Skip to main content

sampadkiya in 12-19 March 2012


रामराज्य आपल्या हाती...
मंथरा सखीच्या कानभरणीमुळे कैकयी महाराणीने दशरथाला जे दोन वर मागितले, ते ऐकून दशरथ विव्हळ झाला. राम भेटीला आल्यानंतर सर्व हकीकत दशरथाने सांगितली आणि रामाला एक पर्याय सांगितला तो असा की, `कैकयीला दिलेल्या वचनाप्रमाणे वनवासाला जाण्याची आज्ञा करणे माझ्यावर बंधनकारक आहे. परंतु त्यानुसार वनात जाण्याचे वचन रामाने कैकयीला दिलेले नाही त्यामुळे ते मानलेच पाहिजे असे नव्हे.' हा `क्ल्यू' देऊनसुद्धा रामाने राज्याभिषेक करून घेण्यास नकार दिला आणि क्षत्रिय म्हणून राज्यकर्त्याने दिलेले वचन पाळण्यासाठी वनात जाण्याचा निर्णय जाहीर केला.

रामजन्माच्या पर्वकालात या प्रसंगाची आठवण येण्याचे कारण असे की भारतातील पाच-सहा राज्ये व महाराष्ट्नतील जिल्हा परिषदा व महापालिका यांची सत्ता घेण्यासाठी गेल्या महिन्याभरात ज्या प्रकारचे राजकारण इथल्या जनतेला अनुभवावे लागले आहे त्याचे मूल्य लक्षात यावे. राजा रामाची तुलना आजच्या सत्तालोलुप पुढाऱ्यांशी करता येणार नाही हे तर उघड आहे, परंतु रामराज्याची जी कल्पना आपण वारंवार उच्चारत असतो त्या दिशेने निदान आपण पाऊलभर तरी पुढे जात आहोत का; एवढे जाणून घेता येईल.

कोणत्याही पक्षाचा, त्यातील लोकनेत्याचा, त्यांच्या एकमेकांशी संबंधाचा असा कोणताही भरवसा जनतेला तर नाहीच. पण व्यक्तिश: त्या गुंडपुंड नेत्यांनाही वाटत नाही. राज्यकर्ते म्हणून पुढे येणारे हे लोक, रामाचे राज्य जाणूनसुद्धा घेण्याच्या पात्रतेचे नाहीत. त्यातल्या कोणी धर्मनिरपेक्षतेचे ढोल वाजवावेत, कोणी ठोकशाहीचा पुरस्कार करावा तर कोणी `मंदिर वहीं बनायेंगे' म्हणून छाती पिटावी. मायावतीचे राज्य गेले म्हणजे दलितांचा पराभव झाला आणि अखिलेश गादीवर आले म्हणून मुस्लिमांचा पाठिंबा वाढला अशा व्यक्तिगत द्वेषाची आणि त्वेषाची भंपकगिरी करणे असे राजकारण झाले आहे. तिकडे संसदेत स्वत:च्या रेल्वेमंत्र्याने मांडलेला अर्थसंकल्प उधळून देत केंद्रीय सरकार पाडण्याची तयारी मुख्यमंत्रीपावर असलेली एक कजाग बाई करू पाहात आहे आणि हिमाचलमध्ये निवडून आलेल्या आमदारांना आपला नेता निवडता येत नाही म्हणून हाती सापडू शकेल अशा लटपटत्या खुर्चीवर दुसरे पाच-पंचवीसजण बसू पाहात आहेत. इकडे सांगली-सातारा काय आणि मुंबई-नाशिक काय, प्रत्येकाने दुसऱ्याच्या तंगड्या ओढाव्यात असाच प्रकार अनुभवास आलेला आहे. गावात भांडत फिरणाऱ्या गावठी सिंहांचे कोयाळ वेगळे वाटू नये असे हे राजकारण रामाच्याच देशात सुरू आहे. ही गेल्या काही वर्षांतील आपल्या राज्याची प्रगती आहे.

परंतु याच रामजन्माच्या निमित्ताने राम वनवासाला निघालेला प्रसंग पुढे सांगता येईल. कैकयी आणि तिचा सत्तालोभ हटत नाही म्हटल्यावर अयोध्येच्या नागरिकांनी रामासमवेतच आपली चीजवस्तू घेऊन वनवासाला जाण्याचे घोषित केले. जिकडे राम तिकडे आम्ही अयोध्या वसवू किंबहुना राम जिथे जाईल तिथेच अयोध्या असेल असे घोषित करून सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी रामासमवेत अयोध्या सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि कैकयीला मागे राहणारी उजाड अयोध्या कवटाळून बसूद्यात, असा संकल्प केला. इतकेच नव्हे तर भरत परतल्यानंतर रामाची क्षमा मागून त्याला परत आणावे यासाठी अयोध्यावासी जनांचा प्रचंड सागर भरतासमवेत रामाच्या भेटीला चित्रकूटला गेला. रामाने त्या सर्वांची समजूत काढून परत पाठवणी केली हा त्यानंतरचा भाग. तथापि रामाच्याच नावाचा घोष करून, रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून भरताने जो आदर्श कारभार चौदा वर्षे केला, तेही रामराज्य म्हणून ख्याती पावले. या सर्वामागे अयोध्यावासीयांचा विचार, निग्रह, समजूत आणि रामाच्या माघारी राज्य चालविण्याची व्यवस्था या सर्वांस महत्त्व आहे.

रामनवमीच्या निमित्ताने रामचरित्राचे गायन करताना दैवी गुणांचा राज्यकारभार रामावर सोपवून देऊन आपण राक्षसगणांच्या नावाने बोटे मोडून उपयोग नाही. लंकेतील राक्षसराज्य जनतेच्या दृष्टीने सुखी होते, ते इथल्या जनतेला नको आहे. जनतेने क्षात्रतेज अंगी बाणवले तर आणि तरच रामराज्य अवतरू शकेल. रावणराज्य एका दिवसात दुरावस्थेला पोचत नाही. ती दीर्घ प्रक्रिया असते. त्याला रोखण्याचे सामर्थ्य जनतेच्या जागरूकतेत असते. म्हणून कोणी अखिलेश, कोणी ममता किंवा कोणी मनमोहन यांच्याकडून रामराज्याची अपेक्षा नाही अशावेळी रामराज्य निर्माण करण्याची प्रेरणा रामाने आपल्यातील प्रत्येकाला दिलेली आहे; कृतीचा काय तो अवकाश!

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...