Skip to main content

21 April 2014

चला, पुन्हा शेतकरी व्हा...
ब्राह्मण मंडळींनी समाज पोषक असणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात भरीव कामगिरी केली. पण गेल्या पन्नास वर्षांत ब्राह्मणांची निरनिराळया कारणांनी पीछेहाट झाली. कूळकायदा लागू करून ब्राह्मणांना जमिनीवरचा हक्क गमवावा लागला. आश्चर्याचा भाग असा की, ब्राह्मणांनी सहजपणे जमिनींवर पाणी सोडले, साधा निषेधही केला नाही. ब्राह्मणांत अनेक मंडळी कायदेतज्ज्ञ असून कूळकायदा काय आहे यावर अभ्यासही केला नाही. कूळ कायद्यात गेलेल्या जमिनी, योग्य किंवा सक्षम लोकांच्या हातात गेल्या असेही नाही. त्यामुळे अनेक जमिनीतून योग्य तितके उत्पादनही घेतले जात नाही. त्यामुळे शेती धंद्याचे नुकसान झाले, पर्यायाने देशाचेही नुकसान झाले. काही सुशिक्षित भूमीहीनांनी जमिनी खरेदी करून त्यात सोने निर्माण केले आहे, हे पाहता जमिनी कर्तबगार लोकांच्याच ताब्यात जाणे योग्य असे जाणवले. आता `ठीक आहे! झाले ते झाले असे म्हणून सोडून दिलेले बरे!' असे ब्राह्मणांचे धोरण आहेे.
ब्राह्मण वर्गावर आजवर अनेक आक्रमणे झाली. शासकीय नोकऱ्यांत त्यांना स्थान नाही, ब्राह्मण ब्राह्मणेतर दरी वाढवून ब्राह्मणांचे राजकारणातील स्थान संपुष्टात आले. पण ब्राह्मण वर्ग खचून गेला नाही. त्यांनी आपली गुणवत्ता वाढवली. मोठमोठ्या पदांवर नोकऱ्या करून मोठी पदे भूषविली. आपला मोर्चा शहराकडे वळवला. काहीजण परदेशात गेले व तेथेही त्यांनी आपले स्थान बळकट केले. आज सरासरी घरटी एक व्यक्ती परदेशात आहे. तरीही आज ब्राह्मण वर्ग अस्थिरतेकडे चालला आहे, ही बाब दखल घेण्यासारखी आहे. ज्यांची स्वत:ची जमीन आहे त्यांनी आपल्या जमिनीकडे दुर्लक्ष न करता, तिचा वापर योग्य तऱ्हेने करून शेती फायद्यात कशी आणता येईल याचा विचार करावा.
फ्लॅट व शेअरमध्ये लोक गुंतवणूक करतात पण फ्लॅटची किंमत शेतजमिनीच्या तुलनेत फारशी वाढत नाही. फार तर चलनवाढीच्या वेगानुसार काही प्रमाणात वाढते. शेअरमध्ये होणारा फायदा हा तात्पुरता व फसवा असतो. बडे बडे भांडवलदार वेगवेगळया खेळी करून शेअर भावात चढउतार घडवून आणतात. आणि समजा १०० रु. चे एक दोन वर्षात दोनशे रुपये मिळाले तरी त्या कालावधीत इतकी महागाई झालेली असते की झालेला नफा त्यामानाने मोठा नसतो व रुपयाची किंमतही घटलेली असते.
बांधकामे व कारखानदारी यामुळे शेतजमिनी घटत आहेत. जमिनीचे भाव झपाट्याने वाढत आहेत. पुण्याजवळील परिसरात तीन-चार वर्षांपूर्वी जमिनीचे दर १ ते १.५ लाख रुपये प्रतिएकर होते. आज त्याच जमिनी ३५ ते ४० लाख रुपये प्रतिएकर झाल्या आहेत. इथून पुढेही जमिनींचे दर वाढत राहणार आहेत हे नक्की. तेव्हा जमिनी विकतानाही तीन वर्षांपूर्वीच्या दराचा फरक लक्षात घ्यावा व नंतरच निर्णय घ्यावा. याचबरोबर लक्षात घ्यावे की जमिनीचे दर या प्रमाणात वाढत राहिले तरी विकण्यापेक्षा शेती करून उत्पन्न वाढवत राहाणेच योग्य ठरेल. यामुळे दरांमध्ये होणाऱ्या फरकाचा फायदा मिळेलच. शिवाय जमिनीत उत्पादन घेण्यासाठी शेती केली तर थोडेफार उत्पन्न मिळाले.
त्यासाठी पारंपारिक धान्य शेतीच केली पाहिजे असे नाही. लगेचच उत्पन्न मिळाले नाही तरी, पुढील अनेक वर्षे उत्पन्न देणारी वृक्ष लागवड करता येऊ शकेल. समजा एखादा माणूस मुंबईला नोकरी करत आहे. त्याची कोकण भागात शेती आहे. तेथे राहून शेती करणे जमत नाही. नोकरीत वेळ मिळत नाही, मजूर मिळत नाहीत, राखणदार ठेवला तर त्याचा भरवसा नाही. अशा परिस्थितीत शेती विकू नये तर काय करावे? यावर वृक्षलागवड हेच उत्तर आहे. कोकणात अनेक प्रकारचे वृक्ष वाढू शकतात. असे काही वृक्ष लावून झुडुपांचे कुंपण लावून, तसेच रखवालीसाठी एखादे कुटुंब ठेवून, यशस्वीपणे वृक्ष लागवड करता येईल. देखभालीसाठी मालकानी एक दोन आठवड्यांनी चक्कर मारली तरी चालण्यासारखे आहे. त्यामुळे तेथील रखवालदारावर आपोआपच लक्ष राहील. कोकणात माणूस मिळणे अवघड आहे हेही खरे, पण नाइलाजाने असा माणूस परप्रांतातून आणावा लागेल. परप्रांतात विशेषत: कर्नाटकात असे मनुष्यबळ मिळू शकते. वृक्ष लागवडीतून मिळणारे उत्पन्न उशीरा मिळाले तरी निवृत्तीनंतर एक प्रकारची पेन्शन मिळत राहून आयुष्याची संध्याकाळ रम्य वातावरणात घालवता येईल. जमिनींच्या वाढणाऱ्या किंमतीचा विचार करता, झालेला खर्च वाया गेला असे होणार नाही.
दुसरा पर्याय म्हणजे पडिक जमिनी कॉन्ट्न्ॅक्ट पद्धतीने कसायला द्याव्यात. ज्यांच्या जमिनी जवळपास किंवा सलग असतील त्या सर्वांनी संघटन करून एक कंपनी बनवावी. त्या कंपनीने कोकणातल्याच एखाद्या तरुणाला कसण्यासाठी जमिनी कराराने द्याव्या. जे तरुण बेकार आहेत किंवा कोकणाबाहेर जाऊन अल्पशा पगारावर नोकरी करतात अशा तरुणांना कोकणात आणून जमिनी कराराने द्याव्यात. ज्यायोगे आपल्या तरुणांना कामही मिळेल व आपल्या भागातच योग्य उत्पन्न मिळेल.पिढीजात वाटण्या होत गेल्याने काहीजणांकडे तुटपुंज्या जमिनी आल्या आहेत. अशांनीही वरीलप्रमाणे कंपनी स्थापन करून एकत्रितपणे जमिनी कसल्या तर त्यापासून चांगले उत्पन्न मिळू शकेल. जमिनी एकत्रित केल्यामुळे क्षेत्र मोठे झाल्याने एकत्रितपणे अनेक कृषीपूरक व्यवसाय सुरू करता येतील. कुक्कुटपालन, फळ प्रक्रिया उद्योग, पशूपालन व दुग्धव्यवसाय तसेच आपल्याच जमिनीतून निघालेल्या उत्पन्नावर काही उद्योग सुरू करता येतील. जसे नारळापासून तेल, खोबऱ्यापासून मिठाई, झावळयांपासून ब्रश, खराटे, पायपुसणी, करवंट्यांपासून औषधी तेल किंवा जळण वगैरे. ही सहकारी शेती काल्पनिक नाही. कोकणातच अशा सहकारी शेती कंपन्या आहेत. चिपळूणजवळ पेढांबे गावानजिक एक सहकारी शेती आहे. तसेच माखजनजवळ असा प्रयोग सुरू झाला आहे. गुजरातेतदेखील अशा कंपन्या यशस्वी वाटचाल करीत आहेत.
जमिनी पडिक राहिल्या तर त्यावर आक्रमण होते किंवा अन्य दुरुपयोग होऊन शेवटी जमिनीवर पाणी सोडावे लागते. जमिनीवरील ताबा सोडून आपले अस्तित्व नष्ट करू नये.ज्यांना जमिनी नाहीत अशांनी पुन्हा जमिनी विकत घेणे योग्य ठरेल. यावर एक शंका उपस्थित केली जाईल की, भूधारक  नसताना जमीन कशी विकत घेता येईल? कृषी कंपनी उभी केली तर भूधारक असण्याची अट शिथिल होऊ शकते. जमीन घेण्याच्या दृष्टीने कोकण भाग योग्य वाटतो. कारण कोकणात पर्जन्यमान चांगले आहे. तेथे भरपूर फायदा मिळवून देणारे मसाल्याचे पदार्थ, फायदेशीर फळे, औषधी वनस्पतींचे उत्पादन निघू शकते. शिवाय कोकण भूमीला भरपूर मोठा समुद्रकिनारा लाभल्याने मत्स्य उद्योग व पर्यटन क्षेत्रे उभी करता येऊ शकतील. ब्राह्मण मंडळी जात्याच बुद्धिमान व कर्तबगार असल्याने ते जमिनीतून सोने नक्कीच पैदा करू शकतील.
त्या दृष्टीने एकत्र येऊन सलग जमिनी घ्याव्यात व सहकारी पद्धतीने शेती उद्योग सुरू करावेत. अशी संघटित शक्ती उभी राहिल्याने घुसखोरी थोपविणे सोपे जाईल आणि सर्वच समाजासाठी आदर्श व फायदेशीर शेतीचे प्रत्यक्ष उदाहरण उभे करता येईल. सर्वांनी मिळून जमिनी घेण्याचा आमचा विचार झाला आहे. ज्यांची कोकणात/अन्यत्र जमीन घ्यायची इच्छा आहे व ज्यांची कोकणभूमीत विनावापर घरे असतील त्यांनी कृपया संपर्क साधावा.
- अ. वि. सहस्रबुद्धे,
अरुदिशा, विश्वविद्या सोसायटी,
जोशी मॅटर्निटी होम मागे, जुना वारजे नाका
पुणे - ५८ (मोबा.९०१११००९०९)


मध्यमवर्गी मार्ग
मध्यमवर्गी लोक राजकारणापासून दूर असतात, असे म्हटले जाते. सध्याचे वास्तव असे की हा वर्ग सगळयापासूनच दूर चालला आहे असा भास होतो. राजकारण हे गुंडपुंडांचे, धकाधकीचे, शिव्याशापाचे असते अशी समजूत त्या वर्गाने करून घेतली आहे, हे तर खरेच; पण त्या व्यतिरिक्त समाजकारण, शिक्षण, अध्यात्म, लेखन-वाचन याही क्षेत्रांपासून हा वर्ग दूर चालला आहे का? हे दूर पळणे, व त्यास अलिप्तता म्हणवून घेणे हेही आजचेच नव्हे, तर पिढ्यान् पिढ्याचे आहे. असे सर्वापासून अंतर ठेवून राहणाऱ्या लोकांनाच मध्यमवर्गी म्हणत असावेत. परंतु हे खरे नाही. उलट विविध क्षेत्रांत ज्यांनी उत्तुंग कामगिरी केली आहे किंवा जे आजही करत आहेत, त्यात मध्यमवर्गीयांचा वाटा अंमळ जास्तच आहे. राजकारणातच काय, कृषी-सहकार-कला-वैद्यक वगैरे कोणत्याही क्षेत्रांत तशी मक्तेदारी कोणत्याच एका वर्गाची नाही, सहसा नसते. परंतु मोठा वाटा मध्यमवर्गाचा असतो.

मुळात मध्यमवर्ग ही संज्ञा वा संकल्पना आर्थिक परिस्थितीवरून एखाद्या समाजगटास मिळते असे मानता येत नाही. तसे पाहिले तर एकाच घराण्यातील किंवा ज्ञातीमधील एकूण कुटुंबे सर्व आर्थिक थरांत विभागलेली असतात. त्यांत काही गर्भश्रीमंत लक्ष्मीपुत्र असतील, काही आपकमाईतून कोट्यधीश, तर काही खऱ्या दारिद्र्यरेषेखाली राहिले असतील. पण सर्वसाधारणत: त्या अख्ख्या घराण्याला मध्यमवर्गीय म्हटले जाते. `मध्यमवर्ग' या, शहाण्या मानल्या जाणाऱ्या समाजगटासही समाजात गटाने किंवा समूहाने एकत्र राहता वागता येत नाही. त्यात ज्याचा तो स्वतंत्र वागतो, केवळ स्वत:ला शहाणा समजतो. `सर्वांनी एकत्र यायला हवं' असे म्हणत तो अलिप्त होतो. अशा प्रवृत्तीच्या लोकांना मध्यमवर्गीय म्हणतात!

मध्यमवर्ग हा शब्द आर्थिक क्षेत्रातला नव्हे, तर तो सामाजिक किंवा वैचारिक क्षेत्रातला, प्रवृत्तीदर्शक आहे. कोणत्याही विषयात जेव्हा दोन विषम विचारांच्या समूहांत वर्गसंघर्ष होतो; त्यावेळी जो संघर्षाच्या दोन्ही बाजूंना नसतो तो मध्यम वर्ग असतो. त्या समूहाला संघर्ष मान्य नसतो. हेही नको, तेही नको, हेही योग्य पण तेही अयोग्य नव्हे अशी धारणा बाळगणे ही या मध्यमवर्गाची प्रवृत्ती असते. इतकेच नव्हे तर, आपला विचार-आचार-उच्चार हे सर्व मध्यमच आहे असे त्यालाच वाटत राहते. त्याला `आमटी तिखट आवडते की हिमूळ?'असे विचारले तर याचे उत्तर `मध्यम' असेच येईल! घर कसे हवे, `स्थळ' कसे हवे, साडी कितीची घ्यावी... अशा प्रत्येक प्रश्नाला `मध्यम असावे..' हेच उत्तर येईल - तेही `आम्हाला शोभेल असं मध्यम! त्यात फार डावे-उजवे नसावे!' हे निश्चित.

सध्याची निवडणूक डावे पक्ष आणि उजवे पक्ष यांच्यात प्रामुख्याने आहे असे म्हणतात. शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, कम्युनिस्ट, बहुजन पक्ष ही मंडळी डावी म्हणायची; तर मनसे, भाजप, तेलगू देसम हे उजवे. शिवसेनेची बाजू अनिश्चित. समाजवाद्यांची घडी पार विस्कटलेली. एका विदेशी लेखकाने जगातल्या समाजवादास, `अनेकजणांनी वापरल्यामुळे जिला काही आकारच राहिलेला नाही अशी टोपी' असे म्हटले. याशिवाय पीपल्स वॉर-माओवादी-नक्षलवादी असे अती डावे किंवा नाझी, तालीबान, हिंस्र धर्मांध असे अती उजवे असतात. यातील कोणताही विचार, दिशा, मार्ग, आचार नसलेला वर्ग म्हणजे मध्यमवर्गी. त्यास मध्यममार्गी म्हणणे जास्त युक्त आहे.

गेल्या दीडदोनशे वर्षांपासून हे डावे-उजवे अर्थकारण सुरू झाले. कार्ल मार्क्सने श्रमवादी विचारसरणी मांडली व सरंजामदारी-भांडवलदारीच्या विरोधात साम्यवादी जाहीरनामा मांडला. त्यापूर्वी १७८९ मध्ये फ्रान्समध्ये राजकीय व सामाजिक क्रांती झाली, राजदरबारात किंवा प्रतिनिधींच्या सभेत सामान्य वर्गातील क्रांतिपक्षीय प्रतिनिधी हे सभापतीच्या डावीकडे बसावेत आणि उच्चभ्रू, परंपरा मानणाऱ्या पण तरीही पुरोगामी बदल स्वीकारणाऱ्या प्रतिष्ठितांनी सभापतीच्या उजवीकडे बसावे अशी व्यवस्था होती. तिथल्या धर्मशास्त्रातही डावा हात अशुभ-अशुद्ध-कनिष्ठ मानला जात असे. पुरोगामी क्रांतिकार्यातही ती धर्मशास्त्रीय रूढी पाळली जाणे हे एक विशेष; आणि तेव्हापासून परंपरावादी उच्चभ्रूंना उजवे, आणि प्राप्तस्थितीला विरोध करणाऱ्यांना डावे म्हटले जाते, त्यावर कुणी आक्षेप घेतला नाही हेही विशेषच!

या दोन्ही विचारसरणींच्या मधला वैचारिक मार्ग स्वीकारणारे ते मध्यममार्गी म्हटले पाहिजे. हेही नको अन् तेही नसावे असे म्हणणारा हा वर्ग परंपरा सांभाळतो आणि नव्याचा स्वीकारही लवकर करतो. अस्पृश्यता निवारण, महिलांना समानता, धार्मिक सहिष्णुता असल्या बाबतीत डावे म्हणवून घेणाऱ्या समाजगटांपेक्षा मध्यमवर्गी हे कितीतरी पटीने पुरोगामी आहेत. अंधश्रद्धा-कर्मकाण्डे-कालबाह्य अनिष्टता या मध्यमवर्गाने इतरांपेक्षा कधीच मागे टाकली आहे.

तथापि जुन्यातील ज्ञान-विज्ञान, शुद्धता, साक्षेप, सृष्टीशी संलग्नता या गोष्टी मध्यमवर्गानेच जपून टिकवून सांभाळल्या आहेत. त्या गोष्टी नाहीशा झाल्या असत्या तर आपला समाज रेल्वेच्या फलाटासारखा विस्कळीत आणि भोंगळ झाला असता. आणि गेल्या शे-दोनशे वर्षांत मध्यमवर्गी चळवळी झाल्या नसत्या तर आपला समाज गंगाघाटाप्रमाणे घाण पाण्यात डुबक्या मारण्यात पवित्रता समजत राहिला असता.

म्हणूनच या वर्गाच्या मध्यम विचार-आचार-उच्चार यांत वावगे मानण्यासारखे काही नाही. नव्या आर्थिक परिवर्तनात सामाजिक स्तरांतील दरी वाढत चालली आहे. मध्यमवर्गातील काही जर सरंजामी झाले किंवा काही कंगाल झाले तर ओरबाडणारे संघर्ष वाढतील. ते सहन करू शकणारा व या चळवळी पुढे नेणारा मध्यमवर्ग त्याकरिता टिकून राहिला पाहिजे.



आठवांचे साठव...!
सर्पाची दोरी
कऱ्हाडच्या सायन्स कॉलेजच्या वसतिगृहात असताना (१९६६) तिथं खरं तर फारसं रमता आलं नाही. वसतिगृहाचं बांधकाम पूर्ण होऊन खूप काळ झालेला नव्हता. त्यामुळं  न्हाणीघरांत गरम पाण्याचे नळ वगैरे अजून नव्हते. खालून बादली न्यावी लागे. सकाळी घाईगर्दीच्या वेळी हा व्यापच व्हायचा. आधी त्या वयात आंघोळीचा उत्साह तितपतच, शिवाय हे गरम पाण्याचे सोपस्कार टाळण्याकडं कल असायचा. नळाला टाकीचं पाणी असायचं, पण ते अर्थात फारच गार असतं.
यावर सोपा उपाय म्हणजे कुुठंतरी पोहायला जाणं. विहीर किंवा नदीचं पाणी सकाळ सकाळी कोमटसर असतं. शिवाय पोहोण्याची हौस व्हायची. वसतिगृहातलं आमचं सगळं मित्रमंडळ खेड्यांशी निगडीत असल्यामुळं विहिरीला पोहायला जाण्यात आम्हाला आनंदच होता. त्यासाठी स.गाडगेमहाराज कॉलेजच्या पूर्वेला पिछाडीच्या रानात एक मोठी विहीर पोरांनी शोधून ठेवली होती. तिथं जाण्याची आम्हा मोजक्याच जणांची प्रथा सुरू झाली.
प्राचार्य रावेरकर हे कॉलेजच्या वेळेपूर्वीच तासभर कॉलेजवर येत. बागबगीचा, बांधकाम, वसतिगृह असा त्यांचा फेरा होत असे. त्यांच्या येण्याआधी आम्हाला आंघोळीहून परत आमच्या खोलीत पोचावे लागे; कारण त्यांच्या काळजीयुक्त शिस्तीत हे पोहायला वगैरे जाणे बसत नव्हते. नंतर कधीतरी त्यांना बहुधा शिपायाकडून, किंवा आमच्यापैकी कोणीतरी चुकून पचकला म्हणून समजले. त्या `बेशिस्ती'बद्दल आमच्या सर्वांच्या घरी कळविण्यात आले. पुढच्या खेपेस घरी गेलो तेव्हा त्याबद्दल बोलणं झालं. पण माझ्या घरच्या वडीलधाऱ्यांना त्या वयातल्या पोरानं पोहायला जाण्यात गैर ते काय, कळले नाही. त्यांनी तिथंच तो विषय संपवला. प्राचार्यांची चूक नव्हती. त्यांनी मुलांची जबाबदारी स्वत:वर मानली होती. कधी पिचत काही अप्रिय घडलं असतं तर? - तर त्यासाठी त्या कॉलेजला दोष देण्याइतकी `जागरूकता' त्या काळात नव्हती, आणि घरच्यांचा विश्वास कॉलेजवर - तितकाच स्वत:च्या पोरांच्या तरुण वयावरतीही होता. पण सरांनी काळजी करणे योग्यच होते, असे वाटायला लावणारा एक प्रसंग आलाही!
एके सकाळी नेहमीसारखे आम्ही त्या विहिरीवर पोचलो. पावसाळा उलगला होता. अंगरखे उतरवून कोवळे ऊन पाठीला छान वाटत असले तरी ते झेलत बसायला वेळ नव्हता. कॉलेजचे तास, प्रॅक्टकल्स आणि रावेरकर सरांची फेरी हे सगळं व्यवधान सांभाळण्यासाठी परत जाण्याची गडबड होती. उघड्या अंगानी विहिरीच्या पायऱ्या उतराव्यात, की वरून उडी मारावी अशा मन:स्थितीत आम्ही विहिरीच्या काठाळीशी रेंगाळत होतो. विहिरीच्या बाजूस दहा-वीस पावलांवर एक भला मोठा खड्डा होता. कधीतरी मुरूम-मातीसाठी तो काढला असावा. अर्धी-कच्ची विहीर काढण्यातून अर्धवट काम सोडून दिल्यासारखं वाटेल, इतका तो खड्डा मोठा होता, आणि त्या डबक्यात पाणी साठलेलंही होतं. राड पाणी, त्यात पालाकचरा, त्याच्या काठाला वरपर्यंत झाडोरा-घाणेरी यांचं केंजाळ होतं. बाजूच्या रानात निसवायला आलेलं ज्वारीचं पीक उभं होतं. खड्ड्यातल्या पाण्याशी बरेच बेडूक होते. त्यातलं एखादं खर्जात खुरखुरत होतं.
यातल्या कशाकडं लक्ष देण्याजोगं आम्हाला एरवी कारण नव्हतं. पण उभ्या पिकाच्या दाटीतून मोठ्या आवाजात खसफसाट ऐकू आल्यामुळं, आमच्यातल्या एकाचं तिकडं लक्ष गेलं. थिजल्यामुळं आत ओढलेल्या आवाजात तो ओरडला, `अरे, ते बघ ते बघ!' सगळेजण टवकारून पाहात राहिले. अरे बापरे! साधारण मांडीइतक्या जाडीचा अजस्त्र नाग झेपावत आला, जवळच्या खड्ड्यातील बेडकांचा मोहरा घेत त्यानं क्षणातच दीडदोन फूट उंच फडा उभारली आणि सप्पकन् बेडूक धरले. एकाच ठिकाणी खेटून बसलेले चार-सहा बेडूक त्याला झटक्यात सापडले. नाग वळला, त्याच्या फणीतून एकदोन बेडूक निसटून पडले. पण जे मिळाले तेवढे पकडून उभारलेल्या फण्यानं तो नाग, आला त्याच वाटेनं तेज गतीनं सळसळत गेला. त्यांच्या अंगावर निश्चितपणे केस होते, आणि बेडकांवर झेप घेऊन रागात परत फिरताना ते ताठ उभारले होते. आम्ही शास्त्र शाखेचे चांगले विद्यार्थी होतो. सापाला केस नसतात असं माहीत होतं, नंतरही पुष्कळदा वाचनात आलं. पण या अजस्र धुडावर आम्ही केस पाहिले. त्याला नाग तरी कसं म्हणावं? छे! डायनॉसोर जातीचा हा नाग म्हणायचा!
हा सगळा खेळ एकदीड मिनिटात संपला. आम्ही सगळे चुप्प राहून तो खेळ जवळून पाहिला कारण तोंडावाटे शब्दच फुटला नाही. नागोबा परत गेल्यावर सगळी उद्गारचिन्हं आमच्या मुखांतून सांडू लागली. आता या चांगल्या विहिरीत पोहायला पाण्यात उतरण्याचं धाडस आम्हाला होईना. मुकाट्यानं सगळयांनी `ए चला चला' म्हणत अंगात कपडे अडकवले आणि अंगरख्याची बटणं लावत घाईने परत सुटलो.
प्राचार्यांची जबाबदारी केवढी होती, ते आज लक्षात येतं. परंतु असले अनुभव मुक्तपणी घ्यायचे तर त्या वयातच घेतले पाहिजेत. बिनभिंतीच्या शाळेत मिळालेलं तेही शिक्षणच होतं की!
- वसंत आपटेे, `वाल्मिकी' किर्लोस्करवाडी ४१६३०८

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन