Skip to main content

18 Dec.2017

एक पत्र : आवर्जून वाचावे असे!
अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ
रत्नागिरी
स.न.वि.वि.
आपले पत्र व सोबत संस्थेचे कार्यवृत्त मिळाले. मी आज रुपये अकरा हजार आपल्याकडे पाठविले आहेत. माझ्या आईने लीला त्रिंबक बापट हिने १९३८ ते १९४२ च्या दरम्यान तिच्या वैद्यकीय शिक्षणासाठी रुपये ९६०/-(नऊशे साठ) आपल्या संस्थेकडून अर्थसाहाय्य घेतले होते. ही माहिती मला आत्ता वयाच्या ७४व्या वर्षी, जुनी कागदपत्रे चाळत असताना मिळाली. किती मदत घेतली याचा काही त्यात उल्लेख नाही. हे ऋण फेडले गेले की नाही याचीही माहिती कुठे दिसली नाही.. तेव्हा अद्यापि परतफेड झाली नसल्यास आपण ती करून टाकावी, असा एक स्वाभाविक विचार मनात आला, आणि आपली संस्था अद्यापि अस्तित्वात तरी आहे की नाही याची चौकशी मी उत्सुकतेपोटी फेसबुकवर केली; व आपल्याशी संपर्क केला.
आपल्याकडे इतकी जुनी नोंद अजूनही सुस्थितीत आहे, ही वस्तुस्थितीच आपल्या संस्थेचा कारभार चोख आहे याचे द्योतक आहे. त्यावरून दिसते की, वरील रकमेपैकी ४०० रुपयांची परतफेड करण्यात आली होती. परंतु आईचे गंभीर दीर्घकालीन आजारपण व अकाली मृत्यू (१२ ऑगस्ट १९५५) यांमुळे उरलेेले ५६० तेव्हापासून देणे राहिले असावेत. मला फार वाईट वाटले.
आमचे बालपण, आईच्या आठवणी, तिने आमच्यावर केलेले संस्कार, तिने घेतलेला अभ्यास, मारलेल्या छड्या, गतवैभव यांबरोबरच तिला क्रॅन्सर झाल्याचे कळल्यावर तिनेे मला कुशीत घेऊन रडणे! मृत्यूपूर्वी टाटा हॉस्पिटलच्या रुग्णशय्येवरून ऑपरेशनच्या आदल्या रात्री तिने आपल्या डायरीत आम्हासाठी लिहून ठेवलेला उपदेश, सगळया सगळया स्मृती एकदम जाग्या झाल्या.
मातापित्यांचे ऋण फेडणे शक्य नाही. आईवर असलेले आर्थिक ऋण अंशत: भरून काढण्याची एक छोटीशी संधी मला देण्यासाठी तर परमेश्वराने मला आजपर्यंत ठेवले नसेल ना! वयाच्या ३५व्या वर्षी चार चिमुकल्यांना सोेडून ती निघून गेली. त्यावेळी मी ११ वर्षे, विनय ६ वर्षे, मोहन ३ वर्षे व सतीश दीड वर्षाचा होता. आई जेवढी जगली, त्याच्या दुपटीपेक्षा जास्त मी जगलो आहे. तरी आजही हा म्हातारा, आईच्या कुशीत शिरण्यासाठी तलमळत आहे.
आईचा जन्म पुण्याचा. प्रसिद्ध क्रांतिकारक चाफेकर बंधू यांच्या चुलत भावाची (गणेश विनायक चाफेकर)नात. तिचे शालेय शिक्षण हुजूरपागेत झाले. माझे वडील त्रिंबक विनायक बापट मध्य प्रदेशातील हरद्या जवळ टीमरनी गावचे. वैद्यकीय शिक्षणासाठी तेही पुण्यासच होते. दोघेही एकाच कॉलेजात, त्यामुळे त्यांचा प्रेमविवाह झाला. आईच्या आग्रहाखातर दोघांनी पुण्यासच स्थायिक व्हायचे ठरविले. आईचे सदाशिव पेठेत सूतिकागृह होते, तर वडिलांचा भवानी पेठेत आणि देहूरोडला दवाखाना होता.
अचानक सगळया वैभवाला दृष्ट लागली. एक वर्ष अंथरुणावर हाल सोसत आई स्वर्गवासी झाली. वडील पत्नीच्या योगाने सैरभैर झाले. पुण्याचे सूतिकागृह, दवाखाने, गाडी, घर, सगळे येईल त्या किंमतीत विकून आम्ही पुणे कायमचे सोडले. वडिलांचे पाचही भाऊ (सगळे डॉक्टर) विदर्भ, मध्यप्रदेशात असल्याने त्यांच्या आश्रयासाठी आलो. सुशिक्षित सहचारिणी गेली, वैभव गेले, पदरी चार लहान मुले. त्या विमनस्क अवस्थेत आपले विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन वडील गावोगावी खेड्यापाड्यांत प्रॅक्टिस करत हिंडत. मन शांत होईना, व्यवसायाकडे लक्ष नसे. ४-६ महिने झाले की लगेच सगळे सामान भरून दुसऱ्या गावाला जात असू! तिथे स्टेशनावर पोचल्यावर मग जागेचा शोध!! मी ५वी ते १०वी पर्यंत ९ शाळा बदलल्या.
आम्ही सर्वजण फिेनक्स पक्षाप्रमाणे राखेतून जन्म घेऊन, भरपूर शिकून, स्वावलंबी राहून सुदैवाने पुन्हा सुस्थितीत आलो. सर्व भाऊ हुशार, पहिला नंबर सोडला नाही, मी इंजिनियर -पण सर्वात कमी शिकलेला. आम्ही सर्वजण केव्हाच निवृत्त झालो आहोत. कधी कुमार्गाने पैसा जमविला नाही, सर्वांची सांसारिक कर्तव्ये पूर्ण झाली आहेत. यामागे एक अदृश्य शक्ती आहे, ती म्हणजे आई-वडिलांचे आशीर्वाद आणि संस्कार. त्यांनी दिलेले प्रेम. गेल्या ६०-७० वर्षांत आमच्यात अक्षरश: एकदाही वाद झाला नाही. माझ्या इतर भावांनाही मी आपल्या संस्थेबाबत आणि या ऋणाबाबत कळविले आहे. वास्तविक आपल्या संस्थेने जे सहाय्य केले त्याचे मोलच करता येणार नाही.
हे सर्व लिहिण्याचा उद्देश असा की, तरुणांनी आपल्या आधीच्या पिढीपासून काही प्रेरणा घेऊन हे संस्कार आणि आपले वैशिष्ट्य जपणे आजच्या युगात फार आवश्यक झाले आहे. कुुटुंबसंस्था मोडकळीस आली आहे. संसाराची, आई-वडिलांचे जबाबदारी तरुणांना नको आहे. स्वार्थ, स्वार्थ, फक्त स्वार्थ आणि दूषित राजकारण. संस्कृतीचा अभिमान नावापुरताच उरला आहे. आचरण त्याविरुद्ध आहे. आमच्या आईने आम्हाला मृत्यूपूर्वी काय उपदेश केला होता त्याची छायाप्रत त्यांनी जोडली आहे.
आपल्या संस्थेस आमच्या सर्वांच्या शुभेच्छा!
  -श्रीकांत बापट, नागपूर फोन-०७१२-२२९५८७८

 संपादकीय
आता काहितरी असे कर जये मालास या भाव ये
टक्के आठ करुनि काट मजुरी, बांधीन रुग्णालये।
-अनंत काणेकर
वार्धक्याची शाल, नेतेपदाची झूल
भारताचे माजी परराष्ट्न्मंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम केलेले यशवंत सिन्हा यांना महाराष्ट्नतल्या शेतकऱ्यांचा कळवळा आल्याचे दिसले. शेतकऱ्यांना त्याचा किती लाभ झाला ते ठाअूक नाही, त्यांच्याच पक्षाचे राज्यसरकार लगेच कृतीशील झाले काय तेही ठाअूक नाही, पण आपल्याकडच्या वृध्दांच्या मानसिक वेदनांकडे मात्र या आंदोलनामुळे लक्ष वेधले जाआील! यशवंतराव सिन्हा बिहारातून महाराष्ट्नत आले आणि तिथले प्रश्न त्यांनी तीनच दिवसांच्या आंदोलनाने मार्गी लावले ही बाब त्यांच्या तडफदारपणाची आणि दबदब्याची झलक दाखविणारी म्हणूया. आितकी क्षमता असणाऱ्या प्रभावी मान्यवर नेत्याकडे आताच्या पक्षनेत्यांनी काहीच कामगिरी सोपविलेली नाही हे चुकीचेच आहे. आंतरराष्ट्नीय किंवा केंद्रीय स्तराचे राहो, पण गेला बाजार `अुर्वरित महाराष्ट्न् विकास मंडळ' अथवा `ग्रामस्वच्छता मंडळ' असे काहीतरी, -गाडी शिपाआीप्यादे असण्यापुरते तरी पद त्यांना (द्यायला)हवे होते. ते नसल्यामुळे मग त्यांना अशा प्रचलित कळवळयाची आंदोलने करणे भाग पडले. कुटुंबाच्या कर्तेपदावरून बाजूला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कशा प्रकारच्या समस्या भेडसावतात, हे सरकारने यशवंत सिन्हा यांच्या यशस्वी आंदोलनातून लक्षात घ्यायला हरकत नाही. ज्येष्ठशक्ती वेळीच ओळखली नाही तर ती कशा प्रकारे कसाला लागते हेही कर्त्या पिढीने या अुदाहरणातून शिकावे. घरच्या म्हातारीला स्वैपाकघरात येऊ न देता, केवळ स्त्रोत्रे योगासने करायला ठेवली तर तिला चिडायलाच होते.

सिन्हा यांना आिकडे महाराष्ट्नत येअून आंदोलन करावे लागावे, याची खंत शेतकरी नेते शरदराव पवार यांनी त्यासंबंधाने व्यक्त केली. ही  खंत आजच्या सरकारी धोरणासंबंधाने होती, की त्यांच्याच आजवरच्या शेतीखात्यासंबंधातील अपयशासंबंधाने होती, की सिन्हा यांच्याच संबंधाने होती, यासंबंधाने काही सांगता येत नाही. पण ज्याअर्थी त्यानी जाणतेपणी  जाहीर वाआीट वाटून घेतले त्याअर्थी  हा प्रश्न (म्हणजे सिन्हांचा) त्यांना फारच गंभीर वाटला असणार. सिन्हांच्याच वयात ते अजूनी त्यांचा राष्ट्न्वादी प्रपंच सांभाळून आहेत, तरीही पुढच्या पिढ्यांकडून  त्या प्रपंचाचे काय होणार हे दिसू लागल्यामुळे त्यांना सिन्हांचा प्रश्न अधिक `लागला' असेल. कसेही असो, यशवंत सिन्हा यांचे आंदोलन  यशस्वी झाले असे साऱ्यांनी म्हटले आहे; त्या साऱ्यांचे समाधान झाले आहे यात आपणही समाधान मानावे हे ठीक.
हल्ली  शेती हा विषय असा आहे की, कुणीही अुठावे आणि त्यासंबंधीच्या मागण्या सुरू कराव्यात. वृत्तपत्रांनी तर भारतीय शेतीचे दशावतार असे मांडत भांडत ठेवले आहेत की, हा व्यवसाय त्यांच्या मते संपल्यातच जमा आहे. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपल्या चाळीस कोटि जनतेला पुरेल अेवढे शेतीअुत्पादन नव्हते. त्यावेळी अन्नमंत्री असे पद होते आणि त्याने जगभर फिरून धान्य गोळा करावे हे त्याचे काम होते. आज १३० कोटि जनतेला पुरून काही अुत्पादने बाहेर विकता येतात अशी स्थिती आहे. शेतीवर अवलंबून तर आपण सारेच आहोत, भारतातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे हेही खरे आहे. पण त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली असल्यामुळे शेतीलाही त्याचा खूप लाभ होत असतो. स्वातंत्र्याच्या प्रारंभ काळात देशी अुद्योग, विशेषत: कापडधंदा ढेपाळला होता. सूत आणि कपड्याच्या बाबतीत सरकारची सतत बदलती धोरणे असूनही, अतिशयोक्तीने म्हणायचे तर  आज जगाला कापड पुरवू शकेल आितकी स्थिती भारतात आहे.

या साऱ्या बदलत्या आर्थिक स्थितीचा वेध घेअून कोणताही धंदा बरकतीत ठेवावा लागतो. आजही दुष्काळी भागात सोने पिकविणाऱ्या सच्च्या कष्टकऱ्यांच्या कथा अपवादाने का होआीना प्रकाशात येत असतात. अेखाद्याच शेतकऱ्याला शेती जमते, तर आितरांनी त्याच्याकडून शिकायला नको का? तसे साऱ्याच व्यवसायांत असते. गावात किराण्याची दुकाने खूप असतात, त्यातले अेखादे धो धो चालते; -बाकीच्यांकडे गुळावरच्या माशा अुठत नाहीत.अेखादा डॉक्टर `नि रोगी' असतो, तर दुसऱ्याकडे पाय ठेवायला जागा नसते. पण अशा व्यवसायिकांना सरकारने सवलती द्यायच्या, की कर्जमाफी द्यायची? त्याच व्यवसायिकाची पोरे नोकरीसाठी बाहेर पडतात. पडावेच लागते, कारण त्यांना कुठे तक्रारी करून चालत नाही. त्या मानाने शेतकऱ्यांची संख्या आपल्याकडे जास्त आहे, म्हणून त्यांचा अनुनय करून आपली नेतेगिरी सिध्द करण्याचाही हेतू आंदोलनांचा असू शकतो. अन्यथा मागण्या आणि प्रश्न जर सारखेच आहेत तर संघटनांची संख्या दीडशेच्या घरात कशाला गेली असती? पण साऱ्यांच्याच डोळयापुढे हार्दिक पटेलचा आदर्श असल्यामुळे यशवंत सिन्हांसारखे बुजुर्गही त्याच वाटेने चालले असतील.

शेतीचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्नच नाहीत असे तर कोणी म्हणणार नाही. पण ते सोडविण्याचे मार्ग हे त्या समाजघटकाला पंगू करण्याचे नसावेत, अुभे करण्याचे असावेत. शेतकऱ्यांची कोणती संघटना अुत्पादनवाढीसाठी अभ्यासवर्ग, प्रशिक्षण शिबिरे, शैक्षणिक सहली, आर्थिक नियोजन असे काही करीत असल्याचे अैकिवात नाही. क्षारपड जमिनी हा काही सरकारने किंवा अन्य कोण्या घटकाने निर्माण केलेला प्रश्न नाही, त्यात बदल करून सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन कोणी करायचे? पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे परंतु पाणी बचतीचे अुपाय कठोर करायला संघटनेची ताकत वापरायला नको? त्यासाठी यांची नेतेगिरी काही कामाची नाही. कारण त्यात अभ्यास आहे, प्रयोग आहेत, श्रम आहेत. त्यापेक्षा आंदोलनाच्या तीनच दिवसांत सारा प्रश्न सुटून जाण्याची आिलम अधिक बरी, तीच सिन्हानी दाखविली. आपल्या शेतकरी नेत्यांना त्याचेच आकर्षण असावे.

भारत शेतीवर अवलंबून आहे, म्हणून शेतीला फार महत्व आहे. शेतकरीही पुष्कळदा बनियेगिरी दाखवितो. आडबाजूच्या खेड्यातल्या आठवडी बाजारातही अेकादशीआधी केळी-रताळी महाग होतात, तिथे कुठली मार्केट कमिटी येत नाही. पण त्यात गैर काहीच नाही. शेतकरी गरीब असू शकतो, पण तो बिचारा म्हणण्याचे कारण नाही; त्याने तसे असूच नये. पण आपल्याकडे `विद्वान दरिद्री ब्राह्मण' असतो, तसेच गरीब बिचारा शेतकरी होतो. शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन हितापेक्षा त्यांच्याबद्दल कळवळा दाखविला की त्यांचे प्रश्न आणखीच कठीण होतील, पण नेत्यांचे राजकारण मोठे होआील. अूसशेती संकटात आहे म्हणून सहकारी कारखाने खाजगी केले की फायद्यात जातात हे लोकांना कळते. सहकारात शेतकऱ्यांचेे आणि सरकारचे भांडवल गुंतलेले असते, पण कारखाना मात्र त्या नेत्याच्या नावाचा होतो. त्यांच्या असल्या दांभिक  कळवळयाने शेतीचे नुकसान जास्त केले आहे. शेतकऱ्यालाच काय, कोणाही दुर्बळ गरीबाला सरकारने, समाजाने सर्वतोपरी मदत केलीच पाहिजे परंतु शेतकऱ्यांच्या नेतेगिरीने गरिबीचा बाजार मांडला तर काय करावे! आमटे कुटुंबाने उध्वस्त कुष्ठरोग्यांना स्वावलंबनाची हिंमत दिली, शेतकरी आपली दुर्बलता दाखविण्यासाठी दूध रस्त्यावर ओततो, हे नेत्यांनी शिकवले काय? त्यांस रोखणारी नेतेगिरी पाहिजे. सिन्हा यांच्या उमेदीतील रंगीत वसने विटली असल्याने वार्धक्याचे लेणे म्हणून खांद्यावर लपेटलेली जीर्ण शाल उरली. ती शाबूत राहावी त्यासाठी हे आंदोलन असेल तर ते यशस्वी झाले म्हणूया.

आंदोलन कुणी करावे याला बंधन नाही म्हणून ते सिन्हानी करावेही. पण ते स्वत: बडे प्रशासकीय अधिकारी होते, मंत्री होते. त्यांच्याच पक्षाचे सरकार सत्तेवर आहे. तरीही त्यांना जनतेचे प्रश्न सोडविण्याचे नेमके अुपाय माहीत नसतील असे तर म्हणताच येणार नाही. परंतु त्यांना त्यांच्याच वयाने निर्माण केलेला प्रश्न सोडविणे माहीत नाही; कारण आितर वयस्करांप्रमाणे त्यांनाही  प्रथमच वृध्दत्व आलेले आहे. आपल्याच प्रश्नावर अुपाय  न  सुचल्यामुळे जशी चिडचिड होते, त्यातलाच हा प्रकार वाटतो. त्यांच्या छोट्याशा आंदोलनाने प्रश्न सुटल्यासारखे आितरांना वाटत असेल तर त्या आनंदात आपणही  सहभागी व्हायला काही हरकत नाही. त्यांना आणि आितर जाणत्या नेत्यांना  बरे वाटले ना, मग झाले तर!

मराठीचा वापर
नोव्हेंबर अखेरीच्या अंकात गगनगिरी महाराजांविषयी माहिती प्रकाशित केली होती, त्यास बऱ्याच वाचकांची पसंती मिळाली आहे. या विभूतीचे नाव अैकले होते, काही आध्यात्मिक कार्य व महती असेल असे वाटत होते, परंतु ही राजघराण्यातील तपश्चरणी व्यक्ती होती, ही सारी माहिती नव्याने कळली, असा साऱ्या पत्रांचा आशय आहे.
नोव्हेंबरच्या अेका अंकात मराठी भाषा वापरण्यासंबंधी आग्रहाची दोेन मते आहेत. आपण आवर्जून मराठीचा वापर करणे आवश्यक आहे. मी गेली काही वर्षे `लँड लाआीन फोन'अैवजी स्थिरभाष, आणि `मोबाआील'अैवजी चलभाष हे शब्द वापरतो आहे. हे शब्द मराठी भाषा अभ्यासपरिषदेच्या `भाषा आणि जीवन'मध्ये वापरले होते, तेे स्वीकारले. वाचकांना व संपादकांना विनंती करतो की, असे आपणही काही मराठी शब्द वापरायला सुरुवात करावी.
  -कालीदास वा.मराठे, ढवळी गोवा.        चलभाष : ९४२३८८२२९०

सत्तेचे नेते
राजकीय पक्षांकडे एकमेव कार्यक्रम आहे. तो म्हणजे कर्जमाफी. जे कधी शेतात गेले नाहीत, नांगर हातात धरला नाही. ते शेतकऱ्यांचे तथाकथित पुढारी. विचित्र मागण्या करत विरोधी पक्षांमध्ये सहभागी होऊन सत्तेचेही फायदे मिळवायचे, सरकारला विरोध करायचा. जे पक्ष निदर्शने मोर्चे काढतात त्यांनी आपले सरकार असताना किती कर्जमाफी दिली? कर्जमाफीच्या शेतकऱ्यांच्या यादीत बड्या उद्योगपतींची राजकारणी लोकांची नावे आहेत. दुधाला ज्यादा भाव मिळावा. भाजीपाल्याला ज्यादा दर मिळावा म्हणून आंदोलने झाली. दु:खद घटना म्हणजे दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकले गेले.  या सर्व गोष्टींचा परिणाम सामान्य लोकांवर होतो.
-नारायण ल. आपटे, कणकवली

आम्हाला अभिमान
प्रदीप आपटे यांच्या पराक्रमाची कथा सांगितली त्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद.
मी सैन्यात पंधरा वर्षे होतो. नंतर रिझर्व्ह बँकेतून सेवा निवृत्त झालो. आता ८४ वर्षे पूर्ण झाली. तब्येत ठीक आहे., वाचन-लेखन करतो. माझा नातू आदित्य जूनमध्ये सिलेक्ट होऊन चेन्नईमध्ये ऑफीसर ट्न्ेिंनग घेतो आहे. पुढच्या वर्षी कमिशन प्राप्त होऊन लेफ्टनंट पदावर त्याचे पोस्टींग होईल. आम्हा सर्वांना अभिमान आहे.
         -देवदत्त दोडके, व्ही ८८ नरेंद्रनगर, नागपूर -४४००१५

निर्दोष प्रयत्नांस शिक्षाच
१९८२ च्या एमपीएससी परीक्षेतून मी ओबीसी असूनही आरक्षणाचा लाभ न घेता मेरीटवर शासनसेवेसाठी निवडला गेलो. मे १९८४ मध्ये मी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातून रुजू झालो. पण मला पहिली पदोन्नती १९ वर्षांच्या `सर्वोत्तम' सेवेनंतर (मार्च २००३) मिळू शकली. मी जातीयवाद आणि धर्मांधवादाचा कट्टर -घोर विरोधी राहिलो आहे. महार या पूर्वाश्रमीच्या जातीतील व मुस्लिम धर्मातील कितीतरी व्यक्तींसोबत माझे घरोब्याचे अंतरंगी संबंध राहिले आहेत. पूर्वीश्रमीच्या एका महार मुलीला व एका मुलाला (आज दोघेही प्रौढ आहेत.) मी मानस कन्या-पुत्र मानले असून, त्या मुलीचे कन्यादानही मी केले आहे. माझ्या पत्नीची शस्त्रक्रिया झाली तेव्हा त्या `महार' मुलीने माझे संपूर्ण घर व मुलांना सांभाळले. माझ्या पत्नीच्या वतीने ती घरची देवपूजा सुद्धा करायची. आजही हे सर्व संबंध निर्वेध कायम आहेत.
मी शिकत असताना एका मुस्लिम परिवाराच्या घरी ८-९ वर्षे भाड्याने राहात होतो. त्या घरच्या अम्माजीने मला आपला लहान भाऊ मानले होते, व परवा मरेपर्यंत तिने तो रिश्ता निभावला. त्यांची दोन्ही मुले मला आजही आपला `मामू'च मानतात. लाडनू(राजस्थान) येथील आचार्य तुलसी यांच्या `युवादृष्टी' आणि नेमीचंदजी जैन यांच्या `तीर्थंकर' या हिंदी नियतकालिकांनी माझी विचारदृष्टी घडविली आहे.
माझी पार्श्वभूमी समजावी म्हणून हे सर्व, (मूर्खपणाचा आरोप स्वीकारून)सांगितले. परंतु जेव्हा नोकरीच्या कालावधीत मला व माझ्या सर्वोत्कृष्ट गोपनीय नोंदीला डावलून माझ्यापेक्षा कितीतरी ज्युनियर व्यक्तींना जाती-धर्माच्या आधारावर पदोन्नती देण्यात आली, तेव्हा मात्र माझी सारी विचारपद्धतीच हादरून गेली. तुमच्या मागे जातींचा, धर्माचा, शिफारशींचा, चापलूसींचा आधार नसेल तर तुम्हाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो, याची जबरदस्त जाणीव झाली.
शिवाय गावोगावच्या पूर्वाश्रमीच्या `दमित' समाजाच्या वंशजांनी आजच्या निर्दोष पिढीवर वंशजांवर जो आसूड उगारला आहे व उगारत आहेत, आणि त्यांच्या या `उभारणी'ला शासन, प्रशासन, न्यायासन, संविधान सर्वांचे पूर्ण समर्थन व संरक्षण मिळते आहे, त्याचा स्वाभाविक आणि निसर्गप्रणित विरोध होणार नाही काय? मला मोठा प्रश्न पडलाय. या प्रश्नाचे उत्तर मी नमूद केलेल्या `नपुंसक' परिस्थितीत तर दडले नसावे ना?

-लखनसिंह कटरे, बोरकन्हार(जि.गोंदिया)   फोन- ७०६६९६८३५०

शतायू वेदशास्त्री
वाआी (जि. सातारा) येथील वेदमूर्ती शंकरराव अभ्यंकर यांनी शंभरीत पदार्पण केले, आजही ते सामाजिक व धार्मिक कार्यासाठी प्रयत्नशील आहेत. वाआी हे प्राचीन काळापासून विद्वानांचे गाव म्हणून विख्यात आहे. `दहा नाशिककर म्हणजे अेक काशीकर, दहा काशीकर म्हणजे अेक वाआीकर' असे गंमतीने म्हटले जात असे. त्या पठडीतले अभ्यंकरशास्त्री, वाआी क्षेत्रीच्या अनेक संस्थांत मार्गदर्शक होते. अर्बन बँक, टिळक स्मारक संस्था, वसंत व्याख्यानमाला, वाआी पालिका अशा संस्थांच्या जडणघडणीत त्यांचा अप्रत्यक्ष  ठसा दिसत असे. वाआीच्या सुप्रसिध्द स्वामी केवलानंद यांच्याकडून त्यांनी प्राज्ञ पाठशाळेत संस्कृतशिक्षण घेतले. त्यांनी यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेचा विशेष अभ्यास केला. ज्योतिषशास्त्राबरोबरच त्यांनी ज्ञानेश्वरी, दासबोध यांचाही सखोल अभ्यास केला आहे. संस्कृतवर त्यांचे प्रभुत्व आहेच, पण वेदातील ऋचा आजही त्यांना मुखोद्गत आहेत. वैदिक परंपरेचे ते अभिमानी आहेतच, पण वेद हे वाचण्यासाठी किंवा पाठांतरासाठी नाहीत, तर ते समजून घेण्यासाठी आहेत असे त्यांचे प्रतिपादन असते. त्यांची राहणी, विचारसरणी आणि दैनंदिनी आजही तरुणाला लाजवेल अशी असते. महिला मुली आणि साऱ्या जातीपातीचे अभ्यासक यांना ते प्रोत्साहन देअून वेदाभ्यास करण्यास सांगतात. ते अनेक ठिकाणी पौरोहित्य करत परंतु कर्मकांड आणि रूढी यांवरती विश्वास  न  ठेवता ते समजून घेण्याचा आग्रह धरीत. अलीकडे त्यांनी तसे भिक्षुकी पौरोहित्य बंदच केेले.
त्यांच्या शंभरीनिमित्ताने त्यांचा नागरी सत्कार वाआीकरांच्या वतीने झाला. त्यांना मानाचे वस्त्र, चांदीची भेटवस्तू आणि मानपत्र देअून गौरविण्यात आले. वाआीकरांवर जातिभेदरहित प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संस्कार करणारे ज्ञानपीठ म्हणून त्यांचा अनेक वक्त्यांनी खास अुल्लेख करून त्यांना वंदन केले. आजही अभ्यंकरशास्त्री कृतिशील आहेत.

सायकलप्रसार आवश्यक 
सायकल पर्वाच्या उंबरठ्यावर हा लेख वाचला. भारतात वाहनांची संख्या भरमसाठ वाढली आहे. यात भर पडत आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका खेडेगावचं उदाहरण देतो. या माझ्या गावी २०१० सालापर्यंत २-४ दुचाकी व २ चारचाकी वाहनं होती, आमदार व दोन व्यापारी यांची!
उजनी धरणाचे पाणी मिळू लागले. गावालगत साखर कारखाना उभारला. बँकेतून पत पुरवठाही सुरू झाला. ९०% जमीन ऊस लागवडीखाली आली. बघता बघता गाव श्रीमंत झाला. दहा-वीस एकर जिरायत शेती असलेला, पूर्वी मजूरी करत असलेला शेतकरी बागायतदार झाला. गावात आज शे-सव्वाशे वाहने धावतात! चारचाकी वाहनांनी टप्पा ओलांडला. शेतीतून पक्की घरे उभारली आहेत.
खेडोपाडी १०-१२ मैल अंतरावरील बाजाराला पायी जाणारे आता सर्रास दुचाकी किंवा पिवळी जीप यांचा वापर करतात. सायकली पिचत आढळतात. खेडीही प्रदूषणग्रस्त आहेत. बैलगाड्यांतून कारखान्यावर फक्त उसाची वाहतूक ७-८ किलोमीटरपर्यंतची होते. सर्वत्र ट्न्ॅक्टर, ट्न्क्स् याचा वापर होतो. नांगर, कुळव, ळूहळू इतिहास जमा होऊ पाहात आहेत. बोअरिंग मशीन, जे.सी.बी., पोकलेन इ.वाहने प्रदूषणात भर घालत आहे. देशपातळीवर यांचा विचार होणे आवश्यक झाले आहेत. हवेचे प्रदूषण करणाऱ्या वाहनांचा वापर कमी करणे, शक्य तिथे सायकलींचा वापर करण्यावर पश्चिमी देश भर देत आहेत. शहरांगावांतून सायकलीकरता स्वतंत्र रस्ते उपलब्ध करून देणे, पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे सायकल भाड्याने मिळावी अशा सोयी करणे इ.मार्गाचा अवलंब ते करत आहेत. इंधनाच्या वापरामुळे प्रदूषणाची पातळी मर्यादा ओलांडू नये याकरता प्रयत्नशील आहेत. आपण केव्हा जागे होणार? याचा गंभीर विचार केला नाहीतर भावी काळी हे प्रदूषण अवाक्याबाहेर जाईल व याचे दुष्परिणाम सर्व समाजाला भोगावे लागतील.
-श्रीकृष्ण मा. केळकर, पुण फोन- ८४४६९०५५१७ 

माणसांची किंमत किती
कोणत्याही देशाचा विकास व आर्थिक प्रगती तेथील नैसर्गिक संपत्ती आणि तिची जपणूक, भौतिक साधने आणि त्यांचा वापर, तसेच वाहतूक - दळणवळण यांच्या सुविधा यांवर अवलंबून असते. त्याचप्रमाणे तेथील लोकांची गुणवत्ता कशी आणि किती हेही मोजले जाते. अेखाद्या हवेलीत राहणारे धनवंत कुटुंब सगळी सुखे अुपभोगत असते, पण ते जर गावगुंडाचे आहे असे आपल्याला समजले तर त्याची खूप प्रगती झालेली आहे असे आपण मानत नाही. याअुलट अेखाद्या साध्यासुध्या घरात विचारवंत सोज्ज्वळ कुटुंब राहात असले तरी ते प्रगत मानले जाते. देशातील साधनसामग्रीपेक्षाही तिथल्या माणसांची गुणवत्ता विशेष महत्वाची असते. आपला देश विकास पावत आहे, अशा वेळी त्या बाबतीत आपण लक्ष दिलेच पाहिजे.
देशाच्या विकासाच्या आराखड्यात शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. सर्वांगीण सुधारणेचे शिक्षण हे प्रवेशद्वार असते. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे, या वचनावर अेकोणिसाव्या शतकातील सुधारकांचा विश्वास होता. म्हणून टिळक आगरकरांपासून फुले-भाअूरावांपर्यंत सगळया सुधारकांनी आधी शाळा सुरू केल्या. त्यांतल्या कुणीही जातीयतेला थारा न देता मुलामुलींच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले. लोक शहाणे शिक्षित झाले तर देशाचा विकास लवकर होआील हे आता साऱ्या जगाने मान्य केले आहे. तथापि देश पुढे जायचा असेल तर त्या खालोखाल दळणवळणास तितकेच महत्व येते.
प्रगतीची अेक संकल्पना म्हणून स्मार्ट सिटी चे आराखडेे तयार होअू लागले आहेत. स्मार्ट सिटी म्हणजे नेमके काय? त्यात अनेक बाबींचा अंतर्भाव असतो, पण अग्रक्रमाने विचार होतो  तो वाहतुकीचा. मोठी शहरे आता अेक कोटि लोकसंख्येची झाली आहेत.  दहा लाख संख्या तर कित्येक शहरांत वसली आहे. शहरीकरणाचे प्रमाण जास्त असल्याने त्या लोकसंख्येत भर पडत आहे. आितक्या जनतेला रोजच्या व्यवहारांसाठी जा ये करावीच लागणार, त्यासाठी वाहतुकीच्या सोयी देणे ही महत्वाची गरज होअून बसते. वेगवान आणि सुखावह वाहतूक आपल्याकडे जवळजवळ नाहीच. आहेत  ती  साधने आपण नीट वापरत नाहीत पण आपल्याकडे बुलेट ट्न्ेन येअू घातली आहे. मुंबआीतल्या लोकल रेल्वेच्या प्रश्नावर काही आिलाज सापडत नाही. पुण्यासारख्या शहरात बसमध्ये बसायला मन धजावत नाही. सोलापूर-नाशिक आिथले तर कोणी बोलायचेच नाही. भारतात सगळीकडे यापेक्षा वेगळी स्थिती नाही. दिल्लीत तर साराच रामभरोसे कारभार.
पाअूस वादळे झाली तर शहरे बंद पडतात. बांधकामे आणि कचरा यांमुळेही वाहतूक अडते. जुनी बांधकामे किंवा अतिक्रमणे पाडली तरी त्याचा परिणाम रस्ते अडून राहण्यात होतो. विनापरवाना आितकी बांधकामे अुभी राहतातच कशी? याचे अुत्तर साऱ्यांना ठाअूकच असते. पण ते देण्या न देण्याने वाहतूक सरळ होत नाही. प्रभादेवीच्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी झाली, तो राग फेरीवाल्यांवर निघत आहे. पण आजच्या शहरांत कोणताच रस्ता फेरीवाल्यांशिवाय नाही. लोक बेशिस्त आहेत हे खरेच, पण अधिकारी पाोलीस स्वयंसेवक कुणीच काही करीत नसतील तर प्रश्न सुटणार कसा? सोडविणार तरी कोण? ज्यांना रस्ता मोकळा हवा असतो, त्यांनी फेरीवाल्यांकडे खरेदी करू नये अेवढे पथ्य पाळायला नको?
तुंबणाऱ्या या वाहतूक व्यवस्थेत माणसाची किंमत किती?  शहरी झगमगाटात मने हरविलेली माणसे दुसऱ्या दिवशी तसले अपघात, दुरवस्था विसरतात, आणि धावायला लागतात. सुरक्षित वाहतूक होण्यासाठी प्रत्येकाची काही जबाबदारी असते, हे प्रत्येकजण विसरून जातो. आज दुसरा कुणी मेला तर `मरूदे त्याला, आपण धावत पुढे गेले पाहिजे' अशी त्याची भावना आहे. जनतेला कळत नाही, आणि नेत्यांना ते समजून घ्यायचे नाही. कुणाची दु:खे कुणी करायची? आपल्यालाच किंमत नाही, तर आपल्या दु:खाला कसली आलीय किंमत!
-शंकर पु. देव, पेण (जि.रायगड) फोन : ९१७५ २१६३७१

मार्क्स चे  युग
लाखो मुलांत सर्वाधिक  -पुष्कळदा शंभर टक्के  किंवा  त्याहून जास्तही -गुण मिळवणारा, काही दिवसांपुरता कोहिनूर हिरा ठरतो.  त्याचा सर्वत्र वारंवार किंवा जन्मभरही गौरव होतो. तो सुवर्ण पदक विजेता, त्याच्या कपाटात प्रमाणपत्रांची आणि पदकांची मैफल असते. पण पुढे सुवर्णपदकविजेत्यांचे काय होते? डॉक्टर झालेच तर त्यांचे प्रॅक्टिस बेताचे चालते. वकिली परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्याचा व्यवसाय तुनुमुनू चाललेला असतो. अशा माणसांचे निवाडेही चमकदार  नसतात. अुलट साधारण श्रेणीत आपली कारकिर्द अुरकणारे लोक फड मारून जातात.
कुठल्याही हापिसात पाहा. पाचपंचवीस कारकुने असतील तर त्यातले चार दोनजण मन लावून चांगले काम करत असतात, शिस्तीचे असतात. तेच लोक खाते चालवीत असतात; ते बहुधा गुणवान असतात. बाकीचे सारे पाट्या टाकणारेच. युनियनच्या दबावामुळे त्यांना काढून टाकता येत नाही म्हणून ते पगार खात असतात. वास्तविक कारकुनी करण्यासाठी फार काही मेरिट लागत नाही, पण तारतम्य, सामान्यज्ञान, आणि अेकूणातली व्यवहारी दृष्टी यांचाच विषय असतो.
कुणी ना कुणी अेखाद्या विषयात -मराठीतही -प्रथम आलेला असतो, पदवी मिळवतो. त्याचीही अपूर्वाआी असतेच. विद्यापीठाची चपटी झिरमिळी टोपी, काळा घोळदार डगला, आणि हातात प्रमाणपत्राची सुरळी असा फोटो घराघरांतून टांगलेला असतो. हे स्कॉलर बोलतात, लिहितात ते चमकदार असते, पण ज्याला साहित्य किंवा प्रतिभाविलास म्हणतात असा काही साक्षात्कार त्यांच्या लेखनात वा भाषणात नसतो. श्रेष्ठ ज्येष्ठ साहित्यिक म्हणून त्यांचा अूठसूट गौरव होत असतो, त्यांस पुरस्कार मिळत असतात, पुस्तके निघत असतात -म्हणजे `काढली' जातात. याअुलट कसदार कथा, काव्यमय कविता, नाट्यमय नाटक लिहिणाऱ्या मुलांची वर्गवारी लिंबूटिंबूत होते. असे चांगले लेखक मराठी घेअून परीक्षेला बसले तरी श्रेणीत येण्याची शक्यता कमीच. अुत्तम लेखकांपेक्षा साहित्यिक वर्तुळातही, खिडकीत टाचा अुंचावून डोकावणाऱ्या समीक्षकांचीच वट असते. अल्बर्ल्ट आआीन्स्टिन म्हणतो, बुध्दिमत्ता म्हणजे माहिती किंवा ज्ञान नव्हे; तर नवनवे शोधू शकणारी प्रतिभा. ती शास्त्रज्ञाची असेल, कलावंताची असेल!  प्रतिभावंतांचे प्रकटीकरण विपुल प्रमाणात होत राहील अशी व्यवस्था शिक्षणात असायला हवी. डोंबाऱ्याच्या पोरांनाही प्रशिक्षण देअून ऑलिंपिकसाठी जिमनॅस्टिक तयार करता येतील.
-म.वि. कोल्हटकर, जीनछाया सोसा. सातारा   फोन-(०२१६२) २३२५०४



Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन