Skip to main content

Sampadkiya in 15July 2013

खचणारी रोमांचक वाट
भारतीय उपखंडातील निसर्ग, त्यातही मुख्यत: मोसमी पाऊस ही परमेश्वराची देणगी मानली जाते. त्याचप्रमाणे निसर्गाची विविधता हेही भारतवर्षाचे वैशिष्ट्य आहे. या दोन्हींचा मेळ घालून निसर्गाचे सान्निध्य, निरीक्षण, निष्कर्ष यांच्याच आधारे एक स्वतंत्र-संपन्न पर्यटनशास्त्र विकसित केले गेले. कोणत्याही संस्कृतीत देवत्त्वाच्या संकल्पनेला निर्विवाद स्थान असते, भारतात पंचमहाभूतांना सगुण-साकार रूप देऊन त्यांची आराधना करणारा कर्तव्यधर्म रुजत गेला. दैनंदिन कर्तव्यांतून काही विरंगुळा हवा, तो प्रवासातून मिळू शकतो. तथापि त्या विरंगुळयाच्या प्रवासातही जिज्ञासेचे  पोषण व्हावे; पंचमहाभूतांच्या आश्वासक, आल्हादक, आव्हानात्मक अशा लहर-बहर-कहराची अनुभूती यावी यासाठी पर्यटनाची संकल्पना विकसित झाली.

पर्यटन हा अशा अवचिताचा अभ्यास आणि प्राकृतिक उत्साहाइतकाच चिंतनाचाही विषय असायला हवा. गावाबाहेरच्या टेकडी-दरीच्या शिवमंदिरातील नित्य उपासना हे एक निमित्य, तसेच त्याकरिता पंढरीची वारी, काशीयात्रा, चारोधाम यात्रा, कैलासदर्शन इत्यादि क्रमाने अवघड होत जाणारे अनुभव घेण्यासाठी पर्यटनप्रेमी माणसांनी त्या बिकट अनुभवांचेही हेतुत: उदात्तीकरण केले. प्रसंगी थोडी हालअपेष्टा होईल, परिश्रम होतील, अवचित अडचणी उद्भवतील, मानसिक धक्के बसतील... या साऱ्यांची तयारी असेल तरच अधिकाधिक आव्हानदायी पर्यटनास निघायचे. शिडाच्या होडीतून सात समुद्र ओलांडायचे, एव्हरेस्टवर चढायचे किंवा दक्षिण ध्रुवावर जायचे. त्या प्रवासात कुणी थंडीचा कडाका, तुफान पाऊस, विरळ हवा इत्यादींना संकट मानत नाही. पंढरीच्या दिंडीतल्या बाया परंपरेने पाय दाबत चालत राहिल्या आहेत. धुवाँधार पावसाला किंवा वैराण दुष्काळाला त्या नावे ठेवत नाहीत. सरकार किंवा व्यवस्थेवर टीका करणे हा अलीकडचा प्रचारकी गर्गशा आहे, त्याचा चिंतनशील पर्यटनाशी वा श्रद्धेशी संबंध नाही.

अलीकडे या पर्यटनाच्या क्षेत्राला फारच ऐश करण्याची सवय झाली आहे. जिथे जातो तिथले हवामान, तिथले ऋतुमान, तिथले लोकजीवन, खाद्यसंस्कृती, राहणी, निसर्ग, प्राणी, पाणी या सर्वांची अंत:करणात भरून उरणारी अनुभूती घेण्यासाठी पर्यटन करणारे कमी; त्याउलट आपल्याच कोषातल्या सवयी कुरवाळत ठेवणारा पाहुणचार म्हणजे पर्यटन असला विचित्र अर्थ रूढ झाला आहे. काश्मीरच्या सहलीत मिठ्या मारलेले फोटो, रेशमी साडी खरेदी आणि गरमागरम पिठलेभात हेच साध्य असेल तर आठदहा दिवस आणि काही हजार `पार पडले', याखेरीज काय मिळणार? `काशीस जावे नित्य वदावे ।' असे पूर्वी म्हणत, कारण तसे घोकत राहण्याने कधीतरी तो कष्टसाध्य जन्मयोग साधेल; आणि तो साधल्यावर मरणासाठीही धीर मिळेल. आता काशीला किंवा काश्मीरला रेल्वेने जाणेही गावंढळ किंवा दारिद्र्यरेषेचे मानतात; सिंगापूर-मलाया हे उच्चमध्यमवर्गी, आणि अष्टविनायक वगैरे तर तळागाळातील पर्यटन. याचे कारण स्पष्ट आहे, प्रवास निव्वळ मौजमजेसाठीच करायचा असे समज होत गेले. तिथेही एसी, बिसलेरी, एटीएम, कमोड यांची चलती. केदारनाथ-अमरनाथ-बदरीनाथ अशी गिरीशिखरे असोत किंवा कांची-कन्याकुमारीचा सिंधुसागर असो तिथे तारांकित हॉटेलांचा उद्योग भरभराटतो. असले पर्यटन हा व्यवसाय - अधिक स्पष्ट सांगायचे तर धंदा म्हणून मोठा होत आहे.

उत्तराखंडच्या प्रलयात वाहून गेलेल्यांबद्दल सहानुभूती वाटणारच; पण या नव्या व्याख्येतील उतावीळ इव्हेंटगिरीची कीवही वाटायला हवी. तेथील मूळ रहिवाशांनी इकडील संकटग्रस्तांची लूट करणारी दरवाढ केली असा उद्वेग सांडणारी वृत्ते प्रसिद्ध झाली. त्या गिरीस्थानचे किंवा काश्मीर-पूर्वांचलचे परिस्थिती-पीडित नागरिक कधी इकडे येतात, त्यावेळी त्यांना कोणती अगत्यशीलता मिळते याचा आठव करता आला, तर तो उद्वेग कमी होईल. जे भक्त व पर्यटक संकटात अडकले ते वाईट झाले; पण ते संकट आले नसते तर तेथील रहिवासी व नागरिकांशी त्यांनी कोणता संवाद साधून बंधुभाव प्रकट केला असता याची कल्पना सहज करता येईल. सरकारने बचावकार्य कसे ढिसाळ केले, तेथील घरे-बंगले-हॉटेल कशी विनापरवाना नदीपात्रात उभारली, धरण-पूल बांधण्यासाठी भूशास्त्र कसे दुर्लक्षित केले, हवामानाचा अंदाज वेधशाळेला कसा येत नाही.... इत्यादी अनेक प्रकारे त्रागा व्यक्त करून तोंडसुख घ्यायला हरकत नाही. परंतु जो प्रदेश तसा लहरी व सामान्य आयुष्यक्रमाच्या दृष्टीने अतिरेकी निसर्गाचा, म्हणूनच मनुष्यवर्दळीपासून तुटक राहिला आहे; तपोभूमी किंवा देवभूमी म्हणूनच मानला गेला, आहे अशा प्रदेशात तारांकित सहलींतून सेकंड हनीमून किंवा रुद्रावर्तन करण्यासाठी गर्दी करणाऱ्यांनी कोणता विचार, कोणते नियोजन केले असेल असा प्रश्न पडतो. पंढरपूरची क्षमता वाढवून वाढविली तरी त्या गावात आजच्या नऊ लाखाची वारी कशी सामावणार? यावरही सरकार किंवा तेथील नगरपालिकेने उपाय करायचा तो कोणता? गर्दी कितीही झाली तरी चौपदरी रस्ते व झुळझुळ पाणी देणारे सरकार आणायचे ते कुठून?

याचा अर्थ सरकार त्याच्या परीने शक्य ते सर्व करते असा मुळीच नव्हे. प्राप्त काळातील सरकारला त्याच्याच वस्त्रांचे ओझे वाटावे अशी त्याची स्थिती आहे. तर मंदाकिनीच्या अवखळ प्रपातांना हे सरकार काय आवर घालणार? त्या प्रवाहात घरे हॉटेले बांधणारे व्यवसायिक आणि तिथे जाऊन `एक आने में बंबई देखो' करणारे आपण पर्यटक यांची काही जबाबदारीच नाही काय? पंढरीच्या खऱ्या श्रद्धाळू गर्दीत भर घालणारे बिसलेरी-बहाद्दर प्रवासी हे विठूच्या ओढीने, वाटेवरच्या गावकऱ्यांविषयी सुखदु:खाने, किंवा समाज समजून घेण्याच्या उद्देशाने जात असतील तर, सरकारने काहीतरी करावे अशी मागणीच ते करणार नाहीत. त्यांना खाचखळग्यांचे रस्ते, चंद्रभागातीरी अस्वच्छता, किंवा कोसभर लांबीची दर्शनरांग त्रासदायक वाटत नाही. उत्तराखंडातील कोप सच्च्या यात्रेकरूंनी नैसर्गिक मानून रुद्राचा रुद्रावतार स्थिरचित्ताने किंवा शरणागत मनानेेे स्वीकारला असणार.

या संकटातून उत्तराखंड राज्याचे पुनर्निर्माण होणार असल्याच्या घोषणा झाल्या. त्याचा अर्थ पैशाची ढगफुटी आणि खळखळाट होणार इतकेच. मुंबईचे शांघाय करून झाले, तसेच हे पुनर्निर्माण! आपण सामान्यजनांनी या प्रकोपातून काही समजून घ्यायचेच तर पर्यटन, निसर्गदर्शन, देवदर्शन, विरंगुळा, प्रवासानंद, अनुभूती, खडतरता, रुद्रभीषणता, रोमांचकता इत्यादी साऱ्या शब्दकळांच्या मूळ अर्थांना उजाळा द्यावा आणि मगच त्या पर्यटनाच्या वाटेला जावे.
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन