Skip to main content

marketing method

मार्केटिंग पद्धती सकाळी लवकर फिरायला बाहेर पडून बोळकांडीतून मोठ्या रस्त्याला लागलं तर तिठ्ठ्यावर चतकोर भाकरी-लिंबू-मिरची वगैरे कुणी त्रस्त समंधानं ठेवलेलं दिसतं. अमावास्या लक्षात येते. पुढचा मैलभर रस्ता विरळ होत गावातून बाहेर पडतो, तिथवरच्या प्रत्येक दहावीस पावलांवर ही आरास दिसते. झुंजुमुंजू दिसू लागल्यामुळं रस्त्याची माणसं ही बला चुकवीत पाय टाकत असतात. पूर्वी पिचत् कुठंतरी केव्हातरी हा उतारा दिसायचा. हल्ली त्याचंही प्रमाण खूप वाढलं आहे. सध्या सगळयाच गोष्टींना मार्केट चांगलं आहे म्हणतात; त्यामुळं अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ जोरात आहे, शनीशिंगणापूरच्या चौथऱ्यावर चढूनच देवदर्शन करणारी हट्टी आंदोलनंही जोरात आहेत, आणि ही उतारे-मंतराची दृष्टही खूप फोफावली आहे.
 महामार्गावर गाडी टोलनाक्यावर थांबली, तशी आरडाओरड करत वस्तूविके घोंघावत येतात. त्यात शनिवार-अमावास्या असेल तर मिरची-लिंबू माळा लोंबत पुढे आणणारी पोरं खूप असतात. महामार्ग वाढले, कार-वाहनं वाढली, तसं हे लिंबू-मिरचीवालेही वाढले. एकदा कोल्हापूर-पुणे महामार्गावरच्या टोलनाक्याशी रांगेत थांबलो तर तीन-चारजण तसल्या माळा घेऊन भोवती आले. आमच्या गाडीत एका संस्थेच्या अभ्यासाला आलेल्या हॉलंडमधल्या दोन तरूण पोरी होत्या. त्यांनी त्यातल्या दोन माळा हातात घेतल्या. त्यांना वाटलं, ही भाजी विकायला आली आहे. भाजी टवटवीत राहण्यासाठी अशी टांगून ठेवण्याची कल्पना त्यांनी `ओह, वंड%फूल - फाईन, सो ईझी' असं म्हणत दाद दिली. त्यांना काय आणि कसं सांगायचं हा प्रश्नच होता. मग `नो मून डे', `दे फील फीअर...' असं करत करत त्यांच्या गोंधळात भर टाकली. त्यांना मात्र या भानगडीची लागण होण्याचा संभव कुणालाही वाटला नाही, कारण त्या या देशीच्या नव्हेत, त्यांना यातलं काही ठाऊक नाही, यावर गाडीतल्या बाकी सर्वांचं मराठीत एकमत झालं. ते जे कोणी भूत, मुंजा, समंध, लागीर असेल ते परदेशी गोऱ्या लोकांच्या वाटेला जात नसावे. तेही परधार्जिणं! या माळा सरसकट पाच रुपयाला नव्हत्या. त्यातही जास्त-कमी किंमतीचा माल होता. जादा पाच मिरच्या व टपोरं लिंबू असेल तर भाव जास्त होता. एक मिरची,  हळकुंड (असावं) अशी विविधता काहीजणांकडं होती. एकानं इंचभर आकाराच्या छोट्या चपला दोऱ्यात ओवून आणल्या होत्या तर दुसऱ्याकडं उलट्या टांगायच्या काळया बाहुल्या होत्या, त्यातही लहान-मोठे किंवा हलके-भारी वगैरे मार्केट पॉलिसी होतीच.
 एका शहराचा सराफा म्हणजे `काय  सांगावं महाराजा' असा अनुभव असतो. ही खाऊ गल्ली रात्री नऊच्या पुढं खादीसाठी गजबजते. एका मुक्कामात मुद्दाम त्या वाटेला गेलो. त्या गल्लीच्या आधीपासूनच पायात या मिरच्या-लिंबू उतरून रस्त्यात टाकलेल्या. आजपर्यंतच्या सवयीमुळे ही पीडा चुकविण्यासाठी सुरुवातीला जरा खो खो खेळत पावलं मागं-पुढं टाकून पाहिली. पण तसं किती वेळ करणार? हळूहळू तो मिरचीचा सडा दाट होत गेला. आजूबाजूची लोकं ते सगळं तुडवत बिनधास्त चालली होती हे मी पाहून त्यांच्यासारखा सरळ चाललो. त्यांच्यासारखंच दुर्लक्ष करू लागलो. हे लागीर अंगावर उतायचं असेल तर त्याच्या वाटणीला आपण काही एकटेच येणार नाही. किती टाळलं तरी पायातला मिरची-लिंबू सडा डोळयात इतका खुपत होता की, त्या कोण्या शनी-समंधाला माझीच दृष्ट लागायची!
  रस-रंग-गंधासह या सराफ्याचा आस्वाद घेऊन तृप्त मनाने मध्यरात्री मुक्कामी झोपलो. सकाळी लवकर उठून जवळच्याच गल्लीनं परतीच्या प्रवासाला ऑटोरिक्षातून चाललो. त्यावेळी नगरपालिकेचे सफाई कामगार खराटे-फावड्यांनी ते सगळे उतारे ढिगाऱ्यांनी त्यांच्या कचरा-गाडीत भरत होते. तुडवा झाल्यामुळं त्या सगळयाची रया गेलेली होती, त्याचा तजेला जाऊन निव्वळ मातेरे झाले होते. पाट्या-पाट्या भरून ही घरातली इडा-पीडा बाहेर फेकायला नेत होते.
 देवाची मूर्ती भक्ताच्या शक्तीनुसार लहान मोठी होते. तसे त्याचे भक्तोपचारही ठरतात. कुणाला बिनवासाचे रानटी फूल पुरते तर काही देवांना गुलाबगेंद व निशिगंधाचे गजरे मिळतात. दुसऱ्या सकाळी सगळयांचे निर्माल्य एकाच गाडीत भरायचे. तसाच प्रकार या भुता-खेतांचाही असतो. `देव-दानवा नरें निर्मिले' हे केशवसुतानी म्हटले. ही निर्मितीच माणसाची असल्यामुळं मागणी, पुरवठा, टंचाई, दरवाढ हे मार्केटचे नियम दोघांनाही लागू होणारच. मिरची लिंबूच्या माळेला पलिटी, साईज प्रमाणं दर असणार. आपण त्यांचे व्यवहारी रिवाज ओलांडून न जाता शक्यतो आपलं पाऊल चुकवावं हे बरं!

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...