Skip to main content

maza column in 14 May2012


घाईघाईत जाशी कुठं
ज्यांच्यामागे वाघ लागलेला असतो, ती माणसं कुत्र्यासारखी धावत असतात म्हणे. ही स्थिती केवळ शहरी जीवनातच असते असा समज आहे. मुंबईची धावती राहणी हा सगळयांच्या आवडीचा विषय असतो. लोकल रेल्वेगाडीतून निवांत तब्येतीत उतरून स्वस्थ चालीत घराकडं परतणारा मुंबईकर, ही कल्पना कोणी करू शकत नाही. पुष्कळ मुंबईवाले तर अंथरुणावरही हलक्या अंगानं लवंडत नाहीत. भदाक्कन उताणं पडायचं, आणि हातानं खेचलेलं पांघरूणसुद्धा तंगड्या झिंजाडत अंगावरती पसरायचं ही त्यांची घाईपद्धत. तितकाही वेळ त्यांना नाही म्हणून पांघरूण घ्यावे न लागणारी उकाडी हवा तिथं देवानं दिलेली असते.
अशा घाईबद्दल आजच्या आयुष्याला किंवा शहरी लोकांना उगीच नावं ठेवण्याची एक पद्धत पडली आहे. प्रत्येक माणूस प्रत्येक काळात अधिक वेगानं `लौक्कर' आटपण्यासाठी मनानं, कृतीनं धावतो आहे हे स्पष्ट दिसतं. लहान पोरांटोरांपासून सगळयांमागे `आटपा भरभर..'चा धोशा लागलेला असतो. पूर्वीच्या घरची म्हातारी माणसं, `आंघोळपाणी सक्काळी भराभर एकदाची आवरली की झालं'' या काळजीनं रात्रभर झोपायची नाहीत. पूजा, संध्या, बाराखडी.... या सगळयांच्या मागे `आवरा' हे ठरलेलं! तरीही म्हणायची एक रीत, पूर्वीच्या आयुष्याला निवांतपणा, संथपणा होता.
आपल्या गावातून मोठ्या शहराला जाण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी बैलगाडी किंवा छकडा असेल. अधिक लवकर पोचण्यासाठी घोड्यावरून जात असतील. नंतर मोटार जाऊ लागली. कोकणातून `हुंबय'ला जायला शिडाच्या होड्यांऐवजी लाँच सुरू झाल्या. सर्विस मोटारी अधिक वेगात, मग यस्टी. त्यावेळची ती आधुनिक सोय लवकरच खटारा किंवा लाल डब्बा म्हणवला जाण्याइतका पुढच्या मोटारपिढीला जोर आला. आता पाच तासांनी पोचणाऱ्या `जनता गाडी'ऐवजी साडेतीन तासात जाणारी टू बाय टू सस्पेंन्शन बस आपण वापरू लागलो इतके परिवर्तन `साध्या दरात' झाले. वास्तविक जर आपण स्वत:, उगीच धावत्या आयुष्याचा इतका तिटकारा करत असू तर पाच तासांच्या स्वस्त गाडीतून आपण का जात नाही? ज्यांना काही फारसं कामधाम उरलेलं नाही, केवळ लेका-भावाला भेटण्यासाठी दहा वीस मैल जायचं आहे त्यांनी धावपळ किंवा आनुषंगिक त्रास टाळून निवा%%न्त चालत जायला काय हरकत आहे? पण तशी कल्पनाच कालबाह्य वाटते.
एखादी गाडी आपल्या ठिकाणावर थोडी उशीरा पोचणार, असं दिसू लागलं तर त्या गाडीतले आपणासह प्रत्येकजण शिव्याशाप मोजू लागलो आहोत. उलट ती गाडी दहापंधरा मिनिटं आधीच पोचली तर खुशीच्या शाबासक्या, टाळया. दहा मिनिटं आधी गाडी फलाटाला लागली तर त्या `लौकर'च्या आनंदात कित्येकजण कोकरूउड्या मारत झपाटून बाहेर धावतात. म्हणजे लौकरातही आणखी घाई. कोणतंही काम लौक्कर संपवायचं, रांगेत आपला नंबर लौक्कर लागावा, लग्नाच्या पंगतीत आपल्या पानात आधी पडावं, सर्वांच्या आधी हात धुवावेत; बाजारात भाजी घेऊन झटक्यात घरी पोचावं, आपली कामाची सुटी आधी व्हावी, आपल्या नळाला आधी पाणी यावं.... किंवा तोटीतून पस्स्स आवाज करत पाणी येत असल्याचं आपल्याला लवकर कळावं....! केवळ माणसाला जन्मजात घाई झालेली असते. ही लगबग अनादिअनंत आहे.
सग्गळं लवकर आटोपून टाकणारा माणूस आपलं हे घाईचं आयुष्य मात्र लांबवायला पाहात असतो. गंमत आहे; सगळं लौकर उरकावं आणि आयुष्य मात्र लांबत जावं! - मग उरणाऱ्या काळात करायचं काय? फुकाची घाईच ना?

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन