Skip to main content

7 Jan 2019

शून्य कचरा 
कचऱ्याने आता `भेदिले सूर्यमंडळा' अशी स्थिती आली आहे. स्वच्छतेसाठी मोहिमा काढल्या तरी त्यांचा फार अुपयोग झाल्याचे जाणवत नाही. या प्रश्नाच्या मुळाशी जायचे तर कचरा निर्माणच होअू नये यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत. असा प्रयत्न करणाऱ्या अेका प्रयोगशील गृहस्थाने `शून्य कचऱ्या'च्या दिशेने केलेला विचार, आणि त्याचे स्वत:चे प्रयत्न यांचे संकलन असलेली पुस्तिका प्रकाशित केली आहे. ती फार अुपयोगी आहे; तरी त्यात आपापल्या परीने काही नवे शेाधही लावता येतील. आपल्या विचारांना अेक दिशा मिळण्यासाठी या पुस्तिकेचा प्रसार व्हायला हवा. या पुस्तिकेची किंमत `आपल्याला योग्य वाटेल ती' अशी छापलेली आहे तरीही तिच्या १३ मराठीतील, आणि हिंदी गुजराती आिंग्रजीही आवृत्या निघालेल्या आहेत, यावरून बऱ्याच लोकांनी हे अुपाय समजून घेतले आहेत. त्या अुपायंाचे सहज सोपे आचरण सुरू झाले तर हा महान प्रश्न बराचसा सुटेल. त्यातील अेका प्रकरणाचा संक्षेप येथे दिला आहे -
शून्य कचरा - अंतिम स्वच्छता - म्हणजेच वापरलेल्या वस्तूंचे किंवा नकोशा वस्तूंचे योग्य व्यवस्थापन. हे पुस्तक वाचून जे कोणी त्याप्रमाणे वागू लागतील त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की; हे एक व्रत आहे, ते नेटाने पाळले, तर आपल्या वृत्ती बदलतात. स्वच्छता हा गुणधर्म बनून जातो.
`शून्य कचरा' ही फक्त कल्पनाच असू शकते असे मलाही वाटायचे. पण थोडासा विचार अन् त्याप्रमाणे आचरण केल्यास ही कल्पना शक्य होते. यासाठी लागतात रोजची फक्त १० ते १५ मिनिटे. माझ्या दारावर मी पाटी लावली. `येथे कचरा तयार होत नाही. गेली अकरा वर्षे आम्ही घरातून कचरा बाहेर देत नाही. कचऱ्याला आम्ही कचरा न म्हणता त्यांना `वापरलेल्या वस्तू' म्हणजेज `वाव' म्हणतो. ``आम्ही कचरा तयार करणारी माणसं नाही.'' असं अभिमानानं म्हणतो. शून्य कचरा ही संकल्पना आचरणात आणत आहोत. तेच कचऱ्याच्या प्रश्नाचे एकमेव उत्तर आहे.
मी कचऱ्याविषयी बोलतो हे ऐकून आमचा सफाई कामगार म्हणाला, `साहेब आमच्या पोटावर पाय आणताहेत! हे सांगतात त्याप्रमाणे जर का वागू लागले तर आम्हाला काम काय उरणार? आमचे खायचे वांदे.` एक उच्चविद्याविभूषित गब्बर मित्र म्हणाला, `अरे असं वागलं तर सफाई कामगार मरतील. ज्यांना दुसरं काही येत नाही, तेच लोक ही कामं करतात!'
हे काम घाण आहे, त्याच्यामुळे आयुष्याची बरबादी होत आहे, कचऱ्यात काम केल्यामुळे व्यसन लागते, रोग होतात, याची त्या सफाई कामगाराला जाणीवच नाही. पैसेवाल्या सुशिक्षित भारतीय नागरिकाला, आपला एक बंधू चुकीचे काम करतो आहे. त्याला ते घाणीतील काम करायला लावण्यामागे मी स्वत: कारणीभूत आहे, याची जाणीव नाही. श्रीमंत वर्गानं कचरा तयार करायचा आणि ज्याला कमी बुद्धी आहे अशा वर्गानं त्याचं व्यवस्थापन करायचं हा एक सामाजिक अन्याय!
शून्य कचरा ही संकल्पना आचरणात आणण्यात पहिली अडचण आहे वर्गीकरणाच्या प्रशिक्षणाची. कचऱ्याचं वर्गीकरण कसं करायचं हे शिकवायला हवं. दहा प्रकारचा कचरा आपल्या घरातून निघतो. -
१) निसर्गनिर्मित- बायोडिग्रेडेबल २) कागद ३) काच ४) नारळाच्या करवंट्या ५) चिनी मातीची भांडी ६) जाड प्लॅस्टिक ७) हाडं ८) पातळ प्लास्टिक ९) सॅनिटरी नॅपकिन्स १०) ई - वेस्ट
शून्य कचरा म्हणजेच पराकोटीची स्वच्छता किंवा वापरून झालेल्या गोष्टींचे, वस्तूंचे योग्य व्यवस्थापन. आपल्याकडे स्वच्छतेबद्दल आस्था नाही. स्वच्छतेपेक्षा कचराच आपल्याला जास्त परिचयाचा आहे. कचरा म्हणजे घाण, गलिच्छपणा हे आपल्या डोक्यात बसले आहे. जुनी गाडी म्हणायच्या ऐवजी आजकाल आपण `प्रिओड्न कार' असं म्हणतो. तसंच कचरा हा शब्द बदलून `वाव' (वापरलेल्या वस्तू) असं म्हटलं तर? प्रिओड्न गाड्या चकाचकच असतात, वापरून झालेल्या गोष्टीसुद्धा तशाच स्वच्छ अन् व्यवस्थितच ठेवायची सवय लागेल. एखादी गोष्ट आपण वापरत असतो, तोपर्यंत आपल्याला तिची घाण, किळस वाटत नाही. बटाट्याच्या साली, केळयाची साल प्लॅस्टिकच्या पिशवीकडे जरा नजर टाका, जोपर्यंत बटाटा, केळे, पावभाजी यांना आपल्याला सांभाळायचे किंवा कोठेतरी घेऊन जायचे आहे, तोपर्यंत त्यांच्या साली अन् पिशव्या आपल्याला हव्या असतात. ज्या क्षणाला साली अन् पिशव्या, सुट्या होतात, त्या क्षणाला त्यांच्या नशिबी कचरेपण येते किंवा या गोष्टी `वाव' बनतात. योग्य संस्कार न केल्याने योग्य व्यवस्थापन न केल्याने त्यांना किळसवाणे रूप येते.
एखादी गोष्ट वापरून झाली की टाकून द्यायची. या सवयीवर जरा विचार करायला पाहिजे. यासाठी पहिली क्रिया कोणती? जाहीर करायला पाहिजे की, माझ्या घरात वापरून झालेल्या गोष्टी आजपासून मी घराबाहेर टाकणार नाही. आपल्या घरावर `शून्य कचरा' असा फलक लावणे म्हणजे एक प्रकारचे स्वत:चेच स्वत:ला बजावणे आहे.
या कचऱ्याचे करायचे काय? माहीत नाही, म्हणून मग घरातला कचरा रस्त्यावर टाकतात. नगरपालिका तो उचलते आणि दूर शहराबाहेर नेऊन टाकते. या दोन्ही क्रिया सारख्याच आहेत. या प्रश्नाला एकमेव उत्तर आहे. प्रत्येकाने `टाकणे' ही क्रिया प्रथम बंद केली पाहिजे. टाकण्यापेक्षा ठेवण्याची सवय स्वत:ला लावून घेणार? एखादी गोष्ट ठेवायची, जतन करायची म्हणजे तिला स्वच्छ करणे हे ओघाने आलेच. वापरून झालेल्या गोष्टी तुमच्या घरात जमा होऊ लागतील. रद्दी तर तुम्ही विकताच. वापरून स्वच्छ केलेले कागद विकता येतील. ज्या वस्तू कोणीही घेणार नाही अशा सर्व गोष्टी ह्या `बायोडिग्रेडेबल' म्हणजेच जैविक वस्तू असतात. त्यांना  मातीत रूपांतरित करणे ही जबाबदारी आहे. ह्या वस्तू सहजपणे मातीमय होतात.
आमच्याकडे कचऱ्याच्या तीन बादल्या होत्या. त्यांपैकी एकीत जास्त कचरा जमा होत होता. ती होती मी कामासाठी बसायचो तेथे असलेली डस्टबिन्! नको असलेले कागद फाडून अथवा बोळा करून डस्टबिन्मध्ये टाकत होतो. कागद फाडण्याची माझी सवय बंद केली. वापरून झालेल्या अथवा नको असलेल्या कागदाचा चोळामोळा करायचा नाही असे मी ठरविले. माझी कचरापेटी ओस पडू लागली. नको असलेल्या कागदाचे ठरावीक आकाराचे गठ्ठे तयार होऊ लागले, जे मी रद्दीवाल्याला सहज देऊ शकणार होतो.
टपाल वेडेवाकडे उघडले की कचऱ्याची निर्मिती होते. दूध घेऊन आलो, दुधाच्या पिशवीचा एक कोपरा उडविला. दूध पातेल्यात ठेवले. माझी पिशवी फाडायची पद्धत चुकीची होती. पिशवी जर मी ब्लेडने आडवी चीर देऊन फाडली असती, तर असा कचरा झाला नसता. मी लगोलग त्या पिशव्या उलट्या करून साबणाने स्वच्छ धुतल्या. फडक्याने पूर्ण पुसल्या. हे सर्व काम दूध तापून चहाला उकळी येइेपर्यंत झाले होते. किती थोडा वेळ! नाहीतरी या वेळेत मी काय केले असते?
पेपरमधून हॅण्डबिलांच्या जाहिराती बाहेर पडतात. पूर्वी या कागदांना मी सरळ डस्टबिनची वाट दाखवीत असे. मी त्या सर्व जाहिराती व्यवस्थित गोळा केल्या. रद्दीच्या खणात एका बाजूला ठेवून दिल्या. गाळण्यात चहाची ओली पूड जमा झालेली होती. एका भांड्यात पाणी भरून घेतले. त्या भांड्यावर चहाची पूड असलेले गाळणे ठेवले. चहाची पूड भांड्यातील पाण्यात बुडणार होती. तिचा गोडवा पाण्यात उतरणार होता. कचऱ्याच्या एका बादलीत मी ती चहाची पूड टाकली. चहाचे भांडे विसळून झाले. शेजारीच शिळया दुधाचे पातेले. सर्व साय खरवडून काढली. पातेले स्वच्छ करण्यासाठी मला अशी पावडर पाहिजे होती की, जी सायीला खराब न करता पातेल्यापासून वेगळं करणार होती. कालची उरलेली पोळी सापडली. दुधाच्या पातेल्यात मी पोळी कुस्करली. थोडीशी साखर टाकली. साखर आणि शिळया पोळीच्या चुऱ्याने सर्व साय निघून आली. त्या एका पोळीचा छोटासा लाडू बनवला. आता दुधाचे पातेले फक्त विसळायचे बाकी होते.
पोह्याचा चुरा, कांद्या-बटाट्याची सालं, कोथिंबीर आणि कढीपत्त्याच्या काड्या, मिरचीची देठं, नारळाची करवंटी ह्या पदार्थांचा ढीग टेबलावर जमला. माझ्या हातात सुरी होती, समोर विळी होती. सर्व टाकाऊ वस्तू घेऊन त्याचे बारीक बारीक तुकडे केले. असे केल्याने या सर्व टाकाऊ  वस्तूंना मातीत रूपांतर व्हायला कालावधी कमी होणार होता. सकाळी जेवणापर्यंत घरातील कचऱ्याच्या तीन बादल्यांपैकी एका बादलीत तळाशी थोडासा कचरा दिसू लागला होता.
संपूर्ण दिवस घरात बऱ्याच वस्तू येत होत्या. वेष्टणाचे सर्व कागद वेगळे केले, प्लॅस्टिकच्या पिशव्या स्वच्छ केल्या आणि वाळवण्यासाठी टांगून ठेवल्या. इस्त्रीवाला कपड्यांच्या बंडलाचा दोरा सोडला, कागद बाजूला केला, दोऱ्याचा गुंडाळा केला. कागद रद्दीत ठेवला. पुठ्ठ्याचे बरेच खोके बॅगा घरात आल्या. खोके रद्दीच्या खणात ठेवले. पूर्वी मी कचऱ्याच्या बादलीत टाकल्या असत्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कचरेवाल्याला दिल्या असत्या. प्लॅस्टिकच्या पिशव्यांची तोंडे मारलेली गाठ निघणारच नाही अशी समजूत आपण करून घेतलेली असते. ओले पदार्थ आणतो ते आपण ही गाठ कापूनच पिशवी उघडतो. ती गाठ अल्प वेळात सुटली. लक्षात आले की, प्लॅस्टिकच्या पिशवीला घट्ट गाठ बसूच शकत नाही. लागल्या हाती  मी त्या पिशव्या उलट्या करून साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुतल्या. जेवणाची मांडामांड होईस्तोवर पिशव्या धुवून झाल्या होत्या.
ओला कचरा असाच ठेवला, तर यावर चिलटे बसणार, दुर्गंधी सुटणार. बादली उघडताच वास येणार. यांपासून बचाव करणारे झाकण मला पाहिजे होते. ते झाकण होते माती! मी धावतच अंगणात गेलो. पसाभर चांगली माती मला मिळेना. सर्व सोसायटीतील जमिनी सिमेंट काँक्रीटच्या. एका रोपवाटिकेत जाऊन तेथून चांगली माती विकत घेऊन आलो. ती माती बादलीतील कचऱ्यावर पांघरूण घातल्यासारखी पसरली. आता बादलीत कचरा दिसतच नव्हता. मातीच्या पांघरुणाखाली झोपलेल्या कचऱ्याचे यथावकाश मातीत रूपांतर होणार होते.
`शून्य कचरा- येथे कचरा तयार होत नाही.' अशी पाटी मी माझ्या घरावर लावली आहे. अपेक्षा आहे की, मी राबवत असलेल्या प्रकल्पाची माहिती येता-जाता एकतरी माणूस कुतुहलापोटी विचारेल. आजपर्यंत फारच थोड्या व्यक्तींचे कुतुहल जागृत झालेले आहे. पण मी आशावादी आहे.

 संपादकीय
नवे वर्ष जुने होते
साधारणत: डिसेंबर महिन्याच्या मध्यापासून प्रचलित व्यवहारातल्या वर्षाच्या अखेरीचे निश्वास सुटू लागतात. हे वर्ष फारच लवकर संपले, वर्ष कसे संपले कळलेच नाही... अशा अुद्गारांत नवे वर्ष दारात येअून ठेपते; आणि तिथून पुढचा नव्या वर्षाचा पंधरवडा अेकमेकांचे शुभ चिंतिण्यात खर्च होतो. क्रॅलेंडर बदलतात, वाटली जातात. वास्तविक अेका घरात अेक किंवा दोन क्रॅलेंडरे पुरेशी असतात; पण मिळतील तितकी क्रॅलेंडरे मागमागून गोळा करण्यातही काहीजण रमतात. डायऱ्यांचे तर ढीग बाजारात दिसतात, पूर्वी संक्रांतीच्या निमित्ताने करंडे - परड्या - बांगड्या लुटण्याची रीत होती, तशा हल्ली फुकट डायऱ्या लुटण्याची रीत असावी. कोणत्याही डायरीच्या तीनशे पासष्टपैकी वीसेक पानांपुरता वापर होअून बाकीची पाने गरगटायला जातात. नव्या वर्षात काय काय स्थिती येआील याची हुरहुर प्रत्येकाला असतेच. त्यात आठवणी, अुत्कंठा, अपेक्षा, संकल्प, निश्चय, संधी, आव्हाने आित्यादींची भर पडते आणि पुढचे वर्ष पुढे सरकत राहते. ते जायचे तसेच जाणार असते.

अुद्याच्या अज्ञात अवकाशात विहार करण्यासाठी आज च्या वर्तमानावर स्वार व्हावेच लागते. याच दरम्यान मकरसंक्रमणाचे पर्व असते. वर्तमान आणि भविष्य यांना जोडणारे संक्रमण सतत सुरूच असते. ही सांधेजोड विलग करता येत नाही. जे कृष्णमूर्ती म्हणतात की, भविष्याबाबतचे कथन किंवा अंदाज म्हणजे वर्तमानाचेच प्रक्षेपण असते. ज्ञात वर्तमानात रुतलेले माणसाचे मन अज्ञाताचा शोध घेण्यास असमर्थच असते. कल्पनांचा अविरत वाहणारा प्रवाह म्हणजेच माणसाचे मन!  वर्तमानात जगायचे आणि त्यालाच काहीतरी कल्पनेचा आकार द्यायचा, त्यालाच भविष्यवेध म्हणायचे, असा मानवी मनाचा खेळ! त्यातलाच हा नव्या वर्षाचा अुत्सव; आणि त्या सांध्यावर अुचंबळणाऱ्या भावभावना.

भारतापुरता विचार केला तर नव्या वर्षाच्या पूर्वार्धात येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका ही मोठी घटना ठरेल. राजकारण आणि अर्थकारण या दोन्ही बाबतींत लोकांचे लक्ष वेधलेले असते. त्यामुळे आपल्या निवडणुका आणि जागतिक स्तरावर चीन-अमेरिकेतील आर्थिक स्पर्धा अुत्सुकतेचा विषय आहेत. पर्यावरणाचा असमतोल तज्ज्ञांच्या चिंतेचा विषय झाला आहे, पण अमेरिकेसारखे संपन्न राष्ट्न् मुजोरपणे त्यासंबंधातले आंतरराष्ट्नीय करार झुगारून देण्याच्या पावित्र्यात आहे. आिंग्लंडने युरोपीय गटातून बाजूला होण्याचे परिणाम जगालाही त्रास देणारे ठरतील. कारण देशादेशांत सामंजस्य आणि सहकार्य वाढविण्यावर सारे जग अवलंबून राहण्याचा काळ येत असताना आपण स्वतंत्र सवते राहण्याने आपलेच प्रश्ण अवघड होतात, आणि त्याचा भार आितरांवरही  पडतोच.
वास्तविक भारतीय राष्ट्नीय दिनदर्शिका वेगळी आहे. ते नवे सौर वर्ष सध्याच्या २२ मार्चला सुरू होते. भारताच्या संसदेने त्यास मान्यता देअून देशभरात वापरण्यासाठी १९५२ साली लागू केले आहे, त्यास ७० वर्षे झाली तरीही आपण आिंग्रजी पद्धतीचे ग्रेगरियन क्रॅलेंडर वापरतो आहोत. आपले सौर क्रॅलेंडर मेघनाथ साहा या शास्त्रज्ञाच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीने अनेक कालमापन पद्धती अभ्यासून भारताची परंपरा, संस्कृती, ऋतुमान, खगोल, गणित, अनेक धर्मपंथ.... अशा साऱ्यांचा विचार करून तयार केले. शासकीय कागदपत्रांवर तसा भारतीय दिनांक नोंद केला जातो, परंतु आपण भारतीय करंटे नागरिक अजूनी ते स्वीकारीत नाही. ते जर शहाण्या सुजाणांनी गांभीर्याने घेतले तर आताचे नवे वर्ष आपले नव्हे असे होआील.

खरे तर वर्ष काय आणि दिनांक काय; आपल्या आयुष्यात तसे वेगळेपण काहीच देणार नाही. मनाचेच खेळ सारे. आपल्या (सु)दैवाने दिवाळी पाडव्याला, गुढीपाडव्याला, ०१ जानेवारीला आणि आता २२ मार्चलाही नवे वर्ष असते. शिवाय हिजरी वर्ष, पारशी नवे वर्ष यांचीही दखल असते. अेकदा तिथीने, अेकदा तारखेने वाढदिवस साजरे करण्यातला तो प्रकार! प्रत्यक्षात रोज वाढदिवस करायला तरी कुणाची हरकत असणार? आपल्या प्रौढत्वात, प्रगल्भतेत काही फरक पडला तर चांगले. अेरवी शुभेच्छा काय, द्याव्यात आणि घ्याव्यात!! त्या द्याव्यात तितक्या कमीच होतील.

मना सज्जना
प्रेरणेचं स्मरण जागतं हवं.
स्वामी विवेकानंद सर्वधर्म परिषदेसाठी शिकागो शहरात पोचले होते. त्यांना धर्मपरिषद सुरू होण्याची तारीख माहीत नव्हती. चौकशी केल्यावर कळालं की सुमारे २-३ महिन्यांनी धर्मपरिषदेला सुरुवात होणार आहे. स्वामीजींच्या ओळखीचे कोणीच नव्हते. जवळ पुरेसे पैसेही नव्हते. राहायला कोणी आसरा देईना. अनेक दिवस तुटपुंज्या खाण्यावर आणि आसऱ्याविना काढावे लागले. पण त्यांना एकदाही भारतात परत जाण्याचा विचार आला नाही. कसे दिवस काढले असतील? त्यानंतर हिंदुत्वाचा मृदंग सातासमुद्रापार वाजवून अवघं जग त्यांनी दणाणून सोडलं. जिच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हे सर्व साध्य केलं, या गोष्टीचं नाव आहे स्वयं-प्रेरणा!
बहुतेक पालक `मुलगा लवकर उठवलं तर पुन्हा झोपतो' अशी तक्रार हमखास करतात. शाळेच्या सहलीदिवशी किंवा दिवाळीच्या दिवशी तो असंच वागतो का? तेव्हाही त्याच्या झोपेची तक्रार असते का? सहल, दिवाळी या दिवशी त्याला उठवण्यासाठी कष्ट घ्यावे लागत नाहीत. हा बदल त्याच दिवशी कसा घडतो? याचं उत्तर आहे स्वयं-प्रेरणा. स्वयं-प्रेरणा म्हणजे बाह्य प्रेरणेच्या मदतीशिवाय, स्वत:ची आवड आणि /किंवा इच्छा यांमुळे कार्य करण्यासाठी प्रेरित करणारी प्रेरणा.
इतक्या महत्त्वाच्या जीवन-कौशल्याचा विकास कसा करायचा? तर सर्वांत पहिल्यांदा आपल्याला आपली आवड आणि इच्छा यांच्याबद्दल नीट माहिती असायला हवं. स्व-जाणीव चांगली असायला हवी. विवेकानंदांना सर्वधर्मपरिषदेत सहभागी होण्याची मनापासून इच्छा होती म्हणून त्यांनी सर्व त्रास सहन केला.
ज्यांना आवड, इच्छा असते आणि सुरुवातीला ते स्वयं प्रेरणेनं कार्य करतात पण थोड्याच कालावधीत ती प्रेरणा कमी होते. कारण त्या कार्यामागचं ध्येय लोक हळूहळू विसरून जातात. हे काम का करत आहोत, याची सतत जाणीव मनाशी ठेवतात ते सतत स्वयंप्रेरणा मिळवतात. म्हणून स्वत:ला आपण ते काम का करत आहोत, ती गोष्ट का करत आहोत ह्याचं कारण नेहमी विचारायचं. ज्यामुळे आपल्याला आपले ध्येय सतत स्मरणात राहते आणि स्वयं-प्रेरणा कमी होत नाही.
- अजिंक्य नितीन गोडसे, इचलकरंजी  फोन- ९६३७७४१८६५

ही देशाशी गद्दारी काय?
क्रॅनडा एवढा मोठा आणि निसर्गसंपत्तीनं भरलेला देश आहे की ती सगळी संपत्ती बाहेर काढण्यासाठी लागणारं मनुष्यबळ आपल्याकडे नाही, असं इथल्या सरकारला वाटतं. त्यातून बदलत्या कुटुंब व्यवस्थेमुळे आणि संबंधित समस्यांमुळे, आहे ती लोकसंख्याही कमी होते आहे. देशात तरुणांपेक्षा म्हाताऱ्यांचं प्रमाण वाढतेय. त्यामुळे इतर देशांतून स्थलांतर करणाऱ्यांना इथलं सरकार काही-बाही गाजरं दाखवत असतं. दरवर्षी  जवळजवळ दोन-तीन लाख लोकांची भर बाहेरून क्रॅनडात पडते. इथे वीज, लाकूड, इंधन, प्लास्टीक यांचा दरडोई वापर प्रचंड आहे. स्थलांतरित लोकांनाही ह्या सवयी इतक्या पट्कन अंगवळणी पडतात की अशा वेगानं - अगदी ओतप्रोत असली तरी, नैसर्गिक संपत्ती संपायला किती वेळ लागणार? - असा मला प्रश्न पडतो, पण त्यांच्या सरकारला अजूनी तरी तो पडलेला नाही.
शिकण्याच्या, नोकरीच्या निमित्तानं कितीतरी तरुण-तरुणी बाहेरून इथे येतात.. राहतात. वरकरणी पाहता ते इथे रुळलेले असतातही, पण मनानं पूर्णत: इथलेच झालेत असं नाही वाटत. विशेषत: आशियायी लोक, -चिनी, थाई, मलेशियन्स, हे भारतीय उपखंडातले इतर लोक, आपल्यासारखेच कुटुंबवत्सल आहेत. इथं एखाद्या वृद्धाला पाय लटपटत चालताना बघून, एखाद्या म्हातारीला एकटीनं बाजार करताना बघून नवीन आलेल्या लोकांना गाव आठवतं. गावाकडचे आपले आईवडील, काका-मावश्या आठवतात.
मागे राहिलेल्या आप्तांसाठी परत जायचं की मुलांच्या भविष्याकडे पाहून इथंच राहायचं अशा द्वंद्वात सापडलेले कितीतरी आशियायी लोक मला भेटले. `आता एकदा हे एवढं झालं - मग ते ऑफीसचं काम असेल, मुलांच्या शाळा-परीक्षा असेल - की निवांतपणे गावाकडे जाणार आहे' असे बहुतेकांचे मनसुबे असतात.... आणि दुसऱ्या दिवशीपासून सुरू होणाऱ्या धबडग्यात ते कोसळून जातात. मग गावाकडचं कोणी भेटलं की तेवढ्यापुरता त्यावरचा राखोडा उडतो.
इथली सुखासीनता अनुभवताना आपण आपल्या देशाशी गद्दारी तर करत नाही ना, अशी बोच कुठंतरी असते. कोणी सहजपणे मान्य करतो, कोणी समर्थन करतो. मला वाटतं स्थलांतर स्थित्यंतरातून जाणाऱ्या प्रत्येक पिढीला यातून जावं लागतंच. यांच्या मुलांना कदाचित असं नाही वाटायचं. ती इथलीच होऊन जातील.
क्रॅनडा किंवा अमेरिका, अस्ट्न्ेिलॉया, न्यूझीलंड या सगळयाच देशांबाबत म्हणायचं तर, इथं आलेले सगळेच तसे परके. कोणी तीन वर्षांपूर्वी आला, कोणी तीस तर कोणी तीनशे. मग हा देश गोऱ्यांचा, -किंवा आपला नाही असं कोणी ठरवलं? बाकीचा क्रॅनडा इंग्रजांचा असला तरी क्युबेकमध्ये बहुसंख्य फ्रेंच असल्यामुळं, ते राज्य फ्रेंचच राहिलं. अमरिकेत कित्येक ठिकाणी इंग्रजीपेक्षा स्पॅनीश जास्त चालते. कारण स्पॅनीश लोक तिथं गेले. लोकांबरोबर त्यांची भाषा, संस्कृती, पोषाख, खाद्यपदार्थ सगळंच येतं! आपल्याकडे नाही का उडपी आणि पंजाबी देशभर सगळीकडे पोचले. त्यामुळं इडली-डोसा आणि ढाबा सर्वत्र दिसतो. पण कांद्याचं थालीपीठ आणि पिठलं-भाकरी हल्ली महाराष्ट्नतही शोधावं लागतं. हल्ली तर हमरस्त्यांवर `भरलं वांगं आणि चुलीवरची भाकरी मिळेल' ही दुर्लभ वाटणारी स्पेशालिटी झाली आहे. देशाबाहेर पडणाऱ्यांमध्येही पंजाब्यांचं प्रमाण मोठं असल्यामुळं भारतीय जेवण किंवा पोशाख म्हणजे पंजाबी जेवण किंवा सलवार कुर्ता अशी बहुतेक गोऱ्यांची समजूत आहे.
आपण जर बाहेर पडलो नाही, जगासमोर आलोच नाही, तर मग आपल्यातलं चांगलं जगाला दिसणार कधी? जग ते मान्य करणार कसं? मग उगाचच माजघरात बसून `खरं तर आमची मराठी संस्कृती - खाद्यपदार्थ जास्त चांगले, पौष्टिक आहेत' वगैरे आपण कितीही `ऊर्ध्वबाहोर्विरोम्येष्य' सांगितलं तरी `न कश्चित श्रुणोति माम् ।' असंच व्हायचं! आमचा पिझ्झा-बर्गर किती चविष्ट आहे हे त्यांनी सांगितल्यामुळे आपल्यालाही तो आवडायला लागला आणि भाकरी-पिठल्याची चव आपण इतरांना दिलीच नाही त्यामुळं ते मात्र हळूहळू दुर्मीळ झालं.
इंग्रज-फ्रेंचांच्या बरोबरीनी जर मराठी लोक इथं येते, तर क्रॅनडाच्या एखाद्या राज्यात मराठी राज्यभाषा होती. मग त्याचा महाराष्ट्नला फायदा झाला असता की तोटा? आयआयटी, आयआयएम चे पदवीधर देशाबाहेर नोकऱ्या करतात त्यामुळं आपल्याकडे `ब्रेन-ड्न्ेन' होत असल्याची ओरड दहा वर्षांपूर्वीपर्यंत होती. त्यात तथ्यही होतं... पण आज कित्येक मोठ्या परदेशी कंपन्यांत भारतीय माणसं मोठ्या हुद्द्यावर आहेत त्याचा भारताला केवढा फायदा होतोय! किंबहुना भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोण सुधारला. आपल्या चवी, पोशाख, संस्कृती, योग याविषयी तथाकथित आधुनिक जगामध्ये आकर्षण निर्माण झालं, त्याचं बरंचसं श्रेय बाहेेर राहणाऱ्या भारतीयांना द्यावं लागेल. लाचलुचपत करणाऱ्या `निवासी' भारतीयांपेक्षा हे अनिवासी भारतीय नक्कीच देशाचा जास्त फायदा करून देताहेत. तरीही यांच्यावर गद्दारीचा शिक्का का मारला जातो बरं?
क्रॅनडाचा तर बऱ्याच राष्ट्नंशी दुहेरी नागरिकत्त्वाचा करार आहे. म्हणजे तुमच्या मूळ देशाचं नागरिकत्त्व रद्द न करता तुम्हाला क्रॅनडाचं नागरिकही होता येतं. महायुद्धानंतर राष्ट्नशी एकनिष्ठतेचे धडे घेत मोठ्या झालेल्या कित्येक युरोपियन राष्ट्नंनाही हे पचवायला सुरुवातीला जड गेलं. क्रॅनडाचं म्हणणं होतं, मुलगी लग्नानंतर सासरी येते म्हणजे काय माहेरशी गद्दारी करते काय? एकदा पाहण्याचा दृष्टिकोणच बदलल्यानंतर सगळंच बदलतं! आता तर वैश्विकरणाच्या लाटेत देशांच्या सीमाही पुसट होत चालल्यात.
-चारुदत्त आपटे, क्रॅनडा 



निसर्गातून `प्रगती'कडे
१९६३ साली माझ्या नोकरीत ओरिसामध्ये पुलांची कामे करण्यास गेलो होतो. ती जागा म्हणजे घनदाट जंगल. आमच्या लोकांना राहाण्यासाठी घरे बांधली, ती एका डोंगराच्या पायथ्याशी. तिथली जागा झाडे झुडपे तोडून साफ केली. खूप साप, विंचू निघाले. फार सावध राहून मजूर काम करत होते. रानडुकरे व हायना वावरत असत. मजुरांसाठी जी घरे बांधली त्यांच्या भिंतींसाठी चटया व छपरावर गवताचा वापर केला होता. इंजिनियर्स आणि सुपरवायझर्स साठी दोन खोल्या व न्हाणीघर जोडलेले असे होते. मी तिथे निवासी अभियंता होतो. माझे घर सर्वांपेक्षा चांगले होते. माझ्याकडे वरचेवर कुणी पाहुणे यायचे. त्यामुळे दोन शयनकक्ष, पाहुण्यांची खोली, भोजनकक्ष होता. सल्लागार कंपनीच्या इंजिनियरसाठी जवळ एक छोटे घरही होते. नदीजवळ मोठे ऑफीस बांधले होते.
घरे बांधून झाल्यावरसुद्धा साप, विंचू सतत निघायचे. विंचू व साप मारले जात. माझी पत्नी व दोन वर्षांचा मुलगा घरी असत. काळजी वाटत असे.
एकदा मी एकटा असताना ऑफीसला जाण्यास तयार होत होतो. थोड्याच वेळात फुस् - फुस् आवाज आला. पाहिले तर मोठा साप टेबलाखाली सरपटत होता. खोलीच्या कोपऱ्यात डॉइंर्ग्जच्या सुरळया उभ्या ठेवल्या होत्या. त्यांपैकी एका सुरळीत तो साप घुसला. मी नोकराला बोलावून सांगितले. तो धावत आला. सुरळीत घुसलेल्या सापाची थोडी शेपटी बाहेर आलेली होती. सुरळीला स्पर्श केल्याबरोबर सापाने शेपटीचा भाग वर घेतला त्यामुळे सोपे झाले.  सुरळीचे खालचे टोक व वरचे टोक घट्ट पकडले. आणि सुरळी दोन्ही बाजूंनी पकडून उचलली व बाहेर नेली. बाजूच्या लोकांना बोलावले. ते आल्यावर नोकराने हातात धरलेली सुरळी झटकली. त्यातून तो साप खाली पडला. त्याला लोकांनी मारले. सापाने फणा काढला. म्हणजे तो नाग होता हे समजले. त्याला ठार मारले; नंतर त्याचे विधिवत श्रद्धेने दहन केले.
एकदा गौहाटीहून दुसऱ्या पुलाच्या ठिकाणी जायचे होते. वाटेत एक जंगल लागते. एका माणसाने सांगितले की पुढे जंगल लागेल ते ५.३० च्या आत पार करून पुढे जाणे जरुरीचे आहे. आम्ही जंगलापर्यंत येण्यास ५.३० वाजून गेले. ट्न्क, गाड्या इ.. जात होत्या. आम्ही त्यांच्या मागे गेलो. पावणेसहा वाजले होते. जंगलात जाईपर्यंत तिथे बऱ्याच गाड्या थांबून राहिल्या होत्या. जंगलातले दोन मोठे हत्ती रस्त्यावर येऊन सर्व वाहतूक अडवून बसले होते. नेहमीच्या माहितगार लोकांपैकी काही ट्न्कवाल्यांनी चार-पाच उसाच्या मोळया रस्त्याच्या कडेला टाकल्या. ते पाहून ते हत्ती तोंड फिरवून ऊस खाण्यास पसार झाले. रस्ता मोकळा झाला आणि वाहतूक सुरू झाली. आमची गाडी नेली. ते जंगल अडचणीशिवाय पार केले.
ओरिसामध्ये व आसाममध्ये बरीच पुलाची कामे १९५० पासून चालू होती. पुलाच्या कामासाठी वाफेवर चालणारी मशीनरी होती. कामावर बॉयलर्स होते. वाफेच्या निर्मितीसाठी लाकडे लागत. ती आसामच्या जंगलातून आणावी लागत. लाकडे आणण्याचे ते काम हत्तींकडून करवून घ्यायचो. हत्तींच्या पायाला लाकडाचे मोठे आेंडके दोरखंडांनी बांधायचे. हत्ती चालू लागले की आपोआप आेंडके ओढले जायचे. या कामाची मजुरी दिवसाला फक्त रु.५ होती.
- मुकुंद करमरकर, वांद्रे (पूर्व)
फोन- ८४५१८२४६०७

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन