Skip to main content

geeta tatparya

आद्य शंकराचार्य आणि लोकमान्य टिळक यांचे गीतातात्पर्य  आद्य शंकराचार्यांच्या संदर्भामध्ये लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्यावर सांप्रदायिक टीकाकारांनी जी टीका केली आहे त्यामध्ये एका परिमाणाचा विचार केलेला नाही. ते परिमाण म्हणजे आद्य शंकराचार्यांचा गीतातात्पर्य निर्णय आठव्या शतकातील असून लोकमान्यांचा १९ व्या शतकातला आहे. जवळजवळ ११ शे वर्षांचे अंतर आहे. परिस्थितीत बदल नक्कीच झालेला आहे. आद्य शंकराचार्यांच्या वेळेला बौद्ध जीवनपद्धतीचा परिणाम होता तर टिळकांच्या काळामध्ये ब्रिटीश सत्ता होती. म्हणून आद्य शंकराचार्यांच्या समोरचा प्रश्न हा बौद्ध प्रभावाचे निर्मूलन करून वैदिक धर्म व संस्कृतीची पुनर्स्थापना करणे हा होता तर लोकमान्यांची समस्या परकीय सत्ता परास्त करून स्वराज्य संस्थापनेचा होता. म्हणून कर्मसंन्यास हे गीतेचे तात्पर्य म्हणून आद्य शंकराचार्यांनी प्रतिपादन केले तर लोकमान्यांनी कर्मयोग हे तात्पर्यसुद्धा काळाची आवश्यकता म्हणून प्रतिपादन केले.
 बौद्ध भिक्षूंच्या संन्यस्त जीवनाचा प्रभाव वैदिक धर्मियांवर पडून मिमांसकांच्या वैदिक कर्मकांडाचा प्रभाव निष्प्रभ झाला होता. वैदिक धर्म आणि संस्कृती यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आचार्यांनी कर्मसंन्यास म्हणून गीतेचे तात्पर्य सांगितले.
 विविध कारणांनी नैष्कर्म्य स्थितीत गेलेल्या भारतीय लोकांना स्वराज्याभिमुख करून स्वातंत्र्यचळवळीमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी लोकमान्यांनी गीतेचा कर्मपर अर्थ लावला. प्रत्येक विचारवंत आणि त्याचा काळ परस्परावर परिणाम करतात हे नक्कीच. म्हणून शंकराचार्यांचा कर्मसंन्यास व लोकमान्यांचा कर्मयोग हा त्यांच्या काळानुरूप आणि प्रसंगोपात् प्रसंगोचित होता. ज्ञानेश्वरांनी बौद्ध, जैन मताच्या महाराष्ट्नतील १२ व्या शतकातील प्रभावाला प्रत्युत्तर म्हणून गीतेचा भक्तिपर अर्थ लावून सगुणब्रह्म ईश्वर विठ्ठलाचीच भलावण केली. तीही त्यांच्या काळाची गरज होती. म्हणून कुरुंदकर  म्हणतात की गीतेला काय अभिप्रेत यापेक्षा आचार्यांना आवश्यक तो अर्थ आचार्यांनी लावला, तेच ज्ञानेश्वर, लोकमान्य यांनी केले.
 दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा, आचार्य व लोकमान्य यांच्यात मतभेद किती यासंबंधी खुद्द लोकमान्यांनी केसरीत निवेदन केले की, आचार्यांचा ब्रह्मसिद्धांत मी मानतो, मायावाद मी स्वीकारतो फरक एवढाच की आचार्य ज्ञानोत्तर कर्म नाकारतात, अनावश्यक मानतात आणि मी ते लोकसंग्रहार्थ आवश्यक मानतो. यामध्ये ही बाब फार महत्त्वाची अशी लक्षात ठेवली पाहिजे की ज्ञानोत्तर कर्म केल्याने मोक्षास बाधा येत नाही.
 सांप्रदायिकांनी आचार्य आणि लोकमान्य यांच्यातील भेदाला फार मोठे स्वरूप दिले. लोकमान्यांनी गीतारहस्यामध्ये युरोपिय नीतिशास्त्राचा ऊहापोह केला आहे त्याची दखल कोणत्याही सांप्रदायिक गीतारहस्याच्या टीकाकारांनी घेतली नाही. ती डॉ.गुरुदेव रानडे यांनी घेतली हेही विशेष आहे.
 वास्तविक अर्जुनाने लढणे हे योग्य की अयोग्य, या प्रसंगी त्याचे कर्तव्य काय? हा प्रश्न, आणि अर्जुनाला मोक्ष कसा व कोणत्या मार्गांनी मिळेल? हा प्रश्न, हे दोन्ही स्वतंत्र प्रश्न आहेत.
 ते एकत्रित केल्याने गीतातात्पर्य निर्णयासंबंधी मतभिन्नता निर्माण होते. तरीसुद्धा प्रवृत्ती मार्ग निष्काम बुद्धीने केल्यास चित्तशुद्धी होऊन ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो असा निर्वाळा खुद्द आचार्यांनी त्यांच्या गीताभाष्येच्या प्रारंभी दिला आहे. याही दृष्टीने पाहता आचार्य आणि लोकमान्य यांच्या गीतातात्पर्य निर्णयामध्ये फारसे अंतर नसून तो प्रश्न भर कशावर आहे याचा आहे. आचार्य भर ज्ञानोत्तर कर्म करण्यावर देतात तर लोकमान्य ज्ञानोत्तर कर्मयोगावर भर देतात.
 यातून दोन निष्कर्ष प्राप्त होतात. लोकमान्यांचा गीतातात्पर्य निर्णय हा प्रसंगोपात् असल्याचे सर्व टीकाकार आवर्जून सांगतात पण आचार्यांचा कर्मसंन्यास हा गीता तात्पर्य निर्णय प्रसंगोपात् आहे हे सांप्रदायिक टीकाकार सोयिस्कररित्या विसरतात. लोकमान्यांवर झालेल्या सांप्रदायिक टीकाकारांचे (बापटशास्त्री, पं.द.बा.जोग व प्रा.अर्जुनवाडकर) गृहीतकृत्य असे दिसते की आचार्यांचा प्रस्थानत्रयीचा अर्थ लावण्याचा अधिकार लोकमान्यांजवळ नाही. हे कशावरून; तर पं. द. बा.जोगांनी गीताभाष्यार्थ प्रकाश असे विधान केले आहे की लोकमान्यांच्या राजकीय क्षेत्रातील नावलौकिकांमुळे गीतारहस्याची आम्हाला दखल घ्यावी लागते.
 याउलट समाजवादी विचारसरणीच्या नरहर कुरुंदकरांनी गीतारहस्याबद्दल सहृदयतेने लिहिले आहे.
 दुसरे असे की, भारतीय तत्त्वज्ञानाची जी कोणत्याही प्रश्नाकडे पाहण्याची जी सर्वंकष दृष्टी म्हणतात त्यांनी नीतिशास्त्र, धर्म, अध्यात्म यांतील परस्परांचा गुंता झाला आणि आद्य शंकराचार्यांनंतर मौलिक अशा तत्त्वज्ञानात्मक विचारांची भर पडली नाही. आजमितीला तर भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास असाच भाग राहिला आहे. याउलट पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या संप्रदायामध्ये आजतागायत अप्रतिहत विचारमंथन होत असलेले आढळून येते.
 लोकमान्यांच्या गीतारहस्यामध्ये युरोपिय नीतिशास्त्राचे प्रयोजन लोकमान्यांच्या टीकाकारांनाही कळू नये किंवा त्याचा त्यांनी अनुल्लेख करावा (गुरुदेव रानडेंचा अपवाद) ही शोकांतिका नव्हे काय?
- र. ग. दांडेकर, पुणे
१०३, धनश्री बिल्डिंग, स्वरनगरी,
आनंदनगर,  सिंहगड रस्ता,
पुणे - ४०० ०५१

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...