Skip to main content

Sampadkiya in 29 April 2013


पैसा, पैसा आणि पैसा
पाणी - हवा - निसर्ग - प्राणी - भूमी इत्यादी गोष्टींचा विचार केवळ एका विधिपुरता म्हणजे बोलण्यापुरता करायचा असतो असा समज हल्ली सार्वत्रिक आहे. स्वत: व्यक्ती, व्यक्तिसमूह अथवा समाज मात्र तसल्या जुनाट-गावंढळ कृतीसाठी किंचित्मात्र राजी नाही. व्यक्तिकेंद्री व्यवहार हेच केवळ आजच्या जगण्याचे मध्यवर्ती सूत्र आहे. घाटरस्त्यात वाहतूक तुंबली तर त्याचे कारण, त्यावरती उपाय अथवा कोणा संकटग्रस्तास मदत असल्या गोष्टींकडे ढुंकून न पाहता दोन्ही बाजूंनी वाहने मुंगीवाट काढत पुढे घुसतात, आणि तुंबा पार पडला की सुसाट घर गाठतात. हीच तऱ्हा प्रत्येक बाबतीत आहे. त्यामुळे हवा-पाणी-प्राणी यांचा स्वच्छंद उपभोग घेत ही घडी ओलांडत जावी; आणि अर्थातच त्या जीवनशैलीसाठी म्हणून आपल्या स्वत:च्याच नियंत्रणाचा एक चिमटा सतत उघडा लावून त्यात चिमटेल तितका पैसा खेचावा. या प्रकारास ग्रामीण, दुर्बल, शिक्षित, पुढारी, बलुतेदार कुणी कुणीही अपवाद नाही.

भीषण पाणीटंचाईच्या एका तालुक्यात उजाड गावकऱ्यांसाठी पाणगाडी (टँकर)च्या खेपा सुरू होत्या. कधीतरी एखादी पाणगाडी भर उन्हात यायची, त्यावर झुंबड उडायची. म्हणून गावातले काही शहाणे-सुरते लोक जिल्हाधिकाऱ्याकडे गेले. `एक पाणगाडी पुरत नाही, चार हव्यातच' असे हटून बसली. साहेबांनी संबंधितांकडे चौकशी केली, नोंदी पाहिल्या. त्यात दिसले की, या गावासाठी दररोज पाच गाड्यांची सोय कागदोपत्री असून तितके पैसे दररोजचे खर्ची पडत आहेत. घोटाळा रोखण्यासाठी साहेबांनी आदेश काढला की पाणगाडीच्या खेपेसाठी वही घालावी. प्रत्येक खेप पोचली की त्यावर पाच गावकऱ्यांची सही घ्यावी, तरच बिले मंजूर होतील. काही काळानंतर पुन्हा हे गावकरी पाणगाडी येत नसल्याची तक्रार घेऊन आले. ताळा पाहिला. पाच गावकऱ्यांची लेखी पोच होती. लक्षात आले की, त्याच गावातल्या पाचजणांनी दहावीस रुपये गाडीवाल्याकडून घेऊन पोच-सह्या केल्या होत्या. जिल्हाधिकारी म्हणतील की, तेथील सर्वच गावकऱ्यांस प्रत्येकी पाचदहा रुपये दिले तर टँकरपेक्षा कमी पैसे लागतील, टँकर बंदच करावेत! भीती अशी वाटते की, लोक प्यायला पाणी नको, त्याऐवजी पैसेच द्या म्हणतील.

निर्मलग्राम नावाचा एक फंडा येऊन गेला. गावोगावी लाखांवारी बक्षिसे वाटली. सरपंचांनी दिल्लीदरबारी जाऊन राष्ट्न्पतीसह फोटो काढले. आजही ती गावे निर्मल नाहीत. रस्त्यात बायका बसायच्या थोड्या कमी असतील, बंद झाल्या नाहीत. या बायका पार्लरात जाऊन भुवया कोरून येतात आणि बाप्ये सेल फोनवर गाणी ऐकतात परंतु संडास बांधत नाहीत, निसर्गसंरक्षण-प्रदूषण-हवामान हे त्यांच्या कक्षेत नाही.

ज्यांच्या कक्षेत ते असू शकेल त्यांची स्थिती तितकीच बेभान वाटते. गेल्या पंधरवड्यात सोन्याचे दर गडगडले, त्यावेळी सोनेखरेदीला झुंबड उडाली ती कुणाची होती? दुष्काळी जिल्ह्याच्या प्रमुख शहराची बातमी प्रसिद्ध झाली की, त्या शहरात त्याच तीन दिवसांत चावीला पाणी आले नाही, परंतु त्या मुदतीत त्या एकाच शहरात सुमारे २८ कोटि सोनेखरेदी झाली.

या सर्व घटना माणसाच्या प्राप्तकाळी आचारसरणीवर प्रकाश टाकू शकतात. पाण्याची होरपळ होण्याला निसर्गापेक्षा माणसाच्या चुका कारणीभूत असल्याचा निष्कर्ष, त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मांडत आहेत. या चुका मान्य करण्यापुरतेही कोणी धावत्या गतीतून थांबत नाही. शहरे वाढली, उद्योग वाढले, दळणवळण वाढले.... वाट्टेल ते समर्थन होते. पण पैशापाठी धाव मंदावत नाही. आधीच्या पिढ्या कमी पैसा मिळवत होत्या, म्हणून कमी पाणी - कमी तेल वापरत होत्या असे थोडेच आहे? आजच्या पोस्टमास्तरला चाळीस हजार पगार, त्याच्या आजोबांना पोस्टात चाळीस रुपये असेल. पण त्यांना स्वच्छ, स्वच्छंद पाणी मिळत होते, पुणे-सातारा-नाशकात चांगले घर, चांगली हवा मिळत होती. धुणे-भांडी-स्वैपाक सांभाळून संबंधित गरजवंताला मदतही करता येत होती. आज मिळकत वाढली पण धावण्याची गती वाढली, चोरवाटांचा शोध वाढला, आपण पुढे जाण्यासाठी दुसऱ्यापायी काटे फेकण्याची रीत आली. आपल्याला अधिक मिळावे यासाठी दुसऱ्याच्या तोंडचा घास किंवा पाणी पळवणारी बिनदिक्कत खोटेगिरी वाढली. पैसा गाठून चकचकीत राहिले की स्वत:ला सभ्यप्रतिष्ठित समजून घेत इतरांच्या पाण्यात चूळ फेकता येते किंवा कोरड्या धरणाच्या निष्क्रीयतेवर मल उत्सर्जनही करता येते.

या सर्वांमागील प्रवृत्ती वेगळी मानणे कठीण आहे. काय खाऊ नये, कसे वागू नये हे सांगणारे अध्यात्मापासून अंगणवाडीपर्यंत सगळेच आहेत. तसे सांगण्यासाठीही सध्या भरपूर पैसे घेतात. `मनी अॅट एनी कॉस्ट' ही भीषण लालसा सर्वत्र वखवखताना दिसते. सुंदर दिसण्याला, सुंदर बोलण्याला, एकंदरीत सुंदर वाटण्याला पैसेच दिले-घेतले जातात; त्यामुळे हे विश्व विद्रूप होते. त्याची फिकीर करेल असे आचारसौंदर्य शोधून त्याला प्रतिष्ठा देण्याचे काम कुणीतरी करावेच लागेल. ***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...