Skip to main content

sampadkiya in 16 April 2012


भक्ताचा देव, सोन्याची चोरी
कोकणातल्या श्रीवर्धनजवळ दिवेआगर हे पोफळीबागांनी मढलेले हिरवेकंच गाव आहे. तिथे एका शेतात सापडलेला चोख सोन्याचा महाकाय गणपती अलीकडच्या दशकभरात  भरात आला होता. हल्ली कुठल्याही जुन्या-नव्या देवस्थानी तथाकथित भगतगणांची चिरंतन रीघ असते, तशी ती याही ठिकाणी लागून राहिली होती. कुठून कुठून माणसे यायची. त्यामुळे सोन्याचा गणपती आणखी श्रीमंत होऊ लागला, हळूहळू श्रद्धाळू डोळयांवर तुस्तीची झापड येऊ लागते. दृष्टी मंद होत जाते. चाचपडणे सुरू होते आणि मग अंध कर्कश श्रद्धाळू कार्यकर्त्यांना सामाजिक पोलिसगिरी करण्याचा निर्मूलन-उद्योगही मिळतो. त्या सुवर्णार्णव वक्रतुंडाने सगळयांना याप्रकारे समृद्धीची पायवाट दाखविली खरी; पण तो मात्र स्वत: कुणा दरोडेखोरांच्या टोळीतून पसार झाला. दिवेआगरचा सुवर्णगणपती चोरीला गेला.

अनंतकोटि ब्रह्माण्डानी व्यापलेले हे विश्वरूप माणसाच्या पंचेन्द्रियांना पेलण्याजोगे नाही, आणि तशी त्यांस प्रतिभाही नाही. म्हणून मग त्या कल्पनातीत अमूर्ताचे चिंतन करणेही अशक्य दिसल्यावर या डोकेबाज माणसानेच त्याला आपापल्या जाणिवेप्रमाणे मूर्तीरूपाने साकार मूर्त बनविले. परन्तु तेवढ्याने पार्थिव मूर्तीला देवत्त्व कसे येणार?

एखादे देवघर वा देऊळ तयार झाले की त्यात ठेवण्यासाठी देवाची मूर्ती आणावी लागते. बाजारातल्या दुकानात जाऊन किंमत विचारावी लागते. दुकानदार त्याच्या मनातला श्रद्धाभाव दूर ठेवून, समोरचे गिऱ्हाईक पाहून भाव लावतो. पितळ अडीचशे, तांबे दोन हजार रुपये किलो असा मूर्तीचा भाव सांगतो. गिऱ्हाईक घासाघीस करून किंमत ठरविते आणि मूर्तीची खरेदी-विक्री होते. त्यातही पावती हवी असेल तर कर लागतो, म्हणून मग काटकसरीच्या नावाखाली तीही चोरी चालत राहते. दुकानदाराच्या दृष्टीने पितळ (किंवा तांबे किंवा सोने), आणि ग्राहकाच्या दृष्टीने मूर्ती असा रुक्ष विनिमय व्यवहार चोख पैशांनी घडतो.

देवळात वा देवघरात ती मूर्ती नुसती `ठेवत' नाहीत; तिची प्राणप्रतिष्ठा करतात. म्हणजे त्या मूर्तीला आपला प्राणस्वरूप भाव अर्पून त्यास प्रतिष्ठा दिली की मग त्यावेळपासून तो आपला `देव' होतो. दुकानातल्या फडताळातील पितळ तांब्याचे पार्थिव, धूळ झटकून वजनकाट्यावर येऊन त्याची किंमत ठरली . तेच मूर्तरूप आता देवत्त्व धारण करून माणसाच्या अगोचर भावनांशी खेळत राहते. कुणाला ते पावते, कुणाची परीक्षा घेते, कुणावर अन्यायही करते, कुणाला कौल देते. ज्यांच्या त्या तशा सद्भावना देवापायी गुंतलेल्या नाहीत, किंवा ज्यांच्या लेखी त्यात `प्राण'च नाही त्यांना ते पार्थीव-पितळ, तांबे, सोने-असेच राहते. यवनांनी देव फोडले त्यावेळी त्या `देवां'ची त्यांना भीतीच नव्हती. आणि त्यात त्यांनी `प्राण' फुंकण्याचाही प्रश्न नव्हता. त्या पार्थिवात ज्यांच्या भावनांचा परम विश्वास गुंतलेला असतो, त्या दुर्दम्य, अगम्य विश्वासाच्या ठिकऱ्या करण्याचा त्यात हेतू असतो. तो विश्वास दुभंगू नये यासाठी पुजाऱ्याने देव लपवून सुरक्षित जागी न्यावे लागतात. पुजाऱ्याने त्याच्या उपरण्यात लपवून दूर नेऊन वाचविलेला देव आपले रक्षण समर्थपणे करणारच, ही श्रद्धा जागृत ठेवावी लागते. कारण माणसाचे माणूसपण टिकणे त्या सद्श्रद्धेवरच अवलंबून असते. त्या श्रद्धेतून जागृत स्थानीचे देवसुद्धा दुपारच्या वेळी दारांवर पडदे ओढून झोपतात हे मान्य करावे लागते. एखाद्या रुग्णालयात तेथील परिचारिका रुग्णाला औषध देण्याच्या वेळा काटेकोर सांभाळते, आणि त्यापायी रुग्ण गाढ झोपलेला असला तरी त्याला ढोसलून-जागे करून झोपेची गोळी देते! सर्वांची श्रद्धा असते की, या औषधाने रुग्णाला आराम पडेल. तसा आराम निसर्गत: पडण्याचे त्यावेळी महत्त्व वाटत नाही.

हे उपजत भावनांचे मनुष्यपण त्याच्या समाजशक्तीमध्ये रूपान्तरित होते, म्हणूनच देवाची चोरी झाली की माणसे कळवळतात. वास्तविक चोरांनी ही चोरी सोन्याची केली आहे देवाची नव्हे. देवत्त्वाची चोरी तर होऊच शकत नाही. कोण्या काळी काठीला सोने बांधून बिनधास्त फिरता येत असे म्हणतात. ती सुव्यवस्था आज नाही हे सांगायला पोलीस किंवा गृहमंत्री तरी कशाला हवा? त्यांना त्यांच्या अंगरख्याचे ओझे वाटेल एवढी दुर्बलता सध्या आहे. त्या स्थितीत रक्षणकर्त्या देवाच्या मूल्यवान सुवर्णाची भिस्त देवस्थानच्या कोणा थकलेल्या गावकऱ्यावर सोडणे योग्य नव्हते. सरकारी गृहखात्याला हा देवरक्षणाचा उद्योग कसा पेलला? प्रशिक्षित कमांडोज्च्या अभेद्य कड्यातून मंत्र्यावर पायताण, किंवा प्रधानमंत्र्यावर गोळी येते, त्या हिशेबाने असुरक्षित उघड्यावर असणारे सोने उचलण्यास चोरांना कसले भय?

इथे प्रश्न येतो श्रद्धा व भावनांचा - ज्यावर माणूस जगतो! सोने चोरीला गेले, ते कदाचित् वितळवले जाईल. त्याचे पैसे वाटून खाल्ले जातील. माणसांची श्रद्धा त्या सोन्यावर होती? की ब्रह्माण्डनायक गणपती नावाच्या अलौकिक `देवत्त्वा'वर होती? ज्याचे त्याने एवढे स्वत:शी तपासून पाहिले तर पुढचा काळ असा येऊ शकेल की, प्राणप्रतिष्ठित गणपतीच काय; पण सोन्याची पार्थिव वीटसुद्धा उघड्यावरची हलणार नाही. देव खरोखरीच असेल तर त्याने तर्कशुद्ध सद्भावना चिरंतन जागवावी अशी प्रार्थना आहे. तो चोरीला जाऊ शकत नाही ही खात्री माणसाने बाळगायला हवी.
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन