Skip to main content

29 may 2017

विजापूर ते विजयपूर : मराठीचा पाया
पूर्वी विजापूर, नंतर बीजापूर, आणि आता विजयपूर असे नामांतर झालेले `गोलघुमटप्रसिध्द' शहर, १४व्या शतकात आदिलशाहीच्या राजधानीचे ठिकाण झाले. मराठेशाहीच्या अुदयाचेही ते केंद्र म्हणता येआील; कारण शहाजीराजानी निजामशाही सोडून विजापूरच्या आदिलशाहीची सरदारकी पत्करली; व सुरुवातीचा काही काळ ते जिजाअू व शिवाजीसह विजापुरात अेकत्र होते. वसआी(मुंबआी), पुणे, गोवा, बेंगलुरू या प्रांतांची राजधानी मध्ययुगीन काळात विजापूर होती.
शिवाजी छत्रपतींच्या निधनानंतर १६८७मध्ये औरंगजेबाने विजापूरची आदिलशाही जिंकली व ते मोगलशाहीला जोडले गेले.औरंगजेबाच्या मृत्यूनंतर १७०७मध्ये हैदराबादेत निजामशाही सुरू झाली व विजापूर निजामी राज्यात गेले. १७६७ला पेशव्यांनी निजामाचा पराभव केला, व विजापूर हे पेशव्यांच्या ताब्यात आले. १८१८ला पेशवाआी संपली आणि ते आिंग्रजांकडे गेले. ब्रिटिश काळात विजापूर मुंबआी आिलाख्यात होते. १९५०मध्ये भारतातल्या राज्यांची रचना झाली तेव्हा विजापूर हे पुणे विभागास जोडण्यात आले; नंतर १९६०मध्ये म्हैसूर राज्यात आणि आता ते कर्नाटकात आहे. आितक्या वेळा या शहराचे हस्तान्तर झाले पण हे शहर कधी हरलेलेे नाही. त्यामुळे या शहराचे नाव विजयपूर `अ सिटी ऑफ व्हिक्टरी' असे करण्यात आले आहे.
आदिलशाहीत जी फर्माने निघाली ती फार्सी आणि मराठी या दोन भाषांत आहेत.. मराठी ही त्या भागाची बोली होती, लिखाणासाठी मोडी लिपी वापरत. अव्वल आिंग्रजी काळात -१८६८मध्ये विजापुरात पहिली शाळा छत्रपती शिवाजीच्या नावाने मराठीतील होती. ती शाळा आजही सुरू आहेच. १८८५मध्ये जिजामाता मराठी मुलींची शाळा सुरू झाली. सुरुवातीच्या काळात त्या शाळांत मोडी लिपी होती.सरकारी कार्यालयांतून आिंग्रजीशिवाय मोडीचाच वापर सरसकट होता. १९१०-१९३० या सुमारास व्यापारी आपल्या पेढीवर नोकर नेमताना त्यास मोडी लिहिता येते का याची परीक्षा घेत असत. शाळांतून पावकी, निमकी, पाअूणकी, सव्वाकी, दिडकी, पावणेदोनकी, औटकी पाठ करण्यास लावत. अेक सव्वं सव्वा, बे सव्वं अडीच, तीन सव्वं पावणेचार.... असे शंभरपर्यंत मराठीत घोकून ठोकून घेत. चौथीपर्यंत असे प्रभावी व्यवहारी गणित आणि पाचवीनंतर मराठीच्या आधीची म्हणून अर्धमागधी असे. बी अे ला अर्धमागधी घेता येत होते. शिवाजी आणि जिजामाता या दोन मराठी शाळांत  शिकल्यामुळे  पुणे  महसूल विभागात नोकरी मिळत असे.
१ऑगस्ट १९२०ला लो.टिळकांचे निधन झाले, त्याच दिवशी विजापूरच्या महिला समाज ने `टिळक कन्या प्राथमिक मराठी शाळा' सुरू केली. तिथे देवनागरीतून शिक्षण असे. मोडी, अर्धमागधी व देवनागरी अशा तिहींंतून  मराठी शिक्षण मिळण्याची सोय विजयपुरात होती. हे प्राथमिक शाळेचे ठीक असले तरी माध्यमिक चा प्रवास खडतर होता. गव्हर्मेट, पी डी जे व दरबार या हायस्कूलांत अेकेक वर्ग मराठी माध्यमासाठी होता, पण त्यात विद्यार्थीसंख्या कमी होत असे. १९४५मध्ये शिक्षण प्रसारक मंडळाने `मराठी विद्यालय' याच नावाने नवी माध्यमिक शाळा सुरू केली, १९६३ला त्या शाळेची नवी भव्य आिमारत झाली आणि आजही त्या जागेत ही दर्जेदार मराठी शाळा सुरू आहे.
आितक्या शाळा असूनही पुन्हा १९६०मध्ये पंचमित्र मराठी मुलांची शाळा सुरू करण्यात आली, त्याचवेळी बडी कमान प्राथमिक मराठी शाळाही चालू झाली. आज या सहा शाळा विजयपुरातील मराठी शिक्षणाचा वसा चालवीत आहेत. तथापि गेल्या काही वर्षांत आिंग्रजी माध्यमांची लाट आली आहे. मराठीतून शिकण्याची संख्या कमी झाली. शासनाच्या धोरणामुळे नोकरकपातही आहे, त्यामुळे शिक्षक नेमता येत नाहीत. या कारणांमुळे शाळा चालविणे दुरापास्त झाले आहे.
कालाय तस्मै नम:! दुसरे काय?
-श्रीपाद  पटवर्धन, विजयपूर 
फोन ९२४३ २१२ ६५७

श्रीनगर येथे शंकराचार्य जयंतीचा कार्यक्रम
महानियती ग्रंथकार, अद्वैत मतांचा प्रचारक, स्तोत्रकार आणि धर्म साम्राज्याचे संस्थापक भगवान आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीचा कार्यक्रम काश्मीरात श्रीनगरमधील आद्य शंकराचार्यांच्या टेकडीवर झाला. मूलाम्नाय कांची कामकोटी पीठाधीश्वर शंकराचार्य जयेन्द्रस्वामी व विजयेन्द्र स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने तो होता. या कार्यक्रमानिमित्त ऋग्वेद संहिता महायज्ञ, ऋग्वेद दशग्रंथ पारायण, कृष्ण यजुर्वेद, सामवेद(कौमुथी शाखा) व अग्निहोत्राच्या विविध इष्ट्या अशा स्वरूपाचे कार्यक्रम जेेष्ठामातादेवी मंदिराच्या प्रांगणात संपन्न झाले. तमिळनाडू मधून १०० भाविक आणि ४० वैदिक विद्वान सहभागी झाले होते.
ऋग्वेद दशग्रंथाच्या पारायणासाठी वेदभवनचे प्रधानाचार्य मोरेश्वर घैसास गुरुजी आणि त्यांचे विद्यार्थी तीर्थराज व धारवाड येथील सुदर्शन देवताळकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. जगदगुरू शंकराचार्य प.प.विजयेन्द्र सरस्वती यांचा सत्यसंकल्प आणि भारतातील महत्वाच्या शहरांत धर्म जागरणाचे काम, असा उद्देश घेऊन हा कार्यक्रम श्रीनगरसारख्या ठिकाणी यशस्वीपणे पार पडला.
श्री जेष्ठामातादेवीचे क्षेत्र नयनरम्य झाडाझुडपांच्या छायेखाली डोंगराच्या मध्यभागी आहे. हे मंदिर खूप मोठे व स्वयंभू असून महादेवाचे मंदिर, यज्ञशाळा, यात्रीनिवास अशा रचनेचे आहे. मंदिराजवळ उभे राहिल्यानंतर श्रीनगरचे आकर्षण असलेले दाल सरोवराचेे दर्शन होते. काश्मीरमध्ये मंत्रांचे हवन करण्यातून वातावरण स्वच्छ होईल व श्रीनगरचा हा भाग अशांततेमधून बाहेर पडेल, या श्रद्धेने हा सर्व कार्यक्रम केला गेला.
श्रीनगरपासून जवळच वृक्षांच्या विस्तीर्ण जागेत खीरभवानीमाता असून श्रीनगरमधील या देवीच्या दर्शनासाठी असंख्य लोक येत असतात. हे भवानीमातेचे स्थान पाण्यात असून प्रशस्त सभामंडप आहे. याठिकाणी देखील वैदिकांनी वेदांच्या मंत्रांचे पठन केले. हे स्थान अतिप्राचीन आहे, परंतु सध्या या मंदिराची सुरक्षा सीमा दलाच्या हातात आहे.
दि.२५ एप्रिल या दिवशी भेट दिली, ते ठिकाण म्हणजे श्रीनगर येथील सैनिकांचा मुख्य तळ. तेथील अतिप्राचीन महादेवाचे दर्शन, व सैनिक अधिकारी व त्यांच्या परिवाराशी भेट असा कार्यक्रम झाला. सर्वांची काटेकोर तपासणी करून सैनिकांच्या बसमधून शिव मंदिराच्या प्रांगणात नेण्यात आले. सर्व व्यवस्था उत्तम होती. मोठ्या मंडपात दोन प्राचीन वृक्षांच्या छायेत वैदिकांची बसण्याची व्यवस्था होती. तेथील शिवमंदिरसुद्धा श्रीनगरच्या निर्मितीपासून पाण्यात असून गुडघाभर पाण्यात शिवलिंग आहे.
वैदिक विद्वानांनी वेदांचे मंत्रपठण करून वातावरणात उत्साह निर्माण केला. पूजेनंतर शिवलिंगास सर्व ब्रह्मवृदांनी सकृत रुद्रावर्तनाने महाभिषेक व आरती केली. पं.राधाकृष्ण शास्त्री यांनी उपस्थित अधिकारी व त्यांच्या परिवारापुढे समयोचित भाषण केले. सैनिकांच्या त्यागाचे, मानसिकतेचे, धैर्याचे वर्णन करून त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, ``भारताच्या सीमांवर तुम्ही सजगपणे जी देशसेवा करीत आहात त्यामुळे आम्ही नागरिक सुखाने राहात आहोत. तुमच्या देशसेवेपुढे आम्ही नतमस्तक होणे आवश्यक आहे. जम्मू-काश्मीरातील विचित्र परिस्थितीमध्ये, निसर्गावर मात करून सीमांचे प्राणपणाने रक्षण करीत आहात, यासाठी तुम्हाला मानसिक बळ मिळावे म्हणून वेदमंत्रांच्या माध्यमातून आम्ही प्रार्थना करीत आहोत.''
दि.२९ एप्रिल या दिवशी श्रीनगरमधील पंडितांच्या महिलांना, कुमारिकांना, कुमारांना निमंत्रित करण्यात आले होते, सुवासिनींच्या ओटी भरून, कुमार व कुमारिकांचे पूजन करून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला. दुपारी कार्यक्रमाची पूर्णाहुती करण्यात आली.
दि.३० एप्रिल या दिवशी सर्व भाविकांनी शंकराचार्यांच्या टेकडीकडे प्रयाण केले. या टेकडीचा संपूर्ण रस्ता स्वच्छ, सुंदर व प्रशस्त देवदार, चिनार वृक्षांनी बहरलेला आहे. डोंगरावर हे स्थान असून सुमारे २५० पायऱ्या चढाव्या लागतात. टेकडीच्या टोकावर भगवान शंकराचे ७०० ते ८०० वर्षांपूर्वीचे मंदिर, त्याची रचना वेगळया पद्धतीची असून आतमध्ये मोठे शिवलिंग आहे. पाऊस व थंडी दोन्ही ऋतू एकाच वेळी अनुभवायला मिळतात. शंकराचार्यांच्या गुहेत जाऊन त्यांच्या ठिकाणाचे दर्शन घेतले. याठिकाणी विजयवाड्याहून आलेले वे.मू. सदाशिव घनपाठी सोमयाजी यांनी स्वस्त्ययनेष्टी करून प्रथमच शंकराचार्यांच्या टेकडीवर श्रौतयाग केला. परमाचार्यांच्या पादुका व श्रीमद् जगदगुरू आद्य शंकराचार्यांच्या प्रतिमेचे पूजन व हरहर शंकर, शिवहर शंकर या नामाचा जप करून सर्व वातावरण आल्हाददायक केले. सर्व वैदिकांनी मंत्रोच्चाराच्या घोषात श्री महादेवीची महापूजा करून जलाभिषेक केला. शंकराचार्यांच्या गुहेतील स्थानावरसुद्धा जलाभिषेक केला. सर्व वैदिकांचे पूजन करून सत्कार करण्यात आला.
सायंकाळी श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकातील सनातन धर्म सभेच्या यात्री निवासामध्ये, महामंडलेश्वर १००८ स्वामी महाराज विश्वात्मानंद यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विविध प्रांतातून आलेल्या चतुर्वेद पंडितांनी वेदमंत्र पठन करून महाराज विश्वात्मानंद यांनी आद्य शंकराचार्यांच्या जीवनावर प्रभावी विचार मांडले व शंकराचार्यांच्या कार्याची महती विषद केली.
सर्वांना पुढील वर्षाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.  

न्यायमूर्तीचे भांडण
शेजारी राहणाऱ्या अेका तरुण पोराचे लग्न लागल्यावर तो जोडीनं  नमस्कार करायला आला. हा तरुण नुकताच न्याय क्षेत्रातील परीक्षा अुत्तीर्ण करून न्यायाधीश बनला होता, आणि तालुक्याच्या न्यायालयात त्याची नियुक्ती झालेली होती. नवपरिणित वधूही तशीच न्यायाधीश झालेली होती. सर्वांना त्या योगायोगाचे सानंद आश्चर्य वाटत होते. कौतुकाने त्याचे सारीकडे अभिनंदन होत होते. घरी आलेल्या त्या जोडप्याने आतल्या खाटेवर बसलेल्या आजीबाआीकडे जाअून त्यांनाही नमस्कार केला. वधूवरांच्या पदाचा योगायोग त्या अनुभवी म्हातारीला सांगितल्यावर त्या माअुलीने प्रश्न केला, ``हे बरीक ठीक झालं रे%, पण  माझी बापडीची शंका अशी की, अुद्या तुम्हा नवरा-बायकोत भांडण होणारच, ते सोडवायला कुणी यायचं?''  सारे स्नेहभराने हसले. त्या प्रश्नात काही गांभिर्य त्यावेळी जाणवले नाही. पण गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या अेका न्यायमूर्तीवर न्यायालयाचाच अवमान केला म्हणून तुरुंगात जाण्याची वेळ येअून ठेपली, त्यानेही ते प्रकरण मुकाट्याने न अैकता, त्याविरोधात आपले प्रयत्न चालू ठेवल्याची कथा सर्वांनी अैकली असेल. सर्वोच्च स्तराच्या न्यायमूर्तींचे हे भांडण कोणत्या थराला जाणार हा अेक प्रश्न, आणि त्यांच्यातला वाद सोडवायला आता कोणत्या कोर्टात जाअून दाद मागायची हाही प्रश्नच.

हा वाद केवळ तांत्रिक महत्वाचा नाही.मनुष्य जातीच्या समाज व्यवस्थेच्या दृष्टीने तो विचारात टाकणारा आहे. माणसाला  आितर प्राणी जगताहून वेगळया भावभावना आहेत, तेच तर त्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यास राग लोभ आहेत, स्वार्थ आहेत, मद आणि अहंकारापोटी येणारे मत्सरादि  विकार आहेत. त्याचप्रमाणे  भविष्यकाळासाठी जास्तीत जास्त मिळवून ठेवण्याची हावही आहे. त्या साऱ्यांपोटी त्याची दुसऱ्याशी किंवा दुसऱ्या समूहाशी सतत भांडणे चालू असतात. तरीही अेका सच्छील समाजाचा आग्रह धरून मानवी समूहाने आपल्या सहअस्तित्वासाठी साऱ्या व्यवस्था निर्माण केल्या आहेत. परस्परांतील व्यवहार मनुष्यनीतीचेच असले पाहिजेत या हट्टापायी शासन-प्रशासन-राष्ट्न् अशा संकल्पना रुजविल्या आहेत. त्यांच्यातील वाद आणि मतभेद मिटविण्यासाठी न्याययंत्रणा अुत्क्रांत झाली. प्राचीन काळातही गाव गावकी, पंचमंडळ, पंचायत  होते. पाच सज्जन अनुभवींचे मानले जाण्यासाठी पांचामुखी साक्षात् परमेश्वर बोलतो, अशी सामाजिक मांडणी होत आली.

पण या साऱ्या व्यवस्था  न  जुमानणारे घटकही होते. खूनखराबा, अरेरावी, चोरी शिंदळकी हेही सतत होत आलेले आहेच. परस्पर व्यवहारासाठी पैसा वापरात आल्यावर तो  स्वत:कडे जास्तीत जास्त हवा, असा हपापा  आला. आणि त्यांतून अनेक वाद निर्माण होत राहिले. अर्थातच ते सोडविण्यासाठी न्याययंत्रणाही मजबूत असणे गरजेचे झाले. कागदावरचा कायदा आणि त्यानुसार न्याय ही पध्दत आिंग्रजांनी दिली, त्यांनी तर त्यांच्या राज्याला सोयीस्कर ठरेल असे अन्याय्य निर्णय कित्येकदा न्यायाच्या नावाखाली दिले. पण ते मानावेच लागले. स्वातंत्र्यानंतरही जरी आपल्या घटनेने कायद्याचे आखीव राज्यशासन दिले असले तरी त्याच्याच आधाराने दिलेले न्यायदान वेगवेगळे असल्याचे आपण पाहतो. अशा प्रत्येक वेळी निम्म्या लोकांना न्यायालयाचा निर्णय अन्यायच वाटतो. तथापि त्यासंबंधात वरच्या  स्तरावर जात  जात सर्वोच्च न्यायालयात गेले की हा प्रश्न, प्रश्न म्हणून संपतो, ही आजवरची कथा झाली. आता नवा तिढा अपूर्वच  ठरला आहे. कारण सर्वोच्च न्यायमूर्तीच आरोपीच्या पिंजऱ्यातून तुरुंगाच्या वाटेवर निघाले आहेत.

अेखाद्या सामान्य निवृत्त सेवकालाही आपण आयुष्यभर जिथे काम केले ते कार्यालय किंवा संस्था आदरणीय वाटू लागते. कित्येक वर्षांनी असा सामान्य माणूस त्याच्या कामाजागी गेला तर त्याला भरून येते. आितकेच नाही तर आज तिथे जी नवी पिढी काम करत असते, त्यांनाही या बुजुर्ग निवृत्तांबद्दल तात्कालिक का असेना कृतज्ञ भाव येतो. शाळेतून बाहेर पडलेला विद्यार्थी कालांतराने पुन्हा शाळेत येतो, तेव्हा त्याच्या भावना आपुलकी आणि जिव्हाळयाने अुचंबळून आल्याशिवाय राहात नाहीत. वास्तविक ती त्याची शाळा तशी सामान्यही असते, आणि त्यापुढच्या जगात त्याने तीपेक्षा कितीतरी गुणवान् शाला पाहिलेल्या असतात. पण तरीही या `आपल्या' शाळेविषयी त्याच्या भावना केवळ कठेार कोरड्या नसतात. न्यायच करायला बसला तर तो विद्यार्थी आपल्या त्या शाळेसंबंधी, किंवा तो कोणी कर्मचारी आपल्या जुन्या कार्यालयासंबंधी पक्षपातीच  असेल, हा सामान्य मानवी स्वभाव आहे. तसे करण्याचे कायदेशीर कारण नाही, किंबहुना ते न्यायाचेच नाही. पण तरीही अेक मानवी वैशिष्ट्य म्हणून ते मानावे लागते. या न्यायमूर्तींना अर्थातच ते लागू होणे कठीण वाटते कारण तेे कठोर न्यायाचे पायीक आहेत. आपल्याच न्यायासनाबद्दल त्यांना शुध्द अग्नितत्व अपेक्षित असल्यास  न  कळे!

या साऱ्या प्रकरणाचे तोटे बरेच होणार आहेत. अेक तर  त्यांचा निर्णय लागण्यात बरेच श्रम पैसा व शक्ती खर्च होणार आहे. तो खर्च केल्यावर त्यातून साध्य काय होणार हे स्पष्टच आहे. या किंवा त्या न्यायमूर्तीचे काहीतरी खरे किंवा खोटे ठरेल. व्यक्ती म्हणून ते कोणी करणस्वामी कायदेशीर दोषी ठरले की नाही हेही फार महत्वाचे नाही. पण त्या प्रकरणातून सामान्य माणसाचा या साऱ्या न्यायव्यवस्थेवरचा विश्वास पूर्णत: अुडेल. जे कोणी न्यायमूर्ती म्हणून आज जागोजागी बसलेले आहेत,त्यांच्याविरोधात जाण्याची आज सहसा पध्दत नाही. जो निर्णय लागेल तो `देवाघरी न्याय नाही' असे म्हणून सोसण्याची अेक मानसिक प्रक्रिया सामान्य माणसात तयार झालेली आहे, तिलाच धक्का लागेल. समाजात काही घटक असे असतात की, त्यांच्या सद्शीलतेवर - त्यांच्या मानव्यबुध्दीवर साऱ्या मानवजातीचा समाज म्हणून विश्वास असतो, श्रध्दा असते, ते सारे ढासळेल. शिक्षक, परिचारक, पत्रकार आित्यादी घटकांबद्दल फार अभिमानाने बोलावे असे आजकाल नाही, हे मान्य करूनही त्यांचे स्थान समाजात वेगळे आहे. ते तथाकथित समतोलाचे घटक क:पदार्थ ठरावेत अशी न्यायाधीशांची  जागा आहे. त्यामुळे त्या जागी कुणाची निवड होताना ती सामान्य मानवी हितसंबंधांपल्याड असते हे गृहीत असते. त्या साऱ्या गृहीतकांना छेद देणारे नवे पैलू आता समाजात रुजतील, हे धोक्याचे वाटते.

घरातील वडीलधाऱ्यांना कायदेशीर अधिकार असतोच असे नव्हे. महिलांच्या बाबतीत तर तसा अधिकार सामान्यत: नसतोच. पण तरीही त्यांना सन्मानाने काही विचारावे आणि त्यांनी काही सांगितले तर ते मनाविरुध्द असले तरी ते मान्यच करावे ही घरातील रीत असते. पण घरचे वडीलधारे आपापल्या लहानमोठ्या पदासाठी अहंभावाने तंडत असले तर त्यांची  वडीलकी संपते, हा त्या घराच्या दृष्टीने धोका असतो. तसेच आिथे सामाजिकतेच्या बाबतीत म्हणता येते. खेळाच्या सामन्यात अंपायरने चुकीचा निर्णय दिला तरी तो मानला गेला तरच पुढचा खेळ चालतो, चालत राहतो. त्याच्याबद्दलच हाणामाऱ्या सुरू झाल्या तर खेळ कायमचा थांबण्याआितकेच समाजातील खिलाडूपण संपुष्टात येआील, हे ध्यानी घ्यायलाच हवे. म्हणूनच तो वाद कोण्या अेका न्यायाधीश व्यक्तीपुरता नाही तर तो साऱ्या मानवी व्यवहारांवर परिणाम करणारा ठरू शकतो.

त्रि स्थ ळी
अनोखा अुपयुक्त प्रयोग
आंबेडकर जयंती असो, शिवजयंती असो किंवा कृष्णजयंती असो; साऱ्या समाजाला वेठीला धरणारे अुत्सव चाललेले असतात. त्याला  ना  पोलीस रोखू शकत, ना कोणी  पर्यावरणी. त्यातही आजकाल त्या महनीय विभूतींची जातीनिहाय वाटणी केली  असल्यामुळे  शक्ती-प्रदर्शनाआितकीच शक्ती,  आितरांना दूषणे देण्यातही खर्च होते. त्यायोगे विद्वेष वाढतो, तो काहींना अुपयोगी पडत असेल पण तो घातकच!
नुकतीच आंबेडकरांची जयंती झाली, त्यानिमित्ताने केलेला अेक अभिनव प्रयोग मात्र खास दखल घ्यावी असाच आहे. बाबासाहेबांना काय, किंवा कोणाही थोर व्यक्तीला काय अनेकानेक व्यक्तीविशेषांचे मोलाचे साहाय्य त्यांच्या कार्यकर्तृत्वात झालेले असते. त्यांनी कधी कोणताही भेदभाव केलेला नसतो, म्हणूनच ते मोठे झालेले असतात. बाबासाहेबांनी महाडच्या तळयाशी जो सत्त्याग्रह केला तिथपासून त्यांनी केलेल्या धर्मान्तरापर्यंत त्यांना ज्यांचे साहाय्य झाले होते, त्यांच्या वंशजांचे - वारसांचे अेक संमेलन मुंबआीत भरविले गेले. बाबासाहेबांना तत्कालीन विचारवंत, बुध्दिवादी आणि त्यांच्याआितकीच सामाजिक तळमळ असणाऱ्या अनेक लोकांनी मदत केली होती. जातीपातीच्या पलीकडे जाअून समतेच्या आधारावर त्यांनी हे लढे सर्वांच्या समवेत केले. त्यात न म जोशी, दादासाहेब दोंदे, रावबहादूर बोले, देवराव नाआीक, सुरभानाना टिपणीस, भाआी चित्रे, शां शं रेगे, बाबूजी कवळी, श्रीधरपंत टिळक, नाना पाटील, सीताराम जोशी, दत्तात्रय प्रधान, अनंत काणेकर, फत्तेलाल खान, दगडूशेठ भिलारे, चंद्रकांत अधिकारी, विनायक  राव, बाळ साठे, केळुसकर गुरुजी, प्रबोधनकार ठाकरे, अशी मोठी नामावळी होआील. त्याशिवाय सयाजीराव महाराज, छत्रपती शाहू, हैदराबादचे निजाम यांनीही त्यांना मोठे साहाय्य केले.
बाबासाहेबांचे हे दलितेतर सहकारी आज नाहीत, पण त्यांचे कोणी वंशज-वारस आहेत; ते त्यांच्या परीने त्या महामानवाचे स्मरण करीत असतात. अशांना अेकत्रित आणण्याचा हा अनोखा प्रयोग म्हणावा लागेल. सामाजिक कार्यकर्ता हीच ज्यांची ओळख आहे, अशा विजय कदम यांनी अशा दलितेतर व्यक्तींचा शोेध घेतला, त्यांना योगीराज बागूल व रमेश शिंदे यांचे सहकार्य मिळाले. त्या वंशज लोकांच्या अुपस्थितीतच आंबेडकर जयंती साजरी करायची अशी कल्पना, अेक प्रशासकीय अधिकारी हर्षदीप कांबळे यांनी प्रत्यक्षात आणली. महापुरुषाच्या स्मरणाच्या निमित्ताने ढोलताशे बडवण्याअैवजी हा अुपक्रम वेगळाच परिणाम साधू शकेल हे नक्की. म्हणूनच त्यांचे अभिनंदन.

राष्ट्न्संघाकडून टपालतिकिट
संयुक्त राष्ट्न्संघाच्या टपालविभागाने (यूअेनपीअे) आंतरराष्ट्नीय योगदिनाच्या निमित्ताने (२१ जून)दहा तिकिटे प्रसारित करीत असल्याचे घोषित केले आहे. ओम्कार चिन्हाच्या समोर योगासनाची अेकेक स्थिती, अशा दहा आकृत्यांची ही दहा तिकिटे असणार आहेत. तिकिटांची किंमत प्रत्येकी १.१५ डॉलर आितकी असेल. संयुक्त राष्ट्न्संघात सध्या भारताचे प्रतिनिधी असलेले सय्यद अकबरुद्दीन यांनी ही माहिती ट्वीटरवरून प्रसारित केली आहे.
भारतीय योगशास्त्राला मोदी सरकार आल्यानंतर मोठा अुठाव मिळत गेला आहे. स्वत: पंतप्रधान योगचर्या करीत असतात, त्यांचे प्रकृतीमान आणि क्षमता लक्षात घेता त्यांच्या त्या चर्येबद्दल विश्वास बाळगावा असे जगालाही वाटू लागले असल्यास नवल नाही. मोदींची देशासंबंधी कर्तबगारी जोखण्याचे वेगळे निकष असतील; पण योगविद्येसारखे  काही विषय त्यांनी जगाच्या पाठीवर नेले हे खरेच आहे.`त्यांनी केवळ तेवढेच केले' अशी कुजकट वक्तव्ये येत असतात, त्याला नाआिलाज आहे. प्रत्येकाची परीक्षाबुध्दी वेगळी असू शकतेच! मोरारजी पंतप्रधान असताना `शिवाम्बूची लाट' आलेली होती. पण योगसाधनेचे तसे नाही. मोदींचे प्रयत्न जरूर आहेत, पण योगाचे शास्त्र नाकारण्यासारखे नाही, परिणामही  कुणी नाकारलेले नाहीत. काही विरोधक असणार, त्यांचे हेतू आणि हितसंबंध असणार, ते असण्याशी काही घेणे असू नये. त्याअैवजी शांतपणे त्या शास्त्राचा प्रसार करीत राहणे हाच अेक योगाचार असतो. योगाचे महत्व पटविण्यासाठी अुगीच आक्रस्ताळी सक्ती करणे हेच मुळी योगविरोधी आहे. त्याअैवजी हळूहळू ज्यांना पटेल तेच शाश्वत टिकेल. संयुक्त राष्ट्न्संघाने त्यासाठी ही सन्मानदर्शक कृती करावी हे स्वागतार्हच आहे.

दुर्गसखा
ठाणे येथे `दुर्गसखा' नावाची संस्था आहे. अैतिहासिक किल्ल्यांच्या प्रेमापोटी त्यातून काही काम चालते हे तर नावातूनच कळते. पण त्याशिवाय काही सामाजिक अुपक्रमही संस्था करते. त्यासंदर्भात आलेला अेका कार्यकर्त्याचा हा अनुभव...
ठाण्यातील माघी गणेशोत्सव मंडळाने काही शैक्षणिक साहित्य अेकत्रित केले होते, ते प्रसादरूपाने गरजू मुलांपर्यंत पोचवावे, म्हणून शहापूर तालुक्यातील कातकरीवाडीला गेलो. त्या वाडीशी, तिथल्या शाळेशी व मुलांशी `दुर्गसखा'च्या कामातून थोडा परिचय होता. तिथे नेलेले साहित्य वाटत असताना काही मुलांनी मला बाहेर बोलावून घेतले. चारपाच मुले भोवती जमली होती. साहित्य वाहून नेलेल्या टेंपोकडे त्यांनी मला नेले. टेंपोत बाकीच्या साहित्यातच आमच्यासोबत आलेल्या अेका छोट्या मुलाची छानशी चप्पल होती. थोडे लाजत लाजत अगदी हळव्या आवाजात तिथल्या अेका पोराने विचारले, ``दादा, ही चप्पल आम्ही घेअू? आम्ही सगळे मिळून ती थोडीथोडी वापरू..'' काय अुत्तर द्यायचे? आमच्या सुखीपणाचेच कसेतरी वाटले. त्यांना सांगितले, ``पुढच्या वेळी येअू तेव्हा सगळयांसाठी चप्पल आणेन हं.'' मुले त्या सांगण्यावरही खूश झाली.  सहजपणे सगळयात मिसळून हुंदडू लागली. पण मला शब्द पाळायला हवा होता.
फेसबुकवर बरीच नाती नवी झाली होती.त्यावर जुन्या चपला माझ्याकडे देण्याबद्दल अेक विनंती टाकली. ती मुले गरीब असली म्हणून काय झालं? त्यांना द्यायच्या त्या चपला जुन्या कशासाठी? -म्हणून मग बऱ्याच जणांनी त्या पोरांच्या पायात नव्या चपला घालण्यासाठी मला हात दिला. २५-३० मुलांना नवे चप्पलजोड नेअून दिले. त्यांचे नटलेले पाय त्यांच्या मुखावरचा आनंद परावर्तित करीत होते. मोठे समाधान घेअून परत आलो.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन