Skip to main content

12 May 2014

अपेक्षित सत्तांतर
हा अंक हाती पडेपर्यंत लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन नव्या सभागृहाची रचना पूर्ण झालेली असेल. आजच्या एकूण वाहत्या वाऱ्यांचा मागोवा घेतल्यास श्री.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बहुपक्षीय सरकार येण्याची शक्यता अधिक वाटते. तथापि हे वाहते वारे अचानक दिशा बदलून अपेक्षित पर्जन्य दुसरीकडेच नेऊ शकतात. लोकांच्या ओठात जे आहे त्यावरून मोदींच्या सत्ताग्रहणाचा अंदाज बांधला जात आहे, परंतु पोटात काय आहे हे प्रगट होत नाही. आणीबाणी संपल्यानंतर इंदिरा गांधींना निवडणूक कठीण जाणार इतपत अंदाज होता, परंतु त्यांची इतकी धूळधाण उठेल असे भविष्य राजकीय मंडळींही व्यक्त करीत नव्हती. स्वत: इंदिरा गांधींनाही अशा पराभवाचा शेवटपर्यंत अंदाज नव्हता. दहा वर्षांपूर्वी भाजपप्रणित सरकार फील गुडच्या अतिरेकाने कोसळले. तेव्हाही तसा पराभव वाजपेयींनीसुद्धा अपेक्षित केलेला नसावा. आज जे वातावरण दिसते त्यावरून `आता येणार मोदी सरकार' ही घोषणा सत्यात येण्याची शक्यता बरीच दिसते.

कोणते सरकार येणार आणि कोणते सरकार यावे हा मुद्दा महत्त्वाचा नाही. परंतु काँग्रेसचे अक्षम सरकार नको एवढे मात्र लोकांचे मत निश्चितच बनले आहे. मोदींच्या एकूण कार्यप्रणालीवरून विरोधकांच्या मते ते कदाचित हुकुमशहा बनू शकतील. परंतु ते पक्के राजकारणी आहेत हे एकदा मान्य केल्यानंतर अशी हुकुमशाही या देशात कदापि चालणार नाही ही गोष्ट ते पुरेपूर जाणून असणार हेही स्वीकारावे लागेल. किंबहुना हे किंवा ते आज ना उद्या कधीही सत्तेवर आले तरी हुकुमशाहीची लागण होताच इथले लोक त्यांना फेकून देतील ही गोष्ट भारताच्या लोकशाहीच्या व जनतेच्या दृष्टीनेही अभिमानास्पद म्हणावी लागेल. इतकेच नव्हे तर प्राचीन काळापासूनच या देशाला लोकशाहीचे बाळकडू मिळालेले आहे. एखादा राजा वंशपरंपरेने गादीवर बसला तरी त्याचा कारभार जोपर्यंत लोकहिताचा आणि लोकांच्या इच्छेचा सन्मान करणारा असतो तोपर्यंतच त्याचे राजपद टिकते असे अनेक दाखले देता येतील. शिवाजी महाराजांचे राज्य राजकीय परिभाषेत सरंजामदारीचेच होते. परंतु त्यांना `लोकराजा' म्हटले जाते. कारण त्यांनी लोकेच्छेने राज्य चालविले.

दुसरी गोष्ट, सत्ताधारी कोणीही असला तरी त्याची नीती काय आहे ही गोष्ट जनता नेमकी जोखत असते. राज्यावर कुणाला बसवायचे हे त्याच निकषावर ठरत असते. आजपर्यंतचे काँग्रेसचे सरकार जो काही कारभार करत होते त्यापेक्षा एकदम जादूची कांडी फिरून सगळा आनंदीआनंद होईल अशी अपेक्षा कोणी केलेली नाही. कदाचित सध्याच्या समस्या नाहीशा होतील असेही नाही. परंतु त्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न करणारे तळमळीचे सरकार आहे असा प्रत्यय सामान्य जनतेला यावा लागतो. तर त्या सत्तेबद्दल लोकांना आपुलकी राहते. ते मत तयार करताना जनता कोणत्याही सत्ताधाऱ्याला पारखून घेते, तिथे मीडियाच्या अकांडतांडवाचा फारसा उपयोग होत नाही.

रावणाच्या राज्यात प्रजा सुखी होती असेच म्हणावे लागेल.  सुवर्णनगरी लंका संपन्न होती, तशी संपन्नता उद्याच्या महान भारतात असावी आणि ती कोणत्याही मार्गाने यावी असे सामान्य माणूस म्हणत नाही. उलट स्वत: राम वनवासातच होता आणि सिंहासनाबद्दल निरिच्छ असलेला भरत राज्यावर होता, तरीही असंपन्न राज्याला आजही रामराज्य म्हटले जाते. रावणाचा पराभव होणे सर्वांना म्हणजे लंकेतल्या जनतेलाही इच्छित होते. कारण रावणाची नियत तेथील प्रजा तपासून पाहात होती.

आजही जुन्या पिढीतले कित्येकजण इंग्रजांचे राज्य चांगले असे म्हणतात. गुलामगिरीचे राज्य असले तरी आपले घर सुखाने चालावे इतकीच जर अपेक्षा असेल तर मोदी किंवा  आणखी कुणी येण्याने फारसे घडणार नाही आणि बिघडणारही नाही. शिवाजीच्या राज्यात इथल्या अर्धपोटी प्रजेने मोठमोठे वाडेहुडे बांधले नाहीत. मोंगलाईत मात्र ऐशआरामी वतनदारी सुखाने नांदली. परंतु उत्तरेतील अतिक्रमणे मराठेशाहीने थोपविली म्हणून दक्षिणेतील गोपुरे वाचली हा इतिहास आहे. त्यामुळे महाराष्ट्नतल्या गडकोटांचे दगड आणि चटणीभाकरी यांच्याबद्दलही आपल्याला समाधान वाटत असते. नव्या सरकारकडून ही अपेक्षा राहील.

पाश्चिमात्य संस्कृतीचे अतिक्रमण आपल्याकडे सरसकट चालू आहे. कोण कुठला सहारा लोकांचे पैसे लुंगावतो आणि त्यांची दौलतजादा करून आमचे क्रिकेटीयर त्या तालावर नाचतात. अशा उद्योगातून मिळणारा पैसा देशाची समृद्धी वाढवू शकेल का, याचे उत्तर देणारी सत्ता देशावर असली पाहिजे. शेतकऱ्यांना शेतीविकासासाठी अल्प व्याजदराने दिलेले पैसे जास्त व्याजाच्या इच्छेने मोठ्या बँकांतून ठेवरूपाने गुंतवले जातात. म्हणजे कर्जवाटप आणि ठेवी या दोन्हींचे आकडे फुगतात, त्यातून विकास कोणाचा साधतो? अशा तऱ्हेची अनेक प्रलोभने आणि क्लृप्त्या लढवून श्रीमंत होण्याचे डोहाळे पाश्चात्य देशांतून पुरविले जातात, ती लाट आपल्याकडे येऊ लागली आहे.  प्रत्येक माणसाला त्याची जी किंमत असेल ती दिली की तो वश होतो हे तत्त्वज्ञान देशाला महाग पडते. त्याउलट प्रत्येक माणसाला मूल्य मिळवून देण्याचा प्रयत्न येणाऱ्या सरकारने केला पाहिजे. २ रु.दराने तांदूळ किंवा अयोध्येत राममंदिर असल्या बाष्कळ घोषणांसाठी भारतासारख्या खंडप्राय देशाची सत्ता राबविली जाऊ नये.


जातीअंत नव्हे जातीचा पगडा
नगर जिल्ह्यातील एका खेड्यात नितीन आगे या पोराची निर्घृण हत्त्या झाल्याच्या बातम्या आणि त्यावरच्या पुष्कळशा प्रतिक्रिया सध्या धुमसत आहेत. या पोराचे वय शाळकरी १७ वर्षांचे, आणि त्याने शोधलेली मुलगी त्याच्यापेक्षा लहान असणार. ज्याला कोवळे प्रेम म्हणतात त्याही वयाची ही मुले नाहीत. पण आजकालच्या युगात जो बटबटीतपणा सर्वत्र माजला आहे त्यातलाच हा एक प्रकार म्हणता येईल. परंतु या मुद्द्याकडे दुर्लक्ष व्हावे एवढा त्याचा जातीवरून झालेला खून ही गोष्ट सर्वत्र झोंबणारी आहे. मोदींच्या प्रचारलढाईत त्यांचीही जात चघळत ठेवण्याचा वावदूकपणा चालू आहे. मोदींची जात कुठली हे आजही निश्चित समजत नाही. ती कोणती का असेना तिला मागासवर्गीय ठरवण्याचा निर्णय जो कधी झाला त्यास अनुसरून तेही मागासवर्गीय झाले. नितीन आगे याची हत्त्या करणारे लोक उच्चवर्णीय कसे आणि का म्हणायचे हा तर मोठाच प्रश्न आहे. गुणकर्माने जात ठरत असेल तर या लोकांना मनुष्यजातीच्याच बाहेर काढले पाहिजे. परंतु आपल्याकडे अशा प्रकारचा जातीअंत होऊ शकत नाही हे या दोन्ही प्रकरणांवरून लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्नत जी जात ठरते ती राजस्थानात वेगळीच काही असते. त्याशिवाय पोटजाती, उपजाती, त्यांच्यातले पंथ हा सगळा गोंधळ विचारात घेतला तर जातींवर आधारित समाजकारण किंवा राजकारण करण्याचे दिवस संपले आहेत असे कधीतरी एकदा ठरवावेच लागेल.
अलीकडे लग्नाच्या बाजारातील मुलांना योग्य मुली मिळत नाहीत अशी एक सार्वत्रिक तक्रार असते. त्यातला महत्त्वाचा भाग असा की, या मुलांना स्वजातीचीच मुलगी हवी असते. वर्तणुकीवरून जात ठरवली तर असे विवाहप्रश्नसुद्धा खरे तर सोपे होतील. तशी काही उदाहरणे आजकाल घडतही आहेत. काळाच्या ओघात आपोआपच या जाती नाहीशा झाल्या तर तो नैसर्गिक न्याय ठरेल. मुद्दाम दामटून किंवा कायद्याच्या डब्यात कोंबून असल्या समजुतींचे प्रश्न सुटत नाहीत, उलट त्यांचा बभ्रा होऊन ते अधिक टोकदार बनतात असा धडा त्यातून घ्यायला हवा.
अंधश्रद्धेचा कायदा करून त्या नाहीशा होत नाहीत हाही तसाच एक विषय. श्री.नरेंद्र दाभोलकर यांची हत्त्या जिथे झाली त्या स्थानावर दरमहा एकत्र जमून त्यांचे कार्यकर्ते श्रद्धांजली वाहतात असे ऐकायला मिळते. हा कोणत्या डोळस श्रद्धेचा विचार म्हणावा याचा निर्णय करता येत नाही. त्यामुळे हे विषय काळाच्या प्रवाहावरच सोपवावेत हे बरे!
- आपले जग


प्रवृत्ती, निवृत्ती आणि विरक्ती
वरिष्ठ नागरिकांनी काही प्रवृत्तीत राहणे महत्त्वाचे आहे. तरुण पिढीपासून दूर राहून, जरुरीच्या वेळी एकमेकांना साहाय्य करणे शक्य आहे. प्रवृत्तीत राहण्याने पैसे मिळणार असतील तर काय वाईट? येणाऱ्या पैशाने जीवनमान सुधारेल. उपभोगण्याचा आनंद मिळेल. शक्य असल्यास आणि इच्छा असल्यास अर्थार्जन करावे यात चुकीचे काही नाही. कला/सेवा/नवीन प्रयोग/दुसऱ्यांना मदत करण्यात रस घ्यावा. असे करणारेही वरिष्ठ नागरिक आहेत. पण काहीच न करणारेही खूप आहेत.
माझ्या मित्राने ज्येष्ठ नागरिक झाल्यावर स्वस्थ बसण्याऐवजी ९० एकर अत्यंत उजाड जमीन विकत घेतली. तेथे जाण्यासाठी बुलडोझर वापरून रस्ता केला. तेथे दहा कुटुंबे कामासाठी ठेवली. वीज उपलब्ध न झाल्याने पवनचक्की आणि सौर ऊर्जा वापरून पाणी आणि उजेडाची सोय केली. कामकऱ्यांस राहण्यासाठी घरे बांधली, संडास बांधले, ह्यामुळे शेतीलाही फायदा झाला. त्यांच्या मुलांना शाळेत घालून त्यांच्या नेण्या-आणण्याची व्यवस्था केली. प्रत्येक कुटुंबासाठी धान्य देऊन दरमहा १० हजार पगार दिला. हे तो आज सात-आठ वर्षे करत आहे. आज त्यातून उत्पन्न मिळावयास लागले आहे. बांबू, लिंबू, चिकू, फणस, आंबा अशी बागाईत आहे.हे वाचून आपलीही ईर्ष्या जागी होईल.
- प्रभाकर नेने, नवरंगपुरा, अमदाबाद  मोबा.++९१(०)९७१२९७२०६९


एक सामाजिक व्यथा....
ही सत्यघटना माझ्या आईने मला कित्येकवेळा सांगितली आहे.
३० जानेवारी १९४८ ला गांधीहत्त्या झाल्याचे रेडिओवरून वृत्त प्रसारित झाले. हत्त्या करणारा नथुराम गोडसे असल्याचे दोन-तीन दिवसात सर्वांनाच समजले. इतरांच्या डोळयात खुपणारा ब्राह्मण समाज अकारण संकटात सापडला. चिथावणी देणारे कित्येकजण होते.
माझे वडील त्यावेळी फैजपूर येथील हायस्कूलचे हेडमास्तर होते. तेथील बराचसा शिक्षकवर्गही ब्राह्मण होता. गावातील लोकांना ही संधीच मिळाली. मोठा जमाव शाळेबाहेर जमा झाला. त्यांनी हेडमास्तर व सर्व शिक्षकांना शाळेच्या बाहेर बोलावले आणि एका रांगेत उभे केले. जमावाने त्यांच्या नावाने शब्दश: शिमगा सुरू केला. आमच्या आईला ही बाब समजली आणि ती चवताळून शाळेकडे धावली. वडिलांच्या पाठीमागे जाऊन ती उभी राहिली. तिचे रूप चवताळलेल्या वाघिणीसारखे भासत असावे. कोणी वडिलांच्या अंगावर हात टाकला असता तर तो जिवंत परत घरी गेला असता असे वाटले नसते. परंतु हा सर्व समाजही शिक्षकांचा मान ठेवून होता. त्यात लेवा पाटीदार मंडळी खूप होती. कोणाही शिक्षकावर हात टाकला गेला नाही.
फेब्रुवारी महिन्यातच तेथील शाळा समितीने वडिलांना नोकरी सोडण्यास सांगितले. माझ्या मोठ्या बंधूंची मॅटि्न्क परीक्षा तोंडावर होती. बोदवडच्या हायस्कूलचे हेडमास्तर श्री.भिसे यांना वडिलांची हकीगत कळली, त्यांनी वडिलांना बोदवडला बोलावून तात्पुरती नोकरी दिली. पुढे जून १९४८ ला माझे वडील जामनेरच्या हायस्कूलचे हेडमास्तर म्हणून रुजू झाले. त्या वातावरणात माझे थोरले बंधू मॅटि्न्क पास झाले आणि पुढे आय.ए.एस.अधिकारी झाले. माझ्याही वडिलांनी आयुष्याची शंभरी पूर्ण केली. `देव तारी त्याला कोण मारी' असे म्हणतात.
पश्चिम महाराष्ट्नतही मोठ्या दंगली त्यावेळी घडवल्या गेल्या. ब्राह्मण कुटुंबांची घरे, दुकाने आणि संस्थांना आगी लागल्या. त्यांना देशोधडीला लावले. या कार्यात पुढे असणारे काहीजण पुढारी म्हणूनही पुढच्या काळात वावरले.
१९८४ साली असल्याच वेडाचारातून शिखांना त्रास झाला. आणि २००२ मध्ये गोध्रा प्रकरणातूनही निष्पाप समाजाला अकारण त्रास झाला. कानडी-मराठी वाद किंवा मुंबईतील मराठी-अमराठी वाद अशा निमित्ताने समाजाची मन:स्थिती अशी का होते हा अतिशय चिंतनाचा आणि त्यावर काही उपाययोजना करण्याचा विषय आहे. कुणीतरी कुणावर तरी सूड घेणे एकवेळ समजू शकते, परंतु एकत्रितरित्या असा सामुदायिक सूड कोणत्या कारणाने घेतला जात असेल हे सामाजिक अभ्यासाच्या दृष्टीने अनाकलनीय वाटते. एखादा समाज इतर सर्व घटकांवर सामुदायिक अन्याय करतो असे निदान आपल्या देशात तरी फारसे घडलेले नाही. तरीसुद्धा अशी चेतवणारी मंडळी असतात आणि त्यांचे झुंडशाहीने कोणीतरी ऐकतो ही बाब घातक आहे. जे लोक अशा वेळी पोळतात त्यांची मन:स्थिती काय असू शकेल हे सहज समजण्यासारखे आहे.
- जयंत म. साठ्ये,  सेक्टर २४, प्लॉट २५८,  पुणे ४११ ०४४

कन्या सासुरासी जाये ।
माझी मुलगी आमच्या पलूस कॉलनीसारख्या खेडवळ वातावरणात पदवीधर झाली आणि त्यानंतर दोन-तीन वर्षे तिने एक छोटीशी नोकरी केली. १९९७ मध्ये तिचे लग्न झाले, त्यावेळी आमच्या आणि तिच्याही फारशा अपेक्षा नव्हत्याच. मुलगा निर्व्यसनी हवा एवढी एक महत्त्वाची आणि कठोर अट होती. ती म्हणायची की, `पैसा मिळवण्याची हिंमत माझ्यात आहे, पण नवऱ्याचे व्यसन घालवण्याची ताकद माझ्यात नाही.'
अशी ही मनस्वी मुलगी लग्न करून देवगड तालुक्यातील एका खेड्यातच श्री.गोखले यांच्या घरी गेली. उंच भराऱ्या मारण्याचे स्वप्न तिच्यासारखी मुलगी आणि आमच्यासारखे पालक पाहू शकत नाहीत. तिच्या सासरी जुने घर, शेणामातीच्या जमिनी, चुलीवर स्वयंपाक, बाहेरून पाणी आणणे अशा वातावरणाचे होते. पण एकत्र राहणारे जिव्हाळयाचे कुटुंब ही मोठीच जमेची बाजू होती. विजेची सोय यथातथा. मैत्रिणींशी गप्पा, फिरायला जाणे, सिनेमा-नाटक या गोष्टी फारच दूर. परंतु सासूबाई आणि सासरे यांच्यासह सर्व माणसे प्रेमळ आणि समजूतदार आहेत.
पाहता पाहता ही सामान्य मुलगी त्या घरची आदर्श मोठी सून बनली. सासरी आंब्याची बागायती असल्यामुळे लोणच्यापासून माव्यापर्यंत घरात सासूबाइंर्चा राबता होता. या गोष्टी आमची मुलगीही शिकली. आमचे जावई शिक्षकी पेशातला इंग्रजी-मराठीवर प्रभुत्व असलेला शिस्तबद्ध माणूस. घरातील शेतीच बहरू द्यावी म्हणून शिक्षकाची नोकरी त्याने सोडून दिली. पण उत्तम बागायती आणि शेती सुरू केली. दहा वर्षांपूर्वी गाव सोडून वाडा या देवगड तालुक्यातील दुसऱ्या गावी बिऱ्हाड करावे लागले. छोटासा बंगला बांधावा असे स्वप्न होते. नव्या जागेत छोटासा धंदा सुरू केला. आंब्याचे लोणचे, फणसाचे गरे, आंब्याची - फणसाची साठे या सर्व गोष्टी करायला ती शिकली. हळूहळू पैसे साठवून वजनकाट्यापासून सर्व वस्तू घरात आल्या. कष्ट सुरू झाले. आज त्याला चांगली बाजारपेठ मिळत आहे. ३००-३५० किलोपर्यंत आंब्याचे लोणचे बनू लागले. आणखी काही बायकांना काम मिळू लागले. त्याशिवाय हापूस आंब्याचा जॅम, तळलेले गरे, सांडगी मिरची, कोकम, पन्हे अशा गोष्टींचे उत्पादन सुरू झाले. आता बाजारात `मनश्री फूड प्रॉडक्टस्' येऊ लागली आहेत. त्याला उठाव मिळण्याची अडचण नाही. त्यांच्या जोडीला देवगड हापूसची विक्री सुरू झाली. मनश्री बंगल्यात आता आमची नातवंडेही खेळू लागली आहेत.
ही मुलगी आहे धनश्री नारायण मराठे, सासरची सौ.धनश्री महेश गोखले. एका सामान्य घरातली सामान्य वाटणारी मुलगी सासरच्या वातावरणात समरस होऊन आता सर्व कुटुंब उद्योजक बनले आहे. अशा मुलीची आई म्हणून मला केवढे समाधान वाटत असेल याची कल्पना प्रत्येक आईवडिलांना सहज येऊ शकेल.
- सौ.मंगल नारायण मराठे
घर नं.११, पलूस कॉलनी, पलूस (सांगली)
फोन नं. (०२३४६)२२८६९८

...... अर्थमंत्र्यांची अडचण......
  भारताचे अर्थमंत्री पी.चिदंबरम् यांनी `हिंदी भाषा येत नसल्याने नरेंद्र मोंदीविरुद्ध बनारसमध्ये लोकसभेसाठी इच्छा असूनही लढता येत नाही' असे म्हटले. आज भारतातून इंग्रज जाऊन सहासठ वर्षे झाली तरीही चिदंबरम् यांच्यासारख्या विद्वान, अनुभवी माणसाला राष्ट्न्भाषा येऊ नये हे दुर्दैवच! इतक्या वर्षात दिल्लीत राहून निदान साधारण बोलाचालीएवढी हिंदी यायला हरकत नव्हती.
दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील सोनियाजी इटालीयन असूनही, हिंदी भाषेतून (कसे का असेना) सर्व ठिकाणी भाषणे देत असतात. अमेठीसारख्या हिंदी बहुल क्षेत्रात त्यांना निवडून येण्यात हिंदीची अडचण आली नाही. मग चिदंबरम् यांच्यासारख्या मूळच्या भारतीय माणसाला हिंदी येऊ नये? आपल्या देशात उच्चभ्रू लोकांत इंग्रजी येत नसणाऱ्यांना मागासले वाटते. त्याउलट इंग्रजी येत असणाऱ्यांना हिंदी किंवा देशी भाषा येत नसली तर ते कौतुकाचे ठरते. इंग्रज गेले तरी देशात इंग्रजी कायम राहील, याचा पूर्ण बंदोबस्त इंग्रजांनी केला होता असे म्हटले जाते, ते चिदंबरम् यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
- सुरेश आपटे, इंदोर

वरील पत्राच्या आशयाला सुसंगत एक प्रसंग परवाच पाहिला. पूर्णत: मराठी असलेल्या उद्योगपतीची मराठी पत्नी एका स्थानिक कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावर होत्या. समोर सगळा श्रोतृवर्ग मराठी, माध्यमिक शाळांतील शिक्षकवर्ग - म्हणजे किमान इंग्रजी जाणणारा नक्की होता. सर्व कार्यक्रम छान मराठीत झाला. प्रमुख पाहुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते, तेही अर्थातच मराठीत बोलले.
परंतु अध्यक्षीणबाई इंग्रजीतून बोलू लागल्या, आणि त्याहीपेक्षा मौज म्हणजे त्यांच्या दोनतीन वाक्यांनंतर एकजण त्याचे भाषांतर करून सांगत होता. या सन्मान्य बाइंर्ना मराठी बोलताच येत नाही म्हणावे, असा काही प्रकार नव्हता. पण इंग्रजीतून बोलण्याची एक ऐट, आणि समोरच्यांना इंग्रजी कळत नसणार ही करून घेतलेली दुसरी गैरसमजुतीची ऐट!!
या इंग्रजी उच्चभ्रूपणाचा प्रभाव पडण्याचे दिवस अजूनी आहेत काय? अशा उच्चभ्रूंना इतरांपासून `अंतर' ठेवायचे असेल; सोनियाजींना ते कमी करायचे असते!
- आपले जग



लावणी-संध्या
प्रसिद्ध शाहीर राम जोशी यांचेबद्दल आख्यायिका सांगतात. राम जोशी हे जन्माने ब्राह्मण असून लावणीची रचना करतात व स्वत: गायन करतात अशी तक्रार पुण्यातील सनातनी ब्राह्मणांनी पेशव्यांकडे केले. त्यांचेवर बहिष्कार टाकला.राम जोशी यांनी दरबारात हजर राहावे असे फर्मान श्रीमंतांनी काढले. राम जोशी हजर झाले. `त्यांना संध्येतील विष्णूची २४ नावे तरी पाठ आहेत का?' असा उपरोधिक प्रश्न विचारण्यात आला. ती २४ नावे त्यांनी लावणी छंदात म्हणून दाखविली. त्यांच्या या व्युत्पन्न पांडित्याची दखल घेऊन श्रीमंतांनी त्यांचा सत्कार केला व त्यांचेवरील बहिष्कार मागे घ्यावयास लावला. ती लावणी -

केशवकरणी अद्भुत लीला नारायण तो कसा
तयाचा सकळ जनावर ठसा ।
माधवमहिमा अगाध गोडी गोविंदाच्या रसा ।
पीत जा जीव होईल थंडसा ।
विष्णू म्हणता विकल्प जाती मधुसूदनाने कसा ।
काढिला मंथनसमयी जसा ।
वेश धरूनि कापट्य मोहिनी भाग करुनि महिनिमा
गायिल्या उद्धरतील अधमा ।
त्रिविक्रमाने त्रिताप हरिले भक्तदोष सर्वहि ।
वामने दान घेतली मही ।
श्रीधर सत्ता असत्य हरती दुष्टांचे सर्वही ।
वंदिती हृषीकेशा चारही ।
पद्मनाभें धरिले तेथुनि जाले देव ब्रह्मही ।
की दामोदरें चोरिले दही ।
संकर्षण म्हणता षडि्न्पु नाशाते पावती।
शरण जा वासुदेवाप्रती ।
प्रद्युम्नाचा करिता धावा गजेंद्र मोक्षाप्रती ।
अनिरुद्धाने वर्णिली श्रुती ।
क्षीरसागरी पुरुषोत्तम हा दाता लक्ष्मीपती ।
स्मरणे अधोक्षजे आकृति ।
गाती मुनिजन नारद तुंबर वसिष्ठादि गौतमा ।
गाइल्या उद्धरती अधमा ।
प्रल्हादासाठी नरहरी स्तंभी प्रकटला ।
अच्युते कालयवन मर्दिला ।
जनार्दनाची अघटित लीला कीर्तन ऐकू चला ।
उपेंद्रा शरण म्हणविती भला ।
हरिहर म्हणता त्रिवारवाचें सर्व दोष हरियला ।
गोकुळी कृष्णनाथ खेळला ।
रामलक्ष्मण यांची नावे निस्तारती हे भ्रमा ।
गाइल्या उद्धरती अधमा ।
अनंत भगवंताची नावे त्यातुनी हे उत्तमा ।
गाईल्या उद्धरती अधमा ।

(प्रस्तुत रचना `अनंत फंदी यांच्या कविता व लावण्या' चित्रशाळा प्रकाशन, पुणे, आवृत्ती ४ थी या संग्रहात समाविष्ट केलेली आहे.(पृष्ठ ५८) त्यात `अनंत भगवंत नामे त्यातुनी हे उत्तमा । गाईल्या उद्धरती अधमा ।' हे ध्रुपद आहे, ही नेमकी कुणाची रचना हे सांगणे कठीण आहे.)
- सर्वोत्तम पुरुषोत्तम केळकर,
एन२०, हिमालयविश्व, नागपूर रोड, वर्धा
फोन : ०७१५२-२३२९४४


गोड साखरेची
कडू कहाणी....
स्वातंत्र्यानंतरची ६७ वर्षे, तेरा पंचवार्षिक योजना, पण शेतमजुरांची आजही अवस्था बिकट आहे. राज्याच्या व देशाच्या विकासाचे चित्र रंगविले जाते, परंतु वास्तव चित्र कितीतरी पटीने मोठे आहे.
शेतामध्ये ऊस तोडणीसाठी आलेल्या शेतमजुरांना आकाशाचे पांघरूण, जमिनीचे अंथरुण आणि शेत हेच अंगण! वळीव पावसाने त्यांना नुकतेच झोडपले. बचाव करण्यासाठी प्लॅस्टिकची ताडपत्री वापरावी लागली. आरोग्य बिघडल्यास, प्रत्यक्ष देवानेच त्यांना वाचवावे. त्यांच्या मुलांचे शिक्षण गगनाएवढे दूर आहे. हे भटके शेतमजुर लाजवणारे जीवन जगत आहेत.
ही विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील ऊस तोडणी मजुरांची कहाणी आहे. मुद्देबिहाळ जवळील हुदगुंद तालुक्यातील नायतेगली परिक्षेत्रातील ऊस तोडणीसाठी ठेकेदार आहेत. या ठेकेदारांनी मुद्देबिहाळ आणि हुनगुंद तालुक्यातील ऊस तोडणीचे कंत्राट मिळविले. महाराष्ट्नतील बीड जिल्ह्यातील वंजारी (लमाणी) लोकांना मुद्देबिहाळ येथे आणले. नवरा-बायको आणि त्यांच्या मुलांसह ऊस तोडणीचा करार केला. दहा कुटुंबातील पती व पत्नी मिळून वीसजणांचा एक गट धरण्यात येतो. हे सर्व काम ठेकेदार व त्यांच्या दलालांमार्फत बिनबोभाट चालते. साखर कारखाना आणि ऊस तोडणीचे मजूर यांचा एकमेकांशी कोणताही संंबंध नाही.
गटाला सहा महिन्यांची मुदत दिली जाते. पती व पत्नीला सहा महिन्यांसाठी १ लाख रुपयांचा करार केला जातो. रोजच्या खर्चासाठी टनामागे १९० रुपये दिले जातात. दररोज ऊसतोड केल्यानंतर हिशेब करून पैसे दिले जातात. सहा महिन्यांनंतर उचल दिलेले पैसे वजा करून बाकी रक्कम दिली जाते. या दरम्यान जेवण, आरोग्य असे खर्च त्या गटातील लोकांनीच करायचे. ऊसाची तोडणी होईपर्यंत त्या शेतातच राहावे लागते. उघड्यावरच प्रातर्विधी, जेवणे. अशा वेळी मुलांचे हालहाल होतात. आईवडील दिवसभर शेतात राबतात आणि मुले त्यांची वाट पाहतात.
साधारणपणे २०० गट, म्हणजे ४ हजार ऊस तोडणी मजूर या भागात दाखल झाले आहेत. २० जणांच्या एका गटात किमान ८ ते १० मुले आहेत. त्यांचे शिक्षण थांबले आहे. या गटातील जवळजवळ सर्व शेतमजूर निरक्षर आहेत. ते महाराष्ट्नतील लमाण असले तरी या भागातील लमाणांशी त्यांचे कोणतेही संबंध नाहीत. ऊस तोडणीच्या वेळी अपघात झाल्यास त्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. आजारी पडल्यास पैसे नसल्याने गावठी उपचार केले जातात.
ही वेठबिगारीची नवी पद्धत आहे. कारखान्याकडून पैसे देताना या मजुरांच्या आरोग्य विम्याच्या नावाखाली दीड टक्के रक्कम कापून घेतली जाते. परंतु मजूर आजारी पडल्यास किंवा जीव गेल्यास कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. बीड जिल्ह्यात त्यांची स्वत:ची शेतजमीन आहे, परंतु पाणी नाही. अन्नासाठी दाही दिशा भटकणाऱ्या या शेतमजुरांचे व त्यांच्या मुलाबाळांचे आयुष्य असेच वाऱ्यावर उडून जाणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी `यंदा आम्हाला मत द्या' असे सांगण्याकरिताही कोणी यांच्यापर्यंत पोहोचले नाही.
प्रसिद्धी माध्यमांनी अशा लाखो शेतमजुरांकडे जरा लक्ष द्यावे, म्हणजे मतदानाची टक्केवारी का वाढत नाही याची कल्पना येईल. राज्याच्या आणि देशाच्या कृषी खात्याचे काम यापुढे कसे चालावे, याचा काही बोध घेता येईल काय?
- श्रीपाद पटवर्धन,
मराठी विद्यालय, मनगोळी रस्ता, विजापूर
मोबा. ०९२४३२१२६५७

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन