Skip to main content

28march

विनिमयाचे हितकर व्यवहार
गोष्ट तशी जुनीच आहे, ग्रामीण भागातल्या कोणत्याही दवाखान्यात घडणारी! एका रुग्णाईत वृध्देला तपासल्यावर औषध घ्यायला सांगितले, पण ते घेण्यासाठी तिच्याकडं पैसे नव्हते. मग मीच तिला काही पैसे देऊ केले, पण ती तेही घेण्यास तयार होईना. आपल्या म्हातारपणाचा उल्लेख करत ती म्हणाली, ``आता देणा शिल्लक रवतां नये. मी मेलंय तं तुमचा देणा फेडतलो कोण?'' तिच्या प्रांजळपणामुळं मलाही ते पटण्याजोगं होतं. प्रश्न पन्नास-शंभर रुपयांचा नव्हता, पण कोणाची उधारी करणं, उपकाराच्या ओझ्याखाली राहणं त्या खेडूतांना तर नको असतं ना!  मी तिचा चरितार्थ कसा चालतो ते विचारलं, तेव्हा कळलं की नारळीच्या झावळयांचे हीर काढून ती केरसुण्या वळून देण्याचे काम करते. बसल्या जागी तिला हे काम होऊ शकतं.
आपलं औषधपाणी सुध्दा सन्मानानं खरेदी करता यावं यासाठी धडपडणारी ती आजी पाहून मला मोठीच प्रेरणा मिळाली.यापूर्वी मी स्वदेशी जागरण मंचाचे राजीव दीक्षित यांची व्याख्याने, सीडीज् ऐकलेले होते. प्राचीन काळी वस्तूविनिमय पध्दतीने व्यवहार चालत असत त्याचे  समाजधारणेतील मोल मला एकदम त्यावेळी आठवले. आपापले श्रम अथवा उत्पादन यांची देवाण घेवाण केल्यामुळे  सर्वांना सन्मानाने राहता येत होते. कोकणात कालपरवापर्यंत वस्तूविनिमयाच्या रूपाने काही ठिकाणी आठवडी बाजार चालत होते हे मी ऐकून होतो. या पध्दतीचा आजच्या काळात वापर केला तर उपयोग का नाही होणार, असा विचार मनात आल्यावर मीच ती योजना पुढे राबविण्याचे ठरविले. `केल्याने होत आहे रे....' हे सूत्र तर आपण नेहमी ऐकतो.
     आयुर्वेदातही  `दृष्यं देशं बलं कालं...' रुग्णसेेवा करण्याची तंत्रयुक्ती सांगितली आहे. तिचाही वापर करीत ही योजना राबविण्याचे ठरविले. अर्थात त्यात काही शंका होत्या, अडचणी दिसतच होत्या. सगळयाच रुग्णांनी वस्तू आणल्या तर? नाशवंत पदार्थ आणले तर? गरजेपेक्षा जास्त वस्तू आपल्याकडं जमल्या तर? आलेल्या सगळया वस्तूंचे पुढे करायचे काय? आपल्या हिशेबात ही मिळकत दाखवायची कशी? ... असे प्रश्न होतेच. पण ही तत्वेे चुकीची कशी असतील?   सुरुवात तर करू; पुढं काय होतं याचा अभ्यास तर करता येईल असा विचार केला, आणि फलक लावून टाकला!
त्याचा परिणाम फारच उत्तम दिसू लागला. सुरुवातीला रुग्णांनाच थोडं शरमल्यासारखं वाटायचं. पण माझ्या हाताखालच्या सहकाऱ्यांनी त्यांना समजून सांगण्याची प्रथा ठेवली. मग हळूहळू आजूबाजूचे रुग्ण वस्तूरूपात फी आणि औषधाचे पैसेही देऊ लागले. सुरुवात केरसुणीपासून झाली,  या गोष्टीला आता तशी बरीच वर्षे झाली, पण माझे या व्यवहारंात कोणतेही आर्थिक नुकसान झाले नाही. आलेली एकही वस्तू फुकट गेली नाही. माझ्या घरात ज्या वस्तू वापरण्यासारख्या नव्हत्या त्या मी परत दवाखान्यात ठेवू लागलो. ज्यांना गरज होती, त्यांनी त्या वस्तू विकत न्यायला सुरुवात केली. हळूहळू वस्तू वाढू लागल्या. भोपळे, कोहाळे, घरगुती तांदूळ, कोकम, काजू
असे येऊ लागले.फौजेत काम करणाऱ्या एका जवानाने काश्मीरमधून आणलेले केशर आणून दिले. गोमूत्र, गेामय, गुळवेल, घरची फळे, गूळ-काकवी, घरगुती लोणची, खोबरेल तेल इ.इ. वस्तूंचा विनिमय सुरू झाला. काहींनी तर आम्हाला औषधे देण्यासाठी लागणाऱ्या कागदी छोट्या पिशव्या तयार करून दिल्या.
एका रुग्ण बाईने १०० रुपयांच्या बदल्यात मला पाच मोठे कोहाळे दिले. त्याचा बाजारभाव एका नगाला शंभर रुपये असेल. त्यातल्या एका कोहाळयाचा मी ४ किलो कुष्माण्ड पाक बनवला, तो २५०रु. किलोस या भावाने विकला. आणखी चार कोहाळे होते, त्यांत प्रक्षेप म्हणून काश्मीरचे अस्सल केशर घातले. त्याचा दर ३५०रु. दिला. तो त्याच्या बाजारभावापेक्षा खूपच कमी होता. तरीही मग मी कशाला नुकसानीत जाईन? पेशंटच्या दृष्टीनं पाच कोहाळे मला देणं फारच स्वस्त आणि सोयिस्कर! असा व्यवहार आजही माझ्या रुग्णाालयात चालतो. साधारण १०% रुग्ण  तसा व्यवहार करतात. त्यांच्या वस्तूच्या किंमतीबद्दल कोणतीही घासाघीस (बार्गेनिंग) केली जात नाही. कोणतेही आढेवेढेे किंवा व्यवसायिक तडजोड केली जात नाही..
कोकणातील बहुतेक सर्व डॉक्टर मंडळींस अशी देवाण घेवाण अनुभवास येते. कोकणातील व एकूणच खेडूत  माणसाचा स्वभाव  देण्याचा असतो. आपल्या डाक्तरला द्यायचे ते उत्तमच असावे, अशी त्याची भावना असते. त्याच्या त्या आपलेपणाचं मोल करताच येणार नाही.या सर्व मानसिकतेला मी अधिकृत केलं. त्यायोगे रुग्ण आणि वैद्य यांच्यातील आपुलकी आणि जिव्हाळाही शाबूत राहिला. गेल्या वीसपंचवीस वर्र्षांत मला माझ्या रुग्णांकडून कधी लेखी संमती वगैरे घ्यावी लागलेली नाही. या व्यवहारांत रुग्णांचा आत्मसन्मान जपला जातो, त्याला लाचार वाटत नाही, आणि त्यांचा आपल्यावरचा विश्वासही दुणावतो. प्रत्येक वेळी आर्थिक फायदा बघितलाच पाहिजे असे नाही, तसा तो प्रत्येक वेळीच होतो असे नाही तरीही सगळा मिळून आढावा घ्यायचा झाला तर सर्वांच्या दृृष्टीने खूप फायदा आहे. माणसांतील नाते  टिकते आहे हे महत्वाचे नाही काय? एखादी साथ आली की डॉक्टर मंडळींस `सीझन सुरू झाला' असे वाटत असेल तर त्यांच्यासाठी हे सांगणे नाही. ज्यांना कोणत्याही गोष्टींतून आनंद मिळवायचा असेल त्यांच्यासाठी माझा हा अनुभव!
या यशस्वी प्रयोगाची दखल `तरूण भारत' व नंतर `इंडियन एक्सप्रेस'ने घेतली. २०१३साली याची नोंद लिम्का बुकात झालेली पाहून मला आनंदाचा धक्का बसला, कारण त्यासाठी मी तर कोणताही प्रयत्न कधी केलेला नाही.
-वैद्य सुविनय दामले, सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) फोन : ०२३६२ - २२१८२१/२२३४२३, ९४२११ ४७४२०

मुलांत खेळणारे आजोबा
     शाळांच्या परीक्षा संपत आल्या. मुलेमुली येते दोन महिने तरी मोकळी राहणार आहेत. काही गावांतून पाण्याची टंचाई असल्यामुळे मुलाबाळांसह परगावी राहायला जाण्यासाठी निमित्त काढावे लागेल, पण ज्या गावी जायचे तिथेही मुलांना तसे रिकामपण असणार आहे. या सुटीचा उपयोग मुलांनी कसा करावा, असे सांगण्याचा हेतू नाही. पण मुलांच्या या सुटीत ज्येष्ठ नागरिकांनी काय करायला पाहिजे हे मात्र सांगायला पाहिजे. कारण मुलांना घडविण्याचे काम जे एरवीसुध्दा ज्येष्ठांनी केले पाहिजे ती मंडळी हल्ली आपल्या त्या कर्तव्याकडे पाहातसुध्दा नाहीत असे साधारण चित्र आहे. त्यात बदल व्हावा, आईवडील किंवा आजी आजोबांनी त्या अव्यवस्थेकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे आहे.
     कोणत्याही गावात कोणत्याही गल्लीत साधारण ८ ते १५ या वयोगटातील मुले बारा महिने दंगा घालत असतात. त्यांना खेळायला `सोडले' असे घरच्यांना वाटते, आणि ती घरची माणसे आपापल्यात रममाण होऊन जातात, मुलांकडे कोणीही लक्ष देत नाही. मुले उन्हातान्हात हुंदडतात, कसेही पाणी पितात, कुणाच्याही बागेत जातात, काचा फोडतात... याला खेळ म्हणायचा का? मोबाईलचे खेळणे वापरण्यातून काय काय परिणाम होतील याची सर्वांना कल्पना येऊ लागली आहे, पण ते रोखण्यासाठी आपण काय करतो याचा विचार कोण करणार आहे? मुलांना सुटीत त्यांच्याजोगे काही काम द्यावे, चित्रकला - संगीत - छंद हे शिकवावे यांसाठी शहरांतून काही क्लासेस असतात; पण ते सर्वांंना परवडतात असे नाही आणि अन्य गावांत तर ते उपलब्धच नसतात. मग अशा ठिकाणी गावातल्या ज्येष्ठ लोकांनी ती जबाबदारी घ्यायला नको का?
    हल्ली गावोगावी ज्येष्ठांंचे संघ आहेत, हास्यक्लब किंवा काहीतरी मंडळे वगैरे आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना तर आपले ज्येष्ठपण विसरून आपल्या `युनियन' असल्याप्रमाणे वागत आहेत. त्यांच्यामार्फत ज्या मागण्या होतात, ज्या प्रकारचे कार्यक्रम दिले जातात ते पाहिल्यावर त्यांच्या कर्तव्यांचा विचार त्यांनी कुठे मांडल्याचे दिसत नाही. ज्येष्ठांच्या समस्या कोणीच नाकारणार नाही. सुमारे ११% इतकी त्यांची प्रचंड संख्या आहे त्याचा काहीतरी सकारात्मक विचार इतरांनी केला पाहिजे हेही खरे आहे. पण त्याचबरोबर आपल्या सरत्या वयात याही लोकांंनी आपल्या पुढच्या उगवत्या पिढ्यांचा काही विचार करायला हवा याचाही विसर पडता कामा नये. -किंबहुना आता आपल्यासाठी काही न मागता आपण काही देण्याचा विचार केला पाहिजे; आणि ते देणे आपल्या नातवंडांसाठी, कोणत्याही अपेक्षा न ठेवता असले पाहिजे.
नुकतीच कोल्हापरची एक बातमी आली की, छगन भुजबळ यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करायचे म्हणून काही ज्येष्ठ नागरिकांस त्याना पेन्शन मिळेल अशी लालूच दाखवून गाडीत भरून आणण्यात आले होते. पेन्शनची आशा या प्रकारची लालसा वाढवत असेल तर ती मागणी रेटणाऱ्यांनी पुनर्विचार करायला हवा. त्याऐवजी ज्येष्ठांना काही विधायक कार्यक्रम द्यायला हवा, की ज्यांतून त्यांचे  `ज्येष्ठत्व' दिसेल.
      मुले ज्या ठिकाणी एकत्र होत असतात, त्या परिसरातील प्रैाढ व ज्येष्ठ लोकांनी त्या मुलांच्यात जावे. त्यांना आपुलकीने व समजुतीने `ताब्यात' घ्यावे. वेळ उन्हाची असेल तर त्यांना सावलीतले खेळ सांगावेत. चित्रे - हस्ताक्षर - काव्य - बैठे खेळ शिकवावेत. अशा वेळी तीन चार ज्येष्ठांचा प्रभाव आणि उपयोग दिसतो. त्यांनी परस्परांत ठरवून हे काम मन:पूर्वक आणि योजनापूर्वक करायला हवे. संध्याकाळी ५-५ ।। नंतर मुलांना मैदानावर घ्यावे. काही महिला मुलींसाठी काम करू शकतील. त्यांनाही त्यांच्या शालीय वयातील खेळ ठाऊक असतात. त्या मुलींना रमवू शकतील. सतत घरकामांचे निमित्त आणि सबबी आता तरूण पिढी ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नाही. किंवा आपल्या  शुगर आणि गुढघ्याच्या तक्रारीत त्यांना काही स्वारस्यही नाही. या मुलांना काही वळण लागेल अशी अपेक्षा करण्यापेक्षा आपल्या व्याधी कमी होतील हा फायदा तरी ज्येष्ठांनी लक्षात घ्यायला काय हरकत आहे?
     पुष्कळ घरांत हल्ली दोघे दोघेच असतात. पिचत एकच असते. त्यंाची तरूण कर्ती पिढी बाहेर असली तरी आसपासची मुले `आपली' मानावी लागतील. दहाबारा मुलांच्या एका गटास एक किंवा दोघे `घडवू' शकतात. आज मोठी होऊन कधीतरी घरी येणारी मुले, त्यांच्या लहानपणी `आमचे ते काका खो खो शिकवायचे' अशा आठवणी काढून त्यात रमतात हे आपण ऐकतो. तशी आजची लहान असणारी मुले त्यांच्या मोठेपणी आपलेही नाव काढतीलच की!
     काहीजण नेहमीच्या तक्रारी मांडतील. `आम्ही खूप शिकवू, पण मुले आमच्या पुढे बसायला हवीत ना!' ही सामान्य तक्रार! `मुलांना तसं काही नवं नको असतं', असं म्हणणाऱ्या आजोबाना तरी असं नवं वेगळं करून पाहायला कुठं हवंय? मुलांच्या हितासाठी जसा पोलिओचा डोस तोंडात ओतावा लागतो, तसा हा चांगल्या संस्कारांचा डोसही त्यांना प्रथम आग्रह आणि निग्रहपूर्वकच द्यावा लागेल. म्हणूनच येत्या सुटीचा उपयोग या प्रयोगासाठी करता येईल हे सांगणारे ज्येष्ठ नागरिक संघ असले पाहिजेत. त्यांच्या राज्य किंवा विभागस्तरीय मंडळाने त्याची योजना करून हा कार्यक्रम दिला तर एकदोन वर्षांतच त्याची फळे ज्येष्ठांना आणि बालकांनाही पाहता येतील.
संपादकीय
तयां देशांत शैत्यकाळी । पाणीं हाणिती कुदळी ।
गोणियांतु भरोनि तया वेळी । गर्दभावरी वाहिती ।
- `क्रिस्तदास' तोमास स्टिफन्स
हे कशाचे संरक्षण!
सर्वसाधारण जाणत्या माणसाच्या मनातील संवेदना श्री.अण्णा हजारे यांंनी संयत शब्दांत व्यक्त केल्या, त्या सरकारी कामाचे आणि निव्वळ देखाव्याचे वाभाडे काढणाऱ्या आहेत, तरीही त्यात कुठे आक्रस्ताळी भाषा नाही. त्यांनी जी मागणी केलेली आहे, ती मान्य केली तरी आणि अमान्य केली तरी  सरकारी पोलीस खात्याची इज्जत जाणारच आहे. ती इज्जत जावी असा त्यात हेतू तर नाही, पण सरळ साध्या नागरिकाच्या दृष्टीला जे विनासायास दिसते, तो गंभीर हलगर्जीपणा कसा दुर्लक्षित असतो हे दाखविण्यामुळे ते घडले आहे.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनांमुळे ज्यांची पैशाची किंंवा प्रतिष्ठेची दुकाने अडचणीत आली, त्यांच्याकडून त्यांना धमक्या येऊ लागल्या. त्यामुळेे त्यांना खास सुरक्षा व्यवस्था देण्यात आली. प्रचलित राज्यकारभाराच्या पध्दतीनुसार ते करणे सरकारला  आवश्यक होतेच. अण्णा हजारे यांच्या मागण्या, आणि त्यांसाठी केलेली आंदोलने यांबाबतीत कुणाचे कितीही मतभेद असले तरी, त्यांच्या सत्शील प्रतिमेबद्दल आणि तळमळीबद्दल कुणी आक्षेप घ्यावा असेे नाही. त्यांची आत्यंतिक साधी राहणी, जिद्द आणि त्यांच्या गाव पातळीपुरते का असेना, पण त्यांंनी केलेले विधायक काम यांमुळे अण्णा हजारे यांना एक फार मोठा विधायक कार्यकर्ता म्हणून मान्यता आहे, प्रसिध्दीही आहे. अशा व्यक्तीच्या जिवाला धोका असणे, किंवा समाजकंटकांकडून त्यांना कोणत्याही प्रकारे  त्रास होणे क्षम्य नाही, म्हणून त्यांना धोकादायक वातावरणात संरक्षणाची व्यवस्था पुरविणे समर्थनीय आहे. तथापि सरकारने त्या कर्तव्यापायी केलेला देखावा अण्णांच्या ताज्या टीकेने पार उघडा पाडला आहे. अण्णांच्या या ताज्या म्हणण्याला सार्वत्रिक पाठिंबा व्यक्त व्हायला हवा, आणि असल्या सरकारी ढोंगबाजीवर वचक बसायला हवा.

अण्णा हजारे यानी अलीकडे पुन्हा एकदा, आपल्यासाठी तैनात केलेली सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याची विनंती सरकारला केली आहे. त्याचे कारण देताना ते म्हणतात की, या छोट्या आडवळणी गावात स्वत:साठी ९अंगरक्षक आणि २८पोलीस कर्मचारी  यांची राहण्या जेवण्यासह सारी सोय करणे सोपे काम नाही. शिवाय तैनात केलेले हे शिपाईदल, कदाचित परिस्थितीचा तणाव आता कमी झाल्यामुळे  -अतिशय ढिले व भोंगळ वागते आहे. अण्णा सकाळी साडेेपाचला फिरायला जातात तेव्हा कोणी अंगरक्षक सोबत नसतो, अण्णानाही त्याची गरज वाटत नसल्याने ते त्या फौजेला झोपेतून उठवत नाहीत. त्यातल्या कोणास जाग आली तर तो घाईघाईने सोबत येतो, त्यावेळी त्यास पादत्राण घालण्याचेही त्राण नसते.  संरक्षणासाठी बाहेर असणारे पोलीस खुर्चीवर बसून मोेबाईलमध्ये गर्क असतात. अण्णा म्हणतात की, `मी योगासने करीत असतो त्यावेळी आपल्यास कोणी मारून गेले तर यांना पत्ताही लागणार नाही'. राळेगण सिध्दी या गावी दोन पोलीसगाड्या नियमाप्रमाणे तैनात आहेत, पण अण्णा परगावी असतील तर गावात एकही गाडी थांबत नसते. कधी एखादी गाडी थांबलीच तर त्यातली मंडळी छान झोपा काढतात. या  पोलीस `संरक्षण-व्यवस्थेची व्यवस्था' पाहायला एका निरीक्षकाची नेमणूकही आहे.

अण्णानी या संदर्भात सरकारला दिलेल्या निवेदनात खास त्यांच्या शैलीत म्हटले की, मी शासनाला लिहून देतो की, उद्या माझ्या जिवाचे काहीही कमीजास्त झाले तर ती सर्वस्वी माझी जबाबदारी आहे, त्याचा दोष शासनावर नाही. पोलीसयंत्रणा व त्यांचे सरकार मानते, तेवढा या संरक्षणाचा आपणास तरी उपयोग होणार नाही. जिथे पोलीसांची संख्या अपुरी आहे तिथे हे दल हलवावे. अण्णांच्या मागणीची वाच्यता झाल्यावर मुख्यमंत्र्यानी लक्ष घालून `त्रुटी दूर करतो' म्हटले; पण त्रुटी फक्त अण्णांपुरती नाही. साहित्य संमेलनाध्यक्षांना त्यांच्या वाह्यातपणामुळे संरक्षण द्यावे लागले; त्यांनीही `हे संरक्षण म्हणे गंमत(फार्स) आहे' असेच म्हटले.

या साऱ्या व्यवस्थेवर अण्णानी तर मोठेच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. पोलीस दलाचे काम कसे चालते हे आपल्यास पदोपदी पाहायला मिळते. कॉलेजची निवडणूक किंवा गॅदरिंंग यांचा दंगाही आजकाल बेफाम फटफट्यांच्या आवाजातील भेदक किंकाळयांनी साजरा होतो, त्यांनी सामान्य लोक भयचकित होतात पण ते पेालीसांच्या कानावर जात नाही. असल्या प्रकारातून कॉलेजात काही  गंभीर घडते. पोरंाच्या या उघड उपद्रवी मस्तीला पोलीसवालेे आवर घालत नाहीत, तिथे अण्णांसारख्या गांधीवाल्याची ते कितीशी दखल घेणार? अण्णा त्यांच्या जिवाला फार भीत नाहीत हे त्यांनीच म्हटले आहे, त्यामुळे पोलीसांनी ही ड्यूटी निवांतपणात चालविली असावी. पण त्या बिचाऱ्या पोलीसांचा आरामही अण्णाना पाहावेना, आपल्या भोवतालची ही वांझोटी ब्याद हलवावी आणि आपल्यासाठी होणारा बाष्कळ खर्च वाचवावा असे त्यानी सरकारला सुनावले आहे.
सरकारी संरक्षणाचा असा बोजवारा अण्णांसारख्यानी उडवल्यावर पुढाऱ्यांना जो आगेमागे शिपाईप्यादी घेऊन फिरण्याचा शौक असतो, त्याचे इंगित कळेल. या देशात अतिरेकी आणि गुंडपुंडांचे सध्या फावते आहे कारण सार्वत्रिक ढिसाळपणा आहे. ज्यांनी  त्यास आवर घालायचा ते पोलीसखाते राजकारण्यांच्या तालावर नाचते, त्यामुळे त्यांच्या पराक्रमासही काही वाव नाही. अशा स्थितीत इथले व्यवहार काहीतरी बरे चालले आहेत, ते चांगल्या माणसांच्या आणि देवावरच्या भरंवशावर चालले आहेत. त्यात पोलीसांची भूमिका नगण्य आहे. कुणी गुन्हा करण्याचे  -एखाद्याला मारण्याचेही ठरविले तर त्यास पोलीसांचे भय वाटत नाही. आपल्या घरी अजून दरोडा पडला नाही किंवा आपले आजपर्यंत पाकीट मारले गेलेले नाही, त्याचे कारण इथली कायदा-व्यवस्था नव्हे, तर `त्यांचे' (खरे तर पोलीसांचेच) अजून माझ्याकडे लक्ष गेलेले नाही; अशी जी आपली सामान्य भावना आहे त्याला अण्णांच्या या फटकाऱ्याने आवाज मिळवून दिला आहे. कुठेतरी अतिरेकी घुसल्याचे समजल्यावर आठवडी बाजारातील कोथिंबीरीची बोचकी तपासणारा हाय-अॅलर्ट आपल्या राष्ट्नीय गलथानपणाचे उदाहरण आहे.नवऱ्याने दारू पिऊन मंगळसूत्र काढून नेले तर आपल्याच लहानग्या पोराला धपाटा घालणारी स्त्री अगतिक झालेली असते; त्यापेक्षा पोलीसही वेगळे नाहीत. त्या बिचाऱ्यांना बिना हेल्मेटची डोकी व डान्सबारचे व्हिडिओ तपासण्याचे काम दिल्यावर त्यांनी संरक्षण कधी करायचे?

अण्णांचे अनुकरण करून, निरुपयोगी असणारी आपापल्या गावातील पोलीस ठाणीही काढून टाकून त्यांचा खर्च वाचवावा असे लोकांनी म्हणायला हरकत नाही, इतकी भयाण स्थिती सामान्य पापभीरूंची आहे. तथापि पोलीसांची असून अडचण असते तसा नसून खोळंबाही असतो हे मान्य करावे लागते. आपल्यावर अन्याय झाला तर त्याचे निवारण पोलीसांकडून होण्याची शक्यता क्षीण असली तरीही पोलीसांत जाण्याची एक रीत आहे. ती पाळता येण्यासाठी तरी पोलीस हवेतच. जसा देव या जगात नाही हे ठाऊक असूनही माणूस त्याला शरण जातो, तसाच तो पोलीसांना जातो. आपल्या कामी तो नाही आला तरी, आपल्या मागे तरी त्याने लागू नये अशी आज नागरिकाची मन:स्थिती आहे. स्वत: मुख्यमंत्री पेालीसखाते सांभाळतात. त्यांनी अण्णा हजाऱ्यांच्या या फटकाऱ्याची तीव्रता जोखली तर पाहूया. नाहीतर मग अण्णांच्या इतके वाहून घेणे किंवा कोणी चोेर-पोलीसाने आपल्या वाट्याला जाऊ नये यासाठी रामरामराम म्हणत बसणे इतकेच पर्याय आपल्यापुढे  राहतात.
अक्षयपात्र योजना
     आदिवासी विकास विभागांतर्गत आश्रमशाळा आणि वसतिगृहांतून होणाऱ्या स्वैपाकाबद्दल नेहमी तक्रारी ऐकू येत असतात. त्याला नवेे आधुनिक रूप देणारी योजना मुख्यमंत्र्यानी लक्ष घालून चालू केली आहे. त्या योजनेप्रमाणे, एकाच ठिकाणी जेवण बनवून ते त्या परिसरातल्या संस्थांच्या मुलाना देण्यास सुरुवातही झाली आहे. नाशिक विभागात असे एक स्ैवपाकघर सहा महिन्यांपूर्वी कार्यान्वित झाले. त्याच साखळीत आता दुसरेे केंंद्र नुकतेच सुरू झाले. ४०किमी परीघातील आश्रमशाळा व वसतिगृहांतील मुलांना लागणारे जेवण, न्याहरी वगैरे एकाच ठिकाणी तयार करून पाठविण्यात येते. पूर्वी या ९हजार मुलांचे जेवण १८ ठिकाणी शिजवले जात असे. ते आता आधुनिक मशीन्सच्या साह्याने  एकाच ठिकाणी होते. उत्कृष्ठ गरम जेवण मुलांपर्यंत पोचू लागले आहे.
     टाटा व अक्षयपात्रा फाऊंडेशन यांच्याशी करार करून मुख्यमंत्र्यानी हे काम जलद गतीने मार्गी लावले. सुमारे वर्षभरातच दोन्ही केंद्रे कार्यान्वित झाली. त्यामुळेे प्रतिविद्यार्थी येणारा खर्च निम्म्यावर आला. त्या कामाशी संबंधित कर्मचाऱ्यांना बंगलुरू येथे आधी प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना नव्या पध्दतीचे स्वैपाकघर चालविण्याबरोबरच दर्जा गुणवत्ता व तत्परता शिकविण्यात आली. त्यांच्या नोकऱ्याही सुरक्षित राहिल्या. आता अक्षयपात्राचे काम काही राज्यांत सुरू झाले आहे.
     त्याबद्दल माहिती यू ट्यूबवर उपलब्ध आहे. `अक्षयपात्रा' सर्च करावे.
- शिवराज दत्तगोंडे   (`विजयंत' वरून साभार....)
.......... वाद - संवाद .........
काच विषयासंंबंधातील दोन प्रातिनिधिक पत्रे व त्यावर संवाद येथे केला आहे. निसर्ग आणि पर्यावरण हा विषय महत्त्वाचा आहेच; पण त्यावर बोलले जाते जास्त! आपल्या मनांत त्याविषयी असणारे विचार तपासून घ्यायला हरकत नाही. जाता जाता सांगायला हवे की, तो विचार विवेकानंदांचा आहे. (रामकृष्ण मठ प्रकाशन वचने पृष्ठ ४१)
बोधवचन विवाद्य वाटते
 फेब्रुवारीच्या आपल्या अंकात शीर्षभागी असे बोधवचन आहे : `प्रकृतीशी सतत जुळते घेतले तर प्रगती थांबेल.हे घर मनुष्याने कसे बांधले? प्रकृतीशी संघर्ष करून झगडून; जुळवून नव्हे!' या विधानास थोडा संदर्भ दिला असता तर बरे झाले असते. टोलेजंग, नाना सुखसोयींनी युक्त घरे बांधणे हे प्रगतीचे गमक आहे काय?
     माणसाने स्वत:च्या सुखसोयींखातर प्रकृतीशी संघर्ष चालविला आहे. त्याने जगातले प्राणीवंश, वनस्पती नष्टप्राय केले आहेत. संकरांंचा सपाटा चालविला आणि पृथ्वीबरोबरच स्वत: दुर्बल होण्याचा विडा उचलला आहे. जराजर्जर, वैफल्यग्रस्त आयुष्यवाढ झाली आहे. प्रकृतीशी संघर्ष करीत राहण्याचाच हा परिणाम नव्हे काय? प्रकृतीशी जुळते घेणारा माणूसच सुखी असलेला दिसत नाही काय?
- म.वि.कोल्हटकर, सातारा फोन : (०२१६२)२३२५०४
संवाद
      प्राचीन माणूस मुक्त अवस्थेत होता, त्यापेक्षा आज जो काही आहे, तो प्रगत किंवा सुखी मानावा की नाही, याच्याशी वरील वचनाचा संबंध आहे. सुख कशात मानायचे  हे एकदा ठरले की मग त्या दिशेने होणारी प्रगती मोजता येईल. भौतिक सोयींनी सुख मिळते का हा तत्वचिंतकांचा चिरंतन प्रश्न आहे; आणि त्या सुखसोयींनी खरेे सुख मिळत नाही, हे त्यंाचे चिरंतन उत्तर आहे. तथापि त्याच त्या सोयीसुविधांसाठी पिढ्यान्पिढ्या प्रयत्न चालू आहेे हे तितकेच खरे आहे. पूर्वी कधीकाळी जिथे देवराया आंबराया होत्या, तिथे आज शहरे गजबजली; त्यास आपण `वसती विकसित झाली  - डेव्हलपमेंट झाली' असे म्हणतो. आजकालच्या जगात त्याला प्रगती मानण्याचा प्रघात आहे. माणूस चंद्रावर गेला, ती प्रगती म्हटली जाते. तसे जाण्याचा प्रयत्न करायचा तर प्रकृतीशी जुळवून कसेे घ्यायचे? पक्षी निरीक्षण करणे, झाडे लावणे म्हणजे प्रकृतीशी इमान राखणे होय. पण पक्षी छंदापायी किती प्रकारची किती वैज्ञानिक साधने वापरावी लागतात. दुर्बिणी, क्रॅमेरे, सीडीज्, बॅगा-बूट हे साहित्य तयार करण्यासाठी प्रकृतीवर आक्रमण होते. ते करायचे की नाही? ते न करता ज्ञानदेवांसारखी माणसे हे ब्रम्हांड त्यांच्या प्रतिभेने जाणत असतील, पण सामान्य जनांचे काय? त्यांनी प्रगतीच्या वाटेवर कसे चालायचे?
     प्रवचनकार गोष्ट सांगतात ती खरीच आहे. एक माणूस सुखी माणसाचा सदरा शेाधत फिरत होता. जिथं सुख नांदते आहे तिथं आशेनं तो जायचा, आणि त्याला त्याचा सदरा मागायचा. की तो यजमान आपल्या दु:खाची कर्मकहाणी सांगू लागायचा, तो खरा सुखी नसायचा. शेवटी हा माणूस निराश होऊन गावाबाहेर चालू लागला. नदीकाठी एकजण मुक्तपणी गाण्याच्या लकेरी घेत, पाण्यात पाय सोडून हातवारे करत आपल्या नादात जगाला विसरलेला दिसला. या माणसाला नक्की वाटले की, हाच तो सुखी माणूस ज्याच्या मी शेाधात फिरतो आहे. त्यानं जवळ जाऊन चौकशी केली, `बाबा, तू चांगला सुखी दिसतोस.' तो बाबा म्हणाला, `अर्थात. हे मुक्त आकाश, पायाशी झुुळझुळतं पाणी, हे मंदसुगंधी वारं... सुख याहून वेगळं काय असतं?' या शेाधक माणसाला आनंद झाला. त्यानं विनवलं, ` - तर मग बाबा, मला तुमचा सदरा द्याल?' तो बाबा मंद हसून म्हणाला, `अरे मी आनंदानं दिला असता, पण मला तर सदराच नाही.'
     प्रगत मनाची ही उन्मनी स्थिती हे परम सुख वाटण्याइतकी ज्यांची प्रगती झालेली असेल, त्यांनीसुध्दा प्रकृतीशी पूर्णत: जुळवून घेणे कठीण आहे. बहुश: ती समाधी अवस्था असेल. एरवी प्रकृतीशी संघर्ष हा तर मन असलेल्या माणसाच्या उपजत हव्यासाला अटळ असतो. चाकाच्या शेाधाने माणसाच्या प्रगतीला गती आली, ती चक्रे तयार करण्याची गती आता कुणाला रोखता येत नाही. संघर्ष प्रकृतीशी आहेच पण त्यापेक्षाही तो आपल्या द्विधा मन:स्थितीशी असतो. आपल्या `प्रकृती'शी असतो. रारंगढांग या कादंबरीत एक वाक्य आहे; त्यातला सैन्याधिकारी म्हणतो, `पोलोचा सामना जिंकायचा असेल तर घोड्याची कणव करून चालत नाही.'
     आपल्याला आता मंगळावर जायचे आहे, श्रीमंत व्हायचे आहे, महासत्ता व्हायचे आहे .... तर मग अणुभट्टी हवी, तेल हवे, क्षेपणास्त्रे हवीत. आपण प्रकृतीशी जमवून घेत बसलो तर हे कसे साधणार? न साधून चालेल का? आक्रमक गप्प राहतील का? हे सगळे प्रश्न परस्परावलंबी आहेत. यच्चयावत मानव समाजाने ज्याला प्रगती म्हटले तीच आपण म्हणावी लागते. त्यामुळे निसर्र्गाचा जो तोल ढळेल तो सावरायला निसर्ग समर्थ असतो. तो नैसर्गिक न्याय करतो. म्हणून माणसाला दिलेल्या हव्यासामागे धावणे ही `प्रकृती'च नव्हे काय? - आपले जग
त्या विचाराचे वाईट वाटले
आपल्या गेल्या महिन्यातील अंकाच्या शिरोभागी सुविचार (की कुविचार) दिला होता. प्रगती करायची असेल तर प्रकृतीशी संघर्ष करावा लागतो; प्रकृतीशी जुळवून घेऊन चांगले घर बांधता येत नाही, प्रगती होत नसते असा त्याचा आशय होता. भारताचा आत्मा म्हणा, पाया म्हणा- `अद्वैत' आहे.  बेकन देकार्ते यांनी सध्याचे (भासणारे) देदीप्यमान यश त्या द्वैती पायावर व त्यांच्या विचारसरणीवर प्राप्त केल्यासारखे दिसते. आम्ही नेहरू काळापासून तोच मार्र्ग पकडला आहे, पण त्यातूनच प्रदूषणाचा राक्षस आता भेडसावत आहे, त्याने आमचे सर्व जीवन ग्रासले आहे . हवा इतकी अशुध्द की आता हवेचे  एटीएम निघणार असे ऐकतो.पाणी जमीन बरबाद झाली. आमचा संघर्ष व झगडा झाला, वा होतोय म्हणता तो कसा? निसर्ग सदा देत असतो. आपण वास्तुशांत करतो, वृक्ष तोडताना त्याची पूजा करतो प्रार्थना करतो हे तोंडदेखले नव्हते. सकाळी उठल्यावर, जमिनीला आता पाय लागणार म्हणून भूमातेची क्षमा मागतो. मला त्या  सु(?)विचाराचा राग नाही आला, पण वाईट वाटले.
- ग.दि.आपटे, गुरुवैभव, पौड रोड पुणे ३८ (फोन : ९५७९८ २०८९४)      
संवाद
याच आशयाचे एक पत्र साताऱ्याच्या म.वि कोल्हटकर यांचे प्रसिध्द करून त्याबाबत `आपले जग'ची भूमिका गेल्या अंकात मांडली होती, ती वेगळी पुनर्मुद्रित करीत आहोत.
त्याव्यतिरिक्त श्री.ग.दि.आपटे यांच्या पत्रात दोन मुद्दे आहेत. एक आहे तो अद्वैताचा. आणि दुसरा आहे वास्तुशांत वृक्षपूजा वगैरे भावनिक कृतज्ञतेचा. त्यापैैकी अद्वैत हे केवळ हवा पाणी झाडे यांच्यापुरते का? ते तर चराचर सृष्टीशी असावे. झाडे वाचली पाहिजेत, पण आपल्याला जळण प्लायवुड हे पाहिजेच; वाघ वाचले पाहिजेत, हरणेही वाचली पाहिजेत हे कसे साधायचे? ते साधण्याचे काम निसर्ग नैसर्गिक रीत्या करत असतो. माणसाला निसर्गानेच लालसा हपापा उपजत दिला आहे. अधिकाधिक चांगले जगण्याची त्याची व्याख्या वेगळी दिली आहे. निसर्गाशीच जवळीक सााधायची असेल, आणि स्नानसंध्या जपजाप्य चिंतन करीत ऋषिजीवन ज्याला जगायचे असेल तर  ते उत्तमच, पण त्यासाठी शहरात चौथ्या आठव्या मजल्यावर राहू नये. आपल्याला राहायला शहर हवे, मुलांना चांगले पॅकेज हवे, पर्यटनाच्या सोयी हव्यात ... मग झाडे वाघ पक्षी वाचवायचे ते कुणी? आदिवासींनी? त्या बिचाऱ्यांंना हुसकूनच तर आपण आपल्या सोयी करून घेत आहोत. ते कधी प्रकृतीशी संघर्ष करतात? ते करत नाहीत कारण त्यांना त्यांच्या मर्र्यादंामुळे शक्य नाही. त्यांच्यातील कोणी शिकून बाहेर पडला की तोही प्रकृतीशी संघर्ष करूनच राहू लागतो. त्यांनाही  `चांगले' जगण्याची लालसा असते.
      माणसाव्यतिरिक्त इतर कोणताही सजीव आपल्यासारख्या प्रगतीचा किंवा सृष्टी धोक्यात आल्याचा विचार करत नाही. कारण त्याना तसे मन नाही. बुध्दीला भूक लागली की तेवढे तेे प्राणी खातात , `पानात टाकायचे नाही'  वगैरे विचार त्यांच्याकडे नसतो. झाड तोडताना पूजा ते करणार नाहीत कारण त्यांना तशा भावना नाहीत. माणसाला भावना आहेत म्हणून आपण ज्याज्याकडून लाभ आहे त्याबद्दल कृतज्ञता शिकवतो, किंवा भविष्यकालासाठी वर्तमानाशी संघर्ष करणे वगैरे मानतो.प्राण्यांच्या बाबतीत आपण `त्यांची प्रगती झाली नाही' असेच म्हणतो. यात त्यांची अद्वैत भावना वगैरेे नाही. माणसाने `प्रकृतीशी जुळते घ्यावे' असे म्हणत राहण्यात अद्वैताचे एक आत्मिक समाधान असते.प्रत्यक्षात तसे पेलत नाही....पिचत अपवाद सोडल्यास कुणालाही पेलत नाही. देव नावाची काही वस्तू नाही असे आपल्याला माहीत असले तरी त्याची भक्ती करायची असते, तसेच हे आहे. `निसर्ग वाचवा' असे म्हणत म्हणत आपण ऐश कारमध्ये बसून पर्यटन करायचे ही माणसाची सहजजात प्रकृती आहे. हा मानसिक  (दांभिक) संघर्ष प्राकृतिकच आहे. त्या लालसेचे काही प्रमाणात दमन करणे हे अनैसर्गिक असले तरी ते आवश्यक ठरते, कारण त्यात माणसाच्या सामाजिकतेचे हित असते. इतर प्राण्यांना `समाज' नसतो. टोळी किंवा कळप असतो. डास आणि कृमी हेसुध्दा निसर्गचक्रातील पूरक घटक आहेत, त्यांचा नाश केला तर  त्या गावाची प्रगती झाली! मोर हेे प्रकृतीचे वैभव आहे!  - का? तर ते माणसाच्या दृष्टीला सुखद आहे. कुत्र्यांना मोर सुंदर दिसत नाही, खायला आवडतो. जिथे मोरांंची संख्या अलीकडे फार वाढली आहे, तिथल्या शेतकऱ्यांचे पेरलेले बियाणे व उगवलेले मोड मोर खातात. म्हणून तिथे शेतकरी मोर मारण्याचा विचार करतात. माकडे नैसर्गिक वागतात पण तो `उच्छाद' असतो, कारण तो माणसाला त्रासाचा असतो.
     याचा अर्थ प्रकृतीची धूळधाण करा असा काढू नये. सृष्टी उपभोगावी हा माणसाचा(ही) हक्क आहे, पण तिचे संवर्धन करावे हे माणसाचेच कर्तव्य आहे. झाडे लावली पाहिजेत आणि तोडलीही पाहिजेत. तोडू नका म्हणणारेही तसे म्हणत त्याच तोडीला हातभार लावतात हीसुध्दा नैसर्गिक प्रकृतीच आहे, तिच्याशीही जुळवून घ्यावे म्हणजे त्रागा होणार नाही. कुणाचा रागही येणार नाही. अद्वैतच असेल तर रागावायचे तरी कुणावर?
- आपले जग
बालवीर
घटना पुण्यातली आहे. सुमारे पंधरा दिवसांपूर्वीची,वेळ रात्री १०।।ची. घरात त्या मुलाचे आजीआजोबा होते, ते नुकतेच झोपले होते. त्याची आईही झोपली होती. त्याचे वडील सोलापूरला होते. हा मुलगा तर रोजच लवकर झोपी जातो, तसा ९च्या आतच डाराढूर!
पण अचानक कशानं त्याला जाग आली, आणि समोरचं दृष्य बघून तो ताडक न् उठला. आईला हाका मारत तो ओरडला. बाहेर जाण्याच्या दरवाजाशी विजेचा स्विचबोर्ड होता, शॉर्ट सर्किट होऊन तिथून ठिणग्या उडत होत्या, जाळ दिसत होता. वरच्या छतापर्यंतची सजावट धोक्यात होतीच पण त्याच्या ठिणग्या खाली पडून भुईवरचे कार्पेट जळू लागलेले होते. या छोट्या पोरानं काय करावं? पट्कन दार उघडलं आणि लिफ्टमध्ये न शिरता, जिन्यावरून टणाटण उड्या मारत तो तळाशी आला. धावत खाली येताना प्रत्येक मजल्याच्या सगळया दारांवर धपापा हात बडवत `आग, आग लागते' असा ओरडा करीतच होता. तळमजल्यावर का आला? -तर तिथं जिन्याशी सगळे मीटर आणि मेनस्विच होते. त्यातला नेमका आपल्या ब्लॉकचा मेनस्विच शोधून त्याने तो बंद(ऑफ) केला. तसाच दोन दोन पायऱ्या चुकवत तो झपाट्यात वरती आपल्या घराशी आला. तोवर शेजारी जमले होते. त्यांनी सगळं आटोक्यात आणलं. किरकोळ जळाजळी, भिंतीवर काळा छप्पा याशिवाय फार काही गंभीर घडलं नाही, पण घडणं शक्य होतं. ते या मुलाच्या चपळाईनं आणि कमालीच्या प्रसंगावधानानं थोपवलं. वेळही तशी बरीच म्हणायची, कारण जिथं या ठिणग्या पडल्या त्या भिंतीशी भलतं काही नव्हतं; त्याच्या समोरच्या भिंतीशी मात्र सोफा त्यावर गाद्या- फोमच्या उशा असे प्रकार होते.
तसं म्हटलं तर हे सगळं ऐनवेळी सुचण्याचं त्या धाडसी मुलाचंं वय नव्हे. त्याला नुकतीच ९ वर्षे पूर्ण झालीत. तो ४थीत आहे. वडगाव (सिंहगड रोड)च्या ज्ञानदीप शाळेत जातो. संध्याकाळी खेळायला संघशाखेतही जातो. लहान चण, परंतु हातावर उलटा दहाबारा फूट चालतो. त्या चलाख शहाण्या मुलाचं नाव आहे - अनुराग आदित्य आपटे.
त्याच्या आईचा फोन नं.९६० ४५५४६६४.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन