Skip to main content

Samp. in 22April2013


ब्रह्म-क्षात्र प्रकट व्हावे
चिपळूणच्या साहित्यसंमेलन प्रसंगी अनेक सामाजिक वाद उफाळले. त्यापैकी एक तर साहित्याशी संबंधितच होता, तो हमीद दलवाई यांच्या घरापासून ग्रंथदिंडी काढण्याचा. पुरोगामी विचारांचा तो दिवंगत साहित्यिक, साहित्यबाह्य कर्मठ धार्मिक वादात अकारण अडकला. दुसरा वाद मुळातच साहित्याशी थेट संबंधित नव्हता, पण कोकणभूमीच्या आणि भूमिपुत्रांच्या अस्मितेशी निगडित होता. श्री परशुरामाशी कोकणातल्या भावना गुंतलेल्या असल्या तरी ती प्रतिमा हटविण्याचे मान्य करून संयोजकांनी वेळीच मुरड घालून कार्यसिद्धी केली ही आजच्या परिस्थितीत योग्य अशीच बाब. प्रश्न केवळ साहित्यबाह्यतेशीच असता तर कोकणातल्या खेड्याचे चित्रपटी नेपथ्य उभे करण्याचा उद्देश तर कोणावर दौलतजादा होण्याचाही असेल. परशुराम-प्रतिमा हटविण्याचे नाटक उरकून त्या रंगमंचावर आता पडदा टाकला तरी चिपळूणच्या महेंद्रगडावर चिरंजीवति अशा परशुरामांचे वास्तव्य असते ही कोकणची नव्हे तर साऱ्या भारतवर्षाची श्रद्धाही चिरंजीव आहे; ती दुखावली जाणार नाही.

परशुरामांचे विश्वभ्रमण, सामर्थ्य, दरारा हा सर्व इतिहास मानायचा, पुराण मानायचे, कल्पित मानायचे की काहीच मानायचे नाही; किंवा अस्तित्त्व पत्करून शत्रुत्त्व मानायचे हा ज्याच्या त्याच्या बौद्धिक कुवतीचा प्रश्न आहे. परंतु माणूस किंवा त्याचा समाज अशा श्रद्धा आणि प्रेरणास्थाने यांना टाळून, फुकाची टीका करून टिकू शकत नाही हे समजून घ्यायला हवे. त्याचबरोबर अशा श्रद्धा व प्रेरणा तेवत ठेवण्याच्या उद्देशाने नेमके काय करावे याचाही विचार त्या त्या कालातील प्रौढ-प्रगल्भांनी केलाच पाहिजे. आपल्या देशात अशा विभूती कित्येक आहेत. त्यांच्या केवळ जयंत्या-तिथ्या करू पाहिल्या तरी वर्षातील मिती कोती ठरेल. परंतु त्या दैवी व्यक्तींच्या शाश्वत-नश्वरतेविषयी चर्चा न करता त्यांचे व्यक्तिमत्त्व-कर्तृत्त्व यांचे गुणसंकीर्तन व्हावे आणि त्याहीपेक्षा आजच्या स्थितीत त्यांचे कोणते वैशिष्ट्य कोणत्या तऱ्हेने आचरणात आणता येईल याचा विमर्श व्हायला हवा. परशुराम हे पूर्वज असल्याचा उल्लेख करू पाहिल्यास त्यांचे क्षात्रतेज-ब्राह्मतेज आठवले पाहिजे. परशुरामजयंतीच्या निमित्ताने उखाण्यांच्या स्पर्धा, हळदीकुंकू किंवा ज्येष्ठांचे कवितावाचन होणार असेल तर त्या अस्मितेने महेंद्रगिरीच्या पायाशी वाशिष्ठीत बुडी घ्यावी हेच बरे!!

मातृभक्ती, पित्याचा राग शमविण्यापुरते वापरलेले चातुर्य, उग्र तप, लोकहित आणि जागृती यांसाठी अखंड भ्रमण, कार्तवीर्याचा उच्छेद, अपरान्तभूमीचे निर्माण, तपाचरण व तत्वचिंतनास संरक्षण, कृषीचे प्रयोग, गृहस्थीधर्मासाठी वधूसंशोधन, क्षात्र-ब्रह्म वृत्तींचा समन्वय... अशा अनेक अंगांनी परशुराम कथा आजही अभ्यासली जावी, लोकांसमोर मांडली जावी आणि भक्त-वारस म्हणविणाऱ्यांकडून तसे आचरण घडण्याचेही प्रयत्न व्हावेत. त्या कथा सत्य असतील, रूपकेही असतील. तारतम्याने त्या जाणून घ्याव्यात. परशुरामांनी क्षत्रियांचा एकवीस वेळा निर्वंश केला हे विधान त्यांचे पूजक आणि निंदक अशा दोन्ही बाजूंनी बाष्कळपणे वापरात ठेवले गेले आहे. पहिल्या वेळी एकदा निर्वंश केल्यावर दुसऱ्यांदा मारायला क्षत्रिय उरलाच कसा, असा साधा तर्क - किमान बुद्धीचा अभिमान बाळगणारांनी - मांडायला हवा. त्याचप्रमाणे परशुरामांनी उत्तरकाळी आपले तेज ज्याच्याकडे संक्रेमत केले तो दाशरथी श्रीराम हा तर क्षत्रियच होता. तात्पर्य असे की, तत्कालीन समाजस्थितीच्या संदर्भात तर्कशुद्ध चिंतनातून सत्यशोध घ्यावा आणि त्याचे आकलन आजच्या संदर्भात प्रेरक म्हणून मांडावे. सर्व विभूतींच्या बाबतीत हे करावेच लागते आणि ते करणाऱ्या चिकित्सक बुद्धीचा वारसा सांगणाऱ्यांनी तर त्यास प्राधान्य द्यायला हवे.

पळीपंचपात्र घेऊन `तदेव लग्नं सुदिनं तदेव, ताराबलं चंद्रबलं तदेव' असे म्हणत दक्षिणा-शिधा उपरण्यात गुंडाळणाऱ्या `याज्ञिकी'चीसुद्धा समाजाला निर्विवाद गरज असते; पण त्या भांडवलावर ब्रह्मतेजाचा वारसा सांगता येत नाही. परशुरामांचे राजकारण सांगणाऱ्यांनी आजच्या काळात मतदानाच्या `सुटी'ला चिपळूण-गुहागर सहल काढू नये; कारण तो आजचा राजकीय कर्तव्यदिन असतो. परशुरामांना राष्ट्न्भक्त म्हणायचे तर मग त्याचा वंश सांगणारे, राष्ट्नीय दिवशी ध्वजवंदनही करत नाहीत याची संगती कशी लावावी? कृषी हा तर भारताच्या सृजनात्म संपन्नतेचा अभिमानास्पद विषय, आज चेष्टेचा बनला आहे. आजचा `जाणता' कृषिमंत्री सांगतो की, शेतीवर अवलंबून न राहता पुढच्या पिढीने इतर पर्याय शोधावेत. अशा समयी परशुरामांस स्मरून सेंद्रिय-वैज्ञानिक शेतीकडे बुद्धिमंत-कष्टकऱ्यांनी वळले पाहिजे. पर्वतावर कोसळणारे पाणी खाचरामध्ये साठवून तृणधान्ये पिकवणारे कृषक्, किंवा गांधारापासून कामरूपापर्यंतच्या भारतवर्षातील तत्कालीन ईर्षाग्रस्त कोलाहलापासून अलिप्त राहणारे चिंतनशील तपाचरण यांचे तत्कालीन प्रयोग इथे आजही रुजविले पाहिजेत.

हे असे काही प्रत्यक्षात येण्यासाठी त्या त्या विचारांचे संघटन तर आवश्यकच ठरते. विचार संघटित होणे ही बरीच पुढची पायरी आहे, पण आचार संघटित होण्यालाही खूप प्रयत्न करावे लागतील. ते आचरण बोडण-श्रावणी-कोश एवढे पुरेसे नसून उद्योग-पराराष्ट्न्-संशोधन-ग्रंथ-कला-अर्थ या सर्व क्षेत्रांतील संपन्नतेचे सर्वांगीण भरणपोषण करणारे हवे. भ्रष्टाचार, प्रदूषण, दुर्भिक्ष्य ही आजची राष्ट्न्संकटे आहेत. त्यांतून मुक्त करणारी राहणी परशुरामसमर्थकांनी आचरलीच पाहिजे. त्यासाठी लाच देणार-घेणार नाही, अन्न-पाणी-इंधन अनाठायी वापरणार नाही, इत्यादी आशय समाजात रुजविणारे आचरण संघटितपणे केले पाहिजे. कर्मठ धर्माचरणास समाजमनस्कता जोडलीच पाहिजे.

राजकारण करायचे की नाही हा मुद्दा वेगळा. परशुराम, चाणक्य, रामदास, गांधीजी यांनी प्रत्यक्ष राजकीय सत्तेत भाग घेतला नाही पण राजकारण न टाळता त्यास वळण लावले. त्यावर वचक ठेवला, मार्गदर्शन केले. हे करण्यासाठी पूर्वजांच्या पराक्रमांचे स्मरणही प्रेरक ठरू शकेल, म्हणून ते करणे योग्य ठरते; पण तसे ते प्रेरक होत असेल तर!! राजकीय असो, वा बौद्धिक सामर्थ्य असो ते लोकहिताचे - अतएव समाजाभिमुख असले पाहिजे. आपल्या गुणवैशिष्ट्यांचा उपयोग सर्वंकष समाजबांधणीसाठीच व्हावा, केवळ तोरा मिरवण्यास नव्हे. बाकीचा समाज भले चूक असेल की बरोबर असेल ती माझीच माणसे आहेत असे वागलेही पाहिजे. परंतु त्यातही थोडा ज्येष्ठ-कनिष्ठत्त्वाचा वास आहे. त्यापुढे जाऊन, मी त्यांच्यातलाच आहे  इतकी समरस भावना बाळगली तरच काही साधेल. परंपरा-भूगोल-शरीरप्रकृती-दैवत अशा आधारांवर कोणी समाजघटक एखाद्या निमित्तापुरता एकत्र होतो. पण पूजा-अर्चा, करमणूक, भोजन एवढेच करून तृप्तीची बोळवण बरी नव्हे. यापुढचा काळ वेगळया तेजाला आवाहन करीत आहे. ते संक्रेमत करता येईल अशी व्यक्तिमात्रे निर्माण होवोत, तरच परशुरामत्त्व चिरंजीव होईल.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...