Skip to main content

14 march 2016

बेने इस्त्रायल
- नोेहा मस्सील
इसवी सनाच्या पूर्व ५८६मध्ये बाबिलोनच्या राजाने जेरुसलेमवर स्वारी केली, आणि ज्यूंची धर्मस्थळे उध्वस्त केली. पुढे इराणच्या शहाने जेरूसलेम जिंकून घेतले व ज्यूंना पुन्हा प्रार्थनामंदिरे बांधण्याची परवानगी दिली. त्याच्या राज्यात ज्यू समाज सुखाने नांदला. काही शतकांनंतर टायटस या रोमन सरदाराने जेरुसलेम पुन्हा जिंकले, त्याने ज्यूंची मोठ्या प्रमाणात कत्तल केली. त्यातून जीव वाचविण्यासाठी असंख्य ज्यू वाट फुटेल तिकडे पळत राहिले. काही युरोपमध्ये गेले, काही मध्यपूर्वेला पळाले. काही ज्यूंना त्यांच्या दर्यावर्दी पेशामुळे व व्यापारामुुळे भारत माहीत होता. असे लोक छोट्या मोठ्या गलबतांत बसून भारताकडे निघाले. तथापि हे त्यांचे भारताकडे निघणे ठरवून होते की समुद्रातील प्रवाहांमुळे घडले, याबाबत आज कसे कोण सांंगू शकणार?
     त्यांचा प्रवास महाखडतर असणार हे तर नक्कीच आहे. त्यात अनेकांची गलबते फुटली, कित्ेकांना जलसमाधी मिळाली.जे कोणी वाचले किंवा अर्धमेले  झाले होते, ते भारताच्या पश्चिम किनारी कोकणातील अलीबागजवळ  चौल (नौगाव) बंदराशी लागले.  सुदैवाने जिवानिशी वाचलेल्या त्या लोकांत ७पुरुष आणि ७स्त्रिया असे १४जण होते. त्यांच्याबरोबर अनेक दुर्दैवी सहप्रवाशांचे मृतदेह सागराने चौलच्या किनाऱ्यावर आणून टाकले होेते. स्थानिक कोकणवासीयांनी धर्मकर्तव्य म्हणून त्या मृतदेहांचे आपल्या पध्दतीने दहन करण्याचे ठरविले, पण त्या ज्यू मंंडळीस त्या देहांचे त्यांच्या रीतीने दफन व्हावे असे वाटत होते. ज्यूंना हिब्रूशिवाय दुसरी भाषा येत नव्हती आणि  स्थानिकांना मराठीशिवाय अन्य भाषेचा गंधही नव्हता. खाणाखुणांनी संवाद झाला, आणि त्यांच्यातील पुरुष एकत्र व महिला एकत्र असा सामुदायिक दफनविधी झाला. नौगावच्या समुद्रकिनाऱ्यावर ज्यू लोकांची ती एकत्रित दफनभूमी आजही दिेसेल.
तिथे उतरलेले ज्यू, बायबलमधील परंपरेप्रमाणे स्वत:ला  `बेने इस्रायल' म्हणवू लागले. त्यांनी तिथे हळूहळू छोटी घरे बांधली, उद्योग आरंभला. भारतातील सहधार्मिक जीवनाचा तेही एक भाग बनून गेले. या मंडळींचे स्थानिकांशी वागणे अर्थातच नम्रतेचे व सौहार्दाचे होते.  स्थानिक लोकांंनीही त्यांच्याशी सहजीवनाचे संबंध ठेवले. ज्यूंना अजिबात त्रास न झालेला भारत हा एकमेव देश आहे. त्याचबरोबर आणखी एक नोंद घेण्याजोगी म्हणजे परदेशांतून भारतात आश्रयाला आलेल्या समुदायांपैकी बेने इस्रायल हा पहिला धर्मसमूह आहे, बाकीचे त्यानंतर आले. प्रथम आलेले आाणि आपला धर्म व परंपरा जपत असूनही येथील समाजाबरोबर सामंजस्याने वर्षानुवर्षे सहजीवन व्यतीत करणारे बेने इस्रायल हे होत. केरळमधील कोचीन ज्यू, व्यापारासाठी भारतात आलेले बगदादी ज्यूू यांचा इतिहास वेगळा आहे.
समुद्रातून येताना त्यांचे धर्मग्रंथ, पंचांगे हे नष्ट झालेच होते, त्यामुळे काही प्रथा परंपरा पाळायच्या तर ज्या काहींना त्यांच्या `तोरा' वगैरेचा काही भाग पाठ होता, त्यांच्यावर विसंबून त्यांचे धर्मपालन सुरू झाले. त्या काळात  `ज्यू' हे नाव प्रचलित नव्हते, त्यांनीच बेने इस्रायल(इस्रायलचे पुत्र) हे नाव स्वीकारले. स्थानिक लोकही त्यांना त्याच नावाने ओळखू लागले. इस्रायलमध्ये म्हटली जाणारी  `शेमा' ही प्रार्थना त्यांनी चालू ठेवली. शनिवार हा पवित्र दिवस(शब्बाथ), मुलाची सुंता करणे (ब्रीथमीला), जन्ममृत्यू वेळच्या धार्मिक प्रथा  हे सर्व ते लोक धर्माज्ञा (मित्सवोत) म्हणून पाळू लागले.  त्यांच्यानंतरच्या पिढ्या इथे वाढू लागल्या, त्यांतील तरुण शेतमजुरी, पशूपालन, व इतर कामे करू लागले, तेल गाळण्याचा उद्योग बऱ्याच जणांनी सुरू केला, कारण त्यांचा तो पूर्वीचा व्यवसाय होता, त्यामुळे त्यात त्यांनी प्रावीण्य मिळविले. इतर समाजातील लोक त्यांना `शनवार तेली' म्हणू लागले. इतरांपासून आपले वेगळेपण दिसण्यासाठी पुरुष दाढीमिशा राखू लागले. या मंडळींनी धर्म कट्टरपणे जपला. मुलांची नावे ठेवण्यासाठी बायबलचाच आधार घेतला.
परंतु साहचर्यामुळे दैनंदिन जीवनात आणि रिवाजांत फरक पडत जाणे अटळ असते. भारतीय परंपरा त्यांंच्या नावांत अलगद प्रवर्तित झाल्या. पुरुषांच्या नावांत `जी' आणि बायकांच्या नावांत `बाई' येऊ लागले. बायबलमधल्या मोशे चे  मुसाजी झाले, तर सॅम्युएलचे सामजी! `राहेल'ची राहीलबाई, आणि दिना ची दिनाबाई झाली. पुढे  काही लोकांनी स्थानिक नावेही स्वीकारली. गावांवरून आडनाव तयार करण्याची कोकणातील प्रथा त्यांंनी घेतली.  चौल चे चौलकर, तळयाचे तळकर आडनाव त्यांनीही घेतले. हा समाज कोकणातील आवास, किहीम, खंडाळा, कुरूळ, चौल, रेवदंडा, तळे, म्हसळे, श्रीवर्धन, पेण, पाली अशा आजूबाजूला पसरला. भारतात येताना त्यांनी आपली हिब्रू भाषा आणली होती, पण कोकणातील मराठी त्यांनी आत्मसात केली,तिचा वापर करू लागले. ज्यांना धार्मिक प्रार्थना पाठ होत्या त्यांनी त्या मराठीत लिहून ठेवल्या आणि त्यांचा वापर धार्मिक कार्यक्रमांत होऊ लागला.
     जगभरातील ज्यूूंपासून बेने इस्रायल शतकानुशतके संपर्कहीन होते. येथील जनतेच्या सौहार्दामुळे त्यांना विरोधाचा किंवा द्वेषाचा त्रास झाला नाही. आता काही खेडेगावांत त्यांनी ग्रामपंचायतीतही स्थान मिळविले आहे. त्यांना आपोआपच सामाजिक स्थान प्राप्त होत गेले आहे. इतकेच नव्हे तर प्रसंगविशेषी त्यांचे मार्गदर्शनही घेतले जाते. अशा तऱ्हेने बेनेे इस्रायल हा अत्यल्पसंख्य समाज कोकणातील सामाजिक व कृषीजीवनात आपले स्थान निर्माण करून राहिला. यथावकाश इस्रायलच्या निर्मितीनंतर काही लोक त्यांच्या त्या भूमीत परत जाण्याचा  निर्णय घेऊ पाहात होते, त्यासाठी त्यांनी सन्मान्य संघटनाही केली. आता ते लोक भारत इस्रायलच्या संबंधातील महत्वाचा दुवा म्हणून काम करू इच्छितात, त्यांंच्या  भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमांना इस्रायलमध्ेय चांगला प्रतिसाद मिळत आहे.  
- भारतीय बेने इस्रायल समाज                                                                      
संपादक : उरी मस्सील
(अनुवाद - अरुण गोडबोले, सातारा)

नोहा मस्सील
  जन्म १९४६, कोकणातील तळे(म्हसळे) या गावी. मूळ आडनाव म्हशीळकर, त्याचे मस्सील झाले. त्यांचे वडील तळयाला सुतारकाम करून बैलघाणा चालवीत. नोहाच्या मराठी शाळेत मुले हात जोडून प्रार्थना  म्हणत. नोहा प्रार्र्थना सांगे, पण ज्यू धर्मात हात जोडत नाहीत, तशी सवलत त्याला देण्याएवढे शिक्षक सहिष्णू होते. सर्वच गावकरी त्या ज्यूंच्या धर्मपालनाला कधी विरोध न करता आनंदाने  संमती देत. गायन स्पर्धेसाठी  पद्ये लिहून त्यांस चाली लावण्यात नोहाचा बालपणी हातखण्डा होता. त्या काळच्या भेंड्या(अंताक्षरी) लावताना मुली जिंकायच्या, मग नोहा जागेवरच कविता करून चालीवर म्हणत, त्याबद्दल तक्रार झाली. मुख्याध्यापकांनी बोलावून घेतले, पण शीघ्र कवित्वाबद्दल कौतुक करून  प्रोत्साहन दिले.
     मुंबईला आल्यावर त्यांचे मामा अब्राहम शालोम तळेगावकर यांच्या कंपनीत ते काम करू लागले. ते मराठी वार्तालेेखन करीत. `काव्यनाद' आणि नुकताच `माझी मायमराठी' असे त्यांचेे कवितासंग्रह. मनावरील पगडा आणि पितृभूमीचा ध्यास यांमुळे ते १९७०साली इस्रायलला स्थलांतरित झाले. त्यांच्या मनात भारतातील जडणघडणीच्या स्मृती ताज्या आहेत. तिथे त्यांच्यासह आयझेक दिवेकर, एच डी हयाम्स, सॅम्सन यांनी `दि सेेंट्न्ल ऑर्गनायझेशन ऑफ इंडियन ज्यूज्' ही संघटना स्थापन केली. त्यांना `भारताचे इस्रायलमधील अनधिकृत राजदूत' असे म्हणतात. दरवर्षी ते सपत्निक भारतात येतात, स्नेहबंध जपतात. त्यांनी `मायबोली' हे एकमेव मराठी त्रैमासिक १९८५ला प्रथम प्रकाशित केले, ते त्याचे प्रमुख संपादक आहेत.

सर्व काही धर्म आणि कर्मा%कर्म । चुकलिया वर्म व्यर्थ जाती
व्यर्थ जाती जन्म ज्ञानावाचूनिया । केले कष्ट वाया निरर्थक ।
    - रामदास

केवळ डान्स, फुसका बार
डान्सबारवरती बंदी घालण्याचा निर्णय आता कोेर्टाकडून रद्द होणार अशी स्पष्ट चिन्हे आहेत. याआधी समलिंगी संबंधांवर बंदी घालण्याचा सरकारचा प्रयत्न फसला. असल्या नसत्या कारभारात व्यर्थ जाणारी सरकारची शक्ती वाचली, त्याबद्दल साऱ्या सरकारी यंत्रणेचे अभिनंदन करायला हवे. त्यात पोलिसांना आपली शेंदाड शिपाईगिरी दाखविण्यास वाव राहिला नाही ही त्यांची थोडी पंचाईत, पण बाकीच्या प्रशासनाचे व न्यायालयांचेही बरेच काम वाचेल. आता सरकारही इरेला पडून कायदा दुरुस्त करण्याच्या मागे जाण्याचा संभव आहे, पण ती बाब तितकी सोपी नाही. एकंदरीत सरकारने सरकारचे काम करायचे सोडून असल्या संस्कृती संरक्षण उद्योगापायी झटावे असे काही नव्हते. समाज सत्शील राहावा, वागावा यासाठी सध्या असलेले कायदे नीट राबविले तरी पुरेसे आहे.

डान्सबार असावेत किंवा समलिंगी प्रथा असावी असा किंचित्मात्र भाव नाही. पण शासन आणि न्यायालये यांना त्यात करता येण्याजोगे काहीही नाही, हे स्पष्ट आहे. त्यात व्यक्तीस्वातंत्र्य जपणे वगैरे अतिपुरोगामी विचारही नाही, कारण व्यक्ती ही शेवटी समाजाचीच घटक असते. तिच्या बेताल वागण्याचा समाजावर अनिष्ट परिणाम होत असेल, समाजाचे अहित होत असेल तर ते वागणे कायद्याने रोखलेच पाहिजे. या दोन्ही किंवा त्या प्रकारच्या अन्य बाबतीत व्यक्तीच्या अनैतिकतेचे समर्थन नसले तरी ते  बेतालपण हा व्यक्तिगत मामलाच होतो, व तो साधारणत: लपून छपून चालत असल्यामुळे रोखणेही शक्य नसते. परंतु आपण या जनसामान्यांची व त्यांच्या भविष्याची किती काळजी वाहतो हे प्रचारकी थाटाने दर्शविण्यासाठी या कायद्यांची सरकारला जास्त गरज वाटते, आणि तसले कायदे मंजूर होऊन ते न्यायालयातही टिकणे  हा वृथा अहंतेचा   -ईगो चा प्रश्न बनतो.

डान्सबारना बंदी घालण्याचा विषय महाराष्ट्नत आधीच्या काँग्रेस सरकारने आणला. त्यांचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी त्यासाठी आपली तडफ इरेला घातली. त्यांच्या सरकारमधील काही मंत्र्यांचेे भ्रष्टाचार आता फसफसू लागले आहेत, ते त्यावेळच्या मंत्रीमंडळास अजिबात ठाऊकच नव्हते असे मानता येत नाही. ते रोखणे वास्तविक अधिक गरजेचे होते. किंबहुना मुंबईतल्या कुठल्यातरी हायफाय हॉटेलात चालणारी ती नृत्ये असा कितीजणांवर अनिष्ट परिणाम करतात? त्या मानाने दिल्लीचे महाराष्ट्न् सदनाचे बांधकाम किंवा १५९ जल सिंचन-प्रकल्पांची नियमबाह्य कामे होण्याचे प्रकार जास्त अनैतिक नाहीत काय? स्वत: कै. पाटील हे तंबाखूच्या आहारी गेल्यामुळे त्यांचेच सहकारी अजित पवार यांच्या जाहीर टीकेचे कारण झाले होते, आणि कदाचित त्याच व्यसनाचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागले. हे सर्व नैतिक नव्हतेच, पण ते साऱ्या समाजाच्या आरोग्यास बाधक होते. आजही थंुकणे हा सर्वांंसाठी आरोग्य-घातक प्रकार जाहीरपणे चालतो, पोलीस वकील खासदार हे सगळे  त्यात सामील आहेत. त्याविरोधी कायदा असूनही ते थांबत नाही, हाच सरकारचा स्पष्ट अनैतिक कारभार आहे, तिथे हे सरकार सामान्य जनांच्या नैतिक वर्तणुकीसाठी कसले काम करणार?

मुळात अश्लीलता आणि अनैतिकता यांच्यात भेद असतो.साधारण समाजाला श्लील-अश्लीलतेशी फार देणेघेणे नसते. आजकालचे कित्येक सिनेमे आणि नाटकेसुध्दा पूर्वीच्या मानाने खूप बहकलेली आहेत. काही कविता आणि कथा जाहीर वाचल्या जातात, त्या एके काळी उच्चारल्या तर मार खावा लागला असता. कला आणि समाज यांबाबत चर्चा करताना `प्रतिभासाधन' या पुस्तकात ना सी फडके यांनी या मुद्द्याबाबत  म्हटले की, एखाद्याने आपल्या लेखनात स्त्री-पुरुषांच्या बाह्य संबंधांचे वर्णन केले, तर ते  (त्या काळात) अनैतिक ठरेल, पण त्यात अश्लील तर काही नाही. याउलट कुणी पतिपत्नीच्या रतिरंगाचे यथेच्छ वर्णन केले तर ते अश्लील वाटेल  (हेही त्या काळात), पण त्यात अनैतिक काय आहे? तथापि हे  (त्या काळातसुध्दा) स्वयंस्पष्ट आहे की तो रतिरंग त्यांच्या शय्यागृहाऐवजी बाहेरच्या चौपाटीवर सुरू झाला तर ते अनैतिक ठरते, कारण त्याचा इतरांंवर अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे काही हॉटेलांतून रंग उधळणाऱ्या श्रीमंत लोकांच्या वागण्याचा परिणाम होऊन समाज बिघडण्याची शक्यता किती? गावोगावचे तमाशे बघणे हेही तितक्याच वाईटपणे घेण्याचा एक काळ होता. आता त्यांचे खेळ शहरांतल्या रंगमंचांवर होतात आणि त्यांतील कलाकारांना गौरव पुरस्कारही दिले जातात. लावण्यांचे खेळ  `खास महिलांंंसाठी' होतात, आणि ते शिट्ट्यांच्या गदारोळात पार पडतात. त्या बाबतीत स्त्रीस्वातंत्र्याच्या कैवाराआड दडण्याचे कारण नाही. ज्यांना तितकी रसिकता असेल त्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा, इतर कुणी त्यास पांचट वाह्यातपणा म्हटले तर त्यांच्यावर उसळू नये. मुकाट्याने आपापले रंग खेळावेत.

ज्या गोष्टी लपून छपून चालतात त्या अनैतिक आहेत हे मुळात त्या गोष्टी करणाऱ्यांनाही माहीत आहे. आपल्याच हाताने स्वत:च्या छोट्या पोरातेंाडी दारूचा पेला देणारा बाप असेल असे वाटत नाही. `आमचं मातेरं झालं, पण पोराला ती लागण होऊ नये' हे जोपर्यंत दारुड्या बापाला वाटते आहे तोपर्यंत जग सुधारण्याची आशा आहेच. ते काम सरकारचे नाही, पण ते काम जे कोणी करत असतील त्यांच्यामागे बळ उभे करणे सरकारला शक्य असते, ते त्याने करावे. ज्या गावांत दारूभट्ट्या बंद होण्यासाठी महिला पुढाकार घेतात, त्यांना तिथे सरकारच्या पोलीसांची मदत नसते, असली तर दारूवाल्यास फूस असते. म्हणजे ज्यांना नीतीची आणि आपल्या विस्कटत्या संसाराची काळजी आहे, त्यांच्या तडफेला सरकारचा पाठिंबा नाही, पण जी गोष्ट खड्ड्यात पडणाऱ्या अन् पाडणाऱ्या दोघांना हवी आहे, आणि ज्याच्याशी समाजाच्या हिताशी प्रत्यक्ष संबंध नाही, त्या गोष्टी आपल्या अंगावर ओढवून घेण्याचे सरकारला काय कारण पडले होते?

कोर्टाच्या फटक्यानंतर आता तरी सरकारने असल्या उचापतीतून अंग काढून घ्यावे. उगीच  `तिथे सीसीक्रॅमेरे लावावेत, त्याचे शूटिंग घ्यावे, पारदर्शक काच नसावी  - की असावी..., असल्या काही तरी अटींचे जंजाळ वाढवू नये. पोलिसांना त्यांच्या आवडीचे असले काम ठेवू नये. अशा प्रकारचे संस्कृती संरक्षक वाटणारे कायदे वेचून ते कमी करावेत. असे म्हणण्यात व्यक्तीस्वातंत्र्याचा कैवार नाही तर त्या कायद्यांची निरर्र्थकतता आहे. सरळ माणसांना ताप देण्यासाठी तेे कायदे पोलीसांना उपयोगी पडतात. त्याऐवजी रहदारीत सिग्नलला थांबणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, अन्नपाण्याची जाहीर नासाडी रोखणे, मंत्र्यांचे नाहक दौरे थांबविणे हे सरकार सहज करू शकते. जिथे कठोर प्रशासन आवश्यक आहे तिथे सरकार बघत बसते, आणि शाळांतील मुलांचे संमेलन, कामगार साहित्य संमेलन, नाट्यगौरव समारंभ ...असल्या निरर्थक सांस्कृतिक बाष्कळीत शक्ती खर्च करते. त्यामुळे मग जाहीर तोंडफोड होऊन ते बारवाले सोकावतात. तसल्या अयोग्य बाबींना बळकटी मिळते. ज्यांना समाजाच्या भविष्याची, नीतीची, शीलाची, प्रतिष्ठेची चिंता असते त्यांनाही मग   सभोवतीच्या अर्वाच्य किंकाळयांपुढे खाली मान घालावी लागते.

सरकारने कठोर प्रशासन राबवावे, आणि संस्कृतीचे सर्व घटक, सर्व अंगे समाजातील शहाण्यासुरत्या लोकांवर सोपवून द्यावीत. त्यंाना त्यांची जबाबदारी कळत नसेल तर सरकार तरी अशा बाबतीत कसे कुठे पुरणार आहे? मटका बंद करावा हे लोकांना कळते, त्यास सरकामधील काही लोकांचा पाठिंबा असतो. ती मुळी वाढू देऊ नये. मटक्यावर बंदी शक्य होणार नाही, त्यात शक्ती घालवू नये. संसार चांगला चालला आहे हे सांगण्यासाठी उगीच प्रचारकी करावी लागत नाही. संसाराची शिस्त व्यवस्था व संपन्नता घरच्या लोकांस, -शेजाऱ्यांसही नेमकी कळते; तसेच सरकारचे आहे. दारू मटका डान्सबार यांस बंदी घालून सरकार सुसंंस्कृत नीतिमान वगैरे ठरणार नाही, त्या प्रकारांंना बाहेरच्या जगात मातू देऊ नये एवढे पुरेसे आहे.

 उत्तरांचे प्रश्न
मी माझ्या धर्माशी निष्ठा बाळगतोच, पण माझ्या मनात काही प्रश्नांचे काहूर  उठते, त्यास उत्तर देणे मला अवघड वाटू लागते. आपल्यातील काही `धर्मनिष्ठ लोकां'साठी  मी  ते प्रश्न उपस्थित करतो आहे. टॉवर्स बांधण्यासाठी झोपडपट्ट्या झाडे जाळणारे बिल्डर्स, आणि इंद्रप्रस्थ वसविण्यासाठी खांडववन जाळून नागलोकांना देशोधडी लावणारे पांडव यांच्यात फरक काय?भीमाची हिडिंंबा, अर्जुनाच्या चित्रांगदा व उलुपी या पांंडवपत्नी माहेरीच का राहिल्या?
अलेक्झांडर, मोंगल व इतर आक्रमकांना निमंत्रणे देऊन इथे पायघड्या घालणारे लोक कोण होते? सोरटी सोमनाथाच्या मंदिराचे दरवाजे सुलतानांस उघडून देणारे कोण होते?ज्ञानेश्वर तुकारामादि संतांस उपद्रव देणारे कोण होते? पानिपतच्या तिसऱ्या लढाईत पेशव्यांंचा तोफखाना-प्रमुख कोण होता, तो अब्दालीस सामील का झाला नाही? ब्रिटिश येण्यापूर्वी  आपल्या प्रजेला नाडणारे व एकमेकांत भांडणारे संस्थानिक कोण होते?  दिल्लीच्या बहादुरशाह जफरची घोषणा बादशहा म्हणून करणारे ५७चे स्वातंत्र्यवीर, देशभक्त नव्हते का? हवामान,भाषा, संस्कृती हे सारे काही अपरिचित असूनही ईशान्य भारतात मिशनऱ्यांनी वर्षानुवर्षे काम केले, आपल्याला तो प्रदेश इतकी वर्षे आपला का वाटला नाही? लाच खाणारे, जमिनी हडप करणारे, डी जे -फटाके -दारू यांसह धिंगाणा घालून समाजाला उच्छाद आणणारे, व नियम मोडणाऱ्यांच्या पाठीशी उभारणारेे पुढारी यांंचा धर्म कोणता?देशप्रेम व राष्ट्न्भक्ती यांंचा दाखला कोणत्या विद्यापीठात मिळतो?
     या प्रश्नांची उत्तरे मनाशी देऊ पाहिल्यास मलाच धर्मसंकट वाटू लागते.
- विलास फडके, जांभूळगाव (जि.पुणे)
फोन ९४२११ ७०११५  

जिभेवर ताबा
     माणसाच्या शरीरातील जीभ हा वैशिष्ट्यपूर्ण अवयव आहे. जिभेला चिरकाल यौवन प्राप्त आहे. माणूस वृध्द होतो, देहावरती सुरकुत्या पडतात पण त्याची जीभ म्हातारी होत नाही. तिचा आवेश तसाच राहतो. जीभ खूप लहान असते पण तिच्यावर ताबा मिळवणे फार अवघड. अतिश्रमाने शरीराचे  इतर अवयव थकतात पण जिभेला थकवा कधी जाणवत नाही. जे लोक खाण्याच्या व बोलण्याच्या बाबतीत जिभेवर ताबा मिळवतात ते सुखी होतात.
- ए.जी.पलसे, जयसिंगपूर
फोन : ९९७५७६ १९०९

.......... वाद - संवाद .........
बोधवचन विवाद्य वाटते
     फेब्रुवारीच्या आपल्या अंकात शीर्षभागी असे बोधवचन आहे : `प्रकृतीशी सतत जुळते घेतले तर प्रगती थांबेल.हे घर मनुष्याने कसे बांधले? प्रकृतीशी संघर्ष करून झगडून; जुळवून नव्हे!' या विधानास थोडा संदर्भ दिला असता तर बरे झाले असते. टोलेजंग, नाना सुखसोयींनी युक्त घरे बांधणे हे प्रगतीचे गमक आहे काय?
     माणसाने स्वत:च्या सुखसोयींखातर प्रकृतीशी संघर्ष चालविला आहे. त्याने जगातले प्राणीवंश, वनस्पती नष्टप्राय केले आहेत. संकरांंचा सपाटा चालविला आणि पृथ्वीबरोबरच स्वत: दुर्बल होण्याचा विडा उचलला आहे. जराजर्जर, वैफल्यग्रस्त आयुष्यवाढ झाली आहे. प्रकृतीशी संघर्ष करीत राहण्याचाच हा परिणाम नव्हे काय? प्रकृतीशी जुळते घेणारा माणूसच सुखी असलेला दिसत नाही काय?
- म.वि.कोल्हटकर, सातारा फोन : (०२१६२)२३२५०४
संवाद
      प्राचीन माणूस मुक्त अवस्थेत होता, त्यापेक्षा आज जो काही आहे, तो प्रगत किंवा सुखी मानावा की नाही, याच्याशी वरील वचनाचा संबंध आहे. सुख कशात मानायचे  हे एकदा ठरले की मग त्या दिशेने होणारी प्रगती मोजता येईल. भौतिक सोयींनी सुख मिळते का हा तत्वचिंतकांचा चिरंतन प्रश्न आहे; आणि त्या सुखसोयींनी खरेे सुख मिळत नाही, हे त्यंाचे चिरंतन उत्तर आहे. तथापि त्याच त्या सोयीसुविधांसाठी पिढ्यान्पिढ्या प्रयत्न चालू आहेे हे तितकेच खरे आहे. पूर्वी कधीकाळी जिथे देवराया आंबराया होत्या, तिथे आज शहरे गजबजली; त्यास आपण `वसती विकसित झाली  - डेव्हलपमेंट झाली' असे म्हणतो. आजकालच्या जगात त्याला प्रगती मानण्याचा प्रघात आहे. माणूस चंद्रावर गेला, ती प्रगती म्हटली जाते. तसे जाण्याचा प्रयत्न करायचा तर प्रकृतीशी जुळवून कसेे घ्यायचे? पक्षी निरीक्षण करणे, झाडे लावणे म्हणजे प्रकृतीशी इमान राखणे होय. पण पक्षी छंदापायी किती प्रकारची किती वैज्ञानिक साधने वापरावी लागतात. दुर्बिणी, क्रॅमेरे, सीडीज्, बॅगा-बूट हे साहित्य तयार करण्यासाठी प्रकृतीवर आक्रमण होते. ते करायचे की नाही? ते न करता ज्ञानदेवांसारखी माणसे हे ब्रम्हांड त्यांच्या प्रतिभेने जाणत असतील, पण सामान्य जनांचे काय? त्यांनी प्रगतीच्या वाटेवर कसे चालायचे?
     प्रवचनकार गोष्ट सांगतात ती खरीच आहे. एक माणूस सुखी माणसाचा सदरा शेाधत फिरत होता. जिथं सुख नांदते आहे तिथं आशेनं तो जायचा, आणि त्याला त्याचा सदरा मागायचा. की तो यजमान आपल्या दु:खाची कर्मकहाणी सांगू लागायचा, तो खरा सुखी नसायचा. शेवटी हा माणूस निराश होऊन गावाबाहेर चालू लागला. नदीकाठी एकजण मुक्तपणी गाण्याच्या लकेरी घेत, पाण्यात पाय सोडून हातवारे करत आपल्या नादात जगाला विसरलेला दिसला. या माणसाला नक्की वाटले की, हाच तो सुखी माणूस ज्याच्या मी शेाधात फिरतो आहे. त्यानं जवळ जाऊन चौकशी केली, `बाबा, तू चांगला सुखी दिसतोस.' तो बाबा म्हणाला, `अर्थात. हे मुक्त आकाश, पायाशी झुुळझुळतं पाणी, हे मंदसुगंधी वारं... सुख याहून वेगळं काय असतं?' या शेाधक माणसाला आनंद झाला. त्यानं विनवलं, ` - तर मग बाबा, मला तुमचा सदरा द्याल?' तो बाबा मंद हसून म्हणाला, `अरे मी आनंदानं दिला असता, पण मला तर सदराच नाही.'
     प्रगत मनाची ही उन्मनी स्थिती हे परम सुख वाटण्याइतकी ज्यांची प्रगती झालेली असेल, त्यांनीसुध्दा प्रकृतीशी पूर्णत: जुळवून घेणे कठीण आहे. बहुश: ती समाधी अवस्था असेल. एरवी प्रकृतीशी संघर्ष हा तर मन असलेल्या माणसाच्या उपजत हव्यासाला अटळ असतो. चाकाच्या शेाधाने माणसाच्या प्रगतीला गती आली, ती चक्रे तयार करण्याची गती आता कुणाला रोखता येत नाही. संघर्ष प्रकृतीशी आहेच पण त्यापेक्षाही तो आपल्या द्विधा मन:स्थितीशी असतो. आपल्या `प्रकृती'शी असतो. रारंगढांग या कादंबरीत एक वाक्य आहे; त्यातला सैन्याधिकारी म्हणतो, `पोलोचा सामना जिंकायचा असेल तर घोड्याची कणव करून चालत नाही.'
     आपल्याला आता मंगळावर जायचे आहे, श्रीमंत व्हायचे आहे, महासत्ता व्हायचे आहे .... तर मग अणुभट्टी हवी, तेल हवे, क्षेपणास्त्रे हवीत. आपण प्रकृतीशी जमवून घेत बसलो तर हे कसे साधणार? न साधून चालेल का? आक्रमक गप्प राहतील का? हे सगळे प्रश्न परस्परावलंबी आहेत. यच्चयावत मानव समाजाने ज्याला प्रगती म्हटले तीच आपण म्हणावी लागते. त्यामुळे निसर्र्गाचा जो तोल ढळेल तो सावरायला निसर्ग समर्थ असतो. तो नैसर्गिक न्याय करतो. म्हणून माणसाला दिलेल्या हव्यासामागे धावणे ही `प्रकृती'च नव्हे काय? - आपले जग

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन