Skip to main content

lekh on Shrikantji Joshi


श्रीकान्तजी : एक सच्चा मार्गदर्शक
राष्ट्नीय स्वयंसेवक संघाचे कार्यकारिणी सदस्य, ज्येष्ठ प्रचारक व हिंदुस्थान समाचार या बहुभाषी वृत्तसंस्थेचे समन्वयक श्रीकांत शंकर जोशी यांचे मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.
श्रीकांत जोशी मूळ गिरगावातील. तरुणपणीच ते संघाचे प्रचारक (पूर्णवेळ कार्यकर्ते) झाले. नांदेड येथे काही काळ संघकाम केल्यानंतर पुढे सुमारे २५ वर्षे आसाममध्ये ते कार्यरत होते. आसाममध्ये फुटीरतावादी चळवळीतून निर्माण झालेल्या अशांततेतही राष्ट्नीय भावना जोपासण्यामध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या संघकार्यकर्त्यांमध्ये श्रीकांतजींचे नाव प्रामुख्याने आहे. आसाममध्ये अनेक संस्थांना पाठबळ देत त्यांनी संपूर्ण ईशान्य भारतात राष्ट्न्वादी विचारसरणीची युवापिढी घडविली.
श्रीकांतजी जोशी यांनी तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही सुमारे १५ वर्षे सावलीसारखी साथ केली. संघामध्ये प्रचार विभाग सुरू झाल्यापासून ते त्याच्याशी संबंधित होते. पुढे ते अखिल भारतीय प्रचार प्रमुखही झाले. या काळात विश्व संवाद केंद्र या संस्थेची स्थापना त्यांनी केली. अ.भा.ग्राहक पंचायतीचे ते मार्गदर्शक व `पालक', तसेच महिला विभागाचे समन्वयक होते.
देशी प्रसारमाध्यमांवरील इंग्रजी भाषेचा पगडा दूर करून त्यांना भारतीय भाषांमध्ये वृत्तसेवा पुरविणाऱ्या `हिंदुस्तान समाचार' या वृत्तसंस्थेचे पुनरुज्जीवन करण्यात श्रीकांतजींनी मोलाची भूमिका बजावली होती. आज या संस्थेतर्फे १७ भाषांमध्ये अनेक प्रसार माध्यमांना वृत्तसेवा दिली जाते.
कै.श्रीकांतजींना गेल्या काही काळात श्वसनाचा त्रास होत होता, परंतु थोडेसे बरे वाटू लागले की त्यांचा प्रवास आणि कामाचा वेग पूर्ववत् होत असे. दोनच दिवसांआधी ते दिल्लीत होते, आणि `विश्व संवाद केंद्रा'च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी त्यांनी भावी योजनांबद्दल विचार-विमर्श केला होता. तत्पूर्वी २२ डिसेंबरला अलाहाबाद येथे त्या संस्थेच्या केंद्रीय नियामक समितीची बैठक झाली, त्याच्या अध्यक्षपदावरून त्यांनी मार्गदर्शन केले होते. त्यानंतर अस्वस्थ वाटू लागले, म्हणून नागपूरच्या मुक्कामात त्यांच्यावर उपचार केले गेले. लगेचच ते मुंबईत (नवयुग निवास, ग्रॅन्ट रोड) येथे आले, तिथे त्यांची तब्येत जास्तच बिघडली व त्यांचे निर्वाण झाले.

श्रीकांतजींचा परिवार तसा मोठा होता. चार भाऊ, एक बहीण यांमध्ये ते थोरले. पदवी घेऊन ते आयुर्विम्यात नोकरी करू लागले, त्यावेळी श्री.शिवराय तेलंग यांच्या संपर्कात ते आले आणि १९५६ मध्ये गृहत्याग करून संघप्रचारक झाले. संपूर्ण जीवन त्यांनी राष्ट्न्समर्पित केले.

अ.भा.ग्राहक पंचायतीचे राष्ट्नीय शिबीर दिल्लीला होते. ते संपवून परत निघताना पत्रमहर्षी कै.बापूराव लेले यांची भेट घेऊन त्यांच्याशी काही प्रश्नांसंबंधात मी चर्चा केली, त्यांनी श्री.श्रीकांतजींशी बोलण्यास सुचविले. त्यांना पत्र लिहून वेळ घेतली व मुंबईत भेटलो. श्री.अशोक तेलंग, किशोर लुल्ला यांच्यासह या पहिल्याच भेटीत श्रीकांतजींनी आम्हांस आपलेसे केले. त्यानंतर ग्राहक पंचायतीच्या कोणत्याही वरिष्ठ बैठकीत त्यांचे मार्गदर्शन होत राहिले.
त्यांचा मुख्य विषय प्रचार व प्रसारमाध्यमे असा होता. त्यामुळे `आपले जग'च्या माध्यमातून त्यांच्याशी खूप संबंध आला. `आपले जग'च्या नोंदणीपासून दिल्लीच्या श्री.बापूराव लेले यांचे खूप साहाय्य होत आले. तो ऋणानुबंध लक्षात घेऊन पुण्याच्या एका भेटीत कै.लेले यांच्या लेखांचा एक संग्रह संकलित करून तो संपादित करावा अशी जबाबदारी माझ्याकडे श्रीकांतजींनी दिली. जुन्या वृत्तपत्रांतील कात्रणे जमवून त्यामधून सर्व पक्षातील विद्वान आणि बुजुर्ग अशा नेतेमंडळींच्या संबंधी परिचय करून देणारी लेल्यांची स्मरणचित्रे या कात्रणांच्या खजिन्यांतून एकत्र करण्यात आली व `स्मरणगाठ' याच नावाने हे पुस्तक सिद्ध झाले. त्याच दरम्यान बापूरावांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार त्यावेळचे पंतप्रधान श्री.अटलबिहारी वाजपेयी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी करण्यात आला. आणि त्याच समारंभात हे पुस्तक प्रकाशित झाले. त्या अपूर्व सोहळयात मी व श्री.लुल्ला उपस्थित होतो. या सर्वांमागे कै.श्रीकांतजींची कल्पना, नियोजन आणि प्रत्यक्ष परिश्रम कारणीभूत होते. त्यानंतर लवकरच श्री.लेले यांचे निधन झाले. आणि त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त `श्री.लेले यांचे चरित्र आणि कार्य' असे एक पुस्तक सिद्ध करण्याची जबाबदारीही श्रीकांतजींनी पुन्हा माझ्याकडेच सोपविली. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनास्वरूप निवेदनात श्रीकांतजींनी असे प्रोत्साहन आणि शाबासकी दिली आहे की, - ``पत्रकारमहर्षी बापूराव लेले यांच्या जीवनातील आणि पत्रकारितेच्या संदर्भातील देशभरात पसरलेल्या आठवणी एकत्रितपणे नवीन पिढीसमोर ठेवण्याचा संकल्प `राष्ट्नीय पत्रकारिता कल्याण न्यास'ने केला. पत्रकारितेतील अशी सोनेरी आणि प्रेरणादायी पाने नव्या पिढीसमोर ठेवली जावीत, ज्यायोगे पत्रकारांची नवीन पिढी त्यापासून बोध घेऊन आपली वाटचाल योग्य रितीने करू शकेल यासाठी या न्यासाचा प्रयत्न आहे. एक `मिशन' म्हणून सुरू होऊन पुढे सफल व्यवसाय म्हणून नावारूपाला आलेल्या वृत्तपत्रक्षेत्रास आताच्या काळात त्याची फार गरज आहे. जनहिताचे ध्येय न विसरता पत्रकारिता हा यशस्वी व्यवसाय व्हावा हा कै.बापूरावांच्या जीवनाचा संदेश होता.
कै.बापूराव लेले यांच्या जीवनावर पुस्तक लिहिणे ही अशक्यप्राय गोष्ट! कारण त्यांच्या आठवणी केवळ देशातच नव्हे तर परदेशांतही पसरलेल्या आहेत. यातील काही वैयक्तिक आहेत तर काही सार्वजनिक. या सर्व आठवणी एकत्र करण्याचे कठीण काम सांगली जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या `आपले जग'चे श्री.वसंत आपटे यांनी स्वीकारले. श्री.आपटे हे सिद्धहस्त लेखक आहेत. कै.बापूरावांनी लिहिलेल्या आठवणींचे `स्मरणगाठ' पुस्तक यापूर्वी त्यांनी संपादित केले आहे. ते बापूरावांच्या संपर्कात होतेच, पण ज्यांचा बापूरावांशी निकटचा संबंध होता त्यांच्याशीही आपटे यांनी संपर्क साधला. आपटे यांच्या परिश्रमामुळेच फारच कमी वेळात हे पुस्तक आपणा सर्वांसाठी उपलब्ध झाले आहे.''
या पुस्तकाचे प्रकाशन अमदाबाद येथे एका भव्य समारंभात करण्यात आले. त्यावेळी मराठी, हिंदी आणि गुजराथी या तिन्ही भाषांत एकाच वेळी हे पुस्तक प्रकाशित झाले. याही संपूर्ण प्रकल्पामागे श्रीकांतजी यांचेच नियोजन आणि परिश्रम होते. अर्थातच त्या कारणाने त्यांच्या अनेकवार भेटी, सहवास, एकत्र मुक्काम आणि चर्चा हे सर्व घडून आले. मी अमदाबादला एका मुक्कामावर असताना रात्रीच्या वेळी कधीतरी श्रीकांतजी दिल्लीहून पोचले. पहाटे त्यांनीच सांगितलेे की, दिल्लीच्या स्टेशनवर येत असताना त्यांच्या गाडीला छोटा अपघात झाला आणि त्या धडकेमुळे त्यांच्या पाठीत जोरदार उसण भरली होती. त्यांनीच येताना बरोबर कसलेसे तेल आणले होते. ते त्यांच्या कंबरेला व पाठीला चोळून देण्यात मलाही आनंद होता. ही अल्पसेवा करून घेतानाही ते वारंवार तसे बोलून दाखवत होते. योग असा की, संध्याकाळपर्यंत त्यांना खरोखरीच बरे वाटू लागले, आणि त्यांनी श्रेय मला दिले.
सांगलीतील लुल्ला ट्न्स्टच्या वतीने अर्घ्यदानाचा समारंभ तीन वर्षांपूर्वी प्रथमच झाला त्यासाठी वडीलकीच्या नात्याने श्रीकांतजी उपस्थित होते व त्यांनी मार्गदर्शनपर भाषणही केले. तसे पाहिल्यास अशा सर्वच कार्यकर्त्यांच्या निकट असो वा दूर असो, त्यांचा सतत संपर्क राहात असे. हिंदुस्थान समाचारचे पुनरुज्जीवन झाल्यानंतर सांगलीतील अनेकांना त्यांनी सभासद करून घेतले. एका वार्षिक बैठकीस दिल्लीमध्ये हजर राहण्याचीही मला संधी मिळाली. अशा वेळी ते आवर्जून मला बोलते करत असत. एका परीने तो प्रोत्साहन देण्याचाच प्रकार होता. सांगलीच्या वाटेवर असताना एका भल्या पहाटे ते रेल्वेने किर्लोस्करवाडीला उतरले आणि आमच्या घरी काही काळ मुक्काम करून गेले. त्याही अल्पकाळात कित्येक कार्यकर्त्यांशी त्यांच्या मनमोकळया गप्पाटप्पा चालू होत्या. त्यातही मोबाईल फोनवर असामी भाषेत बोलत होते तेही अचंबा वाटणारे होते.
एका उच्चस्तरीय समर्पित जीवनाचा अचानक अंत झाल्यामुळे देशभरातील असंख्य कार्यकर्त्यांना धक्का बसला असेल. `आपले जग'च्या व सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांच्या स्मृतीला आदरांजली.
- वसंत आपटे
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन