Skip to main content

7 march 2016

कूळकायद्याचे तीन तेरा
महाराष्ट्नत १९५६ साली कूळकायदा लागू झाला. हा कूळकायदा येणार म्हणून जमीन मालकांनी काही कायदेशीर फेरफार करून, जमीनीच्या वाटण्या करून, कूळकायद्यापासून बचाव केला, पण ज्यांनी असे केले नाही, कुळांनी दिलेल्या शब्दावर विसंबून राहून त्याच्याकडून नोकरनामा लिहून घेऊन भरवश्यावर राहिले, ते तिथेच फसले. कारण ती जुन्या वळणाची माणसं, शब्द दिल्यावर विश्वास ठेवणारी! जे कूळ त्यांच्या वाडवडिलांपासून जमीन कसत होते त्यांनी शब्द दिला.पण त्या कुळास आजूबाजूच्या जमीन मालकांनी फिरवले, त्यांना पुढाऱ्यांनी सांगितले की `सरकार तुमच्याकरता कायदे करीत असताना तुम्ही त्याचा फायदा घ्या.' त्यांनी दिलेला शब्द फिरवण्यास वारंवार सांगून भाग पाडले. मग कुळे कायदेशीर जमीनमालक झाली. कित्येक  मूळ मालकांनी त्यावेळी साठी गाठली होती. हातची जमीन गेली याचा धक्का बसून काही विकलांग झाले, काही मालक खलास झाले. त्यावेळची त्यांची स्थिती फार हलाखीची होती. घरात धान्य नाही, आयुष्य शेतीवर अवलंबून असल्यामुळे नोकरी केली नाही, त्यांना कोर्टात जाणेसुद्धा जमले नाही!
इकडे कुळे मालक झाली. एकदोन वर्षे कशीतरी शेती केली. पुढे बी बियाणे, जमीन नांगरणे, व पीक घेणे त्यांना जमेना. त्यांना शेजारच्या ताकतवान जमीनदाराची मदत घ्यावी लागली. त्या सबळ जमीन मालकानी बैलजोडी दिली, बियाणे दिले, व पैसे दिले, पण पुढे मदतीची परतफेड मागू लागले. ह्यात शेतकरी फसला. कर्जबाजारी झाला व शेवटी बाजूच्या मोठ्या जमीनदारांनी जमीनींचा कब्जा घेतला. आपल्याच शेतात ही कुळे बाजूच्या सबळ जमीनदाराचे नोकर म्हणून काम करू लागली. नंतर जमिनीचे पैसे घेऊन कुळे जमीनदाराच्या जमिनीत मजूर म्हणून राहू लागलीे.
हा व्यवहार बेकायदेशीर असल्याकारणाने ज्यांनी सातबाराच्या उताऱ्यावर आपली नावे लावली, ती कायदेशीर होत नव्हती. त्यामुळे जमीनदार अडकले होते अशी प्रकरणे कोर्टात होती. त्याचा निकाल लागत नव्हता. शेवटी भाजप-शिवसेना सरकारनी कायद्यात बदल करून जमिनीचे कायदेशीर हस्तांतरण करून नव्या मालकांच्या नावावर जमिनी केल्या. वास्तविक हा कायदा करण्याअगोदर सरकारनी मूळ जमीन मालकास आपण अशी जमीन खरेदी करण्यास तयार आहात का, अशी विचारणा करणे जरूरीचे होते. पण त्यांनी तसे केले नाही कारण सरकारला मूळ जमीन मालकासाठी काही देणेघेणे नव्हते! मूळ मालकास जर विचारले असते तर झालेला व्यवहार हा बेकायदेशीर आहे म्हणून जमिनी मूळ मालकास परत कराव्या लागल्या असत्या. पण कुळाच्या जमिनी हडप केलेले जमीनदार मनगटात शक्ती व दरबारी वट असलेले होते. उलट मूळ जमीनदार कमजोर होते. ही परिस्थिती पश्चिम महाराष्ट्नची होती.
ज्या कुळांनी आपल्या जमिनीचे जरी तुकडे झाले तरी दोन-तीन एकर जमीन कसली व मिळकतीचे साधन म्हणून साखर कारखान्यात, दूध डेअऱ्यांमध्ये किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये, पतसंस्थेत नोकऱ्या करून आपले संसार केले. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्नत शेतकऱ्यांना आत्महत्त्या करण्याची वेळ आली नाही. छोटे शेतकरी व इतर दुर्बळ लोकांस पोटापुरता रोजगार देणाऱ्या संस्था, पश्चिम महाराष्ट्नतील पुढाऱ्यांनी काढल्या हे तरी मान्य करावे लागते.
मराठवाड्यात व विदर्भात शेतकरी आत्महत्त्या  करू लागले त्यावेळी या पुढाऱ्यांच्या संस्थात्मक कामांची थोरवी कळाली.
त्याच्यामुळेच पश्चिम महाराष्ट्नत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत. उलट मराठवाड्यात व विदर्भात कोणताही तसा पुढारी निर्माण झाला नाही, ज्यानी रोजगार उपलब्ध करून दिले. मी विदर्भात बऱ्याच खेड्यांत ६० वर्षांपूर्वीही फिरलो आहे. तेथील त्यावेळचे शेतकरी पाहिले आहेत. पाटील, देशमुख यांच्याकडे ४०-४० बैलजोड्या होत्या. त्याच्याकडे बरेच सालदार व लक्ष्म्या कामास होत्या. बैलगाडी, धमणी प्रत्येकाच्या घरात असायची. गावात सरकारी नोकर किंवा इतर अभ्यागत आले तर त्यांची उठबैस पाटील-देशमुख यांचेकडे होई. कायदा झाल्यानंतर सर्व चित्र बदलले. पाटील देशमुख यांच्याकडून शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत मिळत असे, ती बंद झाली. शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नात पाटील-देशमुख मदत करीत असत, ते बंद झाले. त्या लहान शेतकऱ्यांना शेती करता येईना. बी-बियाणे विकत घेण्यास सावकाराकडे जाणे आले. त्यात वारंवार पडणारा दुष्काळ. यांमुळे शेतकरी कंगाल झाला. रोजगाराचे दुसरे साधन नाही.
अशा प्रकारे कूळकायद्याने हजारो शेतकऱ्यांचे बळी घेतले. पश्चिम महाराष्ट्नत पूर्वीची जमीनदारी जावून, ज्या सबळ जमीनदाराकडे पैसा आहे व मनगटात जोर आहे त्याच्या नावांवर, कायद्यानी कुळाकडे आलेल्या जमिनी झाल्या. हे पाहिले असता कूळकायद्याचे उद्दिष्ट काही लोकांसाठी सफल झाले. एक मालक जाऊन दुसरा मालक आला, पण छोटा शेतकरी अत्यल्प उत्पन्न गटात होता तो तसाच राहिला.
`ग्रामीण विकास योजना सरकार राबवीत आहे' अशा घोषणा होतात. ते त्याच्याकडून बैलजोडी, बैलगाडी, म्हैस खरेदी करण्यासाठी कर्ज देतील, जे फेडायचे नसते ,असा समज झाला आहे. मी जिल्हा ग्रामीण विकास योजनेमध्ये काम केले आहे. मी जेव्हा या योजनेच्या लाभधारकांचे अर्ज घेऊन बँकेच्या मॅनेजरना भेटायला जायचो, त्यावेळी खिडकीतून बँक मॅनेजर पाहायचे व मला म्हणायचे, `तुम्हाला बँकेच्या आवारात आलेले पाहतो, त्यावेळी आमच्या अंगात  हुडहुडी भरते. कारण आता आम्हाला यांचे कर्ज मंजूर करावे लागणार की ते परत कधीच मिळणार नसते!' ह्या योजनेत काम करीत असताना एक राजकीय नेते मला खाजगीत म्हणाले होते की, `शेतकऱ्यांना दिलेले कर्ज कधीच परत मागायचे नसते!' शेतकरी दुर्बळच कसा राहील हेच पाहिले जाते. पूर्वी तो दुबळा असला तरी त्यास बड्यांची मदत कर्तव्यभावनेतून होत असे. आता जग पुढे गेले. धनदांडगे लुबाडतात, आणि सरकार मदत ओतत राहते!
- डॉ.राम नेने,गोरेगाव(प.),मुंबई४००१०४ मो. ९७६९८३२६३०

रसिक मनाचा शेतकरी
`इतक्या मोठ्या संख्येनं आपण सगळेे जमणार, त्यासाठी अशा उन्हाळयात जळगाव हे कुठलं ठिकाण काढलं? कारण हे  तर जळणारंं गाव, उन्हानं भाजणारं गाव! परंतु या जैनभाऊंच्या दरीटेकडीवर आल्यानंतर कळलं की, हे जळाचं गाव - पाण्याचं गाव - अंगात पाणी असलेल्या माणसांंचं गाव!' असे प्रास्तविक वसंत आपटे यांनी  केल्यावर खूप टाळया पडल्या, कारण समोर बसलेल्या सर्वांना ते मनापासून पटलंच. ग्राहक पंचायतीच्या कक्ष आणि मंच यांवर काम करणाऱ्या महाराष्ट्नतील सुमारे ४०० कार्यकर्त्यांचे तीन दिवसांचे शिबिर जळगावला झालं. त्याचं यजमानपद भंवरलाल जैन यांच्याकडं होतं. नुकतंच भंवरलालजींची निधनवार्ता समजली, आणि त्या स्वप्नवत पाहुणचाराची आठवण झाली.आपटे  यांच्याकडं त्या संघटनेतील प्रतिनिधी कार्यकर्त्यांचं  प्रांत-प्रमुख पद होतं. त्यामुळं शिबिराची तयारी व आखणी करण्यासाठी त्यांच्या २-३ फेऱ्या आधी झालेल्या होत्या. बिंदुमाधव जोशी यांनी भंवरलालजींची दोस्ती या कामी उपयोगात आणली होती, आणि जैन पाईप्सच्या संबंधी काही ग्राहकांनी केलेल्या तक्रारीतून जैन मंडळींनी या कायद्याचा व त्या निमित्ताने संघटनेचा अभ्यास केलेला होता. त्यामुळे त्याना ग्राहक पंचायतीबद्दल आकर्षण होतं, त्या जवळिकीतून हे कार्य त्यांनी अंगावर घेतले होते.
जैन व्हॅली म्हणजे उत्तम पर्यटनस्थळ वाटावे असं अभ्यासकेंंद्र होतं. टिपटॉप निवासव्यवस्था, सभागृह, भोजनाचा सरंजाम हे तर सारे लक्षवेधी होतेेच, पण भंवरलालजींपासून अगदी तळाच्या माणसांपर्यंंत सर्वांची स्नेहशील अगत्याची वागणूक आम्हाला नवलाची वाटली. जवळच्या डाोंगरटेकड्यांवर हिरवाई भरलेली होती, त्याचशेजारी सरकारी मालकीच्या  डोंंगरदऱ्यांत रुक्ष भकासपणा आमच्या सवयीचा होता.सकाळी लवकर आम्ही दोघंंतिघं टेकडीवर फिरायला गेलो होतो, तर आणखी एक धक्का बसला. स्वत: भंवरलाल भाऊ गवत खुरपून पेंडी बांधत होते. टीशर्ट-अर्धीचड्डी-कापडी बूट असा वेश होता. अर्थातच त्यांच्याशी पळभर बोलता आले.  त्यांनी सांगितले की, घरच्या गाईला गवताची वैरण आणण्यासाठी ते रोज इथे येतात, गाईला चारा घातल्यानंतर त्याना त्यांची आई न्याहरी देते! शिवाय स्वत: मातीत हात घालण्याचे  सुख त्यांना मिळते.
त्या मुक्कामात टिश्यू कल्चर, कांद्याचे निर्जलीकरण, केळयाची पावडर असे प्रकल्प पाहता आले. शेतीचे हे सर्व प्रयोग आणि संपूर्ण व्यवस्थापन संगणकचलित होते, हे वीस वर्षापूर्वी विशेष होते. मोठ्या संख्येने लोक  कामाला होते, त्यांचे खिसे वगैरे तपासून सोडत, तंबाखूची पुडी जप्त होई. पूर्ण निर्व्यसनीपणाचा कटाक्ष होता. कामगारांना न्याहरीसाठी केळी दिली जात. हे वेगळे विश्व पाहण्याचा योग भाऊंंच्या आठवणींनी पुन्हा ताजा झाला.
`अशी अनेक कामं कुठंकुठं चालू असतात, अशा मधुसंचयाकडं भंवर म्हणजे भुंगे आकर्षित होतात; आणि संघटनेच्या मुळाशी विचारंाचा बिंदू बिंदू ठिबकला तर त्याची वाढही जोमदार होते' असं आपटे म्हणाले तेव्हाही भाऊंसकट सगळयांनी सहमतीच्या टाळया दिल्या होत्या.
भंवरलालजींना विनम्र श्रध्दांजली.
-अशोक तेलंग, सांगली (फोन :०२३३-२३३१६३०)

बसोनी थिल्लरी बेडुक सागरा धिक्कारी  
नाही देखिला ना ठावा,तोंडमिटी करी हांवा 
फुगते काऊळे म्हणे मी राजहंस आगळे!!  -तुकाराम
नसत्या  हुशारीचा हंगामा
लग्नात वधूपक्षाने मांडलेल्या रुखवतासाठी खूप राबावे खपावेे, हौसेने सगळे मांडावे, त्याचे इकडच्यांनी कौतुक करावे, आणि तिकडच्यांनी त्या सगळयाला नावे ठेवावीत, तयास हिणवावे असा एक व्यवहार प्रत्येक लग्नात असयचा. दरवर्षीचा अर्थसंकल्प आला की त्याच त्या उद्गारांची तशाच प्रतिक्रियांची आठवण होते.आपल्या समाजात एकूणच हिशेबीपणा कमी, आपापल्या फायद्याच्या गोष्टीकडेही दुर्लक्ष करून लोक बेहिशेबीपणे वागतात. शिवाय एकंदर लोकसंख्येत साक्षरतेचे प्रमाण कमी, त्यात वरचे शिक्षण घेणारे किती आणि त्यातही रोकडा अर्थव्यवहार कळणारे किती असणार आहेत ! आजकालच्या कॉमर्स पदवीधरासही बँकेचे चलन भरता येत नाही, तिथे देशाच्या महागाईचा निर्देशांक, निर्गुंतवणूक, चालू खात्यावरील तूट  या आणि असल्या शब्दांच्या जंजाळातले त्यास काय कळणार?

आपले आमदार खासदार तरी त्यातले काय जाणतात हा जिथे मोठाच प्रश्न आहे, तिथे जिल्हा परिषदेच्या सदस्याची काय कथा! पण आजच्या दिवसांत अर्थसंकल्पावर न बोलेल तो पापी, अशी समजूत करून घेतल्यामुळेे  गावचा गण्यागंप्याही अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया घालत फिरत असावा. `या अर्थसंकल्पामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडेल', `उद्योगक्षेत्राच्या दृष्टीने त्यात भरीव असे काही नाही'.... असल्या गावगप्पांची मते प्रसारमाध्यमांना तरी कोण द्यायला येतात हे गूढ आहे. कदाचित इतर बातम्या आपापल्या टेबलवर बसून पेपरवाले`असे सूत्रांकडून समजले' म्हणतात, त्यातलाच तो प्रकार असावा. त्यांपैकी एक प्रतिक्रिया वास्तव -म्हणूनच दाद देण्याजोगी असते, ती म्हणजे `या अर्थसंकल्पात नवीन असे काहीही नाही!'

वास्तविक हिशेब, ताळेबंद, आढावा, योजना आणि त्याआधारे अर्थसंकल्प ही प्रक्रिया कोणत्याही स्तरावर मूलत: आवश्यकच असते. उद्योगधंदा तोट्यात असला, किंवा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असला तरी त्यास हिशेब ठेवावे लागतात, ताळेबंद मांडावा लागतो, आणि अर्थसंकल्पही आवश्यक असतो. तीच गरज कुटुंबाचीही असते. घरात पत्नीला दिलेल्या पैशाचा  आणि मीठ मिरचीच्या खर्चाचा कोणी हिशेब ठेवत नाही, पण ते आवश्यक तर आहेच. घरालाही योग्य वळण द्यायचे असेल तर योजना करावी लागते, संकल्प मांडावा लागतो. आवक जावक लक्षांत घ्यावी लागते. पण त्या बाबतीत सर्वत्र कमालीचा बेहिशेबीपणा असतो. कुटुंबात कोणी कर्त्या माणसाने वर्षाचा अर्थसंकल्प मांडला, जाणत्या पोरांपुढे तो सादर केला, पत्नीकडून सूचना मागवून त्यावर चर्चा घडवून आणून तो मंजुरीनंतर वर्षभरात अंंमलात आणला असे दृष्य कुठेही दिसणार नाही. घरासाठी काही गंगाजळी लागते, कर्जे काढावी लागतात, अचानक संकटासाठी तरतूद ठेवावी लागतेे, आरोग्य - शिक्षण हेही पाहावे लागते. त्याचेच मोठे स्वरूप म्हणून देशाच्या अर्थसंक ल्पाकडे पाहायचे असते. पण `मिजास राजाची आणि नांदणूक हुच्चेगिरीची' अशा लोकांना, अर्थमंत्र्याच्या संकल्पाचे विश्लेषण करायला सांगणारे सांगतात आणि ऐकणाारे ऐकतात. मनमोहनसिंगांंचे काही म्हणणे मांडले गेले, आणि तेही आर्थिक विषयाच्या नियतकालिकात किंवा चर्चेत मांडले गेले तर ठीक, पण माध्यमांतून एकेका वेळी जसे क्रिकेट - वेमुला यांसारखे एकच एक विषय च च चघळतात, तसेच अर्थसंकल्पाचेही होते याची मौैज वाटते.

अर्थसंकल्पात ज्या तरतुदी मांडल्या जातात, त्यात अल्पकालीन व दीर्घकालीन जमाखर्च असतात. अच्छे दिन लगेच उद्यापासून येणार नाहीत, आणि विरोधकांच्या टीकेप्रमाणे देश उद्याच्या उद्या कर्र्जाच्या विळख्यात सापडून आपल्यावर परदेशाचे राज्य येणार नाही. एखाद्या वस्तूवर कमी किंवा जास्तीचा कर लावतात तेव्हा त्या वस्तूच्या दरात काही कमीजास्ती होते. त्याचा तसा दैनंदिन व्यवहारांवर फार परिणाम होत नसतो, तशी काळजी घेतलेलीच असते.तरीही काही बाबतीत थोडे नफा नुकसान होणार. पेट्नेलच्या किंमतीत वाढ होणार हे एकेकाळी ठरून गेलेले होते, त्यामुळे आधीच्या चार दोन दिवसांत बरेच पंपवाले विक्री तुंबवून साठेबाजी करायचे. ती केवळ पंपवालेच करायचे असे नाही तर स्कूटरवाला कारकूनही दोनच्या ऐवजी तीन लिटर तेल घेऊन ठेवायचा. पण त्यामुळे वस्तूंचा वापर कमी झाला नाही, होत नाही. महागाई किंवा स्वस्ताई तर हल्ली केव्हाही अचानक होते. एका रात्रीत तूरडाळ दोनशे रुपयांवर जाते, कांदा एेंशीवरून दहावर येेतो. त्याचा अर्थसंकल्पाशी संबंध असतोच,असे नाही. मुद्दा असा की, अर्थसंकल्प पुढ्यात घेऊन,उद्यापासून अच्छे दिन येणार की आपले कंबरडे मोडणार असा  हिशेब घालत बसण्यात काही अर्थ नसतो. त्याची काळजी वाहणारे वेगळे लोक असतात. सामान्य जनतेने प्रत्येक विषय समजून अवश्य घ्यावा, पण समजत असल्याप्रमाणे उगीच गर्गशा करू नये.
अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी अनेक तज्ज्ञ आपापसात विचार करत असतात. त्याआधारेच तो मांडला जातो, पण आपल्या खिशाला जरा कुठे धक्का लागतो म्हटले की काही संघटना उसळून उठतात. भविष्य निर्वाह निधीच्या बाबतीत तो अनुभव सर्वांनी घेतला. सरकारही हल्ली फार ठाम राहून अंमल करू शकत नाही. कारण हिताहिताच्या निर्णयासाठी  परस्पर चर्चा होण्याऐेवजी गावगन्ना भडकावू आंदोलन करण्याची प्रथा पडली आहे. अर्थविधेयक चर्चेला येण्याआधीच त्याविरोधात रस्ते बंद करण्याच्या तारखा जाहीर होतात, त्याचा दबाव मोठा. मग कुठल्या जातीला आरक्षणसुद्धा  हो  म्हणावे लागते. देशाची आर्थिक धोरणे कशी केव्हा ठरायची?

एकंदरीतच आपण आपल्या अर्थव्यवहारांकडे  कसे पाहतो, कसे वागतो, त्याचे उदाहरण किंवा प्रचिती म्हणून गेल्या आठवड्यातील अर्थसंकल्पाच्या संदर्भात बातम्या, चर्चा आणि गर्जना पाहाव्यात. त्यावरून आपल्या समाजातील अर्थसाक्षरता जोखता येईल, व त्यावरून आपले आर्थिक भविष्यही मांडता येईल. एरवी रिक्षावाल्यांनी रिझर्व बँकेच्या रॅपो रेटबद्दल बोलण्यास आणि ती छापण्या-ऐकवण्यास कुणाची कशाला हरकत असणार?


पत्रकारी संकेत
श्री.धों.म.मोहिते हे पूर्वी कधीकाळी `किर्लोस्कर' मासिकांचे प्रतिनिधी म्हणून काम करीत. पुढे त्यांनी सागरेश्वर येथील अभयारण्याच्या प्रकल्पासाठी खूप परिश्रम घेतले. अ.र.अंतुले हे महाराष्ट्नचे मुख्यमंत्री असताना त्यांनी धों.म.यांचे सत्कार-कौतुक केले, आणि त्यांना `वृक्षमित्र' पुरस्काराने गौरविले. किर्लोस्करवाडीतून आमचे `आपले जग' हे नियतकालिक सुरू झाल्यावर, या परिसरातील पत्रकारांचा मेळ जमत गेला, त्यांची एकूण संख्या हाताच्या बोटांवर मोजावी इतकीच. पण `समानशीले-' म्हणतात तसे मित्रमंडळाचे सख्य झाले. या मंडळाचा `पत्रकार संघ' झाला. त्यात ओढून ताणून नऊ सदस्य, ज्येष्ठत्वाने त्याचे अध्यक्ष झाले वृक्षमित्र धों.म.मोहिते.त्याचा प्रारंभ जिल्हाधिकारी श्रीधर जोशी व खूपच ज्येष्ठ पत्रकार गजानन हुद्दार यांनी केला.
धों.मं.चा संपर्क आणि लोकसंग्रह चांगला होता, तसे आम्ही सगळे आपापल्या कामांतून सर्वसंचारी होतोच. त्यामुळे आमच्या संघास एक प्रकारे वजन आणि प्रतिष्ठा आपोआपच प्राप्त झाली. धों.म.हे वनखात्याशी संबंधित होते, त्यामुळे आमच्या अभ्यासदौऱ्यात वनखाते प्राधान्यावर होते. तरी इतर कारणांनी आमची भटकंती होत राहिली. आम्हा सर्वांचा लोकसंग्रह होता, तोही त्यात उपयोगी यायचा. उदाहरणार्थ धों.मं.चा श्री.शरद पवार यांच्याशी, यशवंतराव काळापासून चांगला परिचय होता, त्यातून बारामतीला या मुख्यमंत्र्यांना भेटण्यास एकदा आम्ही गेलो, त्यावेळी आमच्यातल्या वि.भा.कुलकर्णी(पंतसर) यांच्या तिथे शासकीय सेवेत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी `साहेबां'चा माग काढून दिला. माझ्या एका मित्राने ती ठिकाणे दाखवून बारामती नगरपालिकेशी आणून सोडले. सहकारी संघटनेतील शिवाजीराव पाटलांच्या कार्यकर्त्याने साहेबांच्या खोलीतच नेले. आत जाताना धों.म.पुढे असल्यामुळे साहेबानी `या%' केलं!
- तर या संघानं साधारण बाराचौदा वर्षे खरोखरीच चांगलं काम केलं. उत्तम वार्तांकन, वृत्तांत, मुलाखती यांसह बरेच अभ्यासदौरे-पाहणीदौरे केले. मुख्यत: सांगायचं तर आम्हा सर्व सदस्यांची अलिखित आचारसंहिता होती. कुठे कोणी पत्रकार म्हणून बोलावत, त्यावेळी भेटवस्तू किंवा जेवण घ्यायचे नाही, रीत म्हणून चहा पुरेसा होईल; असेही कलम असायचे. `पत्रकारी पेया'चा कुणीच रसिक नव्हता. एकत्र जमल्यावर भजी तेवढी आमच्या पैशातून सेलेब्रेट करण्यात येत असत. यांतले काहीजण चांगल्यापैकी बोलू शकत. उच्चपदस्थ कुणाची मुलाखत घेताना त्या त्या विषयातले प्रश्न विचारत. एका छोट्या गावातले हे `सामर्थ्य' पाहून बाहेरची मंडळीही अचंबित होत. एरवी प्रवासात किंवा एखाद्या मुक्कामी आमच्या हशा-टवाळीला ऊत यायचा.
एकदा दिल्लीत दोनतीन दिवस होतो. बऱ्यापैकी हॉटेलात मुक्काम. दिवसा बाहेर फिरती, आणि सकाळी-रात्री गप्पांचा अड्डा होताच. परत निघताना काऊंटरच्या त्या पोरीसारख्या दिसणाऱ्या बाईनं विचारलं, ``आर यू रिअली जर्नालिस्ट?'' आमची एकंदर वर्तणूक तिला अगदीच बाळबोध वाटली असावी. दिल्लीतले ख्यातनाम पत्रमहर्षी बापूराव लेले हे त्या मुक्कामात भेटायला आले आणि खूप माहिती देऊन गेेले. त्यांचाही प्रभाव तिच्यावर पडला असेल. आता आमची पत्रकारिता पटवून देण्यासाठी काय काय करावं, यावरती चर्चा करीत आम्ही परतीची वाट धरली.
या पत्रकारी  संचारात वनखात्यातील काही अधिकाऱ्यांशी स्नेह जमला. गुलाबराव पवार, नंदकुमार कुलकर्णी आणि त्यांचे वरचे साहेब श्री आयएजे सत्तार हे खास मित्र बनले. सत्तारसाहेब आता निवृत्त झाल्यानंतर उत्तर कर्नाटकात कुडची या त्यांच्या गावी उत्तम शाळा चालवतात. बहुश्रुत, संयमी, सुसंस्कृत अशा सत्तारसाहेबांशी गप्पागोष्टी फार मोठ्या आनंदाच्या असत. पनवेलजवळ अर्नाळयाच्या लॉगहट्मध्ये त्यांच्याशी गप्पांत सरलेली रात्र, गोव्याजवळ दोडामार्गच्या झोपडीवजा घरातील मुक्काम, चांदोलीजवळच्या प्रचीतगडावर त्यांच्यासह रस्ताभात शिजवून केलेले अरण्यभोजन कसे विसरेल? माझा एक मुलगा सातवी आणि एक चौथीच्या शिष्यवृत्तीला एकदमच उत्तीर्ण झाल्याचे सत्तारनी आधी कळवले, आणि अभिनंदनार्थ त्यांच्या घरी आम्हा कुटुंबास भरगच्च नाष्टा दिला.
पत्रकारीसाठी एकत्र आल्यामुळे मला तरी हे मैत्र फार मोलाचे असे लाभले    
                                                 -वसंत आपटे,किर्लोस्करवाडी                                            

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन