Skip to main content

Lekh in 22 April 2013


भोग उपभोगण्याचं सुख
- विनिता तेलंग

बेळगावस्थित आमच्या आत्या व काका ही जोडी म्हणजे मूर्तिमंत उत्साह. सत्तरी पार वयात दोघे अत्यंत क्रियाशील. हे दोघेही एका वृद्धाश्रमाशी जोडलेले. त्यांच्या परिश्रमातून उभी राहिलेली वृद्धाश्रमाची नवीन सुसज्ज वास्तू. मी प्रथमच असा `वृद्धाश्रम' नीटपणे पाहणार होते. २५ महिला व केवळ २ पुरुष ही सदस्यसंख्या. तिथे केवळ महिला राज.
आमटीच्या वासानं किचन दरवळलं होतं. एकेका खोलीत सात-आठ कॉट. स्वतंत्र कपाट. प्रत्येकीचं स्वतंत्र जगच ते. एक आजी एम.एस्सी.झालेल्या. बेंगलोरच्या संस्थेत संशोधनाचं काम २५ वर्षे करून निवृत्त झालेल्या. दुसऱ्या आजींच्या चेहऱ्यावरचं नवखेपण लपत नव्हतं. खिडकीशेजारील कॉटवाल्या आज्ज्यांच्या चेहऱ्यावर बंगलेवाले फ्लॅटवाल्यांकडे पाहतात तसे भाव. कुणी नातवानं दिलेली साडी नेसून बसलेल्या. एक-दोघी खूपच आजारी - हैराण. कुणी कुणाला आग्रहानं चहा-बिस्किट भरवत होतं. एक आजी खूपच प्रसन्न, संुदर हसल्या, त्यांना ऐकू येत नाही. एका परिचितांच्या सासूबाई होत्या, त्यांच्याच बंगल्यात मी एकदा या बाइंर्ना भेटलेही होते. त्यांनी पट्टा सुरू केला... नामस्मरणाचं महत्त्व!
तेथील सगळया वृद्धा `पाहून' झाल्यावर निरोपानिरोपी करत आम्ही बाहेर आलो. याच संस्थेच्या विस्तारासाठी सुसज्ज अशा नव्या इमारतीचं बांधकाम शेजारी चालू होतं. संस्थेची ही प्रगती दाद देण्याजोगीच होती. नेटके व्यवस्थापन, छान वातावरण... सगळया आज्ज्यांचे क्षेमकुशल हे सगळं मला आवडलं.
परंतु हे `आवडणं' चांगलं की वाईट, हे मला ठरवता येईना. उगीच त्या आवडण्याची बेचैनी आली. स्वत:ला मूलबाळ नसल्यानं - म्हणजे वृद्धाश्रमात आणून सोडणारं हक्काचं कुणी नसल्यानं - त्या आत्याबाई `मला तर बाई या जागेवरची एक खोली आत्ताच माझ्यासाठी राखून ठेवावीशी वाटतेय...' वगैरे सांगत होत्या. हा मार्ग अगदीच व्यावहारिक, काहीसा अपरिहार्य असला तरी येत्या परिस्थितीला सोयीचा, सुखाचा आहे हे मला पटवत होत्या. त्यातली काही वाक्यं मनात घोळत राहिली. दुर्गाबाइंर्सारख्या दिसणाऱ्या एका आजींनी मला विचारलं होतं, `तू का आली आहेस?' त्यांना पटेल असं खरंखुरं उत्तर मला सुचलं नाही.
मला दोन मुलीच असल्याबद्दल दोघीतीघींनी हळहळ व्यक्त केली. अंतकाळी अग्नी द्यायला तरी मुलगा हवा, असं पूर्वी म्हणत, तसं आता वृद्धाश्रमात सोडायला तरी मुलगा नको का? अगदी निघताना एक आजी धावत आल्या. `तुझ्याच गावात माझा भाऊ राहतो. फोन करून माझ्या भावाला सांग यायला - यावर्षी आलाच नाही तो. भाऊबीजेलाही नाही' असं विनवू लागल्या.
काका एकेक किस्से सांगत होते,- आजी सीरियस असताना घरी कळवलं की, `सगळं आटोपल्यावरच कळवा..' आणि त्याहीवेळी कळविल्यानंतर `मग आता तुम्हीच क्रियाकर्म करा आणि खर्च वजा करून उरलेलं डिपॉझिट पाठवून द्या...' असं म्हणणारा कुणी महाभाग!! - आणि अशा चिरंजीवांच्या आईवडिलांना मायेनं सांभाळणारं काकांचं सत्तरीच्या पुढचं आशावादी-कृतिशील व्यक्तिमत्त्व.

त्या आजींचा प्रश्नही माझ्याकडून उत्तर मागत होता - खरंच मी का गेले होते? इथं लिहायला एक `स्टोरी' मिळावी म्हणून? - एक वेगळा `अनुभव' घ्यावा म्हणून? - आपले पालक कसे सुखी आहेत हे मनाशी अधोरेखित करावं म्हणून? - दोन्ही मुली असल्यानं माझ्यासाठी या पर्यायाची संभाव्यता वाढते असा समज आहे म्हणून? हा आश्रम भाड्याच्या एका घरात असतानाही आम्ही पाहिला होता. काकांच्या धडपडीतून साकारलेलं त्याचं भव्य, नवं रूप आज समोर उभं होतं. पण मन यात आनंद मानायला तयार नव्हतं. `वृद्धाश्रम, पाळणाघरे हे समाजाला मिळालेले शाप आहेत', `अनाथाश्रम, वृद्धांची डे केअर सेंटर्स ही मिरवण्याची नव्हे, लाज वाटण्याची ठिकाणे आहेत...' वगैरे तत्वज्ञान इतके दिवस मनाशी होते. पण तेच वास्तवाला सोडून नाही का? अशा व्यवस्थांचा आधार (सु)दैवाने ज्यांना घ्यावा लागत नाही ते अशा सर्वच गोष्टींकडे तुच्छतेने पाहातात काय?
माणसाच्या आयुष्यातल्या गुंतागुंती वेगळया वाढल्या आहेत. परिस्थिती कुठल्या वळणावर आणून उभं करेल सांगता येत नाही. वृद्धांचा सांभाळ घरी करणं शक्य नाही, या अपरिहार्यतेशी आणून ठेवणाऱ्या, आणि समक्ष पाहिल्यानंतर आपल्यालाही पटतील अशा अनेक अगतिकता असतात. आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडणाऱ्या मुलांच्या नावानंही कल्पनेनं बोटं मोडून नाही चालणार. (तिथल्या काहीजणींच्या वागण्यातले पीळ व्यवस्थापकांना इतके जाचत होते, तर घरी त्याचा त्रास होत असणारच की!) प्रत्येक गोष्टीला दुसरीही बाजू असेतच ना?
घरी असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींसाठी कुणी ना कुणी घरी राहणं अनेकदा आवश्यक ठरतं. दररोजच्या वेळा त्यांच्यासाठी घरातल्या सदस्यांनी वाटून घेतल्या तरी केव्हातरी एकदम बाहेर फिरायला जाणं, कौटुंबिक कार्यक्रम असे प्रसंग मुलगा-सून-नातवंडं, आणि घरातली वृद्ध मंडळी दोघांनाही अवघड होऊन बसतात. एरवी त्यांचं मायेनं करणाऱ्यांना केव्हातरी मोकळेपणानं, निर्धास्तपणानं बाहेर जाता यावं असं त्या ज्येष्ठांनाही मनापासून वाटत असतं. `अशा वेळेपुरते वृद्धांसाठी `अल्पाकाळचे निवारे' का असू नयेत' - असं मला एका समाधानी वृद्धेनं विचारलं होतं. - `म्हणजे आम्हालाही थोडं समाधान मिळेल की, आपल्यामुळं मुलांना बांधल्यासारखं होतं. याचे दु:ख कमी होईल' असं त्यांचं म्हणणं. घरी आई वडील दोघेही आजारी - अंथरुणाला खिळलेले. मुलगा नाही, मुलगी तिच्या दूरगावी संसारात, काही बाही अडचणी. अत्यंत जबाबदार, प्रेमळ, संवेदनशील असलेल्या या मुलीनं त्यांना तशा प्रकारच्या, वृद्धांची काळजी घेणाऱ्या नर्सिंग होममध्ये दाखल केलं. अशा वेळेला, दाखल होणारेच नव्हेत तर दाखल करणारेही फार मोठ्या मानसिक संघर्षातून जात असतात. समाज म्हणून आपण (आपलं सगळं छान असेल तर अधिकच...)  नावं ठेवण्यापलीकडे काहीच करत नाही.
मूलबाळ नसणारे, मुले परदेशी असणारे, वानप्रस्थाश्रमाची संकल्पना मनात ठेवून तिथे जाणारे, गरजेनुसार-आनंद-अडचणीवेळी मुलांकडे राहून एरवी आश्रमात राहणारे.... अशा अनेक प्रकारांनी लोक या वाटेकडे वळत आहेत. ही वेळ येऊ नये हा आदर्श आहेच. पण जर ती वेळ आलीच असेल तर या `सपोर्ट सिस्टीम' अधिक चांगल्या, सोयीस्कर कशा होतील हे पाहायला हवेच.
एक लक्षात घेऊया की पाळणाघर कितीही छान असलं तरी उगीचच कोणी आपलं मूल तिथे नेऊन टाकत नाही; टाकूही नये. पण एकच अपत्य असणाऱ्या घरात वाढणारं मूल तिथे जाऊनच सामाजिकता शिकतं, `शेअरिंग' शिकतं हे खरं आहे. व्यवस्थेचे फायदे तोटे असतातच. त्यामुळे ती सरसकट स्वीकारावी असं नाही, पण ती तुच्छतेने झिडकारूनही चालणार नाही.
एक गोष्ट मात्र प्रामाणिकपणे सांगावीशी वाटते, आपल्या भरल्या घरात आज मुला-नातवंडांत राहणाऱ्या आज्जी-आजोबांनी एकदा तरी ठरवून वृद्धाश्रमाला भेट द्यायला हवी. आपल्या घरात सगळं नीट, ठीक असतानाही अनेकदा कितीतरी बारीक-सारीक गोष्टींचे आग्रह, नाराजी, असमाधान, टीका अशा नकारात्मक गोष्टींचं गाठोडं आपण बांधलेलं-बाळगलेलं असतं. कदाचित त्या वातावरणाचा गंध अनुभवल्यानंतर आपल्याला आपलं गाठोडं उघडून काही चीजा फेकून देत त्याचा आकार थोडा कमी करता येईल.
- आणि अर्थातच आपल्यावर ही वेळ यायला अजून खू%%प अवकाश आहे, अशा तरुण-मध्यमवयातील मंडळींनीदेखील ही `झलक' एकदा पाहून ठेवलेली बरी! म्हणजे आपल्या घरातील वृद्ध पावले तिकडे वळू नयेत याचा आपण निकराचा प्रयत्न करू!
 (मोबा.९८९०९२८४११)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...