Skip to main content

Sampadkiya in 4 Feb.2013


लाक्षागृहमंत्री
श्री.राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष झाले आणि त्याच वेळी पक्षाचे किंवा खरे तर सोनिया गांधींचे पाईक असणारे गृहमंत्री, राष्ट्नीय स्वयंसेवक संघावर घसरले. देशाच्या गृहमंत्र्याने ज्या उथळपणाने विधाने केली ती ऐकल्यावर आपल्या गृहस्थितीची ग्रहदशा झाल्याचे जाणवते.

रा. स्व. संघाकडून अतिरेकी कारवायांसाठी प्रशिक्षण केंद्रे चालविली जातात असे अहवाल प्राप्त झाले असल्याचे गृहमंत्री म्हणतात. त्यावरती त्यांच्या पक्षातील वाचाळ प्रवक्त्यांनी समर्थक चिंता मांडली, पाकिस्तानी उचापतखोर संघटनांनी याच शब्दांचा आधार घेऊन आजवर त्यांना उगीचच दोषी ठरविल्याची मुत्सद्देगिरी दाखविली, आणि इतर अनेकांनी टीकाही केली. खुद्द संघाचा प्रखर विरोध एकवेळ बाजूला ठेवला तरी इतरांनी इतपत जी दखल घेतली, त्यानंतरही गृहमंत्र्यानी त्या विधानापासून माघार घेतली नाही, विपर्यास केल्याचा आक्षेप मांडला नाही, अगर मी असे म्हणालोच नव्हतो असे सांगण्याची प्रथाही पाळली नाही. त्यावरून ते त्यांच्या म्हणण्याशी चिकटून आहेत असे दिसते.

देशापुढील एकंदर समस्यांच्या पर्वतापैकी उघड वा छुप्या अतिरेकी कारवायांचा वाटा फार फार मोठा आहे. संसदेवर किंवा मुंबईच्या स्थानकावर बाँब-गोळयांचा बेछूट मारा होण्यापासून बनावट नोटा प्रसारात आणण्यापर्यंत, आणि येथील व्यवस्था व समाजधारणांबद्दल तिरस्कार निर्माण करण्यापर्यंत होणाऱ्या कारवाया देशाच्या दृष्टीने अतिरेकीच आहेत. यापैकी ज्या कारवाया रा.स्व.संघ करत असेल तर त्या गृहमंत्र्यांनी सप्रमाण उघड करायला हव्यात. इतकेच नव्हे तर अशी केंद्रे जिथे चालत असल्याचे खात्रीशीर अहवाल असतील तिथे त्यांच्या पोलिसदलांनी घुसून ती उध्वस्त करायला हवीत. ते करण्याऐवजी स्वत:च्या पक्षाच्या स्वैपाकघरात उभे राहून त्यांना `मिळालेले' अहवाल सादर करण्याचा पराक्रम गृहमंत्र्यांनी करावा इतपतच त्यांचा शूरपणा दिसतो. प्रजासत्ताकदिनास मोठ्या हल्ल्याची शक्यता वाटल्यामुळे सर्वत्र विमाने आणि अस्त्रे जी अस्मानातून भिरभिरत ठेवली होती त्यांची तरी काय गरज होती? तशा भीषणतेचे, संघाकडून भीतीचे `अहवाल' असतील तर झंडेवाला, रेशीमबाग, मोतीबाग अशा काही संघकेंद्रांच्या दारावर एकेक भोंगळ सखाराम उभा करून काम भागले असते.

ज्यांनी प्रत्यक्षात अतिरेकी हल्ले केले, त्या शेजारी देशाकडे सज्जड पुरावे देऊनही त्यांची परराष्ट्न्मंत्री बाई त्यांना जुमानत नाही आणि इथले शेंदाडशिपाई मुत्सद्दी, घरच्याच म्हातारीचे काळ बनणारी विधाने करतात याचा राग-त्वेष-द्वेष न वाटता आता हतबल उद्वेग वाटू लागतो. राजकीय प्रचारतंत्र म्हणूनही त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही कारण ही बडबड कोण्या निष्ठावंत सदू-महादूने प्रचारसभेत केलेली नव्हे. गृहमंत्र्याकडे प्राप्त झालेच असतील, आणि ते इतके गंभीर अहवाल जर केवळ `चिंतन-शिबिरा'पुरते प्रकट होत असतील तर गृहखात्यातल्या हेरांनी जीव धोक्यात घालून ते तयार करावेत तरी कशाला? स्वत:च्या देशात चालणारी केंद्रे, खात्रीशीर अहवाल मिळूनसुद्धा सुखेनैव पुढे चालूच राहात असतील तर गृहमंत्र्यांचे काम म्हणजे केवळ चिंतन शिबिरांना आणि स्वत:च्या जिल्ह्यातील लावणी-स्पर्धांना उपस्थित राहणे इतकेच शिल्लक उरते की काय!

गृहमंत्र्यांच्या या उफराट्या विधानांचा अचूक उपयोग पाकमधील अतिरेकी म्होरक्यांनी करून दाखविला. त्यांच्या म्हणण्यानुसार गृहमंत्र्यांनीच जाहीरपणे रा.स्व.संघ अतिरेकी केंद्रे चालवितो हे कबूल केले, आणि आजवर त्या परस्थ टोळयांवर उगाचच दोषारोप केले गेले. हा तर बिनतोड तर्काचा युक्तिवाद आहे आणि तो जगापुढे मांडण्यास आमच्याच गृहमंत्र्यानी सोय करून दिली. शाहरुख खानने बारीकशी कळ लावण्याचा उपयोग करून पाकिस्तानने त्यास पुरेसे संरक्षण देण्याची भारताकडे मागणी करावी हा भोचकपणाही दाद देण्याजोगा आहे. अजमल कसाब हा साक्षात् अतिरेकी आपल्या देशाचा नागरिकही नव्हे असे धडधडीत ठोकून पाकिस्तान त्या कारवाया आणि केंद्रे पाठीशी घालतो; आणि आमचे गृहमंत्री इथल्याच एका संघटनेस अतिरेकी ठरवून मोकळे होतात ही मौज तरी कशी म्हणावी?

जयपूरच्या चिंतन शिबीरात श्री.राहुल गांधी यांना पक्षाचे उपाध्यक्ष केल्यानंतर त्यांच्या काही `कुटुंबवत्सल' स्तुतिपाठकांनी त्यांची तुलना बराक ओबामांशी केली. त्यातला विनोद सोडला तरी ओसामा लादेनला संपविण्यासाठी ओबामांनी पाकिस्तानात घुसून केेलेली कारवाई डोळयासमोर घेण्यास तरी त्यांस सांगायला हवे. लादेनवरचा हल्ला यशस्वी करण्यास जेवढी तयारी करावी लागली ती करणे, आवेशपूर्ण भाषणाकरिता केवळ अस्तन्या सावरण्याइतके सोपे नाही; त्याचप्रमाणे संघावर बेछूट आरोप करण्याइतकेही ते सहज शक्य नाही. त्यामुळे या उच्चपदस्थांच्या आरोळयांपुरताच हा पराक्रम सीमित राहणार इतकेच जनतेने समजून घ्यायला हवे. ओबामांचे राजकीय विरोधक ओम्नी यांच्याशी निवडणूक लढाई जिंकल्यानंतर त्या प्रतिस्पर्ध्याविषयी ओबामांनी जे गौरवाचे उद्गार काढले ते वाचले तर गृहमंत्री वा पक्ष-उपाध्यक्षांचे भाट यांना यापुढे काहीतरी उपरती होऊ शकेल. परंतु ती सहिष्णुता म्हणजे कदाचित हिंदुत्त्व ठरेल या भीतीपोटी ते होणार नाही. तोपर्यंत या निरपेक्ष नेत्यांनी सोडलेल्या वाफांचे चटके जनतेला सहन करावे लागणार!
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन