Skip to main content

22 Feb.2016

२६ फेब्रुवारी २०१६ला सावरकराना जाऊन ५० वर्षे होतात, त्यानिमित्ताने...
अनादि मी, अवध्य मी
मृत्यूला सहज सामोरे जाऊन राष्ट्नसाठी अमर झालेल्या स्वातंत्र्यवीराचा अंतकाळ
फाल्गुन शुद्ध षष्ठीला (२६ फेब्रुवारी १९६६) त्यागवीर सावरकरांनी देहत्याग गेला. दोनच दिवस आधी आपले कार्यवाह श्री.बाळाराव यांना नमस्कार करून ते म्हणाले, `आम्ही जातो अमुच्या गावा । अमुचा रामराम घ्यावा.' ज्याला `आमचे गाव' म्हटले, त्याची त्यांना माहिती होती. ते गाव `अदृष्ट' होते. तरी तिथले `सुरम्य सदन' त्यांनी धर्म-कर्माचा `विसार' भरून आधीच राखून ठेवले होते. सावरकर जराजीर्ण नि बहुधा घरी पडूनच असत. आकाशवाणी ऐकणे, वृत्तपत्रे वाचणे यात खंड पडला नव्हता.
२० ऑक्टोबर १९६२ला चीनने आक्रमण केले. शांतताखोर काँग्रेसवाले आत्तापर्यंत सावरकरांना `युद्धखोर' म्हणून हिणवीत असत. परंतु स्वप्नाळू धोरणामुळेच भारताचा पराभव झाला. त्याचे दु:ख सावरकरांना इतके असह्य झाले की १४ नोव्हेंबर १९६२ला ते तासभर ढसाढसा रडले. तेव्हापासून त्यांना वारंवार वाटे की, आता जगायचे तरी कशासाठी? १९६४मध्ये ते कार्यवाहांनाच एकदा म्हणाले की, `माझे या जन्मीचे मुख्य कर्तव्य मी बजावलेय. आता ८१ वय झाले. पुन्हा शक्ती येणे आता अशक्य. परावलंबी होऊन जगण्यात काय अर्थ? असे रडत कढत मरेतो जगण्यापेक्षा आत्मार्पण करणेच योग्य.'
सावरकरांचा पहिला विचार होता जल-समाधि घ्यायचा. त्यांनी तसे बोलूनही दाखवले. पण ते सुसाध्य नाही असे पाहून समर्थ रामदासांप्रमाणे प्रायोपवेशन(म्हणजे प्राणांतिक उपवास) करून देहत्याग करायचे ठरवले.
डिसेंबर १८ ला आचार्य अत्रे सावरकरांना घरी जाऊन भेटले. त्यांनी अत्र्यांना शंकराचार्य, ज्ञानेश्वर, रामदास इत्यादींनी त्यांच्या त्या त्या जन्माचे कार्य संपल्यावर आत्मार्पण कसे केले ते सांगितले. `जगावे कसे' याप्रमाणेच `मरावे कसे' हेही मला ठाऊक आहे, असेही ते एकदा म्हणाले होतेच.
देहान्ताच्या आधीपर्यंत तसाच कोणी भेटला तर त्याच्याशी चर्चा करीत किंवा पत्रही लिहीत. पुढे ऑगस्टमध्ये त्यांना कुशीवर वळण्याचीही शक्ती उरली नव्हती. सौ.वैद्य त्यांची प्रकृती पाहायला गेल्या. त्यांना  एकदम म्हणाले, ``केवळ दु:खच सोसायला मला आता मुळीच जगायचे नाही!'' सहनशीलतेच्या पोलादी पदराने झाकलेली त्यांची खोल वेदना नकळत उमटली होती. पण लगेच स्वत:ला सावरून ते बोलले, ``अगं, हे शरीर आता थकले.''
अतिशय अशक्त झाल्याने सावरकर बहुधा पडूनच असत. पण १९६५च्या २६ ऑगस्टला एक अपूर्व घडले. पाकिस्तानच्या काश्मीरमधल्या घुसखोरीला वावच उरू नये म्हणून भारतीय सेनेने चक्क युद्धबंदीरेषेच्या पलीकडे जाऊन आपली ठाणी ठोकली! हे विजयवृत्त कानी पडताच सावरकर ताडकन उठून बसले आणि आठवड्याने `चढाईचा पवित्रा घेऊन भारतीय सैन्य लाहोरात तीन बाजूनी घुसले आहे' ही लोकसभेतली संरक्षणमंत्री चव्हाणांची घोषणा आकाशवाणीवर ऐकताच सावरकरांना परमानंद झाला. त्यांनी परलोकाचे काढलेले तिकीट परत केले! ६ ते १० सप्टेंबरपर्यंत भारतीय सेनेची आगेकूच चालू होती. त्या दिवसातला तात्यारावांचा आवेश एखाद्या सेनापतीसारखा असे. ते भारताचे मानचित्र(नकाशा) सतत समोर ठेवीत असत. मानचित्रावरून युद्धक्षेत्र समजावून देत आणि बोट ठेवून म्हणत, `अरे, या ठिकाणी कोंडीत पकडता येईल शत्रूला!' त्या दिवसात त्यांना एकाएकी शंभर हत्तींचे बळ आले.
१९६५च्या सप्टेंबर २३ला युद्धबंदी झाली. १०-१-१९६६ला पंतप्रधान लालबहादूर शास्त्री ताश्कंदला वाटाघाटीसाठी गेले. सावरकरांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली! `केसरी'च्या प्रतिनिधीला ते आधीच म्हणाले होते की, तिथे त्यांच्यावर दडपण आणतील नि जे रणांगणावर लढून मिळवले ते हे गमावून बसतील, असे भय वाटते. आणि दुर्दैवाने झालेही तसेच.
या दुर्घटनेमुळे सावरकरांना अतोनात दु:ख झाले. आता तर जगण्यात अर्थच नाही. ठाम निर्धार झाला. त्यांनी अन्न घेणे हळूहळू कमी करीत आणले होतेच. त्यांनी डॉक्टरांना बजावले की `आता मला तुमची औषधेही नकोत'. १फेब्रुवारीपासून तर त्यांनी औषधच नव्हे, तर अन्नही पूर्ण वर्ज्य केले. नुसते पाणी घेऊन ते राहात.
दि.२०ला सावरकरांची प्रकृति चिंताजनक होती. पाण्यातच किंचित औषध टाकून ते पाणी म्हणून डॉक्टरांनी प्यायला दिले. पण तात्यारावांचे नाक तिखट! त्यांनी ओळखले. ते कमालीचे रागावले. मृत्यू माझ्या जवळ येत असूनही हे लोक त्याला अडवताहेत असे पाहून ते ओरडले, ``डॉक्टर, तुम्ही कुणीही आता माझ्या आड येऊ नका. कृपा करा. आता थोड्या वेळाचा प्रश्न आहे.''
डॉक्टर म्हणाले,``तात्या, तुम्हाला जायचेच आहे तर जा, पण सुखाने जा. तुमचे हाल आमच्याने बघवत नाहीत.'' तात्या लगेच म्हणाले, ``पण माझे हाल होताहेत असे म्हटलेय का मी कधी? कण्हलोय तरी का?''
दि.२३ला अत्र्यांनी आणून दिलेले `पाकिस्तान कट् टू साइझ' हे मंकीकरांचे पुस्तक सावरकरांनी कार्यवाहांकडून थोडेसे वाचवून ऐकले. दि.२४ला सकाळी परिचारिकेला `बाहेर जा' म्हणून खुणावले. दोन्ही हातांनी नमस्कार करून सावरकर क्षीण आवाजात म्हणाले, ``बाळाराव, तुम्ही आता सर्वांना आमचा नमस्कार सांगा. आता आम्ही जातो आपुल्या गावा । आमुचा रामराम घ्यावा ।''
दि.२६चा शनिवार सकाळी अकरा वाजता, मृत्यूचा हात आपल्या हातात घेऊन, ते त्या संगे निघाले महायात्रेला! त्यांनी स्वत:च लिहिल्याप्रमाणे `काळाच्या काळया पाण्यावर धाडले जाताना त्यांना जी मोठी जन्मठेप झाली होती' तीही आता संपली होती.
***
सावरकर सदन
मुंबईच्या शिवाजी पार्क येथे पांढऱ्या रंगाची इमारत दिसते. सावरकरांच्या अक्षरांची पाटी नजरेसमोर येते. १० मे १९३७ रोजी सावरकरांची रत्नागिरीतील स्थानबद्धतेतून सुटका झाली व ते मुंबईला आले. १९३७ साली दादर येथील गणेश पेठ लेनमधील `सावरकर भुवन' या स्वत:च्या घरात कुटुंबासमवेत राहिले. त्यानंतर त्यांनी `सावरकर भुवन' विकून शिवाजी पार्क वसाहतीत प्लॉट नं.७१ जागेवर १९३७ साली इमारत बांधण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तळमजला व पहिला मजला, वर गच्ची अशी रचना होती. बांधकाम हिंदू कॉलनी येथील इंजिनियर श्री.सुळे यांनी केले. जून १९३८ मध्ये `सावरकर सदन' या वास्तूत सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई(माई), कन्या प्रभात, पुत्र विश्वास, बाबाराव, डॉ.नारायणराव, त्यांच्या पत्नी शांताबाई व त्यांची मुले राहावयास आले. गुढीपाडवा व दसऱ्याच्या दिवशी घरावर कुंडली कृपाणांकित भगवा ध्वज उभारून माई त्याची पूजा करत असत. पायऱ्या चढल्यावर प्रशस्त हॉल आहे. येथे सावरकरांचे कार्यालय असून महत्त्वाच्या पाहुण्यांची भेट तेथे ते घेत असत. तेथे त्यांचे सहकारी बाळाराव सावरकर बसत. पहिल्या मजल्यावर समोर सावरकरांची खोली दिसते.
भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी सावरकरांनी तिरंगी ध्वज व कुंडली कृपाणांकित भगवा ध्वज इमारतीच्या गच्चीवर फडकवला. १९४८साली गांधीजींच्या हत्त्येनंतर सावरकर सदनावर  हल्ला झाला होता. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी सावरकरांचे निधन झाले त्यावेळेस खालच्या मोठ्या दिवाणखान्यात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सध्या त्यांच्या कार्यालयाच्या जागी स्मारक असून, तेथे त्यांना मिळालेली मानपत्रे, त्यांच्या वापरातील वस्तू, त्यांची पुस्तके, जुने फोटो अशा वस्तू आहेत.
(`शतपैलू सावरकर' या ह.त्रिं.देसाई यांच्या पुस्तकातील
`योगेशाचे देह-विसर्जन' या प्रकरणातील काही भाग...)




टिळे टोपी उंच दावी । जगीं मीच तो गोसावी ।
अवघा वर-पंग सारा । पोटीं विषयांचा थारा ।। 
- तुकाराम
उचकवादावर श्रद्धा
शनी शिंगणापूरसारख्या क्षेत्राच्या ठिकाणी लोकांच्या ज्या काही श्रध्दा गुंतलेल्या असतात, त्या उचकावून अकारण सामाजिक तेढ वाढविण्याचे महत्कार्य सध्या काही संघटनांकरवी सुरू झाले आहे. वास्तवात त्या प्रकारच्या कामांचा विज्ञानवादाशी किंवा पुरोगामित्वाशी काहीही संबंध नाही. त्यास फार तर सामाजिक गोंधळ-गिरी   इतकेच म्हणता येईल. म्हणूनच विज्ञान व समता यांच्याशी थोडी फ ारकत घेण्याचा दोष पत्करूनही त्यांस विरोध केला पाहिजे. या प्रकारच्या अंधश्रध्दा नाहीशा होणे आवश्यक आहेच आहे, पण  या प्रकारे रस्त्यांवर लोळणारी आणि पोलीसांशी झटापटी करणारी आक्रस्ताळी आंदोलने करून त्या नाहीशा होणार नाहीत.त्यांस अकारण प्रसिध्दी मिळून विरोधकांनाही चेव चढतो. तोच त्या पुरोगामी आंदोलकांचा हेतू असतो की काय न कळे.

केेवळ महाराष्ट्नत वा भारतातच अशा श्रध्दा पेासलेल्या आहेत असे काही नाही, तर जगाच्या पाठीवर सर्वत्र ते प्रकार चालतात. त्यास कोणताही देश, कोणताही धर्म, कोणताही काळ अपवाद नाही. धर्मपालनात विज्ञान असतेच, पण पुष्कळदा खरे धर्मपालनही होत नाही. आपल्या ताटातला एक घास भुकेलेल्यास द्यावा हा मानवतेचा धर्म आहे, आणि त्यात विज्ञानास कुठे धक्काही लागत नाही. पण त्यांतून भीक मागण्याचा धंदा उदयाला येत असेल तर अशा प्रकारचे अपात्री दान ही अंधश्रध्दा होते. ती कशी रोखायची हा सामाजिक चळवळींपुढचा प्रश्न होऊ शकतेा.

हाजीअलीचा दर्गा मुंबईत आहे, तिथेही महिलांनी जाण्यास बंदी आहे. आज कोणत्याही मशीदीत दररोज नमाज पढण्यासाठी महिला जात नाहीत. त्याउलट हिंदू मंदिरांतून आरतीच्या वेळी महिलांचीच गर्दी असते. तेवढ्यावरून मग आरतीवाल्या समाजास पुरोगामी  मानायचे का? तेही एकवेळ बाजूला ठेवू, पण मशीदीत महिलांना प्रवेश नसलेल्या धर्मपंथास ठणकावण्याचे पुरोगामित्व तरी दाखवावे; तिथे बोटचेपेपणा कशासाठी ? शनीच्या चौथऱ्याप्रमाणेच मशीदींतही घुसण्याचा त्या बायकांनी प्रयत्न करून पाहावा.  त्याशिवाय अशी काही देवस्थाने आहेत की  जिथे पुरुषांना बंदी आहे; तिथेही त्याविरोधी आंंदोलनांचे कुठे ऐकीवात  नाही. केरळची राजधानी थिरुअनंतपुरम येथे अट्टुकल भगवती देवीचे कोण एक मंदीर आहे. त्या मंदिरात महाप्रसादावेळी फक्त महिलांना प्रवेश असतो, पुरुषांना बंदी असते. १५ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत तिथे उत्सव आहे, २३ फेब्रुवारीला पोंगल नावाचा प्रसाद वितरीत होणार  असल्याचे जाहीर झाले आहे. शिंगणापूरच्या त्या पीडांनी तिकडेही लक्ष घालायला काय हरकत आहे?                                                                      

असा वावदुकपणा करत राहायचाच असेल तर अनेक ठिकाणे आहेत आणि अनेक अंधश्रध्दा आहेत. त्यांच्या विरोधांत असली आंदोलनेेच करत बसण्याचेही एक कर्मकांडच होऊन बसलेले आहे, तोही पुरोगामी अंधश्रध्देचा प्रकार म्हणायचा. तेही करत राहायला हरकत नाही; या सर्वांतून अंधश्रध्दा निर्मूलनाच्या चळवळीला दूषणे देण्याचा अट्टहास खचितच नाही. पण हेही समजून घ्यायला हवे की  माणूस श्रध्देवरच जगतो, त्यामुळे माणसाच्या आयुष्यांतून श्रध्दा हद्दपार होऊच शकत नाही. तसेच श्रध्दा आणि अंधश्रध्दा यांच्यात सुस्पष्ट भेद करता येत नाही. अमूक म्हणजे श्रध्दा आणि तमूक म्हणजे अंधश्रध्दा हे कोण कसे ठरवणार ? गणपतीच्या मिरवणुकीपुढे ढोल बडवणे ही कोणत्या मापाने श्रध्दा म्हणावी ? ती म्हणता येत नसेल तर मग तिथे स्त्रियांना बंदी करणारे पर्यावरणवादी आंदोलन तरी करावे ना ..!

या आंदोलकांनाच फक्त विज्ञानवाद कळतो, अशातला भाग नाही. जे सच्चे वैज्ञानिक म्हणून ओळखले जातात, असे कितीतरी मान्यवर, ईश्वरावर आणि कर्मकांडांवरही शब्दश: देवभोळी श्रद्धा ठेवतात. त्यांना विज्ञानवादी म्हणायचे की नाही  हा त्या आंंदोलकांचा प्रश्न आहे. फेसबुक या जगद्विख्यात कंपनीचा प्रमुख मार्क झुकरबर्ग याला काही काळ विलक्षण खचलेपण (डिप्रेशन) आले होते. त्या कठीण काळात तो भारतात काही मंदिरांना भेटी देण्यासाठी आला होता. आणि त्या देवदर्शनानंतर आपले दिवस बदलले आणि धंद्याला चढती कमान लागली असे तो नमूद करतो. त्याला हा अवैज्ञानिक अंधश्रध्द सल्ला कोणी दिला? -तर दुसऱ्या नावाजलेल्या जागतिक कीर्तीच्या अॅपल कंपनीचा बॉस स्टीव्ह जॉब्ज याने. ही विज्ञानोद्योगी विदेशी माणसे ऐहिक जगातही तितकीच श्रद्धाळू होतात. त्यांच्यापेक्षा असल्या पुरोगामी ब्रिगेडचा विज्ञानवाद श्रेष्ठ असेलही, पण तो इतका अहंमन्य असू नये.

वास्तविक शिंगणापूरचा तो शनीदेव महाकोपिष्ट म्हणून प्रसिद्ध आहे. स्त्रियांनी त्याच्या चौथऱ्यावर चढणे हे महापाप असेल तर त्यापायी शनीभक्तांनी एवढे भावनिक आक्रमक होण्याचे कारणच नाही. त्यांची श्रद्धा जर सच्ची असेल तर त्यांच्या दृष्टीने महापापी असणाऱ्या त्या आंदोलक महिलांकडे शनिदेवच पाहून घेईल ना ! तशी त्या भक्तांनाही खात्री वाटत नाही कारण त्यांंच्याच त्या श्रध्देवर त्यांचा विश्वास नाही. त्यांचा विश्वास त्यांच्या शनीच्या न्यायावर नाही तर तो त्यांच्या श्रध्देच्या अवडंबरी देखाव्यावर आहे. त्यातून उद्भवलेले ते भांडण आहे.

कुणाची श्रध्दा दुखावू नये,असे म्हटल्यावर  काहींची बुवाबाजी फोफावणार त्याला फारसा इलाज नाही. माणसाचे मन मजेचे असते. बर्फाखाली गाडल्या गेलेल्या ९ सैनिकांविषयी तितका दुखवटा व्यक्त झाला नाही, जितका हनुमंथप्पाच्या अखेरीसाठी झाला ! कारण त्याचे आठवडाभर जिवंत राहणे हे साक्षात मृत्यूशी झुंजणारे होते. अशा भावनासुध्दा व्यक्त होताना दिसणे हे माणसाच्या मनाला जास्त भावते! म्हणून माणसांच्या भासमान भावनांचे खेळ किती खेळवत ठेवायचे हेही ज्याच्या त्याच्या भावनेवरच सोडून द्यावे. त्यापायी उचकावणारी आंदोलने कशाला?


सामान्यांची अपेक्षापूर्ती व्हावी
केंद्रात आणि राज्यात भाजप चे सरकार आले, त्यास आता वर्ष-दीड वर्षाचा काळ उलटला. नव्याची नवलाई संपून आता त्या सत्ताबदलातील फरक लोकांना प्रत्यक्षात दिसण्याची अपेक्षा होती, ती पुरी होत नाही.  परदेशांतील प्रतिमा आणि त्यांसोबतचे करारमदार, अथवा सरकारने जाहीर केलेल्या काही योजना या सर्वांचे यश दिसायला काळ जावा लागेल. तोपर्यंत दाराशी निवडणुका येऊन ठेपतील. त्यावेळी जनतेला दोन प्रमुख पक्षांच्या कारभारात कोणता फरक दिसेल?
    भाजपाकडे वास्तविक संघयंत्रणा व त्या परिवारातील संस्था-संघटना आहेत.ज्याला केडर बेस म्हटले जाते अशी बांधणी असेल तर लोकांची रोजच्या व्यवहारातील कामे करण्यासाठी ती का वापरली जात नाही?
या केडरमधील स्वयंसेवकांना विविध क्षेत्रांत लोकांच्या मदतीसाठी नेमून दिले पाहिजे. सरकारी कार्यालयांत लोकांना हे स्वयंसेवक खूप मदत करू शकतील. त्याचा उपयोग पक्षाची प्रतिमा तयार करण्यासाठी होईर्ल.  शिवाय वाहतूक  नियंत्रण  करण्यासाठी  शहरांतील तीन-चार  मोठ्या चौकांत काही  स्वयंसेवक गर्दीच्या वेळी  उभारले तर त्याचा  बराच परिणाम कायमस्वरूपी दिसू लागेल. फार तर त्यांनी प्रचारासाठी खांद्यावर पट्टे टोप्या वगैरे वापरावे. स्वच्छता मोहीम तशीच राबवता येईल. त्यात शिस्त, नियमितता, कामांंचे  वाटप हेेही  संघपध्दतीने झाले तर  इतर  लोकही  त्यात सामील होतील
    रस्त्यात फेरीवाले व अतिक्रमणे यांचे साम्राज्य असते त्यांतून लोकांना खूप त्रास होतो, त्या संबंधित लोकांसही  ती बेशिस्त नकोच असते. मंडईतील हक्काचे  गाळे  सोडून त्यांना बाहेर रस्त्यात येेऊन बसावे लागत असते. अशा ठिकाणी स्ववंसेवक  सेवाभावी काम करू शकतात. त्याचप्रमाणे सातत्याने  लोकांचे प्रबोधनही करू शकतात.  या सर्व उपाय-योजनांमुळे लोकांना शासन  बदलल्याचा प्रत्यय येईल.`अच्छे दिन'ची सुरुवात झाली असे लोक म्हणतील.
स्वयंसेवकांची एवढी मोठी फौज आणि आता तर १० कोटि  पक्षसदस्य अशी ताकत  असेल तर ती मैदानात उतरवली पाहिजे. विशाल संमेलने, एकत्रीकरण, संचलने व यात्रा  यांपेक्षा लोकांना काहीतरी  काम दाखवावे.
-प्रसाद भावे, सातारा
(मोबा.९८२२२८४२८७)

प्रत्येकाचे काम महत्त्वाचेच
माणूस धडधाकट असतो तेव्हा तो नेहमीचे व्यवहार सुरळीतपणे करत असतो. पण आजारी पडला की त्याला डॉक्टरची आठवण येते. कधी आजार बळावला तर शस्त्रक्रिया वगैरे असते. अशावेळी वाटते की, डॉक्टरचे काम म्हणजे दुसऱ्याच्या जिवावरचा खेळ. डॉक्टरनी आपले काम चोख केले नाही तर काय होईल.असा जिवावरचा खेळ फक्त डॉक्टरच्या बाबतीतच आहे काय? इतरही साऱ्या व्यवसायांच्या बाबतीत त्यांचे त्यांचे काम हे इतरांच्या जिवावरचा खेळच असतो.
आपल्या नित्याच्या कित्येक गोष्टी सरकारी कार्यालयांशी निगडीत असतात. आपली कामे हाताळताना सरकारी कर्मचारी, अधिकारी, आणि मंत्रीसुध्दा कुचराई करतात. भ्रष्ट कारभारामुळे सार्वजनिक कामे नीट होत नाहीत. त्यांमुळे आपल्याला तो सारा कारभार अक्षरश: जीव नकोसा करतो. रस्त्यांची कामे केवढी धोकादायक होतात. ती कामे जिवाशी खेळच ठरतात. शेकडो वर्षांपूर्वी बांधलेली किल्ले-मंदिरे-वाडे बळकट उभे असतात, पण गेल्या दहा पाच वर्षांतील पूल इमारती लोकांच्या जिवावरच आलेल्या असतात. ही बांधकामे काळजीपूर्वक बांधली न गेलेल्याचाच तर तो परिणाम असतो. सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याची समस्या आपण पाहतो, स्वच्छतेची जबाबदारी ज्यांच्यावर असते, त्यांचा हलगर्जीपणा लोकांच्या जिवाशीच तर खेळ असतो. अन्न-औषध प्रशासन नावाचे खाते आपल्याकडे आहे, ते भेसळ वा खराब खाद्यपदार्थांवर नीट लक्ष ठेवत नाहीत. त्यांचा लोकांच्या आयुष्यांवर किती गंभीर परिणाम होतात. पतसंस्थांसारख्या ठिकाणी जे लेखापरीक्षण करतात त्यांच्या हलगर्जीपणातून कितीतरी लोकांचे पैसे बुडीत जाऊन त्यांनी जीव दिलेत. गृहिणीचे काम करणाऱ्या  महिलांचे दुर्लक्ष झाल्यामुळेसुध्दा काही बालकांचे प्राण कंठाशी आल्याची उदाहरणे आपल्या आजूबाजूला झाली असतील.
    म्हणजे केवळ डॉक्टरच नव्हे तर  प्रत्येक काम हे तितकेच महत्वाचे असते, ते काळजीपूर्वक न केल्यास इतरांच्या तो जिवाशी खेळच असतो. आपण आपले काम कोणतेही असले तरी ते लक्षपूर्वकच केले पाहिजे.
- विद्या दिवेकर,वाटेगाव
(मोबा.९९६०४५२८४१)

जीवनगति ही न्यारी!
एका शेतकऱ्याकडे इतर जनावरांप्रमाणेच एक घोडा आणि एक बोकड पाळलेला होता. एकदा तो घोडा आजारला, शेतकऱ्याने पशुवैद्याला बोलावले. नीट तपासल्यावर तो वैद्य म्हणाला, ``याला काहीतरी संसर्ग झालाय. त्याला तीन दिवस औषध देऊन पाहूया; उपयोग नाही झाला तर त्याला मारून टाकणं बरं.'' हा सगळा प्रकार आणि त्या वैद्याचे बोलणे, जवळ फिरणाऱ्या बोकडाने ऐकले होते. औषध देऊन शेतकरी वगैरे खूप दूर गेल्यावर बोकड घोड्याजवळ येऊन म्हणाला, ``मित्रा, तू जरा उभारी धर. ऊठ. उत्साह धर. नाहीतर ते तुला गारद करतील. उभा राहा.''
दुसऱ्या दिवशी पुन्हा औषधाचा डोस देऊन ते लोक गेले, तशी बोकड घोड्याजवळ येऊन त्यास उमेद भरू लागला, ``अरे मूर्खा, ऊठ. मी तुला मदत करतो, चल. एकेक पाऊल टाक. शाबास! एक-दोन-तीन अस्सं. जरा उठून उभा रहा नाहीतर ती माणसं तुला ठेवणारच नाहीत.''
तो पशुवैद्य आला. औषध दिले आणि म्हणाला, ``आता उद्याचा दिवस वाट पाहूया, पण काही उपयोग न झाला तर याला संपवावं लागेल. नाहीतर मग इतर जनावरांत हा संसर्ग फैलावेल.''
हे ऐकल्यावर तो बोकड कासावीस होऊन पुन्हा घोड्याजवळ आला. ``हे बघ शहाण्या. आता तुला सांगतोय ते शेवटचं ठरेल. आता हाल नाहीतर संपलासच! धीर धर. ऊठ. शाब्बास रे, ऊठ ऊठ! सावकाश, छान. चल, चल. आता टाक पावलं. जरा भरभर, हां अस्सं. चाल असाच. वा वा जमतंय.'' हे सुरू असताना मालक शेतकरी तिथं परत आला. घोडा उठून चालतोय हे बघून खूश होत ओरडला, ``हैयाव. चमत्कारच म्हणावा की. माझा घोडा उठला. बरा झाला..'' त्याच्या घरचे जवळचे आणखी चारसहा जण जमले. घोडा चालताना बघून सगळयांना आनंद झाला. एकजण म्हणाला, ``भले भले शाबास. आता याबद्दल जेवण पायजे.''
``अरे हूनजाऊदे. देतो जेवण. आपल्याकडं बोकड आहेच की, तेच आख्खं कापतो!!''
प्रेषक : वसंत नेने, १५५ लोकमान्यनगर, इंदोर(म.प्र.) मोबा.९४२५९६१४१७

काश्मीरकरांची संवादभेट
भारताच्या उत्तरेला जम्मू काश्मीरात सतत अशांत परिस्थिती राहिली. त्याची राजकीय कारणे आणि परिणाम काहीही असले तरी तेथील सामान्य जनतेला आपल्या दैनंदिन आयुष्याचे प्रश्ण कसे सोडवायचे याची विवंचना असते. आधीच तो प्रदेश भारताच्या प्रवेशद्वारी असल्याने आक्रमणांना बळी पडत आला आहे. गेल्या एकदोन शतकंात साऱ्या जगात उद्योगीकरण फैलावले, पण त्यापासून काश्मीर व पूर्वांचल क्षेत्र कोेसो दूर राहिले; कारण तिथे दळणवळणाची साधनेही पोचलेली नव्हती, उद्योगीकरणास लागणारा कच्चा माल तिथे नाही, लोकसंख्या  विरळ असल्याने मजूर कमी... या सगळयांमुळे उर्वरित भूप्रदेशाचे तिकडे कमी लक्ष राहिले. फाळणीनंतर अतिरेक्यांचा प्रश्न निर्माण झाला. त्यांनी तर हा प्रदेश मानसिक दृष्ट्याही अस्वस्थ करून सोडला.
या सगळयाचा एकत्रित परिणाम म्हणजे येथील जनता बाकीच्या राज्यांच्या मानाने मागे राहिली. पर्यटनाचा एकमेव चालता उद्योग, तोही अडचणीत आल्यावर लोकांची आवक घटली. शिक्षण मागे पडले. उर्वरित भारतापासून दुरावलेपण वाढत गेले.
हे सगळे लक्षात घेऊन काही स्वयंसेवी संघटना त्या समस्यांवर उपाय शोधू लागल्या, आणि त्यांना खूप कमी गतीने का असेना, पण चांगले यश दिसू लागले आहे.आज अनेक समस्यांचे मूळ तेथील लोकांच्या मानसिक दुरावलेपणात आहे. ते दुरावलेवण कमी होऊन एकमेकांस मदतीचा हात मिळवून देण्याचा प्रयत्न, पुण्याची असीम फौंडेशन ही संस्था करत असते. जम्मू काश्मीर तसेच ईशान्य भारतात समाजातील दुर्बल घटकाच्या सबलीकरणाचे व संवादाचे पूल बांधून, उर्वरित भारताला या भागाशी जोडण्याचे संस्थेचे काम गेली १४ वर्षे सुरू आहे. शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, व्यवसायांसाठी मार्गदर्शन, सामाजिक जागृती, स्थानिक उद्योगांच्या विकासाला चालना देणे, आणि नवनव्या कल्पनांसाठी संशोधन करणे इत्यादी अंगांनी संस्थेचे काम चालते.
या कामाचा एक भाग म्हणून काश्मीरमधल्या काही युवकांना `असीम'च्या वतीने महाराष्ट्नची भेट घडवून आणली गेली. सतत धुमसणाऱ्या  अस्वस्थ वातावरणातून, अनुकूल आणि सुस्थिर अशा महाराष्ट्नत त्या युवकांना आणण्याचा हेतू  स्पष्ट होता. इकडच्या उद्योजकतेशी, सामान्य परिस्थितीशी, सामाजिकतेशी  त्यांचा परीचय  घडविणे आणि खुल्या चर्चेतून त्यांच्यात एक विश्वास जागविणे की, या प्रकारचे मोकळे व विक सनशील आयुष्य तेही घडवू शकतात.
यासाठी केलेल्या नियोजनानुसार काश्मीरमधून १० युवक पुण्यात पोचले. `असीम'च्या वतीने त्यांचे स्वागत वगैरे झाल्यावर पुण्याच्या जवळच  विज्ञान आश्रम येथे त्यांनी भेट दिली. अतिशय सोप्या सोप्या कल्पनांतून वैज्ञानिक तत्वे कशी वापरली जातात हे त्यांना पाहता आले. अशा तत्वांंवर आधारित  छोटे उद्योग त्यांना दाखविण्यात आले, ते त्यांना खूप प्रेरक वाटले. आमने-सामने (फेस टू फेस) या अनौपचारिक कार्यक्रमातून , काश्मीर समजून घेण्यासाठी पुणेकरांनी या युवकांबरोबर चर्चा केली. पुण्यातील लोकांच्या आत्मीय भावनाही काश्मीरकरांंना समजल्या.
महाराष्ट्नतला साखर कारखाना पाहण्याची उत्सुकता या पाहुण्यांना होती. त्यानिमित्ताने सांगली भागात जाण्याचे ठरले होते. सांगलीजवळच, पण कर्नाटक हद्दीत असलेल्या उगार येथील शिरगावकर यांच्या कारखान्यास त्या युवकांनी भेट दिली. तेथील चेअरमन श्री.राजाभाऊ शिरगावकर  यांची भेट झाली. ८० वर्षे वयाच्या या सक्रीय  व उत्साही व्यक्तिमत्वाशी मनमोकळी चर्चा त्या तरुणांना मार्गदर्शक आणि प्रेरणादायक वाटली. त्यांनी सर्व कारखाना फिरून दाखविला.
सांगलीचे श्री.किशोर लुल्ला यांनी केलेल्या नियोजनानुसार संध्याकाळी मिरज येथे त्यांचा पाहुणचार झाला. त्यांच्या  व्हिस्परिंग वुड्स या अतिथीगृहात गप्पागोष्टी झाल्या. स्वत: किशोरजी लुल्ला, दीप्ती कुलकर्णी, रणधीर पटवर्धन, मयूर अभ्यंकर, धनंजय वाघ यांनी पुष्कळ माहिती दिली. उद्योजकता म्हणजे नेमके काय; कठीण परिस्थिती उद्योगांत कशी येऊ शकते; अनुकूल व प्रतिकूल गोष्टी कोणत्या; पुढे मार्ग कसा काढता येतो... अशा अनेक गोष्टी चर्चेत आल्या. शून्यातून विश्व निर्माण करण्याची उर्मी या चर्चेतून त्या तरुणांत निर्माण झाली असणार ! त्यानंतरच्या भोजनात खास मराठी  बेत होता, त्याचा आस्वाद त्या मंडळींंनी चवीढवीने घेतला.
दुसऱ्या दिवशी सगळेे गोव्याच्या सहलीला गेले. रायेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ इंजि. अँंड टेक्नॉलॉजी या संस्थेचे आमंत्रण होते. त्या महाविद्यालयाच्या भेटीत  परिसर पाहणी व परिचय झाला. कोलवा समुद्रकिनारी हे युवक फारच खूश झाले. मराठी मनाला जसे हिमालयाचे अप्रूप असते, तसे त्या पोेेेेरांना समुद्राचे होेते. पुढच्याच दिवशी  कोकणी नृत्याने त्यांचे रंजन झाले. आतापर्यंतच्या अनुभवामुळे या तरुणांची भीड चेपली होती. त्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांपुढे हे काश्मिरी युवक व्यासपीठावरून दिलखुलास बोलले.  या सर्व कार्यक्रमाची सांगता गोवादर्शन फेरीने झाली. काश्मीरकर पुण्याकडे रवाना झाले. तिथून ते काश्मीरला निघाले.
या काश्मिरी गटात सगळे मुस्लीम धर्मी होते हे तर उघडच आहे. त्यात होतकरू उद्योजक, आणि शेतकरीही होते. शिया - सुन्नी पंथसंघर्षात त्यांना काही स्वारस्य दिसलेच नाही. पाकिस्तानात तोे संघर्ष चालू आहे याची त्यांना कल्पना आहे. अर्थातच पाकिस्तानात जाण्याला ते अजिबात उत्सुक नाहीत.  काश्मीरात अनिश्चित वातावरण  असूनही तेथे बऱ्यापैकी उद्योेगधंदे वाढत आहेत, पण त्यास स्वाभाविक मर्यादा आहेत. भारताच्या  इतर राज्यांतील लोकांनी पुरेसे सहकार्य केल्याशिवाय त्यात वाढ होणार नाही, असे काश्मीरच्या लोकांचे मत असल्याचे त्यांनी  नमूद केले. काश्मीरच्या लोकांवर आणि तेथील उत्पादनांवर विश्वास वाढविण्यासाठी ही मदत हवी आहे. परस्पर सौहार्दाच्या वातावरणातच काश्मीरात वेगाने बदल होईल असे तेथील सर्वसामान्य माणसाला वाटते.
असीम फाउंंडेेशन आणि टीबी लुल्ला चॅीरटेबल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमानेे हा उपक्रम घेण्यात आला. त्यांतून त्या पाहुण्यांना आणि इथल्याही लोकांना एक वेगळा सामाजिक प्रवाह जाणून घेता आला हा मोठाच लाभ म्हणता येईल. काश्मीरच्या बाबतीत, `परदु:ख शीतल' म्हणतात तशी आपली वृत्ती असते. त्यास नवी दिशा देणारा हा प्रयोग होता. परतीच्या वाटेवर त्या युवकांनी  आपली महाराष्ट्न् भेट सार्थकी लागल्याची भावना वारंवार व्यक्त केली. `असीम'चा त्यांच्याशी पुढच्या वर्षभरात सतत संपर्क राहीलच, आणि त्यांना स्वत:चा उद्योग तिथे सुरू करण्यासाठी शक्य ती मदतही करेल. आपल्यांतील ज्या संस्था किंवा कार्यकत्यांच्या गटाला अशा प्रकल्पात मदत करण्याची असेल, त्यांचे स्वागतच आहे.

चार वर्षांपूर्वी असीमने लडाखचा भाग समजून घ्यायला सुरुवात केली. तीन वर्षांपूर्वी या भागातून पहिला मैत्री आणि अभ्यास दौरा महाराष्ट्न् भेटीवर आला. नात्यांचा विश्वास एवढा की दोन वर्षांपूर्वी या भागातून शिक्षणासाठी पुण्यामध्ये तिघीजणी दाखल झाल्या. पण काही महिन्यात त्या सगळयांच्या कुटुंबात लहान बहिणींची भर पडली. जवळपास दहा जणांनी पुण्यात येण्यासाठी उत्साहाने संपर्क साधला आहे. शिक्षणाची तळमळ, नवी आव्हाने स्वीकारण्याची जिद्द आणि या वयात घरापासून लांब राहताना असीमवर दाखवलेला विश्वास प्रशंसनीय आहे. यापैकी काहीजण अतिदुर्गम भागातले, काही शेतकरी कुटुंबातले आहेत. काहींचे वडील सैन्यदलातून निवृत्त आहेत. एक विद्यार्थिनीचे वडील कारगील युद्धात कामी आले आहेत.
या सर्वांसाठी हक्काचे घर उभे करायचे स्वप्न आहे. आपल्या बांधवांमधले संवादाचे पूल उभे करायची एक मोठी संधी आहे. हे घर -आपले घर - आणि त्यातून एक शैक्षणिक नाते तयार करायला आपण सर्वजण साथ देणार ना?
संपर्क : टी बी लुल्ला चॅरिटेबल फाउंंडेशन
अभ्यंकर कॉम्लेक्स, आंबराई रोड , सांगली
फोन : (०२३३) २३७५३७४

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन