Skip to main content

Sampadkiya in 5 March 2012


व्यक्तीकडून समष्टीकडे

नाशिक, पुणे-मुंबई, ठाणे यानंतर सांगलीमध्ये चित्पावन उद्योजक प्रतिष्ठानची स्थापना होऊन त्याचा पहिला शानदार मेळावा नुकताच पार पडला. `चित्पावन उद्योजक' हा शब्द आजपर्यंतच्या काळात वदतोव्याघात चे उदाहरण म्हणून उच्चारला जात असे. कारण या समाजात शिक्षण आणि राष्ट्न्कार्य याला प्राधान्य होते आणि त्या क्षेत्रात अनेकांनी कर्तबगारी दाखवून दिली ही वस्तुस्थिती असली तरी उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रात, काही अपवाद वगळता फारसे काही भरीव करण्याची प्रवृत्ती दिसत नव्हती. ही गोष्ट जमण्यासारखी नव्हती अशातला भाग नव्हे, तर परिस्थितीचेही कारण होते. एकतर ही ज्ञाती सतत स्थलांतर करणारी आहे. बुद्धिमत्तेला जितके महत्त्व दिले जाते तितके, पैसे कमावण्याला दिले जात नाही. भांडवलाची कमतरता नेहमीची होती. कर्ज काढण्यासाठी कुणी जामीन राहण्यास उत्सुक नसत. कारण परस्पर विश्वासाचा अभाव होता आणि एकादशीच्या घरी शिवरात्र जाण्याचा तो प्रकार असल्यामुळे कोणी वित्तीय संस्था यांचा जामीन मान्य करणेही कठीणच होते. लक्ष्मी आणि सरस्वतीचे भांडण असल्याचा समज करून घेतल्यामुळे सरस्वतीचे पूजन करताना लक्ष्मीला घराबाहेरच ठेवावे अशी एक मनस्थिती आजवर होती. या ज्ञातीमध्ये दूरदृष्टी निश्चितच होती. तत्त्वही - काही अतिरेकीच - होते. डोळे बंद केल्यानंतर व्हिजन असे, पण डोळे उघडल्यानंतर डिव्हिजन आपोआपच होई. या सर्व कारणांनी या लोकांनी उद्योजकता अंमळ सुरक्षित अंतरावर ठेवली होती. शिवाय दारिद्र्यातही अंगभूत कणखर बाणा आणि प्रतिष्ठेच्या कल्पना यांनाही मोठे स्थान असल्यामुळे भांडवल, कच्चा माल, इतर सुविधा आणि ग्राहक यांच्यासमोर लीनता धारण करणे म्हणजे शांतम् पापम्!

याखेरीज आणखी एक मोठे कारण म्हणजे १९४८ सालच्या प्रसंगामुळे परिस्थितीला मिळालेले वळण. यानंतरच्या पन्नास वर्षांत आपल्या गुणवैशिष्ट्यांसह टिकून राहणे इतकेच कर्तव्य आणि जबाबदारी मानली गेली. स्वकष्टार्जित मिळकत आणि प्रस्थापित गावे सोडून पोटामागे धावायचे तर नोकरीला पर्याय नव्हता. आणि त्या सुमारे अर्धशतकात बँका आणि शाळा यातच बुद्धिजीवींचे स्थान असल्यामुळे तेथील नोकरी हेच इतिकर्तव्य मानावे लागले. यामुळे अंगी कर्तबगारी असूनही बरीचशी चेष्टा आणि टवाळी सहन करत काळ कंठावा लागला. उलट प्रचार सहन करावा लागला. सावरकरांसारख्या नरसिंहाला जातीयवादी ठरवून कुठल्या कोण फेदरपांडूला राष्ट्न्वादी म्हटले जात असताना तेही उघड्या कानांनी ऐकावे लागत होते. पुष्कळांना गुलाबपुष्पाची अॅलर्जी असते म्हणतात, तसाच प्रकार समाजात घडत होता. परंतु अशा वादळांना फुले उध्वस्त करता आली तरी जमिनीत गाडले गेलेले बीज त्यांना नाहीसे करता येत नाही.

पन्नास वर्षांनंतर परिस्थिती वळण घेत आहे. नव्या जगात आर्थिक संपन्नतेची दिशा सर्व जगाने पकडली आहे. त्यामुळे गेल्या सुमारे पंचवीस-तीस वर्षांत आपल्या बुद्धीइतकेच श्रमशक्तीला स्थान देणारे व्यवसाय आणि उद्योग बहराला येत चालले आहेत. सरकारी नोकऱ्या आणि सवलती यामध्ये स्थान मिळण्याची शक्यता नसल्यामुळे स्वत:च नोकऱ्या निर्माण करणारे उद्योजक नव्या पिढीने निर्माण करण्याला सुरुवात केली आहे. या बदलास संपन्नता म्हणण्यासारखी परिस्थिती अद्यापि नाही, तरीही दिशा अचूक असेल तर सारा समाज बरोबर घेऊन तो स्वस्थचित्त बनविण्यासाठी उद्योग जगताचे नेतृत्त्व करण्यासारखी परिस्थिती शक्य होईल, यासाठी या उद्योजकांचे संघटन आवश्यक ठरते.

हे संघटन तीन पैलूंनी होणे अपेक्षित आहे. एक म्हणजे समस्याधारित काम. उद्योजकांपुढे भांडवल, मार्केटिंग, कर्मचारी या संदर्भात अडचणी आहेत. शिवाय स्वत: मालक आणि कर्मचारी या दोन्ही घटकांना नव्या बदलत्या परिस्थितीनुसार प्रशिक्षणाची नितांत गरज आहे. बाजारातील अगत्यशीलतेमध्ये भारतीय लोक फार कमी पडतात असा जगाचा अनुभव आहे. पुणेरी व्यवसायिकांचा तऱ्हेवाईकपणा हा आजपर्यंत चेष्टेचा विषय होता त्यात बदल आवश्यक आहे. गावोगावीच्या उद्योजकांची लग्नेसुद्धा जमत नाहीत कारण कमी संख्येने असलेल्या मुली नोकरीवाल्यांना प्राधान्य देतात; उद्योजकांच्या दृष्टीने हीसुद्धा समस्या हाताळावी लागेल. सध्या सरकार ही एक समस्याच ठरत आहे. त्याच्याशी संवाद करत ती आटोक्यात घ्यावी लागेल. दुसरा पैलू असा की, उद्योग-व्यवसायातून येणाऱ्या पैशाचा विनियोग करण्यासाठी मार्गदर्शन हवे. `समाज आणि सरकार फारच चूक आहे' अशी समजूत घेऊन स्वत:चे अलिप्तपण राखणे समर्थनीय ठरत नाही. समाजाचे ऋण मानून ते फेडणे हा एक भाग आणि आपण या समाजाचेच घटक आहोत यादृष्टीने सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा दुसरा भाग अंगिकारावा लागेल. तिसरा मुद्दा म्हणजे आपल्या बुद्धीचा आणि तथाकथित शहाणपणाचा उपयोग समाजाला दिशा देण्यासाठी करावा लागेल. समाजातील अनेक अनिष्ट प्रथा केवळ टीका करून किंवा त्यापासून दूर राहून नाहीशा होणार नाहीत. त्यांच्यापुढे नवे आदर्श प्रस्थापित करावे लागतील हे या उद्योजकांचे कर्तव्य आहे. उदाहरण म्हणून या संघटनेच्या वतीने आदर्श गणेशोत्सव साजरा करून दाखवता येईल. टिळकांनी ज्या भावनेतून उत्सव सुरू केला त्याच्याशी प्रामाणिक राहणारा सामुदायिक उत्सव आवर्जून करावा. वाहने व प्रदूषण यांचा अतिरेक झाला असून तो कमी करण्याची गरज सर्वत्र व्यक्त केली जाते. या संघटनेचे सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय यांनी आठवड्यातला किंवा प्रारंभी किमान महिन्यातला एक दिवस `वाहनविरहित दिवस (नो व्हेईकल डे)' पाळावा. या ज्ञातीमध्ये मतदानाचे प्रमाण अत्यल्प आहे ते शंभर टक्के होईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. हे सर्व उपक्रम उदाहरण म्हणून दिले आहेत त्यात कितीतरी भर घालता येईल. यासाठी फार मोठा निधी लागणार नाही, केवळ मनोभूमिका तयार करण्याची गरज आहे आणि इतर समाजावर त्याचा खूप मोठा प्रभाव निश्चितपणाने दिसून येणार आहे.

याशिवाय अशा एकत्त्वाने काम करताना काही विधी म्हणजे करावयाच्या गोष्टी आणि निषेध म्हणजे टाळण्याच्या गोष्टी प्रस्थापित कराव्या लागतील. करण्याच्या गोष्टींमध्ये उचित व्यवहार (फेअर डिल) याला प्राधान्य हवे. या संघटनेतील कोणताही सभासद फसवणूक करणार नाही, गुणवत्तेला प्राधान्य देईल असा विश्वास जगाला देता आला पाहिजे. संवादकौशल्य हीसुद्धा नव्याने अंगी बाणवण्याची गोष्ट आहे. दुसऱ्यावर टीका करणे किंवा दुर्मुखलेपणा कवटाळणे यामुळे उद्योजकता विकसित होणे कठीण असते. अशा अनेक प्रकारांनी सामर्थ्य मिळविणे, त्याचा विनियोग करणे आणि त्यातून इतरांना दिशा देणे हे घडत राहिले तर त्याचे महत्त्व वेगळे सांगत बसावे लागणार नाही.

उद्योग-व्यवसायातून मिळणारे धन, प्रतिष्ठा, आणि इतर अनेक फायदे हे अंतिमत: राष्ट्न्सेवेसाठी वापरता आलेच पाहिजेत. त्यासाठी वेगळा अभिनिवेश बाळगायला हरकत नाही. राजकारण काहीच करू देत नाही हे सध्याचे वास्तव असले तरी, तसले राजकारण झुगारून देत आपली मांड उत्तम व्यवस्थेच्या शासनावरसुद्धा पक्की करता येईल अशी दीर्घकालीन शक्यता लक्षात घेऊनच आज पहिले पाऊल पडत आहे. ही वाटचाल सर्व दिशांनी प्रभावी होत जावो.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन