Skip to main content

Sampadkiya in 7-13 April


अद्वैत श्रद्धेने चिरंजीव कार्य
श्री परशुराम आणि श्री शंकराचार्य या भारतवर्षातील दोन विभूतींचे पुण्यस्मरण-दिवस साधारण एकाच सुमारास आहेत. त्या निमित्ताने पुष्कळ ठिकाणी कार्यक्रम होत असतात. भारतभूमीत इतक्या संख्येने नररत्ने होऊन गेली की, त्या सर्वांचे केवळ स्मरणच करायचे म्हटले तरी आज आपल्यासाठी काही कृती करण्यास दिवसच काय, पण क्षणभरही मोकळा मिळायचा नाही.! पाच-दहा हजार वर्षांच्या प्रदीर्घ ऐतिहासिक भूमीच्या नित्यनूतन, सनातन, परिवर्तनशील संस्कृतीमध्ये विविध पैलूंचे मोठेपण लाभलेली अनेक माणसे झालेली असणारच. त्यांना कुणी अवतार म्हणोत कुणी विभूती म्हणोत, देवत्त्व देवोत किंवा दैवी मानोत.

अशा थोर स्त्री-पुरुषांच्या व्यक्तिमत्त्वांचे क्षणकाल पूजन करीत असताना त्यांच्या गुणगौरवाला महत्त्व असते. त्यायोगे त्यांच्यातील मनुष्यत्त्वाच्या मर्यादा पुसून जातात, सामान्य व्यवहारांना अतर्क्य चमत्कारी रूप येते अथवा असामान्य कर्तबगारीवर अतिशयोक्त अमानुषी तेजाचे अनुलेपन चढते. अशा लोकोत्तर व्यक्तींच्या जीवनकार्याचे आकलन होण्यासाठीही वेगळी शक्ती अंगी असावी लागते; ती नसेल तर मग शिवछत्रपतींना अवतार म्हणावे, गांधीजींना गांधीबाबा म्हणावे, टिळकांना महाराज करावे. कोणत्याही पुण्यश्लोक व्यक्तीचे स्मरण करण्याचा कार्यक्रम कुणाकडून कसा साजरा होतो याला त्यामुळेच अर्थ प्राप्त होतो. आजच्या काळात बुद्धिमत्तां वरिष्ठम् महाबली हनुमानाचा उत्सव रेकॉर्ड डान्स-स्पर्धा आणि खिरीच्या महाप्रसादाने होतो. श्री परशुराम वा श्री शंकराचार्यांचे स्मरण समाजाला करून देण्याने क्षात्र आणि ब्राह्मतेजाचा आविष्कार एकाच वेळी व्हावा अशी कामना तरी केली पाहिजे आणि त्यांची शिवस्वरूपी संकल्पना जीवस्वरूपी ऐहिक वास्तवाशी अद्वैत सांगणारीच असली पाहिजे. त्यामुळे हा मानवसमाज शंकराचार्यांप्रमाणे कठोर तत्त्ववादी आणि परशुरामाप्रमाणे चिरंजीव-शाश्वत होऊ शकेल.

आपली पुराणे, तत्त्वग्रंथ, ज्ञानसंपदा व काव्ये यांना भाकड समजण्याचे पुरोगामित्त्व हल्ली पुष्कळच बहकले आहे. रूपक, अतिशयोक्ती, उपमा, उत्प्रेक्षा असे भाषालंकार त्यांना कळत नाहीत. `मातेच्या अमृतपाना'साठी पुरोगामी वास्तव कथन करण्याचे शब्दसामर्थ्य प्राचीन ग्रंथकारांना नव्हते असेही कुणी म्हणावे. अशांनी आपल्या धर्म-तत्त्वांवर अवास्तव टीका करण्याने अल्पमती जनांची शेषमतीही कलुषित होते हे सर्वत्र दिसून येते. परमतखंडन आणि स्वमतप्रतिपादन यांसाठी शंकराचार्यांनी जो वैधानिक विवाद मंडनमिश्राशी केला त्यास विदूषी महिला निर्णयाध्यक्ष होती हे ऐतिहासिक सत्य आजच्या काळातही आवर्जून सांगितले गेले तर उगीच धर्मरूढींच्या भ्रमाला धोपटणाऱ्या अर्वाचीन वावदूकांचा प्रभाव कमी होईल. धर्माला ग्लानी येते त्यावेळी शंकर-परशुरामांसारख्यांना दंड-परशूंसह उत्थापनेचे प्रयत्न करावे लागतात. पूजनसमयी त्या प्रयत्नांचे भान ठेवावेच लागेल.

आपल्या संस्कृतीमध्ये असे अनेक पुण्यकीर्त महामानव आहेत. त्यांची तेजस्विता अल्पांशाने प्रकट व्हायची असेल तर त्यांच्या पार्थिव मूर्तस्वरूपावर जमलेली भ्रांतीची पुटे खरवडून काढावी लागतील. भक्तिभावाच्या अतिरेकाने व्यवहार - वास्तवाचा अभाव दर्शविणारी गंधपुटे त्यांच्या प्रतिमांवर चढली आहेत. ती खरडून-धुवून काढली तर आतील रेखीव जीवनचरित्राचा साक्षात्कार सर्वांना होईल. ते सत्यान्वेषणाचे कार्यही त्या पुण्यशील विभूतींचे भक्त, अनुयायी वा पूजक यांनाच करावे लागेल. पुण्यस्मरणाचे कार्यक्रम हे त्या अनुषंगाने व्हायला हवेत.

आजच्या काळात लोकशाही व समाजवाद यावरती भर असतो. आपल्याला या संकल्पना नव्या नाहीत. काळाच्या ओघातील समाजमनांच्या दृष्टीने दैवतांचेही दैव बदलत असते. त्यालाच बहुधा धर्मग्लानी म्हटले असेल. म्हणूनच आजच्या भारताच्या संविधानाचे साक्षेपी चिंतन करून ते आधुनिक काळानुरूप अंगिकारले तरी मूळ तत्त्वात फरक पडण्याचे कारण नाही. त्यालाच धर्माभिमानी निरपेक्षता व सर्वस्पर्शी विकास म्हणायचे. प्राचीनत्वाला प्रौढत्त्व असावे, हेकटपणा नसावा. आणि आधुनिकतेला उत्फुल्ल नाविन्य असावे, उथळपणा नसावा. या सुसंस्कृत सनातनतेच्या चिरंतन चिरनूतत्वासाठी परशुराम आणि शंकराचार्य यांच्या स्मरणाइतके शुभप्रद पुण्य अन्य कोणते?

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...