठ्या संमेलनात असा प्रस्ताव आला होता की, आपल्या सुपात्र असलेल्या मुलांना सध्या योग्य त्या शिक्षणासाठी व `करियर'साठी पुरेशी संधी मिळत नाही, किंबहुना नाकारली जाते म्हणून आपण विद्यापीठ काढावे, त्यासाठी जमीन आिमारती व प्रारंभिक गरजांसाठी शंभर कोटि रुपयांची तरतूद करावी लागेल, तीही करू. या कल्पनेनुसार काहीतरी सुरुवातही झाल्याचे अैकले होते. अलीकडे त्याबद्दल माहिती नाही. पण यात वेगळे मत असे की, जी विद्यापीठे आहेत तिथे योग्य ते बदल करणे शक्य असते. नवीन विद्यापीठ अुभारण्यापेक्षा ते फार कमी श्रमाचे ठरेल. पूर्वी ज्या अशा सोयी होत्या, यंत्रणा होत्या त्या आज आपल्या अुपयोगाच्या राहिल्या नाहीत; -किंबहुना त्या विरोधातच चालल्या आहेत; त्यांची कारणे काय? प्रमुख कारण असे की आपणच त्यांपासून अलिप्त झालो, दूर राहिलो, त्यांतून लक्ष काढून घेतले, त्यांची आपल्याला जरूर नसल्याप्रमाणे वागलो. सगळयांच्या बरोबरीने त्या सोयी सर्वांसह आपल्याला अुपयोगी पडतील यासाठी कधी प्रयत्न चालू ठेवले नाहीत. आता तेथील व्यवस्था बदलल्या, कायदे नियम बदलले. आपल्याला फारसा वावच नाही अशी भावना होत चालली. पण तरीही त्यात अनुकूलता हवीच असेल तर अधिक योग्य त्यासाठी मार्ग शेाधावे लागतील. सुधारणा करता येतील. सर्वस्वी नव्याचीच अुभारणी करणे जीव खाणारे काम असते. त्याहीअुपर ते केलेच तर पुन्हा हीच वेळ येणार नाही याची खात्री काय?
त्याअैवजी आहेत त्याच व्यवस्था, -त्यांतील नियमांनुसार,  -आपल्यालाच नव्हे तर कुणाही सुपात्र व्यक्तीला अनुकूल होण्यासाठी  संघटित प्रयत्न केले पाहिजेत. नव्याची अुभारणी करण्यापेक्षा ते कितीतरी सोपे. हाच विचार क्षेत्राच्या जागी अद्ययावत् भक्तेनवास बांधण्याच्या आणि अन्य कोणत्याही बाबत लागू होतो.
गुहागर येथे भक्तेनवास आहे. तो साधासुधा आहे. आम्हा आपटे लोकांचे अेक संमेलन गुहागरला झाले. काही कुलबंधू अेका अद्ययावत् हॉटेलमध्ये अुतरले हेाते, मी पत्नीसह त्या भक्तेनवासात राहिलो होतो. मला त्यावेळी बहुधा ५०रु. खर्च आला होता. माझी गरज फार कमी होती, माझ्यापुरती तिथे तेवढी व्यवस्था होती, ती ठीक होती, चालवून घेण्याजोगी होती. कोकणातील भक्तांना ती पुरेशी वाटत असावी. किंवा आितरत्र ठिकाणहून येणाऱ्या लोकांतील ज्यांची तितकीच गरज असते, त्यांना ती चालते. ज्यांना त्याहून अधिक सुखसोयी हव्या असतात, त्यांच्यासाठी गुहागरात बरीच हॉटेले आता आहेत. काहींच्या घरीही निवासाची तशी चांगली सोय होअू शकते. जे लोक स्वत:च्या गाडीने येतात, त्यांना चिपळूणातही राहता येआील, ते अंतर ५५किमी आहे. वेळणेश्वर येथेही चांगल्या सोयी आहेत. शासकीय विश्रामगृह आहे, एकदा मी तिथे तीन दिवस राहिलो. ते व्याडेश्वर मंदिरापासून जरा दूर आहे. गाडी असेल तर ते ठीक आहे.
अलीकडे गुहागरातच श्रीदुर्गादेवी मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. तिथेही तीन मजली भक्तेनवास आहे. व्याडेश्वर ते दुर्गादेवी अंतर अर्धा किमी आहे. या साऱ्यांपेक्षा अधिक माहिती व तपशील कुणालाही सहजी अुपलब्ध होअू शकतो. सांगण्याचा मुद्दा असा की, यापेक्षा वेगळी काही सोय हवी असेल असे नाही. मग त्यापायी स्वतंत्र नव्या भक्तेनवासाचा प्रकल्प राबविणे व्यवहार्य होआील का?
या संदर्भातच थोडे विषयांतर करून हे निवेदन लांबवू म्हणतो. हल्ली कोणतीही सामाजिक संस्था सुरू केली की त्याच्या नोंदणीची घाआी केली जाते. आणि पैसे गोळा करून भव्य योजनांचे संंकल्प होतात. ज्येष्ठ नागरिक संघ जरी झाला तरी कुठेतरी प्लॉट घ्यायचा, सभागृह बांधायचे, विरंगुळा केंद्र बांधायचे अशा योजना सुरू होतात. सरकारची मदत मिळण्यासाठी पुढाऱ्यांकडे हेलपाटे होतात. वास्तवात हे निवृत्तांचे संघ असतात, त्यांनी पुन्हा संघटनात्मक आर्थिक व कागदोपत्रांच्या गुंत्यात का अडकायचे? हे मत साऱ्यांना पटते असे मुळीच नाही, माझा विचार मी मांडला. विरंगुळा केंद्र किंवा अेकत्र जमण्यासाठी जागा कोणत्याही गावात सहज अुपलब्ध होते. शासकीय शाळांत परवानगी असते. त्यांचा वापर होअू शकतो. अेखाद्याचे घरही सोयीचे असते. छोट्या गावांत कुठे झाडाखाली बसले तरी हेतू सफल होतेेा. पण त्याअैवजी कार्यकारिणी, ठराव, निधी, व्यवस्था हे सारे सुरू होते.
आपल्या सामाजिकतेचा या संदर्भाने वेगळा काही विचार व्हायला हवा असा हे लिहिण्यामागे अुद्देश आहे. आहेत त्या यंत्रणा आणि सोयींचा अधिकाधिक वापर करणे हाही सामाजिकतेचा वा  देशकार्याचाही अेक पैलू ठरेल.

एक संप्रेरक व्यक्तिमत्त्व-द. गो. मेहेंदळे
अशा एका सद्गृहस्थांचे नाव दत्तात्रय गोविंद मेहेंदळे. ते अमृत महोत्सवी वर्ष ओलांडत आहेत. त्यांना बहुतेक जण वीस वर्षे अलीकडच्याच वयाचे समजतात. आम्ही त्यांना `दत्तोपंत' म्हणतो, घरात ते `सुरेश' असतात, रंगभूमीवर `राजू' म्हणून ओळखले जातात, गंगा पदयात्रेत `दत्तूमामा' असतात, तर सिंहगड वारकरी त्यांना `लखू' म्हणतात. रासायनिक उद्योगसंस्थेत ते पस्तीस वर्षे कामाला होते. माता-पित्यांच्या सद्गुणांचा गुणाकारी वारसा घेऊन जन्माला आलेले हे दत्तोपंत सार्वजनिक कार्यांत एकरूप झाले.
त्यांच्या अनेक कार्यांतील विशेष उल्लेखनीय असा त्यांचा रक्तदान यज्ञ. तब्बल एकशे एेंशी रक्तदानाच्या समिधा त्यांनी रुग्णाईत सेवार्थ समर्पित केल्या आहेत. वय वर्षे अठरा ते साठ या बेचाळीस वर्षांत त्यांनी सातत्याने रक्तदान करून चोपन्न लिटर्स म्हणजेच चोपन्न हजार सी.सी. रक्ताची निर्मिती केली. मुलुखावेगळी साठीशांतच झाली. सदर साठीशांत समारंभाला निमंत्रित पाहुणे कोण होते? तर एकशे त्र्याएेंशी उत्स्फूर्त रक्तदाते. श्री.मेहेंदळे यांच्या रक्तदान समाप्तीचे औचित्य साधून, त्यांना मानवंदना देण्यासाठी प्रत्यक्षपणे रक्तदान करण्यासाठी रक्तदाते ६-८-२००० या दिवशी जमले होते. अशी साठीशांत केवळ दत्तोपंतच करू शकतात.
साठीशांत झाल्यावर लगेचच त्यांनी रक्तदानाच्या प्रचार कार्यास महाराष्ट्न् रक्तपेढी संघटना या संस्थेच्या माध्यमांतून भटकंती चालू केली आहे. दुर्मीळ रक्तगटांच्या रुग्णांसाठी पुणेस्थित संबंधित रक्तदात्यांची तपशीलवार सूची करण्याच्या ते प्रयत्नांत आहेत. श्री.दत्तोपंत मेहेंदळे यांच्या उमेदीच्या काळातले विक्रम आजही औत्सुक्याचे ठरतात. दापोडी ते खडकी या दरम्यान तत्कालीन स्थानिक रेल्वे गाडीतून मुळा नदीत मारलेली उडी, उघड्या मैदानावर चोवीस तास उभे, विहिरीच्या पाण्यात चोवीस तास तरंगत राहिले, पूर्वानुभव नसताना पर्वती टेकडी पाच तासात चाळीस वेळा चढले आणि उतरले, सव्वीस मैलांच्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग, एक तासात शास्त्रशुद्ध एकशे पस्तीस सूर्य नमस्कार, तत्कालीन पुण्याच्या लकडी(संभाजी) पुलावरून अनेक उड्या, याशिवाय पदभ्रमण, गिरीभ्रमण, जलतरण अशा कित्येक साहसी मोहिमांत अग्रभागी राहिले.
सर्वसाधारण साठीनंतर शारीरिक सामर्थ्यही थकत जाते, पण श्री.दत्तोपंत मेहेंदळे अपवाद आहेत. साठीनंतरच्या उपक्रमांकडे नजर फिरविली तरी पूर्वीच्या विक्रमांची सत्यता पटते. सेवानिवृत्तीनंतर श्री.मेंहेंदळे काय काय करताहेत? अमरनाथ यात्रा, हिमालयाचा पायथा, कांचनझोंगा पायथा आणि गंगोत्री-गोमुख पर्यंतची मोहीम. गंगासागर (पश्चिम बंगाल) ते गोमुख (उत्तरांचल) हे दोन हजार चारशे कि.मी. अंतर एकशे आठ दिवसांत पायी चालत पूर्ण केले. आळंदी पालखी सोहळयात पायी निरपेक्ष सेवा. २००३ ते १२ या नऊ वर्षांत प्रत्येक पौर्णिमेनंतर शनिवारच्या मध्यरात्री गणेश मळा ते सिंहगड पायथा ही सुमारे २२ कि.मी. पायी रपेट `मून लाईट वॉक' म्हणून शंभर पौर्णिमांचा संकल्प पूर्ण केला; प्रतिवर्षी प्रदीर्घ पल्लयांच्या सायकल मोहिमेत सहभाग. श्री.मेहेंदळे अजूनही पुण्याच्या गर्दीच्या रस्त्यांवरून दैनंदिन किमान २५ ते ३० कि.मी. सायकलच चालवतात.
मराठी रंगभूमीवरील त्यांचा मुक्त वावर हे त्यांचे बलस्थान आहे. त्यांच्या वडिलांनी दत्तोपंतांना सहाव्या-सातव्या महिन्यातच रंगभूमीचे दर्शन घडविले. `पुण्यप्रभाव' नाटकात कडेवर बसलेल्या तान्ह्या बाळाची भूमिका होती; ते रंगभूमीवरील प्रथम पदार्पण. त्यानंतर अनेक नाटकांतून भूमिका गाजवल्या. मराठी भाषेवर त्यांचे कौतुकास्पद प्रभुत्व आहे. त्यांचे विपुल लेखनही झालेले आहे. त्यांच्या निवडक लेखांचे `सिंहावलोकन' नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. लौकिक अर्थाने ते अल्पशिक्षित असूनही सुशिक्षित वाटतात. ते जेथे असतात, जेथे रमतात त्यांतलेच ते होऊन जातात. असे बहुआयामी पारदर्शी व्यक्तीमत्त्व फारच थोड्यांच्या वाट्याला येत असते.
श्री.दत्तोपंत मेहेंदळे यांच्या आनंदाचा पाया `तू हलत राहा',
(द.गो.मेहेंदळे यांचा संपर्क - (०२०) २४३३१२८६)
- श्रीकांत पंढरीनाथ वांकर, तपोभूमी सोसा; दत्तवाडी, पुणे-३० 
फोन-(०२०) २४३३८३३६,  ९४२२३६८९१५


Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन