Skip to main content

samp.in 14 Jan.2013


उत्पत्सते%स्ति मम को%पि समानधर्मा
कालोह्ययं निरवधिर्विपुलाच पृथ्वी ।
वैचारिक संघर्षाचीच गरज
चिपळूणला मराठी `संमेलन'नावाची साहित्यजत्रा पार पडली, संमेलनाच्या अध्यक्षपदावरून श्री.नागनाथ कोत्तापल्ले यांनी साहित्य आणि साहित्यिकांबद्दल योग्य विचार मांडले. ते जे म्हणाले त्याची मध्यवर्ती कल्पना (थीम) अशी जाणवते की, जे साहित्य प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष मांडते, तेच साहित्य-संस्कृती समृद्धीच्या दृष्टीने मोलाचे असते. कोणत्या तरी भूमिकेशिवाय साहित्य असूच शकत नाही, आपापल्या भूमिका मांडण्यासाठी साहित्यक्षेत्र हे एक रणांगणच असते.
अध्यक्षांच्या या प्रतिपादनात दुमत होण्याचे कारण नाही; मराठी साहित्यजगताचा सन्मान्य प्रतिनिधी म्हणून मांडलेले हे विचार आहेत. मात्र त्यातील `संघर्ष', `रणांगण' इत्यादी संज्ञा लाक्षणिक अर्थाने घ्यायच्या हे मात्र लक्षात ठेवण्याची गरज ठासून सांगायला हवी. त्या संज्ञा साहित्यक्षेत्राने तरी वैचारिक म्हणूनच जपल्या पाहिजेत. त्याऐवजी तथाकथित विद्रोहवाद्यांनी व ब्रिगेडियर्सनी संघर्षाची दुकानदारी मांडून शब्दश: रणांगण माजविण्याचा प्रघात निर्माण करू पाहिला आहे. त्यामुळे साहित्य, कला, इतिहास, संशोधन, प्रशासन अशा सर्व क्षेत्रात वैचारिक कलहाऐवजी वर्गकलह माजण्याची भीती वाढली आहे. तसे साक्षात रणांगण टाळायचे तर साहित्यिक - संशोधक - प्रशासक इत्यादींना एकतर त्या भडक वास्तव संघर्षाच्या मागे खेचत जावे लागते, किंवा मूग गिळून छपून बसावे लागते, किंवा मग या रणांगणापासून दूर निघून जावे लागते. विचारस्वातंत्र्याला इतके संकुचितपण येणार असेल तर मग संघर्ष तरी कुणाशी करायचा? आणि पुढे जाऊन संघर्षवादच नसेल तर ती अपेक्षित समृद्धी तरी साहित्य-संस्कृतीला कशी द्यायची? ठाम भूमिका मांडू पाहणाऱ्यांना धोंडे खाण्याची दहशत वाटत राहिली तरी भूमिकेशी ठाम राहून रणांगणात गाडून राहायला आजचे साहित्यिक म्हणजे कुणी सॉक्रेटिस - ज्ञानेश्वर नव्हेत. कोकणभूमीची श्रद्धा असणारा परशुराम हटवून `सामोपचार' करावा लागला ते योग्य होते; - की तिथे संघर्ष करायचा होता? तथापि अस्तित्त्वात असणाऱ्या कातडीबचाऊ का असेना, अशा साहित्यिकांतून ते अजरामर साहित्यिक तत्वज्ञ महात्मे निर्माण होतीलही. तितकी अपेक्षाही न ठेवता हंस-मयूरांइतकेच विहरण्यात चिमण्या-फुलपाखरांसही मुक्तांगण असलेच पाहिजे, हेसुद्धा नमूद केले पाहिजे.
साहित्य संमेलनास अजूनी जी काही प्रतिष्ठा आहे ती तरी वैचारिक साहित्य वा साहित्यिकांनी आणि सामान्य कुवतीच्या लालित्यानेही त्यांच्या त्यांच्या लेखणीतून दिली आहे. शासकीय देणगी, आमदारनिधी वा स्वागताध्यक्षांच्या समितीचे `योगदान' यांतून शोभादायी भव्यता साकारणे शक्य होते. परंतु त्यामुळे वैचारिक भव्यता, समरसता, सामंजस्य, प्रगल्भता, सहिष्णुता या अपेक्षितांवरच आघात होत असतील तर रणांगण व संघर्षांचे मोठेच तांडव होईल पण साहित्य-संघर्षांचे मंथन होणार नाही. ते भान साहित्यचळवळीने ठेवलेच पाहिजे.
प्रत्यक्षात ते भान सांभाळणे परिस्थितीपायी अशक्यच होत चालले असेल तर त्या भव्यतेचा शंभरवेळा विचार करावा. अध्यक्षांना वैचारिक रणांगण गृहीत आहे हे तर उघड आहे. जर कुणी त्या रणांगणाचा वापर लेखणीऐवजी दगड-दंडुक्यांसाठी करत असेल तर खऱ्या साहित्यिकांनी कोणती भूमिका घ्यायची हा मोठाच प्रश्न आहे. अर्थात साहित्यिकांना दंडुकी रणांगण सोसत नसेल तरीही त्यांनी लेखणी म्यान करता कामा नये. त्यांनी त्यांचे विचार, नवरसपूर्ण ललित साहित्य आणि संशोधनात्मक प्रबंधलेखन श्रद्धेने करीत राहिले पाहिजे. कारण कधीकाळी ते साहित्यसंस्कृतीच्या उपासकांना आधारभूत ठरणार आहे. आजच्या संमेलनाध्यक्षांनी अशीच ग्वाही दिली आहे की, ``जे लेखक तसे भान ठेवतील, त्यांच्या गाथा इंद्रायणीमध्ये कितीही बुडविल्या तरी त्या तरूनच वर येतील आणि कितीही काळ गेला तरी त्या वाचकांना उन्नतच करत राहतील.''
तुकारामांची सहिष्णुता त्यांच्या विद्रोही वारसदारांना पेलवणार नाही. पण त्यांचे साहित्यिक थोरपण ज्यांना जाणता येईल अशा महाराष्ट्न् सारस्वतांनी त्यांचे अनुयायित्त्व शोभेल असाच साहित्य-प्रपंच परमार्थाने करावा. रात्रंदिन युद्धाचा प्रसंग मानणाऱ्यांना संघर्ष नवा नाही, रणांगण नवे नाही परंतु अस्थानी वावदूकपणे घडणारी दंडेली मात्र असह्य वाटत असेल.
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...