Skip to main content

8 Jan 2018

स्नेहमयी मकरसंक्रांत
इंग्रजी कालगणनेनुसार नवीन वर्षाची सुरुवात जानेवारी महिन्यापासून होते. १४ जानेवारी म्हणजे मकरसंक्रांतीचा दिवस. पौषमासातील गुलाबी थंडीच्या काट्याबरोबरच हलव्याचा नाजूक काटाही फुलायला लागतो. तिळगुळाचा खमंग वास दरवळू लागतो. रंगीबेरंगी हलवा, हलव्याचे दागिने, संक्रांतीला लुटण्याच्या वाणाच्या विविध वस्तू, काळया रंगाच्या तऱ्हतऱ्हेच्या साड्या, केशरी गजरे, टपोरी बोरे, हिरवे मटार यांनी बाजार फुलून येतो आणि वातावरणात आपसूकच गोडवा निर्माण होतो.
मकरसंक्रांत म्हणजे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलून सहजतेने उत्तरेकडे सरकत जातो. या काळाला `उत्तरायण' म्हणतात. सूर्याच्या ह्या संक्रमणाशी मानवी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे. मानवी जीवन प्रकाश आणि अंध:कार यांनी वेढलेले आहे. अंधकाराकडून प्रकाशाच्या दिशेने जाण्याचा हा संक्रमणाचा काळ. अज्ञानाच्या अंधकाराने व्यापलेल्या मानवी मनाला ज्ञानप्रकाशाने उजळवून टाकणारे हे वैचारिक संक्रमण असायला हवे.
सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे म्हणजे संक्रमण. हे संक्रमण एकूण १२ वेळेला होते. परंतु सूर्याचे कर्कराशीतून आणि मकर राशीतून जेव्हा संक्रमण होते तेव्हा बरीच स्थित्यंतरे घडून येतात. सूर्याचे मकर राशीतून संक्रमण होत असताना सूर्याची गती उत्तरेकडे वळते; त्यामुळे दिवस हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र लहान होते. मकरसंक्रांतीपासून कर्कसंक्रांतीपर्यंतच्या या काळास `उत्तरायण' म्हणतात. तर कर्कसंक्रांतीपासून मकरसंक्रांतीपर्यंतच्या काळास `दक्षिणायन' म्हणतात. उत्तरायणाच्या काळात मृत्यू आल्यास मोक्ष मिळतो अशी एक श्रद्धा. भीष्मपितामहांनी आपल्या मृत्यूला उत्तरायणापर्यंत थोपवून धरल्याचे महाभारतात म्हटले आहे.
पुराणात मकरसंक्रांतीविषयी कथा आहे. संकरासूर आणि किंकरासूर असे दोन बलाढ्य राक्षस प्रजेला त्रास देत. त्यांचा नाश करण्यासाठी देवीने अवतार घेतला आणि या दोन राक्षसांचा वध केला. या राक्षसांच्या नावावरून देवीला `संक्रांत' असे म्हणत असावेत. देवीने संक्रांत म्हणजे चांगली क्रांती केली, सुराज्य निर्माण केले. या आनंदाप्रीत्यर्थ संक्रांत आणि दुसरा दिवस किंक्रांत साजरे करतात. देवीने रात्रीच्या अंधारात या राक्षसांचा वध केला, त्यावेळी तिने काळी साडी परिधान केली होती. देवीने दुष्ट आणि काळया शक्तीचा नाश करून, शांततेचा चांदणप्रकाश पाडला, म्हणून संक्रांत सणाला स्त्रिया काळया रंगाच्या साडीवर पांढऱ्या खडीच्या चांदण्या असलेल्या साड्या नेसू लागल्या असतील.
दरवर्षी ही संक्रांतदेवी वेगवेगळया `वाहनावर' स्वार होऊन येते आणि देवीला आवडणाऱ्या वस्तू महाग होतात असाही एक समज आहे. पौष महिन्याला प्राचीन काळी `सहस्य' या नावाने ओळखले जात असे. या महिन्यात रात्री पूर्व क्षितिजावर पुष्य नक्षत्र उगवते आणि रात्रभर आकाशात दर्शन देऊन पहाटे पश्चिमेला मावळते. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र पुष्य नक्षत्रापाशी असतो; या महिन्याला `पौष' असे नाव आहे. पौष महिन्यातील रविवार हे `आदित्य (रवि)वार' म्हणून ओळखले जातात.
भारतात वेगवेगळया प्रांतात वेगवेगळया नावाने आणि प्रकाराने मकरसंक्रांत साजरी केली जाते. दक्षिण भारतात हा सण `पोंगल' या नावाने केला जातो. या दिवशी तिथे सूर्याची पूजा करून तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. उत्तरप्रदेशात हा सण `खिचडी', बुंदेलखंडात `सकुरात किंवा बुडकी', आंध्रप्रदेशात `धनुसंक्रांत', पंजाबात `माघी' तर गुजराथमध्ये गोग्रास देऊन आणि ब्राह्मणांना तीळाच्या लाडवात पैसे घालून गुप्तदान देण्याची प्रथा आहे. गुजरातेत मकरसंक्रांत दिवाळीप्रमाणे साजरी करतात. तिथे यानिमित्ताने पतंग उडवण्याची प्रथा आहे.
हे दिवस थंडीचे असल्यामुळे तीळ आणि गूळ या पदार्थांना विशेष महत्त्व आहे. तीळाचे तेल पुष्टी आणि बलवर्धक आहे. तिळगुळाचे लाडू, वड्या, रेवडी, खीर, गुळाच्या पोळया अशा पदार्थांचे सेवन करून आरोग्यही सांभाळले जाते. मकरसंक्रांतीच्या काळात तीळतर्पण करून वास्तुदेव आणि विश्वदेवाची पूजा केली जाते. भगवान शंकरास तीळतांदूळ वाहून तिळाच्या तेलाचे दिवे लावले जातात. थंडीमुळे शरीर शुष्क, कोरडे पडते त्यावर तिळाचे तेल आणि तिळापासून बनवलेले पदार्थ गुणकारी ठरतात. या ऋतूमध्ये तीळ औषधाप्रमाणे काम करते.
मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगास्नानही खूप महत्त्वपूर्ण आणि पुण्यकारक मानतात. प्रयाग येथे स्नानाचा उत्सव होतो. मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी `भोगी' साजरी केली जाते. संक्रांतीला पूजा करून मग वाण देतात.
संक्रांत हा निसर्गाचाच उत्सव आहे. या दिवसात सृष्टी धान्य, भाजीपाला, फळाफुलांनी बहरून आलेली असते. `सुगड' म्हणजे काळया मातीचे घट. ज्या धरित्रीच्या कुशीत बीबियाणे रुजते, त्यावर ते फुलते, फळते, बहरते त्या काळया मातीविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आणि सृजनत्वाची पूजा करणे हा त्यामागचा उद्देश. या दिवसात ऊस, बोरे, गाजरे, ओला हरभरा, मटाराच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, रायआवळे यांची रेलचेल असते. सुगडांमध्ये या सर्व पदार्थांचे तुकडे, तिळगूळ, सुपारी, दक्षिणा भरून त्याचे दान दिले जाते. आपल्या घरी आलेल्या, आपल्या शेतात पिकलेल्या धान्यातील छोटासा वाटा इतरांनाही देऊन `तुमच्या घरीही सुख, समृृद्धी येवो' हीच व्यक्त होणारी इच्छा. या दिवशी तांदुळमुगाची खिचडी, कढी, वांग्याची भाजी, बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी असा नैवेद्य दाखविला जातो.
संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकवाचा काळ. स्त्रिया भेटवस्तू `वाण' म्हणून लुटतात. सुवासिनींची ओटीसुद्धा गाजराचे तुकडे, बोरे, सोलाणे, ऊसाचे करवे, मटार, भुईमुगाच्या शेंगा यांनीच भरली जाते. याच सर्व पदार्थांनी लहान बाळांना न्हाऊ घातले जाते. त्याला `बोरन्हाण' असे म्हणतात. बाळाला हलव्याचे दागिने घालून, नटवून इतर बालगोपालांना बोलावून हा सण कौतुकाने साजरा केला जातो. नवीन लग्न झालेल्या मुलीला काळया रंगाची साडी, हलव्याचे दागिने देऊन आणि जावयाला चांदीच्या वाटीतून तिळगूळ देऊन सन्मान केला जातो.
निसर्गाने आपल्याला जे मुक्त हस्ते आणि भरभरून दिले त्या काळया मातीविषयी कृतज्ञता व्यक्त करून, भक्तीभावनेने परंपरा आणि संस्कार जतन करावेत. आरोग्य, सामाजिक बांधिलकी आणि व्यवहार यांचा सुरेख त्रिवेणी संगम साधावा हा सणामागील खरा संदेश. संक्रांती म्हणजे `सम्यक क्रांती'. क्रांतीमधून बदल, परिवर्तन अपेक्षित असते. संक्रांतीमध्ये सम्यक परिस्थिती स्थापन करण्याची अभिलाषा असते. यासाठी संकल्पांची आणि मनोनिग्रहाची गरज असते. वैचारिक क्रांतीची आवश्यकता असते. क्रांतीमध्ये हिंसेला महत्त्व असू शकते, परंतु संक्रांतीमध्ये सामंजस्य, समानता आणि सलोख्याची अपेक्षा असते. सुराज्य स्थापनेसाठी संघटनेची गरज असते. कोणत्याही महान कार्यासाठी संघटनेचे बळ आवश्यक असते. संघटनेत शक्ती, एकजूट असते.
तीळ आणि गूळ म्हणजे स्नेह आणि माधुर्याचे प्रतीक. एकमेकांना `तिळगूळ घ्या गोड बोला' असे सांगून आपल्यातील जुने मतभेद, हेवेदावे, वैरभावना विसरून, स्नेहाची, प्रेमाची पुन:स्थापना करायची. कालचक्र गतीने फिरत असते. विज्ञानाच्या वरदानामुळे मोबाईलसारखे शोध लागले आणि एकमेकांतील संवाद यांत्रिक भाषेत होऊ लागले. प्रत्यक्ष भेटीचे मधुर क्षण दुर्मीळ होत गेले. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे वेळही मिळेनासा झाला. अशा व्यस्त आणि तणावपूर्ण आयुष्यात खरं तर प्रत्येकालाच प्रेमाचे, आधाराचे, समजुतीचे दोन गोड शब्द हवे असतात; ज्यामुळे आपल्या जीवनात आनंद निर्माण होईल आणि एकमेकांतील नातेसंंबंध अधिकच बळकट आणि दृढ होतील. संक्रांतीच्या निमित्ताने सूर्याचा प्रकाश, तीळातील स्नेह, गुळातील गोडवा आणि पतंगाच्या सूत्रधारावरील विश्वासाप्रमाणे दृढविश्वास आणि अढळ श्रद्धा यांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला तर वैचारिक संक्रमण घडून येईल आणि योग्य दिशा सापडेल. परस्परातील स्नेहाचं, सामंजस्याचं, गोड बोलण्याचं आणि भावनिक ओलावा जपण्याचं `वाण' आपण आपापसात वाटूया.
- सौ.प्रज्ञा कुलकर्णी, डोंबिवली  (`आदिमाता')

 संपादकीय
आपत्काली शैलही आदळो का
धाकेना जे गाजवी धैर्य डंका ।
-वामनपंडित
तणावाच्या आधारे पुढे जाऊ
पाहता पाहता पुन्हा एक नवीन वर्ष सुरू झाले, आणि त्यातलाही आठवडा संपला. पोराटोरांनी गरगटलेले रस्ते किंवा रतीब टाकावेत तसे कुणीतरी पाठविलेले `एसेमेस' वगळता वर्षस्वागताच्या उत्साहाची कारंजी यंदा जरा मंदच उडाली. िख्रास्मसपासूनच त्याची उभारी फसफसत यायची, तशी यावेळी जाणवली नाही. कोण्या मूक बळीसाठी तरुणाईने किंवा दिखाऊ कनवाळू विचार मुक्तांनी हाती घेतलेल्या मेणबत्त्या विझल्या, तरी त्या विषयी मनांतली खदखद शमलेली नाही असे दिसते. या तरुण संवेदनशीलतेचेही प्राप्त परिस्थितीत समाधान वाटू शकेल. पण याच उदासमनस्कांचे `मार्केट' मिळविण्यासाठी `त्या'च प्रकारच्या अत्याचारी बातम्यांचा ओघ वाढल्याचेही दिसते. त्या माध्यमांनी उसन्या उत्साहाने `चला मजेत जगूया', `तणावमुक्ती', `संकल्प-सिद्धी' असे विषय नव्या वर्षाचे म्हणून समोर फेकायला सुरुवात केली तरी त्यामुळे स्फुरण चढल्याचे कुठे जाणवत नाही.

अशा मानसिकतेचे कारण म्हणून एका संशोधक-विचारवंताचे नवे प्रतिपादन काही वृत्तपत्रांनी चांगल्या रितीने प्रगट केले आहे, त्याची दखल घ्यायला हवी. हा विचार तसा आपल्याला नवा नाही, तो श्रीकृष्णांनी कधीच प्रगट केला होता. परंतु त्यास केवळ तत्त्वज्ञान, चिंतन, बोधस्वरूप असल्यामुळे ते पोथीनिष्ठेने वाचले गेले. पाश्चात्य प्रयोगशीलतेने त्यास सर्वेक्षण-निरीक्षण-आकडेवारी-निष्कर्ष अशा खटाटोपात बांधले असल्याने ते आजच्या काळास सुसंगत आहे. त्यांतून मानवाच्या विचार-प्रक्रियेचा काही धागा जुळवता येतो. आणि या अनंत विश्वाच्या ब्रह्मांडव्यापी काळगणनेपैकी एका मानवी वर्षारंभाचा उत्साह त्याद्वारे मोजण्याचा प्रयत्न करता येतो.

शॉन अॅकॉर याने जागतिक मंदीच्या संदर्भात केलेल्या संशोधनात जे उपाय हाती लागले ते पूर्णत: मानवी मनाशी संंबंधित आहेत. `लढत राहणे, लोकसंग्रह करणे व वृत्ती प्रसन्न ठेवणे' ही तीन महत्त्वाची तत्त्वे त्याने मांडली. हजारो व्यक्तींच्या मुलाखती, प्रबंधांचा अभ्यास, उद्योगांच्या कार्यपद्धती यांच्या मंथनातून त्याच्या हाती लागलेले नवनीत हे होते की, यशस्वितेची पूर्वअट `प्रसन्नात्मेंद्रिय मन:' ही आहे!

मानसशास्त्र असे सांगते की, मानवी शरीराच्या प्रतिक्षिप्त क्रिया वा मेंदूच्या विचारप्रक्रिया यांच्या मुळाशी `भय' आहे. भोवतीच्या घडामोडींतून शरीराला धोका असणाऱ्या गोष्टी निवडून त्यावर मेंदू प्रथम लक्ष केंद्रित करतो. समस्यांकडे प्रथम लक्ष देणे, त्याला सुरक्षिततेसाठी आवश्यक वाटते. पण हळूहळू मेंदूच्या या प्रवृत्तीमुळे आपल्याला सकारात्मक गोष्टींपेक्षा नकारात्मक गोष्टीच पाहायची सवय लागते. आपली भीतीची केंद्रे आधी उद्दीपित होतात. भयाच्या वातावरणात सृजनशील विचार, समाधान, कार्यक्षमता या भावना, आणि सद्वृत्ती निर्माण होत नाहीत. त्या होण्यासाठी, योग्य निर्णय वेळेतच घेण्यासाठी मन शांत, स्थिर, प्रसन्न असावे लागते; असे तो शॉन सांगतो.

एक मजेदार निरीक्षण त्याने नोंदवले की हल्ली ताणतणाव नियोजन, तणावांचे दुष्परिणाम वगैरे गोष्टी सतत बोलल्या जातात. त्यामुळे `आपल्यावर तणाव आहे की काय...' या कल्पनेचाच माणसाला खूप ताण येतो! त्यासाठीही त्याने रीतसर प्रयोग वगैरे केले आहेत. तणावाच्या दुष्परिणामांवर सतत विचार करण्यापेक्षा त्यांना आनंदाने, युक्तीने हाताळले तर तणाव दूर ठेवण्याचे मार्ग सापडतात व यश मिळवता येते. हे त्याने अनेक प्रकारे अभ्यासातून सिद्ध केले. हे साध्य करण्यासाठी काही सोपे मंत्र सांगितले `दररोज सकाळी तुम्हाला मदत करणाऱ्या घटकांची आठवण करा. सकाळी इतरांना आनंद देणारी एखादी कृती करा. किमान दहा मिनिटे छान व्यायाम करा. अस्वस्थ वाटेल तेव्हा दिवसातून केव्हाही तीन मिनिटे फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. मित्रमंडळींच्या सहवासात रहा. लोकसंग्रहातून उर्जा मिळवा.' उद्योजकांच्या एका गटावर याप्रमाणे प्रयोग करून त्याने हे सिद्ध केले की, याप्रमाणे वागल्याने त्या सर्वांची शारीरिक व मानसिक कार्यक्षमता कित्येक पट वाढली व ती दीर्घकाळ टिकूनही राहिली.

मेंदूला सकारात्मक विचारांची सवय लावता येते. त्याचे परिणाम उत्तम दिसतात हे त्याला दाखवायचे होते. काही अतिप्रचंड यशस्वी उच्चाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या पाच महत्त्वाच्या घटना किंवा यशाचे प्रसंग आठवायला सांगितले. त्याला असे दिसले की या सर्व वेळी सर्वांनी खूप तणावपूर्ण परिस्थितीचा सामना केला होता.

काही मिळवायचे तर काही सोसावे लागतेच. मग आपण त्याचा एवढा बाऊ का करतो? संशोधनाने, आकडेवारीनिशी, त्यातही अमेरिकन शास्त्रज्ञांनी सांगितलेले तत्त्वज्ञान आपल्याला लगेच पटते! तंतुवाद्ये वा तबला, मृदंग ही तालवाद्ये यांना नीट सुरात बोलायला लावायचे तर त्यांच्याही खंुट्या पिळाव्या लागतात. सतारीची तार, तबल्याचा पृष्ठभाग पुरेसा ताणलेला असावा लागतो. झाडांना भरपूर खतपाणी देऊन तृप्त केले तरी शेवटी त्यांनाही `ताण' द्यावा लागतो; शेतकरी त्यांचे पाणी पूर्ण तोडतो. ताण चांगला बसला तर झाड चांगले मोहरते, बहरून येते. माणसाचेही असेच आहे. अनेकदा प्रतिकूल परिस्थितीच माणसाकडून त्याच्या पूर्ण क्षमतेने काम करवून घेते. अनेक कलावंतांचे त्यांच्या पूर्वआयुष्यातील सोसणे हीच  त्यांची शक्ती बनली हे आपण जाणतोच.

`सोस रे तू सोस जीवा, सोसण्याचा सूर होतो' ही ओळ वाचली तर कानात जीवघेणा दर्दभरा आवाज गुंजायला लागतो. गायिकेच्या आयुष्यातले सोसणे, तिची वेदना त्या आवाजातून काळजाला भिडते. पण काही गायक-गायिकांची अतिशय आनंदी, अवखळ गीतंही तितक्याच प्रसन्नतेने आत भिडतात याचे कारण त्यांची प्रसन्न वृत्ती!

शरीराला सवयीच्या `कम्फर्ट झोन'मधून बाहेर आणण्यापुरता, मनाची संवेदनशीलता जिवंत राहाण्यापुरता, थोडासा `ताण'च नव्या वर्षाकडे मागावा काय? नाहीतरी हेच वातावरण, हीच दगदग आपल्यासोबत असणार आहे. त्यांचाच वापर करून, थोडी वृत्ती बदलून पाहावी, आपलेही व्यक्तिमत्त्व येत्या वर्षी झाडासारखे बहरून येते का!

भाव नाही; सदुपयोग हवा
कधी कधी संसर्गजन्य रोगाप्रमाणे अत्याचारही वाढत जातो आणि अमरवेलीप्रमाणे पसरतो. स्वत:ची मुळे नसतानाही ती वेल विस्तारत जाते आणि लवकरच झाडाला आच्छादून टाकते. वनस्पतीवर चिकटणारे किडे बघता बघता वंशविस्तार करतात आणि मूळ वनस्पतीला खाऊन फस्त करतात.
दुष्टचिंतन आणि भ्रष्ट आचरण हे आज सरधोपट रीतीचे झाले आहे. दुष्टप्रवृत्ती पतन-पराभवाच्या दिशेने सुसाट पळत असते. उन्नत होण्यासाठी पराकाष्ठा करावी लागते. विधात्याच्या नियमानुसार तो अत्याचाराला एका मर्यादेपलिकडे वाढू देत नाही. लहान मुलांचा विशिष्ट मर्यादेपर्यंतचा गुन्हा मातापिता क्षम्य मानतात. पण त्यांनी मर्यादा ओलांडली की कठोर शिक्षाही करतात. असे झाले नाही तर उर्मटपणाचा अतिरेक होऊन सृष्टीचे सारे संतुलनच ढासळून जाईल. सशक्त लोकांनी संघटित होऊन आपल्या संयुक्त शक्तीचा दुरुपयोग करण्यात कसूर केली नाही. या काळात मर्यादापालनाच्या नियमाने पीडितांनी त्याचा यत्किंचितही प्रतिकार केला नाही. छळ सोसायचा आहे तरी वेळप्रसंगी स्वत:चे रक्त सांडून छळाचा प्रतिकार तर करता येतोच. मानवाची घडणच अशा मातीपासून झाली आहे की तो अनीतीविरुद्ध जिंकला जरी नाही तरी सामना देऊ शकतो. अनीतीला राजरोस वावरू देण्यापेक्षा किंवा सहन करण्यापेक्षा त्याच्याशी टक्कर देत जगणे हेच गौरवास साजेसे आहे.
जेव्हा दुराचारी हटत नाहीत आणि पीडित जनता मुकाबला करण्यास सरसावत नाही तेव्हा परमेश्वरालाही खेद होतो. विधात्याचा आक्रोश वाढतो दुष्टलोक दुष्टकर्मापासून ढळत नाहीत आणि शोषित लोक प्रतिकारास प्रवृत्त होत नाहीत. जगात अन्याय, अत्याचाराचे अस्तित्व आहेच. पण शोषितांनी यशापयशाचा विचार न करता प्रतिकार प्रतिरोधास तयार असले पाहिजे. दया आणि क्षमेच्या नावावर अनीतीला उत्तेजन देणे अयोग्य आहे. अन्यायाचा प्रतिकार करणे हे मानवाचे खरे वैभव आहे.
आजच्या काळाला `प्रगतीचा काळ' म्हटले जाते. आज ज्ञान-विज्ञानाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे. सुखसोयींची साधनेदेखील प्रचुर प्रमाणात वाढली आहेत. सुखसोयींचा डोंगर समोर असूनही प्रत्येक व्यक्ती खिन्न, उद्विग्न आणि विफल दिसते. याचे कारण साधनांचा अभाव हे नाही तर जे काही समोर उपलब्ध आहे त्याचा सदुपयोग होत नाही. बुद्धिमत्तेचे खरे स्वरूप हेच की जे काही हस्तगत आहे त्याचा श्रेष्ठतम सदुपयोग करणे. माणसाच्या गरजा मोजक्या आहेत. त्यामानाने उत्पादनसामर्थ्य भरपूर आहे. एवढे असूनही बहुतांश लोक खिन्न, उद्विग्न दिसावेत याचे आश्चर्य वाटते. हीच खरी गुंतागुंत आहे.
ज्ञान आणि विज्ञानाचा सदुपयोग त्यांचा नीतीमत्तेशी समन्वय होण्यात आहे. सदुपयोगाने कोणतीही वस्तू सुखद आणि श्रेयस्कर होते. दुर्बुद्धिग्रस्त होऊन दुरुपयोग करण्यात आला तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणारच. पुरुषार्थ करूनही असमाधानी, अभावग्रस्त होणार. वस्तूंचा अभाव नव्हे त्याचा दुरुपयोग जनतेला त्राही भगवान करून सोडत आहे.
मनुष्याला सामान्य गरजांपेक्षा एवढे लाभले आहे की तो स्वत:च्या गरजा भागविण्याशिवाय इतर लोकांचीही कामे करू शकतो. पण घडते ते उलटेच. मनुष्य स्वत: दु:खी बनतो आणि दुसऱ्याला दु:खी करतो, कारण साधनसंपत्तीचा दुरुपयोग. प्रत्येकजण श्रमनिष्ठा, तन्मयता, कौशल्य आणि वेळ याद्वारे बरेचसे काम करू शकतो. पण दुसऱ्याची मदत करणे तर दूरच राहिले, त्याच्या स्वत:च्याच गरजासुद्धा पूर्ण होत नाहीत.
सज्जनतेच्या मोबदल्यात दया, सहानुभूती हे जसे एक स्वरूप आहे तसेच उर्मटपणाबद्दल छळ, शिक्षा हे देखील आहे. प्रत्येक क्षेत्रात उर्मटपणाला जणू ऊत आला आहे. प्रमाणापेक्षा जास्त शक्ती हातात गवसल्यावर लोक अत्याचाराला प्रवृत्त होतात. मर्यादांचे उल्लंघन करतात, करू नये वा वागू नये त्यापद्धतीने वागतात. लोकनिंदा होऊ लागते. तेवढ्यानेही चुका सुधारत नाहीत तेव्हा दंडविधानाचा अवलंब करावा लागतो.

कराचीतील एक अधिकारी : रावबहादुर फडके
सिंध प्रांतातील कराची, स्वातंत्र्यापूर्वी मुंबई इलाख्यात होते. तिथे मराठी वसती खूप होती. `सिंध-मराठा' नावाचे मराठी साप्ताहिक वृत्तपत्र तिथे निघत असे. त्याच्या १९३८ सालच्या अंकात आलेला हा वृत्तांत. यातील भाषा आणि तपशील त्या काळच्या विविध बाबींवर प्रकाश टाकू शकतील.
'डेाश रीश लेीप सीशरीं, ीेाश रलिंर्ळीीश सीशरींपशीी, ुहळश्रश ेप ीेाश सीशरींपशीी ळी ढर्हीीीीं.' अशा तीन प्रकारात जगातील श्रेष्ठ व्यक्तिंचा समावेश करता येईल असे एक प्रसिद्ध इंग्रज कवि म्हणतो. रावबहादूर फडके यांस आपण दुसऱ्या सदरांत घालू शकतों. आज त्यांना आपल्या व्यवसायांत मिळालेले श्रेष्ठस्थान सहजासहजी मिळालेलें नसून त्यासाठी त्यांना अविरत श्रम व प्रतिकूल परिस्थितीशी झगडा करावा लागला आहे.

जन्म व शिक्षण
रावबहादूर फडके यांचा जन्म ता.२१ अक्टोबर १८८२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात दोणवली येथे गरीब व प्रामाणिक अशा आईबापाच्या पोटी झाला.  इ.स.१९०० म्यॅट्नीकची परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते १९०१ मध्ये सरकारी कॉलेजात सरकारी शिष्यवृत्ती मिळवून दाखल झाले. १९०२ साली पदवीधर होऊन पहिला नंबर पटकाविला. इ.स.१९०४ मध्ये असिस्टंट व्हेटरिनरी ऑफिसर म्हणून नेमणूक होते न होते तोच त्यांना मुक्तेसर येथे त्याच वर्षी व्हेटरिनरी इन्स्पेक्टरच्या मोठ्या हुद्द्यावर बढती मिळाली. १९०८ मध्ये परत त्यांची मुंबईच्या  कॉलेजात बदली होऊन अखेरीस १९१२ मध्ये कॉलेजचे लेक्चरर म्हणून नेमण्यात आले.
परदेश गमन
इ.स.१९१२ च्या सप्टेंबर महिन्यात स्थानिक सरकारने त्यांची योग्यता व हुशारी ओळखून उच्च शिक्षणासाठी त्यांना विलायतेत पाठविले. रावबहादूर जेथे जेथे म्हणून गेले तेथे तेथे त्यांनी आपले कर्तबगारीवर व विलक्षण बुद्धिचातुर्यावर आपल्या वरील वरिष्ठ अधिकारी व प्रोफेसर यांची मर्जी संपादन केली व त्यांच्या प्रशंसेस पात्र झाले. त्यांचे शास्त्रीय ज्ञान, कार्यनिष्ठा व समाजात मिळून मिसळून वागण्याची प्रवृत्ती या गुणांमुळे ते क्यामडेन टाऊन येथील विश्व विद्यालयात उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर ते १९१४ मध्ये मुंबईत परत आले.
महायुद्धातील कामगिरी
इ.स.१९१४ मध्ये जागतिक महायुद्धाचा भयंकर वणवा पेटला. जगाच्या कानाकोपऱ्यांतून लढाईतील संकटग्रस्त लोकांच्या शुश्रुषेसाठी स्वयंसेवकांची एकसारखी मागणी करण्यात येत होती. `युध्दस्य वार्ता रम्या' या उक्तिप्रमाणे आपणास लढाईच्या गोष्टी ऐकण्यास किती मौज वाटते, पण प्रत्यक्ष तेथे जाणे म्हणजे एक सुळावरची पोळीच आहे. परंतु रावबहादूर यांनी क्षणाचाही विलंब न लावता लढाईवर स्वयंसेवक म्हणून जाण्याचे निश्चित करून ते मोर्सेलिस बंदरी जाऊन थडकले. या त्यांच्या निर्भय वृत्तीबद्दल जिकडे तिकडे त्यांचा लौकिक झाला. इ.स.१९१६ मध्ये त्यांना मुक्तेसर येथे एक महत्त्वाची जबाबदारीची जागा पत्करावी लागली. त्यावेळी त्यांना हिंदुस्थानातील एकंदर सरकारी `दुग्धालये' तपासणीसाठी शहरोशहरी जावे लागले. त्यांची श्रम करण्याची शक्ति व कार्यनिष्ठा यामुळे त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकजणाकडून स्तुति सुमनांचा वर्षाव होऊ लागला. १९१६ ते १९२० च्या दरम्यान डर्शीीा डर्ळाीश्रींर्शीर्शेीी पद्धति यशस्वी करून दाखविणारे रा.ब. हेच पहिले गृहस्थ आहेत. पहिलेच हिंदि प्रिन्सिपाल. इ.स.१९२० मध्ये त्यांची मुंबई व्हेटरिनरी कॉलेजचे असिस्टंट प्रोफेसर म्हणून नेमणूक झाली. १९२२ ते १९२४ पर्यंत त्यांनी ईम्परियल सर्व्हिस मध्ये काम केले परंतु हिंदी सरकारने ली कमिशनच्या अटी मान्य केल्यामुळे त्यांना पुढे चालू करता येईना. १९२४ मध्ये कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपॉल व १९२६ आणि १९२८ मध्ये प्रिन्सिपाल म्हणून रावबहादूर यांनी उत्तम प्रकारे काम केले. योग्य संधि दिल्यास हिंदी मनुष्य दुसऱ्या कुठच्याही मनुष्याशी वाटेल त्या व्यवसायात बरोबरी करू शकतो याचे प्रत्यंतर रावबहादूर यांनी लोकनिदर्शनास आणून दिले. त्यांची हुशारी व पात्रता ओळखून सरकारने त्यांस जे.पी. ही बहुमानाची पदवी बहाल केली. मुंबईच्या व्हेटरिनरी कॉलेजचे रावबहादूर हे पहिलेच हिंदी प्रिन्सिपॉल झाले. त्यांच्या प्रिन्सिपॉल या नात्याने प्रशंसनीय कामगिरीबद्दल कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवाच्यावेळी इ.स.१९३१ मध्ये त्यांना मुंबईचे नामदार गव्हर्नरसाहेब यांच्या हस्ते सुवर्णपदक अर्पण करण्यात आले.
रावबहादूर हे १९३७ सालच्या एप्रिलपासून नोव्हेंबरपर्यंत मुंबई इलाख्याचे डायरेक्टर ऑफ व्हेटरिनरी सर्व्हिस या मोठ्या हुद्द्याच्या जागेवर विराजमान झाले. सेवानिवृत्त झाल्यावर सरकारने पुन्हा त्यांची सहा महिने मुदत वाढविली असून आज ते सिंध प्रांतात याच हुद्द्यावर नेमले गेले आहेत. १९३८ साली त्यांना हिंदी सरकारने नूतन वर्षाच्या सन्मान समारंभात `रावबहादूर' ही पदवी बहाल केली. इतक्या वर्षीचा अनुभव उपजत हुशार बुद्धि व कार्यनिष्ठा यांच्या जोरावर त्यांची सिंध प्रांतातील कारकीर्द अत्यंत भरभराटीची व उत्कर्षाची होईल यात तिळमात्र शंका नाही.
त्याच अंकात आलेले अन्य वृत्त असे -
श्री शिवाजी हायस्कूलच्या मदतीसाठी ठाकरे कृत `विधिनिषेध' चा खेळ महाराष्ट्नीय युनियनच्या मंडळी ने दि. ६ ऑगस्ट १९३८ रोजी कराचीच्या कत्राक हॉलमध्ये केला. कु.धोंडी धुळे या बालनटाने दोन पदे सुस्वर आवाजात म्हटली, त्यास `वन्स मोअर' मिळाला. या खेळातून शाळेला रु.४०० ते ५०० चे उत्पन्न होईल.तिसऱ्या अंकाच्या सुरुवातीला कराचीला हल्लीच आलेले व्हेटरिनरी डायरेक्टर इन. सिंध रावबहादूर फडके यांच्या आश्रयाखाली सदरहु खेळ झाला असल्यामुळे शिवाजी हायस्कूलच्या व्य.मं.चे सभासद अ.मनोहर प्रधान ह्यांनी थोडक्यात भाषण केले. प्रि.मांडके ह्यांनी अध्यक्षांना पुष्पहार व गुच्छ अर्पण केला. नंतर महाराष्ट्न् युनियनचे अध्यक्ष पंडीत बद्री व नाटकाचे मुख्य दिग्दर्शक रा.वसंतराव गुप्ते ह्यांनाही पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. रावबहादूर फडके यांनी प्रसंगोचित भाषण करून शिक्षणासारखे पवित्र कार्य इतक्या चिकाटीने व उत्साहाने चालविल्याबद्दल चालक मंडळींना धन्यवाद दिले व शंभर रुपयांची उदार देणगी जाहीर केली.
रावबहादूर यांचे पणतू श्री.अनिल दत्तात्रय फडके यांनी हा जुना अंक व माहिती उपलब्ध करून दिली.
त्यांचा पत्ता : `उमा निवास', कमला नेहरू उद्यानाजवळ, ७७३/५ एरंडवणे, पुणे ०४  
(सौजन्य : डॉ.ब.गो.फडके फोन (०२०) २५४५३१००)

कुख्यात मार्ग
पूर्वी काही तळमळीचे लोक शाळा काढायचे, आणि प्रारंभी `न्यू इंग्लिश स्कूल' छापाचं सोप्पं नाव द्यायचे. काही काळातच कुणी मोठी देणगी दिली की त्याच्या म्हणण्याप्रमाणं नाव बदलून घेता येत असे. गेल्या शेदोनशे वर्षांत रस्त्यांना नाव देण्याची प्रथा आली. ब्रिटिश काळात मुंबई केंद्र मोठे झाले, त्यात मिंट रोड, क्वीन्स रोड, ग्रँट रोड आले. स्वातंत्र्यानंतर तिथे देशी नावे येऊ लागली. आता गावोगावी गांधी-नेहरू-आंबेडकर मार्ग झाले. गावे वाढली तसतशी स्थानिकांना स्थान मिळू लागले. तरीही त्यासाठी गावात काही कर्तृत्त्व गाजविणाऱ्या प्रतिष्ठिताचे नाव त्या भागाशी - रस्त्याशी संबद्ध असावे इतकी काळजी आवश्यक मानली पाहिजे.
आपापल्या गल्लीत `उगवती नेतृत्त्वं' पुंडगिरी करतात, त्यांच्या वाढदिवसाचे फलक त्यांचे कडे-चेन-मोबाईलसह झळकतात. आता तेवढ्यावर भागत नाही तर त्यांचे नाव तेथील रस्त्याला झळकू लागते. अचानक एके दिवशी एका नक्षीदार खांबावर आकर्षक फलक `गंपू झपके मार्ग' मिरवू लागतो. रस्त्यांची जुनी नावे लोकांच्या मुखी असतात, परंतु स्थानिक रहिवाशांची मागणी, नगरपालिकेचा ठराव, रीतसर नोंद अशी काही पद्धत आहे. ती धाब्यावर बसवून कोणीतरी आपल्या मर्जीचे नाव ठोकून देतो. त्यातही ती व्यक्ती पोलिसी खात्यास `मोस्ट वॉन्टेड' असेल तर?
- तर काय? या मार्गावर चालणाऱ्या प्रजेचे मोल आपोआपच समजून येईल. उद्याच्या काळात `वीरप्पन मार्ग, अजमल कसाब पथ, बेआन्तसिंग चौक' यांचीही प्रतीक्षा आहे. `त्या' मार्गांची वाटचाल आपल्यास नेणार कुठे? शहरांतल्या खड्ड्यांनी दुर्दशा झालेल्या सांगलीच्या रस्त्यांना मंत्र्या-पुढाऱ्यांची नावे देण्यात आली, ती पद्धत कचऱ्याचे ढीग, तुंबलेले जलाशय कोणत्याही बजबजपुरीसाठी चांगली ठरेल काय?

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन