Skip to main content

Mukundrao Kirloskar Special Ank


श्री.मुकुंदराव किर्लोस्कर यांचे वयाच्या ९२व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. महाराष्ट्नतील ख्यातनाम मासिके `किर्लोस्कर' `स्त्री' `मनोहर' यांच्या संपादकपदी त्यांची कारकीर्द विशेष पुरोगामित्वाने गाजली. नवे विषय निवडून त्यांनी घेतलेला भविष्याचा वेध आज विचार करायला लावतो. त्या व्यतिरिक्त एक वत्सल विचाराचा आणि सकारात्मक आचरणाचा मित्र म्हणून श्री.मुकुंदराव हे साऱ्या महाराष्ट्नला परिचित झाले.  त्यांचे जाणे अकाली नव्हते तरी, सर्व ऋणानुबंधीयांना चटका लावून गेले. त्यांच्या मासिक स्मृतिदिनानिमित्त (फाल्गुन कृ.३) हा अंक....


एक(च) दर्शन
शहर - पुणे.... दि. १६ फेब्रुवारी २०१३, वेळ ५ ची.
स्थळ - महाराष्ट्न् साहित्य परिषदेचे सभागृह.
निवडक संपादकांच्या विचारसभेचा दिवसभराचा समृद्ध अनुभव समाप्तीकडे वाटचाल करू लागलेला.....
शेवटचे चर्चासत्र. कृती कार्यक्रमासंबंधी विचारविमर्श सुरू असताना
संयोजक वसंत आपटे हे समारोप सत्रासाठी
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले सरांना आणण्यासाठी गेले.
आता चर्चासत्र थांबवून समारोप सभेसाठी बैठक रचना लावायला हवी,
अशा विचारात आम्ही असतानाच कुणीतरी कुजबुजलं...`मुकुंदराव आले!'
एकदम सगळयांच्यात चैतन्य पसरलं.
मुकुंदराव आले. `तुमचं चालू द्या' म्हणत सहजपणे बसले.
पाचच मिनिटात चर्चा संपवून समारोपसत्रासाठी रचना करण्यात आम्ही गुंतलो.
आपटेंनी मुकुंदरावांना मनापासून, आग्रहपूर्वक बोलावलं होतं.
आपले जग, किर्लोस्करवाडी आणि विचारपत्रे सगळे विषय
मुकुंदरावांच्या आंतरिक जिव्हाळयाचे असल्याने ते येतील असा विश्वास होता
पण त्यांचे वय व प्रकृती लक्षात घेता त्यांच्या येण्याची एकीकडं खात्री नव्हती. `मला एवढी दगदग झेपणार नाही' असं त्यांनी
९२ व्या वर्षी म्हणणं स्वाभाविक होतं.

पण ते आले. खास किर्लोस्करी टापटीप अन् प्रसन्न वेशभूषेत आले. मला मुकुंदरावांना भेटण्या-पाहण्याचा योग प्रथमच येत होता. दिवसभराचे वृत्त ऐकून व उपस्थित मंडळींची संख्या, गुणवत्ता पाहून त्यांना आनंद झाला होता. आपल्या आवडीच्या गोतावळयात ते मनापासून रमलेले जाणवत होते. कोत्तापल्ले सरांना घेऊन वसंतराव आत आले. मी घाईघाईनं त्यांना सांगायला गेले, `मुकुंदराव...' एवढं म्हणताच वसंतराव म्हणाले, `` छे छे ! ते येतील अशी अपेक्षा नको करुयात... त्यांची प्रकृती...'' मी त्यांना तोडत म्हटलं, ``मुकंुदराव मघाशीच आलेत. थोडा वेळ थांबून निघेन म्हणालेत.'' वसंतरावही उडालेच! `काय?' म्हणत तेही त्यांना भेटायला धावले. ९२ व्या वर्षीही मुकुंदरावांचा तरतरीत तजेला आणि उत्साह प्रेक्षणीय होता! बहुधा त्यांना फार वेळ बसवत नव्हतं. तरीही त्यांचा पाय त्यांच्या प्रिय गोतावळयातून निघत नव्हता. `समारोपाचा कार्यक्रम सुरू झाला की थोड्या वेळानं मी निघेन' असं म्हणून त्यांनी सभेच्या अध्यक्षांची पूर्वपरवानगी घेऊन ठेवली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच `व्यापारी मित्र'चे संस्थापक संपादक आणि `आपले जग'चे चाहते श्री.जी.डी.शर्माजींच्या हस्ते मुकुंदरावांचा छोटासा सत्कार केला. तेही नव्वदीचे लख्ख व्यक्तिमत्त्व! नवसंकल्पाच्या उच्चारांनी अजूनही स्फुरण पावणाऱ्या, मूर्तिमंत चैतन्य असलेल्या त्या दोन युवावृद्धांना पाहताना मनातल्या सगळया निराशा, अडचणी, औदासिन्य गळून पडत होतं. `बोलणार नाही' अशी अट घेऊन आलेले मुकुंदराव `जातवाल्यांच्या' प्रेमळ आग्रहाखातर थोडंसं बोलले. विचारपत्रांच्या या उपक्रमास भरभरून शुभेच्छा दिल्या. `आपले जग'वरचं त्यांचं प्रेमही त्यांनी खुलेपणानं व्यक्त केलं. ``मला वसंतरावांचा खूप अभिमान वाटतो. ३४ वर्षे सातत्याने वाडीतून एक दर्जेदार साप्ताहिक चालवून त्यांनी किर्लोस्करवाडीची पताका फडकत ठेवली आहे याचा मला विशेष आनंद वाटतो. त्यानं इथं पुण्यात येऊन तुम्हा सगळयांना निमंत्रित करून नियतकालिकांचं वैचारिक स्थान दृढ करण्यासाठी पुढाकार घेतला, त्याचं कौतुक आहे.'' असं ते म्हणाले आणि मग माझाही ऊर अभिमानानं भरून आला.

विचारपत्रांच्या संपादकांनी एकत्र यावं व काही विधायक उपक्रम सुरू करावेत या `आपले जग'च्या धडपडीला या पुण्याच्या बैठकीनं भरघोस यश प्रदान केलं. या प्रयत्नाला आशीर्वाद देण्यासाठी मुकुंदराव आले आणि आमचं बळ अजून वाढलं. मराठी वाचक घडवण्यासाठी महाराष्ट्नच्या साहित्यविश्वाची पायाभरणी मुकुंदरावांनी केली. त्यांच्या या योगदानासाठी इथे त्यांचा केेलेला गौरव मात्र अखेरचा ठरला.

वय, अनुभव, योगदान कुठल्याच योग्यतेत बसत नसताना केवळ `आपले जग'मधील अल्प सहभागामुळे मला या हृद्य प्रसंगाची साक्षी होण्याचं भाग्य लाभलं. त्यात तरंगत असताना अवघ्या दहा-बारा दिवसातच मुकुंदराव गेल्याची बातमी आली, जिच्यावर विश्वास ठेवणं खरंच कठीण होतं! त्यांच्या शरीरावर वार्धक्याच्या खुणा मी पाहिल्या होत्या पण नजरेत विलक्षण तेज होतं. शब्द अडखळत होते, पण तारुण्याच्या ऊर्जेनं विचार धावत होते. ती ऊर्जा संक्रेमत करण्यासाठीच जणू ते तिथे आले होते!

महाराष्ट्नची विचारपत्रे अजूनही गुणवत्ता व तत्त्वनिष्ठा जपून नव्या योजनांचा वेध घेत आहेत, हे समाधान घेऊन मुकुंदराव गेलेत!...

जाता जाता तो वसा आपल्या हातात सोपवून!
- विनिता तेलंग (मोबा.९८९०९२८४११)  


जीवन सुंदर करा...
- किरण वैद्य
दि.२८/२/२०१३. मुकुंदराव किर्लोस्कर गेले. चैतन्य चैतन्यात विलीन झाले. अगदी सहजपणे. बोलता बोलता. कर्तृत्वावर काळाने मात केली. एका अनुकरणीय जीवनाची सांगता झाली. मुकुंदराव म्हणजे चैतन्यमूर्ती. सतत उत्साही. सतत आनंंदी. आवश्यक कामांसाठी आपली शक्ती व वेळ खर्च करणारे आणि अनावश्यक गोष्टींमध्ये  वेळ कधीच वाया न घालवणारे. वेळेचं आणि शक्तीचं महत्त्व पुरेपूर जाणणारे आणि म्हणूनच दोन्हीचं विचारपूर्वक व्यवस्थापन करणारे. नियमितपणे फिरायला जाऊन, निसर्गसान्निध्यात राहून शक्ती आणि उत्साह मिळवणारे आणि मिळवलेल्या शक्तीचा उत्साहाने उपयोग करून मोठी मोठी कामे हातावेगळी करणारे. सर्वांशी संपर्क ठेवणारे, जिव्हाळा जपणारे आणि प्रोत्साहन देऊन सहकाऱ्यांनाही मोठे करणारे.
सकारात्मकता, अखंड कार्यमग्नता आणि कल्पकता यांच्या योगाने स्वकर्तृत्वाने समृद्ध होत असतानाच समाजाच्या कल्याणाचा विचार करणारे मुकुंदराव, कर्नाटक आरोग्य धामाचे भक्कम आधारस्तंभ होते. स्वास्थ्य सेवेसाठी समर्पित असलेल्या कर्नाटक आरोग्यधामाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी तीन तपांहून अधिक काळ समर्थपणे सांभाळली. आपल्या संपादकीय कारकीर्दीत `किस्त्रीम'द्वारा संस्कृती संवर्धनासाठी भरीव योगदान देणाऱ्या मुकुंदरावांनी कर्नाटक आरोग्यधामाच्या माध्यमातून समाजस्वास्थ्यासाठीही मोलाचे योगदान दिले. त्यांच्या अनुभवी मार्गदर्शनामुळे, उत्साही सहभागामुळे आणि डोळस जिव्हाळयामुळे कर्नाटक आरोग्य धामाने लक्षणीय प्रगती केली. समाजाचे घसरते स्वास्थ्य आणि बदलती मानसिकता लक्षात घेऊन त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा आग्रह धरला आणि कर्नाटक आरोग्यधाम अनेक यंत्रांनी, उपकरणांनी सुसज्ज झाले. हजारो रुग्णांना त्याचा लाभ झाला.
मुकुंदरावांचे वडील शंकरराव किर्लोस्कर कर्नाटक आरोग्यधामात वास्तव्यास होते. त्यामुळे मुकुंदराव फार पूर्वीपासून घटप्रभेला येत. त्यांच्या येण्याने संस्था चैतन्यमय होऊन जाई. ते सर्वांशी आत्मीयतेने बोलत. संस्थेच्या प्रगतीकडे जातीने लक्ष ठेवत. चांगल्या गोष्टीचं  मनापासून कौतुक करत आणि गैर काही दिसलं तर अधिकारवाणीने समज देत. जबाबदारीची जाणीव देत. पण परस्परसंंबंध कधीही बिघडू देत नसत. प्रत्यक्ष भेटून, फोन किंवा पत्राद्वारे संपर्कात राहात. संस्थेस काही समस्या आल्यास ते ती समस्या पूर्णपणे समजावून घेत आणि आपला अमूल्य वेळ खर्च करून त्या समस्येचं निराकरण करत.
१ जानेवारी हा शंकरराव किर्लोस्करांचा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृत्यर्थ मुकुंदरावांनी शालेय मुलांसाठी एक चित्रकला स्पर्धा सुरू केली. शक्य असेल तेव्हा स्वत: येऊन ते चित्रे पाहून कौतुक करत. स्वहस्ते बक्षिसे देऊन मुलांना प्रोत्साहित करत. `चित्रकला ही सर्वांना समजणारी भाषा असल्याने ती सर्वांनी आत्मसात केली पाहिजे' असे म्हणत. एका स्मृतिदिनी संस्थेतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी `जीवन सुंदर करा' असा संदेश दिला होता.
संस्थेच्या प्रगतीत अत्यंत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संस्थेने जीवनगौरव समारंभ आयोजित केला होता. त्यात मुकुंदरावांचाही गौरव करण्यात आला. त्यावेळी ते `मी जीवनात कोणताच गौरव-सत्कार स्वीकारला नाही. पण या संस्थेने दिलेल्या प्रेमामुळे आज मला नकार देणे अशक्य झाले आहे' असे म्हणाले. त्याचवेळी `संस्था आता तरुण झाली असल्याने अधिक उत्साहाने, जोमाने काम करून सेवाकार्य खेड्यापाड्यातही जाऊन सुरू केले पाहिजे आणि तिथल्या महिला, शिशु आणि विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्याचे रक्षण आणि संवर्धन केले पाहिजे' असे सांगून त्यांनी त्यांची सामाजिक प्रश्नाची जाण व ते सोडविण्याची तळमळ व्यक्त केली होती.
मुकुंदराव आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्या जीवनातील चैतन्यदायी स्मृती, कार्य यशस्वी करण्याच्या रीती, आणि जीवन सुंदर आनंदी करण्याच्या कृती आपल्याजवळ आहेत. त्या आपल्या जीवनात उतरवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल.
- डॉ.किरण वैद्य
कर्नाटक हेल्थ इन्स्टि. घटप्रभा (जि.बेळगाव)
 मोबा.नं. ९४४८१४७१०२






दि. ७/३/१९९६
ङ्कतुम्ही मला एक धक्काच दिलात. `वाढदिवस' ही खासगी व व्यक्तिगत बाब आहे. म्हणून त्याला कसलेही सार्वजनिक स्वरूप देण्यास मी माझ्या मित्रांना सक्त विरोध केला होता. सुदैवाने माझ्या इच्छेला मित्रांनी प्रतिसाद दिला. पण तुम्ही `आपले जग'मधील मुखपृष्ठावरच माझ्या पंचाहत्तरीची वाच्यता केली आहे. त्यामुळे पुण्यातील ज्या मंडळींच्या पाहण्यात `आपले जग' येते, त्यांचे शुभेच्छादर्शक फोन येऊ लागले.
असो. `आपले जग'द्वारे तुम्ही मजबद्दल नेहमीच स्नेहभावना बाळगत आला आहात. त्यापोटीच तुम्ही ही प्रसिद्धी दिलीत असे मी समजतो. आणि एरवी झाली असती ती नाराजी मनातून पुसून टाकतो. तुमच्या स्नेेहभावनेबद्दल व सदिच्छांबद्दल मन:पूर्वक आभार ङ्ख
म.गांधीजींचे काही विचार १९९७ च्या स्मृतीदिनास `आपले जग'मध्ये प्रसिद्ध केले. तो अंक दुर्गा भागवत यांनी पाहिल्यावर त्यांनी `लोकसत्ता'कडे पाठविला. त्यासंबंधी दुर्गाबाइंर्नी `आपले जग'ला कळविले की -
दि.२५/१/१९९७
ङ्कगांधींचा भ्रष्टाचारावरचा उतारा आपण प्रसिद्ध केला आहे. तो मी लोकसत्ताकडे पाठविला आहे. तो गांधी पुण्यतिथीस छापतील.
मी लिहिले त्यात विशेष काय. आपल्या देशात कुणी काही मेहनत घेऊन कर्तव्य म्हणून करताना दिसले की मला आनंद होतो. एरवी मी कुठल्याही पक्षाची नाही. गांधींजींच्या चळवळीत भाग घेणारा एक दुबळा जीव मी आहे; म्हणून त्यांच्याविषयी खूप आपलेपणा आहे, इतकेच. ङ्ख   - दुर्गा भागवत


``समाजातून भ्रष्टाचार नष्ट व्हावा असे वाटत असेल तर समाजाचे आपण एक घटक आहोत म्हणून, आपल्या जीवनातून विसंगती आहे ती दूर करावी लागेल; त्याशिवाय समाजातील विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार दूर व्हावा म्हणून मागणी करण्याचा हक्क राहात नाही. आपल्या व्यक्तिगत सुखासाठी जास्तीत जास्त धनसंग्रह करण्यासाठी आपण झटपट मार्ग शोधत असतो तो बंद करावा लागेल. तसेच नेता, अधिकाऱ्यांची किंवा सत्ताधाऱ्यांची खुशामत करण्याची भीरुता सोडावी लागेल आणि सत्य बोलण्याची हिंमत करावी लागेल. कोणाकोणाची फुकट स्तुती करून श्रेय देण्याचे टाळावे लागेल. आपण इतके सूक्ष्म रीतीने भ्रष्टाचार अनुभवत असतो, पाहात असतो इतका तो आपल्यात भिनला आहे. खोलवर शिरला आहे, हे त्या वेळी लक्षात येईल. समाजातील कित्येक माणसांच्या आचाराबद्दल दोष देऊन किंवा फक्त उपदेश करून भ्रष्टाचार कधीही दूर होऊ शकणार नाही. हे मी अनुभवाने म्हणू शकतो. यासाठी समाजातील  अशा अनेक वीर पुरुष-स्त्रियांच्या समर्पणाची आवश्यकता आहे, जे स्वत:च्या जीवनात विशुद्ध आणि निर्मल चारित्र्याने सर्वत्र संदेश फैलावतील. अशा प्रकारचे चारित्र्यवान संघटित झाले तर देशवासियांसमोर एक चांगले उदाहरण उभे राहू शकेल....''
- महात्मा गांधी (गुजरातीवरून अनुवादित)
(आभार : आपले जग, किर्लोस्करवाडी)
अर्थात हे मुशंकि यांना माहिती नव्हते. नंतर `लोकसत्ता'त उल्लेखासह ते विचार प्रसिद्ध झाल्यावर त्यांनी लोकसत्ताला पत्र लिहिले व त्याची प्रत इकडे पाठविली. ते पत्र -
दि. ३/२/१९९७
ङ्कशुक्रवार ता. ३० जानेवारीच्या दैनिक `लोकसत्ते'च्या मुखपृष्ठावर अग्रभागी गांधीजींचे विचार आपण खास चौकटीत प्रसिद्ध केले आहेत. हे विचार `आपले जग' या किर्लोस्करवाडीहून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिकावरून घेतले असल्याचे ठळकपणे नमूद केले आहे. त्याबद्दल कोणाचे अभिनंदन करावे या संभ्रमात मी पडलो आहे. आपले अभिनंदन करावयाचे ते अशासाठी की `आपले जग'सारख्या ग्रामीण भागातून प्रसिद्ध होणाऱ्या छोट्या साप्ताहिकाकडेही आपले लक्ष असते. त्यावरून काही मजकूर घेण्यात आपल्यासारख्या नामवंत वृत्तपत्राला कमीपणा वाटत नाही. एवढेच नव्हे तर, त्या नियतकालिकाच्या नावाचा उल्लेख करण्याचे सौजन्यही आपण दाखविता. `आपले जग'चे अभिनंदन यासाठी की त्याच्या नावाला महाराष्ट्नतील सर्वाधिक खपाच्या लोकप्रिय दैनिकाने अग्रभागी ठळक प्रसिद्धी दिली. ते असो, `आपले जग' या साप्ताहिकाला आपण अगदी योग्य वेळी प्रसिद्धी दिली. कारण रामानंदनगरसारख्या सांगली जिल्ह्यातील एका अगदी छोट्या गावातून हे साप्ताहिक गेली १८ वर्षे नियमित प्रसिद्ध होत आहे. या काळात दर्जेदार वृत्तपत्रकारितेचे सर्व संकेत या साप्ताहिकाने पाळले आहेत. सांगली जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांना लोकजागृती व लोकशिक्षण या दृष्टिकोनातून या साप्ताहिकाने प्रसिद्धी दिली आहे. त्यामध्ये पुस्तक परिक्षणापासून निधर्मिकतेसारख्या राष्ट्नीय प्रश्नापर्यंत अनेक विषयांचा समावेश आहे.
असे असले तरी वाचक किंवा जाहिरातदार यांचे फार थोडे पाठबळ अशा दर्जेदार साप्ताहिकांना मिळते. वास्तविक वरकरणी स्थानिक वाटणारे, परंतु खरे पाहता साऱ्या महाराष्ट्न् राज्याच्या जिव्हाळयाचे असे काही प्रश्न `आपले जग'सारखी ग्रामीण भागातील छोटी छोटी वृत्तपत्रे व साप्ताहिके प्रकाशात आणण्याची मोलाची कामगिरी करीत असतात. उदाहरणार्थ ताकारी गावाजवळील सागरोबा अभयारण्याची उपेक्षा किंवा वेरळा नदीवरील बलवडी येथील क्रांतीस्मृतिवनाची दुर्दशा यासारख्या गंभीर प्रश्नाकडे साऱ्या समाजाचे व सरकारचे लक्ष वेधण्याची कामगिरी `आपले जग'नेच मोठ्या पोटतिडकीने केली. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
हे सारे सांगायचा हेतू हा की दैनिक `लोकसत्ते'सारख्या अनेक गावांतून प्रसिद्ध होणाऱ्या महाराष्ट्न्व्यापी दैनिकाने आपल्या परिसरातील लहान दैनिके व नियतकालिके यामधून प्रसिद्ध होणाऱ्या उपयुक्त मजकुरास फेरप्रसिद्धी देऊन, त्या सोबत त्या त्या प्रकाशनाचा उल्लेख केला तर जाहिरातदार व वाचक यांचे लेखी त्या त्या प्रकाशनांची किंमत वाढेल. महाराष्ट्नच्या ग्रामीण भागातील काही महत्त्वाच्या घटनांकडेही दैनिक लोकसत्ताच्या वाचकांचे लक्ष वेधले जाण्यास त्यामुळे मोठी मदत होईल. अशासाठी एखाद्या नव्या सदराचा (फीचर) संपादक महाशयांनी जरूर विचार करावा ही विनंती.ङ्ख
`आपले जग'च्या संग्रहातील घटप्रभेच्या परिसरातील एक फोटो मुशंकि यांना उपयोगी होईल म्हणून तो त्यांच्याकडे पाठविला, त्याची ही पोच. (अमेरिकेहून आल्यानंतर वृत्तांत-कथन घटप्रभा येथे झाले, त्यासंबंधी अन्यत्र उल्लेख आहेच.)
दि. २७/१२/२००३
ङ्कतुमचे पत्र व फोटो हे साहित्य आजच मिळाले. फोटो लाखमोलाचा आहे कारण जून १९५७ ते मे १९५८ मी अमेरिकेत होतो. वृत्तपत्र + नियतकालिक सृष्टीच्या निरीक्षणासाठी. तेथे घेतलेेले अनुभव दोन दिवसांच्या वर्कशॉप माध्यमातून मी संबंधितांपुढे ठेवले. दिवसभर प्रत्येकी तीन-तीन तासांचे एक सत्र याप्रमाणे संपादन, जाहिरात, विक्री, पब्लिक रिलेशन्स, छपाईतंत्र, वाचक/ग्राहक पाहणी या विषयावर मी माहिती दिली.
घटप्रभेच्या तळयाकाठच्या इन्स्पेक्शन बंगलो मध्ये दोन-तीन दिवस सर्व मंडळी एकत्र राहात होतो. तो एक अविस्मरणीय अनुभव होता. म्हणून फोटोबद्दल शतश: धन्यवाद.
क्रॅप्टन शिंदे ही माझ्या लोकसंग्रहात पडलेली फार मौलिक भर होय. त्याचे सारे श्रेय तुम्हाला. माझ्या कि.वाडी मुक्कामात मी तुमचा खूपच वेळ घेतला. दिलगीर आहे. लेखाचे ध्यानात आहे. ता.२-३ जाने. रवाना करतो.
तीन्ही इंजेक्शन्स घेतलीत ना?ङ्ख
***


किर्लोस्करवाडीला एकदा पुष्कळ माजी विद्यार्थी जमले होते, त्याविषयी व्यक्तिगत उत्सुकता व सहभागाची इच्छा होती. परंतु बहुतांश स्थानिक `माजीं'ना, ना सूचना, ना बोलावणे. `कदाचित परगावच्या विद्यार्थी गटाने ही वाडी भेट ठरविली असेल त्यामुळे त्यांनी त्यांच्या दृष्टीने योजना केली असेल' असे मानून स्वस्थ राहणे पत्करले. नंतर पुण्याला गेल्यावर मुशंकि यांना हे कळले, आणि त्यांनी लिहिले -
दि. १५/१०/१९९०
ङ्कहे पत्र मुख्यत्त्वे दिलगिरी प्रदर्शनार्थ. कि.वाडी स्नेहसंमेलनाबद्दल मी तुमचेबरोबर चर्चा केली होती. त्यावेळी तुम्ही त्या कल्पनेचा उत्साहाने स्वीकार केला होता. एवढेच नव्हे तर सर्व प्रकारचे हार्दिक सहकार्यही देऊ केले होते.
परंतु ही सारीच कल्पना किर्लोस्कर कारखान्याच्या स्थानिक व्यवस्थापनाने आपल्या कक्षेत घेतली. त्यामुळे मी व्यक्तिश: त्या कल्पनेच्या अंमलबजावणीपासून अलिप्त राहिलो. स्थानिक मंडळींपैकी कोणाला निमंत्रित करावे- यासारख्या बाबी मी स्थानिक व्यवस्थापनावरच सोपविल्या. तुमची गैरहजेरी मला स्वत:ला तीव्रतेने जाणवली. वाईटही वाटले. पण स्थानिक व्यवस्थापनात ढवळाढवळ करणे मला अनुचित वाटले. माझी ही निराशा तुम्हाला कळविण्यासाठी व दिलगिरी व्यक्त करण्यासाठी हे पत्र. तुम्ही गैरसमज करून घेणार नाही अशी उमेद बाळगतो.ङ्ख

किर्लोस्कर मासिकांकडून लेखन मोबदला लेखकांस वेळेत पोचविण्याची दक्षता घेण्यात येई. `आपले जग' तारतम्य पाहून ही प्रथा यथाशक्ती सांभाळू पाहते. त्यानुसार मुशंकि यांनीच लिहिलेल्या एका लेखास किती व कसे मानधन द्यायचे असे धर्मसंकट होते. म्हणून त्यांना `रौप्यमहोत्सवी महाराष्ट्न्' हे छायाचित्रांसह माहितीचे सुंदर पुस्तक देण्यात आले. त्यास पोच देताना त्यांनी लिहिले -
दि. १२/०९/१९९५
ङ्कतुम्हाला दोन पत्रे लिहिली खरी, परंतु तुमच्या सुंदर भेटीबद्दल आभार मानायचेच राहून गेले होते. त्याबद्दल दिलगीर आहे. `सचित्र महाराष्ट्न् दर्शन' मला फार आवडले. सामान्य लेखाबद्दल जर तुम्ही असे भारी मोबदले देऊ लागला तर माझ्यासारखा पुस्तकप्रेमी माणूस तुमचेवर लेखांचा भडिमार करावयाचा! तरी लवकर सावध व्हा, व लेखकांचे एवढे कौतुक करू नका.


Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन