Skip to main content

Sampadkiya in 5Aug.2013

प्रसार  आणि  फैलाव
आजकाल साऱ्या पृथ्वीतलावर सगळे अनैतिक, वाईट, दुराचारी असे गलिच्छ ते घडते आहे असा एक लाडका समज कवटाळून बसण्याची रीत आहे. जे काही चुकीचे, त्याबद्दल त्रागा करावा; आणि त्याचा आपल्याला कसा-किती त्रास होतो हे एकमेकांसमोर कण्हत-कुंथत सांगावे, असे करून माणसाचे आयुष्य आनंदात जात असावे. परंतु जगात सर्वत्र सर्वकाळी केवळ भ्रष्टाचार दुराचार मातलेला असतो असे नाही. वाईट जे घडते ते स्वत: आपण केलेले नसते हे कदाचित खरेही असेल, पण जे काही चांगले घडले पाहिजे असे आपल्याला वाटते त्यासाठी तरी स्वत: काय करतो, हा प्रश्न पूर्णत: निरुत्तर करणारा असतो. सभोवताली फक्त आणि फक्त चांगले असू शकत नाही, कारण ते पुरेसे नाही. त्याला वाईटाची जोड असावीच लागते. आपल्या घराशेजारून झुळझुळत वाहणारा निर्झर असावा हे छानच, परंतु त्याइतकीच सांडपाण्याच्या गटारीची आवश्यकता असते.समारंभात अत्तराचे फवारे उधळले जातात, तशी खरकटे फेकण्याची सोय असावी लागते. प्रश्न असा असतो की त्या दोन्हींचा उपयोग व उपभोग आपण कसा करतो.

`आजकाल कोणतेही वृत्तपत्र खून-मारामाऱ्या-आणि फॅशन शो एवढ्याने भरलेले असते' हे एक सहज फेकलेले विधान असते. `टीव्हीवरती सूडकथा किंवा व्यभिचारी नाती एवढेच दाखवतात' हेही समांतर आशयाचे विधान असते. त्यात चूक फारशी नाही; पण ते सर्वस्वी खरे नाही. प्रसारमाध्यमे आज जगावरती राज्यच करतात हे खरे असले तरी अशा उल्लू-उथळ, काकदृष्टी माध्यमांचे कौतुकही करण्याचा उथळपणा चालतो. माध्यमे तर सर्व क्षेत्रात आहेत. अर्थ, बालक, शिक्षण, आरोग्य, कृषी... वगैरे सगळया क्षेत्रांची तपशीलवार हालहवाल कळविणारी, नव्याची दखल घेणारी शब्दश: असंख्य नियतकालिके आहेत. आपण ज्या क्षेत्रात काम करतो, अथवा ज्यात स्वत:ला स्वारस्य आहे असा विषय मांडणारे एखादे तरी नियतकालिक, पुस्तक आपल्यातील किती घरांत असते या प्रश्नाला प्रामाणिक उत्तर सोपे नाही. त्याउलट आजकाल जी वृत्तपत्रे उरावर येऊन आदळतात, ती आपल्या भागात घडणाऱ्या अशा बातम्या निवडून छापतात की ज्या हीनतेत आपल्याला स्वारस्यच आहे; म्हणून तर ती आपण विकत घेतो, सकाळी `ते' वृत्तपत्र नसेल तर बेचैन होतो!

एखाद्या - किंवा कोणत्याही - विषयाचे संशोधन, उपयोजन, प्रयोग, निष्कर्ष यांची माहिती देणारी अध्यात्मापासून सौंदर्यसाधनेपर्यंत आणि हिरेमाणकांपासून कीटकनाशकांपर्यंत सगळया विषयांची प्रसारमाध्यमे आहेत. दैनंदिन व्यवहारांत झुळझुळता निर्झर आणि गटार या दोन्हींत, पाणी हेच माध्यम असते, पाण्याचीच अटळ गरज असते. आस्वाद कोणत्या माध्यमाचा घ्यायचा हे आपल्या बौद्धिक उंचीवर, आवडीवर, प्रतिष्ठेच्या कल्पनांवर आणि उपयुक्ततेवर अवलंबून असते.

तथाकथित सेलिब्रेटी किंवा प्रस्थापित व्यक्ती, संस्था, आणि नेते यांच्यामागे धावणारा एक अर्धशिक्षित हपापा सदासर्वकाळ असतो. आपल्या गरजा, ज्ञान, मर्यादा, आवड आणि समाधान यांचा विचार केला तर त्यामागे धावण्याचे कारणच पडत नाही. आजच्याच समाजात इतक्या गोष्टी चांगल्या घडत आहेत की, त्या पाहिल्यावर हे जग उत्तमही चालले आहे असा विश्वास वाटू लागतो. उत्तरांचल राज्यात जलप्रलय झाला त्यावेळी सरकारी यंत्रणेतील चुकांवर खूप चर्चा झाली. तेथील व्यवसायिकांनी दरवाढ आणि साठेबाजी करून पर्यटकांना लुटले, हेही खूप ठिकाणी प्रसिद्ध झाले. परंतु रा.स्व.संघ, क्लब, स्थानिक युवकसंघटना यांच्याकडून मोठे मदतकार्य झाले याबद्दल कुठेतरी कोपऱ्यात नोंद घेतली गेली. आपल्या लष्कराच्या कामगिरीच्या मानाने त्याची फार कमी दखल घेतली गेली.

याला दुसरीही एक बाजू आहे. ती अशी की, चांगले व्हावे, चांगले घडावे, ते लोकांपर्यंत पोचावे यासाठी योग्य काही प्रयत्न होत नाहीत. तसल्या उथळ `बलात्कारी' वृत्तपत्रातच आपले नाव, आपले काम प्रसिद्ध व्हायला हवे असे अनेकांस वाटते. ती माध्यमे तर निखल धंदेवाईक असतात. `ती आमच्या बातम्या छापत नाहीत' असे रडगाणे तरी चांगल्या कार्यांनी का गावे? एखाद्या शिक्षकाला पुरस्कार मिळाला तर त्याचे वृत्त तो शिक्षणविषयक नियतकालिकास पाठवतही नाही, परंतु स्थानिक चोरमारी वृत्तपत्राच्या दारी नेऊन देतो, त्यांच्या मागे लागतो. आणि `काहीही करून' ते फोटोसह प्रसिद्ध झाले की धन्यतेने त्याचे कात्रण संग्रही ठेवतो. डॉक्टरनी आपले अनुभव, सल्ले-सूचना आरोग्यविषयक मासिकात चर्चेसाठी मांडले असे घडत नाही. पण सोनोग्राफीने गर्भपरीक्षा करण्याचे गुन्हे वृत्तपत्रात येण्याचे कोण कौतुक! हे जर प्रतिष्ठितपणाचे मोजमाप असेल तर खऱ्या चांगल्याच्या शोधात असणारे, ते आपण नव्हे हे समजून घ्यावे.

स्वयंसेवी संस्था व त्यातील कार्यकर्ते आज गावोगावी कार्यमग्न आहेत. त्यांचे कार्य, कार्यक्रम, अडचणी, सहभाग यांच्याविषयी परस्पर संवाद आवश्यकच असतो. परंतु त्यांच्याही अपेक्षा अशाच प्रकारच्या उथळ किडीच्या फैलावावर टेकलेल्या राहाव्यात याचे आश्चर्य वाटते. त्यांच्या उपक्रमाबद्दल `ही' वृत्तपत्रे तुसडेगिरी करतात ही तक्रार एका बाजूने ऐकू येते; तर त्या त्या विषयांना स्थान देऊ पाहणाऱ्या, चांगले प्रयत्न लोकांपुढे आणणाऱ्या योग्य प्रसारमाध्यमांना त्याच संस्था व कार्यकर्ते किंचितही दाद देत नाहीत ही तक्रार दुसरीकडून उमटते.

कोणी दाद-दखल घेवो न घेवो, आपले काम करीत राहावे असेही म्हणणारे कित्येक, असंख्य आहेत. त्यांना `त्या' जगाची फार चिंता नाही. एखादा अपघात झाला तर संकटनिवारणासाठी धावणारी माणसे असतातच. परंतु बघे, बडबडे फार जास्त! त्यांना मृतांची नावे, प्रवासाचे निमित्य, वाचलेले पोर आणि पोलिसांची बेफिेकरी यांतून खूपखूप आनंद मिळतो. तथापि ग्रस्तांना दवाखान्यात नेणारे, प्रसंगी रक्त देणारे असेही खूप असतात. त्यांना स्थान देणारी माध्यमे माणसाच्या प्रगल्भतेचे निर्झर झुळझुळत ठेवतात. ते आहेतच, म्हणून तुंबणाऱ्या गटारी स्वच्छ होण्याची आशा असते. आपण कोणत्या काठावर पाय बुडवून बसायचे याचा विचार ज्याचा त्याने करावा!
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...