Skip to main content

sampadkiya in 28May2012


समानीव आकूति: । समाना हृदयानि व: ।
समानमस्तु वो मनो । यथावस्सुसहासति ।।

संकटातील धर्म

ग्रीष्माच्या झळा सर्वस्पर्शी पोळत आहेत. तळपत्या सूर्यामुळे मनातला झाकोळ गडद होत आहे. पुष्कळशा भागात पाणी दुर्मीळ झाले आहे. वीजटंचाई ही तर आता अंगवळणी पडली आहे. एखाद्याच्या पायाला बरे न होणारे इसब घेऊन त्याला हिंडा फिरावे लागते, तशी स्थिती वीजप्रश्नाची आहे. त्याविषयी विव्हळले तरी आजार अटळ आहे याची सर्वांना कल्पना येऊन चुकली आहे. जलसंपदा हे भारदस्त नावाचे खाते खातेरे बनले असल्याचे जाणवते. चित्रपट महोत्सव आणि आयपीएल् ची झगमगती दुनिया दुष्काळ नावाच्या अस्वस्थतेशी संबंधित नाही, ते अपेक्षितही नाही. पण भाजीभाकरी आणि रोजची आंघोळ ज्यांना शक्य आहे तो तथाकथित बुद्धिजीवी मध्यमवर्ग सध्या त्या भीषणतेकडे डोळेझाक करून झगमगाशी नाते जोडू पाहात आहे याचे आश्चर्य मानावे, की समाधान मानावे, की कालगत न्याय म्हणावे?

बंगालमधल्या महाभयंकर दुष्काळात टिळकांनी मोठा निधी उभारला, त्यास शतक उलटले. १९७२ ला महाराष्ट्नत मोठा दुष्काळ पडला तेव्हा महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्था, संकटनिवारणासाठी पुढे आल्या होत्या. विविध राजकीय विचारसरणीचे पक्ष-कार्यकर्तेही रोजगार हमी, सुखडी वाटप, विदेशातून येणारे तेल-गहू वाटप, वैरण छावण्या, बालगृहे वगैरे योजनांतून सहभागी होते. तात्पर्य असे की, सामाजिक जाणिवेतून ही कामे करण्यास मध्यमवर्ग पुढे येत होता, हल्ली तो तसा दिसत नाही. याचे कारण ती जाण व जाणीव कमी झाली; की तो मध्यमवर्ग आता वरच्या वर्गात गेला? पुण्या-मुंबईत पाणी कपात करावी लागली त्यामुळे बाटलीबंद पाण्याचा खप वाढला आणि तिकडे कुठे प्यायला पाणी नाही त्यामुळे गुरे मागे टाकून गाव सोडावे लागले या दोन्हींतला फरक लक्षात घ्यायला नको का?
दुष्काळाची भीषणता वाढण्याला भ्रष्टाचारी सरकार आणि राज्यकर्ते कारणीभूत आहेत हे खरेच आहे. त्यांच्यात कुठेही राष्ट्नीय धोरण नाही, राष्ट्न्वादी निष्ठा नाही, नवनिर्माणाची आवड नाही आणि भारतीय जनतेविषयी सहानुभव नाही. फ्रान्स - रशिया - इंग्लंड येथील उमरावांचे वर्तुळ जसे कुठल्याही परिस्थितीचा फायदा उठवत आपली मिजास वाढवत राहात असल्याचे इतिहास सांगतो, तशाच वर्तमानाची पैदास आपल्याकडे झाली आहे. पाकिस्तानातील जनता दारिद्र्य, धर्म व लष्कर यांच्या विचित्र दबावाखाली आहे. त्यांच्याशी आपण वेगळेपण मानावे असे नाही. विदेशांतील या उदाहरणांची दुर्दशा होऊन राजे-राण्या व अमीरांना रस्त्यावर फरफटत आणले गेले, ते भोग भोगल्यानंतर आज तिथे लोकशाही, समाजवाद, मानवी मूल्यांचा विकास हे शब्द ऐकू येत आहेत. आपल्याकडे त्या संकल्पनांचे उद्घोष कधीकाळी उमाळत होते, ते पार अस्तंगत झाले आहेत. विदेशातील ती क्रांतिपूर्व स्थिती अनेकांना इथे जाणवू लागली आहे. परंतु तसे निसर्गन्यायाने अविवेकी उद्रेक न होता स्थितीचे परिवर्तन झाले तरच आपले वेगळेपण राहील. हे परिवर्तन होण्यासाठी मध्यमवर्गाने पुढाकार घेतला पाहिजे; तर त्या बुद्धिजीवित्त्वाचा उपयोग!

शासन आणि प्रशासन तूर्त कसेही असो, ते त्त्वरित बदलणे किंवा सुधारणे आपल्या हाती नाही. वृत्तीचे परिवर्तन ही दीर्घ प्रक्रिया असते. परिस्थिती पालटणे हे तव्यावरचे थालीपीठ उलथण्याइतके सहजसाध्य नाही. दुष्काळातील बांधवांना मदत करणे म्हणजे कुठल्या खंडरीबहादुराला वर्गणी देऊन आपला दरवाजा लावून घेणे इतके मर्यादित नाही. कोणत्याही संकटावर केवळ पैसा हा उपचार पुरेसा नसतो. माणसाला धीर देण्याची, त्याच्या दु:खाला ममत्त्व देण्याची, त्यातून बाहेर पडण्यासाठी जिद्द देण्याची जास्त गरज असते. ती गरजसुद्धा सद्शक्तींकडून पुरवली जायला हवी. भ्रष्टाचारी उमरावाने `थोडे सहन कर, पुढच्या वर्षी धरण बांधतो' असे म्हटले तर ते दु:खावर डागणी दिल्यासारखे वाटते. `१९७२ पेक्षा हा दुष्काळ मोठा' हे ऐकल्यावर अरे वा वा म्हणून खूश होणारे उमराव असतीलही. कारण त्यांना धरण-रस्ते-शाळा-पूर-दुष्काळ या सगळयात संधी दिसते. ते विश्व तूर्त बाजूला ठेवू.

ज्यांनी गेल्या पन्नास-साठ वर्षांत दारिद्र्य, जातीयता, राजकीय कोंडमारा अनुभवला, असा एक मोठा वर्ग आज आर्थिक व सामाजिक सुस्थितीला पोचला आहे. तो वर्ग स्वत:ला बुद्धिजीवी, पांढरपेशा म्हणवतो. छोट्या मोठ्या शहरांतून त्यांची संख्या व शक्ती लक्षणीय आहे. अशा वर्गातील प्रौढ स्त्री-पुरुष व तरुणांनी या मोसमात `दुष्काळ पर्यटन' करायला हवे. एकेका गटाने स्वत:च्या गाडीने शे दोनशे मैलांवरच्या गावी जावे. तिथल्या ग्रस्त जनतेशी भावनिक नाते जोडावे, त्यांना धीर द्यावा, शक्य असेल तितकीच मदत करावी. स्वत:च्या गाडीतून भाकरी-भाजी नेऊन, किंवा तिथे शिजवून त्यांच्यासमवेत खावी. पिण्यासाठी बिसलेरी नेऊ नये... थोडक्यात असे की, दुष्काळाच्या संकटाला ते बांधव जे द्यायचे ते तोंड देतच आहेत. उमराव वर्ग त्या स्थितीच्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करतीलही. प्रश्न ह्या सुजाण मानल्या जाणाऱ्या समाजाचा आहे.

त्या वर्गातील सदाचरणी सज्जन हे उमरावांच्या कळपात सामील होणार नाहीत. पण दारे बंद करून अलिप्त राहण्याचा मध्यममार्ग त्यांनी त्यागावा. `त्यांच्या'समवेत जात नसू तरी `यांच्या'समवेत राहिले पाहिजे. तसे संकटग्रस्तांना भावले पाहिजे. त्यासाठी बुडाखालची थोडी पेन्शन किंवा मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या अपत्यांचा एखादा पगार - स्वत:च्या जाणिवा वृद्धिंगत करण्यासाठी खर्च पडला तरी बिघडत नाही. समाजधारणेसाठी हा सहअनुभूतीचा धर्म आचरला पाहिजे. धर्म म्हणजे डींर्रींीी ेष ाळपव असे म्हणतात. ती मनोधारणा कशी प्रगट  होते ते महत्त्वाचे आहे. धर्माच्या भावाबहिणींना त्याची गरज असते. एखादे लग्न-बारसे किंवा सहल कमी घडले तरी हरकत नाही.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन