Skip to main content

18 May 2015

नागराळे (ता.पलूस) येथे परिवर्तन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्या अंतर्गत `जग पुढे चालले, आपण मागे का?' याविषयी प्रा.सुनिलकुमार लवटे (कोल्हापूर) यांचे व्याख्यान झाले. त्याचा वृत्तांत......
आपण मागे का?
नैसर्गिक आपत्ती काही फक्त आपल्याच देशावर किंवा महाराष्ट्नवरच येते असे नाही. ढगफुटी, महापूर, गारपीट, अवकाळी पाऊस अशा घटना जगभर घडतच असतात. नैसर्गिक आपत्ती अटळ आणि दुर्दैवी असतात पण अशी संकटे धीरोदात्तपणे सोसण्याचे बळ आपल्या देशात आढळत नाही. भारतातील आणि जगातील अनेक देशांमध्ये घडणाऱ्या घटना तुलनात्मकदृष्ट्या पाहिल्यास काय आढळते?
काही वर्षांपूर्वी जपानमध्ये त्सुनामी आली. प्रचंड नुकसान झाले. पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे घरे कोसळली. मोठी प्राणहानी झाली. पण तो देश सावरला. त्सुनामी आल्याच्या तिसऱ्या दिवशी इन्कमटॅक्स भरायची शेवटची तारीख होती. उध्वस्त झालेल्या शासकीय कार्यालयांसमोर जपानी नागरिकांनी आयकर भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या! ही जीवननिष्ठा, राष्ट्न्प्रेम, स्वाभिमान आपल्याकडे का आढळू नये? मदतीसाठी जगापुढे हात न पसरता, तो देश स्वसामर्थ्यावर अल्पावधीत पुन्हा उभा राहिला. माझ्या देशात मला काय दिसते? मोठा पाऊस झाला;-नुकसानीचे पंचनामे-मोर्चे-आंदोलने! गारपीट, भूकंप, पाणीटंचाई... जणू काही हे शासनानेच घडविले आहे, असे समजून आक्रस्ताळेपणाने आपण मदतीसाठी आकांत करतो. अलीकडेच आपल्या शेजारच्या नेपाळमध्ये भूकंप झाला. मोठा अनर्थ घडला. जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला, पण अल्पावधीत तेथील सरकारला परिस्थितीचे भान आले. जगभरातील सेवाभावी संस्था व कार्यकर्त्यांना नेपाळने आवाहन केले की, `आतापर्यंत केेलेल्या मदतीबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, पण आता कृपया आपल्या घरी परत जा; आम्ही स्वत:च्या हिंमतीवर परिस्थितीला तोंड देऊ आणि सावरू!' आपल्याकडे असे घडले असते का?
स्वातंत्र्यानंतर गेल्या साठ-सत्तर वर्षांत आपल्या देशाने काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत. त्या नाकारता येणार नाहीत. पण इतर देशांच्या तुलनेने आपण अजून फार मागे का? आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इस्त्राइल स्वतंत्र झाला. आपल्याला सुजलाम् सुफलाम् नद्यांचे सुपीक खोरे, प्रचंड वनसंपदा आणि खनिजसामग्री मिळाली. इस्त्राइलला काय होते? रखरखीत उजाड वाळवंट! पण त्या देशाने जिद्दीने प्रयत्न केले. ज्या भूमीवर गवताचे पाते उगवत नव्हते तिथे हिरवीगार शेती फुलविली. उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब काळजीपूर्वक वापरला. आज त्यांच्याकडील कृषी तंत्रज्ञान जगभर जाते. आपल्याकडची परिस्थिती काय आहे? स्वातंत्र्यपूर्व काळी आपल्या देशात तीन चतुर्थांश जंगल व एक चतुर्थांश जमीन होती. आपण जंगलतोड केली. आता एक चतुर्थांशही जंगल नाही.
स्वित्झर्लंड देशात आपल्या बरोबर उलट परिस्थिती आहे. तेथे तीन चतुर्थांश जंगल आणि एक चतुर्थांश शेतजमीन आहे. वृक्षतोडीबाबत कठोर कायदे आहेत. त्या देशात फेर्नचरसाठी आणि इमारतीसाठी लाकूड वापरावर निर्बंध आहेत, आणि ते पाळले जातात.
युरोपमधील नद्यांमध्ये स्वच्छ, प्रदूषणमुक्त पाणी वाहते. `नदीच्या पाण्यामध्ये हातपाय धुवू नका' अशा सूचना लावलेल्या आहेत. तेथील लोक नियम पाळतात. आपल्याकडे काय? गावामधील जेवढी म्हणून घाण ती सगळी गटारगंगा नदीमध्ये! आपण नदीत हातपायच नव्हे तर म्हशी धुतो, ट्न्क धुतो. आपली अत्यंत पवित्र गंगा नदी आज जगात सर्वाधिक प्रदूषित नदी आहे. तीर्थ म्हणून श्रद्धेने गंगेच्या पाण्याची आेंजळ तोंडाजवळ न्याल तर दुर्गंधीने तुम्हाला शिसारी येईल. हा विनाश आपणच ओढवून घेतला आहे.
गेल्या पन्नास-साठ वर्षांत साक्षरतेमध्ये वाढ झाली असेल पण सुशिक्षित झालो आहोत का हा प्रश्न आहे. अक्षरज्ञान आले, पण सुसंस्कार, सदाचार शिकवला गेला नाही. स्वातंत्र्य आंदोलनातील देशभक्तांची पिढी अस्तंगत झाली. आताचे राजकारण हा उकीरडा झाला आहे. भ्रष्टाचार, लाचलुचपत, अवैध मार्ग यांमुळे बजबजपुरी आणली आहे. हे अवघे चित्र  निराशा करण्याइतके भेदक आहे. लोकशाहीची आपल्या देशात अक्षरश: विटंबना चालू आहे. मतदान करताना उमेदवारांच्या यादीवरून नुसती नजर फिरवली तरी त्यांपैकी एकही जण सत्पात्र आढळत नाही, सुजाण विचारी नागरिकांचा भ्रमनिरास होतो. यापैकी एकही जण पात्र नाही म्हणून मोठ्या दु:खाने `नोटा'चा म्हणजे नकाराधिकाराचा वापरच करावा असे वाटू लागते.
आपल्याकडे राष्ट्नीय शिस्तीचा अभाव आहे. परदेशात रस्त्यावर वाहतूक पोलीस उभा असला तर लक्षात येते की, रस्त्यावर काही अडचण आहे. आपल्याकडे ट्न्ॅफीक पोलीस केवळ हप्ते उकळण्याशिवाय दुसरा उद्योग करीत नाही. चूक एकट्या ट्न्ॅफीक पोलीसाची नाही, आपली पण आहे. आपणच त्याला पैसे खायची सवय लावतो. शिट्टी वाजवून गाडी थांबवली तर खिशातून नोट काढून त्याच्या हातावर टेकविणे हे आपल्या एवढे अंगवळणी पडले आहे की, त्यामध्ये काहीही विशेष वाटत नाही. ही स्थिती बदलायला नको का? आपल्याला सातबाराचा उतारा या ना त्या कारणासाठी लागतो. सातबारा उताऱ्याची सरकारी कायदेशीर फी फक्त पन्नास पैसे असते. आपल्यापैकी कितीजणांनी पन्नास पैशात सातबारा मिळविला आहे? त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. दहावीस वेळा हेलपाटे घालावे लागतात.
ज्या देशाला नैतिक अधिष्ठान असते तोच देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. आपण परिवर्तन करण्यासाठी या व्याख्यानमालेच्या निमित्ताने प्रयत्न करीत आहात. आपल्या शक्तीनुसार जमेल ते बिनबोभाट करत आहात. गावोगावी अशी चळवळ उभी राहिली पाहिजे. एखादी लाट येते... कधी इंदिरा गांधीची लाट, कधी जनता पक्षाची लाट, कधी मोदी लाट. लोक आशेने अच्छे दिन ची वाट पाहतात आणि अल्पावधीतच भ्रमनिरास होतो. सगळया गोष्टी शासनानेच करायच्या आहेत हा भ्रम बोकाळला आहे. तो हाडीमासी भिनला आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून माझी स्वत:ची काही जबाबदारी आहे याचा आपणाला विसर पडतो. अशा चळवळीमुळे असा विधायक विचार आपण समाजामध्ये पेरत राहूया.
***
(शब्दांकन : मोहन आळतेकर)


शोधिला पाहिजे विचार । यथातथ्य ।।
``स्वातंत्र्यानंतर एकदा काँग्रेसचे एक प्रमुख नेते बाळासाहेब देसाई कर्मवीरांकडे गेले व म्हणाले, `शिक्षकांचे पगार द्यायची, त्यासाठी पैसे गोळा करायची, `कमवा आणि शिका' यांसारख्या योजनांतून मुलांनी फी उभारायची तुमची कटकट आता सरकारने दूर केली आहे. आता सरकारच पगार देईल, सगळा खर्च करेल आणि गरीब मुलांना फीसुद्धा पूर्ण माफ असेल. तुमचे सगळे कष्ट आता संपले.' हे ऐकून कर्मवीर खूश होतील अशी बहुधा मंत्रीमहोदयांची अपेक्षा होती. पण हे त्यांचं बोलणं ऐकून कर्मवीर खूप उद्विग्न झाले. दु:खातिरेकाने आपला तळहात तीन वेळा कपाळावर आपटून घेऊन कर्मवीर म्हणाले, ``अहो, काय केलंत हे! आपल्या सगळया शिक्षणाचं वाट्टोळं करणारा हा निर्णय आहे! स्वत:च्या प्रगतीसाठी स्वत: पुढाकार घेऊन काही करायची लोकांची ऊर्मीच यामुळे नष्ट होईल. प्रत्येक गोष्टीसाठी लोक सरकारवरच अवलंबून राहू लागतील. समाज आळशी बनेल. जे फुकट मिळतं त्याची कोणालाच काही कदर असत नाही; फुकट दिलंत तर तुमचं शिक्षणही कवडीमोल ठरेल. अतिशय दुर्दैवी असा हा तुमचा निर्णय आहे. मुलांनी स्वावलंबी बनावं, कमवावं व शिकावं हेच उत्तम.' कर्मवीरांनी तेव्हा ते जे कळवळून सांगितलं ते आजही पटतं. लोकांनी स्वत:च्या पुढाकारातून जर शाळा उभारल्या असत्या आणि चालवल्या असत्या तर आज जी शिक्षणाची दुरवस्था झाली आहे ती झाली नसती.''
- `अजूनी चालतोची वाट' या रावसाहेब शिंदे चरित्रातून...

ग्राहकांचा व कार्यकर्त्यांचा उच्च बिंदू
१९९० ते २००५ या सुमारे पंधरा वर्षांत महाराष्ट्नत ग्राहक पंचायत ही `चळवळ' प्रभावी होती. तत्पूर्वी १९७४ पासून पुणे आणि नागपूर येथे स्वतंत्रपणे ग्राहकचळवळीचे काम सुरू झाले होते, आणि त्यानंतरच्या काळात ते मुंबई ग्राहक पंचायतीच्या नावाने वेगळेच सुरू झाले. पुढे देशभरात ही चळवळ थोड्याफार प्रमाणात परिचित झाली, त्यास श्री.बिंदुमाधव जोशी यांचे अविश्रान्त श्रम कारणीभूत आहेत.

भारतीय ग्राहक चळवळीला पुरातन इतिहास आहे. श्रृती-स्मृतींपासून परस्पर व्यवहारांसाठी अर्थनीतीचा विचार येथे मांडलेला आहे. भारतीय विचारांतील `अर्थनीती'चे, पश्चिमात्य मांडणीत `अर्थशास्त्र' बनले. याज्ञवल्क्य स्मृतीत राजाची कर्तव्ये, करवसूली, दुष्काळातील जबाबदाऱ्या वगैरेचा ऊहापोह असल्याचे सांगतात. कौटिल्याचा काळ साधारण तेवीसशे वर्षांपूर्वीचा; त्याच्या अर्थविषयक मांडणीतच आजच्या अर्थशास्त्राचा पाया आहे. अन्नधान्यात भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्याचा अंगठा तोडावा, असे कौटिल्याच्या बाजारपद्धतीचे नियम आज पेलणे कठीण. भारतीय अर्थनीती शेतकरी-उद्योजक-पुरवठादार व ग्राहक या चार स्तंभांवर उभी असून त्या चौघांना समान महत्त्व असल्याचे प्राचीन प्रतिपादन, श्री.बिंदुमाधव जोशी यांनी पुन्हा नव्याने सांगितले. भारतीय विचारदर्शनावरील हे समग्र चिंतन श्री.दत्तोपंत ठेंगडी यांनी प्रथम प्रसृत केले. त्याच दरम्यान अमेरिकन सिनेटमध्ये जॉन केनेडी यानी, ग्राहकांच्या हक्कांची काळजी नव्या अर्थव्यवस्थेला घ्यावी लागेल असा १५ मार्च १९६४ ला प्रथमच उल्लेख केला. ग्राहकत्त्वाचे हे स्थान भावी काळात प्रभावी ठरणार हे लक्षात घेऊन त्या विषयाच्या आधारावर स्वतंत्र संघटन उभे करण्याची कामगिरी रा.स्व.संघाने बिंदुमाधव जोशी यांच्याकडे सोपवली.

अभ्यास, वक्तृत्त्व, प्रवास या त्रिसूत्रीवर त्यानी सुमारे पंचवीस वर्षात ग्राहक संघटना विस्तारली. सर्व विचारांच्या, सर्व क्षेत्रांतील नेत्या-कार्यकर्त्यांशी त्यांचा खूप संपर्क होता. ग्राहक पंचायतीच्या प्रारंभकाळात `संघ इज माय ब्लडग्रुप' असे ते म्हणत असत, तरीही ग्राहक चळवळ त्यांनी कोणत्याच एका विचार-पक्ष यांच्या खुंटीला बांधली नाही. जगाच्या आधुनिक अर्थव्यवस्थेत एके काळी भांडवलदार महत्त्वाचे होते, त्यांनी क्रॅपिटॅलिझम आणला; नंतर श्रमिकांना महत्त्व आले, त्यांनी कम्युनिझम आणला; पुढे काही काळ सोशॅलिझमची हवा होती. या सगळया `ईझम्स'चा पराभव झाला असला तरी आता त्या जागी नवा `ग्राहकवाद' (कन्झ्युमॅरिझम) प्रबळ होऊ नये अशी त्यांची मांडणी होती. `ग्राहक म्हणजे केवळ पैसे देऊन वस्तू किंवा सेवा विकत घेणारा घटक नव्हे, तर बुद्धी-मन-शरीर-आत्मा यांनी जो ग्रहण करतो तो ग्राहक' असे ते सांगत. ग्राहकाला `राजा'चे स्थान न देता, ग्राहक म्हणजे `लोकशाहीची कुणी (किंगपिन ऑफ डेमॉक्रसी)' यावर त्यांचा भर होता. त्यामुळेच ग्राहकांचे `हक्क' महत्त्वाचे, पण त्यापेक्षा `कर्तव्य' जास्त महत्त्वाचे; आणि `अधिकारां'पेक्षा जबाबदारी जास्त महत्त्वाची हा विचार ते सांगत राहिले.

भारतातील अर्थव्यवस्थेने वेगळे वळण घेतले आहे. बाजारपेठेला खूप महत्त्व आले तरी ग्राहकहिताची काळजी त्यात फारशी नाही. ग्राहकाच्या गरजेची वस्तू बाजारात येण्याऐवजी, आपण उत्पादन करून बाजारात आणू त्या वस्तूची गरज निर्माण करणारे नवे मार्केटिंगचे शास्त्र आले. वस्तू `पुरवण्या'तील सेवाभाव संपून `खपविण्या'ची स्पर्धा वाढली. अशा काळात भारतीय ग्राहकतत्त्वांवर आधारित मजबूत संघटना आवश्यक आहे. म्हणून हे कार्य थोडेही दुर्लक्षित होणे, किंवा त्यात शैथिल्य येणे चिंताजनक आहे.

बिंदुमाधव जोशी यांच्या व्यक्तिमत्वात संघाचा प्रभाव होताच, परंतु व्यक्तिेनष्ठा वाढत जाणे संघशैलीच्या विरोधात असते. त्या बाबतीवरून उत्तरार्धात त्यांची संघपरिवाराशी फारकत झाली. युती सरकार गेल्यानंतर त्यांचे ग्राहककल्याण उच्चाधिकार समितीचे मंत्रीस्तरीय  अध्यक्षपद गेले. त्यांचे वय आणि प्रकृतीच्या तक्रारी यांच्याही मर्यादा पडू लागल्या. त्यांच्या कुटुंबियांसह साऱ्या कार्यकर्त्यांच्या विशाल परिवाराचे ते `नाना' होते. त्यांच्या वृद्धापकाळात एकंदर परिस्थिती त्यांना स्वस्थसमाधान देत असेल का, असे शंकाकुल वातावरण होते.  तथापि योगाभ्यास, पूर्वीचे व्यायामप्रेमी शरीर, व संघसंस्कारांतून आलेली शिस्त यांमुळे ते स्थिरचित्त राहू शकले असावेत. त्यांचे आजारपण अलीकडे वाढले होते, हृदयाची शल्यक्रिया करावी लागली, त्यातून ते बरे होतील असे वाटण्याइतके मनस्वीपण त्यांच्याकडे होते. त्यांच्या निकट वर्तुळातील अनेक ग्राहक-कार्यकर्त्यांनी, बिंदुमाधवांना अपेक्षित असणारे भारताचे `ऐश्वर्योपनिषद्' रचण्याचा पुनर्विचार करून नवा प्रारंभ करायला हवा.

ग्राहक पंचायत नावाची ही चळवळ बिंदुमाधव जोशी यांच्या नावाशी जोडली गेली आहे. पण त्यांच्या जाण्याने चळवळ अस्तंगत होऊ नये. उलट नवी परिस्थिती, नवी आव्हाने आणि नवी कार्यपद्धती यांचा स्वीकार करून ही चळवळ वाढवली पाहिजे. देशाला प्राधान्य, श्रमप्रतिष्ठा, विश्वस्त वृत्ती, स्वदेशी, आणि ग्राहकनीती या पंचतत्त्वांना राष्ट्नीय मूल्ये म्हणून रुजविण्याची कधी नव्हे इतकी गरज आज निर्माण झाली आहे. ती मूल्ये अर्थव्यवहारात आली तरच देश `महान' होईल. तेच बिंदूजींचेही स्वप्न होते. श्री.बिंदुमाधव जोशी यांना नम्र आदरांजली.  

नानांच्या सहवासात
श्री.बिंदूमाधव जोशी यांच्याशी निकट संबंध येण्यातून पुष्कळ शिकता आले. भजी किंवा पुरणपोळीसह त्यांच्या घरचे अगत्य पुष्कळदा अनुभवले; त्याचप्रमाणे इथे `वाल्मिकी'च्या प्रांगणातील त्यांच्या भेटीही स्मरणीय आहेत. त्यांच्यासमवेत खूप प्रवास व सभा-व्याख्याने झोडली, वादविवाद झडले आणि प्रेमसंवादही घडले. वक्तशीर दिनचर्या, शुद्ध सात्विक आहार, योगाभ्यास हे सर्व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडीत होते. त्यांचे हस्ताक्षर, वेशभूषा, रोजनिशी, पत्रव्यवहार यांत रेखीवपणा होता. गबाळपणा त्याना खपत नसे. साहित्य-संगीत व शस्त्रविद्या यांची त्यांना जाण होती. वागण्यात काहीवेळा कृत्रिम वाटेल इतके सौष्ठव होते, तशीच तळमळ होती. लाल दिव्याच्या गाडीतून प्रवास करताना सोबतीच्या पोलीसवाल्यांची काळजी घेतली जाई. जिल्हासीमेवर निरोप देताना त्या पोलीस-शिपायांचा सन्मान करण्याची त्यांची रीत होती.
त्यांच्या सहवासातील काही काळ, आयुष्य समृद्ध करून गेला हे वास्तव उरले. आदरणीय नाना गेले! - वसंत आपटे


मोदी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने
मी पंतप्रधान झालो तर...
राष्ट्न् व समाजहिताची भव्य स्वप्ने पाहणाऱ्यांपैकी मीसुद्धा एक आहे. समाजात नैसर्गिकरित्या चार घटक असतात. पहिला कामगार घटक, दुसरा व्यवस्थापक, जो प्रत्यक्षात कामगाराच्या अनुभवातून व नोकरीच्या ज्येष्ठत्त्वाने उत्पन्न होतो, तिसरा घटक नेतृत्त्वाची दुसरी फळी; उदाहरणार्थ लेफ्टनंट जनरल, हवालदार ते सुभेदार मेजर, आयएएस/आयपीएस डेप्यूटी ते सेक्रेटरी, कार्पोरेटर-मंत्री वगैरे वगैरे. या व्यक्ती गुणवत्तेने व भाग्याने वर जातात. परंतु हे सर्व प्रचलित नियमानुसार चाकोरीबद्ध वागतात. चौथा घटक ज्याला मी उपजत किंवा जन्मजात नेता म्हणतो. उदा.छत्रपती, बाजीराव, इंदिराजी, शेषन, बाळासाहेब ते कर्नल जयंतराव! यांच्यामध्ये जन्मजात नेतृत्त्व, गुणवत्ता असते. प्रचलित रूढी, नियम, इतर काय म्हणतील वगैरेपेक्षा स्वत:ला काय योग्य वाटते याला ते महत्त्व देतात. असे अनेक नेते नि:स्वार्थी असतात. `ह्या ठिकाणी मी असतो तर काय केले असते' ही मनोमन तुलना ते करतात. ओबामा भेट, चर्चा, देवाणघेवाण करार यावेळी श्री.मोदींच्या ठिकाणी मी असतो तर?
माझी स्वप्ने फार मोठी-भव्य! युवाशक्ती, ओबामाना `बराक' म्हणून संबोधणे... जिवलग मित्रच जणू! कडकडून मिठी वगैरे वगैरे! आधी सुवर्णकळस पण भुसभुशीत पाया! वर्ष झाले, पण रस्त्यांचे खड्डे, भाववाढ, गुन्हेगारी, गंगेत मृतदेह, रस्त्यांवर भजन-पूजन, सर्वसामान्यांकरिता रिश्वतखोरीचा विळखा वाढला आहे. मोठ्या बोलण्याने देशाचे `राष्ट्न्' घडत नसते. पंतप्रधान होताच अमेरिका, जपान, अस्ट्न्ेिलॉया इत्यादी वाऱ्या कशाकरिता? पंतप्रधानांना आपली शक्तीस्थाने, कमतरता तसेच प्रतिपक्षाच्या गरजा ज्ञात हव्यात. प्रगतीत फक्त अंबानींचे रँकींग वाढले-जगभरातील श्रीमंतांत!
अतिश्रीमंत व सकल राष्ट्नीय उत्पन्न खूप मोठे असलेल्या देशात प्रत्येक नागरिकाच्या जिवाचे मूल्य त्या प्रमाणात मोठे असते. त्यामुळे वास्तव हे आहे की, अमेरिकेच्या तुलनेत आमच्या जिवाचे मूल्य फार फार कमी! पण हेच आमचे बलस्थान होऊ शकते. इंजिनियरिंग गुडस्, तंत्रज्ञान इत्यादीत अमेरिका व भारताची तुलनाच होऊ शकत नाही. जर मी पंतप्रधान झालो तर अमेरिकेसारख्या देशात अंतर्गत सुरक्षेसाठी लाखभर मनुष्यबळ भारताने पुरवले असते. हे अंतर्गत सुरक्षा कर्मचारी असतील; ते अमेरिकेच्या बाजूने युद्ध वगैरे करणारे सैनिक निश्चितच नव्हेत. पण अंतर्गत सुरक्षा कर्मचारी पाठवणे हा एक आर्थिक व्यापारी-व्यवहार आहे. अमेरिकेतील प्रमाणात प्रत्येकाला साधारण १०हजार डॉलर वेतन म्हणजे वर्षाला १०० अब्ज डॉलर्स होतात. म्हणजे तितक्या प्रमाणात पैसा भारतात आला. त्यांचे प्रशिक्षण वगैरे अमेरिकाच करेल. या एवढ्या अमेरिकेच्या पैशातून भारतीय लष्कराच्या २०० बटालियन्सचा खर्च भागतो.
आपण बँकांचे राष्ट्नीयीकरण केले. मी पंतप्रधान झालो तर मंदिरे-मस्जीद-गुरुद्वारा-चर्च इत्यादींबाबत तोच निर्णय घेईन. हा खरे तर जनतेचा पैसा आणि संपत्ती आहे. हा निर्णय घेतला तर सोने ठेवायला सरकारला नवी गोदामे बांधावी लागतील!
देशा-परदेशांत उगीच दौरे कशाला काढायचे? त्यासाठी किती तयारी, किती लाचारी, किती खर्च!! त्यापेक्षा मी दर आठवड्याला एक दिवस १०० किमी प्रवास करून रस्त्यांची पाहणी केली असती. त्यामुळे मुख्यमंत्री-मंत्री-अधिकारी-सगळे टरकले असते. इथे तर आधी कळस उभारण्याची घाई दिसते, पाया मात्र भुसभुशीत! याउलट पाया मजबूत केला तर वरती दगड रचत जाण्याचे काम जनता आपोआपच करेल.
पंतप्रधान होण्यासाठी लढलेल्या निवडणुकांत ४०० सभांसाठी ४०० कोटि अंबानीने दिलेले असतील तर ते तो वसूल करणारच. नुसते `युवाशक्ती' `मन की बात', `भव्य स्वप्ने' हे किती ऐकावं? मेक इन इंडिया करिता भिकेचे वाडगे चालणार नाहीत. इथे हातात चाबूक आणि साऱ्या बलस्थानांचा १०० टक्के निस्वार्थी उपयोग हवा. राष्ट्नच्या मूलभूत गरजा ओळखून नियोजन हवे. जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडणार!!
- कर्नल जयंतराव चितळे, पुणे
मोबा.९३७१८०७४९१

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन