Skip to main content

Samp. in 11 feb2013


सापेक्ष धार्मिकता

काश्मीरमधल्या मुलींच्या वाद्यवृंदास बंदी घालून संगीत हे इस्लामविरोधी असल्याचा आचरट शोध सांगत तिथल्या काही `खोमेनी'नी धर्माज्ञांचे उल्लेख चालविले आहेत. याही उप्पर त्या तरुण पोरींना अमानुष धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे `धर्मगुरूंनी निवेदन केलेला धर्म आपल्यास माहीत नव्हता, व त्यांचा फतवा मान्य' असल्याचे सांगत त्या मुलींनी सपशेल माघार घेतली; एकीने काश्मीरातून स्थलांतर केले. त्या `धर्मनेत्यां'च्या चापलुसीचा विजय झाला. त्यांचा जो बोलविता धनी वेगळाची असेल त्याचाही डाव यशस्वी झाला. मात्र त्या मुलींची माघार म्हणजे त्यांचा पराभव नव्हे. तर हा भारतीय सरकारच्या नेभळटपणाचा पराभव आहे.
त्या सामान्य स्थितीतल्या तरुण मुली माथेफिरूंशी संघर्ष करू शकणार नाहीत. माथेफिरूंपुढे हतबल असलेले सरकार व त्याचे प्रतिनिधी किंवा पोलिस-लष्करादी दळे काही प्रतिकारच करत नाहीत, अशा स्थितीत सामान्य जनतेने जीव सांभाळून राहण्यासाठी असल्या धर्माज्ञेस शरण जाण्याशिवाय कोणता मार्ग आहे?
काश्मीरचे राज्य सरकार वा केंद्रातले सरकार एकवेळ बाजूला राहूदे; पण पुरोगामित्त्वाचा आणि धर्मनिरपेक्षतेचा ज्यांनी स्वयंनियुक्त पत्कर घेतलेला असतो त्या संघटना, पक्ष आणि विचारवंत यांनी यावेळी उशीत तोंड खुपसल्याचे जाणवते हे अधिक झोंबणारे आहे. त्यांच्या विचार चिंतनातून पाझरणाऱ्या पुरोगामित्त्वाच्या मर्यादा, केवळ स्वधर्म आणि स्वसंस्कृती झोडपण्यात शौर्य मानतात. वास्तविक राज्यसरकारनेच अशा कोणा मुल्ला-मौलवींचा बंदोबस्त करायला हवा, पण ते मुख्यमंत्री तर सावध-मृदू निषेधाचे विवेचन टि्वटर-ब्लॉगवरती लिहून याही डगरीवरती हात असल्याचे वरदेखलेपण करतात. कदाचित इकडले धर्मसापेक्ष असणारे हिंदूविरोधी मुखंडही त्यांच्या हातास हात लावतील. मातीच्या नागोबा-मूर्तीवर सचैल अभिषेक करता येत नाही म्हणून फुलाच्या पाकळीने चार थेंब शिंपडावेत, तसा त्यांचा हा आबदार निषेध, पुष्कळदा प्रयत्न करूनही समजू शकत नाही.
याउलट गृहमंत्र्यांचे निवेदन रा.स्व.संघावर बेफाट आरोप करणारे प्रसिद्ध झाले, त्यावर ही पुरोगामी विचारवंत मंडळी पटकन विश्वास ठेवतात. संघाला हिंदुत्त्ववादी म्हणणेसुद्धा काहीवेळा धाडसाचेच ठरावे; पण अधिक क्लेष होतो तो स्वत्त्वाशीच संघर्ष करणाऱ्या दांभिक पुरोगामित्त्वाचा. काश्मिरी मुलींच्या बाजूने प्रत्यक्षात, धर्मनिरपेक्ष म्हणविणाऱ्या संघटना व पक्षांनी झोड उठवायला हवी. ज्या राज्यांत त्यांची सरकारे आहेत तिथे, उपटसुंभ धर्ममार्तंडांपासून संरक्षण देत, या मुलींचे कार्यक्रम घडवून आणायला हवेत, तसे सहर्ष घोषित करावे. यालासुद्धा त्या सामान्य घरच्या मुली तयार होतील अशी भीतीपोटी खात्री नाही. परंतु निदान पक्षपाती काश्मीर सरकारच्या विरोधात योग्य तो संदेश त्यातून जाईल. याहीमुळे त्या कोणा मौलवींना `जितं मया' असे वाटेल, व काश्मिर हे इस्लामी राज्य ते म्हणवतील; त्याला आमचे करंटेपण म्हणण्याशिवाय करणार काय?
काश्मीरात, ईशान्य भारतात, गडचिरोली भागात स्वातंत्र्य किती आकसून गेले आहे, हे या घटनेवरून कळते. त्यास एक मौलवी किंवा त्याचा धर्म कारणीभूत नाही. गडचिरोलीत ग्रामपंचायतीला उभारण्यासाठी तळहाती शिर घेण्याचाच प्रकार घडतो आहे. तिथे हीच मुजोरी नक्षलवादी हिंदूंमुळे सहन करावी लागते. पण मालेगाव स्फोट किंवा तत्सम घटना वर्षानुवर्षे रटत राहून ते सिद्ध होण्याची वाट न पाहता हिंदुत्त्वाला निरपेक्षतेचे डोस पाजत राहण्यात पुष्कळांना पुरोगामित्त्व वाटते, आणि राममंदिरासाठी विटा गोळा करण्यात पुष्कळांना हिंदुत्त्वाचे सार्थक वाटते.
सहिष्णुता हे तर हिंदुत्त्वाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. परंतु सहिष्णुता म्हणजे दुबळेपण नव्हे, आणि घरभेदे पुरोगामित्त्वही नव्हे. इतर धर्मपंथांचा सन्मान मूलभूत असला पाहिजे. तथापि `इतरां'साठी स्वत:च्या धर्माकडे न्यूनता घेण्याचे सुतराम कारण नाही. आपल्या राज्यघटनेने निरपेक्षतेचे तत्त्व अंगिकारले ते निष्ठेने व श्रद्धेने जपले पाहिजे. परंतु `समाजवादी' नाव मिरविणारे उत्तर प्रदेशचे सरकार अलाहाबादच्या कुंभमेळयाच्या स्वागत जाहिराती देते, महाराष्ट्नतल्या देवस्थानच्या महापूजा इथले मुख्यमंत्री बांधतात, आणि निवडणुकीत मतांचे जातवार हिशेब करत उमेदवारी वाटतात. त्यांनी धर्माच्या नावाखाली काश्मीरमधील मुलींच्या संदर्भात चाललेला वात्रटपणा कठोरपणी मोडण्यासाठी सर्वत्र घमासान उठवून काश्मीर व केंद्रसरकारवर दबाव आणला पाहिजे; तशी शक्यता नाही. मौलवींच्या वागण्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे धर्मस्वातंत्र्य देणे नव्हे; हिंदूंना विरोध म्हणजे धर्मनिरपेक्षता नव्हे; आणि हिंदू परंपरांचा व समाजधारणांचा सतत पाणउतारा करणे म्हणजे पुरोगामित्त्व नव्हे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. राज्यघटनेच्या आधारे धर्मनिरपेक्षतेच्या चाकोरीवर राज्यशकट चालविण्याऐवजी धर्मांधतेचे संघर्ष पेटवत ठेवून या शकटातून स्वार्थी सैर करण्याचे धोरण इथल्या राज्यकर्त्यांनी अवलंबिले आहेे, त्यामुळे `काळ' सोकावतो आहे त्याचे वैषम्य वाटते.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन