Skip to main content

25 May 2015

ताब्दीच्या उंबरठ्यावर असलेल्या, उज्वल परंपरा असणाऱ्या कऱ्हाडच्या नामवंत अशा शिक्षण मंडळा(टिळक हायस्कूल व अन्य शाखा)च्या व्यवस्थापनाची धुरा अलीकडे कराडचे उत्साही आणि धडाडीचे श्री.चंद्रशेखर देशपांडे यांनी स्वीकारली आहे. त्यांनी या जुन्या शाळेला केवळ गतवैभवच देण्याचा नव्हे तर महाराष्ट्नतील एक अग्रगण्य आदर्श शाळा घडविण्याचा चंग बांधला आहे. या शिक्षणसंस्थेच्या सध्या १६ शाखा असून सुमारे १४ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कै.यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे कित्येक नामख्यात विद्यार्थी असणारी ही संस्था आज चंद्रशेखर देशपांडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करेल असा विश्वास कऱ्हाड भागात आहे. संस्थेच्या कामकाजात त्यांचा पूर्वीपासूनच सहभाग होता. कऱ्हाडच्या सार्वजनिक जीवनाचा दीपस्तंभ म्हणून ज्यांचा उल्लेख करावा, अशा कै.नानासाहेब देशपांडे, तसेच दादा आणि आशाताई देशपांडे यांचा वारसा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे अपेक्षा व जबाबदारीही मोठी आहे.
नव्या अपेक्षांच्या वळणावर
कऱ्हाडच्या जीवनात सन्मानाचे स्थान असलेल्या शिक्षण मंडळाचे 
श्री.चंद्रशेखर देशपांडे यांनी `आपले जग'शी केलेला वार्तालाप....
येत्या शैक्षणिक वर्षापासून ही संस्था एक प्रकारे नवी कारकीर्द प्रारंभ करीत आहे. बहुधा प्रत्येक मोठ्या गावात अशा जुन्या मोठ्या संस्था आहेत. त्यांची ही प्रातिनिधिक कथा वाटेल. संस्थेचे विविध उपक्रम, विकास योजना, त्रुटी-उणिवा वगैरेंची यथार्थ जाण शेखररावांना आहे. पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम सर्व शाखा व विभागांना समक्ष भेटीची योजना आखली असून, काही शाळांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि काही सक्रीय पालक यांची त्यांनी भेट घेऊन समग्र चर्चा केली आहे. यापुढे ही पद्धत चालू राहाणार आहे.
प्रत्येक घटकाची काही विचारप्रणाली असते, संस्थेच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक विचार असतात, काही विधायक सूचना असतात. दैनंदिन कामकाजातून प्रत्येक लहान सहान गोष्टीची माहिती संस्थाचालकापुढे येतेच असे नाही. पण समक्ष भेटीमध्ये, चिकित्सक पाहणीमध्ये आणि संबंधातील चर्चेमध्ये अशी बरीच उपयुक्त माहिती पुढे येते. त्या आधारे उपाययोजना करण्याचा मार्ग सुकर होतो. सर्वच योजना लगेच हाती घेता येतील असे नाही. टप्प्याटप्प्याने, पैशाच्या उपलब्धतेनुसार नियोजन करण्याचा मार्ग या भेटीद्वारे खुला होतो. त्यांनी केलेल्या समक्ष पाहणीमध्ये असे लक्षात आले की, बऱ्याच इमारती जुन्या झाल्या आहेत. त्यांची दुुरुस्ती-देखभाल, आवश्यक त्या सुधारणा, रंगरंगोटी अशी अनेक कामे तातडीने हाती घ्यायला हवीत. त्याबाबतचे अहवाल आले आहेत.
ते म्हणाले की, `मुताऱ्या, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय या गोष्टींमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. स्वच्छतागृहे खूपच अस्वच्छ, जुनाट व अपुरी आहेत. ती अद्ययावत् कालानुरूप करणे गरजेचे आहे. सामान्यत: शाळेचे म्हणून काही वातावरण, काही व्यवस्था (जनरल हाऊसकीपिंग) सध्या खूपच दुर्लक्षित आहे, तिथे लक्ष घालायला हवे. पुढेमागे आमच्या संस्थेचे डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतर व्हावे यादृष्टीने आयएसओ मानांकन घेण्याच्या धर्तीवर खूप काम करायला हवे. शाळेमध्ये किमान सुविधा पुरविणे गरजेचे आहे. स्वच्छतेविषयी प्रबोधन आणि कार्यवाही होण्यासाठी कामाला लागलो आहे. आमच्या शाळांमधून राष्ट्नीय विचाराचे शिक्षक मिळालेच पाहिजे, तो या शाळेचा संस्कार आहे. त्यासाठी योग्य माणसे शोधावी लागतील. काही शिक्षक सध्या केवळ पाट्या टाकण्याचे काम करतात, हे लक्षात येत असते. भरपूर वेतन व सेवासुविधा घेतल्यानंतर आता त्यांनी झोकून देऊन, जीव ओतून काम केले पाहिजे अशी सर्वांची प्रामाणिक अपेक्षा आहे. त्यासाठी प्रसंगी सध्याचा `सेट अप्' बदलून फेरमांडणी करावी लागेल. सगळेच शिक्षक व सेवक कामचुकार आहेत असे नाही. बव्हंशी सेवाभावी व त्यागी वृत्तीचे आहेत, त्यांच्या मागे बळ उभा करून त्यांना प्रोत्साहित करणे, त्यांना सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देणे यात आमचा अग्रक्रम असेल. आमच्या या नियोजित कार्यक्रमामध्ये पालकांचा फार मोठा सक्रीय सहभाग अपेक्षित आहे आणि तो मिळेल याची पूर्ण खात्री आहे. पालकांचा मुलांच्या शिक्षणाबाबत दृष्टीकोण व कर्तव्ये यावर पुष्कळ अवलंबून आहे. म्हणून त्यांच्याशी सतत संवाद ठेवला पाहिजे.
कल्पना चावला विज्ञान पुरस्कार, विवेकानंद विचार मंच वगैरे आमच्या शाळांतील उपक्रम अधिक नेटाने चालविले जाणार आहेत. परीक्षा संपल्या की सुट्टीच्या आजवरच्या वातावरणात मशगूल न राहता शिक्षकांनी प्रबोधन सत्र चालू ठेवावे असा आमचा आग्रह आहे. ज्या मुलांना आई आणि वडील नाहीत अशी मुले शोधून त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी खास प्रयत्न करावेत असा मनोदय आहे. त्यासाठी निधी संकलन सुरू आहे.
आमच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यम किंवा सेमी इंग्रजी शिक्षणप्रणाली जरी अवलंबली तरी मराठी भाषा, मराठी संस्कृती जपली जाईल अशा तऱ्हेने मेळ घालण्याचे धोरण आहे. मराठी भाषेकडे किंवा संस्कृतीकडे दुर्लक्ष होणार नाही, अशी पुरेपूर काळजी घेऊन इंग्रजी माध्यम असणारे शिक्षण दिले जाईल.
आजवरच्या पद्धतीमध्ये निर्णय प्रक्रियेचे केंद्रीकरण झाले होते. सर्वच छोटे मोठे निर्णय वरच्या पातळीवर एकारलेले असत. त्याचा दुष्परिणाम असा की निर्णय प्रक्रियेला वेळ तरी लागतो, किंवा `आहे ते चालू राहू द्या' म्हटले जाते. काही मर्यादेपर्यंत निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करून शाळा पातळीवर जलद निर्णय घ्यावेत, या धोरणाचे काही अनुकूल परिणाम आमच्या लक्षात येऊ लागले आहेत.
शिक्षकांना सध्या बरीच शिक्षणेतर कामे करावी लागतात, त्यामध्ये बराच वेळ जातो. स्वाभाविकच मग मुख्य काम-शिक्षण, तेच बाजूला पडते. यासाठी शासन व जिल्हा परिषदेचे आदेश कारणीभूत असतात, हे सगळे वास्तव आहेच. आम्ही असे शिक्षणेतर काम कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहोत. संचालक मंडळ सध्या ज्येष्ठ मंडळींचे आहे. एकदोन अपवाद वगळता सर्व सदस्य ६५ वर्षे वयाच्या पुढील आहेत. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा काही फायदा नक्कीच होतो. पण त्यांच्या जोडीला तरुण रक्ताची मंडळी संचालक मंडळात आली तर कामकाज अधिक गतिमान व वस्तुनिष्ठ होईल. त्या दृष्टीने आमची वाटचाल असेल. संस्थेचे डी.एड्.कॉलेज आता कालबाह्य झाले आहे. शैक्षणिक अभ्यासेतर शिक्षण उदा.चित्रकला, तबला, सतार वादन असे काही छंदवर्ग सुरू करावयाचे आहेत.
`आठवीपर्यंत परीक्षाच नाही' अशा स्वरूपाचे काही निर्णय शासनातर्फे घेतले जातात किंवा काही गैरसमज मुद्दाम पसरविले जातात. त्यामध्ये धरसोड होते. फीबाबत काही नियंत्रण शासनातर्फे आहे. पण प्ले ग्रुप प्रवेशाच्या वेळीच काही शाळा व संस्थांमध्ये सोयीसाठी फी गोळा केली जाते, त्याला आवर कसा घालणार? आम्ही बाहेरील संस्थांचे अहवाल मागवून, त्याचा अभ्यास करतो आहोत. शैक्षणिक क्षेत्रातील जागतिक परिस्थितीचा आढावा घेत आहोत. त्याचा आमच्या संस्थेत कसा उपयोग करून घेता येईल असा विचार चालू आहे. पालक सभा व पालकांचा सहभाग हा आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे.
२०२१ साली संस्थेचा शताब्दी महोत्सव आहे. तो आम्ही भव्य प्रमाणात साजरा करणार आहोत. त्यासाठी व्हिजन डॉक्यूमेंटेशन सुरू करणार आहोत. आमच्यासारख्या शंभरीतील किंवा पंचविशी-पन्नाशीतील शाळा संस्था निश्चितच एका वळणाच्या टप्प्यावर आहेत. यापुढच्या काळातील शैक्षणिक गरजा, आणि बाहेर पडणारा विद्यार्थी फार वेगळा असेल. त्यासाठी आम्हा `शाळकऱ्यां'नी सज्ज व्हायला हवे.


दिल है छोटासा, थोडीसी आशा ।
मोदींच्या सरकारला एक वर्ष झाले. त्या निमित्ताने त्याचे मूल्यमापन सर्व क्षेत्रांत सर्व स्तरांवर होत आहे; ते होणे आवश्यकही आहे. तथापि सध्या भारतात तरी भाजप आणि भाजपेतर एवढीच राजकीय विभागणी असल्यामुळे, मोदींचे कडवे विरोधक आणि स्तुतिपाठक एवढेच गट प्रकाशात आहेत. त्यामुळे त्यांच्या मतांस मूल्यमापन म्हणता येत नाही. त्यांचा अभिनिवेश किंवा बाष्कळ बडबड यांतून सामान्य माणसाला गोंधळून जायला होते. `अच्छे दिन आनेवाले' असा बराच गवगवा झाला होता, त्याचा आनंददायी प्रत्यय सामान्य प्रतिष्ठेच्या, सामान्य विचारांच्या, समंजस जनतेला अजूनी तरी येत नाही. त्याचप्रमाणे `या सरकारने शेतकरी-कष्टकऱ्यांची बेफिकीर लूट चालविली असून जातीधर्माच्या आधारे देश तोडायचे खेळ होत आहेत' या रामभरोसे आरोपाचाही कुठे प्रत्यय येत नाही. या पार्श्वभूमीवर वर्षभरात काही साधले, काही गमावले, की काही फरकच झाला नाही या तीन मुद्द्यांशी मूल्यांकन येऊन पोचेल.

तसे केले तर स्पष्टपणे एक मुद्दा नाकारता येईल, तो म्हणजे काही गमावले काय? महागाई-चलनवाढ-बेकारी-भ्रष्टाचार या गंभीर समस्या वाढलेल्या तरी नाहीत हे जाणवते. मोठमोठे आर्थिक घोटाळे सापडले नाहीत. परकीय चलनाची गंगाजळी वाढली आहे. कर्जात वाढ नाही. महिलांवरचे अत्याचार, घात-अपघात, शिक्षणगोंधळ, आत्महत्त्या हे सगळे सामाजिक विषय आहेत. ते रोज चर्चिले जातच आहेत पण प्रत्येक खात्याची अधिकृत आकडेवारी असे सांगते की, या अन्याय्य व्यवस्थेत, नोंदविण्याइतकी घट नसली तरी वाढ तर नक्कीच नाही. हे सर्व लक्षात घेतल्यावर वर्षभरात सुधारणा नसली तरी वर्षापूर्वीच्या स्थितीत वेगळा काही फरक नाही असे दिसते.

वर्षभरात जे काही साधले असे म्हणता येईल, ते निश्चितच महत्त्वाचे आहे. पहिली गोष्ट साधली म्हणजे आधीच्या केंद्र सरकारबद्दल रडवी दुबळी प्रतिमा तयार झाली होती ती पुष्कळ अंशी बदलली. आधीच्या सरकारमध्ये मनमोहन सिंग हे बुद्धिमान-अनुभवी अर्थतज्ज्ञ प्रमुख होते. शिवाय पी.चिदंबरम, कपिल सिबल, ए के अॅण्टनी, प्रणव मुखर्जी अशी चांगली माणसे होती. पण गांधी मायलेकरू आणि त्यांच्याभोवतीचे टोळके यांनी त्या कर्तबगार लोकांचे पार वांगे केले. इथे एक गोष्ट अनाकलनीय म्हणून नमूद केली पाहिजे की, ही माणसे एवढी तज्ज्ञ व कर्तबगार होती तर मग ती त्या मायलेकरांच्या पोराटकीत कशी काय गुंतून पडली? तो भारतीय सामाजिक मानसिकतेचा अगम्य विशेष म्हणावा; पण त्या मंडळींस कमी लेखण्याचे कारण नाही. त्यांच्याशी तुलना केल्यावर टीम मोदी फारच वरच्या स्तराची मानावी, असे जाणवत नाही.

मनमोहनसिंगांचे परराष्ट्न् दौरे किंवा परदेशी हितसंबंध कमी तोलाचे नव्हते. ओबामांकडून स्तुती व मैत्री त्यांनाही मिळाली होती. त्या मानाने मोदींनी वर्षभरात विदेशी दौऱ्यांचा खूप धडाका लावला असून त्यांची देहबोली, मोकळेपण आणि मुख्य म्हणजे वक्तृत्व सरस आहे. तथापि चीन-अमेरिकेतून त्यामुळे राजकीय किंवा परराष्ट्नीय पाझर वाहू लागेल असे समजू नये. एखादा मित्र मितभाषी, दबलेला, चिंताक्रांत असा असतो; तर दुसरा एखादा मोकळाढाकळा, टाळी देत-घेत अघळपघळ बोलका असतो. पहिला मित्र आपल्या घरी प्यायला पाणी मागून घेईल, तर दुसरा बिनधास्त स्वैपाकघरात जाऊन `काकू पाणी घेतो'-असे म्हणत स्वत: पेला भरून घेईल... त्यापुढे कदाचित तिथल्या टोपलीतून दोन द्राक्षेही खाईल. हे दोन भिन्न स्वभाव, दोन आचारपद्धती आहेत. त्यावरून कर्तृत्व किंवा प्रभाव ठरत नसतो.

परदेशी गुंतवणुकीचे करार आपल्या देशात उत्पादन करण्यासाठी होणे हे उभयपक्षी फायद्याचे असले तरी त्या परदेशासाठी इथे काय काय द्यावे लागेल आणि ते कसे द्यायचे आहे यावरती अच्छे दिन येणार की नाही हे ठरेल. समजा कोकाकोलाने इथे बाटल्या भरण्याचा कारखाना काढला तर आपल्या शेतीचे पाणी त्यास उपलब्ध करून द्यायचे का? जमीन परदेशी कंपनीला दिली तरी इथल्या नोकरांना त्या देशांइतके पगार मिळणार की आमच्या इथल्या रोजगार हमीची त्यांना मजुरी मिळणार? शिवाय इथे उत्पादन होणारा माल इथेच विकला तर नफ्याचे प्रमाण कसे राहणार? कंपनीला होणारा नफा विदेशात जाणार ना? - की ४९% भागधारक भारतीय असणार?.... अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांवर हे करारमदार किती महाग पडणार की संपन्नता आणणार हे ठरेल. एकूणात या गुंतवणुकीमुळे ठप्प झालेले भारतीय जनजीवन उल्हसित व क्रियाशील होईल एवढा तरी लाभ दिसतो.

परंतु हेही लक्षात घ्यायला हवे की, जे आणि जेवढे सुलभीकरण मोठ्या विदेशी कंपन्यांसाठी अवलंबिले जात आहे, त्या इतके इथल्या देशी लघुउद्योगांसाठी केले तर इथली सामान्य माणसे देशासाठी बरेच काही करू शकतील. चीन-जपानमध्ये प्रचंड उद्योग आहेतच, पण पिना-पेने असल्या वस्तूंनी तिथली सामान्य घरे व चरितार्थ चालविले आहेत. भारतातील औद्योगिक वसाहती आणि लघुउद्योगांनी शासकीय छळवाद अनुभवताना, कोण्या चिनी-फ्रेंच कंपनीच्या इथल्या कारखानदारीचा आनंद कसा घ्यावा?

एका वर्षावरून केंद्र सरकारविषयी मत देताना सर्वत्र एकट्या मोदींबद्दल बोलले जाते. सरकारी कारभाराचा सामान्य जीवनावर काय प्रभाव दिसतो? काय वेगळेपण दिसते? प्रवास-बाजार-पोस्ट या ठिकाणी अजून तरी फरक नाही. त्या सगळया व्यवस्था आधीच पार तळाला गेल्यात, त्यांना अधिक खाली जाण्यास जागाच नव्हती त्यामुळे त्या व्यवस्था `जैसे थे' आहेत. वर्षभरात त्यांमध्ये काहीतरी अनुकूल फरक दिसायला हवा होता. `मोदी खूप काम करतात, सुटी-विश्रांती घेत नाहीत' याचा गवगवा कशासाठी? नेहरूंबद्दल, किंबहुना सर्वच राजकीय नेत्यांबद्दल तसे सांगतात. ती या सरकारच्या वर्षाच्या कारभाराची उपलब्धी नव्हे. शेवटच्या स्तरापर्यंत सामान्य प्रश्न सोपे करण्याचे प्रयत्न जोमाने सुरू व्हायला हवे होते, ते दिसत नाही. भाजपची सदस्यसंख्या १० कोटी झाली, त्यातले निम्मे सदस्य आठवड्यातील ४ तास तरी जनतेसाठी देत असतील, तरच फरक पडेल.

हे सर्व असूनही एक गोष्ट निर्विवाद म्हणावी अशी की, मोदी सरकारने जनतेच्या मनांत काही विश्वास, काही उमेद, आशा वर्षभरात निश्चितच निर्माण केली आहे. राजकीय श्रेष्ठींपुढे लाचार बोटचेपेपणा आणि जनतेपुढे अरेरावी असे भोग नक्कीच कमी झाले आहेत. सर्वधर्मसमभाव किंवा धर्मनिरपेक्षता अशा थोतांड तत्त्वांच्या आडून धार्मिक व जातीय विद्वेष पसरविण्याला काही आळा बसला आहे. प्रशासन व कारभार केवळ, अनुदान-कर्जमाफी-आरक्षण यांच्या भूलथापांवर चालविण्याचे प्रमाण कमी जाणवते. स्मारक-अस्मिता-उत्सवप्रियता यांचा फेरविचार सुरू झाला आहे. आर्थिक  उत्कर्षाची चाहुल जनतेला जाणवते आहे, पण हाती येऊ पाहणारा पैसा जबाबदारी व कर्तव्याने खर्च करण्याची शिकवण देण्याला महत्त्व असले पाहिजे.

पाचपैकी शेवटचे वर्ष हे पुढच्या निवडणुकीची तयारी करण्यात जाईल. म्हणजे आणखी तीन वर्षे हाती आहेत. त्या कालावधीत अच्छे दिन उगवणार नसले तरी तशी शक्यता तरी वाढून जनतेला आत्मविश्वास आला पाहिजे. तूर्त निदान एक स्थिर आणि मजबूत सरकार मिळालेे आहे, एवढ्यावर तरी समाधान मानून घ्यायला हवे.


कालप्रवाहाचे अभिनंदन
सुवर्णा मादार या देवदासी युवतीने डॉक्टरेट (पीएच.डी.) संपादन केल्याबद्दल हंपी विद्यापीठाचे प्रा.डॉ.रंगराजू यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. मुंबई येथील श्री.सुधाकर आठले यांच्याकडून डॉ.सुवर्णाला गौरवधन देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्थान संस्था व बेडर रामोशी संघटनेचे अध्यक्ष डॉ.भीमराव गस्ती होते. हा कार्यक्रम रायचूर (कर्नाटक) येथे झाला.
त्या समाजातील कार्यकर्त्या व्ही. आर.भागेम्मा यांना श्रीमान सुधाकर आठले सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ.भीमराव गस्ती यांच्या हस्ते अनंतपूर (आंध्रप्रदेश) येथे हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला. पुरस्कारासंबंधी डॉ.लता यांनी माहिती सांगितली. समारंभाला महिला कार्यकर्त्या, खास करून शिक्षण घेणाऱ्या त्या समाजातील युवतींनी एकच गर्दी केली होती. श्रीमती भागेम्मा यांनी श्रीमान आठले यांना मन:पूर्वक धन्यवाद दिले.
आंध्रातील चित्तूर जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार आदिवासींना, ते कसणाऱ्या वनजमिनीचे हक्कपत्र मिळवून देण्यात उत्थान संस्थेला यश आले. अरण्यात वास्तव्य करून असलेल्या आदिवासींना कायमस्वरूपी जमिनीचे हक्कपत्र मिळाल्यामुळे त्यांच्या जीवनाला स्थैर्य मिळेल. यासाठी उत्थान संस्थेने अनेक वर्षे लढा दिला होता. चित्तूर जिल्ह्यातील आदिवासी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन डॉ.भीमराव गस्ती यांचा चित्तूर येथे सत्कार केला. कार्यक्रमाला चित्तूर व अनंतपूर जिल्ह्यातील आदिवासी उपस्थित होते.
- उत्थान संस्था, १७९, मारुती गल्ली, यमनापूर, बेळगाव
फोन (०८३१)२४७४०५८

शालीय केसपेपर
मुलगा शाळेत प्रवेश करतो. त्याचे एक प्रगतीपुस्तक ठेवले जाते. प्रगतीपुस्तकात सामान्यपणे बारा पाने असतात. प्रत्येक पानावर परीक्षेतील गुण लिहिले जातात. प्रगतीपुस्तकामध्ये आणखी काही कोरी पाने ठेवावीत. या पानांवर शिक्षकाने मुलाचे घर, नातलग, परिस्थिती, मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर चांगला-वाईट परिणाम करणारे वास्तव याच्या नोंदी असाव्यात. वर्गशिक्षकाने त्यासाठी वर्षातून एकदोन वेळा मुलाच्या घरी जावे. पालकांशी थोडे बोलावे. वास्तव पाहावे आणि नोंदी कराव्यात. मुलगा त्या शाळेमध्ये शिकतो आहे तितकी वर्षे त्याची सर्व इयत्तांची प्रगतिपुस्तके जपून ठेवावीत. मुलगा पुढच्या इयत्तेत सरकला की नव्या वर्गशिक्षकाला त्या मुलाची मागील इयत्तांची सर्व प्रगतीपुस्तके वाचायला द्यावीत. मुलगा शाळा सोडून जाईल तेव्हा त्याची सर्व इयत्तांची पुस्तके त्याच्या पालकाच्या स्वाधीन करावीत. अशा या पुरवणी व वितरणात्मक पुस्तकांमधून मुलाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी खूप उपयुक्त माहिती शिक्षकांना, पालकांना आणि स्वत: मुलाला मिळू शकेल. भविष्यकाळात त्या व्यक्तीसही त्याचा आनंद मिळेल.
- म. वि. कोल्हटकर, सातारा
फोन (०२१६२) २३२५०४

फाटकी चादर
पंडित जवाहरलाल नेहरू यांचे व्यक्तिमत्त्व जितके मोठे होते तसेच ते लहान  मुलासारखे निर्दोष होते. त्यांनी स्वत:ला कधी वृद्ध मानले नाही आणि खरे म्हटले तर अगदी मरण येईपर्यंत ते तसे भासले पण नाहीत. मला तर त्यांचा एकही प्रसंग आठवत नाही की त्यांनी आपल्यावरचा एवढासा बोजा दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न केला असेल! ते तर भारताचे पंतप्रधान; मोठे अधिकारी, माणसे एका लहानशा इशाऱ्याने त्यांच्या पायावर झुकतील अशी परिस्थिती होती. कोणाला विश्वास वाटणार नाही पण कधी त्यांनी बेल वाजवून नोकराला-सेवकाला बोलावले नाही. एखाद्या वस्तूची गरज पडली तर ते स्वत: उठून दारापाशी जात आणि जो कोणी दिसेल त्याला सांगत, `बाबा जरा आतमध्ये येशील का?' ऑफीसकाम पूर्ण करून निघायचे झाले की एकही काम ते नोकरासाठी बाकी ठेवत नसत. दिवे, पंखा, हीटर वगैरे ते स्वत: बंद करीत असत. दरवाजासुद्धा स्वत: बंद करून बाहेर पडत.
मी स्वत: पाहिले आहे की, काम करून थकल्यावर एक पाय खुर्चीवर घेऊन पुढे ते काम चालू ठेवीत आणि मग काही वेळ उभे राहात. `आज आपण थकलो आहोत' `बरे वाटत नाही' या सबबींवर त्यांनी कधी काम अर्धवट सोडले नाही.
लोकांना असे वाटत असेल की भारताचे पंतप्रधान ऐषारामात राहात असतील आणि त्यांचा भारी दबदबा असेल. त्यांचा पेहेराव एरवी तसा साधा होता. झब्बा आणि पायजमा.
त्यांच्याकडे एक जुनी चादर होती, ती पण काही ठिकाणी फाटलेली. सकाळी फिरायला जाताना किंवा वर्तमानपत्र वाचताना ते ही चादर पांघरून घेत. त्यांनी ती चादर खूप मळलेली आहे असे पाहून एक दिवस हरीला सांगितले `ती धुवून टाक'. दुपारी धोबी आला पण ती चादर धुण्यासाठी घेऊन जायला त्याने नाही म्हटले. तो म्हणाला, `ही चादर फार विरलेली आहे. ती पाण्यानं विरून जाईल.' दुसऱ्या दिवशी पंडितजींना कळले की त्याने खरंच ती चादर धुतली नाही. तेव्हा त्यांनी स्वत:च ती धुवून टाकली. हीच चादर शेवटपर्यंत त्यांच्याजवळ असलेली मी बघितली.
(मधुसूदन लाला `अरधी सदीनी वाचन यात्रा' या पुस्तकातून )

तुरुंगात असताना नेहरूंचे `डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हे पुस्तक विनोबाजींच्या वाचनात आले. त्यात एका ठिकाणी लिहिले होते की, `महान अकबराच्या कारकिर्दीत तुलसीदास नावाचा संत होऊन गेला.' विनोबांनी नेहरूंना कळवलं की ह्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघेल तेव्हा सुधारणा करावी, `महान तुलसीदासाच्या वेळी अकबर नावाचा एक राजा होऊन गेला.' विनोबा म्हणतात की, `मी दोनदा हिंदुस्थानच्या पदयात्रा केल्या. मला प्रत्येक ठिकाणी तुलसीदासांच्या चौपाया म्हणणारे लोक आढळले. परंतु अकबराचे नाव फारसे आढळले नाही.'
तात्पर्य हे की संतांपुढे कुठलाही राजा थोर नाही.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन