Skip to main content

sampadkiya of 25 april2011

गाभारा देवीचा राहो
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात यापुढे महिलांनाही प्रवेश राहील. यासाठी वास्तविक आंदोलन करावे लागावे हेच कालविसंगत आहे. परंतु शासन-प्रशासन क्षेत्रातील राजकीय मंडळींच्याच हाती प्रश्न गेल्यावर धडकमोर्चा, डांबरफासो, हल्लाबोल याशिवाय गत्यंतर नाही. दुसरे हेही खरे की, आंदोलनाचा नारा घुमेपर्यंत हा असा काही प्रश्न आहे असेही  फार कुणाच्या गावी नव्हते. कोल्हापूरचे शाहू छत्रपती-फुले-आंबेडकर यांचा त्रिकाल जप करून स्वत:भोवतीच फट्कारी सोंगाचे पुरोगामित्त्व घुमवणारे पक्ष व संघटनांऐवजी अंबाईच्या गाभाऱ्यात घुसखोरी करणारे भाजप आणि मनसे हे तथाकथित जातीयवादी पक्ष, आणि पुष्कळशा `ब्राह्मण्यवादी' महिला हे पुढे होते. पुजारी, देवस्थान मंडळ, जिल्हाधिकारी हेही सर्व `ब्राह्मण्यवादी' असून त्यांनी सामोपचाराची भूमिका घेऊन फार न चिघळता योग्य बदल अनुसरला.
एकंदरीत जी गोष्ट झाली ती स्वागतार्ह आहे. पंढरपूरच्या सार्वजनिक मंदिरप्रवेशासाठी (पुन्हा `ब्राह्मण्य'च) साने गुरूजींनी उपोषण केले त्याला पाचसात दशके उलटली. त्या काळात मंदिरप्रवेश करीत असलेला अस्पृश्य कसा ओळखू येई असा एक प्रश्न राहतोच. पण ती काळस्थिती आज कल्पनेने जाणली तरी चार लढाऊ पुरोगामी नेते घेऊन घुसखोरी करण्याचे साने गुरुजींना सुचले नव्हते; त्यांनी प्राणान्तिक उपोषण आरंभिले. पुष्कळ धार्मिक ठिकाणी हा सामाजिक विसंवाद आजही चालू आहे. मुस्लिम प्रार्थनास्थळी नमाज पढायला महिला कधी दर्ग्यात नसतात; कुठलाच धर्म-पंथ असल्या अतार्किक रूढींमधून सुटलेला नाही. पूर्वास्पृश्यांना मंदिर प्रवेश सुकर झाला हे तर उत्तमच, परंतु गावोगावच्या जत्रांमधून त्या त्या देवदेवतांकडे त्यांच्याच जातीतील स्त्रियांना आजही प्रवेश नसतो. स्त्रियांकरवी पूजा संमत नसते, स्त्रियांनी नारळसुद्धा फोडायचा नसतो. समानतेच्या लाटेचे पाणी स्वत:च्या पायरीला लागू न देण्याचे कौशल्य दाखविणारी ही आंदोलने म्हणूनच क्रांतिकारी नव्हेत तर निव्वळ राजकारणी उचापतीची आहेत. अर्थात त्यायोगे देवीचा दरवाजा सर्वांसाठी उघडला हे बरे झाले.
देवत्त्व हे मुख्यत: पावित्र्य, मांगल्य आणि सद्भाव यांचे द्योतक असते. त्याचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्ताच्या अंगी निव्वळ साहचर्यातून ते गुण येऊ शकतात असे मनोविज्ञान सांगते. तथापि त्यासाठी भक्तही आपापल्या मनोभावानुसार आपल्या देवाचा स्वभाव व रूप ठरवीत असतो. तामसी भक्ताला जीभ बाहेर काढून डोळे वटारणारा देव पूजनीय वाटतो. सौम्यशीतल वृत्तीला कमलनेत्रही अर्धोन्मीलित असणारी आशीर्वचनाचा हात देणारी देवता प्रिय वाटते. देवतेलाही स्थलकालस्थिती-सापेक्षता असते. खरा देव केवळ भावाचा भुकेला असेलही पण भक्ताच्या सामर्थ्यानुसार त्याला समाजात भाव मिळतो. म्हणूनच भावखाऊ भक्तांना आपला भाव वाढविण्यासाठी अशी श्रेयदायी आंदोलने करावी लागतात.
पंढरीच्या पांडुरंगाचे पाय भक्तांचा माथा टेकून टेकून झिजू लागले. सततच्या पंचामृती अभिषेकाने रासायनिक परिणाम होऊ लागला. अशा कारणांनी तिथे भक्तांवर बंदीच घालावी लागली. कोल्हापूरचे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे मंदिरही रासायनिक थर (कोटिंग) देऊन घेण्यात गैर नव्हते. मुख्य म्हणजे शिखर असो, गाभारा असो किंवा पायीची पायरी असो....ते जितके पुरातन तितके श्रद्धापात्र असते. परंतु एक इमारत म्हणून ते चिरंजीव असू शकत नाही. त्याचप्रमाणे त्या त्या काळातील घटना, श्रद्धा, रूढी, परंपरा, समजुती याही चिरंतन असण्याचे कारण नाही. आक्रमकांनी मूर्ती आणि देवळे भग्न करायचा सपाटा लावल्यावर देव कुठे भुयारात - दरीत - डोंगरात नेऊन ठेवणे भाग पडले; तशा एखाद्या घटना-प्रसंगातून काहीतरी प्रथा पडतात. त्या मन:पूर्वक पाळल्या जात असतील तर कुणी हरकत घेण्याचे कारण नसावे. काळानुसार तितकी प्रगल्भता आल्याचे मान्य असेल तर त्या प्रथा कवटाळून बसण्याचेही कारण नाही. तथापि त्यासाठी जनजागरण, प्रबोधन, प्रयोगशीलता हे मार्ग  आहेत. धडकमोर्चा हा मानवी रिवाज नाही, ती रीत वेगळया प्राण्याची आहे. असल्या धडकांनी श्रद्धा डळमळीत होत नाहीत, मग त्या डोळस असोत की अंध असोत. उलट समाजात सत्शील  टिकविणाऱ्या अंधश्रद्धाही वैज्ञानिक दृष्टीने उदार मनाने  सोसल्या पाहिजेत. शनी शिंगणापूरला चोरी करणाऱ्याला `भोगावे' लागते, त्यामुळे दाराला कुलूप नसते म्हणतात. ही अंधश्रद्धा मोडून काढण्यासाठी चोरी करून दाखविण्यात कसली आधुनिकता अन् कसली वैज्ञानिकता?
महिलांना समान अधिकार आणि हक्क देण्यापेक्षा त्यांच्या समानतेसाठी कर्तव्य आणि जबाबदारी घ्यायला हवी. समानता म्हणजे पुरुषी वागणे नव्हे. गाभाऱ्याची झीज होत असेल तर पुरुषांनाही प्रवेश बंद करावा, आणि एकदा शुचिर्भूत शरीराने पूजाभिषेक झाल्यानंतर पुजाऱ्यांनीही गाभाऱ्यात जाऊ नये. परंतु इतकी सार्वत्रिक समानता व वैज्ञानिकता पेलवणे कठीण आहे कारण हे प्रश्न केवळ शास्त्रार्थ, तर्क, विज्ञान व कालानुरूपता इतक्यावर तोलले न जाता त्यात राजकारण, चरितार्थ, प्रतिष्ठा, अहंता असे मानवी पैलूही असतात. आपल्या धर्मकथांतील देवादिकांस ते चुकले नाहीत मग हे आंदोलक तर मर्त्य मानव. त्यांना भक्तांच्या मुक्तीपेक्षा आणि देवीच्या भक्तीपेक्षा आपल्या कुरघोडी शक्तीचे जास्त महत्त्व!

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन