Skip to main content

20 Nov. 2017

धर्म-अधर्म हे व्यवहार्य असावे

आपली उपनिषदे, त्यांचे सार असलेली ब्रह्मसूत्रे आणि गीता या तीन ग्रंथांना `प्रस्थान-त्रयी म्हणतात. मनुष्याला मोक्षाप्रत नेणारे अक्षरवाङ्मय म्हणून प्रस्थानत्रयी परंपरेने प्रतिष्ठित आहे. त्यात गीतेचा समावेश आहे म्हणून, तिचे विवरण व आकलन अध्यात्मप्रवणतेने करण्याचा अेक प्रघात आहे. तरीही गीतेचे पारलौकिकत्व मांडताना गीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय बाजूला ठेवता येत नाही. महाभारताच्या युध्दासाठी अर्जुनाला प्रवृत्त बनविणे हा गीतेचा उद्देश आहेच. युध्द म्हटले की हिंसा आली; मग हिंसेचे प्रतिपादन वगळून परमार्थपर गीता कशी स्वीकारायची? शिवाय युध्दाच्या पृष्ठभूमीवर गीतेसारख्या तत्वज्ञानपर प्रबंधाचे प्रयोजनच काय? गांधीजींची श्रध्दा गीतेवर होती, आणि ते तर अहिंसेचे उपासक. तथापि `गीतागत उपदेश मानवी मनोव्यापारातील सुष्ट आणि दुष्ट या उभय प्रवृत्ती- दरम्यानच्या द्वंद्वावर मात करण्याचा मार्ग दाखवितो' असे म्हणून सुटका करून घ्यावी लागते.
कृष्ण हा दैवी अवतार आहे हे गृहीत धरले जाते. गीतेच्या निर्मितीसाठी सांगितलेले निमित्त काहीवेळी अप्रस्तुत ठरविले जाते किंवा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कसेही असले तरी  गीतेच्या कथनाला निमित्त असणारा मुख्य घटक म्हणजे अर्जुनाला पडलेला प्रश्न, निखळ नैतिक स्वरूपाचा होता, त्या नैतिक पेचाला कृष्णाने दिलेलेे उत्तर म्हणजे गीता होय. ते वास्तव टिळकांनी अचूक जाणले होते. ते गीतेला नीतिशास्त्रावरील ग्रंथ म्हणून मानतात. अर्जुन भ्याड नव्हता, तो शूर योध्दा होता. मग युध्दभूमीवर तो संहाराच्या भीतीने संमोहग्रस्त कसा काय झाला?
त्यासाठी  विनोबांनी काल्पनिक कथा मांडली. अेक कमालीचा न्यायनिष्ठुर न्यायाधीश होता. नृशंस गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या आरोपींना प्रसंगी देहान्ताची शिक्षा सुनावण्यास हे न्यायाधीश कचरत नसत. त्यांच्यासमोर अेकदा त्यांच्या मुलाचाच खटला उभा राहिला. अेका हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेला त्यांचाच मुलगा पुराव्यानिशी दोषी ठरला. देहान्ताची शिक्षा सुनावण्याची वेळ आल्यावर या न्यायनिष्ठुर माणसातील बाप जागा होतो.  मुळात देहान्ताची शिक्षा ही व्यापक दृष्टिकोणातून मानवाला अनुचित, अनिष्ट कशी आहे वगैरे युक्तीवाद तो सुरू करतो. अर्जुनाची अवस्था त्या न्यायाधीशासारखी झाली असे विनोबांचे म्हणणे. महाभारताचा आणि त्या कथानकाच्या चौकटीतील अर्जुनाच्या प्रश्नाचा संदर्भ सोडला, तर मग सारी वैचारिक कसरत करावी लागते.
युध्द मुळातच खरोखर आवश्यक आहेच काय? -याविषयी त्याही काळात खूप ऊहापोह झालेले असावेत. कौरवांशी युध्द करावेच, याबद्दल पांडवांतही एकमत नव्हते. होता होईतो युध्द टाळावे असाच पवित्रा सारेजण घेत असतात. कृष्णशिष्टाईपर्यंतचे सारे प्रयत्न युध्द टाळावे यासाठीच होते.युध्द पार झाल्यानंतरसुध्दा उत्तंग नावाचे ऋषी, युध्द टाळण्यात अपयश आल्याबद्दल कृष्णाला खडसावून जाब विचारतात. युध्दासाठी रणभूमीवर आलेले सारेजण स्वकीय आहेत हे पाहिल्यानंतर अर्जुनाला नैतिक पेच पडतो, त्याचे अुत्तर समर्थपणे देणारा मुत्सद्दी म्हणून महाभारतात कृष्ण दिसतो. नीतिशास्त्राची उत्तम जाण त्याला होतीच, पण स्वत:च्या जीवनातही त्याने नीतीचाच अवलंब केला होता. महाभारतात कृष्णाची ती दोन रूपे आहेत. पण महाभारतात श्रीकृष्णचरित्र परिपूर्ण आलेले नाही.
द्रौपदी स्वयंवराच्या प्रसंगाने महाभारतात कृष्ण येतो, तो स्पर्धक म्हणून आलेला नव्हता तर अेक निमंत्रित होता. तत्कालीन आर्यावर्तातील एका प्रबळ, समर्थ अशा यादव साम्राज्याचा मुत्सद्दी सूत्रधार म्हणून तोवर कृष्ण प्रतिष्ठा पावलेला होता. द्रौपदीचा पण जिंकून अर्जुनाला ती मिळणार म्हटल्यावर `ब्राह्मणकुमाराने क्षात्रकन्या जिंकणे हेच आम्हास मान्य नाही' असा पवित्रा घेऊन क्षत्रियांनी संघर्षाची वेळ आणली. त्यावेळी कृष्ण सरसावला, आणि ती अधर्माने नव्हे तर धर्माने जिंकलेली  - `धर्मजिता' आहे, असा निर्वाळा दिला. म्हणजे तो धर्माचा प्रवक्ता, उद्गाता, विवेचक या नात्यानेच प्रकटतो. धर्म म्हणजे काय, अधर्म कशाला म्हणायचे याची चिकित्सा करत, सतत धर्माचीच पाठराखण करणारा तो राजकीय मुत्सद्दी आहे.
धर्माधर्माचा चिकित्सक भाष्यकार हे त्याचे एक रूप आहे, तर  प्रगल्भ नीतिवेत्ता हे त्याचे दुसरे रूप आहे. महाभारतात तसे अनेक नीतीतत्ववेत्ते आहेत. भीष्म, विदुर, कणिक, उध्दव. त्यातील अधिकांश तर कृष्णाचे भक्त  आहेत. आध्यात्मिक श्रेष्ठत्व आणि राजनीतीपटुत्व या दृष्टींनी कृष्णाचे कर्तृत्व, अलौकिक दिसते. कृष्णाच्या राजनीतीचा आध्यात्मिक गाभा क्षेमेंद्राने उलगडून दाखविला. क्षेमेंद्र हा प्रतिभासंपन्न महाकवी, काश्मिरवासी  पंडित  होता. तो  ११व्या शतकात होऊन गेला. त्याने कृष्णाच्या राजनीतीचे दोन पैलू सांगितले. सूक्ष्मादृष्टी, म्हणजे कोणत्याही विषयाची सूक्ष्म, सांगोपांग चिकित्सा करण्याची क्षमता. आणि अमलाप्रज्ञा, म्हणजे स्वहित संपादनाबरोबरच परहिताचे संरक्षण करण्याबाबत कुशलदक्ष असणारी बुध्दिमत्ता! या दोनही गुणांचा प्रत्यय कृष्णाच्या नीतीमध्ये येत राहातो, असे क्षेमेंद्राने म्हटले.
धर्म हे लोकव्यवहाराचेच अेक अंग आहे. धर्माचरणात सर्वसाधारण संकेत व नियम यांचे प्रसंगानुरूप विश्लेषण करून नियमांना असणाऱ्या अपवादांचाही पुरस्कार तारतम्याने करण्याचे बुद्धिकौशल्य म्हणजे सूक्ष्मदृष्टी. सत्य बोलावे हा धर्म आहे. पण त्या धर्मनियमास अपवादाने कधी बगल द्यायची हे कळले तर तेही धर्माचरण व सत्यपालन ठरते. `नरो वा कुंजरो वा' असे युधिष्ठिराला म्हणायला लावणारा, किंवा `तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म?' असे खडसावणारा कृष्ण, म्हणूनच धर्मनीतीचा पुरस्कर्ता ठरतो. प्रत्येक प्रसंगात केवळ आपल्या आणि आपल्याच हिताचे पाहात  न  बसता व्यवहारात त्याची सांगड घालण्याची भूमिका म्हणजे अमला-प्रज्ञा. कौरव राजसभेतील शिष्टाआी हे त्याचे उदाहरण.
धर्माचे पांघरूण ओढून शहाजोगपणे वावरणाऱ्या अधर्माचा सूक्ष्मादृष्टीने बीमोड करणारा धुरंधर राजनीतिज्ञ आणि धर्मवेत्ता हीच श्रीकृष्णाची महाभारतातील प्रतिमा आहे. या गुणसमुच्चयामुळेच, समोर अुभ्या असलेल्या स्वजनांवर शस्त्र कसे उचलायचे; असल्या संभ्रमाला `माझे अनुसरण करून युध्दच कर (मामनुस्मरयुद्ध्यच)' असे तो अर्जुनाला सांगू शकला. कृष्णाने त्याच्या जीवनात धर्माच्या प्रतिपालनासाठी स्वजनांवर शस्त्र उचलले होतेच. कंस हा त्याचा मामा होता.
त्याच्या जीवनातील नीतीचे उपयोजन म्हणजे त्याने स्वत:च्या निर्वाणापूर्वी यादवकुळाचा नाश घडवून आणला. युध्दानंतर यादवांना कोणी प्रतिस्पर्धीच नव्हता. युध्दातही त्यांनी कौरव पांडवांची स्पष्ट बाजू न घेता हात राखूनच भाग घेतला, त्यामुळे त्यांची ताकद शाबूत होती; बाकीची राज्येसाम्राज्ये क्षीण झाली होती. यादवच प्रबळ म्हणून उरले होते. बळाचा मद वृत्तीत भिनल्यामुळे थिल्लर व पोरकट कृत्यांतून यादवांनी स्वत:वर संकट ओढवून घेतले आणि आपसात लढून लयाला गेले. जे त्यात वाचले तेही डोआीजड बनले तर समाजव्यवहाराला अुत्पातक  ठरतील, हे ओळखून कृष्णाने अुरल्यासुरल्या यादवांना  संपविले.
स्वजनांवरही शस्त्र अुचलण्यास सांगणारी गीता हेच आपले न्यायनीतीचे शास्त्र आणि तेच व्यावहारिक अध्यात्म म्हणून आचरणीय आणि पूजनीयही ठरते.


संपादकीय
व्यवहारी धर्माचरण
भारत हे हिंदू राष्ट्न् आहे की नाही या मुद्द्यावर अनेक विचारवंतांची अनेक आंदोलने चालू असतात. मुळात हिंदू हा शब्द कसा आला इथपासून त्या वादांची सुरुवात होते आणि सामाजिक अराजक माजविण्यासाठी त्यांस अनेक फाटे फुटत राहतात. ज्यांना आपल्या हिंदुत्वाबद्दल आत्यंतिक श्रद्धा असते किंवा आत्यंतिक दुरावा असतो त्या दोहोंच्या हेतूंबद्दल अेकवेळ  सन्मानाने  किंवा परमतसहिष्णुतेने बोलता येआील; परंतु हिंदुत्व म्हणजे नेमके काय, धर्म म्हणजे तरी नेमके काय हे फारसे खोलात जाअून  न  शेाधता, किंवा शोधून  न  कळता; -परंपरेने अनेकजण स्वत: धर्म पाळतो असे मानतात. त्या श्रध्देवर त्यांचा सारा जीवनक्रम पार होतो. त्याअुलट तसल्या कर्मकांडी धर्माला मनापासून विरोध करणारी माणसे, तेवढा धर्मविरोध करत राहणे हेच आपल्या जीवनाचे सारसर्वस्व असल्याचे मानून आयुष्याची आितिकर्तव्यता ठरवितात.

त्या दोन्हींच्या गदारोळात ज्यासाठी धर्म पाळायचा किंवा धर्मनिरपेक्षता जपायची ते मूळ हेतू फार दूर निघून जातात आणि आजच्या भारताप्रमाणे धार्मिक अराजकता माजते. त्यामुळे साऱ्या राष्ट्नचे, संस्कृतीचे, पुढच्या पिढ्यांचे नुकसान होते. देशात दुही माजते, आणि आपोआपच त्या समाजाची अधोगती सुरू होते. धर्माचरणाच्या अंधश्रध्दा बनतात तशा अधर्माच्याही अंधश्रध्दा बनतात; आितकेच नाही तर धर्मनिरपेक्षता नावाच्या गोलंकार समजुतीच्याही अंधश्रद्धा बनतात. फार कशाला, अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळही अेक अंधश्रध्दाच बनून काहीजणांचे ते कर्मकांड होअून बसते.

काहीही करून समाजाचे अेकसंधत्व आणि धार्मिक विश्वासार्हता नाहीशी व्हावी हा अेक विरुद्ध बाजूचा राजकीय डावपेच असतो. साडेतीनशे वर्षांपूर्वी अशी अेक घटना झाली, तिचा याच अंगाने विचार करायला हवा. शिवाजीराजांवर अफजलखानाने स्वारी केली ती सपशेल परतवून प्रतापगडावर खानाचा राजानी नि:पात केला तो दिवस होता मार्गशीर्ष शुध्द ७, तारीख १० नोव्हेंबर (१६५९). साडेतीनशे वर्षांपूर्वीची ही मोहीम अनेक अंगांनी अुल्लेखिली जाते, पण त्याला दोन धर्मांचे वैर, आणि त्यात हिंदू धर्माचा विजय;  अेवढ्याच विचाराने लक्षात घेतले तर अफजलखानाची मोहीम त्याच्याच बाजूने फत्ते झाली आणि शिवाजी राजांच्या तत्वाचा पराभव झाला असे म्हटले पाहिजे.

केवळ हिंदू-मुसलमानांचा किंवा मराठा ब्राह्मणांपुरताही विचार त्या घटनेचा  करता कामा नाही. शिवाजीराजा मराठा होता, तसे कित्येक जन्मजात खानदानी मराठा सरदार  अफजलखानाच्या बाजूने होतेे. अफजलखानाला जावलीच्या खोऱ्यात आणि प्रतापगडाशी राजांच्या टप्प्यात आणून अुभे करण्याचे महत्कार्य करणारे पंताजी गोपीनाथ हे ब्राह्मण होते, तसा खानाचा वकील कृष्णाजी भास्क र हाही ब्राह्मण होता; आितकेच नाही तर ऐन मोक्यावर त्याने राजांवर वार काढला होता हेही लक्षात घ्यायचे. खानाने वाटेवरची देवळे फोडली, मूर्ती भ्रष्ट केल्या हेे केवळ हिंदुत्वाचा द्वेष म्हणून नाही; तर त्यांतून शिवाजी राजे आणि या मुलखातली धर्माचरणी संस्कृती यांच्यावरचा विश्वास त्याला डळमळीत करायचा होता. तो तसा झाला तर पुढची लढाआी सोपी होते. या विधानाच्या पुष्टीसाठी पुराणकाळापासून कालपरवापर्यंत -अगदी  या क्षणापर्यंत अनेक अुदाहरणे देता येतील.

मुळात शिवाजीराजांची महाराष्ट्नतली चळवळ विजापूरकर बादशहाच्या लेखी फार मोठी नव्हतीच. त्याच्या पदरीच असलेल्या शहाजीसारख्या  अेका सरदाराच्या पोराने चालविलेली ती पुंडाई होती. राजानी त्या वेळेपर्यंत जे काही छोटेमोठे पराक्रम केले होते, त्यांचे महत्व बादशहाला राजकीय दृष्ट्या फार नव्हते. मग ती पुंडाआी रोखण्यासाठी दरबारातला अेक जबरदस्त मोहरा साऱ्या ताकतीनिशी कामी लावण्याचे कारण काय होते?     शिवाजीराजांचा पराभव हे त्याच्यासमोर फार मोठे काम नव्हते; शिवाजीकडे जायचे आणि त्यास  चुटकीसरशी धरून आणायचे हे तर खानाने अनेकदा बोलून दाखविले होते; त्याच्या सैन्यातही तीच भावना होती. तो अतिआत्मविश्वास (ओव्हर कॉन्फिडन्स) ठरला हे नंतर सिध्द झाले. पण मुद्दा असा की शिवाजीराजाचा राजकीय पराभव हे खानाच्या दृष्टीने फार मोठे कामच नव्हते.

त्याचे मोठे काम होते ते तो वाटेत करतच पुढे आला होता. देवळे भ्रष्ट करण्यापेक्षा या देशातल्या गावगाड्यातल्या संस्कृतीचा, परंपरेचा, कर्मण्यवादाचा, सहकाराचा, समन्वयाचा, परस्पर विश्वासाचा नाश करणे आणि त्याजागी आपली राज्यकर्ता म्हणून दहशत बसविणे हे त्याचे खरे काम होते. कोणत्याही संकटात आीश्वराला  किंवा आिथल्या परंपरागत ग्रामव्यवस्थेला शरण जाण्याऐवजी  इथला माणूस आपल्या सत्तेला कान पकडून शरण आला पाहिजे हा राजकीय हेतू त्यात होता. त्याअुलट राजांनीही अशा धार्मिक संस्कारांचाच आश्रय घेअून लोकांना प्रेरक शक्ती दिली. स्वप्नात देवीने साक्षात्कार दिला, आणि तलवार दिली. किंवा `मी तुझी तलवार होऊन राहिले' असे देवीने सांगितले. यावर त्या काळातील श्रध्दाळू लोकांचा सहज विश्वास बसला. त्या काळी आजचे कोणी पुरेागामी कार्यरत नसावेत,-अन्यथा राजांची ही बुवाबाजी ठरवून मोकळे झाले असते. यात दोन्ही बाजू स्पष्टपणे राजकीय हेतूंनी त्या काळच्या लोकभावनांचा मुत्सद्देगिरीतून आधार घेत होत्या. शिवाजी राजांनी येथे नीतीचे धर्माचे राज्य स्थापन केले, ते महत्वाचे; त्यांनी हिंदुत्व वाढविले, की अफजलखान हाच सच्चा मुस्लिम होता, हा वाद आजच्या काळात तरी आपल्या थोर विचारवंतांसाठी सोडून द्यावा.

मार्गशीर्ष शुध्द ११ हा गीताजयंतीचा दिवस जवळच आहे. महाभारताचे युध्द कौरव पांडवांच्या राजकीय सत्तेसाठी होते हे तर खरेच. पण त्याच्या प्रारंभीच अर्जुनाचा जो संभ्रम झाला तो चुकीचा तर नव्हता. दोन्ही बाजूंची ताकत महाप्रचंड वाढलेली होती, त्यामुळे महासंहार होणार हे तर स्पष्टच दिसत होते. मग ते युध्द जिंकल्यावर मागे अुरणाऱ्या विधवा स्त्रियांच्या प्रजेचे राज्य मिळवून करू काय; हा त्याचा प्रश्नही भेदकच होता. पण त्याला समजावून सांगताना श्रीकृष्णाने म्हटले असणार की, हे युध्द तुझ्या राज्यप्राप्तीसाठी आहे असे तू कशाला समजतोस? हे युध्द सत्य म्हणजे असत्य, नीती अनीती, कपट आणि सदाचरण, यांच्यातील झगडा आहे असे समज. कौरवांनी आयुष्यभर अन्याय अव्यवहार केला, अकर्म केले... म्हणजेच अधर्म केला, त्याविरुध्द न्याय नीतीचा -धर्माचरणाचा हा संघर्ष आहे. त्यात `सत्याचा, धर्माचाच जय होतो' हे तत्व प्रस्थापित करण्यासाठी तुला लढावेच लागेल. ते तुझे धर्मकर्तव्य आहे. जर तू शस्त्र खाली टाकून लढाआी नाकारलीस तर या जगात कौरवधर्माचा विजय होतो असे मानले जाआील. अधर्म माजेल. मानवाची चिरंतन मूल्येच पराभूत होतील. तसे  न  होता, तुला -म्हणजे सामान्य मानवी न्यायधर्माला कितीही आणि कसाही संघर्ष करावा लागला तरी अंती त्याचाच जय होतो हे सत्य रुजविण्यासाठी हे युध्द करावे लागेल. आणि ते त्या त्या प्रसंगानुसार  युध्दधर्मानेच जिंकावे लागेल. अर्जुनाला ते पटले.

काश्मिरमध्ये अतिरेक्यांनी चालविलेला हैदोस त्याच भावनेतून चालू आहे. नक्षलवाद्यांची अरेरावी त्याचाच नमुना आहे. या लोकांना भारताशी युध्द करण्याची शक्ती नाही हे त्यांनाही कळते. लढाआीच पेटली तर त्यांचा दम किती टिकेल हे सारे जाणतात. पण काश्मिरातील बायकापोरे सुरक्षित नाहीत आणि आम्ही म्हणू तशी ती वाकतात हा संदेश लोकांत नागरिकांत पसरणे हा त्यांचा हेतू असतो. म्हणून त्यांचा दहशतवाद `त्याच' प्रकारे नष्ट करायचा हे जरी खरे असले तरी, आपल्या लोकांत त्यांच्या विरोधांत लढण्याची जिद्द आणि आपल्या व्यवस्थांबद्दलचा विश्वास निर्माण करणे हेही फार महत्वाचे असते. गांधीजीनी मूठभर मीठ उचलले, ते धाडस सार्वत्रिक झाले, त्यामुळे इंग्रज साम्राज्याचा पाया खचला. आपल्या राष्ट्नीय दुर्दैवाने कौरवांचा किंवा  खानाचा विजय झालाच असता तर लोकांच्यात जी भावना पसरली असती, ती आपण कशी काढणार होतो? त्यांना केवळ धार्मिक पुराणांची वांगी ठरवून पुरोगामी म्हणून स्वत:च्या  अंधश्रध्दा वाजवत फिरण्याचा अुपयोग होता काय? लोक खचून गेले असते, आणि मुकाट्याने खानाला सामील झाले असते. त्याअैवजी खानाच्या मोहिमेनंतर हे छोट्या आकाराचे का असेना, पण स्वराज्य निर्माण झाले. त्या फत्तेची फळे आज समानतेच्या, आदर्श राज्यव्यवहार-तत्वांच्या रूपात आपण जाणू लागलो आहोत. अेक म्लेंच्छसंहार झाला असे नव्हे तर  दुष्ट हेतूंचा अेक राजकारणी राजांनी मारला, म्हणून या श्रींच्या राज्याचे बळ वाढले.अफजलखानाचा नव्हे तर त्या अमानुष अधर्माचा कोथळा बाहेर काढला गेला, त्यातून आजच्या राजधर्माला खूप शिकता येईल.

एका प्रकाशदात्याची कथा

आिचलकरंजी हे वस्त्रांचे माहेघर म्हणून प्रसिध्द आहे. तिथले दाते कुटुंब त्याच व्यवसायात, खाऊन पिऊन सुखी संपन्न. त्यांच्यातले प्रकाश दाते हे काही काळ नोकरी करून नंतर आपल्या व्यवसायात स्थिर झाले होते. त्यांचा संसार अंमळ उशीराने पण चारचौघांसारखा सुरू झाला. आैंध संस्थानातील कोरेगावच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला आणि शारदा दाते या प्रकाशरावांच्या जीवनात आल्या. बरीच वाट पाहायला लावून त्यांना पहिला मुलगा झाला, तो प्रथमेश.
हा मुलगा जन्मत: डाऊन सिंड्नेम चा, मतिमंद- लोळागोळा!! बाळाचा चेहरा मंगोल वंशी, अपुरे वजन, डोळे व तोंडाच्या जागी नुसत्या रेघा.... प्रत्येक अवयवात दोष, जगण्याची आशा तितपतच.
डॉक्टरांनी कल्पना दिल्यावर काही काळचे खचलेपण दूर करून या दंपतीने या संधीप्रकाशातून वाट शेाधली. प्रकाशरावांचे वय ४२ आणि शारदाबाआींचे ३८. यापुढच्या आयुष्याची दिशा त्यांनी ठरवून घेतली. खरी परीक्षा होती, पण त्यांचा निश्चय असा की, `परमेश्वराने अेक खास जबाबदारी देऊन हेे मूल आपल्याकडे पाठविले आहे. आपण त्याची काळजी घेऊ, ही `त्याला' खात्री आहे. परमेश्वराचा तो विश्वास खरा ठरविणे हेच कर्तव्य.त्या निष्पाप जीवाचाही विश्वास तोडायचा नाही. कळत्याला चकविता येआील; पण  न  कळत्याला फसविणे मोठे पाप! आता `प्रथम ईश' घडविण्यासाठी कणकण झिजवू.'
हा मुलगा जन्मला त्यास २९ नोव्हेंबर ला तीस वर्षे होतात. हा प्रथमेश आता सर्वार्थाने समर्थ पायावर अुभा असून देश विदेशांत जाऊन विविध पुरस्कारांचा विजेता `सेलिब्रेटी' झाला आहे. त्या प्रवासाची कथा पुस्तकरूपाने प्रकाशित झाली आहे. प्रथमेशचे प्रकाशदाते म्हणजे त्याचे वडील प्रकाश  दाते, आणि आआी शारदा यांच्या विलक्षण प्रयत्नांची ही कथा प्रा.सचिन कानिटकरांनी शब्दबध्द  केली आहे. कानिटकर हे चांगले वक्ते असल्यामुळे, पुस्तक वाचताना त्या कथेचे श्रवण केल्याचाच आनंद मिळतो इतके ते सुलभ शैलीत आहे.
३० नोव्हेंबर या प्रथमेशच्या वाढदिवशी त्याचे अभीष्टचिंतन करून, मनमंदीने ग्रासलेल्यांना त्याच्या कथेतून संजीवनी मिळेल अशी अपेक्षा आहे.
कथा `घडविणाऱ्या हातां'ची पुस्तकातील हे अेक प्रकरण -
अेकदा प्रथमेशच्या आआीने प्रथमेशबरोबर शेजाऱ्यांकडे निरोप पाठविला. प्रथमेशने त्याच्या त्या बोबड्या अडखळत्या वाणीने शेजारी जाअून तो सांगितला. तर शेजाऱ्यांनी त्याच्या तोंडावर त्याच्या सांगण्याची नक्कल करत मुलांबाळांसह सहकुटुंब हसण्याचा आनंद घेतला. हे समजताच प्रथमेशच्या आआीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी त्या शेजाऱ्यांना स्पष्टपणे बजावले की, `नक्कल काय करता... अशा मुलाचे पालकत्व प्रत्येकाने घेतले पाहिजे. याचे मनोबल वाढविले पाहिजे.' पण किती जणांच्या तोंडाला लागणार हाही प्रश्नच होता.
प्रथमेशचे तळपाय चपटे आहेत. त्याला आपल्या पायाला असते तशी खडाव म्हणतात तशी -कमानदार पोकळी नाही. त्यामुळे त्याला कवायत प्रकार वगैरे यायचे नाहीत. त्यांतच पुन्हा स्नायूंचे दौर्बल्य तर होतेच... पण हे काही लक्षात  न  आल्याने कवायतीच्या शिक्षकानी प्रथमेश कवायत नीट करत नाही म्हणून त्याला अगदी वळ अुठेस्तोवर मारले... झाले!... प्रकाशरावांना हा प्रकार समजताच ते शाळेत गेले आणि त्यांनी त्या शिक्षकाना प्रथमेशच्या मर्यादा समजावून सांगितल्या. ते म्हणाले, ``मारून होत असतं तर आम्ही त्याला घरातच मारून शिकवून आिथं आणलं असतं... त्याला ते येणार नाही... तो हळू हळू जमेल तसे करेल.... सांभाळून घ्या.' अशा प्रत्येक प्रसंगी अेक प्रश्न होताच की, अशा मुलाला मग सर्वसाधारण सुदृढ मुलांच्या शाळेत घातलेच का?'
यावर मान खाली घालत `सांभाळून घ्या', `समजून घ्या' या विनवण्याखेरीज हाती काही राहात नव्हते.... आणि ज्याला ताठ मान म्हणजे काय, स्वाभिमान म्हणजे काय हे माहीत होते; त्याची ओढही होती अशा माणसाला, या मान खाली घालण्यात काय यातना होत असाव्यात याची कल्पना फक्त स्वाभिमानीच करू शकतो... पण आिथे परमेश्वराने दुसरा इलाजच ठेवला नव्हता. उंच शिखर गाठायचे असेल तर मान खाली घालूनच पर्वत चढायचा असतो. फक्त शेवटपर्यंत जाण्याची जिद्द हवी आणि ती प्रकाशराव आणि शारदावहिनींकडे होती. त्यांनी हे शिखर गाठायचेच ठरविले होते, आणि म्हणून त्यासाठी त्यांनी आरंभली अेक अभिनव प्रयोगमालिका... जिच्यातून शिकावे तेवढे थोडे असे जग म्हणणार होते...

प्रथमेश पाचवीतून सहावीत...सातवीत पुढे सरकत होता. प्रकाशरावांनी त्याचे शिक्षण व्यवस्थित व्हावे म्हणन प्रयत्नांत कसर सोडली नाही. घरात फळा खडू सारे आणले. त्याच्याबरोबरची दोन मुले घरी ठेवून घेतली. फळयावर प्रश्न लिहायचे व या मुलांनी उत्तरे लिहायची हे सुरू झाले. प्रथमेशला त्याच्या चुका कळाव्यात हा त्यामागचा उद्देश. त्याचबरोबर त्यांनी प्रथमेशसाठी खाजगी शिकवणी लावली. त्याला शिकवणाऱ्यांनी प्रथमेशला वैतागून शिकवणी सोडू नये, म्हणून आणखी दोन तीन मुलांना त्या शिकवणीत भरती करून घेतले. त्या मुलांची फी प्रकाशरावच भरू लागले. प्रकाशरावांची दृष्टी स्पष्ट अन् स्वच्छ. त्यांनी शिक्षिकेला सांगितले, `तुम्ही मन लावून शिकवा, रिझल्ट ओरिअेंटेड नको. शेवटी त्याला काय आले-किती आले हे मी विचारणार नाही. तो काय शिकू शकतो हे मला बघायचे आहे.' याच खडखडीत विचारसरणीमुळे प्रकाशराव निर्धाराने पावले टाकत होते व प्रथमेश त्यांचे बोट धरून बिनधास्त चालला होता.
 हे पुस्तक, आणि त्या विषयातील शंका वा माहिती यांकरिता संपर्क-  प्रकाश गणेश दाते
दाते वाडा, ३/७१३ गावभाग, आिचलकरंजी - ४१६ ११५
              फोन (०२३०)२४३२५९४,  २४२५३०९.   सेल : ९८९०१८७८८३,  ⇑🌙

धरी गर्दभाचे पाय
कोकणातील गरीबीला कंटाळून अनेक ब्राह्मण कुटुंबे १८व्या शतकात देशावर आली. पेशवाआी मुलुख, कोल्हापूर-सातारकर छत्रपती तसेच मिरज सांगली वगैरे संस्थानांतून त्यांना जिथे नोकऱ्या मिळत गेल्या तिथे  ती मंडळी स्थायिक झाली. रत्नागिरीजवळ सोमेश्वर या खेडेगावातून आमचे पूर्वज रघुनाथ केळकर  हे साताऱ्याजवळ वाआी गावी येऊन स्थिरावले. त्यांच्या मागोमाग बरीच केळकर कुटुंबे वाआीत आली, वाआीला `केळकर गल्ली' तयार झाली.
रघुनाथ केळकर यांचा मुलगा बाळकोबा हा सातारकर छत्रपतींकडे खाजगीत गुप्तहेर म्हणून होता. या बाळकोबांची मुलगी मनुताआी सोलापूर जिल्ह्यातील निमगाव (टेंभुर्णी) येथील मराठेे सावकारांकडे दिली होती. या मुलीने आपला भाअू सिध्देश्वर उर्फ सिधोपंत यास आपल्या गावी बोलावून घेतले; निमगावला सिधोपंत बहिणीच्या शेजारीच जागा घेअून राहू लागले. जवळच्या पिंपळनेरच्या भिडे कुटुंबातील मुलगी त्यांची पत्नी झाली. सिधोपंतानी निमगावी शेती घेतली, तिथे त्यांचे वंशज आज चौथ्या पिढीतील आहेत. या सिधोपंतांची अेक मुलगी पुण्यात देवधरांकडे दिली होती, ते देवधर डेक्कन कॉलेजात प्रोफेसर होते, ते डेक्कन जिमखान्यावर राहात. सिधोपंत अधून मधून पुण्याला या लेकीकडे -देवधरांकडे येऊन राहात.
सिधोपंत हे अत्यंत धार्मिक श्रध्दाळू वृत्तीचे होते. पंढरपूर भागातील वास्तव्य असल्यामुळे ते रोज हरिपाठ म्हणत, ज्ञानेश्वरीचे दोन तीन अध्याय वाचल्याशिवाय अन्नग्रहण करीत नसत. पंढरीच्या विठूरायावर त्यांची अपार श्रध्दा होती. निमगाव ते पंढरपूर हे अंतर सुमारे ३० किमी; दर अेकादशीची वारी ते पायी करीत.
अेकदा ते पुण्याला जावआी देवधरांकडे आले होते. नित्याप्रमाणे हरिपाठ म्हणून झाल्यावर ते ज्ञानेश्वरी वाचायला बसले. तसे त्यांचे शिक्षण केवळ लिहिण्या वाचण्यापुरतेच होते. पण ज्ञानेश्वरी तर वाचायचीच! मनात खंत असायची की, ज्ञानेश्वरीची भाषा क्लिष्ट आहे, अर्थ समजत नाही. त्याही दिवशी वाचताना ती बेचैनी होतीच. अेका खोलीत बसून त्यांचे वाचन चालू होते, त्यावेळी पलीकडच्या दिवाणखान्यात देवधरांची काही मित्रमंडळी पत्त्याचा ब्रिज डाव खेळत होती. ज्ञानेश्वरीचे वाचन चालू असताना अेकाअेकी काय झाले ते सिधोपंतांनाही कळले नाही, पण ज्ञानेश्वरीतल्या त्या त्या ओवीचा अर्थ त्यांच्या डोळयापुढे अुलगडू लागला. अत्यानंदाने ते मोठमोठ्याने वाचू लागले. अर्थबोध होत निघाला तशी त्यांच्या डोळयांतून अश्रूधारा वाहू लागल्या. वाचन खणखणीत आवाजात बाहेरच्या खोलीत अैकू येऊ लागले.
मित्रांनी चौकशी केली, तर आपले सासरे वाचन करीत असल्याचे देवधरांनी सांगितले. `चला पाहून तर येऊ' -असे म्हणत मित्रांनी खोलीत पाहिले, तर सिधोपंत अुत्फुल्ल मुद्रेने अश्रूधारा वाहात, वाचनात तल्लीन झालेले दिसले. मित्रमंडळही अवाक् झाले होतेच. पंतांचे वाचन संपल्यावर त्यांनी पोथी मस्तकी लावून ती बासनात गुंडाळून ठेवली. साहजिकच मित्रांनी बोलणे सुरू केले. अेकानी प्राध्यापकी ढंगात विचारले, ``आजोबा, तुम्ही इतक्या मनापासून भक्ती करता, तो देव असतो तरी कसा? तुम्ही त्याला कधी पाहिलात तरी का?'' या आजोबांनी ठासून `हो' म्हटले. काही मित्र लगेच विवेकानंदांच्या आवेशात म्हणाले, `` -तर मग आम्हाला तो देव तुम्ही दाखवू शकता काय?''
दार उघडून सिधोपंत बाहेर आले, आणि त्या `जिज्ञासूं'ना म्हणाले, ``चला ना, लगेचच दाखवितो देव!'' सर्वजण बाहेर आले. दारासमोरच अेक गाढव उभे होते. सिधोपंत गाढवाच्या जवळ गेले आणि त्यास नमस्कार करत म्हणाले, `` हा काय देव! याच्या पाया पडा. तुम्ही विद्वान मंडळी आहात, मी गावातला अशिक्षित माणूस. तुम्हाला माहीत नाही का, की साऱ्या प्राणिमात्रांच्या ठायी देव आहे. इतकेच नाही तर जळी स्थळी काष्ठी पाषाणी तो व्यापलेला आहे, हेही तुम्हास ठाऊक असेल. मला ते आत्ता कळू लागले आहे.''

      -श्रीकृष्ण मा.केळकर, पुणे ३८. फोन : ८४४ ६९० ५५१७

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन