Skip to main content

sampadkiya in 17-23May2012



काय करू आता धरुनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजविले ।
नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण । सार्थक लाजून नव्हे हित ।।
- तुकाराम


व्यंगाचे सौंदर्य समजले पाहिर्जे

नर्म विनोदापासून लागट झोंबऱ्या कुचेष्टेपर्यंत कोणतीही टीका जेवढी सहन करता येईल तेवढी ती व्यक्ती किंवा तो समाज प्रगल्भ झाला असे म्हणता येते. तितकी प्रगल्भता वाढत जाते तसतसे माणसाचे वागणे-बोलणे-लिहिणे या सर्वांमध्ये एक नजाकत येते आणि जगणे अलंकृत होते. भाषेच्या माध्यमात म्हणूनच वक्रोक्ती, व्याजोक्ती, अतिशयोक्ती, उपहास, उपरोध, दृष्टांत अशा अनेक खुब्या वापरल्या जातात. जसे आहे अगदी तस्सेच फक्त बोलायचे तर स्वभावोक्ती एवढीच भाषेची किंवा अभिव्यक्तीची मर्यादा राहील. एखाद्या स्त्रीने लग्न झाल्याचे चिन्ह म्हणून केवळ काळी पोत बांधावी, तसे करणे कुणालाच पटत नाही. तिला स्वत:ला आणि कोणत्याही भावनेतून तिच्याकडे पाहणाऱ्यांना तिचे अलंकार मानसिक आनंद देतात. परंतु एखादी सर किंवा मणी तिच्या अंगावर वेगळा दिसला की तिच्यावर नस्ते संशय घेऊन तिला बुकलून काढणारा नवरा भेटला तर काय करावे? डॉ.आंबेडकरांच्या व्यंगचित्रावरून ज्यांनी गदारोळ चालविला आहे त्यांच्याशी त्या आक्रस्ताळी नवरोबांचीच तुलना करण्याची वेळ भारतीय जनतेवर आली आहे.
एखाद्या सुंदर स्त्रीला किंवा पुरुषालासुद्धा चांगला अलंकार अधिक खुलवतो, आणि त्या दागिन्याचेही सौंदर्य वाढते असे म्हणतात. ज्ञानेश्वर अशा पूरकत्त्वासाठी `तेथ अलंकारिले कवण कवणे' असे शब्द वापरतात. म्हणजे कुणामुळे कुणाचे आलंकरण झाले असा संभ्रम पडला. माणसाची प्रगल्भता आणि अभिव्यक्ती यांचा संबंध तसा आहे. `फार शहाणा आहेस तू!' या वाक्यातला भावार्थ ज्यांना ज्या प्रमाणात कळेल तेवढी प्रगल्भता जास्त असते. ते वाक्य दोन वर्षाच्या पोराला कौतुकाचे असते, पण आठरा वर्षाच्या घोड्याला त्यातील उपरोध कळत नसेल तर त्याला गाढवच म्हणायला हवे.

परस्पर संवादात, वादचर्चेत किंवा लेखनात, कलाविष्कारात या अलंकारिक अभिव्यक्तीवरच बंधने आली तर ते मानवी व्यवहारांवरचे संकटच म्हणायचे. देशभरात सर्वत्र सरदारजींवर सातत्याने टवाळीविनोद होत आले आहेत. युरोपातही आयरिश की स्पॅनिश लोकांना असेच `धरले' आहे. आपल्याकडे शिख समाजाची बुद्धिमत्ता, कष्ट, शौर्य हे गुण कौतुकाने सांगून, अशा लोकांची टिंगल करणे गैर असल्याचे सांगणारी काही माणसे वा त्यांचे पंथ आहेत. पण सरदारजींच्या बाष्कळकथा ही भाषिक गंमत आहे हे त्यांनी समजून घ्यायला नको का? तशी टवाळी तर मारवाडी, न्हावी, चित्पावन, मुस्लिम या जातींवरूनही सहजी केली जाते. मग ते समाज कर्तबगार नाहीत म्हणून त्यांच्यावरची टिंगल चालवून घ्यायची असे म्हणायचे की काय? तसे तर पुढारी-मंत्री, कवी, स्त्री, नट्या इत्यादी पेशांनी सगळे विनोदी जग समृद्ध केले आहे. त्याचा अर्थ या सर्व जातीजमाती व व्यवसायिक दुर्लक्षित, बुद्दू, दुर्बळ वगैरे मुळीच नव्हेत. पण अशा सर्वांवरची टिंगल, व्यंग्योक्ती, विनोद कुठेही प्रगट होता कामा नये अशी जरब संसदेने बाळगूनच कारभार चालविला तर काय (काय) घडेल याची कल्पनाही करता येणार नाही.

स्वत: बाबासाहेबांच्या हयातीत संबंधित व्यंगचित्र प्रसिद्ध झाले, त्यावर त्यांची प्रतिक्रिया खिलाडूपणाची असणार, कारण त्यांच्या प्रगल्भतेविषयी आपण काही म्हणणे हेच अप्रगल्भ ठरेल. जे नेते किंवा त्यांची राज्यव्यवस्था तसा खिलाडूपणा दाखवीत नाही, त्यांची भंपक अरेरावी हासुद्धा जगभरच्या मानवी समाजासाठी टवाळीचा विषयच असतो. रशियातील हुकुमशाही पोलादी पडद्याआड जो अमानवी कारभार चालत असे तो तर कित्येक साहित्यकृती व कलाविष्कारांना जन्म देऊन गेला. अशा पुस्तकांवर बंदी जिथे घातली तोच समाज अप्रगत राहिला आणि ज्यांनी त्यांचा आस्वाद घेतला ते समृद्ध झाले हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

ज्या नवरा किंवा बायकोला चेष्टामस्करीतून चीड येते, त्यांच्या वाटेला जाणे टाळावेच लागते अन्यथा भांड्यांची फेकाफेक किंवा तोल जाणारा त्रागा अधिक अनर्थ करतो. एखादा शब्द अधिकउणा जाण्याने संसार उसकटण्याचे भय असेल तर शहाण्या व्यक्तीने बोलणे टाळून चिडचिडाट आपल्याकडून बंद करणे इष्ट असते. स्वत:च्या विनोदनासाठी `घर' ही जागा नव्हे एवढा बोध या अपरिपप्तेतून घ्यायची वेळ येईल. तो धोका संसदेतील निर्णयाने अधोरेखित केला आहे.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...