Skip to main content

26 june 2017

अणुऊर्जा 
भारतीय वैज्ञानिक संस्थांमधील एक अव्वल यशस्वी संस्था असलेल्या भाभा अणुसंशोधन केंद्राच्या आत नेमके काय चालते याची उत्सुकता सर्वांच्या मनात असते. त्याचे कथन या यशाचे साक्षीदार असलेले आल्हाद आपटे हे नेमकेपणाबरोबरच अधिकारवाणीने करू शकतात. अणुकार्यक्रमाचा इतिहास त्यांनी संबंधित मानवी कंगोरे, निगडित परिस्थितीचा संदर्भ, आनुषंगिक मनोरंजक व चित्तवेधक गोष्टी यांनी सजवून सुस्पष्टपणे, रंजकपणे प्रस्तुत केला आहे. भाभा अणुसंशोधन केंद्राचे दार किलकिले करून आतील वैज्ञानिक विश्वाचे दर्शन घडविणारा मराठीतील हा पहिलाच ग्रंथ.
लेखकाने या पुस्तकाच्या संबंधाने म्हटले आहे की, `डॉ. होमी भाभा या बुद्धिमान व द्रष्ट्या व्यक्तीने मुंबईच्या तुर्भे येथे कुशलतेने निर्माण केलेल्या या संस्थेची कथा एकरेषीय वाटचालीची नाही, तर तीमध्ये विज्ञानजगताची विविध कथानके व उपकथानके एखाद्या महाकाव्यासारखी गुंफली जाऊन त्यांचे एक सुंदर बहुरंगी चित्र बनले आहे. चाळीस वर्षे संस्थेचा, पर्यायाने या चित्राचा, एक भाग म्हणून अनुभव घेतला असल्याने, या कथेचे विविध पदर उलगडून दाखविण्याचे आव्हानात्मक कार्य हाती घेतल्यावर माझ्या दृष्टीने ती निर्मितीप्रक्रियाच अतिशय रसपूर्ण बनत गेली. माझा कार्यानुभव प्रामुख्याने संगणक व डिजिटल क्षेत्राचा आहे, परंतु बी.ए.आर.सी. ट्न्ेिंनग स्कूलने केलेली घडणच अशी आहे की, या ग्रंथाच्या निमित्ताने अणुविज्ञानातील विविध विषयांचा अभ्यास करताना कोठेही अनोळखी प्रदेशात संचार करीत असल्याची भावना निर्माण झाली नाही. अणुविज्ञान व त्या अनुषंगाने येणारे वैज्ञानिक जग हे बाहेरून पाहिल्यास फारसे नाट्यमय नाही. त्यातील नाट्य पाहण्यासाठी त्याकडे थोडेसे विज्ञानाच्या चष्म्यातून पाहावे लागते'.

भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार आणि मंत्रीमंडळाच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष आर. चिदंबरम् यासंबंधात म्हणतात की, `भाभा अणुसंशोधन केंद्र ही देशातील एक अग्रगण्य विज्ञान-तंत्रज्ञान संस्था आहे. तिला आणि अणुऊर्जा विभागाच्या अन्य संस्थांना जे मोठे यश मिळते आहे, त्याकडे आपण तथाकथित तंत्रज्ञान-नकारातून निर्माण झालेल्या अडथळयांच्या पार्श्वभूमीवर पाहावयास हवे. ज्या काळात देशात तंत्रज्ञान विकासाचे फारसे अस्तित्व नव्हते, अशा काळात अणुऊर्जा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी डॉ.भाभांनी आपल्या भोवती वैज्ञानिक नेतृत्वाचे एक मोहोळ उभे केले. अणुक्षेत्रातील आणि त्याचबरोबर डॉ. विक्रम साराभाइंर्सह सम्मीलित केलेल्या अंतरिक्ष क्षेत्रातील, वैज्ञानिक नेतृत्वाच्या पुढील पिढ्यांना भाभांचा हा वारसा प्रेरित करत आहे. हे.'

अणुऊर्जा आयोगाचे सदस्य अनिल काकोडकर यांचे म्हणणे असे की, `एखाद्या देशाचे जगातील तुलनात्मक स्थान हे त्या देशाच्या आर्थिक व सामरिक बळावर आणि तेथील जनतेच्या जीवनमानावर अवलंबून असते. या तिन्ही गोष्टींचा देशाच्या तंत्रज्ञानक्षमतेशी फार जवळचा संबंध आहे. म्हणूनच आपापली तंत्रज्ञानविषयक क्षमता जपण्याचा व ती वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न सर्वच देश मोठ्या कटाक्षाने सतत करत असतात. यातूनच सामरिक दृष्ट्या निर्णायक अशा तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणावर बंधने निर्माण होतात. अणु तंत्रज्ञानाच्या बाबतीत तर हे नेहमीच प्रकर्षाने जाणवत आले आहे.
भारतासारख्या देशाला आपले भवितव्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने अणुशक्तीची आवश्यकता डॉ. भाभांनी भारतात आपले संशोधनकार्य सुरू करतानाच ओळखली व त्या अनुषंगाने त्यांनी भारताच्या अणुकार्यक्रमाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने आखणीदेखील केली. आज भारताची गणना अणुतंत्रज्ञानात जबाबदार आणि प्रगत देश म्हणून केली जाते. देशाला भविष्यात लागणाऱ्या ऊर्जेची गरज अणूच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत आज आपण स्वयंपूर्ण आहोत. अण्वस्त्रसज्जताही आपण साध्य केली आहे. पूर्वी आपल्यावर लादलेली बंधने जाऊन आपल्या शांततामय कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्नीय सहकार्याचा मार्ग आज मोकळा झाला आहे. अणुऊर्जा कार्यक्रमासाठी लागणारी अतिरिक्त सामग्री, आपली अणुधोरणविषयक स्वायत्तता अबाधित राखून, आज आपण आयात करू शकतो. अणुऊर्जा निर्मितीक्षमता अधिक गतीने वाढविण्यासाठी परदेशातून अणुसंयंत्रेसुद्धा आज आपण आयात करू शकतो.
विज्ञान व तंत्रज्ञान कार्यक्रम देशाच्या हितासाठी कसे आखावेत व राबवावेत; मूलभूत विज्ञान व उपयोजित विज्ञान एकमेकांना पूरक कसे आहेत; वैज्ञानिकांच्या क्षमता पुरेपूर उमलण्यासाठी कसे वातावरण असायला हवे; या व यांसारख्या अनेक पैलूंबद्दल डॉ.भाभांनी केलेली कार्यक्रम आखणी व त्याचे प्रबंधन एक आदर्श उदाहरण ठरावे. वैज्ञानिक संशोधन, त्यातून पुढे येऊ शकणारे उच्च तंत्रज्ञान व त्याआधारे राष्ट्नला पुढे नेणारी चालना असे मार्गक्रमण करण्याची क्षमता, याबाबतीत आपण अजून खूप मागे आहोत. आपला अणुविकास कार्यक्रम या दृष्टीने दिशादर्शक ठरावा.'

सुमारे ३०० पृष्ठांच्या `अणुगाथे'ची फलश्रुती सांगताना कोणताही अभिनिवेषी निष्कर्ष न मांडता आल्हाद आपटे हे त्यांच्या शांत वैज्ञानिकाच्या संयतपणे नेमकी दिशाही दाखवून देतात. ते गाथेचा शेवट करताना सूचकपणे लिहितात, `अणुऊर्जा हवी की नको यावर अनेक उलटसुलट मते मांडली जातात. अनेकदा टोकाची मते व्यक्त केली जातात. कोणत्याही वादात टोकाची भूमिका घेणाऱ्यांच्या सहभागाचेही महत्व असते. प्रश्नाचे विशिष्ट अंग प्रकर्षाने पुढे आणण्यात त्यांना महत्वाची भूमिका निभावायची असते. पण अशा कोणावरही निर्णय घेण्याची जबाबदारी नसल्याने ते टोकाला राहण्याचे स्वातंत्र्य उपभोगू शकतात. परंतु, ज्यांच्यावर निर्णय घेण्याची जबाबदारी असते, त्यांंना सर्व बाजू विचारात घेऊन नीरक्षीरविवेकाने निर्णय घ्यावा लागतो. त्यात त्यांचा कल कोणत्या बाजूला आहे याचाही भाग असतोच. पण घेतलेल्या निर्णयाला ती व्यक्ती किंवा संस्था जबाबदार असते. भारतीयांच्या भविष्यकालीन जीवनशैलीला अनुसरून असलेल्या विजेच्या मागणीचा विचार करून आणि विद्युतऊर्जा स्त्रोतांबाबतची सद्य:स्थिती व भविष्यात ही स्थिती विकसित होण्याच्या सर्व शक्यता गृहीत धरून निर्णयकर्त्यांना अणुऊर्जेबाबत निर्णय घ्यायचा आहे आणि त्या दृष्टिकोणातून पाहिल्यास अणुऊर्जा नकोच असा टोकाचा निर्णय घेणे आज तरी कोणालाही शक्य होणार नाही. जगातील निरनिराळया देशांचे निर्णय पाहता हेच चित्र समेार येते.
`आपली जीवनशैलीच चुकीच्या दिशेने विकसित होत आहे, आपण आपल्या गरजा कमी करणे अत्यावश्यक आहे' असे प्रतिपादन करणारे लोकही आहेत. त्यांच्या मुद्द्यात निर्विवाद तथ्य असले, तरी व्यवहारात घड्याळाचे काटे उलटे फिरविणे आज तरी दुरापास्त आहे. त्यामुळे या तात्विक पातळीवरील मतप्रवाहाचा ऊहापोह निराळया संदर्भातच, तात्विक पातळीवर होऊ शकतो.
-आल्हाद आपटे, बावधन, 
४०१-`सावली', डीएसके, रानवारा, पुणे
फोन.नं.९५११९१४७४४

शालान्त म्हणजे अन्त नव्हे.
गेल्या पंधरवड्यात १०वी-१२वी चे निकाल लागले, शाळाही पुन्हा नव्या वर्षासाठी सुरू झाल्या. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आजच्या शिक्षण व्यवस्थेविषयी असमाधान सर्वत्र व्यक्त होत आहे. नव्याने शाळेत प्रवेश करणारी मुले नव्या अुत्साहात असतात, पण ज्यांना आपले शिक्षण कुचकामी असल्याचा साक्षात्कार होतो त्याचे पालक मात्र कमालीचे नाराज झालेले असतात. हे असे कित्येक वर्षे चालतच आलेले आहे, त्यास आजच्या काळातील व्यवस्थाही अपवाद नाही. महाभारताच्या काळातही  सारे राजपुत्र त्यांच्या गुरूच्या बाबतीत खूश नव्हते; द्रोणाचार्यांवर पक्षपाताचा आरोप त्याही काळी झाला होताच.

मुळातच शिक्षण कशासाठी घ्यायचे याबद्दल नेमकेपण आपल्या मनांत नाही. आजच्या काळात तर केवळ पैसा मिळवणे हे अेकमेव अुद्दिष्ट, शिकणाऱ्यांच्या पालकांपुढे आहे. वास्तविक काळ तर असा आहे की, काहीही चांगल्या रितीने केले तर पैसा मिळू  शकतो. सुशिक्षित बेकार ही फसवी संज्ञा आपण सहजावारी रूढ केलेली आहे. ज्या माणसाला पोटापुरते मिळविता येत नसेल, तो सुशिक्षित कसा म्हणावा? त्याने कुठल्यातरी शाळा कॉलेजाची कसलीतरी पदवी काहीतरी करून मिळवली असेल, त्यास बाहेरचे जग सु शिक्षित मानत नाही, हा दोष जगाचा नाही.  -तर तो समज करून घेणाऱ्यांचा आहे. शिक्षणाची दुकाने ज्यांनी काढली त्यांचे `गिऱ्हाआीक' आपल्यातली मुले झाली. त्यांचा अुद्देेश  ज्ञानदान करण्याचा वगैरे नव्हता, तर पालकांच्या बुभुक्षित मनस्थितीचा फायदा घेण्याचा होता. त्यांच्याकडून जर काही शिकायला मिळालेच असेल तर त्याचा अुपयोग चांगुलपणाने चरितार्थ चालविण्यासाठी होत नाही. ज्यांना अन्य काही सोयी सवलतींचे टेकू मिळाले असतील, त्यांनी त्यांचे चरितार्थ चालविलेही असतील; पण त्यांतून समाजाला कोणताही लाभ झालेला नाही. अुदाहरणार्थ ज्यांना त्या शिक्षणावर प्राध्यापकाची नोकरी मिळाली असेल त्यांनी हाती आलेल्या मुलांतून काय घडविले असे विचारण्याची सोय नाही. आिंजिनियरची पदवी कोणी त्या दुकानांतून घेतली असेल त्यांनी काय निर्माण केले ते विचारण्याची सोय नाही. त्यांनी फार तर त्यांच्या पोटापुरते पैसे कमावले असतील! कारण त्यांना जे शिक्षणाच्या नावाखाली मिळाले त्या पदवीला कुणीतरी अन्य गिऱ्हाआीक मिळाले. ती वस्तू अुपयोगी होती असे काही नाही.

परवाच्या शालान्त परीक्षेत शतप्रतिशत गुण मिळविणारे दोनशेभर विद्यार्थी आहेत. हा तर चमत्कार म्हणायचा! प्रत्येक शाळा आपल्या ८५-९०-९५ टक्के निकालासाठी  आपापली पाठ थोपटून घेत आहे, त्यात किती तथ्य आहे हेही प्रत्येकाला ठाअूक आहे. जाणत्यांना त्यातील फोलपण समजेल, पण मुलांचे तसे नाही. जी मुले पास केली गेली आहेत त्यांचे भवितव्य तर कठीण होआील. कारण त्यांच्याकडे प्रत्यक्षात नसलेली गुणवत्ता त्यांच्याकडे  असल्याची प्रशस्ती केली जात आहे.त्यामुळे तर  त्या प्रत्येकाचे आपल्या पात्रतेविषयी चुकीचे समज होत आहेत. मुलांची मने दुखवू नयेत हे खरेच आहे, पण त्यांच्या आयुष्याविषयी चुकीच्या कल्पनाही करून देअू नयेत.लहान मूल जसे अेका दिवशी व्यायाम केला की दंडातील बेडक्या दाखवू  लागते, तसेच बालीश चाळे आजकाल पालकांनी आरंभिले आहेत. मूल नापास झाले असे म्हणण्यापेक्षा `पुन्हा परीक्षा देण्याला पात्र' असे म्हणण्याने मुलांवर काही फरक होत असेलही, पण पालकांवर तो जास्त दिसून येतेा.

आपल्याकडे बेकारीची समस्या असल्याचे भासविले जाते, तशी ती नाही. प्रत्येकाला आपल्या क्षमता वाढल्याचा भास करून दिला जात आहे, त्या भासमान प्रतिष्ठित क्षमतेचे काम बाजारात नाही. प्रत्येक व्यवसायात चांगल्या माणसांची वाण आहे. भांगलायला आणि संगणकालाही कामाची माणसे मिळत नाहीत. दहावी बारावीला ज्यांना शून्य ते पंचाहत्तर गुण आहेत, त्यांनी अशा कामांची तयारी दाखवायला हवी. त्यात कमीपणा नाही हे पालकांनी त्यांना पटवून द्यायला हवे. ती कामे  प्रामाणिकपणे करूनही चांगले जगण्यापुरते पैसे मिळतात, हे वास्तव सांगायला हवे. पुणे बंगलोरच्या आय टी मधल्या, किंवा पाठोपाठ पगारवाढी देणाऱ्या सरकारी नोकऱ्या हे आकर्षण असले तरी ते प्रत्येकाला अुपलब्ध नसते; आणि यापुढच्या काळात ते तितके सोपेही ठरणार नाही.

हे  सारे लक्षात घेअून शालान्त परीक्षेच्या निकालास किती महत्व द्यायचे ते ठरवावे. आपल्याकडे मोसमी पावसाचा, नगरपरिषदांच्या निवडणुकांचा, चॅपियन करंडकाचा, आणि  आिफ्तार पाटर््यांचा जो अकारण गवगवा होतो, तसाच तो शालान्त परीक्षांचा होत आहे. त्यातून घटकाभराची चघळचर्चा होते; पण बऱ्याच काळचे प्रश्न कायमचे खडे होतात. म्हणून त्याचे तारतम्य दिसावे ही सुजाण समाजाकडून अपेक्षा आहे.

खडतर वाट आणि वाटमारी
देशाच्या प्रगतीसाठी दळणवळण ही महत्त्वाची गरज असते, त्यासाठी रस्ते आणि वाहतूक यांवर खूप भर देणे आवश्यक आहे. आपल्याकडे त्या बाबतीत अक्षम्य हेळसांड आणि ढिसाळपणा चालू आहे. त्या मुद्यावरून सर्व राजकारणी, कंत्राटदार, वाहनवाले, टोलवाले आणि सामान्य जनता हे सगळे घटक रस्त्यावरच येत असल्यामुळे व्यवस्था सरळ चालण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही.
सार्वजनिक बांधकाम नावाचे सरकारी खाते(रे) केवळ टेंडर आणि पैसा या चक्रात गुरफटले आहे. ही तऱ्हा राष्ट्नीय महामार्गापासून घराजवळच्या बोळकंडीपर्यंत पोचली आहे. रस्ता बांधण्याची सुरुवात करताना किंवा तेथील झाडे उधसत असताना रम्य झोकदार वळणाची चित्रे प्रदर्शित करण्यात येतात, पण तसा चित्रातला रस्ता एकही दिवस वाहनांच्या वाट्यास येत नाही. त्यातले सीमेंट-खडी-डांबर कुणाच्यातरी पोटात जाते, ते पचण्यापूर्वीच तो रस्ता रुंद करण्याची टूम निघते. मूळ रस्त्याला खड्डे, उरल्या ठिकाणी डायवर्शन आणि थोडी पैस जागा असेल तर तिथे टोल नाके. एवीतेवी टोल नावाची लूटमारच करायची तर ती तरी जरा सुसह्य करावी; तेही नाही! तिथे मैलभर रांगा, फेरीविक्रेत्यांची झुंबड, बेफिकीर मुजोरी! दोन-तीनशे किमीच्या प्रवासात दीडदोनशे रुपयांचा टोल भरूनही रस्ते हे असे. शिवाय ढाबे, गावांशी वर्दळ, अतिक्रमणे, टपऱ्या यांचा राबता टळत नाही. `राजमार्गा'ची ही स्थिती, मग शहरात-गावात काय शोभा वर्णावी!
लोकांच्या संतापाचा उद्रेक कोल्हापुरी नमुन्यात प्रकटतो, ती तर स्वतंत्र बुद्धिभेदी तऱ्हा! रस्ता बांधून टोल वसूल करण्याला प्रशासन व सत्ताधारी पक्षाने मान्यता दिली होती, त्यावेळपासून चारदोन वर्षात काही मोठा आवाज नव्हता. पण टोल सुरू होताच त्याला `सर्वपक्षीय' विरोध कसा होऊ शकतो? टोल देणे योग्य की अयोग्य यावरती वादंग होते. त्यात खरे तर सत्तेवरच्या पक्षाने टोलच्या बाजूने  राहायला हवे होते,  कारण तसे त्यांनीच ठरवून दिले होते. वादंग निर्माण झाले तर त्याचा न्याय करण्यासाठी न्यायालये आहेत. त्यानुसार उच्च न्यायालयाचा निर्णय झाल्यावरही तो न जुमानता टोलविरोधात धुडगूस आंदोलन चालू होते. न्यायालयाचा निर्णयही मान्य न करणारी या प्रकरणातील नेतेमंडळी बेळगाव व सीमाभागासाठी तरी न्यायालयात का जात असतील? कंत्राटी रस्त्याच्या दर्जाबद्दल तक्रार होती, ती प्रथमत: लावून धरायला हवी होती; आणि त्या दर्जाची तुलना अन्य रस्त्यांशी करायलाही हरकत नव्हती. काम करून घ्यायचे आणि संध्याकाळी मजुरी देताना कामाच्या दर्जाबद्दल तक्रारी काढून पैसे द्यायचे नाहीत हा व्यवहार कसा होतो? व्यापक आंदोलनाने एकाच शहरापुरती हवा तापविण्याऐवजी राज्यभरातील अशा पद्धतीविरुद्ध आंदोलन करायला हवे. तिथे राजकारण आडवे येते. सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगारांना खासदार-आमदारकी नाकारल्यावर कायदाच बदलणारा वटहुकूम काढू पाहणारे सरकार, आणि न्यायालयाचा निर्णय न मानता `टोल देणार नाही' म्हणणारा विरोधी पक्ष... असा जो लोकशाही दु:स्सह मार्ग सध्या जनतेच्या वाट्यास आला आहे, तोच विलक्षण खड्ड्यांचा व धोक्याचा बनला आहे. इतकेच नव्हे तर त्यासाठी मुकाट्याने टोल भरूनही लोकांना दु:स्सह लाचार जीवन-प्रवास करावा लागत आहे.
या साऱ्या सुलतानांची आपण प्रजाही सुलतानी वृत्तीचीच बनली गेलो आहे. सुलतानाला केवळ लूट, आणि छळ एवढाच रस्ता माहीत असतो, भोवतीच्या माणसाशी माणुसकीचे वर्तन त्याच्या स्वभावात नसते. गाभाऱ्यातला पुजारी जसा गर्दीतून पुढे आलेल्या भक्ताचे डोके दाबून देवाच्या पायी आपटतो, तीच वर्तणूक रेल्वेच्या-बँकेच्या खिडकीत, विम्याच्या-दवाखान्याच्या-मृत्यूदाखल्याच्या टेबलावर अनुभवायला मिळते. तिथेही खड्डे आणि डायवर्शनमधून जायचे आणि मुकाट्याने टोल भरायचा. त्याबद्दल कुणी-कुठे तक्रारच नव्हे, ब्र काढण्याची शक्यता नाही. कारण तो काढणाऱ्याची दमछाक होण्यापलीकडे त्याचा उपयोग नाही. फार जोर केला तर जिवाची भीती!
विकासाला अडथळा होणारे असले मार्ग टोलवसूलीने कसे सुधारणार? टोल आणि रस्त्यांमुळे आलेली रडकुंडी जनतेने कुणापुढे व्यक्त करावी?
गावातल्या रस्त्यांना तर कुणीच वाली नाही. सांडपाणी, पिण्याचे पाणी असो, गायी-बकऱ्या असोत, प्रातर्विधी-धुणी भांडी असो, दुकान-बाजार असो, की वाळू-काँक्रीट असो.... रस्ता सामुदायिकच असल्यामुळे त्यावर रहदारी सुखद असावी हे कोण पाहणार? रस्त्यांत हे अडथळे असतात ते केवळ मानसिक त्रासाचे म्हणून गैर नव्हे, तर नुकसानकारक आहेत याचे भान नाही. वाहनांची खराबी, इंधन वापर, मनुष्यवेळ, अपघात अशा सगळया बाजूंनी खूप नुकसान होत असते. गावोगावी स्वागतकमानी आणि शुभेच्छाफलक यांची भंकस चालली आहे, तो पैसा रस्त्याचे खड्डे आणि उकीरडे काढण्यासाठी खर्च केला तर सत्कारणी लागेल. रस्ता हे मानवी संस्कृृती पुढे नेणारे प्रतीक मानले तर आपली वाटचाल कोणत्या आणि कसल्या रस्त्यावर होत आहे हे कोणीही समजू शकेल. पण अधोगतीची गती वाढत असल्याने त्याच रस्त्यांशिवाय मार्ग नाही!!

सत्तानारायणाची पूजा
आटपाट नगर होतं. तेथे एक दरिद्री माणूस बायकोमुलांसह राहात होता. खायचे वांधे, ल्यायचे वांधे, अख्खे कुटुंब भिक्षा मागून जगायचे. रात्री जेवण मिळेल याची खात्री नसायची.
एकदा तो दरिद्री माणूस एका बंगल्यापाशी आला. तेथे माणसांची प्रचंड गर्दी होती. झेंडे होते, मोठमोठे फलक होते, मोटारी होत्या. प्रत्येकाच्या हातात नोटांची पुडकी होती. कुणाचा तरी जयजयकार चालला होता. भीतभीतच त्याने तिथल्या एका माणसाला विचारलं, ``साहेब, येथे काय चाललं आहे? मला भिक्षा मिळेल का?'' तो माणूस तुच्छतेने म्हणाला, `अरे भिकारड्या बाजूला हो.'' दुसऱ्याला विचारलं... त्यानंंही झिडकारलं. तिसऱ्याला मात्र दया आली. त्यानं विचारलं, ``तू मतदार आहेस का?'' त्या दरिद्री माणसानं `हो' म्हटलं. विचारपालट झाला.
त्या दरिद्री माणसाला बंगल्यात नेलं. हातपाय धुवायला गरम पाणी दिलं. तोंड पुसायला स्वच्छ टॉवेल दिला. खायला वडापाव दिला, प्यायला चहा दिला. दरिद्री माणसाला एवढं आदरातिथ्य जन्मात मिळालं नव्हतं.
मग त्या तिसऱ्या माणसानं सांगितलं, ``बाबा, येथे दर पाच वर्षांनी सत्तानारायणाची पूजा होते. सत्तानारायण प्रसन्न झाला तर पूजा करणारा नगरसेवक होतो, आमदार होतो, खासदार होतो. पाच वर्षांत त्याची भरभराट होते. प्रत्येक वर्षाला त्याच्या एका पिढीची ददात मिटते. पाच वर्षात पाच पिढ्यांची भरभराट होईल इतकी माया जमते. बंगले होतात. पंचतारांकित हॉटेले बांधता येतात, पेट्नेल पंप विकत घेता येतात... तू फक्त एवढंच करायचं... मतदान यंत्राचं आमच्या निशाणीसमोरचं बटण दाबायचं... आम्ही भरपूर बिदागी देऊ.''
दरिद्री माणूस खूश झाला. `तुमच्या निशाणीचं बटण दाबीन' म्हणाला. भक्तिभावानं सत्तानारायणाच्या चौरंगाला साष्टांग नमस्कार करून तो दरिद्री माणूस मनात म्हणाला, ``सत्तानारायणा, पाच वर्षांनंतर मीही तुझी पूजा करीन म्हणतो. माझ्यावर कृपा कर. भिक्षा मागून माझं कुटुंब फार कंटाळलं आहे रे....''
- गजानन वामनाचार्य, 
घाटकोपर(पू.) मुंबई -७५
(मोबा.९८१९३४१८४१)

घरगुती औषधोपचार
माझ्या लहानपणापासून मी पाहते, माझी आई शक्यतो दवाखान्यात जाऊन औषध आणायची नाही. किरकोळ आजारावर सर्वांना ती नेहमी घरगुतीच औषधे देत असताना, ती कशी तयार करते ते मी पाहत असे. गुणही यायचा ती म्हणायची, ``एवढ्या-तेवढ्याशाला दवाखाना कशाला गाठायचा ! सर्दी-पडसे, खोकला, कसर, करट, पोटदुखी-दाढदुखी-डोकेदुखी अशांसारखे किरकोळ आजार, मधूनमधून हवामानात बदल झाला की डोके वर काढतातच. अशा रोगांना सामोरे गेलेच पाहिजे. घरी स्वयंपाकघरात असणारे पदार्थ, अंगणातील वनस्पती वापरून प्रथमोपचार करून बघावा. कंटाळा करू नये.'' मलाही ते पटलं. खेळताना खरचटत, मुका मार बसतो, कधी ठेच लागते, पाय मुरगळतो, डोक्याला टेंगूळ येत, डोळयात धूळ जाते, बसमधील खिडकी बडवते, बोट कापत, कोणीतरी बेशुध्द पडत, कुणाचा घोणा फुटतो, हात भाजतो, वाफ येते. लग्नसमारंभात वगैरे काहीतरी कोणाला व्हायला लागत ! कोणीतरी कुठेतरी कडमडत ! दवाखाना जवळ असायला हवा, डॉक्टर दवाखान्यात असायला हवेत, अशावेळी आपणच नको का तात्पुरते वैद्य व्हायला !  तेच मला माझ्या आईने शिकवले.
    आपल्या परिचयाच्या, सहज मिळणाऱ्या वनस्पती अवतीभवती उगवलेल्या असतात. त्या म्हणत असतील की, माझा उपयोग करा आणि सुखी व्हा ! देण्यात सुख आहे हे दिल्याशिवाय कसे समजणार ! सूर्य प्रकाश-उष्णता देतो, नदी पाणी देते, जमीन अन्न-वस्त्र देते, वनस्पती तर सर्वस्व देतात.
    आईने दिलेल्या बटव्यातील औषधे मी स्वत: अनुभवली  आहेत. बरेच जणांना मी औषधे दिली आहेत. गुणकारी आहेत असा अनुभव आहे.

रोगांची गमतीशीर नावे
१) डोक्यावर काही भागांवर केस नसणे- चाई
२) डोक्याला फोड- गळू
३) जांघेत आणि काखेत फोड- मांजरी
४) नाकात फोड- माळीण
५) कानात फोड- गोसावी
६) डोळयाच्या पापणीला फोड- रांजणवाडी
७) हाडाच्या मणक्यावर ओळीने फोड- नागीण
८) तळपायाला घट्टे- भोरी,  कुरूप
९) टाचेला फोड- टाचरू
१०) नखात फोड- नखुरडे
११) पिंढरीला फोड- पैण
याशिवाय केसतूट, पुटकुळी, नायटा, गजकर्ण, इसब, मुरडा, वांग, लजक, भगभग, संग्रहणी, आंव, घामोळे, गालगुंड, खुजऱ्या, कांजिण्या असे अनेक रोग घरगुती आयाबाया उपचार करून बरे करीत.


खंबा फोर्ट ची मोहीम रामराव निकम यांची कामगिरी
एका उमद्या सेनाधिकाऱ्याने केलेल्या पराक्रमाची स्मृती जागवीत, त्या पुढच्या पिढीतील `सैनिक' गौररवस्थळी दाखल झाले.
आपल्या पित्याच्या कामगिरीची दखल घेताना त्यांना भरून पावले असणार यात नवल नाही.
 त्या पराक्रमास ७० वर्षे होतील. त्यानिमित्ताने त्या वीराची ही सन्मानगाथा.
कर्नल रामराव  निकम हे अजमेरच्या किंग जॉर्ज रॉयल आिंडियन मिलीटरी कॉलेज येथे शिकले. त्यांच्या कुटुंबात लष्कराचीच परंपरा होती. त्यांनी पहिल्या मराठा लाआिट आिंन्फंट्नी (जंगी पलटन)मध्ये प्रवेश केला व वायव्य सरहद्दीवर त्यांची नेमणूक झाली.  त्यांची निवड आिंडियन मिलीटरी अॅक्रॅडमीतील प्रशिक्षणासाठी झाली.  दुसऱ्या महायुध्द काळात त्यांची तुकडी ऑफ्रिकेला रवाना झाली. तिथून त्यांना जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणच्या आघाड्यांवर लढाआीचे अनुभव मिळाले. जपानमध्ये अणुबाँब पडल्यापासून त्यांना त्या शरणागत सैन्याधिकाऱ्यांना घेअून अस्ट्न्ेिलॉयात जावे लागले होते. जनरल ऑफिसर कमांडिंग २६ डिव्हिजन - नंतर ती जम्मू डिव्हिजन म्हणून ओळखली जाअू लागली, -मेजर जनरल आत्मा सिंग यांचे अे डी सी म्हणून निकम यांनी काम केले. अुधमपूरजवळ झालेल्या अेका भीषण अपघातातून ते बचावले, पण जनरलसाहेब गेले. नंतर चार लढाअू तुकड्यांत पराक्रमी कारकीर्द त्यांनी केली. दलाआी लामा तिबेटमधून निघण्यावेळी त्यांना आणण्याची कामगिरी  निकम यांच्याकडे होती.
त्यांच्या पराक्रम गाथजल अेक सोनेरी पान अलीकडेच अुलगडले गेले आहे. त्या सुवर्णपृष्ठाचे नाव आहे, `ऑपरेशन खंबा फोर्ट'. भारत पाक सीमेवर पाकिस्तानच्या बाजूस नौशेरा गावापासून २०किमी अंतरावर हा किल्ला आहे. त्या किल्ल्याची बांधणी काश्मीरचा महाराजा गुलाबसिंग याने १८१५ साली केली. सरहद्दीचा हा किल्ला १९४८ साली पाकिस्तानच्या ताब्यात होता.  किल्ला अुंच ठिकाणी असल्यामुळे  भारतीय लष्करावरती नजर ठेवणे पाक सैन्याला सोपे ठरत होते. विरुध्द बाजूला भारताची ३मराठा लाआीट आिंफंट्नी, पॅॅराशूट बटालियन तैनात होती. ले.कर्नल वीर्क आणि ब्रिगे. मोहम्मद अुस्मान हे सेनापती त्यांवर होते. महाभारताच्या  काळी  या जागी पांडवांचे वनवासकालीन वास्तव्य होते, अशी आख्यायिका आहे. तिथे पाच पांडव व कुंतीमाता यांच्यासाठी म्हणून सहा शिवलिंगे आहेत.
खंबा फोर्टवर चढाआीसाठी आपल्या बटालियनने दोन निरीक्षण ठाणी तयार केली, व तीन पेट्नेल गस्तपथके सुरू केली. त्यातील अेका गस्त पथकाचे नेतृत्व सर्वांत तरुण अधिकारी असूनही दुसऱ्या महायुदातील अनुभव होता; म्हणून रामराव निकम यांच्याकडे दिले होते, ते त्या वेळी लेफ्टनंट होते. पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती काढण्याची कामगिरी त्यांच्या पथकावर होती. ही जबाबदारी दोन आठवड्यात पार पाडून तीनचार आठवड्यात किल्ला ताब्यात घ्यायचाच, अशी योजना होती. हे काम अवघड आणि जोखमीचे होते.
ठरल्याप्रमाणे लेफ्ट. निकम यांनी आपले काम वेळेत पूर्ण केले. आित्थंभूत माहिती काढली. किल्ल्याशी जाण्याची चिंचोळी वाट होती.  शुक्रवारी पाकिस्तानी सैनिक नमाजसाठी किल्ल्यावरून खाली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्याच संधाचा फायदा घेअून त्यांनी ०९जुलै १९४८च्या रात्री किल्ल्यावर चढाआी केली. त्यांच्या तुकडीने शत्रूच्या बेसावधपणाचा फायदा घेत किल्ला काबीज केला. युध्दरेषा ओलांडून हे करणे फारच जोखमीचे होते. १० जुलैला त्यांनी आपल्या वरच्या तळावर ते वृत्त दिले. तीन दिवसांनंतर मौजमस्ती करून पाकिस्तानी सैन्य परत येत होते.  ले.रामराव निकम यांच्या तुकडीने लाआिट मशीनगन्स व ग्रेनेड्स आधीच किल्ल्याच्या दारावर व बुरुजावर तयार ठेवलेले होते. पाकिस्तानी सैन्य टप्प्यात येताच भारताच्या तुकडीने गोळीबार आणि हातगोळयांनीच त्यांचे `स्वागत' केले. त्ंयांची निकमांच्या तुकडीने कोंडी केली होती. शत्रूपक्षाचे काही सैनिक गारद झाले, आणि आपली मोहीम फत्ते झाली. ले.निकम यांनी आपल्या नीतीला अनुसरून, पाकच्या मयत व जखमी सैनिकांना घेअून जाण्याची त्यांना संधी आणि वेळ दिली. खंबा फोर्टवर तिरंगा फडकला. आजही तो फडकत आहे. लेफ्टनंट रामराव निकम यांचे वरिष्ठांनी कौतुक केले. हा सारा आितिहास  ले.ज.मॅथ्यू थॉमस यांच्या `ग्लोरी अँड द प्राआीस' या ग्रंथात नोंद आहे. आरडी निकम यांच्या पराक्रमाची नोंद भारताच्या संरक्षण विभागाच्या रेकॉर्डमध्येही आहे.
हा अधिकारी नंतर कर्नलच्या पदापर्यंत चढत गेला. १९६५ आणि १९७१च्या युध्दांतही त्यांनी भाग घेतला. विविध छावण्यांवर प्रशिक्षण केंद्रांत त्यांनी शेवटपर्यंत कामगिरी बजावली. १९८५ला निवृत्त झाल्यावर त्यांनी माजी सैनिक  निवृत्तीधारकांसाठी संघटना बांधली. वन रँक वन पेन्शन अलीकडे मंजूर करण्यात आली, पण त्यासाठीचे प्रयत्न निकम यांनी सुरू करून ते जागते ठेवले होते. त्याशिवाय त्यांचे प्रमुख कार्य म्हणजे `सैनिक सहकारी बँके'ची स्थापना.  आज त्या बँकेच्या २० शाखा आहेत, व कर्ज व्यवहार १६० कोटींचा आहे. त्या बँकेचे चेअरमनपद त्यांचे चिरंजीव क्रॅप्टन अुदाजीराव निकम हे सेनाधिकाऱ्याच्याच शिस्तीने समर्थपणे सांभाळत आहेत.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन