Skip to main content

Lekh on B. D. Tilak


डॉ.बी.डी.टिळक : स्थितीशी संघर्ष
कहाणी सुमारे १५० वर्षांपूर्वीची. एकत्र कुटुंबपद्धत होती. एकमेकांच्या मदतीला धावून जात. एका माऊलीचे यजमान चार लहान मुले पदरात असताना निवर्तले. माऊलीला भावाने आश्रय दिला. भावाला दोन लहान मुले होती. त्याच्या तिसऱ्या मुलाचा जन्म झाला पण दहा दिवसाचे आतच बाळंतीण भावजयीचे निधन झाले. माऊलीने आपल्या व भावाच्या परिवाराचा भार उचलला. माऊलीचे शेंडेफळ अंगावर पीत होते. माऊलीने नवजात अर्भकालाही स्वदूध देण्यास सुरुवात केली. दु:खी वातावरण असल्याने नवजाताचे बारसे झाले नाही. त्याला सर्वजण `बाळ'या नावाने संबोधू  लागले. `बाळ'ने स्वत:चे नाव बाळकृष्ण सांगण्यास सुरुवात केली. ही माऊली म्हणजे माझ्या आईची आई - माझी आजी.
बाळ अतिशय हुशार. त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात उत्कृष्ट गुणांसह पदवी मिळविली आणि टाटांची शिष्यवृत्ती घेऊन इंग्लंडला प्रयाण केले. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून डॉक्टरेट मिळविली. त्यांचे सहाध्यायी डॉ.वुडवर्ड हे नोबेल प्राईझचे मानकरी होते. हे आमचे बाळमामा - डॉ.बी.डी.टिळक. भारताचे ललामभूत शास्त्रज्ञ. महान देशभक्त. परदेशात चांगल्या संधी असूनही आपल्या देशबांधवांना आपल्या ज्ञानाचा लाभ मिळावा म्हणून भारतात परतले. मुंबई विद्यापीठात असि.प्रोफेसर म्हणून रुजू झाले तेव्हा ते सायकलवरून जात असत. स्वकर्तृत्त्वावर पुण्याच्या राष्ट्नीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेचे डायरेक्टर झाले. ते कार्यरत असताना एन.सी.एल.ने रजतजयंती साजरी केली, त्यासाठी तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी आल्या होत्या. डॉ.टिळक यांचे पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत भाषण झाले ते ऐकण्याचे मला भाग्य लाभले होते.
त्यांच्या मृत्यूप्रसंगीचे शल्य मला आजही टोचते. त्याचे असे झाले - त्यांची दुसरी हृदय शल्यक्रिया मुंबईच्या प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये झाली. तिथेच त्यांचे निधन झाले, त्याची वार्ता त्यांच्या पत्नी व मुलाला दुपारी तीन वाजता सांगण्यात आली. केसपेपरवर १२.३० ला निधन झाल्याची नोंद होती. सर्व सोपस्कार करून पार्थिव पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता आले. डॉ.टिळकांच्या निवासस्थानी विद्यापीठातील व एन.सी.एल.मधील शास्त्रज्ञ वगैरे मोठमोठी मंडळी जमली होती. पार्थिवासह दुपारी १ च्या सुमारास `वैकंठ'ला पोचलो. दाहिनीचा वीजपुरवठा बंद होता. चौकशी करता सांगण्यात आले,`अर्ध्या तासाने वीजपुरवठा चालू होईल.' दोन-अडीच तास झाले तरी अर्ध्या तासाचे पालुपद सुरू होते.
मी वीजमंडळातून कार्यकारी अभियंता म्हणून निवृत्त होतो, पण आता मला कोण ओळखणार? ऑपरेटर म्हणाला,``अजून परमिट आले नाही त्याशिवाय वीज चालू करता येणार नाही.'' ऑपरेटरने जोशीसाहेबांना फोन जोडून दिला. मी विचारले,``आपण सिस्टीम इंप्रुव्हमेंट सर्कलला होता काय? मी केळकर बोलतो आहे.'' मी परिस्थिती सांगितली. गेलेली व्यक्ती व जमलेल्या व्यक्तींचे थोरपण सांगून गांभीर्य कळविले. `ऑपरेटरला फोन द्या.'' जोशी म्हणाले. जोशीसाहेबांनी त्त्वरित सूत्रे हलविली. वीजपुरवठा सुरू झाला. सर्व मंडळी पार्थिव घेऊन दाहिनीजवळ थांबली होती. मी शेवटचे अभिवादन केले.
- दि. वि. केळकर
३२,श्रीलेखा सोसा.,कोथरुड, पुणे - ३८
फोन (०२०)२५४४६५५२, ९४०३७६९१६४

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन