Skip to main content

Apale Jag 26Aug.2013

ज्ञानरचनावाद-सार्वत्रिक चळवळीची गरज
- प्रशांत देशपांडे
सचिव, तुळजाभवानी शिक्षण मंडळ, इस्लांपूर (जि.सांगली) फोन : ९८२२२४१९१३
माणसाच्या आयुष्यातील समस्या सोडविता याव्यात हा तर शिक्षणाचा मूळ उद्देश असतो. परंतु गेल्या काही वर्षांत शिक्षण हीच एक समस्या आहे, असे म्हणण्याची पाळी सर्व संबंधी घटकांवर आली आहे. आयुष्य सुसंस्कृत, संपन्न तरीही जिज्ञासू करण्यासाठी शिक्षणाने दिशा द्यायला हवी. तसे `आनंददायी शिक्षण' ही संकल्पना मुलांच्या वाट्याला गेल्या पाच-पन्नास वर्षांत आलेलीच नाही. उलट, शासन-पालक-शिक्षक यांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. गेल्या काही वर्षांत तर `घोका आणि ओका' पद्धतीची शिक्षणव्यवस्था आपल्याकडे रुळून गेली. विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात चांगले जगता येईल इतकीही क्षमता त्यामधून प्राप्त झालेली नाही. निव्वळ परीक्षार्थी मुले, वेतनार्थी शिक्षक आणि उदासीन पालक अशी एक साखळी तयार झाली.

ही स्थिती सर्वच घटकांना अमान्य होती. पुष्कळ वर्षांच्या कटू अनुभवातून आणि अनेक विचारवंतांच्या मंथनातून शिक्षणविषयक नवा प्रयोग अलीकडे सुरू झाला आहे. सहामाही किंवा वार्षिक परीक्षांतील स्मरणआधारी गुणांकनावर मोजली जाणारी गुणवत्ता फसवी असल्याचे मान्य होऊ लागले, आणि मुलांच्या शैक्षणिक आकलनाचे मूल्यांकन प्रत्येक दिवशी करून त्याची वर्षभरातील प्रगती जोखण्याची नवी पद्धती आता येऊ घातली आहे. या बदलामागची भूमिका, त्याची प्रक्रिया आणि अपेक्षित परिणाम हे सर्व प्रामाणिकपणे समजून न घेता `आता काय परीक्षाच नाहीत' असा टोकाचा वैचारिक गोंधळ पुष्कळजण निर्माण करत आहेत. हे एक उदाहरण लक्षात घेतले तर शिक्षणक्षेत्रात येऊ घातलेल्या नव्या प्रयोगाविषयी सर्वांना आकलन होणे कसे अकारण बिकट केले जात आहे त्याचा अंदाज येईल.
मानवाच्या उत्क्रांतीपासून त्याची जी जडणघडण होत आली आहे, त्याविषयी सातत्याने संशोधन सुरू असते. त्यामधून पुढे येणारे सिध्दांत विचारात घ्यायला हवेत. मानवाच्या एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जी गुणवैशिष्ट्ये संक्रेमत होतात, त्यांमध्ये सर्वसाधारणत: शरीराची ठेवण, रंगरूप, स्वभाव-आवडी इत्यादी बाबी आपल्याला सहजी दिसून येतात. त्याच प्रकारची आनुवंशिकता विचार, क्षमता, संस्कृती यांचीही असते. कुणी त्यांस `आधीच्या पिढीचे संस्कार' म्हणावे. परंतु याचा स्पष्ट अर्थ असा की, विद्यार्थ्यांची आजची पिढी कल्पक, जिज्ञासू व प्रयत्नशील व्हायची असेल तर शिक्षक-पालकांच्या सध्याच्या पिढीने ती तशी `घडविली' पाहिजे. त्यासाठी नवा ज्ञानरचनावाद समजून घेतला पाहिजे.
आजपर्यंतच्या पारंपरिक विचारांच्या चौकटी मोडून टाकून मुलांच्या नव्या भविष्यासाठी, त्यांच्यासमोर वेगळी आव्हाने आणि प्रश्न उभे न करता, त्यांची उत्तरे त्यांनाच शोधता येतील अशी शिक्षणाची दिशा असली पाहिजे, हे आता तज्ज्ञ मंडळी मान्य करत आहेत. `वर्तन परिवर्तन म्हणजे शिक्षण' असे विनोबांनी म्हणून ठेवले आहे. परंतु केवळ वर्तनवादी शिक्षणपद्धतीतून ठोकळेबाज पदव्या मिळत जाण्यामुळे परिवर्तनाची कोणतीही वाट एकेका पिढीला सापडू शकलेली नाही हे तर आपण सर्वजण मान्य करतो. म्हणजेच आपल्यापुढील अनेक जटिल समस्या निवारण करण्यासाठी सध्यापेक्षा वेगळया काहीतरी शिक्षणपद्धतीचा अवलंब आपल्याला करावा लागेल हे स्पष्ट आहे.
परीक्षापध्दती रद्द होणार यावरसुद्धा पुष्कळ टीका केली जाते आणि परीक्षा हव्यातच असे प्रतिपादन केले जाते. त्यावर एक साधे उत्तर असे की, आजपर्यंत परीक्षापद्धती होतीच, त्या पद्धतीमुळे समस्या कमी न होता वाढत चालल्या आहेत, हे तर कोणालाही मान्य असते. म्हणजेच ही पद्धत बाजूला करण्याची तर आवश्यकता आहे. त्याच्या जागी पर्याय कोणता असेल हे मात्र टीकाकारांपैकी कोणी सांगत नाही.
प्रचलित शिक्षणपद्धती ही शिकवून-घोकून-घोटून चालणारी साधना, परीक्षांतील गुणांकन आणि प्रात्यक्षिके व कृतिशीलतेशी फारकत अशा तऱ्हेच्या `शिक्षककेंद्री' बाबींवर भर देणारी होती. साधारणत: वयाच्या पंचविशीत शिक्षकाने शिकलेला विषय त्याच्या साठीपर्यंत तो शिकवत असतो. या पस्तीस वर्षात, निदान आजच्या युगात तरी प्रत्येक क्षेत्राने कोठल्या कोठे भरारी घेतलेली असते. परंतु आम्ही शिकवतो तेच ज्ञान, अशी शिक्षकांची समजूत पक्की होऊन बसल्यामुळे विद्यार्थ्यांमधील विचारप्रवणता, त्यांच्यातील नाविन्याची ओढ, सृजनता अशा गोष्टींना वावच मिळत नाही. चाकोरीबद्ध विचारांची पुनरावृत्ती होत राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि एकूणच शिक्षणक्षेत्राला नवीन कल्पना, नवीन स्वप्ने पडेनाशी होतात हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे समस्यांचे समाधान शोधण्याच्या बाबतीत पारंपरिकता व अपरिपप्ता सर्वत्र जाणवते.
साऱ्या जगातील शिक्षणविषयक अनुभव पाहिल्यानंतर, आपल्या देशातील उगवत्या पिढीची क्षमता तोलून पाहण्याचा एक छंद आपण जोपासलेला असतो. संशोधन, त्याचे उपयोजन आणि जीवनातील मूल्यांना येत चाललेले महत्त्व, पारदर्शीपणा, हिशेबीपणा अशा सर्व बाबतीत इतर जगापेक्षा आपली मुले मागे पडता कामा नयेत हे निर्विवाद आहे. कल्पकता, उन्मेष आणि नवीन विचार यातूनच विज्ञान व तंत्रज्ञान, उत्पादन, प्रक्रिया, व्यवस्थापन आणि सेवा ही क्षेत्रे आपल्या देशात काही अपवाद वगळता म्हणावी तशी विकसित झालेली नाहीत. याविषयी आंतरराष्ट्नीय पातळीवर मान्यताप्राप्त अशा संशोधन व बौद्धिक संपदा यांच्या स्वामित्व अधिकारावर (पेटंटस्) भारतीयांचा प्रभाव अपेक्षेइतका दिसत नाही.
जागतिक नवनिर्मितीचा निर्देशांक (ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स) चालू २०१३ या वर्षातच प्रसिद्ध झाला आहे. त्या अहवालानुसार नवनिर्मितीच्या क्षेत्रात उमलत्या भारतीय तरुणांचा निर्देशांक ६६वा आहे. चीनचा ३५ वा, जपान २२, सिंगापूर ८, हाँगकाँग ७ अशी ही क्रमवारी आहे. २०१२ साली आपण ६४ व्या क्रमांकावर होतो. चालू वर्षी तोही क्रमांक खाली गेला आहे. अनेक आखाती देश आणि मॉरिशससारखा छोटा देशसुद्धा आपल्यापेक्षा पुढे आहे आणि विशेष म्हणजे गेली सतत तीन वर्षे स्वित्झर्लन्ड प्रथम क्रमांकावर आहे. हा निर्देशांक तरुण पिढीच्या सृजनशीलतेवर, प्रयोगशीलतेवर, नव्या कल्पनांच्या संशोधनावर आणि प्रत्यक्ष उपयोजनावर अवलंबून असतो. त्या बाबतीत आपण किती मागे पडतो आहोत याचे वास्तव, आजचे शालीय विद्यार्थी गांभीर्याने घेऊ शकणार नाहीत कारण त्यांचे अजूनी ते वय नव्हे. परंतु शिक्षक, पालक आणि शासन यांनी तरी हे क्रमांक पाहून चिंताग्रस्त व्हायला हवे.
अशा स्थितीमुळे आपल्या देशातील उद्योगीकरण, विदेशी गुंतवणूक, रोजगार, बाजारपेठेतील वर्चस्व, आर्थिक विकासाचा दर, ज्ञानाची निर्मिती, मनुष्यबळाचे व्यवस्थापन या सगळया बाबतीत सुधारणांचा वेग अतिशय कमी दिसून येतो. अशा अनेक स्तरांवर परिणामकारक आणि सकारात्मक बदल तातडीने घडून यायला हवेत. मुलांच्या अनेकविध क्षमता आणि कौशल्ये यांचा विकास विद्यार्थीदशेतच होणे आवश्यक आहे. आपण अद्यापि शाळांचे प्रवेश, त्यासाठी नियम अटी, शिक्षकांच्या नेमणुका, पालकांचे गैरसमज आणि शासनाकडून येणाऱ्या सूचना व आदेश... एवढ्यावरतीच सर्व शिक्षणक्षेत्र पूर्णत: गोंधळून टाकले आहे. याकरिता असे पारंपारिक समज आणि आजपर्यंतच्या पद्धतीवर विसंबून न राहता नव्या ज्ञानरचनावादाचा पुरस्कार लवकर करणे अनिवार्य आहे.
आजपर्यंत कधीतरी, केव्हातरी, कोणीतरी तयार केलेल्या पाठ्यपुस्तकातील उपलब्ध माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचे काम शिक्षक करीत असत. शिक्षक कितीही तळमळीचा असेल तरीही त्याच्याकडून `शिकविण्याची क्रिया' एकतर्फी होत राहते. विद्यार्थ्यांकडून त्याच तत्परतेने `शिकण्याची' क्रिया घडत नाही. शिक्षक क्रियाशील असले तरी वर्गातील मुले मात्र निष्क्रीय बनतात, हा अनुभव आतापर्यंत आपण घेत आलेलो आहोत. नव्या रचनावादी शिक्षणपद्धतीत, उपलब्ध होणाऱ्या माहितीचे रूपांतर मुले स्वयंअध्ययनाने आणि स्वयंअनुभवाने स्वत:च्या ज्ञानात करतात. म्हणजेच मुले स्वत:हून आपल्याला आवश्यक असणाऱ्या ज्ञानाची रचना करतात. अर्थातच यासाठी शिक्षकाचे अत्यंत बारीक लक्ष आणि विद्यार्थ्यांना नवीन नवीन काहीतरी देण्याची क्षमता असली पाहिजे, नसली तर ती वाढवली पाहिजे. अशा वर्गातील शिक्षक आणि विद्यार्थी दोन्ही सतत कृतिशील राहतील, याकरिता विविधांगी समृद्ध अनुभव देण्याच्या अनेक कल्पक योजना करीत राहणे आणि त्या सतत राबवीत राहणे ही शिक्षकांची मुख्य जबाबदारी असेल. मुलांच्या कोणत्या वयोगटाला कोणते उपक्रम द्यावेत याविषयी शिक्षकांनीच पूर्वतयारी आणि गृहपाठ करत राहिले पाहिजे. मुलांच्या क्षमता आणि कौशल्ये त्यातूनच विकसित होणार आहेत हे विशेषत: शिक्षकांनी लक्षात घ्यावे आणि मुख्यत: पालकांना हे पटवून द्यावे. `११ ते ५ पाट्या टाकणे' या स्वरूपाचे शिक्षण कुठे चालत असेल तर ते लवकरात लवकर नामशेष व्हायला हवे. बहुतांशी सर्व शिक्षक या परिवर्तनाला मनापासून तयारच आहेत. परंतु समाजातील काही गट या नव्या बदलास अकारण विरोधसुद्धा करताना दिसतात.
नव्या रचनावादी शिक्षणपद्धतीची काही वैशिष्ट्ये नमूद करता येतील, ती अशी -
* रचनावादी शिक्षणपद्धती मुलांच्या `व्यक्तिगत शिकण्याकडे' जास्त भर देते. म्हणजेच शिक्षण विद्यार्थीकेंद्री होते. उपलब्ध होणाऱ्या माहितीतून स्वयंअध्ययन, स्वानुभव आणि स्वनिर्मिती अशाच मार्गाने विद्यार्थी शिक्षित होत जातात.
* मुलांचे शिक्षण कृतिकेंद्री आणि अनुभवाधारित असते. प्रात्यक्षिक आणि प्रयोग यावर अधिक भर राहील, अशा पद्धतीने मुले जे शिकतील ते त्यांच्या स्मरणात कायमचे राहील.
* कल्पक नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि उपक्रम याद्वारे मुले कृतिशील होतील. अशा अनुभवांतून स्वत:ची बुद्धिमत्ता व ज्ञान वापरतील, आणि त्या प्रयोगातून त्यांची विचारक्षमता वाढेल. अमूर्त अशा वैचारिक अनुभवांकडे विद्यार्थ्यांनी गेले पाहिजे. तरच त्यांना मूल्यांचे मोल कळेल.
* शाळेला सुट्टी मिळाली तर मुलांना आनंद होतो, ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. असे का व्हावे? मुलांना शाळेत जाण्यात आनंद वाटला पाहिजे. त्यांची शिकण्याची ऊर्मी दिवसभर टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. त्यासाठी शालीय परिसरात, वर्गात आणि घराघरातसुद्धा पोषक वातावरण असले पाहिजे, जेणेकरून मुलांचे शिक्षणच आनंददायी होईल. कुणीतरी सारखे शिकवीत राहिले तर मुले कंटाळतात, वैतागतात. त्याऐवजी आजूबाजूच्या वातावरणातून मुले ज्ञान शोषून घेत असतात. बाजूच्या समाजातून, सृष्टीतून, अनुभवातून त्यांना जास्त शिकायला मिळते. ते त्यांना हवे असते. परंतु पुस्तकातील पाठ, पाठांतर नको असते. म्हणून त्यांच्या जिज्ञासेची पूर्ती होईल असे भोवतीचे जगच तयार करण्याचे काम शाळेचे व शिक्षकांचे आहे. ज्यायोगे त्यांना शिक्षणात आनंद वाटेल.
* मुलांच्या कल्पनाशक्तीला, जिज्ञासेला जागृत ठेवण्यासाठी त्यांच्यापुढे बौद्धिक आव्हानांच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत. त्यांना पेलतील अशी आव्हाने स्वीकारणे मुलांना आवडते. त्यांचे शिकणे आशयसंपन्न होण्यासाठी ते निरस व कंटाळवाणे करण्याऐवजी आव्हानात्मक करावे. `हे तुला जमेल, प्रयत्न कर, तू सहज करशील' अशा तऱ्हेचे प्रोत्साहन देत त्यांच्यापुढे संधी निर्माण करत राहिले पाहिजे. हे काम शिक्षक व पालक यांच्यासाठी फार महत्त्वाचे, परंतु म्हटले तर खूप कठीण आहे. मात्र ते अटळच मानले पाहिजे.
* शिकायचे कशासाठी? - याचे स्पष्ट उत्तर शिक्षक आणि पालक यांच्यासमोर असले पाहिजेच. ताणतणावाच्या परिस्थितीत मुले शिकत नाहीत आणि परीक्षाही देऊ शकत नाहीत. त्यासाठी त्यांची भावनिक स्थिरता फार महत्त्वाची असते. सातत्याने परीक्षा, त्यात गुण मिळवण्याची सक्ती, थोडेसे कमी गुण मिळण्याने आयुष्यच वाया जाण्याची भीती, अटीतटीचे पाठांतर आणि एकूण अभ्यासाचा ताण या बाबी मुलांवर प्रचंड बौद्धिक ओझे लादत असतात. शिकण्यासाठी लागणारा उत्साह, मानसिकता आणि भावनिक स्थिरता मुलांना प्राप्त असलीच पाहिजे. खेळीमेळीत होणारे शिक्षण परिणामकारक होते, परंतु अशी खेळीमेळी सर्वत्र सतत टिकविणे ही जबाबदारी शिक्षक व पालकांची आहे, ती सोपी नाही.
स्वयंशिक्षणाच्या अपार संधी, व्यक्तिगत प्रत्येक मुलाच्या वकूबाप्रमाणे शिक्षणाची रचना, बौद्धिक आव्हाने पेलण्याच्या संधी, आवड आणि निवडीचे स्वातंत्र्य, अनुभव आणि प्रत्यक्ष कृतिकेंद्री शिक्षण ही सर्व रचना उभी करणे आवश्यक आहे. शिकण्याची व जे शिकतो ते कायम ज्ञानस्वरूपात साठविण्याची मुलांची क्षमता तरच वाढेल. मुलांच्या भावनांची कदर झाली तर कोणतीही गोष्ट मुले सहजपणाने आणि अतिशय वेगाने शिकतात. त्यांच्या शिक्षणाने शाळा-घर आणि एकूण समाज या सर्वांवर किती मोठा परिणाम होत आहे हे मुलांना जाणवून दिले तर मुलांची जबाबदारी त्यांना आपोआप कळेल.
अशा विविधांगी संधी जेथे उपलब्ध असतात, ते स्थान म्हणजे शाळा - अशी नव्या रचनावादाने शाळेची व्याख्या केली आहे. अशा विद्यार्थीकेंद्री शाळा निर्माण झाल्या पाहिजेत. आपल्या सध्याच्या शाळांचे रूपांतर अशा नवरचनावादी शाळांत करण्याचा ध्यास शिक्षकांनी घेतला पाहिजे. संस्थाचालकांनी आपल्या शिक्षकांना तशी संधी आणि स्वातंत्र्य दिले पाहिजे आणि अशाच प्रयोगशील शाळांचा शोध घेऊन पालकांनी आपली मुले तिथे दाखल करण्याचा आग्रह धरला पाहिजे.
थोडक्यात म्हणजे समाजातील सर्वच घटकांनी नव्या रचनावादी शिक्षणपद्धतीचे सार्वत्रीकरण करून आपापल्या परीने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाठपुरावा केला पाहिजे. योगायोगाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा, शासकीय पातळीवरून काही चांगले बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. आणि त्या अनुषंगाने आदेशही प्राप्त होत आहेत. परंतु या सर्व मूलभूत संकल्पना आणि कार्यपद्धती यांची अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत काहीसा गोंधळ निर्माण करणारी स्थित्यंतराची एक अवस्था सध्या काही वेळेला जाणवते, पण लवकरच सर्व स्थिरस्थावर होऊन शिक्षणाच्या संदर्भात सर्वच घटक नव्या शैक्षणिक रचनावादाने झपाटून जातील अशी आशा करायला हरकत नाही.
अर्थातच या सर्व नव्या योजनांसाठी आर्थिक गरजही वाढणार आहे. शासनाची तिजोरी शिक्षणावर किती खर्च करू शकेल याबाबतीत पुष्कळशी शंका वाटते. नव्या विकासाला पुरेल इतके आर्थिक बळ शासनाकडे सध्या तरी दिसत नाही. परंतु या बाबतीत समाजानेही समजून घेऊन शाळांची व मुलांच्या शिक्षणाची आर्थिक बाजू मजबूत करणे फारसे कठीण नाही. शासकीय नियोजनाचाच विचार करायचा झाला तर, रोजगार आणि धान्यपुरवठा या बाबतीत अलीकडे केलेल्या योजना सफल झाल्या तर, प्रत्येक कुटुंबाने शिल्लक राहिलेली सर्व ताकद आपल्या पुढच्या पिढीच्या शिक्षणावर वापरण्याचे ठरविले पाहिजे. शिक्षणासाठी समाजातून पैसा कमी पडेल ही शक्यता नाही. परंतु अशा नव्या युगातील शिक्षणविषयक परिवर्तनासाठी पैसा उभा करावा लागेल ही गोष्टही पालकांनी मनोमनी समजून घेतली पाहिजे. हा पैसा मुलांना मिळणाऱ्या संधीसाठीच खर्च व्हावा यात दुमत होण्याचे कारण नाही.
***



दाभोलकरांच्या वाट्याला कर्मकांड
नरेंद्र दाभोलकर यांच्यासारखा माणूस कुणाच्या गोळयांना भीषण प्रकारे बळी पडला, त्या घटनेचे स्वाभाविक सार्वत्रिक पडसाद जे उमटले, त्यात कमालीची हळहळ आणि उद्वेग दाटलेला होता. धक्कादायक बातमी होती, त्यातून विषादाचा उपजत सूर होता. तथापि त्या सर्वांस छेदत, परिस्थितीवर कुणाचे नियंत्रण नसल्याची अराजकी जाणीव जास्त भयप्रद होती. समाजाचेच काम करण्यासाठी म्हणून जे कार्यकर्ते घराचा उंबरठा ओलांडतात, त्यांना त्याच समाजातून विरोध होतो हे तर सार्वकालिक आहे. डॉ.दाभोलकर यांनाही संघर्ष चुकलेला नव्हता. किंबहुना कार्याचा विस्तार जेवढा वाढत जातो, त्या प्रमाणात विरोधांची टोकेही वाढत जातात. दाभोलकरांना तशा काही धमक्या येत होत्या, यावरतीही कोणा कार्यकर्त्याचा सहज विश्वास बसण्याचे कारणच हे की, तसाही अनुभव पुष्कळ कार्यकर्त्यांचा असतो.

सामाजिक दुर्दैव असे की, अशा घटनेबाबत शासन, मंत्री, विविध संघटनांचे विविध प्रमुख, आणि अपवाद वगळता सर्व समाज, यांच्या प्रतिक्रियांतून उथळपणाशिवाय काहीही जाणवले नाही. चॅनलवाल्यांनी तर आता ताळ सोडला आहे. कुणी तरी कुठेतरी एक शब्द असा-तसा उच्चारला की त्याचा अर्थच्छल करीत कैचीत पकडून दिवसभर ब्रेकिंग काथ्याकूट घालण्याचा त्यानी उद्योगच मांडला आहे. पण ज्यांच्याकडून काही धीरोदात्त वागण्याबोलण्याची अपेक्षा करावी, त्यांनीही एक कर्मकांड उरकल्याप्रमाणेच अंधश्रद्धेने हा `इव्हेंट' करावा याचे अधिक दु:ख होते. दाभोलकर ज्या पुरोगामी विज्ञानवादासाठी झगडले, त्यांतून काय निष्पन्न झाले; या विचाराने मन जास्तच आक्रंदन करीत उठते.

या प्रकाराचा निषेध करण्यासाठी गावोगावची कित्येक कॉलेजे बंद ठेवली गेली. प्राध्यापकांचा किमान त्या दिवसाचा पगार दाभोलकरांच्या कार्यासाठी द्यायचा होता! साधारण सहाशे विद्यार्थी एका कॉलेजात मानले तर ५० जणांचा एक, असे १२-१२ गावांतून अंधश्रध्दा-जादूटोणा विरोधी वातावरण तयार करता आले असते. यांपैकी अनेक कॉलेजांतून स्वत: दाभोलकर वा त्यांच्या कार्यकर्त्यांनी `कार्याची' शपथ दिली असेल! त्या शपथेच्या पालनातून फारच अपेक्षा करायची, तर मग शासनाला वेगळा कायदा करायची गरजच लागली नसती! दाभोलकरांच्या प्रतिमा वऱ्हांड्यात मांडून त्यापुढे उदबत्ती लावण्याचा प्रकार श्रद्धेचाच मानावा लागेल हे खरे, पण दाभोलकरांनी जो पुरोगामी विज्ञानवाद मांडला, त्याला हे साजेसे नाही, हे निदान महाविद्यालयीन क्षेत्राच्या - निदान अशा प्रसंगी - लक्षात यायला नको का?

मुख्यमंत्र्यांनी लगेच `गांधीजींची हत्त्या करणाऱ्या याच प्रवृत्ती...' वगैरे तद्दन राजकारणी बोल काढले; तर `कोणत्या संघटनेवर बंदी घाला' असेही जाहीर सल्ले सुरू झाले. मारेकरी कोण हे ठरत नाही, पोलिसांचा शोध जारी आहे, तोपर्यंत हे सारे बोलके न्यायमूर्ती न्यायदान करून मोकळे! कल्पना अशी करून पाहावी की, उद्या कोणत्या विदेशी अतिरेकी संघटनेचा हात असल्याचे निष्पन्न झाले तर या उत्साहमूर्तीची तीच वाक्ये ठाम असतील काय? गांधीजींच्या हत्त्येसाठी मग पाक अतिरेकी प्रवृत्तीच नव्याने कारणीभूत होणार का? - की त्या संघटनांवर बंदी घालायला हे वाचावीर वाघा सरहद्द ओलांडणार? मारेकरी शोधण्यासाठी व न्यायालयात गुन्हा शाबीत होऊन कठोरात कठोर शिक्षा लवकर होण्यासाठी, सरकारने आपली सारी शक्ती पणाला लावली पाहिजे. इथे तर `पोलिस तपास चालू आहे' ही रेकॉर्ड किती काळ ऐकावी लागेल ते सांगता येत नाही. परंतु तोही तपास न करताच मुख्यमंत्री आरोपी जाहीर करू शकत असतील तर त्यास तरी फाशी देण्याची हिंमत दाखवावी. राजीव गांधींचे मारेकरी सापडले, न्यायदान झाले, तरी त्या अपराध्यांना माफ करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांच्याच पक्षाध्यक्षांनी का घ्यावी, एवढे तरी त्यांनी विचारावे. इथे पोलीस, सरकार, न्याय या साऱ्या यंत्रणा अशा चालतात की, अपराध्याला शासन होऊ नये. पण खऱ्या कार्यकर्त्यांस भोगावे लागावे. अनाचार फोफावण्यास हेही मोठे कारण आहे हे मुख्यमंत्री व पंतप्रधान लक्षात घेतात याची कुठेही प्रचिती नाही. कदाचित मारेकरी न शोधता, संशयसुई कुठेही कलती ठेवणे अशीही निवडणूक-योजना असेल.

एका बुध्दिवादी शहरात, भरदिवसा, रस्त्यात एका विचारवंत कार्यकर्त्याची राजरोस हत्त्या व्हावी ही बाब साऱ्या महाराष्ट्नला लाजिरवाणी आहे. ही शरम मुख्यमंत्री, शासन, पोलीस, आणि साऱ्या समाजघटकांनी अबोलपणी परंतु कृतिशीलतेनेे व्यक्त केली पाहिजे. प्रगल्भता सोडून आततायी विधाने मुळीच शोभादायक नाहीत. एखाद्या रुग्णालयात कुणाचा मृत्यू झाला म्हणून तेथील काचा फोडणारेही, आधी टीव्हीचा क्रॅमेरा बोलावत असले तर ठाऊक नाही. एरवी अशी दृश्ये प्रेक्षकांस दाखविण्यासाठी लागणारी तत्पर धंदेवाईक क्रॅमेरोग्राफी कशी जमते, हे आश्चर्य! दाभोलकरांनी गोळया खाल्ल्या त्याचा माग काढण्यास ही तत्परता कशी कामी येणार? त्याच पद्धतीने मोर्चे-निषेध आणि वाचाळ प्रतिक्रिया यांनी दाभोलकर घटनेचे दु:ख अधिक क्लेषदायी केले. डॉ.भटकरांसारख्या वैज्ञानिकाने `दाभोलकरांना मरणोत्तर महाराष्ट्न्भूषण पुरस्कार द्या' ही मागणी केली; काय बोलणार? आजच्या तापल्या वातावरणात ते घडूनही गेले तर पुढे कशा, कोणत्या मागण्या होतील, याची कातरभीती तरी वाटावी! ही `वैचारिक प्रगल्भता' म्हणण्यास जीव धजत नाही.

समाजातील अंधश्रद्धा कमी होऊन माणसाची परस्परांवर श्रद्धा निर्माण व्हायला हवी. ती कर्तृत्वावर, प्रामाणिकपणावर, सत्शीलतेवर.... एकूणात प्राणिमात्रांतील देवत्त्वावर हवी. माणसाला विज्ञानाच्या पलीकडे धावणारे एक मन असते आणि मानसिक स्वास्थ्य-समाधान लाभण्यावर लौकिक विज्ञानमय जीवन सुख-दु:खाचे होऊ शकते. मानसशास्त्र ही तर विज्ञानाची एक शाखा आहे आणि मानसाचे व्यवहार माणसाच्या ऐहिक जीवनावर परिणाम करतात. त्यात पारलौकिकाचा संबंध जोडण्याचे कारण नसेल; परंतु अशा मानसिक भावनांचा धंदा करणारी भोंदू बुवाबाजी माणसाची मने नासवून, देवत्त्वावरील श्रद्धेेऐवजी राक्षसतत्वावरील अंधश्रद्धा वाढविते. दाभोलकरांचा संघर्ष त्या मानसिक पतनाशी होता. तो संघर्ष यापुढील काळात तितक्याच जोमाने चालू राहील का; अशी शंका या बोलघेवड्या अंधश्रद्धेमुळे वाटू लागते. अठरा वर्षे रखडलेला आणि दाभोलकरांना रडवलेला जादूटोणा विरोधी कायदा त्यांच्या मृत्यूनंतर एका दिवसात अध्यादेशाने व्हावा, याला काय म्हणावे? या कायद्याचा अंमल कसा होणार ही तर सर्वस्वी अविश्वासार्ह गोष्ट. गळयात ताईत, हातात दोरे, बोटात अंगठ्या, आणि टेबलावर कोण्या बाबाचा फोटो बाळगणारे मंत्री आणि अधिकारी, कसले निर्मूलन करणार ते सहज समजेल!

या प्रसंगातून सरकार नावाच्या वस्तूची दुर्बलता अधोरेखित होते. दुर्जनांस जरब नाही, सुजनांस अभय नाही. विलय रोखता येत नाही, सृजन जोपासता येत नाही. चौकांतून श्रद्धांजली किंवा शुभेच्छा मांडून आपल्या कैफात जगणारा हा अंधश्रद्ध कर्मकांडी समाज जोवर कणमात्र बदलत नाही, तोवर दाभोलकरांचे बलिदान हे नाहक बळी ठरते! त्याबद्दलचा आक्रोशही मूकपणीच करावा लागतो, तेवढ्या हळहळी व्यतिरिक्त काही करता येऊ नये, ही गुदमर आता दाभोलकरांपर्यंत कशी पोचणार?
***



कै.देवदत्त दाभोलकर यांच्याकडे कधीतरी जाणे घडत असे. पुण्यातील क्षिप्रा सोसायटीतील त्यांच्या घरी, आणि त्यानंतर ते साताऱ्यास (स्वगृही) आल्यानंतर तिथे जास्त वेळा त्यांना भेटता आले. डॉ.नरेंद्र यांच्याशी तिथे स्वाभाविकच परिचय झाला. सर्वच दाभोलकर बंधू मिष्कील होते. देवदत्तांचे `दादा'पण हे मोकळे स्वातंत्र्य आणि आदरभाव राखून असल्याचे या बंधूंच्या वागण्या-बोलण्यातून जाणवे.
एका सकाळी साडेनऊच्या सुमारास दादांच्या गोडोलीतील `शांतिनिकेतन' बंगल्याचे फाटक मी उघडत असता आतून नरेंद्र बाहेर पडण्याच्या तयारीत आले. फाटकाशी मला पाहून ते म्हणाले, ``ओ हो, या या मोठे लोक!'' मीही त्याच गंमतसुरात उत्तरलो, ``का बुवा, सकाळपासून दुसरं कुणी भेटलं नाही का?''
``भेटले पुष्कळजण; पण इतकं मोठं कुणी नव्हतं! तुम्ही तर फार मोठे!'' नरेंद्रांची मिष्कीली.
``छे! ही तर तुमची अंधश्रद्धा आहे!'' मी अशी खेचल्यावर त्यांनी, ``वा! गुरू भेटलात!'' असं म्हणत टाळी दिली. हसत हसत आम्ही आत गेलो. थोडाच वेळ गप्पा करून ते जायला उठले.
फेब्रुवारी महिन्यात संपादकांच्या `संवाद सभे'ला ते उपस्थित होते. योगायोगाने त्यांच्याशेजारीच मी बसलो होतो. एकपट्टी चप्पलधारी पाऊल हलवत ते आत्यंतिक साधेपणाने बोलत होते. कसलाही आविर्भाव-अभिनिवेश नाही.
त्यांच्या आंदोलनांसंदर्भात येणारी टोकाची भूमिका, पूर्णत: पटणारी नव्हती पण एक सच्च्या दिलाचा कार्यकर्ता म्हणून आदर वाटावा, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.
- वसंत आपटे

या घटनेसंदर्भात असे समजले की, डॉ.नरेंद्र गेले, त्यावेळी त्यांचे बंधू ७५ च्या घरातील दत्तप्रसाद हे गोव्यात होते. सकाळी १० च्या सुमारास त्यांना फोनवरून एका स्नेह्याने सांगितले. त्या दिवशी दत्तप्रसादांचे व्याख्यान होते, ते पूर्ण करूनच ते रात्री तातडीने साताऱ्याला आले. दुसऱ्या सकाळी अंत्यविधी आटोपून ते पुन्हा आल्या पावली गोव्याला गेले. कारण त्या दिवशी त्यांच्या पुस्तकाचे गोव्यातच प्रकाशन होते. ``दाभोलकर घराला `कर्तव्य आधी' अशी शिकवणच आहे'' अशी त्यांची प्रतिक्रिया!


प्रेरणादायी समर्पण मंडळ
बँक ऑफ बरोडा कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन निधी जमा केला व तो सांगली व कोल्हापूरच्या मूकबधिर शाळांना प्रत्येकी रु.१८ हजार देण्यात आला.
सर्वसाधारण बँकेतील कर्मचाऱ्यांबद्दल समज आहे की, बँक बरी आणि आपण बरे! समाजाबद्दल यांना काही देणे घेणे नाही. बँकेच्या पाट्या टाकायच्या आणि घरी जाऊन आराम! मधून पगार, भत्ते यासाठी निदर्शने... या गैरसमजाला हे कर्मचारी अपवाद ठरले.
१९७५-७६ साली बँकेत नोकरीला लागलेला एक मुलगा. नाकासमोर काम करायचा आणि तसाच घरी जायचा. त्याला कंटाळा येऊ लागला. मन अस्वस्थ होऊ लागले. मन संवेदनाशील, काम चोख, नि:स्वार्थी बुद्धी यामुळे तो बँकेत प्रिय झालेला. या मुलाने मांडलेली एक योजना आठ-दहा मित्रांनी उचलून धरली.
अनिल हणमंत रुईकर. आता हा `मुलगा' नसून आजोबा झाला आहे. मित्रांसमोर योजना अशी की, आपल्या पगारामधून दरमहा रु.१५/- जमा करायचे आणि वर्षाचे शेवटी शिल्लक न ठेवता जमा होणारी रक्कम समाजातील गरजू विद्यार्थ्यांना द्यायची. योजना सुरू झाली १९८९ साली. योजनेतील कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढू लागला. मंडळाला `समर्पण मंडळ' असे नाव द्यायचे ठरले. एक कार्यकारी मंडळ ठरविण्यात आले. मदत कुणाला द्यावी हा त्या मंडळाचा अधिकार. वर्षभरात किती पैसे जमले, काय खर्च केला याबद्दल कुणीही काहीही विचारायचे नाही. हिशेब मागायचा नाही. दरमहा रु.१५/- ही रक्कम कमी पडू लागली म्हणून सर्वांनी दरमहा १० तारखपर्यंत एक बंद पाकीट, ज्यात किती रक्कम घातली आहे याचा उल्लेख नसेल, ते समर्पण मंडळाच्या प्रमुखाकडे द्यायचे. पाकिटातून किती रक्कम कोण देतो याची वाच्यता अगर चौकशी कोणीही न करता वर्षातून अशा निधी समर्पणाच्या कार्यक्रमास सर्व कार्यकर्ते उपस्थित असतात. जी रक्कम आपण समर्पण भावनेने दिली आहे त्याबद्दल कुणाला काही सांगायचे नाही, हिशेब मागायचा नाही. गरजूंना मदत करायची! याला म्हणतात समर्पण!
एक-एक पैशाचा हिशेब मागणारे महाभागही भेटतात. पण अनेक वर्षे सातत्याने कुठलाही हिशेब न मागता आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवून `समर्पण मंडळ' निष्ठेने चालू आहे. `खारीचा वाटा' म्हणूनच समर्पण मंडळाचे बोधचिन्ह खारीचे चित्र आहे आणि बोधवाक्य आहे `आम्ही असू सुखाने, पत्थर पायातील' कुठेही अपेक्षा नाही, वाच्यता नाही, गर्व नाही, फक्त समर्पण भाव! वर उल्लेख केलेल्या संस्थांना केलेली मदत ही गेल्या २४ वर्षांतील सर्वोच्च मदत  होती. आत्तापर्यंत केलेली मदत कोणताही कार्यक्रम न करता झाली!
मंडळातील काही सभासद, व्यक्तिगत मदत समयदान करून करतात. नंदू गोसावी अनेक गावांतून कीर्तन करतात. खानवलकर रिमांड होमच्या शाळेतील मुलामुलींच्यात रमतात. अनिल  रुईकर गव्हर्मेट कॉलनीत संस्कारवर्ग घेतात. गीता पाठांतर स्पर्धा, सहली यात रमतात.
असेच एखादे `समर्पण मंडळ' आपल्याला चालू करता येईल का? देणाऱ्यांना आपली मदत खारीची वाटली तरी घेणाऱ्यांसाठी ती आभाळाएवढी.
- शरद छत्रे (मोबा.९४२३०२३८०८)
श्रीपाद सहनिवास, अंकली रस्ता
१०५५/१/के, गावभाग, सांगली

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन